Friday, June 24, 2022

अनाहत सत्य (भाग 30) (समाप्त)

 अनाहत सत्य


30

"शेषा? जस्सी? काय झालं तुम्हाला?" गोविंद अस्वस्थपणे शेषा आणि जस्सी जवळ बसून त्या दोघांना उठवायचा प्रयत्न करत होता.

"काळजी करू नकोस. त्यांची शुद्ध हरपली आहे फक्त." नैना म्हणाली.

"पण का? तुला सतत काहीतरी दुष्ट अयोग्यच का करावंसं वाटतं नैना?" गोविंद चिडून म्हणाला.

"मूर्खासारखं बोलू नकोस गोविंद. मी काहीही केलेलं नाही. शांतपणे विचार केलास तर तुला लक्षात येईल की तुम्ही कोणीही सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर काहीही खाल्लेलं नाही. आता दुपारचे चार वाजून गेले आहेत. आयुष्याचं सत्य समजून घेताना शरीराची गरज विसरून चालत नाही महाराज गोविंदराज." नैना अत्यंत उपरोधक आवाजात म्हणाली. ती जे म्हणाली ते टोचलं असलं तरी ते सत्य गोविंदने मान्य केलं.

"संस्कृती, मी मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो. तू इथेच थांब." संस्कृतीकडे वळून गोविंद म्हणाला. संस्कृतीने नजरेनेच होकार दिला. महिकडे वळून गोविंदने विचारलं; "मही, आपल्या मागल्या अनेक आयुष्यांमध्ये काय काय घडलं हे याक्षणी तरी महत्वाचं नाही. एकामागोमाग एक घडणाऱ्या या घटनांमुळे आम्ही सगळेच सैरभैर झालो आहोत. त्यात नैना म्हणते त्याप्रमाणे आम्ही काहीही खाल्लेलं नाही हे देखील खरं आहे. इथे जवळपास पाणी देखील दिसत नाहीय. तू मला मदत करशील का? जस्सी आणि शेषाला एका बाजूला बसतं करूया आणि मग मी त्यांच्यासाठी जाऊन पाणी घेऊन येतो अगोदर. एकदा ते जागे झाले की मग पुढचं पाहू."

महिने होकारार्थी मान हलवली आणि जस्सी, शेषाला बसतं करण्यासाठी गोविंदला मदत केली. गोविंद संस्कृती जवळ आला आणि म्हणाला; "इथेच थांबशील न? मी आलोच."

"अजिबात चिंता करू नकोस गोविंद. मी आहे इथे." अगदी शांत आवाजात संस्कृती म्हणाली. तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखं करून गोविंद तिथून निघाला.

"थांबा. मी देखील येतो. इथे बाहेर बरेच स्टॉल्स आहेत. तिथे तुम्हाला थोडं खायला मिळेल आणि पाणी देखील." मही म्हणाला आणि एकदा नैनाकडे बघून गोविंद सोबत निघाला.

हे सगळं घडत असताना नैना मात्र एका बाजूला हाताची घडी घालून शांत उभी होती. गोविंद आणि मही तिथून निघाले आणि संस्कृती नैनासमोर येऊन उभी राहिली.

"आपल्याला निघायला हवं अपाला." नैना अत्यंत शांत आवाजात म्हणाली.

"तुला माहीत आहे नैना मी तुझ्या सोबत कुठेही येणार नाही आहे. मला माहीत आहे; आमची जी काही चर्चा इथे झाली ती सगळी तू ऐकली आहेस. भीमाने एका अर्थी माझ्यावर केलेले आरोप देखील तुला माहीत आहेत; आणि ते काही अंशी सत्य आहेत हे देखील मी मान्य करते. त्यामागील कारण हे संपूर्णपणे माझं होतं. केवळ गोविंदच नाही तर अपाला देखील भावनिक झाली होती; हे सत्यच तर आहे. हो! मला माझ्या गोठवलेल्या जीवनापेक्षा माझं आणि गोविंदचं एकत्र येणं जास्त महत्वाचं वाटतं होतं. कुंजरला मोठं होताना मला बघायचं होतं. हळूहळू होणारी वृद्धत्वाकडची वाटचाल मला हवी होती. तीक्ष्णा हे वाटणं योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही. कारण मला आजही हे सगळं हवं आहे; आणि त्यासाठी मी आज देखील तुझ्या विरोधात जायला तयार आहे." संस्कृती म्हणाली.

"अपाला; त्यावेळी कदाचित मी कमी पडले तुला काहीही समजावायला. कारण कदाचित गोविंद म्हणतो त्याप्रमाणे माझा इगो मोठा होता. पण तू जाणतेस. आता मात्र असं काही नाही आहे. मी तुला शोधण्यासाठी अनेक जन्म घेतले आहेत. या अनेक मानवीय जन्मांमध्ये माझा 'स्व' विरघळून गेला आहे. केवळ तुला परत नेण्यासाठी मी इथे आले आहे. त्यात देखील माझा स्वार्थ नाही आहे ग. अपाला; कदाचित तू विसरली आहेस; म्हणून परत एकदा तुला आठवण करून देते.... आपण मानवीय उत्क्रांतीमधल्या एका खास टप्यातले मानव आहोत. आपण म्हणजे एका मानवीय उत्क्रांती टप्प्यातील संपूर्ण समूहातील 'काही' खास आहोत ग. आपण ठरवून केवळ बौध्दिकतेला महत्व देऊन भावनिकता दूर सारत या निसर्गसुंदर वसुंधरेला जपण्यासाठी आपलं आयुष्य देण्याचा निर्णय घेणारे आहोत. उत्क्रांतीच्या उच्चतम बिंदूला पोहोचल्यानंतर स्वतःचा ह्रास होऊ न देता त्या उच्चतम बिंदूवर स्वतःला गोठवून टाकणारे 'काही' आहोत. आपण उत्क्रांतीची सुरवात आहोत; परमोच्च बिंदूवरील अत्यंत प्रगत मानव आहोत. हे आठव की आपण अनेक संस्कृती बघितल्या आहेत आणि बघणार देखील आहोत.

अपाला, तुला देखील माहीत आहे की आपल्यासाठी उत्क्रांती हा केवळ एक शब्द नाही... ती एक स्थिती आहे. त्या स्थितीला पोहोचण्यासाठी अनेक सहस्त्र आयुष्यांचा काळ जावा लागतो; तो काळ, ते दुःख, त्यावेळी आपल्यातून हरवलेले अनेक आपले जवळचे तू कशी विसरू शकतेस? आपल्यामध्ये हळूहळू बदल होत होते. नैसर्गिक पध्दतीने आपल्यात अशी काही गुणसूत्र निर्माण झाली की ज्यामुळे आपण भावनांपासून दूर गेलो. पण म्हणूनच आपण कोणत्याही विषयांच्या गर्भापर्यंत पोहोचू शकलो. त्यातूनच ग्रह-तारे, हे विश्व, ही वसुंधरा आणि तिच्या पोटातील अनेक गुपितं याविषयीचं ज्ञान आपल्याला उमगलं. त्यासोबतच निर्मिती आणि जपवणुक यांचं महत्व समजलं. ज्यांच्या गुणसूत्रांमध्ये असे बदल नाही झाले ते सर्वचजण सर्वसामान्य मानव राहिले. जशी तू वेगळी झालीस.... अपाला.... तसा गोविंद सर्वसामान्य मानवाचा प्रतिनिधी होतो.

अपाला, प्लीज आठव, आपल्या मानवीय प्रजातीमधल्या काही प्रमुखांनी निर्णय घेऊन आपले गट बनवले आणि पृथ्वीवरच्या विविध प्रदेशात आपण विखरून राहू लागलो. आताचे ग्रीस, इजिप्त हे असे काही देश की जिथे आपण आपलं वेगळेपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिलं. अर्थात त्याचं कारण आपल्यासाठी स्पष्ट होतं. जे समूह विविध ठिकाणी होते; त्या आपण सर्वांनी ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या मदतीने एकमेकांशी संपर्क ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अपाला; आपल्या गोठवण्याच्या काळातली एक तरी घटना तुला आठवते आहे का ग? त्यावेळी आपण आपल्या वसुंधरे बाहेरील जीवांशी देखील जोडले गेले होतो. म्हणूनच तर त्यावेळी अनेक मोठ्या निर्मिती आपल्याला सहज शक्य होत होत्या. अर्थात या निर्मिती आपण करत होतो. काहीशी त्यांची मदत घेऊन. अपाला, यासर्वाची जवाबदारी माझ्यावर होती; आणि तू..... तू यासर्वांमध्ये मला बिनशर्त स्वतःहून साथ देत होतीस. तुझं माझ्या सोबत असणं ही माझी गरज होती. अर्थात एका उदात्त हेतूसाठी. म्हणून तर तुझं राजकुमार गोविंदराज सोबत जाणं मला मान्य नव्हतं. अपाला...... संस्कृती...... तुला यातलं काहीच आठवत नाही का ग?

खरं सांगू? मी गेले अनेक जन्म स्वतःला दूषणं देत जगले आहे. या गुंफा.... ही लेणी... हे श्रीशिव मंदिर बांधणे हा माझा आग्रह होता. त्यावेळी आपण भारताच्या उत्तरेकडे होतो. म्हणून तर भीमाला श्लोक लिहिण्यासाठी तिथली गुंफा योग्य वाटली. पण त्याबाजूला अनेक नैसर्गिक बदल होत होते. त्यामुळे आपला इतरांशी होणारा संपर्क सतत तुटायला लागला होता. त्याचवेळी आपण इथे भूगर्भात नगर वसवलं होतं. पण ते वापरात नसल्याने तिथल्या वायुवीजनाची स्थिती चांगली नव्हती. माझा विश्वास होता की वायुविजन तू योग्य करशील. म्हणूनच मी इथेच येण्याचा आग्रह केला. सगळं कसं नीट चालू होतं. त्याचवेळी भूतप्रमुखांनी मला एक विचार बोलून दाखवला की जर सर्वसामान्य मानवातील योग्य व्यक्तीला आपण योग्य मार्गाने संगोपन केलं.... वाढवलं.... तर कदाचित भविष्यात आपल्याला सतत भूपृष्ठावर येण्याची गरज उरणार नाही. कदाचित आपल्या असण्याची देखील गरज उरणार नाही. मला देखील तो विचार पटला होता आणि म्हणूनच मी महाराज कृष्णराज यांच्याकडे राजकुमार गोविंदराजने आपल्या सोबत राहून काही धडे घ्यावेत हे सुचवलं. दुर्दैवाने राजकुमार गोविंदराज अति भावनिक निघाला. मी माझ्या मनात ठरवलेल्या प्रमाणे काही झालं नाही.... पण त्याहून देखील जास्त मोठं दुःख मला हे आहे की तू तुझ्या कर्तव्यापासून दूर गेलीस. तू माझा विरोध नव्हतीस करत अपाला, तू एका विस्तृत संस्कृतीचा.... तुझ्या खऱ्या अस्तित्वाचा विरोध करत होतीस....."

नैना अजूनही बोलली असती. पण संस्कृतीने तिला थांबवलं आणि म्हणाली; "नैना... तू विसरते आहेस की मी अपाला नाही; संस्कृती आहे. हे सातवं शतक नाही.... हे दोन हजार एक आहे. खूप काही बदललं आहे नैना. पण माझे त्या काळातले विचार मात्र बदललेले नाहीत. मी तेव्हा देखील गोविंदवर खूप प्रेम करत होते आणि आज देखील माझं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की मी त्याला सोडून तुझ्या सोबत येणार नाही. त्यामुळे तू मला काहीही समजावण्याचा त्रास करून घेऊन नकोस."

संस्कृतीच्या बोलण्याचा नैनावर खूप मोठा परिणाम झाला. काही क्षणांसाठी तिचा चेहेरा दुःखी झाला. पण मग तिने स्वतःला सावरलं आणि संस्कृतीकडे बघत ती म्हणाली; "हाच जर तुझा निर्णय असेल संस्कृती तर काहीच हरकत नाही. तुला परत परत जन्म घ्यावा लागेल आणि मला देखील. माझी तयारी आहे..... तुला चॉईस नाही. मागील वेळी जे झालं तेच होणार असं दिसतं."

नैनाचा आवाज कमालीचा थंड होता. तिच्या त्या बोलण्याचा परिणाम संस्कृतीवर लगेच झाला. "काय म्हणायचं आहे तुला नैना?" संस्कृतीने नैनाला विचारलं.

"काहीच नाही संस्कृती. येते मी. आपण भेटूच.... भेटत राहूच." असं म्हणून नैना वळली आणि निघून गेली. तिला पाठमोरी जाताना संस्कृती बघत होती.... आणि नैनाच्या मनात नक्की काय चालू असेल याचा विचार करत होती.

नैना जात असतानाच संस्कृतीला गोविंद समोरून येताना दिसला. तिची नजर एका क्षणासाठी नैनावरून हलली. पण संस्कृतीने परत नैना ज्या दिशेने जात होती तिथे नजर वळवली तर नैना तिला कुठेही दिसली नाही. अर्थात आता तिला त्याचं कारण शोधायची इच्छा नव्हती. गोविंद पाणी घेऊन आला होता. संस्कृती आणि गोविंदने मिळून जस्सी आणि शेषाला शुद्धीत आणलं आणि दोघांना आधार देत लेण्यांच्या बाहेर आणलं. त्यांनी जी गाडी नक्की केली होती त्याचा ड्रायव्हर तिथे तयारच होता. चौघेही गाडीत बसले आणि त्यांनी गाडी हॉटेलच्या दिशेने न्यायला सांगितलं.

***

"आपण इथे राहण्याचं काहीच कारण नाही आता." हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सरळ जेवायलाच गेले होते चौघेही. थोडं खाल्ल्यावर जस्सीच्या अंगात बळ आलं आणि त्याने स्वतःचं मत सांगितलं.

"खरंय. निघुया इथून. आपल्या त्या काळातल्या असण्याचं कारण आता आपल्याला कळलं आहे. त्या श्लोकाचा अर्थ देखील कळला आहे. पुढे काय हे अजून आपल्याला माहीत नाही. पण काय असेल ते ठरवायला आपण इथेच राहिलं पाहिजे असं नाही." शेषा म्हणाला.

"खरंय." गोविंद म्हणाला आणि त्याने अपेक्षेने संस्कृतीकडे बघितलं.

संस्कृती स्वतःच्याच विचारात होती. ती काहीच बोलत नाही पाहून गोविंदने तिला हलवलं. "संस्कृती कसला विचार करते आहेस?"

संस्कृतीने एकदा तिघांकडे बघितलं आणि म्हणाली; "खरं सांगू? माझ्या मनात अजूनही काही प्रश्न आहेतच. जस्सीला आणि शेषाला त्यांच्या पुनर्जन्माचं कारण समजलं आहे. आता त्यांना परत जन्म घेण्याची गरज उरली नाहीय. याचा अर्थ आता ते हा जन्म पूर्णपणे उपभोगून कदाचित अनंतात विलीन होतील. पण माझं गोविंदचं काय?"

"तुझं माझं काय संस्कृती? तू जे उत्तर नैनाला दिलंस न तेच आपलं सत्य नाही का? आपण सातव्या शतकात एकत्र येऊ शकलो नाही कारण तीक्ष्णाच्या हातात अनेक गोष्टी होत्या. अनेक शक्ती होत्या. तो काळच वेगळा होता. पण आता सगळंच बदलून गेलं आहे न? आपल्याला त्याकाळातलं आपलं सत्य कळलंय आणि या काळातल्या नैनाच्या हातात असं काहीच नाही की ती आपलं काही नुकसान करू शकेल. आताचे कायदे वेगळे आहेत संस्कृती. कोणी उठलं आणि मनात आलं म्हणून दुसऱ्याला संपवलं असं होणं शक्य नाही. त्यामुळे आपण देखील आपलं या जन्मातलं आयुष्य जस्सी आणि शेषा सोबत पूर्णपणे जगणार आहोत.... उपभोगणर आहोत. याहून जास्त काही विचार नको करुस संस्कृती." गोविंद म्हणाला आणि त्याने संस्कृतीचा हात प्रेमाने हातात घेतला.

"पण...." संस्कृती काहीतरी बोलणार होती. पण तिला थांबवत गोविंद म्हणाला; "खरंच आता काही फाटे नको फोडूस संस्कृती. जस्सी म्हणतो आहे तेच बरोबर वाटतं आहे मला. आपल्यासाठी इथे काहीही उरलेलं नाही. त्यामुळे चला... आपण निघुया इथून उद्याच."

"अरे पण आपल्या परतीच्या तिकिटांची सोय कुठे केली आहे आपण अजून?" शेषाने प्रश्न केला.

"अरे त्यात काय.... आठ दहा तासांचा तर प्रवास आहे. विमान नाही तर आपण गाडी घेऊ भाड्याने आणि निघू. पण उद्याच निघायचं हे नक्की." हसत गोविंद म्हणाला आणि चौघांनीही ते मान्य केलं.

***

दोन दिवसांनंतर नैना लायब्ररीमध्ये पोहोचली. समोरच्या रॅकवर ताजी वर्तमानपत्र ठेवली होती. त्यातलं एक तिने उचललं आणि आत लायब्ररीमध्ये जाऊन बसली. वर्तमानपत्राच्या दुसऱ्याच पानावर एक बातमी होती. औरंगाबाद ते मुंबई या महामार्गाचे काम सुरू असताना एका मोठ्या गाडीचा अपघात आदल्या दिवशी झाला होता आणि त्यात तीन तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. ती बातमी वाचून नैनाने वर्तमानपत्र तिथेच ठेवलं आणि ती लायब्ररी बाहेर पडली.

नैना तिची डॉक्टरेट पूर्ण करायला कधीच आली नाही.... त्यासंदर्भात तिने महाविद्यालयाला काहीच कळवलं देखील नाही.

***

निर्मितीचा जन्म झाला आणि तिच्या आई वाडीलांसमोबत वहिनी देखील खूप खुश झाल्या होत्या. तिची वेगळी आवड जरी तिच्या विहिनींना आणि आईच्या जीवाला घोर लावत होती तरी तिच्या वडिलांनी तिला कायमच पाठबळ दिलं होतं.

म्हणूनच आज ती प्रोफेसर राणेंसोबत मिठठू समोर बसली होती.

"संस्कृती, गोविंद, जस्सी आणि शेषाचा मृत्यू अपघातात झाला न?" निर्मितीने मिठठूकडे बघून प्रश्न केला.

"हो! तुला शंका आहे का दिदी?" मिठठू थेट निर्मितीकडे बघत म्हणाला.

"अजिबात नाही. माझ्या मनात दुसराच प्रश्न आहे मिठठू." निर्मिती अत्यंत शांत आवाजात म्हणाली.

"तू विचार दिदी. मला जमलं तर नक्की उत्तर देईन." मिठठू देखील तितक्याच शांतपणे म्हणाला.

"आपण तिघेही नक्की कोण कोण आहोत मिठठू?" निर्मितीने प्रश्न केला आणि प्रोफेसर राणे एकदम उभे राहिले.

"सर..... नैना.... भागीनेय तीक्ष्णा इतकं अस्वस्थ होण्यासारखं काहीच नाहीय." मिठठू अजूनही अत्यंत शांत आवाजात बोलत होता. त्याच्या आवाजातला शांतपणा जाणवून प्रोफेसर राणे खाली बसले.

"सर, निर्णय केवळ अपाला, संस्कृती..... निर्मिती घेणार आहे. खूप काही बदललं आहे या गेल्या एकवीस वर्षांत. आज भारत एका अशा वळणावर उभा आहे की यापुढे त्याला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाहीय. त्यावेळी राजकुमार गोविंदराजचा विचार ज्याकरणासाठी केला गेला होता.... त्याच विचारांची पूर्तता आपल्या भूतप्रमुखांनी वेगळ्या मार्गाने केली आहे. आज भारत .... आणि केवळ भारतच नाही; तर संपूर्ण पृथ्वी योग्य मार्गाने पुढे जाते आहे. त्यामुळे आपण तिघांनी परतीचा मार्ग स्वीकारायला काहीच हरकत नाहीय. अर्थात, तुम्ही आणि मी तयार आहोत. निर्मितीला जर अजूनही वेगळा विचार करायचा असेल तर ती तिची इच्छा असू शकते." मिठठू बोलायचा थांबला आणि त्याने निर्मितीकडे बघितलं.

"भीमा.... मला वाटलं होतं तू कायम माझी साथ देशील." निर्मिती मिठठूकडे बघत म्हणाली.

"त्याने कायमच तुझी साथ दिली आहे अपाला. प्रत्येकवेळी तुझ्या सोबत राहिला आहे तो. यावेळी फक्त मी एक बदल केला आहे." ताठ उभं राहात तीक्ष्णा म्हणाली. "गोविंदला तुझ्या आयुष्यात मी येऊ दिलेलं नाही अपाला. या जन्मात मी तुझ्या लहान वयापासूनच तुझ्यावर लक्ष ठेवण्यात यशस्वी झालो. मला योग्य वाटत होतं त्याप्रमाणे मी तुला मार्ग दाखवत गेलो आणि तुला देखील आपल्यातला खरा कनेक्ट कायम जाणवत असावा. कारण तू देखील कुठेही लक्ष न देता मी सांगितल्या प्रमाणे वाचन ठेवलं होतंस. अपाला.... निर्मिती.... आज मी तुला तोच प्रश्न परत विचारतो आहे.... या मंदिराच्या दारातून आपण आज प्रवेश करू तो परत न येण्यासाठी. तुला हे मान्य आहे का? आपल्या भूतप्रमुखांनी जरी अनेक गोष्टी मार्गी लावल्या असल्या तरी; तुझ्या अपाला असण्याला जे कारण होतं ते आज देखील तितकंच खरं आहे. तुला तुझी जवाबदारी मान्य आहे का? तरच पाऊल उचल निर्मिती."

निर्मिती मंद हसली आणि प्रोफेसर राण्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. "सर, जर मी आजही नकार दिला तर परत अजून पंचवीस वर्षांनी आपण असेच एकमेकांच्या पुढे उभे असू हे सत्य आहे. तुम्ही मला परत घेऊन जाण्याची प्रतिज्ञा केली आहे; हे आता माझ्या लक्षात येतं आहे. पण तरीही मी कदाचित नकार दिला असता. पण सर, तुमच्याच प्रयत्नांमुळे आज माझ्या आयुष्यात गोविंद नाही. माझी कुठेही भावनिक गुंतवणूक नाही. त्यामुळे मी तुमच्या सोबत आणि भीमासोबत परत एकदा अपालाचं आयुष्य स्वीकारायला तयार आहे."

निर्मितीचं बोलणं संपलं आणि प्रोफेसर राणेंनी मंद हसत तिच्याकडे बघितलं.

तीक्ष्णा, अपाला आणि भीमा ज्यावेळी त्या मंदिराच्या प्रवेश द्वारातून आत जात होते त्यावेळी आजूबाजूचा निसर्ग पराकोटीचा स्थब्द झाला होता. जणूकाही एक मोठं पर्व कायमचं संपलं होतं; याचीच ती खूण तर नव्हती न?

समाप्त






No comments:

Post a Comment