अनाहत सत्य
भाग 27
भीमा आणि तीक्ष्णा श्रीमंदिरासमोर उभे होते. आता अगदीच शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे केवळ कारागिरच मंदिराच्या परिसरात दिसत होते. मूळचे कामगार अगदीच तुरळक होते. मूलतः या कामगारांच्या कामाचा आवाकाच मोठा होता. त्यांचं रूप जरी अत्यंत विचित्र असलं तरी त्यांच्यामध्ये शारीरिक शक्तीचा साठा भीमाला देखील लाजवेल असा होता. असे कामगार एका कारागिराजवळ एक अशा प्रकारे उभे होते आणि कारागीर सांगेल ते काम पूर्ण करत होते.
तीक्ष्णाने अत्यंत प्रेमाने श्रीमंदिर वास्तूकडे बघितले. संपूर्ण पर्वतामधून काही भाग टेकडी अलग करून त्यानंतर या मंदिराच्या कामाचा शुभारंभ केला होता तीक्ष्णाने. केवळ हाताशी असलेल्या कामगारांच्या मदतीने.... त्यांच्या कामाच्या वेगाचा अंदाज असल्याने तिने एवढे मोठे आव्हान स्वीकारले होते. तरीही भूतप्रमुखांच्या सांगण्यावरून तिने कळसाचे काम अगोदर सुरू केले होते. कामाला सुरुवात करताना भूतप्रमुखांच्या मनात काम पूर्ण होऊ शकेल का याविषयी साशंकता होती. कारण काम मोठं होतं आणि त्यामानाने लवकरात लवकर संपण अपेक्षित होतं. त्यामुळेच जर काम अपूर्ण राहिलं तर निदान मंदिराच्या कळसाचा प्रमुख भाग पूर्ण झालेला असणं आवश्यक होतं. अर्थात तीक्ष्णाला तिच्या कामाच्या बाबतीत पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाचं फळ आता तिच्या समोर दिमाखात उभं होतं.
एकाच अजस्त्र शिलेमधून कापून बांधलेलं श्रीमंदिर म्हणजे अप्रतिम कलेचा नमुना पृथ्वी अस्तित्वात असेपर्यंत राहणार होता. मंदिराच्या कामाला सुरवात झाली ते दिवस सर्रकन तीक्ष्णाच्या डोळ्यासमोरून सरकून गेले. त्यावेळी खडकाच्या तुकड्यांचा पडणारा खच; अहोरात्र काम करून तो उचलून बाजूला करणारे तिचे कामगार आणि त्यांच्यावर स्वतः देखरेख करत उभी असलेली तीक्ष्णा हेच दिसत असे. मात्र हळूहळू मंदिराचा आकार नजरेत भरायला लागला. तीक्ष्णाने कलात्मकतेने मंदिराची महल तीन बाजूंनी वर उचलली होती आणि मंदिराच्या वरच्या भागाला; जिथून श्रीदर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे तिथे जोडून घेतली होती. श्रीशंकर वाहन नंदी आणि प्रिय पुत्र गजानन यांच्या प्रेमाखातर गजराज मंदिराच्या दोन्ही बाजूने निर्माण केले होते. तीक्ष्णाने तिच्या स्थापत्य ज्ञानाचा संपूर्ण कस लावला होता या मंदिर निर्मितीमध्ये. ती स्वतः अत्यंत समाधानी होती तिच्या कामाच्या बाबतीत.
बराच वेळ स्वतःच्या निर्मितीकडे बघितल्या नंतर तीक्ष्णाने वळून भिमाकडे बघितलं आणि म्हणाली; "भीमा, तुझे शब्द विसरू नकोस. या मंदिरामधील एकही मूर्ती काकणभर देखील खंडित झाली तर तुला तुझ्या सर्व शक्ती त्यागून परत एकदा सर्वसामान्य मानवीय आयुष्याला सामोरं जावं लागेल. भीमा.... तू मला जाणतोस. असा निर्णय घ्यायची वेळ आली तर मी क्षणभराचा देखील विचार करणार नाही."
भीमाने अत्यंत विश्वासपूर्वक तीक्ष्णाकडे बघितलं आणि म्हणाला; "भागीनेय, आत्ता हे श्रीमंदिर, तुम्ही निर्मित केलेली ही अद्वितीय स्थापत्य कला; तुम्ही ज्या प्रेमाने बघत होतात त्यावरून मला कल्पना आलीच आहे. मी माझ्या बाजूने हे नक्कीच सांगू शकतो भागीनेय, तुम्हाला जसा तुमच्या निर्मितीचा अभिमान आहे आणि काळजी आहे; त्याचप्रमाणे मला देखील माझ्या कामाबद्दल पूर्ण विश्वास आहे आणि चूक होणार नाही याबद्दल अभिमान आहे."
"येणारा कालच याचं उत्तर देईल याची मला खात्री आहे." तीक्ष्णा अत्यंत गंभीर आवाजात म्हणाली आणि पुढे चालू लागली. भीमाला तिच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ लक्षात नाही आला. पण तिला कोणताही प्रश्न विचारण्याची त्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तो देखील तिच्या सोबत चालत त्याच्या कामाची माहिती द्यायला लागला.
***
"भीमा..... भीमा.....? भीमा कुठे आहेस?" गोविंद भीमाला शोधत फिरत होता. अमावास्या उलटून तीन दिवस झाले होते. पुढील प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा होता. अजूनही रात्रीच्या वेळी केवळ चांदण्यांचा लुकलूकता प्रकाश भूतलावर पोहोचत होता. त्यात पर्जन्यकाल असल्याने तो प्रकाश देखील ढगांच्या कृपेवरच अवलंबून होता. अशा परिस्थितीत गोविंद भीमाला शोधत फिरत होता.
अलीकडे सूर्यास्त देखील खूपच लवकर व्हायला लागला असल्याने रात्र काल वाढला होता. त्यामुळे नक्की किती रात्र उलटून गेली आहे ते गोविंदला कळत नव्हतं. तो आणि अपाला काही वेळापूर्वी पर्यंत एकत्र होते. कुंजर देखील त्यांच्या डोळ्यासमोरच होता. नुकताच पाऊस पडून गेला असल्याने मंद वाऱ्याच्या झुळका आल्हाददायक वाटत होत्या. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या हस्तांतरण सोहोळयाबद्दल गोविंद आणि अपाला बोलत बसले होते. मूलतः त्यादिवशीच्या सोहोळयानंतर अपाला आणि गोविंद एकत्र कसे येऊ शकतील हाच विषय सतत त्यांच्या चर्चेत होता. बोलता बोलता गोविंदला कधी झोप लागली ते त्याचं त्यालाच कळलं नाही. त्याला अचानक जाग आली होती ते कुंजरच्या हाकेमुळे. गोविंद जागा झाला आणि क्षणभरासाठी तो कुठे आहे हे त्याला कळलंच नाही. कारण तो आणि अपाला तिसऱ्या गुंफेच्या मागील टेकडीवर बसले होते. मात्र गोविंदला जाग आली त्यावेळी तो गुंफेच्या आत होता.
गोविंद धपडपडून उठला आणि त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. त्यावेळी त्याला अनेक पावलांचा आवाज आला. अत्यंत घाईघाईने कोणीतरी चालत होतं आणि त्यांच्या पायांचा आवाज त्या शांत वेळी गुंफेच्या आत घुमत होता. आतील भाग पूर्ण काळोखात झाकोळलेला होता. अनेक वर्ष तिथे राहिल्यामुळेच केवळ गोविंद त्या गुंफेच्या आत उभा राहू शकत होता. इतर कोणीही असतं तर काळोखाचे हात आपल्याला सामावून घेण्यासाठी आपल्यामध्ये मुरत आहेत अशी भावना मनात साकळून आली असती आणि केवळ भीतीनेच मृत्यूला ओढवून घेतलं असतं.
गोविंदला अचानक अपालाने हाक मारल्याचा भास झाला आणि आवाज आला त्यादिशेने त्याने नकळत धाव घेतली. पण तो गुंफेच्या भिंतीवर जाऊन आदळला. काय झालं ते गोविंदच्या लक्षात नाही आलं; पण तो एकदम भोवळ येऊन खाली पडला.
गोविंदला जाग आली आणि तो धडपडत गुंफेबाहेर पडला. आतापर्यंत अपाला आणि कुंजर आपल्यापासून बरेच लांब गेले असणार याची त्याला कल्पना आली होती. त्यामुळे गुंफेच्या आत थांबून त्यांना शोधण्यात काहीच अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच तो भीमाला शोधायला बाहेर पडला होता.
***
"भीमा.... तू इथे या गुंफेच्या दुसऱ्या टोकाला काय करतो आहेस? मी बराच वेळ तुला शोधतो आहे." मंदिराच्या डावीकडील सर्वात शेवटच्या गुंफेच्या मागील टेकडीवर बसून आकाशाचे निरीक्षण करणाऱ्या भिमाजवळ उभा राहून गोविंद म्हणाला.
"अरे गोविंद? तू इथे यावेळी काय करतो आहेस? अपाला आणि कुंजर नाहीत का तुझ्यासोबत?" भीमाने गोविंदने विचारलेले प्रश्न ऐकलेच नव्हते. तो त्याच्याच विचारात गाढलेला होता हे गोविंदच्या लक्षात आलं.
भीमा अपाला आणि कुंजर सोबत मी दुसऱ्या बाजूच्या गुंफेच्या मागील टेकडीवर होतो. मी आणि अपाला बोलत होतो आणि कुंजर आमच्या सोबत आडवा पडून तारका बघत होता. बोलताना मला झोप लागली. मला कुंजरने मारलेल्या हाकेमुळे जाग आली त्यावेळी मी गुंफेच्या आत होतो." गोविंद बोलत असताना आडवा पडून आकाशाकडे बघणाऱ्या भीमाने एकदम उठून गोविंदकडे बघत प्रश्न केला; "तू तिसऱ्या गुंफेमध्ये होतास का?" गोविंदला भीमाच्या प्रश्नांचं आश्चर्य वाटलं.
"हो! का?" गोविंद म्हणाला.
काही क्षण भीमा शांत बसला.
"माझ्या संयमाचा अंत बघू नकोस भीमा. मला कल्पना येऊन चुकली आहे की मी अपाला आणि कुंजर पासून दुरावलो आहे. मला केवळ तुझा आधार आहे. अशा वेळी तू जर काही न बोलता मला कोड्यात टाकणारे प्रश्न विचारू नकोस." गोविंद म्हणाला.
"गोविंद" अत्यंत शांत आवाजात भीमाने बोलण्यास सुरवात केली. "अपाला आणि कुंजर दोघांपासून तू दुरावला आहेस इतकंच नाही तर त्यांना तू परत बघू शकशील असं मला वाटत नाही."
भीमाच्या पहिल्याच वाक्याने गोविंद हतबल होऊन गेला. भीमा पुढे म्हणाला; "अपाला आणि कुंजर एव्हाना आमच्या नगरमध्ये पोहोचले असतील. राजकुमार, पूर्वी अंदाज लावल्याप्रमाणे आमच्यातील कामगार इथून परतीच्या वाटेला लागले होते. त्यांच्या सोबत काही कारागीर देखील जायला लागले होते. मात्र अपाला आणि कुंजर यांना भूगर्भाच्या दिशेने इतक्यात पाठवण्याची चूक तीक्ष्णा करेल असं मला वाटलं नव्हतं. परंतु आपण चिंता करू नका. मला खात्री आहे की अपाला यातून मार्ग काढेल."
"मला तुझ्या खात्रीबद्दल खात्री नाही भीमा. जर अपाला काहीच मार्ग शोधू शकली नाही तर मग? आता केवळ हातावर मोजण्याइतकेच दिवस आहेत आपल्या हातात." गोविंद अत्यंत अस्वस्थ झाला होता.
"राजकुमार तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि अपालाने मार्ग शोधून काढला आहे. त्यामार्गातील सगळ्याच अडथळ्यांचा आम्ही विचारपूर्वक मार्ग काढला आहे. आम्हाला अंदाज होताच की भागीनेय तीक्ष्णा अपाला आणि कुंजरला सोहण्याच्या दिवसा अगोदरच बाहेर काढणार. म्हणूनच मी तिच्याच सांगण्यावरून भूतप्रमुखांशी बोललो होतो. अपालाने केलेल्या मेहेनतीच फळ म्हणून ती हस्तांतरण सोहळा बघण्याची हकदार असू शकते; याविषयी मी भूतप्रमुखांकडे विनंती केली होती. त्याचवेळी अपाला या सोहळ्याच्या वेळी तिथे असू नये अशी इच्छा तीक्ष्णाने व्यक्त केल्याचं मला कळलं. परंतु भूतप्रमुखांनी माझी विनंती मान्य केली आणि अपालाला हस्तांतरणाच्या दिवशी इथे उपस्थित राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे जरी तीक्ष्णाच्या आदेशावर अपाला आणि कुंजर यांना इथून नेण्यात आलं असलं तरी ती शेवटच्या दिवशी इथे असेल याबद्दल मला खात्री आहे." भीमाने गोविंदला माहिती दिली.
"याचा अर्थ केवळ त्याच दिवशी मी अपाला आणि कुंजर यांना इथून नेऊ शकतो. त्याअगोदर पुढचे काही दिवस अपाला मला दिसणार देखील नाही आह.... बरोबर न?" गोविंदने हताश आवाजात भीमाला प्रश्न केला.
अत्यंत प्रेमाने गोविंदच्या हातावर हात ठेवत भीमा म्हणाला; "माझ्यावर विश्वास ठेवा राजकुमार. तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल."
"पण भीमा, तू तुझं काम देखील करतो आहेस. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे एकदा तू तटरक्षक भिंत उभी केलीस की तुमच्यातील कोणीच ती भिंत पार करून आमच्या बाजूला येऊ शकणार नाही. असं असताना अपालाने केवळ सोहळा बघायला येऊन काय साध्य होणार आहे? त्याशिवाय कुंजर बद्दल तू काहीच बोलला नाही आहेस. त्याचं काय भीमा?" गोविंदचे प्रश्न संपत नव्हते.
"राजकुमार, मी देखील अपालाला हाच प्रश्न केला होता. तिने मला आश्वस्त केलं होतं की यावरील उपाय ती शोधून काढणार आहे. राजकुमार, अपाला आपल्या दोघांपेक्षा देखील तल्लख आहे. ती स्वतः स्त्री असल्याने भागीनेय तीक्ष्णा कशा प्रकारे विचार करत असेल याचा तिला अंदाज देखीलं असणार. त्यामुळे आपण तिच्यावर विश्वास ठेवणं योग्य होईल." भीमा म्हणाला.
***
प्रत्येक जाणाऱ्या दिवसा बरोबर गोविंदचा धीर सुटत होता. अपाला आणि कुंजर नाहीसे झाल्या दिवसापासून नाथा देखील दिसेनासा झाला होता. गोविंदला याचं वैषम्य वाटत होतं खरं पण तो त्याच्याच दुःखात इतका बुडाला होता की नाथाला शोधावं असं त्याच्या मनात आलं नाही.
हस्तांतरण सोहळ्याला केवळ एक दिवस राहिला होता. आदल्या दिवसाच्या सकाळपासूनच संपूर्ण परिसर विविध सुगंधी फुलांनी फुलून गेला होता. त्याशिवाय नगराकडून महाराजांच्या सेवेतील काही प्रमुख सोहळ्याच्या जागी येऊन स्वतःच्या देखरेखीखाली सोहळ्याची तयारी करत होते. नगरजन देखील नगरातील आपली घरं दारं बंद करून श्रीमंदिर हसतांतरणाचा सोहळा पाहण्यासाठी सोहळा स्थानी येऊन राहिले होते. संपूर्ण परिसराला उत्सवाचं स्वरून आलं होतं. एकूण परिस्थिती बघून सुमंत कल्याण यांनी सैनिक तैनात केले होते. सोहळ्याच्या ठिकाणी आलेले नगरजन आणि प्रमुख राजकुमार गोविंद यांना मुद्दाम भेटायला येत होते आणि राजकुमारांनी देखील आता नगर प्रवेश करत महाराजांचे काम कमी करावे यासंदर्भात राजकुमारांना विनंती करत होते. गोविंद जरी सगळ्यांना भेटत असला तरी तो त्याच्या विचारांमध्येच सतत राहात होता. संध्याकाळ होता होता गोविंदचा धीर सुटला. त्याने भीमाला गाठलं आणि त्याला घेऊन तो तिसऱ्या गुंफेच्या मागील टेकडीवर गेला.
"भीमा.... माझी अपाला.... माझा कुंजर..." अस्वस्थ आवाजात गोविंद म्हणाला. त्याचे डोळे भरून आले होते. त्याला बोलता देखील येत नव्हतं. त्याची परिस्थिती बघून भिमाचं मन देखील द्रवलं.
"राजकुमार तुम्ही धीर सोडलात तर अपालाने कोणाकडे बघावं?" भीमा म्हणाला.
"धीराची तर अपाला आहे भीमा. मी .... मला काहीच सुचत नाही. मला माझी अपाला आणि माझा पुत्र कुंजर हवे आहेत. त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही भीमा. मला आता केवळ तुझाच आधार आहे." गोविंद भरल्या डोळ्यांनी म्हणाला.
"राजकुमार........." भीमा काहीतरी सांगणार होता. पण त्याला बोलू देखील न देता गोविंद म्हणाला; "भीमा... आता मी कोणतीही वाट बघायला तयार नाही. मी तुला इथे घेऊन आलो आहे याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे. मला माहीत आहे की तुमच्या नगरीच्या दिशेने जाणारा मार्ग इथेच कुठेतरी आहे. तू मला तो मार्ग दाखवणार आहेस. मी त्या मार्गाने जाऊन अपाला आणि कुंजरला घेऊन येणार आहे आणि उद्याच्या सोहळ्याच्या वेळी इथून बाहेर पडण्यासाठी तू मला मदत करणार आहेस."
"मी? तुम्ही म्हणाल ती मदत करायला मी तयार आहे राजकुमार." भीमा म्हणाला.
"भीमा.... मग माझी तुला कळकळीची विनंती आहे.... तू तुझ्या तटरक्षक भिंतीमधला एक असा मार्ग... केवळ एक व्यक्ती बाहेर पडू शकेल इतकाच........ उघडा ठेव भीमा. केवळ अपाला बाहेर पडू शकेल इतका. बाकी मी बघून घेईन." गोविंदचा आवाज आता खूप वेगळा होता.
"राजकुमार आपण मला जे करायला सांगता आहात ते केवळ अशक्य आहे." भीमा एकदम म्हणाला.
गोविंद काही क्षण शांत राहिला आणि मग अत्यंत शांत आवाजात तो भीमाला म्हणाला; "जर माझी विनंती तुला मान्य नसेल भीमा तर ही माझी आज्ञा समज. आणि तरी देखील जर तू नकार देणार असलास तर तुमचं सत्य जगासमोर यावं यासाठी जे जे म्हणून करावं लागेल ते ते मी करीन. भीमा..... तुला माहीत आहे.... मी काहीही करून अपाला आणि कुंजरला मिळवणारच."
गोविंदचं ते रूप बघून भीमा एकदम गोंधळून गेला आणि गोविंदकडे एकटक बघत उभा राहिला. "राजकुमार, मी तुम्हाला मार्ग दाखवीन. परंतु अपाला आणि कुंजर या दोघांना उद्याच्या सोहळ्याच्या अगोदर घेऊन येणं तुम्हाला शक्य होईल असं मला वाटत नाही. राजकुमार आपण आपलं मन माझ्यासाठी कलुषित करू नका. मी आपल्याला सत्य तेच सांगतो आहे. तरीही... जर आपण त्यांना घेऊन आलातच तरी आपण मला जे करायला सांगत आहात ते केवळ अशक्य आहे....."
"भीमा तुला ते शक्य करावंच लागेल." मागून अपालाचा आवाज आला. भीमा आणि गोविंद दोघांनी एकाचवेळी मागे वळून बघितलं.
"अपाला तू?" भीमा म्हणाला. गोविंद अपालाच्या दिशेने धावला आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. भीमा त्या दोघांकडे बघत उभा होता. इतक्यात तिथे नाथा देखील पोहोचला.
नाथाला बघून भीमा पुढे झाला आणि त्याला विचारलं; "गेले कित्येक दिवस मी तुला बघितलं नव्हतं नाथा. कुंजर आणि अपाला यांना कपटाने तीक्ष्णाने परत पाठवलं. त्यासाठी तिने बळाचा आणि केवळ तिच्याजवळ असणाऱ्या अशा खास शक्तींचा वापर केला. पण मला खात्री होती अपाला नक्की त्याची तोड शोधेल. त्याप्रमाणे अपाला परत देखील आली आहे. पण या अवघड वेळी तू राजकुमारांसोबत असणं आवश्यक होतं. मात्र तू कुठेच नव्हतास. असं का?"
"कारण मी कुंजरला घेऊन इथून दूर गेलो होतो." नाथा म्हणाला. भीमा आणि गोविंदला मोठाच धक्का बसला. परंतु अपाला शांत होती. तिने नाथाकडे बघून एक मंद स्मित केलं आणि म्हणाली; "हो! मीच कुंजरला नाथा सोबत पाठवून दिलं होतं. भीमा म्हणतो त्याप्रमाणे मी आणि गोविंद बेसावध असताना तीक्ष्णाने गोविंदला संमोहित केलं आणि मला बळाचा वापर करून आमच्या स्थानी पाठवून दिलं. पण गोविंद मनाने माझ्याशी इतका जोडला गेला होता की संमोहित अवस्थेत देखील तो मला वाचवायचा प्रयत्न करत होता. पण जसजशी मी त्याच्यापासून दूर भूगर्भाच्या दिशेने जाऊ लागले तसा आमचा संपर्क तुटूला आणि गोविंद जागा झाला. त्याला मी मनातून मारलेली हाक ऐकू आली आणि तो पूर्ण जागा झाला. असं काहीसं होईल याची मला कल्पना होती; म्हणूनच मी नाथावर लक्ष ठेऊन होते. नाथाच्या मनात भीमा आणि माझ्याबद्दल संदेह निर्माण झाला आहे; हे मला लक्षात आलं आणि मी कोणाच्याही नकळत त्याला भेटून सर्व सत्य सांगितलं. नाथाचा आजही त्या सर्वावर विश्वास नाही.... पण माझं राजकुमार गोविंद यांच्यावर खरं प्रेम आहे आणि मी त्यांच्या सोबत नगर प्रवेश करणार आहे... याची त्याला खात्री आहे. म्हणूनच तो माझ्या सांगण्यावरून कुंजरला घेऊन इथून गेला होता."
नाथाने मान खाली घातली आणि अत्यंत हळू आवाजात तो म्हणाला; "कुंजरला नेण्याचं एक महत्वाचं कारण हे देखील आहे अपाला की तू तुझ्या पुत्रप्रेमासाठी तरी नक्कीच राजकुमारांची साथ देशील." त्याचं बोलणं ऐकून भीमा, अपाला आणि गोविंद तिघेही हसले.
"मी समजू शकते नाथा." अपाला म्हणाली. त्यानंतर ती भिमाकडे वळली आणि म्हणाली; "भीमा, राजकुमार तुला जे सांगत होते तसं करणं अत्यंत आवश्यक आहे. मी इथे आले आहे ते मीच निर्माण केलेल्या एका गुप्त मार्गातून. आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी भूतप्रमुखांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य देखील केली. पण मी आपल्या स्थानी गेल्या गेल्या मला संस्कारित करण्यात आलं आहे. त्यामुळे मी भीमाने निर्माण केलेली रक्षित भिंत पार करू शकणार नाही. केवळ म्हणूनच मी तुम्ही इथे येण्याची वाट बघत होते. भीमा, मी आत्ता देखील तुझ्या तटाच्या जवळ जाऊ शकणार नाही आहे. हो! मला तुझा तट दिसतो आहे. तुझे रक्षक देखील माझ्याकडे एका सावजाकडे बघावं तसं बघत आहेत. अर्थात त्यात त्यांचा दोष नाही. नेमकं इथे माझ्या कामाच्या संरक्षणासाठी तू जे वेगळेपण निर्माण केलं आहेस; ते माझ्या संपूर्ण विरोधात उभं आहे. भीमा त्यामुळे आता मात्र माझी सगळी आस तुझ्यावर आहे. मला खरंच माझ्या आयुष्यातलं प्रेम राजकुमार गोविंदच्या रूपाने मिळालं आहे. सर्वसाधारण मर्त्य जीवनातील उणिवा मला माहीत आहेत. मला हे देखील माहीत आहे की पुढे जाऊन कदाचित असे अनेक प्रसंग येतील की मी आता जो निर्णय घेते आहे तो चुकला असं मला वाटेल. तरीही हे सगळं मान्य करून देखील मला राजकुमार गोविंद यांच्या सोबत वृद्धत्वाचा स्वाद घ्यायचा आहे."
अपाला बोलायची थांबली आणि तिने अत्यंत प्रेमाने गोविंदचा हात हातात घेतला. भीमा काहीही न बोलता तिथून निघण्यासाठी वळला. त्याला थांबवत गोविंद म्हणाला; "भीमा.... आता सगळं तुझ्या हातात आहे."
"म्हणूनच निघतो आहे राजकुमार. मीच केलेल्या तटाला भगदाड निर्माण करावं लागणार आहे. राजकुमार तुम्हाला खरंच कळणार नाही माझं दुःख. पण अपालासाठी काहीही स्वीकारीन मी." भीमा म्हणाला आणि अपालाच्या दिशेने तो वळला. "अपाला तुला माहीत आहे मी काय करणार आहे. फक्त ती फट.... भगदाड.... कुठे असेल ते तुलाच कळू शकेल हे लक्षात ठेव. बाहेर पडताना तुझा हात राजकुमारांच्या हातात असला पाहिजे. फक्त आणि फक्त राजकुमारांच्या हातातच. कारण आजवर आपल्या सोबत असल्याने त्यांच्या भोवती देखील एक वेगळी शक्ती निर्माण झाली आहे. त्या शक्तीचा उपयोग तुला होणार आहे. बरं, आता मी निघतो. माझं ऐकणार असाल तर राजकुमार तुम्ही देखील निघा इथून. नगर जणांमध्ये जाऊन मिसळा. पण तुमच्या मनातला आनंद एकदम चेहेऱ्यावर आणू नका. आता इथे आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजून घेणं अवघड आहे. नाथा तू तर इथे थांबुच नकोस. कुंजर सोबत राहा. राजकुमार आणि अपाला नक्की नगर प्रवेश करणार उद्या. त्यावेळी तू त्यांचं स्वागत कर." भीमा बोलायचा थांबला आणि अपालाने आवेगाने त्याला मिठी मारली.
तिथून जाण्यासाठी निघालेल्या नाथाच्या कपाळावर परत एकदा एक आठी निर्माण झाली होती. पण भीमा, अपाला आणि गोविंद यांचं लक्ष नाथाकडे नव्हतं.
क्रमशः
No comments:
Post a Comment