Friday, January 21, 2022

अनाहत सत्य (भाग 8)

 अनाहत सत्य

भाग 8

गुहेजवळून निघताना त्याने बॅगमधून पांढरा खडू काढला आणि मोठया झाडांवर खुणा करत तो निघाला. त्याला फार लांब जावं नाही लागलं. समोरच त्याला त्याचे ट्रेकर मित्र दिसले. त्यांना हाक मारून तो त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला.

"आयला, गोविंद! तू जिवंत आहेस? आम्हाला तर वाटलं एव्हाना तुला जंगलातल्या प्राण्यांनी किंवा माणूस खाणाऱ्या माणसांनी मारून टाकलं असेल. पण ती संस्कृती मागे लागली केवळ म्हणून तुला शोधत आलो आम्ही. बरा वाचलास रे." त्यांच्यातला एकजण म्हणाला. त्यावर हसत गोविंद म्हणाला; "मेलोच असतो यार. पण नशिबाने इथे एक गुहा दिसली आणि आत जनावर आहे की नाही याचा अंदाज घेऊन तिथेच थांबलो होतो." "अरे इथे कोणती गुहा रे? आम्ही तर कधी कोणती गुहा बघितली नाही. इतक्या वेळा आलो आहोत या भागात...." कोणीतरी म्हणालं. त्यावर गोविंद म्हणाला; "मला अगदी वाटलं होतं तुम्ही असच म्हणाल म्हणून मी खुणा करत करतच आलो आहे. हवं तर चला आपण बघू आत्ताच." त्याचे मित्र तयार झाले आणि ते परत मागे फिरले. गोविंदच्या मनात तेच होतं. त्याला सोबत असताना आणि जास्त उजेड असताना परत एकदा त्या तलावाच्या जवळ जायचं होतं.

गोविंदने केलेल्या खुणांच्या मदतीने ते तिघे परत एकदा गुहेच्या दिशेने निघाले. थोडं अंतर ते गेले आणि मग गोविंदच्या लक्षात आलं की अनेक झाडांवर तशाच खुणा आहेत. तो काहीसा गोंधळला. तेवढ्यात त्या तिघांना कोणीतरी बोलल्याचा आवाज आला आणि त्यांना ध्यानी मनी नसताना समोरून काही लोक आले.

"कोण रे पोरं तुम्ही? ट्रेकर्स दिसता. या भागात काय करता आहात?" त्यातला एक माणूस पुढे होत म्हणाला. "हो! आम्ही ट्रेकर्सचं आहोत. आमचा हा मित्र रात्री इथेच एका गुहेत अडकला होता. तो आत्ता आम्हाला भेटला. पण इथे गुहा असावी असं वाटत नाही. कारण आम्ही इथे नेहेमी येतो; तरी कधी दिसली नव्हती. म्हणून त्याच्या सोबत आम्ही ती गुहा शोधतो आहोत. त्याने तर झाडावर खुणा देखील केल्या आहेत." त्यांच्यातल्या एकाने उत्तर दिलं. त्यावर तो माणूस मोठ्याने हसला आणि म्हणाला; "कोणत्या खुणा म्हणता आहात? या पांढऱ्या खडूच्या का? त्या आमच्या स्टाफने केल्या आहेत. कोणती झाडं कीड लागलेली आहेत आणि कोणत्या झाडांची वेगळी छाटणी करायची आहे ते ठरवण्यासाठी. मुळात इथे कोणतीही गुहा नाही. त्यात जर याने खुणा केल्या आहेत तर त्या आम्ही नेहेमी करतो तशाच कशा असतील? सर्वसाधारणपणे फुली किंवा बरोबरची खुण केली जाते. इथे खूण जी आहे ती आम्ही करतो तशी आहे. काय रे! तुला ही खुण करायला कशी सुचली?" त्या माणसाने विचारलं.

त्याचा एकूण पेहेराव आणि अधिकार वाणीने बोलणं यावरून तो फॉरेस्ट ऑफिसर असावा असा अंदाज गोविंदने बांधला आणि अगदी शांत आवाजात तो म्हणाला; "सर, मला सहज सुचलं तशी खुण पहिल्यांदा केली आणि मग तशाच खुणा करत मी पुढे निघालो. फार विचार नव्हता केला मी. मला माझ्या मित्रांच्या हाका ऐकू येत होत्या. ते दूर जाण्याच्या आत मला त्यांना गाठायचं होतं. पण मी खरंच सांगतो आहे सर, मी काल रात्री इथे एका गुहेमध्ये राहिलो होतो. आत एक मोठा तलाव आहे.... आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तलावाचं पाणी वाहातं आहे."

त्याचं बोलणं ऐकून तो अधिकारी क्षणभर विचारात पडला आणि मग गोविंद जवळ जाऊन त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला; "मुला, तू म्हणतो आहेस तशी गुहा इथे जवळ पास नाही हे मी तुला नक्की सांगतो. त्याच सोबत हे देखील खरं आहे की कदाचित रात्री तुला चकवा लागला आणि तू कुठेतरी भरकटत गेलास. तिथे झाडांच्या गर्दीत कदाचित तुला कोणता तरी तलाव दिसला. पण अंधारामुळे तुला ती गुहा वाटली असेल. इथे असे अनेक तलाव काही काळासाठी निर्माण होतात आणि नाहीसे होतात. पण ते सगळं जाऊ दे. मुख्य म्हणजे अशा पाणथळ जागेजवळ रात्रभर राहून देखील तू जिवंत आहेस ही देवाची कृपा समज आणि आता निघा तुम्ही सगळे इथून. तसा हा भाग देखील रिस्ट्रिकटेड आहे फिरण्यासाठी."

त्यांचं बोलणं ऐकून ते तिघे मागे फिरले आणि तिथून निघाले. काही पावलं पुढे जाऊन गोविंदने मागे वळून बघितलं. पण मागे कोणीही दिसलं नाही त्याला. 'ते सगळे मिळून किमान पाच लोक होते. अचानक सगळेच कसे दिसेनासे झाले?' गोविंदच्या मनात आलं. पण मग काही न बोलता तो त्याच्या मित्रांसोबत निघाला आणि त्यांच्या कॅम्पवर जाऊन पोहोचला.

त्याला बघताच संस्कृती धावत समोर आली आणि त्याचा हात धरत म्हणाली; "गोविंद!!! अरे कुठे गायब झाला होतास? हे सगळे तर म्हणत होते आता तू मिळणार नाहीस. खूप घाबरले होते मी." संस्कृतीच्या मागून आलेले जस्सी आणि शेषादेखील आले होते. त्या तिघांनाही गोविंदने एका बाजूला घेऊन त्याचा रात्रीचा अनुभव सांगितला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी आणि जंगलात भेटलेल्या ऑफिसरने सांगितलेली मतं देखील सांगितली. संस्कृती, जस्सी आणि शेषा गोविंदचा अनुभव ऐकून एकदम गप झाले. थोडा वेळ गेला आणि जस्सी म्हणाला; "मला उत्सुकता आहे यार ती गुहा बघण्याची. यार अशी गुहा असेल आणि तिथे तलाव वगैरे असेल तर याचा अर्थ तिथले फोटो झकास येतील. काहीतरी वेगळं बघायला मिळेल यार. चला न आपण शोधुया ती गुहा." त्याचं बोलणं ऐकून शेषा वैतागून म्हणाला; "जस्सी, तुला वेड लागलं आहे का? अरे अशी कोणतीही गुहाच नाही. मग तू काय म्हणतो आहेस की जाऊया.... बघूया???"

शेषाचं बोलणं ऐकून गोविंदने त्याची सॅक उघडली आणि त्याचा कॅमेरा बाहेर काढला. नवीन डिजिटल कॅमेरा त्याने चालू केला आणि गोविंदने फोटो दाखवायच्या अगोदरच जस्सीने कॅमेरा हातात घेऊन त्याची स्क्रीन चालू केली. शेवटचे चारही फोटो त्या तलावाजवळचे होते!!!

"अबे!!!! देखो यारो!!! गोविंद सच बोल रहा है। कूच तो अलग है इन फोटो मे।" जस्सी म्हणाला. त्याबरोबर शेषा आणि संस्कृतीने डोकं पुढे करत कॅमेरामध्ये बघितलं. गोविंद थोडा मागे उभा राहून बघत होता. भिंतीचा फोटो बघून संस्कृतीने कॅमेरा खेचून घेतला आणि ती फोटो निरखून बघायला लागली. काही क्षण त्या फोटोकडे बघून ती गोविंदकडे वळली आणि म्हणाली; "तुला माहीत आहे का तू नक्की कशाचा फोटो काढला आहेस?" शांतपणे संस्कृतीकडे बघत गोविंद म्हणाला; "हो संस्कृती. ती लिपी आहे. आपली नेहेमीची नाही. पण काहीतरी लिहिलं आहे या भिंतीवर. ते जाणवलं म्हणून तर मी फोटो काढला त्या भिंतीचा." डोळे मोठे करत संस्कृती म्हणाली; "काहीही झालं तरी मला ती गुहा.... ती भिंत बघायचीच आहे. आपण आत्ताच जायचं तिथे."

तिचं शेवटचं वाक्य इतर ट्रेकर्स पैकी एकाने ऐकले आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणाला; "अरे यार. तुम्ही अजूनही गोविंद जे म्हणतो आहे त्यात अडकला आहात का? तिथे असं काहीही नाही बघण्यासारखं. अरे इथल्या फॉरेस्ट ऑफिसरने देखील सांगितलं की इथे गुहा वगैरे काहीही नाही. गोविंदला भास झाला. चला बॅग्स पॅक करा. आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनला निघायचं आहे."

 त्याचं बोलणं ऐकून संस्कृतीने गोविंदकडे वळून बघितलं. गोविंदने तिला डोळ्यांनीच शांत राहायला सांगितलं. शेषा आणि जस्सीला देखील गोविंदने शांत राहायला सांगितलं आणि सगळेच आवरायला गेले. ट्रेक सुरू झाला आणि जस्सी, शेषा, संस्कृती आणि गोविंद एकत्र चालायला लागले.


"गोविंद, ती गुहा नक्की कुठे आहे हे आता समजण शक्य आहे का? मला खरंच तिथे जायचं आहे." संस्कृती गोविंद बरोबर चालत म्हणाली.

"आता तिथे जाणं अशक्य आहे संस्कृती. त्यामुळे तिथे न जाता देखील ती लिपी कोणती आहे आणि त्या भिंतीवर काय लिहिलं आहे ते कसं कळेल आपल्याला? यावर विचार करायला सुरवात कर." गोविंद म्हणाला.

"माझ्या मते ती खूप जुनी लिपी आहे. नीटसं दिसत नाहीय. त्यामुळे त्यावर फार काही आत्ताच सांगता नाही येणार मला. पण आमच्या अभ्यासात हा विषय होता. पण आपल्याला याबद्दलची सगळी माहिती नैना देऊ शकेल. यार ती याच विषयात पी. एच. डी. करते आहे. आपण तिला हे फोटो दाखवुया. काय वाटतं?" संस्कृती म्हणाली.

तिचं बोलणं ऐकून जस्सी फसकन हसला आणि म्हणाला; "हे बेस्ट आहे. तिच्याकडे हे फोटो घेऊन गोविंदला जाऊ दे. म्हणजे तर ती लगेच सगळी माहिती घडाघडा सांगेल. ती तर वाटच बघते आहे न; की कधी एकदा गोविंद येतो आणि मी त्याच्याशी गप्पा मारते." जस्सीच बोलणं ऐकून शेषा देखील खदाखदा हसायला लागला.

"गप यार जस्सी." गोविंद म्हणाला. चालता चालता तो संस्कृतीला म्हणाला; "तुला वाटतं का नैना आपल्याला मदत करेल?"

"गोविंद तिला तू पटत नाहीस. का ते मला माहीत नाही. पण हे फोटो तू काढले आहेस हे सांगायची गरजच काय? मी तिला प्रिंटआउट नेऊन दाखवते. ते बघून ती सांगेल. जर तिने काही जास्त प्रश्न विचारले तर मीच फोटो काढले आहे असं सांगीन. तुझा अनुभव मी माझा आहे असं सांगेन; म्हणजे झालं न? हे आपल्या चौघांमध्ये क्लिअर असलं की इतर कोणाला काही उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही न? काय वाटत तुम्हाला?" संस्कृती म्हणाली.

"ये ठीक लगता है।" शेषा म्हणाला.

जस्सी आणि गोविंदने देखील होकारार्थी मान हलवली. एकदा निर्णय झाला आणि हा विषय बाजूला ठेऊन त्यांनी संपूर्ण लक्ष ट्रेकवर घातलं.

ते परत आले आणि त्याच दिवशी गोविंदने फोटो डेव्हलप करून संस्कृतीला दिले.

रात्री संस्कृती तिच्या खोलीत आली तर समोरच नैना काहीतरी वाचत बसली होती. संस्कृतीला आत आलेलं बघून देखील नैना काहीच बोलली नाही. आपण ट्रेकला गोविंद बरोबर गेलो होतो हे नैनाला आवडलं नव्हतं याची संस्कृतीला जाणीव होती. पण अर्थात नैनाला काय आवडतं आणि काय पटत नाही; याचा विचार संस्कृतीला करायचा नव्हता. त्यामुळे तिला राग आला आहे हे आपल्याला कळलेलंच नाही असा आव आणून संस्कृती तिच्याजवळ जाऊन बसली.

"ए बिझी आहेस का?" तिने गोड आवाजात नैनाला विचारलं.

"उगाच लाडात येऊ नकोस संस्कृती. काय हवंय तुला? नक्की कोणती तरी स्क्रिप्ट आणली आहेस अर्थ विचारण्यासाठी." नैना तिच्याकडे न बघताच म्हणाली. नैनाचं बोलणं ऐकून संस्कृती क्षणभर चमकली. पण मग हसत-हसत म्हणाली; "अय्या हो ग. तुला कसं कळलं? अग, मला एक वेगळाच अनुभव आला या ट्रेकला. कोणाशीही शेअर नाही केलाय मी हा अनुभव. हे फोटो बघतेस का? अग ट्रेकच्या पहिल्याच दिवशी मी चुकले होते ग; आणि एक संपूर्ण रात्र मी एका गुहेत होते. सगळं शांत झाल्यावर मला आतून पाण्याचा आवाज ऐकू आला. मला खूप ताहान लागली होती. म्हणून मग अंदाज घेत मी आत गेले...." असं म्हणत संस्कृतीने गोविंदचा अनुभव स्वतःचा म्हणून नैनाला सांगितला आणि शेवटी फोटो नैनाच्या हातात ठेवत विचारलं; "तुला ही स्क्रिप्ट माहीत असेल न ग? मला अर्थ सांगू शकशील का?"

तिचं सगळं बोलणं नैनाने शांतपणे ऐकून घेतलं होतं. तिने फोटो हातात घेतले आणि बघितले. त्या फोटोंकडे बघताना नैना नकळत ताठ बसली. बराचवेळ फोटो निरखून बघितल्यावर नैनाने नजर वर उचलली आणि संस्कृतीला विचारलं; "तू काढले आहेस का हे फोटो?" संस्कृती तिच्या प्रश्नाने मनातून काहीशी हलली. पण आवाजात बदल होऊ न देता तिने शांतपणे म्हंटलं; "अग, मी काढले नसते तर ते माझ्याकडे आले असते का? काहीही का विचारतेस? बरं, तू अर्थ सांगतेस का याचा?"

"थोडा अर्थ लागतो आहे; पण मला उद्या लायब्ररीमध्ये बसून एक दोन पुस्तकं बघायला लागतील. मगच मी नक्की सांगू शकते काय लिहिलं आहे. श्लोक आहे काहीतरी... इतकचं आत्ता सांगते." नैना म्हणाली.

ती फार काही न विचारता अर्थ सांगायला तयार झाली यामुळे संस्कृती खुश झाली आणि हसून बर म्हणून स्वतःच्या बेडकडे गेली.

क्रमशः

No comments:

Post a Comment