Friday, June 10, 2022

अनाहत सत्य (भाग 28)

 अनाहत सत्य


28

हस्तांतरण दिन म्हणजे एक महान कलाकृती सर्वसामान्यांसाठी खुली होण्याचा महत्वाचा दिवस होता. सर्वप्रथम महाराज आणि त्यांच्या सोबत राज घराण्यातील सर्वच तीक्ष्णा सोबत संपूर्ण निर्मिती बघणार होते. त्यानंतर सरदार आणि त्यांचे आप्तेष्ट आणि त्यानंतर नगरजन बघू शकणार होते. श्रीमंदिरातील श्रीशंभो पूजन आणि प्राणप्रतिष्ठापना देखील महाराज आणि महाराणी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार होती. त्यासाठी सप्त नद्यांचे पवित्र जल आणण्यात आले होते. महाराज आणि महाराणींसोबत राजकुमार गोविंद देखील संपूर्ण वेळ आणि त्यानंतर पूजन स्थानी उपस्थित राहणार होते. महाराजांनी आजवर विस्तारलेल्या सीमांमुळे दूर दूरहून अनेक परदेशी नागरिक देखील हा अपूर्व सोहळा बघण्यासाठी आले होते. दूरहुन आलेल्या या परदेशी नागरिकांनी जवळपासच्या मोकळ्या जागेवर आपापल्या राहुट्या उभारल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसराला एखाद्या लहानशा शहराचं रूप आलं होतं. सर्व वातावरण मंगलमय होतं. सतत वाजणाऱ्या ढोल, ताशे, नगाऱ्यांमुळे वातावरणाला एक वेगळीच धुंदी चढली होती. केवळ त्या एका दिवसासाठी देखील अनेक व्यापाऱ्यांनी तिथे आपली दुकाने थाटली होती. श्रीमंत गरीब असा भेद न करता सर्वचजण बाजारामधून फिरत होते.

महाराज आणि महाराणी अत्यंत खुशीत होते कारण राजकुमार गोविंदनी आज नगर प्रवेश करण्यास मान्यता दिली होती. तीक्ष्णाने श्रीशंभो पूजनाची घटिका दुपार नंतर योग्य असल्याचं महाराजांना सांगितलं होतं. त्यामुळे प्रथम संपूर्ण परिसर आणि नवनिर्मिती बघून झाल्यानंतर आणि भोजन पश्चात महाराज आणि महाराणी अभ्यंग स्नान करणार होते आणि त्यानंतरच संपूर्ण विधिपूर्वक श्रीशंभो पूजन आणि प्राणप्रतिष्ठापना होणार होती.

या एकूण आनंदी वातावरणात मनातून अत्यंत अस्वस्थ आणि काळजीने व्यापलेला गोविंद सतत भीमाला शोधत होता. खरं तर महाराज आणि महाराणी सोबत संपूर्ण परिसर फिरण्याची त्याची इच्छा नव्हती. परंतु त्या निमित्ताने तो तीक्ष्णावर लक्ष ठेऊ शकत होता. अपाला परत आली आहे हे एव्हाना तीक्ष्णाला कळले असण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे तिच्यावर लक्ष असणे आवश्यक होते. केवळ म्हणूनच त्याने फिरण्यास मान्यता दिली होती. तीक्ष्णाने महाराजांना प्रथम गुंफेपासूनचे काम दाखवण्यास सुरवात केली.

पहिल्या दोन गुंफा पहातानाच तीक्ष्णाकडे बघून महाराज म्हणाले; "या गुंफांमध्ये पाहण्यासारखे काहीच नाही. तरीही आपण आग्रह करत आहात याचं काही विशेष कारण आहे का?"

तीक्ष्णाने अत्यंत शांत नजरेने महाराजांकडे बघितलं आणि म्हणाली; "महाराज, या गुंफा कधीच आपल्यासाठी आणि सर्वसामान्य जनांसाठी महत्वाच्या नसणार आहेत. परंतु श्रीमंदिर निर्मितीसाठी हा परिसर नक्की करताना येथील इतर काही महत्वाचे बदल; जे पुढील अनेक मानवीय जन्मांसाठी आवश्यक असतील; ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत करतो आहोत. त्यादृष्टीने या गुंफा अत्यंत महत्वाच्या ठरतात. याविषयी विस्तृत माहिती आपणास राजकुमार गोविंद देखील देतील. त्यांच्या इथल्या वास्तव्यामध्ये त्यांनी या गुंफांची निर्मिती होत असताना ते काम अत्यंत जवळून बघितलं आहे."

तीक्ष्णाचं ते बोलणं गोविंदच्या मनाला चटका लावून गेलं. तीक्ष्णाने अपालाच्या 'स्व' ला तिच्या शब्दांनी डिवचले होते. एकवेळ गोविंदने स्वतःबद्दल काहीही ऐकून घेतलं असतं. पण अपालाच्या कामाबद्दल काहीसं कुत्सितपणे तीक्ष्णा बोलत होती. सोबत असणाऱ्या सरदार आणि इतर मानकऱ्यांसमोर काही बोलावं की नाही असा विचार राजकुमार गोविंद काही क्षण करत होता. त्यामुळे त्याच्या लक्षात नाही आलं की महाराज काही अपेक्षेने त्याच्याकडे बघत आहेत. परंतु ते लक्षात येताच पुढला मागचा कोणताही विचार न करता गोविंद म्हणाला; "महाराज, सत्य सांगत आहेत तीक्ष्णा. या गुंफांचे संरक्षण विशेष पद्धतीने झाले पाहिजे. या गुंफांची रचना अशा प्रकारे केली आहे की काही विशेष वायुविजन निर्माण होते...." गोविंद अजूनही काही सांगणार होता परंतु तीक्ष्णा एकदम सतर्क झाली आणि त्याचं बोलणं तोडत म्हणाली; "महाराज, राजकुमार अत्यंत सत्य तेच सांगत आहेत." महाराजांना एकूण त्यादोघांमधील शाब्दिक चकमकीतून निर्माण झालेल्या ताणाची जाणीव झाली. त्यांना आजच्या शुभप्रसंगी कोणतेही विघ्न नको होते. त्यांनी गोविंदला डोळ्यांनीच खुणावले आणि हसत म्हणाले; "तीक्ष्णा, आमच्या राजघराण्यात आजवर कोणीही असत्य बोलले नाही आहे. त्यामुळे आम्हाला इतर कोणाकडून राजकुमारांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि सत्य बोलण्याबद्दल साक्ष अपेक्षित नाही. तरीही आपण तसे सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद. याविषयी आम्ही स्वतः राजकुमार गोविंद यांच्या सोबत चर्चा करू आणि आमच्याकडून आवश्यक अशी काळजी घेऊ. पण सध्या याविषयी जास्त चर्चा करण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळे आपण पुढील निर्मिती पाहण्यासाठी जावं हेच योग्य."

महाराजांच्या बदललेल्या आवाजातून तीक्ष्णाला योग्य तो अर्थ लक्षात आला. तिने अत्यंत आदराने मान झुकवली आणि काही न बोलता महाराजांना पुढील गुंफेच्या दिशेने नेण्यास सुरवात केली. परंतु शब्दांच्या त्या चकमकी नंतर गोविंदला त्या लावाजम्यासोबत जाण्याची इच्छा उरली नव्हती. त्यामुळे थोडं पुढे गेल्यानंतर त्याने महाराजांकडून परवानगी घेतली आणि तो त्या गोतावळ्यामधून बाहेर पडला. मन थोडं शांत झालं आणि गोविंद भीमा कुठे असेल याचा विचार करायला लागला. खरं तर पुढे काय होणार आहे याची गोविंदला काहीच कल्पना नव्हती. केवळ अपालाला साथ देणे आणि तिच्या सोबत राहणे एवढंच त्याच्या हातात होतं. पण त्यासाठी त्याची आणि अपालाची भेट होणं आवश्यक होतं. गोविंदला सकाळपासून अपाला भेटली नव्हती किंवा भीमा देखील दिसला नव्हता. नाथा आजच्या दिवशी तिथे असणारच नव्हता. त्यामुळे गोविंदला एकटं पडल्याची भावना झाली होती.

गोविंद त्याच्या कक्षामध्ये बसला होता. भोजनासाठीचं बोलावणं येईपर्यंत कुठेही न जाण्याचा निर्णय त्याने घेतला होता. कोणीही त्रास देऊ नये असं त्याने त्याच्या कक्षाबाहेर सांगून ठेवलं होतं. इतक्यात समोरचा पडदा बाजूला झाला. ते पाहून गोविंदच्या कपाळावर आठयांचं जाळं निजर्मन झालं आणि अचानक त्याच्या समोर सुमंत कल्याण येऊन उभे राहिले. सुमंत कल्याणना बघून गोविंद गोंधळून गेला होता. त्याला अचानक लक्षात आलं की गेले काही दिवस चाललेल्या धामधुमीमध्ये सुमंत कल्याण कुठेही दिसले नव्हते.

"सुमंत आपण यावेळी इथे माझ्या कक्षात कसे? आत्ता तर आपण महाराजांसोबत असणं अपेक्षित नाही का?" गोविंदने सुमंत कल्याणना प्रश्न केला.

सुमंत कल्याण यांनी अत्यंत स्थिर नजरेने गोविंदकडे बघितलं आणि ते म्हणाले; "राजकुमार आपला माझ्यावर विश्वास नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याला माझं म्हणणं ऐकवच लागेल. केवळ तुमच्याशीच बोलू शकतो असा विषय असल्याने मी थेट तुमच्याकडे आलो आहे. हे खरं आहे की मी आत्ताच काय पण येथील सोहळा ठरल्यापासून महाराजांसोबत असणं अपेक्षित आहे. परंतु महाराजांसोबत असण्यापेक्षा महाराजांच्या आणि आपल्या सुरक्षेसाठी योग्य पावलं उचलणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे."

गोविंदच्या मनात एकदम कुंजरचा विचार आला. कुंजर नाथासोबत होता. नाथा जरी गोविंद सोबत होता आणि त्याचा मित्र होता तरीही त्याची नेमणूक सुमंत कल्याण यांनी केली होती. त्यामुळे गोविंदहुन देखील अगोदर तो सुमंत कल्याणचं ऐकेल अशी शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे सुमंत कल्याणकडे दुर्लक्ष करणं गोविंदला योग्य वाटलं नाही. सुमंतांना बसण्याची खुण करून गोविंद देखील त्यांच्या समोर बसला. सुमंतांनी क्षणभर गोविंदकडे बघितलं आणि मग मान खाली घालून त्यांनी बोलण्यास सुरवात केली.

"राजकुमार, आपला पुत्र कुंजर; ज्याला आपण नाथासोबत सुखरूप राहण्यासाठी ठेवले होते....."

गोविंद सुमंतांच्या त्या बोलण्याने एकदम अस्वस्थ झाला. उठून उभा राहात त्याने तीव्र शब्दात सुमंत कल्याणना प्रश्न केला; "काय झालं आहे कुंजरला सुमंत? जर आपण काही दुष्ट विचार करून त्याला काही हानी पोहोचवली असेल तर...."

सुमंत कल्याण देखील उभे राहिले आणि त्यांनी गोविंदच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले; "आपण कोणताही गैरसमज करून घेऊ नका राजकुमार. आपला पुत्र कुंजर या राज्याचं भविष्य आहे. त्याला कोणतीही हानी पोहोचवणे माझ्या मनात देखील येणार नाही. किंबहुना जर कोणी असं करणार असेल तर कोणताही विचार न करता मी स्वतः त्या व्यक्तीचा नायनाट करीन."

सुमंतांच्या त्या वक्तव्याने मात्र गोविंद हादरला. "सुमंत आपण? आपण नाथाला?"

"हो राजकुमार." सुमंत अत्यंत शांत आवाजात बोलायला लागले. "राजकुमार आपण मनाने फारच चांगले आहात. त्यामुळे आपण कोणावरही विश्वास ठेवता. मात्र सत्य हे आहे की नाथा विश्वास ठेवण्यासारखा नव्हता."

"सुमंत कल्याण! नव्हता? म्हणजे? नाथा कुठे आहे?" गोविंदने एकदम पुढे होत अत्यंत तीव्र आवाजात सुमंत कल्याणना प्रश्न केला.

"नाथा या जगात नाही राजकुमार." सुमंत तेवढ्याच शांतपणे म्हणाले.

"सुमंत!!! आणि माझा कुंजर?" गोविंदने अत्यंत दुखावलेल्या आवाजात प्रश्न केला.

"कुंजर....." सुमंत उत्तर देणार इतक्यात खुद्द महाराणींचं आगमन होत असल्याची वर्दी घेऊन एक सेवक आत आला आणि लगोलग महाराणी देखील आल्याच. त्यामुळे सुमंत कल्याण यांचं वाक्य अर्धवट राहिलं. महाराणी आल्यामुळे सुमंत कल्याण राजकुमार गोविंद यांची रजा घेऊन तिथून निघाले.

"राजकुमार आम्हाला असं आत्ताच कळलं आहे की आपण आपल्या जीवनाची जोडीदार निवडली आहे आणि तिच्यापासून पुत्र देखील आहे आपणास." सुमंत गेल्याक्षणी महाराणींनी गोविंदला प्रश्न केला.

"हो माई." गोविंदने उत्तर दिलं खरं. पण त्याचं मन महाराणींशी बोलण्यात नव्हतं. कुंजर कुठे आहे आणि अपालापर्यंत आपण कसं पोहोचायचं हा एकच प्रश्न त्याच्या मनात फिरत होता. त्यामुळे महाराणींना त्याचं सत्य कोणी सांगितलं असावं हा प्रश्न त्याच्या मनात आला नाही. मात्र महाराणी गोविंदकडून सत्य कळल्यानंतर अत्यंत दुःखी झाल्या.

"राजकुमार, आपण किमान एकदा तरी माझ्यावर किंवा आपल्या पित्यावर विश्वास ठेवून सगळं खरं सांगायला हवं होतं. तो बिचारा नाथा खरं सांगत होता पण महाराजांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. त्याच्या बाजूने बोलायला त्यावेळी कोणीच नव्हतं. सुमंत कल्याण आत्ता इथे काय करत होते ते माहीत नाही मला; पण त्यावेळी त्यांना निरोप देऊन देखील ते आले नाहीत. राजकुमार, तुम्ही निघून गेल्यानंतर ती तीक्ष्णा महाराजांसोबत बराच वेळ होती. तिने अजून काय काय सांगितलं असेल महाराजांना ते सांगता येत नाही. मला खात्री आहे तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल नसेल उचललं. परंतु तुमच्या सोबत जी कोणी तरुणी आज नगर प्रवेश करणार तिच्याबद्दल तुम्ही स्वतः महाराजांना सांगणं योग्य." महाराणी म्हणाल्या आणि गोविंद काही बोलण्याच्या अगोदर जशा आल्या तशा निघून गेल्या.

गोविंद अवाक होऊन थिजल्याप्रमाणे उभा राहिला. आपण काय करावं त्याला सुचत नव्हतं. अशातच किती वेळ गेला ते त्याला कळलंच नाही. त्याने नजर वर उचलून बघितलं तर त्याच्या समोर एक सेवक उभा होता. गोविंदने त्याच्याकडे पाहाताच त्याने महाराजांचा निरोप दिला....

"राजकुमार आपल्याला श्रीशंभो पूजन संस्कारासाठी महाराजांनी लगोलग येण्यास सांगितलं आहे."

गोविंदने हा निरोप ऐकला आणि त्याच्या मनात पहिला विचार आला तो अपालाचा. श्रीपूजन जर सुरू होणार आहे तर अपाला नक्की तिथेच कुठेतरी असावी. ती आपली वाट बघत असेल. आपण न दिसल्याने ती गोंधळून जाईल. अजून तिला नाथाचं सत्य कळलेलं नाही. त्यामुळे आपण तिथे उपस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात येताच गोविंद अत्यंत जलद गतीने श्रीमंदिराच्या दिशेने निघाला. मात्र त्याच्या कक्षाच्या बाहेर येताच त्याला जाणवलं की एकूण वातावरण बदलून गेलं आहे. पर्जन्य झड येऊन गेली आहे आणि संपूर्ण आकाश अंधःकारमय झालं आहे. त्याला याची जाणीव होती की हा पर्जन्यकाल आहे; मात्र इतक्या लगेच संपूर्ण वातावरण बदलून जाईल याची त्याला कल्पना नव्हती.

गोविंद झपाट्याने श्रीमंदिराजवळ पोहोचला. पूजन संपून प्राणप्रतिष्ठापना झाली होती. तीक्ष्णा आणि महाराज एकूण सांगता करण्याच्या शेवटच्या टप्प्यात होते. हळूहळू पावसाला सुरवात झाली असल्याने सामान्य नगरजन आडोशाच्या मदतीने दूरवर उभे होते. आकाशात विजा चमकायला लागल्या होत्या. वादळी वारा वाहायला सुरवात झाली होती. गोविंदला पाहताच तीक्ष्णाने एक तीव्र कटाक्ष त्याच्याकडे फेकला. गोविंदच्या ते लक्षात आलं. पण आता खूप उशीर झाला होता. तीक्ष्णाशी कोणताही वाद घालण्यापेक्षा अपाला कुठे आहे ते शोधणं जास्त महत्वाचं होतं त्याक्षणी. म्हणूनच गोविंदने तीक्ष्णाकडे दुर्लक्ष केलं. जसजसा विधी पूर्ण होत येत होता तसतसं आभाळ देखील दाटून येत होतं. वादळाला सुरवात होणार हे स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे सर्वच सरदार, त्यांचे आप्तेष्ट राजघराण्यातील सर्वच व्यक्ती सुरक्षित स्थानी गेले होते. पूजन स्थानी महाराज, महाराणी, राजकुमार गोविंद, राजगुरू आणि तीक्ष्णा असे मोजकेच प्रमुख होते. बाकी सेवक वादळापासून यासर्वांचं संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करत होते.

विधी पूर्ण झाला आणि तीक्ष्णाने समोरच्या हवनकुंडामध्ये शेवटची आहुती अर्पण केली. तिने वळून हसत महाराजांना म्हंटलं; "महाराज, मी दिलेल्या शब्दाची पूर्ती मी केली आहे. आपल्या इच्छेनुसार हे श्रीशिव मंदिर इथे उभं राहिलं आहे. यावदचंद्रदिवाकरू या मंदिराचा लौकिक जगभरात राहणार आहे आणि त्यासोबत आपलं नाव देखील."

तिचं बोलणं ऐकून महाराजांनी अत्यंत आनंदाने मान डोलावली. महाराणी देखील संतोष पावल्याचं त्यांच्या चेहेऱ्यावरून दिसून येत होतं. त्याचवेळी अचानक अत्यंत जोरात पावसाची सर आली आणि संपूर्ण लवाझमा श्रीमंदिराच्या आत जाण्यासाठी वळला. त्याचवेळी गोविंदचं लक्ष हत्तीशीले जवळ उभ्या अपालाकडे गेलं आणि तो अत्यंत तीव्र गतीने तिच्याकडे गेला.

"राजकुमार माझा पुत्र?" त्याला जवळ आलेला बघून अपालाने पहिला प्रश्न केला.

"अपाला कुंजर तुझ्या समोर आणून उभा करायची जवाबदरी माझी. मला माहीत नव्हतं नाथा घात करेल. अर्थात याविषयी आपण नंतर बोलू. आज दिवसभर मला भीमा देखील दिसला नाही ग. मी नक्की काय करावं ते मला सुचत नाही आहे." गोविंद तिचे दोन्ही खांदे धरून तिला जवळ घेत म्हणाला.

"राजकुमार घात तीक्ष्णाने केला आहे. ती पहिल्या दिवसापासून याक्षणचं नियोजन करत होती. पण हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. याक्षणी मी भीमाने तयार केलेली राक्षकभिंत पार करणं आवश्यक आहे. कारण भीमाला देखील तीक्ष्णाने अडकवून टाकले आहे. अर्थात त्याने माझा मार्ग मोकळा ठेवला आहे. चला राजकुमार आपल्याकडे वेळ कमी आहे." एवढं बोलून अपालाने राजकुमार गोविंदचा हात धरला आणि ती श्रीमंदिराच्या उजव्या बाजूच्या पायऱ्या उतरायला लागली. एवढ्यात श्रीमंदिरातून तीक्ष्णा बाहेर आली आणि तिने तीव्र आवाजात अपालाला हाक मारली आणि म्हणाली; "अपाला, हा वेडेपणा करू नकोस. तुझा जन्म सर्वसाधारण मानव म्हणून झालेला नाही. अनेकदा जन्म घेण्यापेक्षा हा एकच जन्म जवाबदारीपूर्ण जग."

मागे वळूनही न बघता अपाला चालत राहिली आणि त्याक्षणी तीक्ष्णाने तिचे दोन्ही हात वर आकाशाकडे फेकले आणि म्हणाली;

"हे नक्षत्र-ताऱ्यांनो, या मंदिर कळसाची निर्मितीच मुळी तुमच्याशी संपर्क करण्यासाठी झाली आहे. आजचा हा पर्जन्य आणि हे घोंगावत येणारं वादळ; याची पूर्वकल्पना तुम्ही मला दिलीत ती त्या विशेष रचनेतून संपर्क करूनच. एका प्रकारे ही तुमची आणि माझी परीक्षाच आहे. तुमच्याकडून मिळालेल्या संकेतानुसार काही क्षणातच हा संपूर्ण परिसर वादळामध्ये वेढला जाणार आहे.... पण ते क्षण लवकर यावेत यासाठी मी माझ्या संपूर्ण शक्तीनिशी तुम्हाला आव्हान करते आहे."

तीक्ष्णाच्या त्या आव्हाहनाचा परिणाम संपूर्ण वातावरणावर झाला आणि प्रचंड घोंगावत वादळाने संपूर्ण परिसरावर धडक दिली. होणारे बदल तीक्ष्णा तिच्या जागी शांतपणे उभं राहून बघत होती. अपालावर देखील या निसर्ग कोपाचा परिणाम झाला नाही. मात्र गोविंद एक सर्वसामान्य मनुष्य होता. त्यात त्याचं मन अनेक डोलायमानते मधून गेल्याने तो क्षिण झाला होता. त्यामुळे होणारा बदल तो सहन करू शकला नाही आणि अपाला रक्षकभिंत ओलांडणार इतक्यात त्यादोघांचा हात सुटला. तक्षणी गोविंद लांब फेकला गेला आणि अपाला रक्षकभिंत ओलांडू न शकल्याने श्रीमंदिराच्या दिशेने ढकलली गेली. गोविंद उठू शकत नाही हे पाहून अपाला हताश झाली आणि तिने वळून तीक्ष्णाकडे बघितलं.

"तू मला रक्षकभिंत ओलांडण्यापासून अडवू शकतेस तीक्ष्णा; गोविंदपासून दूर देखील करूच शकतेस. मात्र मी जर स्वेच्छेने माझं आयुष्य त्यागण्याची इच्छा धरली तर तू मला अडवू शकत नाहीस. हे सत्य तू जाणतेस आणि मी देखील." अपाला हट्टाला पेटली होती. तिने इतकं बोलून तीक्ष्णाकडे पाठ केली आणि तीक्ष्णा प्रमाणेच आपले दोन्ही हात आकाशाकडे करत म्हंटलं; "मी माझ्या सर्व शक्ती त्यागते आहे. मला कल्पना आहे की या शक्तींसोबत माझी स्मरणशक्ती जाईल आणि सामान्य मानवीय आयुष्याच्या गर्तेत मी ढकलली जाईन. पण ते मला मान्य आहे. कारण मला खात्री आहे की कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये माझा गोविंद मला नक्की भेटेल."

इतकं बोलून अपालाने तिला आणि केवळ तिच्यासारख्यांना दिसणाऱ्या रक्षकभिंतीच्या दिशेने धाव घेतली. भीमाने श्रीमंदिराच्या संरक्षणासाठी अत्यंत कठोर असे रक्षक उभे केले होते. त्यांनी अपालाला त्यांच्याकडील विशेष आयुधाने अडवले. त्याचा परिणाम स्वरूप अपाला मोठा विजेचा धक्का लागल्याप्रमाणे पडली आणि गतप्राण झाली.

अपाला असं काही करेल असं तीक्ष्णाला अपेक्षित नव्हतं. अपालाने आपली जवाबदारी समजून सर्वसामान्य जीवन घेऊ नये अशी तीक्ष्णाची इच्छा होती. म्हणूनच तिने अपालाला थांबवण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न केले होते. मात्र तीक्ष्णाच्या सर्व प्रयत्नांना असफल करत अपालाने स्वेच्छेने शरीरत्याग केला होता.

अपाला खाली पडली आणि त्याचवेळी भीमा धावत तिथे आला. त्याने एकदा अपालाकडे बघितलं आणि मागे वळून तीक्ष्णाकडे बघितलं.

"भीमा तू रक्षकभिंतीला भगदाड ठेवलंस. तुझ्या कामातील ही चूक कधीच मान्य केली जाणार नाही." तीक्ष्णाचा आवाज तीव्र होता.

"भागीनेय; हे खरं आहे की मी काही जागा शिल्लक ठेवली होती. मात्र ती जागा मी भारून टाकणार होतो. मात्र तुमची तशी इच्छा नव्हती. म्हणूनच तुम्ही मला दूर केलंत याजागेपासून. भूतप्रमुखांसमोर माझी चूक दाखवून तुम्हाला मला परत एकदा मर्त्य जीवनात धकलायचं होतं. त्यामागील कारण काहीही असेल.... कदाचित योग्य ..... कदाचित अयोग्य! मी तुमची इच्छा मान्य करतो. अर्थात मी चुकलो म्हणून नाही तर माझी प्रिय अपाला जिथे नाही तिथे मला देखील राहण्याची इच्छा नाही." भीमा म्हणाला आणि त्याने देखील स्वेच्छेने शरीरत्याग केला.

त्याचवेळी एक अत्यंत मोठी वीज शलाका तीक्ष्णावर येऊन कोसळली आणि आतून बाहेर येणाऱ्या सर्वांसमोर तीक्ष्णा तिथून नाहीशी झाली.

***

.........................."गोविंद; हेच सत्य आहे आपल्या पूर्व आयुष्याचं." तिच्या मागे आलेल्या गोविंदच्या डोळ्यात बघत संस्कृती म्हणाली आणि मंद हसत त्याचा हात धरून त्याला घेऊन ती गुंफेच्या बाहेर पडली.

क्रमशः

No comments:

Post a Comment