अनाहत सत्य
भाग 29
मही, शेषा आणि जस्सी समोरच बसले होते. पण आता सर्वांची नजर बदलली होती. प्रत्येकाला एकमेकांची ओळख पटली होती.... त्या जन्मातली.
"जस्सी... तुझं अपालावर प्रेम होतं; पण म्हणजे नक्की काय? तू तर गोविंद आणि अपालाने एक व्हावं यासाठी सतत प्रयत्न करत होतास." शेषाने जस्सीकडे बघून प्रश्न केला.
काहीसं मंद हसत जस्सी म्हणाला; "तुला नाही कळणार शेषा..... कारण त्यावेळी नाथाच्या मनात असलेला संशय आता परत तुझ्या मनात निर्माण झाला आहे. भिमाच्या मनातल्या अपाला बद्दलच्या भावना समजून घेण्यासाठी मनात कोणताही किंतु असून चालणार नाही."
महीची नजर आता अजूनच कठोर झाली होती. "तीक्ष्णाच्या वागण्याचा अर्थ तरी सांगशील का भीमा?"
जस्सीच्या चेहेऱ्यावर अजूनही तेच मंद हसू होतं. "तिनेच तर सांगितला होता अर्थ."
मही त्या उत्तराने काहीसा चिडला आणि म्हणाला; "भीमा, उत्तर टाळू नकोस. कारण तुला माझा प्रश्न कळला आहे. तीक्ष्णाने अपालाला विरोध का केला हा माझा प्रश्नच नाही. गेले अनेक जन्म मी या लेण्यांमध्ये अडकून पडलो आहे; ते केवळ एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही म्हणून."
आता भीमाचा चेहेरा थोडा गंभीर झाला. "मी नक्की उत्तर देईन तुमच्या प्रश्नाचं. तुमचा हक्कच आहे सत्य समजून घेण्याचा. पण त्यागोदर तुम्ही आम्हाला पूर्ण सत्य सांगा."
भिमाची ही मागणी पूर्ण होत असतानाच संस्कृती आणि गोविंद देखील गुंफेमधून बाहेर आले. दोघांचेही चेहेरे हसरे प्रसन्न होते. त्यांचे हात एकमेकांमध्ये गुंतले होते. त्यांच्यातलं प्रेम जस्सी आणि शेषाला माहीत होतं; पण ते असं दोघांनी सहज उघडपणे पहिल्यांदाच स्वीकारलं होतं. त्यादोघांकडे बघून जस्सीने हाय केलं. शेषा मात्र उठून त्यांच्या दिशेने गेला. शेषाला पाहाताच संस्कृतीचा चेहेरा बदलला.
"नाथा...... माझा कुंजर?" डोळ्यातलं पाणी मोकळेपणी वाहू देत संस्कृतीने प्रश्न केला.
"मला माहीत असतं तर लगेच सांगितलं असतं ग मी." तितक्याच भावूक आवाजात शेषा म्हणाला.
"मी सांगतो." मही म्हणाला आणि सगळ्यांनी वळून त्याच्याकडे बघितलं. "महाराज कृष्णराज यांच्या दृष्टांता प्रमाणे श्रीशंभो कैलास मंदिर निर्मिती नंतर जो हसतांतरण सोहळा झाला त्याला गालबोट लागलंच. अर्थात यामध्ये महाराज कृष्णराज यांनी त्यांच्या स्वतःच्या सुमंतावर आणि अत्यंत जवळच्या मित्रावर केलेला अविश्वास हे मोठं कारण होतं."
"नाही सुमंत कल्याण." गोविंद म्हणाला. "तुमच्या मनातली अढी ना महाराज कृष्णराज यांना दूर करता आली ना मला."
काहीशा क्रुद्ध नजरेने गोविंदकडे बघत मही म्हणाला; "अपालाच्या मृत्यूनंतर आपण कधी शुद्धीत होतात का राजकुमार?"
महीच्या त्या बोलण्याने गोविंद एकदम चिडला. "तोंड सांभाळून बोला सुमंत. अपालाच्या अकाली मृत्यूमुळे मी पूर्ण मोडून गेलो होतो; हे जितकं सत्य आहे तितकंच खरं हे देखील आहे की मला वेड लागलं नव्हतं. तुम्ही चांगलंच जाणता ते. सुमंत कल्याण, महाराज कृष्णराज माझा राज्यभिषेक करून जनकल्याणाच्या विचाराने राज्य व्याप्ती करण्यासाठी निघाल्यानंतर तुम्ही माझ्या धाकट्या भावासोबत.... ध्रुव धरावर्ष सोबत संगनमत केलंत आणि मला भ्रमिष्ट ठरवलं. मला राजसिंव्हासनावर बसवून तुम्ही आणि ध्रुव धरावर्ष दोघांनी मिळून राज्यकारभार चालवायला सुरवात केलीत. त्यावेळी मी जगत होतो ते केवळ राजकुमार कुंजरराजकडे बघून."
"ओह... माझा कुंजर.... राजकुमार कुंजरराज...." संस्कृतीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. पण आता चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. त्यावर आनंद पसरला होता. माता ही एकदा बाळाला जन्म दिला की कायमच ममत्वाची मूर्ती होते; याचं उदाहरण सर्वांना दिसत होतं.
"हो संस्कृती. आपला कुंजर.... राजकुमार कुंजरराज. तुझा पुत्र. तुझ्या हाडामासा पासून बनलेला एक तेजस्वी राजकुमार. वयाच्या केवळ बाराव्या वर्षी त्याने त्याच्या काका सोबत ध्रुव धरावर्ष सोबत राज्यकारभारात लक्ष घालायला सुरवात केली. तो माझ्यासारखा भावनिक नव्हता. अत्यंत हुशार, निधड्या छातीचा तरुण होता; आणि दुर्दैवाने त्याचे हेच गुण त्याच्या आड आले ग."
"म्हणजे?" संस्कृती, जस्सी आणि शेषाने एकाचवेळी प्रश्न केला.
त्या तिघांकडे एकदा बघून गोविंदने महीच्या दिशेने बघितलं आणि म्हणाला; "सुमंत कल्याण, जे घडलं त्यानंतर मोठा काळ लोटला आहे. तुमचा दोष असला तरी देखील आता तुमच्या विरोधात काहीही होणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही काय ते सत्य सांगितलंत तर बरं होईल."
"महाराज गोविंदराज. मी आपला क्रोध समजू शकतो. मी हे देखील मान्य करतो की आपले धाकटे बंधू ध्रुव धरावर्ष यांच्या सोबतीने मी काही निर्णय घेतले देखील. ते अयोग्य होते हे खूप नंतर मला कळलं. पण माझा उद्देश अत्यंत स्पष्ट होता. त्यामुळे मला त्यावेळी देखील माझी चूक आहे असं कधी वाटलं नाही.... ना आता मी ते मान्य करेन." मही बोलायला लागला. "महाराज गोविंदराज, आपण कायमच भावनिक राहिलात. आपण राज्यकारभाराचा स्वीकार देखील राजकुमार कुंजरराज यांच्याकडे बघून केला होतात. हे त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला माहीत होतं. अर्थात ते योग्यच होतं. राजकुमार कुंजरराज हेच तुमचे योग्य उत्तराधिकारी होते. ते पूर्ण मोठे होऊन राज्यकारभारात निपुण होत नाहीत तोपर्यंतच मी आपले बंधू ध्रुव धरावर्ष यांच्या सोबत राजकारभार चालविन असं त्यांना सांगितलं होतं. सुरवातीला आपल्या बंधूंना देखील ते मान्य होतं. परंतु राजकुमार कुंजरराज यांची सर्वच विद्यांमधली अश्वगती पाहून आपल्या बंधूंच्या मनात काळ नितीने प्रवेश केला. राजकुमार कुंजरराज यांना सोबत घेऊन ते शिकारीला गेले; याची तुम्हाला जशी कल्पना नव्हती तशी मला देखील नव्हती महाराज. ज्याप्रमाणे राजकुमार अभिमन्यु यांना चक्रव्यूहात अडकवून त्यांचा घात केला गेला; त्याचप्रमाणे राजकुमार कुंजरराज नाहीसे झाले."
"माझा कुंजर....." संस्कृतीचे डोळे परत एकदा वाहू लागले. जस्सी आणि शेषा देखील स्वतःचा बांध थांबवू शकले नाहीत.
"हो! माझा कुंजर कधीच परत आला नाही. त्या दुःखात मी अंथरुणाला खिळलो." गोविंदचा आवाज देखील अत्यंत दुःखी होता.
"नाही महाराज." महीचा आवाज अत्यंत खोलातून आल्यासारखा होता. "तुम्हाला विषप्रयोग झाला होता."
"काय?" गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा एकाचवेळी ओरडले.
"हेच सत्य आहे." मही म्हणाला. "महाराज, जनतेला तुमच्या भावनिकतेची कल्पना होती. त्यामुळे तुमचं दुःखच तुम्हाला आजारी पाडतं आहे; याविषयी सर्वांची खात्री होती. अगदी माझी देखील. राजकुमार कुंजरराज यांचा घात आपल्या बंधूनी केला; याविषयी माझ्या मनात संशय असला तरी तसा कोणताही पुरावा मला मिळत नव्हता."
"कारण तुम्ही तोपर्यंत पराकोटीचे संशयी झाला होतात." अचानक शेषा म्हणाला.
महीने अत्यंत रागाने शेषाकडे बघितलं. "मही.... तू इथे या काळामध्ये सुमंत कल्याण नाहीस आणि मी नाथ नाही. त्यामुळे मी तुला घाबरत नाही. जे सत्य आहे ते संगण्यापासून आता मला कोणी थांबवू देखील शकत नाही. गोविंद, संस्कृती, जस्सी.... मी सांगतो पुढील सत्य. महाराज गोविंदराज अंथरुणाला खिळले होते. दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावत होती. त्यांना कोणत्याही औषधाने उतारा मिळत नव्हता. महाराज गोविंदराज भावनिक होते; आणि हेच त्यांचं बल स्थान होतं. अपाला आणि त्यानंतर राजकुमार कुंजरराज असे त्यांच्या हृदयाचे दोन्ही भाग अनंतात विलीन झाल्यानंतर त्यांनी मनापासून ठरवलं होतं की आता केवळ प्रजेसाठी जगायचं. मात्र त्यांच्या बंधूंच्या मनात निर्माण झालेली राजगाडीची इच्छा त्यांना माहीत नव्हती. त्यामुळे जे औषध समोर येत होतं ते महाराज घेत होते."
"तू....." मही काहीतरी बोलणार होता.
"अहं! माझी पत्नी." काहीसं कुत्सित हसत शेषा म्हणाला.
"म्हणजे तू?" महीच्या डोळ्यात आश्चर्य होतं.
"हो! मी मुख्य नगरापासून लांब एका गावात एक उपरं आणि अज्ञात आयुष्य जगत होतो. अर्थात तरीही मी खुश होतो. कारण माझा मित्र राज्याचा कारभार बघत होता आणि माझा कुंजर अत्यंत योग्य प्रकारे मोठा होत होता. पण मग कुंजर गेला आणि गोविंद देखील.... मी माझ्या पत्नीला आग्रह पूर्वक महाराज गोविंदराज यांच्या अंत:पुरात कामाला रुजू करवल. तिच्याकडून मला सत्य कळत होतं. पण त्याकाळातल्या नाथाच्या हातात काहीच नव्हतं. त्याचा मित्र तिळ तिळ मरतो आहे; हे कळत असूनही तो काही करू शकत नव्हता. आणि सुमंत कल्याण एका वेगळ्याच विश्वात होते. महाराज गोविंदराज यांच्याशी प्रामाणिक न राहिल्याचं दुःख आणि राजकुमार कुंजरराज सारखा अत्यंत योग्य उत्तराधिकारी अचानक नाहीसा झाल्याचं दुःख यामुळे सुमंत कल्याण मोडून गेले. नाथा सारख्या अनेक प्रामाणिक आणि निष्ठावान लोकांना सुमंत कल्याण यांनी केवळ राजकारणाचा भाग म्हणून दूर केलं होतं. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. अर्थात ते देखील कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते. महाराजांचे बंधू ध्रुव धरावर्ष यांच्या तर ते पथ्यावरच पडलं. महाराज गोविंदराज यांना देवाज्ञा झाली; त्यानंतर काही दिवसातच सुमंत कल्याण यांना वानप्रस्थाश्रमासाठी पाठवलं गेलं. सुमंतांनी देखील ते स्वीकारलं. कारण........ मनातलं गिल्ट." शेषा म्हणाला.
"गिल्ट?" जस्सी.
"अपराधी भावना रे जस्सी." शेषा म्हणाला.
"ओह! मी इतका अडकलो आहे तुझ्या कथनामध्ये... शब्दाचा अर्थच कळला नाही मला. पण बरं झालं तू तो शब्द वापरलास. परत आलो या काळात मी." जस्सी म्हणाला आणि शेषाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"सगळं खरं आहे हे. मी मान्यच करतो आहे न; माझे निर्णय चुकले होते. पण तरीही मी या जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकलो आहे... हे सत्यच आहे न." मही म्हणाला.
"कारण तुला तीक्ष्णाच्या वागण्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे मही. तुझा झालेला अपमान तू इतके जन्म मनात धरला आहेस." जस्सी म्हणाला.
"तुला जर माझ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यांचं कारण माहीत आहे; तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देखील माहीतच असेल न?" मही जस्सीकडे बघत म्हणाला.
"हो!" जस्सीने एकदा संस्कृती आणि गोविंदकडे बघितलं आणि बोलायला सुरवात केली. "तीक्ष्णा असं का वागली. तिने महाराज कृष्णराज यांच्या सोबत एक वेगळीच गुप्तता सांभाळली. कारण तिने महाराजांना ही लेणी का निर्माण केली जात आहेत त्याचं सत्य सांगितलं होतं. अर्थात त्यावेळी महाराज कृष्णराज यांच्या कल्पनेच्या बाहेर होतं ते. पण किमान त्यांच्याकडे त्याबद्दलची स्वीकारार्हता होती."
"म्हणजे ती सुमंत कल्याणकडे नव्हती; असं तुला म्हणायचं आहे का?" दुखावलेल्या आवाजात महिने प्रश्न केला.
"तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे मही. तू नाथावर विश्वास नाही ठेवलास. अरे इतकंच काय तू स्वतः तुझ्या राजावर आणि त्याच्या पुत्रावर विश्वास नाही ठेवलास. तुझ्यासाठी तुझा इगो सर्वात मोठा होता. तीक्ष्णाने तुझ्यासारख्या राष्ट्रकूट घराण्याच्या एकनिष्ठ सुमंताला आणि महाराजांच्या अत्यंत जवळच्या मित्राला बाजूला केलं.... बास! हे एकच दुःख तू आज देखील हृदयाला कवटाळून ठेवतो आहेस. मही, आज 2001 मध्ये तुला अनेक गोष्टींची माहिती उपलब्ध आहे. तुला तर या देशाचा इतिहास देखील माहीत आहे. अगदी तुझ्या काळातील सत्य देखील तुला आठवत असेलच. रामायण, महाभारत या दंतकथा नाहीत.... केवळ महाकाव्य नाहीत... तर आपल्या या देशाचा इतिहास आहे; हे माहीत असूनही तू आज देखील ते अमान्य करतो आहेस न?" जस्सी म्हणाला.
"अं?" मही एकदम अबोल झाला.
"जस्सी?" शेषाने जस्सीकडे बघत म्हंटलं. त्यावर शेषकडे बघत जस्सी म्हणाला; "हा मही.... वेरूळ लेण्यांची माहिती देणारा मोठा गाईड..... आजही इथे कथा सांगतो.... सत्य नाही. अरे शेषा थोडं आठवून बघ. आपल्याला देखील तो कथा रुपात सांगत होता. काय हरकत आहे त्याने 'हे असं घडलं;' अशा प्रकारे सत्य सांगायला?" जस्सी जरी शेषाशी बोलत होता तरीही ते सर्वस्वी महिला लागू होत होतं.
"तुला कारण कळणार नाही. त्या काळात राजकुमार गोविंद भावणीकतेत अडकले आणि अपालाच्या आणि कुंजरच्या दुःखातच निवर्तले. आज मी देखील एक कुटुंब चालवतो. समाजाच्या विरुद्ध... ते देखील इथे.... औरंगाबादमध्ये? हम्म.... ठीक! मला माझ्या प्रशांची उत्तरं मिळाली. चालतो मी." मही म्हणाला आणि त्या चौघांकडे पाठ करून चालू पडला.
"स्वतःला सांभाळ संस्कृती. जे घडून गेलं त्याला अनंत काळ लोटला आहे. तुझा पुत्र तुझ्यापासून हिरावला गेला हे मी मान्य करतो. पण तुला देखील विचार करायला हवा की तीक्ष्णावरील रागामुळे तू स्वदेह त्याग केलास त्यावेळी कुंजर आणि गोविंद यांचा विचार तुझ्या मनात नव्हता. आपण सुमंत कल्याणला दोष देतो आहोत की स्वअहंकारापाई त्याने अनेक जन्म घेतले.... पण तुझ्या बाबतीत देखील हेच सत्य नाही का?" जस्सी अत्यंत स्पष्टपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून दुःखात हरवून गेलेली संस्कृती देखील मान वर करून बघायला लागली.
"भीमा तू?" संस्कृती काही बोलणार होती पण जस्सीने तिला थांबवलं आणि म्हणाला; " अपाला, सत्य स्वीकार. तुझ्या त्यावेळच्या निर्णयामध्ये तुझं गोविंदवरचं प्रेम हे कारण जितकं खरं होतं न.... तितकंच सत्य हे देखील होतं की तुला तीक्ष्णाला हरवायचं होतं."
"हे तूच बोललास म्हणून बरं." मागून आवाज आला आणि गोविंद, संस्कृती, जस्सी आणि शेषा सर्वांनीच मागे वळून बघितलं. त्यांच्या पासून थोड्याच अंतरावर नैना उभी होती. तिला पाहाताच गोविंद पुढे झाला. शेषाने गोविंदला स्वतःच्या मागे टाकलं आणि अत्यंत रागीट चेहेऱ्याने तो नैनाकडे बघायला लागला. जस्सी पुढे झाला आणि त्याने सर्वांनाच शांतपणे मागे केलं.
"तुला नक्की काय म्हणू? तीक्ष्णा की नैना? कारण तुला काहीही म्हंटलं तरी तुझ्या पुनर्जन्माचं कारण कोणालाही कळणार नाही." जस्सी म्हणाला.
"तुला ते माहीत आहे न? मग इतरांना ते कळावं याची काळजी तू नको करुस. तुला मी त्याचवेळी म्हंटलं होतं की तू चूक केलीस तर तुला मानवी जन्म घ्यावा लागेल. ते लक्षात ठेवून तू तुझ्या हेतूने परत परत जन्म घेत राहिलास भीमा. जोवर तू अपालाला भेटला नाहीस. काय काय नाही केलंस त्यासाठी? तो श्लोक! इथे ज्या गुंफा आपण निर्माण केल्या; त्याचं सत्य त्या दूरवरच्या जंगलात गेलंच कसं भीमा? तुला आता आठवणार नाही.... कारण तू जो मानवीय जन्म स्वीकारला आहेस त्यासाठी तू तुझ्या शक्ती त्यागल्या होत्यास. अर्थात त्याची अंधुक आठवण सुरवातीच्या काळातील जन्मात होती तुझ्या मनात. त्याच आठवणींच्या मदतीने तू संपूर्ण भारतवर्षात भ्रमण करत राहिलास आणि अशा अनेक गुंफामधून तो श्लोक त्या त्या वेळच्या भाषेत लिहीत राहिलास. अर्थात.... गोविंदला प्राकृत भाषेतला श्लोक मिळाला. कदाचित तुम्ही इतर कुठे गेला असतात तर संस्कृत किंवा अगदी मागधी भाषेतील श्लोक देखील मिळाला असताच. तुला अपालाला सत्याचा आरसा दाखवायचा होता आणि तुझी शिक्षा देखील भोगायची होती. म्हणूनच प्रत्येक जन्मात तू फार बांधनांमध्ये अडकला नाहीस. केवळ जन्म घेत तिला शोधत राहिलास. अर्थात त्यामुळे माझं काम सोपं झालं. मी केवळ तुझ्या मागे जात राहिले."
"जर तुला इतकं सगळं माहीत आहे तर मग माझ्या जन्माचं प्रयोजन तर सांग." शेषा नैनाकडे बघून म्हणाला.
"once again guilt!! तुझ्या मनातली अपराधी भावना. तुझ्यामुळे कुंजरला काहीही झालं नाही हे तुला अपालाला आणि गोविंदला सांगायचं होतं." नैना हसून म्हणाली..... आणि अचानक भीमा आणि शेषा खाली कोसळले.
ते पाहताच गोविंद गोंधळून गेला. तो पटकन त्यांच्या दिशेने धावला. संस्कृती मात्र ताठ उभी राहात नैनाला सामोरी गेली.
क्रमशः
No comments:
Post a Comment