Friday, January 28, 2022

अनाहत सत्य (भाग 9)

 अनाहत सत्य



भाग 9

सकाळी संस्कृती उठली तर तिच्या लक्षात आलं की नैना खोलीमध्ये नाही आहे. रात्री देखील संस्कृतीला झोप लागेपर्यंत नैना समोर दोन मोठी पुस्तकं उघडून ठेऊन काहीतरी वाचत होती; हे संस्कृतीने बघितलं होतं. आपण दिलेल्या श्लोकांचा शोध नैना घेते आहे हे देखिल तिच्या लक्षात आलं होतं. पण नैना 'अर्थ सांगते'; म्हणाली आहे तर नक्की सांगेल याची खात्री असल्याने आणि प्रचंड झोप येत असल्याने संस्कृती झोपून गेली होती.

आपलं सगळं आवरून संस्कृती बाहेर पडली तर गोविंद, जस्सी आणि शेषा तिची वाट बघत होस्टेलच्या गेटजवळ उभे असलेले तिला दिसले. त्यांना बघून तिला खूप हसायला आलं.

"काय रे रात्रभर इथेच होतात की काय? मी तर बाबा मस्त झोपले होते. आत्ता उठून आवरून बाहेर पडते आहे. यार, जाम भूक लागली आहे. चला न... कुठेतरी काहीतरी खायला जाऊ या. मिसळ खायची का? कितीतरी दिवसात मिसळ नाही मिळालेली. त्यामुळे एकदम पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतंय." त्यांच्या जवळ येत अगदी सहज आवाजात संस्कृती म्हणाली.

ती फोटोमधल्या स्क्रिप्ट बद्दल काहीच बोलत नाही हे बघून तिघेही वैतागले. गोविंदने तिचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाला; "ए, उगाच नाटक करू नकोस हं. काय म्हणाली ती नैना त्या फोटोंबद्दल? सकाळपासून आम्ही इथे उभे आहोत. तू मात्र एकदम निवांत येते आहेस. जस्सी इथे पोहोचला तर त्याला नैना कॉलेजच्या दिशेने जाताना दिसली होती. पण उगाच तिच्या मागे जाऊन तिला संशय येईल असं वागायला नको म्हणून तो इथेच थांबला. तसही आम्ही इथेच भेटायचं ठरवलं होतं."

"तुम्ही ठरवलं होतं नं? मग भेटा की एकमेकांना. मी निघते." अजूनही संस्कृती थट्टेच्या मूडमध्ये होती.

"ए पकवू नकोस ग. सांग न काय म्हणाली नैना. आम्हाला खूप उत्सुकता लागली आहे. अर्थ सांगायला तयार झाली का नैना? मुळात तिला ती स्क्रिप्ट कळते का? काही बोलली की नाही ती घुमी नागीण?" जस्सी म्हणाला. त्याच्याकडे बघत संस्कृती म्हणाली; "जस्सी, नागीण? इतकी वाईट आहे का रे ती?" त्यावर एकदम सावरून घेत तो म्हणाला; "अग तसं नाही ग! पण बघ न... एकदम बारीक आणि खूप जास्त उंच आहे ती. सतत काळे कपडे; घट्ट वर बांधलेली वेणी; डोळ्यात काळं काजळ असा पेहेराव असतो तिचा. हातावर एक काय तो काळ्या रंगाचा जाडा दोरा आहे. कोणाशीही आपणहून बोलत नाही. कोणी समोरून बोलायला लागलं तर मोठे डोळे अजून मोठे करत फक्त निरखून बघत बसते. उत्तर तर कधीच देत नाही. एकदम गूढ वाटते यार ती. त्यामुळे सगळे मुलगे तिला नागीण म्हणतात." त्याच्याकडे बघत शांतपणे हसत संस्कृती म्हणाली; "माहीत आहे मला सगळे मुलगे तिला नागीण म्हणतात ते. अरे तुम्ही मुलं तर ठीक... मी तिच्या सोबत एकच रूममध्ये राहाते तर अनेक मुली मला विचारतात कसं जमतं मला. पण खरं सांगू का? तिचं आणि माझं पहिल्या दिवसापासून जमतं. सुरवातीला तिने मला थोडं हे कर - ते करू नकोस असं सांगायचा प्रयत्न केला. पण मग मी तिचं ऐकत नाही हे लक्षात आल्यावर तिने मला काही सांगायचं सोडून दिलं. हळूहळू मैत्री झाली आमची. त्यात तिचा पी. एच. डी. चा विषय माझा पण लाडका असल्याने आमचे गप्पांचे विषय एकच असतात. इतरांना ती थोडी खडूस, अबोल, शिष्ठ वाटत असेल; पण माझ्याशी ती मोठ्या बहिणीसारखी आहे. म्हणून तर मला खात्री आहे ती त्या श्लोकांचा अर्थ मला नक्की सांगेल. काल ती आपणहून म्हणाली की तिला लायब्ररीमध्ये जाऊन काही पुस्तकं बघावी लागतील. पण मुळात तिला ती स्क्रिप्ट माहीत आहे; त्यामुळे अर्ध काम झालंय."

संस्कृतीने दिलेली माहिती ऐकून जस्सी आणि शेषा खुश झाले. चौघेही त्यांच्या नेहेमीच्या उडप्याकडे नाश्ता करायला गेले. जस्सी आणि शेषा थोडं पुढे चालत होते ती संधी साधून गोविंदने संस्कृतीचा हात हलकेच धरला आणि चालण्याचा वेग अजून थोडा कमी करत तिला हलक्या आवाजात विचारलं; "काय म्हणाली नक्की नैना? खूप चौकशी केली का ग तिने?" गोविंदकडे बघत मंद हसत संस्कृतीने आदल्या रात्रीचा सगळा प्रसंग गोविंदला सांगितला आणि म्हणाली; "तिने खात्री केली की हे स्क्रिप्ट मलाच मिळालं आहे न. खरं सांगू तर मला वाटतं तिचा फार विश्वास नाही बसला माझ्या सांगण्यावर... तसं मला तिच्या डोळ्यात दिसलं. पण मी जास्त काही बोलले नाही आणि तिने फार खोलात जाऊन काही विचारलं नाही." "चल, ठीक! ती अर्थ सांगायला तयार झाली न; खूप झालं." लांब बघत गोविंद म्हणाला.

"गोविंद!" संस्कृतीने हाक मारली.

गोविंदचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. "हं?!" कुठेतरी बघत तो हुंकारला.

"गोविंद! तू अस्वस्थ आहेस का? काही झालंय का?" संस्कृतीने त्याचा दंड धरून त्याला थांबवत हलकेच विचारलं.

गोविंद थांबला आणि त्याने तिच्याकडे बघितलं. त्याचे डोळे काहीसे हरवलेले होते. तो तिच्याकडे टक लावून बघत होता; पण तरीही तो स्वतःतच हरवला आहे हे संस्कृतीला कळत होतं.

"काय झालंय गोविंद?" तिने परत एकदा मऊ आवाजात त्याला विचारलं.

आता मात्र गोविंद संस्कृतीकडे थेट बघत होता. "संस्कृती... त्या रात्रीपासून काहीतरी नक्की बदललं आहे." गोविंद म्हणाला. संस्कृतीला त्याच्या म्हणण्याचा अर्थ कळला नाही; पण तो गंभीर झाला आहे हे संस्कृतीच्या लक्षात आलं.

संस्कृती आणि गोविंद अचानक मागेच थांबून काहीतरी बोलत आहेत हे जस्सी आणि शेषाच्या लक्षात आलं आणि ते देखील मागे फिरले आणि त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले.

"काय झालं तुम्हाला? असे रस्त्यात मध्येच का थांबले आहात तुम्ही दोघे?" शेषाने विचारलं.

"अरे गोविंद थोडा अबोल वाटला म्हणून मी त्याला सहज विचारलं काय झालंय. तर तो...." संस्कृतीला थांबवत जस्सी म्हणाला; "गोविंद! All good? त्या रात्रीनंतर परत घडलंय का?" जस्सीच्या प्रश्नामुळे शेषा आणि संस्कृतीने गोविंद वरून नजर काढून जस्सीकडे वळवली.

"ओये! माझ्याकडे नका बघू तुम्ही. कमाल करता यार.... तुमच्या लक्षात नाही आलं? गोविंद त्यारात्री नंतर थोडा शांत झाला आहे. त्याची सतत तंद्री लागते आहे. मी जितक्या वेळा फोटो काढताना कॅमेरा गोविंदवर नेला तितक्या वेळा तो मला तंद्री लावून कुठेतरी बघताना दिसला. अगोदर मला वाटलं तिकडच्या जंगलाचा परिणाम असेल. पण इथे आल्यानंतर देखील तेच दिसतं आहे. अरे यार शेषा; आपण संस्कृतीची वाट बघत आत्ता उभे होतो तेव्हा देखील मी त्याला किमान पाच वेळा आपल्या गप्पांमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. पण हा पठ्ठ्या दुसरंच काहीतरी बघत होता." "हो! ते आलं माझ्या लक्षात. पण मला वाटलं त्या फोटोमधून काय निघत आहे याची उत्सुकता असल्याने तो गप आहे." शेषा म्हणाला.

"तुम्ही दोघे शांत झालात तर गोविंदला आपण विचारू शकतो." संस्कृतीने शांतपणे म्हंटलं. तिचं म्हणणं पटल्याने जस्सी शेषा शांत होऊन गोविंदकडे बघायला लागले. इतका वेळ सगळ्यांच बोलणं ऐकत उभा असलेला गोविंद म्हणाला; "लेको... खरे दोस्त आहात तुम्ही. हो! काहीतरी बदललं आहे.... चला खाता-खाता बोलूया." असं म्हणून गोविंद भरभर चालायला लागला. त्याच्या सोबत जस्सी, शेषा आणि संस्कृती देखील निघाले.

खाण्याची ऑर्डर देऊन चौघे बसले आणि गोविंदने बोलायला सुरवात केली. "यार, त्या रात्री मी त्या गुहेत थांबलो. फुल्ल हालत खराब होती माझी. त्यामुळे रात्रभर झोपलो नव्हतो. खूप उशिरा कधीतरी डोळा लागला त्यावेळी मला काहीतरी स्वप्न दिसलं. कोणीतरी पाठमोरं होतं... कळलं नाही कोण. बरं! कपडे पण इतके काहीतरी होते.... सुपरमॅन सारखं पाठीवरून काहीतरी बांधलं होतं आणि ते गुंडाळलं होतं अंगभर. केस वर घट्ट बांधले होते. उंच होतं कोणीतरी... चांबड्याचे बूट होते. त्या व्यक्तीने मान मागे करून खांद्यावरून मागे वळून बघितलं माझ्याकडे. मला ती नजर नाही आवडली. त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. काही क्षणांनी परत बघितलं तर ती व्यक्ती नव्हती. त्याचवेळी मला जाग आली आणि हाका पण ऐकू आल्या. त्या हाका ऐकून जीवात जीव आला होता माझ्या. त्यामुळे त्या स्वप्नाचा अर्थ शोधत न बसता मी पटकन तिथून निघालो. पण खरं सांगू? मला आत्ता देखील असं वाटतंय की ती नजर ओळखीची होती आणि ते स्वप्न जरी असलं तरीही खरंच तसं कधीतरी घडलं आहे. कोणीतरी माझ्याशी बोलून पुढे गेलं आणि मी मागून येत नाही आहे हे जाणवून मागे वळून बघत होतं माझ्याकडे. मात्र मला त्या व्यक्तीच्या सोबत जायचं नव्हतं. त्यामुळे मी दुर्लक्ष केलं आणि ते त्या व्यक्तीला पटलं नसल्याने त्या व्यक्तीने मागे वळून माझ्याकडे बघत नजरेतून मला दाखवून दिलं होतं." गोविंद बोलायचं थांबला. जस्सी, शेषा आणि संस्कृती गोविंदकडे बघत ऐकत होते. सगळेच शांत झाले.

काही क्षण गेले आणि संस्कृती काहीतरी बोलायला तोंड उघडणार इतक्यात तिला हॉटेलच्या दारात नैना दिसली. हाताची घडी घालून स्थिर नजरेने ती संस्कृतीकडे बघत होती. संस्कृती दाराकडे बघत होती म्हणून इतरांनी देखील त्या दिशेने बघितलं. नैना किती वेळ ती तिथे उभी होती कोण जाणे.... ते कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. संस्कृतीने नैनाकडे बघताच नैनाने तिला खुणेनेच जवळ बोलावलं. संस्कृतीने एकदा गोविंदकडे बघितलं आणि शांतपणे स्वतःची पर्स उचलून ती नैनाच्या दिशेने गेली. संस्कृती जवळ येताच नैनाने तिचा हात धरला आणि तिला काहीतरी म्हणाली. संस्कृतीने मागे वळून त्या तिघांकडे बघितलं. नैनाने देखील गोविंदकडे बघितलं. संस्कृतीने बाय करण्यासाठी हात उचलला आणि गोविंद, जस्सी आणि शेषाला काही कळण्याच्या आत संस्कृती नैनासोबत तिथून बाहेर पडली.

"अरे यार! हे काय? ही अशी काय न काही बोलता निघून गेली?" आश्चर्य वाटून जस्सी म्हणाला. उठत शेषा म्हणाला; "कोण समजते ती नैना स्वतःला. सरळ आली आणि संस्कृतीला घेऊन गेली. थांब तिला परत घेऊन येतो. असली दादागिरी नाही चालणार."

शेषाचा हात धरून त्याला परत बसवत गोविंद म्हणाला; "शेषा, उगाच काहीतरी करू नकोस. असं कोणीतरी आलं आणि चल म्हणाल तर सोबत जाणारी नाही संस्कृती. तरीही ती गेली आहे याचा अर्थ काहीतरी नक्की असेल. बरं! आपल्याला नैना पटत नाही; पण तिचं आणि संस्कृतीचं चांगलं पटत. मुख्य म्हणजे त्या फोटोमधले अर्थ आपल्याला नैनाच सांगणार आहे.... आपल्याला म्हणजे संस्कृतीला. कदाचित नैनाला तो अर्थ कळला असेल; तेच सांगायला नैना आली असेल आणि तोच अर्थ समजून घेण्यासाठी संस्कृती गेली असेल. त्यामुळे तुम्ही दोघेही एकदम शांत व्हा. चला, दिलेली ऑर्डर आली आहे तर आपण खाऊन घेऊ. कदाचित तोपर्यंत संस्कृती येईल देखील." गोविंदचं बोलणं जस्सी आणि शेषा दोघांनाही पटलं. तिघेही खायला बसले. एकदम जस्सीला काय सुचलं कोण जाणे.... तो फसकन हसत गोविंदला म्हणाला; "अबे; तुझ्या स्वप्नातली ती व्यक्ति म्हणजे ही महान नैना तर नसेल ना? तसही तिला तू आवडत नाहीस; आणि मला वाटतं तुला देखील ती आवडत नाही. त्यामुळे कधी काळी ती जर काही सांगायला आली तुला तर तू ऐकून घेणार नाहीस. मग ती पुढे जाईल आणि मागे वळून तुला खुन्नस देईल." त्याच्या कल्पना विलासावर गोविंद आणि शेषा दोघेही हसले.

संस्कृती नैनाजवळ गेली तेव्हा नैनाने तिला म्हंटलं; "संस्कृती; एक सांग.... तू मला जे फोटो दिलेस त्याबद्दल त्या तिघांना सांगितलं आहेस का?" तिचा प्रश्न ऐकून एक क्षण संस्कृतीने विचार केला आणि त्या तिघांकडे वळून बघितलं. तिला वाटलं नाकारावं. पण मग मनात काहीतरी विचार करून संस्कृतीने हलकेच 'हो' म्हणून मान हलवली. त्यावर संस्कृतीकडे स्थिर नजरेने बघत नैना म्हणाली; "काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी संस्कृती. चलतेस का माझ्या सोबत?" कुठलाही विचार न करता संस्कृतीने मागे वळून बाय केलं आणि ती नैना सोबत निघाली.

"नैना थोडं हळू चालशील का?" संस्कृतीने नैनाचा हात धरत म्हंटलं. नैनाने तिचा चालण्याचा वेग कमी केला आणि काहीसं हसत संस्कृतीकडे बघितलं. "सॉरी ग. मी अशी कोणासोबत कधी चालत नाही; त्यामुळे लक्षात नाही आलं की मी फारच पटापट चालते आहे." संस्कृती देखील हसली आणि म्हणाली; "अग तू इतकी उंच आहेस की तुझे पाय आपोआप लांब पडतात. त्यामुळे देखील तुझा वेग जास्त असतो. दमछाक होते आहे माझी तुझ्या सोबतीने चालताना. "बर! पण आता जरा बोलशील का? काय महत्वाचं बोलायचं आहे तुला? त्या श्लोकांचा अर्थ शोधलास का तू? काही खास आहे का त्यात?" संस्कृतीने नैनाकडे बघत म्हंटलं.

"संस्कृती आपण रूमवर जाऊन बोलूया का?" नैनाने अगदी हलक्या आवाजात म्हंटलं. "का ग? सांग की इथेच." संस्कृतीने आग्रह धरला.

"इथे? भर रस्त्यात? नको. आणि प्लीज... हॉटेलमध्ये पण नको. मला खूप लोक असले की अस्वस्थ वाटतं. चल न आपण आपल्या रूमवरच जाऊ." नैनाने आग्रह केला.

संस्कृतीला त्या श्लोकांचा अर्थ समजून घ्यायचाच होता. त्यामुळे नैनाला दुखावून चालणार नव्हतं. मानेनेच बरं म्हणून संस्कृती नैनासोबत चालत रूमवर गेली.

नैनाचा हात धरून तिला समोर बसवत संस्कृती म्हणाली; "हं! सांग!"

नैनाचा चेहेरा खूप गंभीर होता. "संस्कृती, मी तुला त्या लेखनाचा अर्थ सांगणारच आहे. पण त्याअगोदर तू मला काही प्रशांची उत्तरं देशील का?" ती म्हणाली.

संस्कृतीच्या कपाळावर आठ्या आल्या. "नैना, हे ब्लॅकमेलिंग आहे का? मी उत्तरं दिली तरच तू अर्थ सांगणार आहेस का?" काहीसं नाराज आवाजात संस्कृतीने विचारलं.

"उगाच काहीही बोलू नकोस संस्कृती. कारण नसताना नको ते अर्थ नको काढुस." अगदी शांत आवाजात नैना म्हणाली. तिचा शांतपणा संस्कृतीच्या मनाला आत भिडला. तिच्या डोळ्यात एक टक बघून संस्कृती म्हणाली; "बरं! विचार तुझे प्रश्न."

"संस्कृती, गोविंद आणि तू.... तुमचं नक्की नातं काय आहे?" नैनाने पहिला प्रश्न केला आणि संस्कृती तटकन उभी राहिली. "नैना, नको सांगूस अर्थ. तसही ते लिहिलेलं दिसण्या आगोदर देखील माझं आयुष्य साधं होतं आणि नंतर देखील राहणार आहे. पण केवळ त्याचा अर्थ सांगणार या नावाखाली तू मला माझ्या वयक्तिक आयुष्यातल्या लोकांबद्दल प्रश्न विचारणार असलीस तर मला ते मान्य नाही." एका श्वासात संस्कृती म्हणाली.

"संस्कृती..... तू अजूनही तीच आहेस ग." नैना बोलून गेली.

"तीच? म्हणजे?" आता संस्कृतीला राग यायला लागला होता. "काय म्हणायचं आहे तुला?" तिने आवाज चढवत विचारलं.

संस्कृती क्षणा-क्षणाने चिडत होती. तरीही नैना मात्र शांत होती. तिने तिच्या मनावरचा आणि आवाजावरचा ताबा अजिबात सोडला नव्हता.

"काही नाही संस्कृती. बस तू. मी तुला कोणताही प्रश्न न विचारता अर्थ सांगते. मात्र संपूर्ण अर्थ समजला की मग तू आपणहून..... मी काय म्हणते आहे ते नीट ऐक... आपणहून इच्छा झाली तर मला खरं काय आणि कसं घडलं होतं ते सांग." नैना म्हणाली.

"काय खरं आणि कसं घडलं नैना? का कोड्यात बोलते आहेस?" अजूनही संस्कृती वैतागलेली होती.

"बस! कळेल तुला मी काय म्हणते आहे ते.... बरं! अर्थ सांगू न? ऐक.... अगोदर काय लिहिलं आहे ते सांगते. कदाचित ते ऐकतानाच तुला अर्थ कळेल. जर नाही कळला तर मी सांगेनच....

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।

नैनाने हातातल्या कागदावरची नजर उचलली आणि संस्कृतीकडे बघितलं. संस्कृती डोळे मिटून ऐकत होती. तिचा चेहेरा अगदी शांत होता. तिने डोळे उघडले आणि नैनाकडे बघितलं.

"मला नाही गोविंदला दिसलं होतं ते. त्याने नवीनच डिजिटल कॅमेरा घेतला आहे. त्यावर त्याने ते फोटो काढले. आम्हाला त्या लेखाचा किंवा श्लोकाचा अर्थ समजणं शक्य नव्हतं. तुलाच कळला असता. पण तुला गोविंद आवडत नाही; त्यामुळे त्याने फोटो काढले आहेत हे कळल तर तू अर्थ सांगणार नाहीस असं मनात आलं माझ्या आणि मी तुला खोटं सांगितलं की ते फोटो मीच काढले आहेत." नैनाच्या डोळ्याला डोळा देत संस्कृती म्हणाली.

पुढे झुकून नैनाने संस्कृतीचा हात हातात घेतला आणि म्हणाली; "संस्कृती, या लेखामध्ये खूप मोठा आणि खूप खोल अर्थ दडलेला आहे."

"खरं सांगू का नैना, मला काहीही कळलेलं नाही. पण माझं अंतर्मन मला सांगतंय की या श्लोकाचा अर्थ कळल्या नंतर अचानक सगळं बदलून जाणार आहे. एक मन म्हणतं आहे की अर्थ समजून न घेता हे सगळं विसरून जाणं बरं. त्याचवेळी दुसरं मन मात्र त्या अनादी-अनंत आणि अनोळखी भविष्याकडे ओढ घेतं आहे...." संस्कृती शांतपणे बोलत होती. बाहेरून एकणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वाटलं असतं की कुठल्यातरी अंमलाखाली ही बोलते आहे. पण संस्कृती पूर्ण शुद्धीत होती. तिची द्विधा मनस्थिती तिची तिला जाणवत होती.

"संस्कृती, मी तुला त्या श्लोकाची फोड करून सांगणार आहे. फक्त माझी एकच विनंती आहे.... तू गोविंदला या श्लोकाचा अर्थ सांगू नयेस असं मला वाटतं. अर्थात हे सांगतानाच मला माहीत आहे की तू माझं ऐकणार नाही आहेस. हमम! ठीक" नैना म्हणाली.

"तर अर्थ आहे....

सृष्टी निर्माता नच जरी स्व हा।
तुझी कामना पूर्त विश्वात।
हा श्लोक ज्याच्यासाठी आहे तो (स्व) तो जरी सृष्टी निर्माता नाही; तरी तुझी (या स्व ची) (कामना) इच्छा याच विश्वात पूर्ण होईल आणि त्याने इच्छा केलेली निर्मिती होईल.

निर्मिती नष्ट दुष्ट प्रकृती करिती।
शोध घे तू मानवात।
ही निर्माण झालेली निर्मिती दुष्ट प्रवृत्तीचे लोक नष्ट करतील. तू त्यांचा शोध मानवांमध्येच घे.

सोबत सोबतांची तुजसवे असता।
आयुष्य बदलते सर्वस्व।
तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुझ्या बरोबर असेल तर तुझे आयुष्य बदलून जाईल.

नच सोबत अर्थहीन मग।
समजून घे तू विश्वास।
पण जर काही कारणाने ही तुझ्या जवळच्या लोकांची सोबत तुला नाही लाभली; तर सगळंच अर्थहीन होईल. त्यामुळे त्यांचा विश्वास तुला कायम समजून घ्यावा लागेल.

तू नच नर - नरेश तु।
फलप्राप्ती तुज इष्ट।
तू केवळ एक नर (सर्वसामान्य माणूस) नाहीस तर नरेश म्हणजे राजा आहेस; हे विसरू नकोस. तू जर हे कायम लक्षात ठेवलेस तर तुला इष्ट ती फलप्राप्ती होईल."

नैनाने अर्थ सांगितला आणि संस्कृतीकडे बघितलं.

"नैना मला अजूनही काहीही कळलेलं नाही." संस्कृती म्हणाली.

"संस्कृती; ऐक.... तो जो स्वतःला नर समजतो तो खरं तर एक नरेश आहे. हे तो विसरला आहे. जर त्याला ते आठवलं आणि ते त्याने लक्षात ठेवलं तर त्याला इष्ट फल प्राप्ती होईल. पण त्यासाठी त्याने काही शक्तींच्या मदतीने सर्वसामान्य मानवांकडून विश्वामध्ये जी निर्मिती करून घेतली आहे आणि काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी जिचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला आहे; त्या निर्मितीकडे त्याच्या जवळच्या, विश्वासाच्या सोबत्यांबरोबर जावं लागेल." नैनाने अजून नीट फोड करून अर्थ सांगितला.

संस्कृतीने नैनाकडे एकटक बघितलं आणि म्हणाली; "मी माझ्या मित्रांना भेटायला जाते आहे. त्याला पटो अथवा न पटो नैना.... मी त्यांना भेटणं आवश्यक आहे."

नैनाने काही क्षण एकटक संस्कृतीकडे बघितलं आणि मग मान खाली घातली. तिने शांतपणे हात पुढे केला आणि हातातला कागद संस्कृतीला दिला. तो कागद हातात घेताना संस्कृतीला जाणवलं की नैना खूपच हताश झाली आहे. पण त्याक्षणी तिला गोविंद, जस्सी आणि शेषाला भेटणं जास्त महत्वाचं वाटत होतं. आपण नंतर नैनाशी बोलू... असं मनात ठरवून तिने तो कागद घेतला आणि ती रूम बाहेर पडली.

क्रमशः

No comments:

Post a Comment