Friday, January 14, 2022

अनाहत सत्य (भाग 7)

 अनाहत सत्य

भाग 7

"मिठठू, तिथे प्रवेश करण्याच्या अगोदर काही प्रश्नांची उत्तरं माहीत असावीत यासाठी मी सतत धडपडत होतो. मागच्या वेळी 'आत जाऊ या का?' या तुझ्या प्रश्नाला म्हणूनच मी बगल दिली होती. आणि आता तू म्हणतो आहेस की आपण त्या जागेमध्ये प्रवेश करण्या अगोदर आम्हाला दोघांना सगळं सत्य माहीत असणं आवश्यक आहे... म्हणजे असं तर नाही न की मी जे शोधायचा प्रयत्न करत होतो ते तुला अगोदरच माहीत होतं; आणि तरीही तू मला सांगितलं नाहीस? अचानक निर्मितीच्या येण्याने असं काय झालं आहे मिठठू की सगळी गणितं बदलून गेली?" सरांच्या प्रश्नाने निमिर्ती दचकली आणि तिने सरांकडे बघितलं. तिच्या येण्याने काय झालं हे तिला कळलं नव्हतं. मुख्य म्हणजे अचानक तिचं तिथे असणं सरांना खटकत आहे की काय असं तिला वाटलं. कदाचित ते तिच्या डोळ्यात दिसलं असेल; तिच्याकडे बघत तिच्या पाठीवर थोपटत सर म्हणाले; "निर्मिती, मी तुला कोणताही दोष देत नाही आहे. मुळात दोष तर कोणालाही देत नाही आहे. फक्त हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे की हे संपूर्ण नाटक अगोदरच लिहून तयार आहे का? आपण फक्त आपापली भूमिका करणारी पात्र आहोत का? जर हे खरं असलं तर मात्र मला हे समजून घ्यायला आवडेल की मी नक्की कुठलं पात्र आहे या नाटकात....

"सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे." मिठठू अजिजिने म्हणाला.

"नाही रे मिठठू! तक्रार नाही आहे माझी. फक्त आयुष्याच्या सारिपाटावरचं माझं स्थान समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.... आणि आता तर वाटतं आहे की त्याचा विचार देखील करू नये. मी कोण विचारणारा आणि समजून घेणारा... पण माझ्यापुरता एक आनंद तर नक्की मी ठेऊ शकतो; की तिथे काहीतरी असं आहे जे अगम्य आहे; पण खोटं नाही! थोडासा कदाचित अंधविश्वास आहे; पण अंधश्रद्धा नाही... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते जे काही आहे... किंवा जे कोणी आहे... त्याचा माझ्यावर विश्वास आहे हे नक्की." सर एक दीर्घ श्वास घेत म्हणाले.

"सर... फक्त विश्वास नाही तर खात्री आहे की जर काही शक्य असलं तर ते तुमच्या हातूनच शक्य आहे....

"का?"

"याचं कारण.... सर... याचं कारण खूप खूप मागच्या काळात दडलं आहे.... मी केवळ आणि केवळ एक दुवा आहे जोडणारा. माझा या नाटकातला रोल इतकाच आहे.... पण तरीही तुमच्या प्रमाणे मी देखील खुश आहे की त्यांनी माझी निवड केली आहे. सर, आपण आत्ता एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आणि विसाव्या शतकात आहोत. दिदी तुमचं वय केवळ बावीस वर्षांचं आहे. तरीही तुम्ही ग्रॅज्युएशनच्या वेळी मानवीय जीवन उत्पत्ति आणि त्याचा ऱ्हास हाच विषय का घेतलात? आज देखील तुम्हाला प्रत्येक युगातील मानवी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची ओढ आहे. मानव जन्माला कसा आला असेल? त्याने स्वतःला कसं प्रगत केलं असेल? कसे जगत असतील ते लोक त्या काळात? त्यावेळची संस्कृती किती प्रगत झाली होती? कधी ऱ्हास पावली .... त्याची कारणं काय असतील? त्यावेळची भाषा, व्यवहार, धर्म, चाली-रिती...... दिदी तुम्हाला सगळं सगळं समजून घ्यायचं आहे. पण हाच विषय का? कारण तुमच्या लहानपणी तुमच्या त्या लहानशा गावाच्या जवळच्या टेकड्यांमध्ये काही गुहा होत्या. ज्या तुम्हाला सतत आकृष्ट करायच्या. त्या गुहांच्या अभ्यासासाठी राणे सर तिथे आले. त्यांना त्या गुहांमध्ये काहीच मिळालं नाही... पण तुम्हाला राणे सर भेटले; तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट मिळालं. शिक्षणाला दिशा मिळाली. त्यानंतर तुम्ही मागे वळून बघितलंच नाहीत. हे सगळं जितकं खरं आहे तुमच्या बाबतीत; तितकंच हे देखील खरं आहे न दिदी की तुम्हाला फारसे मित्र-मैत्रिणी नाहीत...." मिठठू बोलायचा थांबला आणि त्याने निर्मितीकडे बघितलं.

निर्मितीचा चेहेरा अगदी शांत होता. त्यावर कोणतेही आश्चर्याचे भाव नव्हते. तिने अगदी शांतपणे मिठठूकडे बघत म्हंटलं; "मिठठू तू जे जे सांगितलं आहेस न ते सगळं अगदी तंतोतंत खरं आहे; एकही शब्द खोटा नाही. खरं तर मला आश्चर्य वाटायला हवं नाही का? तुला हे सगळं इतकं नीट कसं माहीत? तू तर वयाने देखील खूप लहान आहेस. पण तरीही मला मुळीच आश्चर्य वाटलेलं नाही; कारण ही सगळी माझ्या आयुष्यातली सत्य आहेत... कधीच लपून न राहिलेली. त्यामुळे माझ्याबद्दल माहिती काढायची ठरवलं तर हीच आणि इतकीच माहिती असू शकते सगळ्यांना. तुझं वय लहान असलं तरीही तू ही माहिती मिळवू शकतोस; हा विश्वास आहे मला. तू ज्या प्रकारे काल रात्रीपासून बोलतो आहेस; त्यावरून तुझा आवाका माझ्या लक्षात आला आहे."

निर्मितीचं बोलणं ऐकून सर शांतपणे हसले आणि मिठठू देखील. "दिदी, तुम्हाला इम्प्रेस करायला नाही सांगितलं मी हे सगळं. त्यामागे एक वेगळी कारणमीमांसा आहे. ती तुम्हाला पटावी अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच थोडक्यात तुम्हाला तुमचाच इतिहास.... या जन्मातला पास्ट.... मी सांगितला. सर, दिदी... मी तुम्हाला सुरवातीलाच सांगितलं की आपण त्या जागेमध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला दोघांना सगळं सत्य माहीत असणं आवश्यक आहे; असं माझं मत झालं... आणि म्हणूनच तुम्हाला सगळं खरं सांगण्याची परवानगी मी घेतली आहे." मिठठू म्हणाला.

"मिठठू, नमनालाच घडाभर तेल झालं आहे बरं का तुझं." निर्मिती हसत हसत म्हणाली. तिने वापरलेली म्हण ऐकून सर आणि मिठठू दोघेही हसले. पण क्षणात मिठठूचा चेहेरा गंभीर झाला आणि तो सावरून बसला. सर आणि निर्मिती देखील मिठठू आता काय सांगतो ते ऐकायला सरसावून बसले.

"सर, दिदी... आता मी जे सांगणार आहे ते सुरवातीला कदाचित तुम्हाला पटणार नाही. मनात काही प्रश्न निर्माण होतील .पण तरीही एक विनंती आहे; सगळे प्रश्न माझं सांगून झालं की मग विचारा...

तर दिदी... मला तुझा सगळा पास्ट माहीत आहे; कारण तो मला कोणीतरी सांगितला. अगदी खरं आहे तुझं म्हणणं. फक्त तो कोणी सांगितला हे थोडं वेगळं आहे. ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सत्य घटना सांगतो... कारण ती तुम्हाला कळणं आवश्यक आहे. फार जुनी नाही ही घटना. जेमतेम बावीस-तेवीस वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे नीट सांगायचं तर दिदी तुझ्या जन्माच्या जस्ट आधीचीच.

दिदी, तू आत्ता ज्या वयाची आहेस न त्याच वयाची होती संस्कृती. आर्कियोलॉजि विषय घेऊन तिने ग्रॅज्युएशन केलं होतं आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन करणार होती. तुझ्या प्रमाणेच ती देखील होस्टेलमध्ये राहात होती. तू तशी अबोल आहेस आणि तुला मित्र-मैत्रिणी नाहीत; पण संस्कृतीला होते. फक्त मित्र असं नाही तर अगदी खास मित्र देखील होता तिला. गोविंद! संस्कृती आणि गोविंद एकमेकांच्या प्रेमात होते. गोविंद खूप श्रीमंत होता. ग्रॅज्युएशन नंतर त्याने घरच्या व्यवसायामध्ये लक्ष घालावं असं त्याच्या वडिलांना वाटायचं. पण गोविंदचं मन या कामात रमत नव्हतं. आपण दुसरं काहीतरी करावं असं त्याला खूप वाटत होतं. पण नक्की काय ते मात्र त्याला सांगता येत नव्हतं. त्याचे दोन अगदी खास मित्र! शेषा... म्हणजे शेषवाहनस्वामी आयांगार. शेषा खरं तर गोविंदचा मित्र तर होता पण तरीही गोविंदची परफेक्ट लाईफ बघून त्याला नेहेमी वाटायचं की त्याचं आयुष्य देखील तसंच असावं. अर्थात त्याने तसं कधीच गोविंदला म्हंटलं नाही. पण गोविंदची मैत्री देखील कधी सोडली नाही. शेषाच्या वडिलांचं स्वतःचं दुकान होतं. पण गोविंद प्रमाणे शेषा देखील वडिलांच्या दुकानात बसायला तयार नव्हता. जस्सी म्हणजे जगदीश यादव हा या त्रिकुटातला तिसरा कोन. त्याला फोटोग्राफीचा नाद होता. खूप सुंदर फोटो काढायचा तो. अत्यंत उत्तम प्रतीचा कॅमेरा होता त्याच्याकडे. जिममध्ये अंगमेहेनत करायची आणि निसर्गाचे फोटो काढायचे इतकंच त्याला माहीत होतं. त्याच्या घरी कोण होतं; तो कुठे राहात होता ते गोविंद आणि शेषाला माहीत नव्हतं. जस्सीला त्याबद्दल बोलायला आवडत नसे. त्यामुळे ते दोघे त्याला त्याविषयावरून कधी छेडत नसत.

संस्कृती सोबत तिच्या हॉस्टेलच्या रूममध्ये तिची पार्टनर नैना राहायची. ती पी. एच. डी. ची तयारी करत होती. नैना रूपाने सावळी होती. पण तिची उंची मुलींच्या मानाने खुपच जास्त होती. सडसडीत अंगाची नैना कायम काळे कपडेच घालायची आणि कधीच कोणाशीही बोलायची नाही. सुंदर लांब केसांची एक घट्ट वेणी, काळी जीन्स आणि तसाच काळा किंवा फार तर ग्रे टॉप असा तिचा वेष असायचा. तिच्या डाव्या हाताच्या मनगटात एक जाड काळा धागा वेणीप्रमाणे गुंफलेला होता. इतरांशी न बोलणारी नैना संस्कृतीशी मात्र मोकळेपणी बोलायची. नैनाला गोविंद अजिबात आवडत नव्हता. "संस्कृती, अग शिक्षण पूर्ण झालं तरी तो काहीही करत नाही आहे. ना वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालतो आहे; ना काही नवीन शिकण्याचा मानस आहे त्याचा. का आहेस तू त्याच्यासोबत?" नैना अलीकडे संस्कृतीला सतत हाच एक प्रश्न करत होती. संस्कृतीला ते आवडत नव्हतं; पण का कोण जाणे तिला नैनाला दुखवायचं नव्हतं. त्यामुळे ती सतत या विषयाला बगल देत होती.

रिझल्ट लागल्यानंतर संस्कृती तिच्या घरी जाणार होती. पण तिच्या वडिलांचा तिला फोन आला की काही कामाच्या निमित्ताने ते परदेशात जात आहेत. संस्कृतीची आई लहानपणीच वारली होती. वडील नाहीत म्हंटल्यावर तिने तिचं जाणं रहित केलं. पण आता काय करावं तिला माहीत नव्हतं. कॉलेज सुरू होईपर्यंत नैना सोबत होस्टेलमध्ये राहायची तिची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यादिवशी संध्याकाळी जेव्हा गोविंद, शेषा आणि जस्सी नेहेमीच्या उडप्याकडे तिला भेटले तेव्हा तिने त्यांना कल्पना दिली की ती बाबांकडे जात नाही आहे. ते ऐकताच जस्सीने एकदम उत्साहात उडी मारली आणि म्हणाला; "ये बेस्ट हो गया. अरे माझ्या माहिती मधला एक ग्रुप आसामच्या खोऱ्यामध्ये ट्रेकसाठी जातो आहे. तुमची हरकत नसेल तर आपण पण जाऊया का? अप्रतिम निसर्ग आणि घरच्यांची कटकट नाही. बोलो!" जस्सिची ऑफर ऐकून सगळेच खुश झाले. पण मग शेषाचा चेहेरा एकदम उतरला. "तुम्ही जा यार. आप्पा परवानगी नाही देणार. मग पैसे कसे भरू मी?" तो म्हणाला. त्याच्या खांद्यावर हात टाकत गोविंदने डोळा मारला आणि म्हणाला; "तू फक्त परवानगी घेऊन ये. बाकी मी बघतो."

.... आणि अशा प्रकारे ही चौकडी आसामच्या खोऱ्यात येऊन पोहोचली.

पहिलाच दिवस होता त्याचा ट्रेकचा. सर्वांनी एकत्र राहायचं आणि आधार होण्याच्या आत कॅम्पसाठी ठरवलेल्या जागी पोहोचलंच पाहिजे; हे सगळ्यांना सांगण्यात आलं आणि सगळा ग्रुप निघाला. त्यावेळी नुकताच डिजिटल कॅमेराचा शोध लागला होता. जस्सी त्याचा कॅमेरा देणार नाही हे माहीत असल्याने गोविंदने स्वतःसाठी एक डिजिटल कॅमेरा घेतला होता. संस्कृतीला कॅमेरा दाखवून तो म्हणाला; "हा जस्सी आपले फोटो काढणार नाही; म्हणून मी मुद्दाम नवीन कॅमरा घेऊन आलो आहे." कॅमेरा बघून संस्कृती हसली आणि म्हणाली; "ते ठीक आहे गोविंद. पण त्या नवीन कॅमेराच्या नादात हरवून जाऊ नकोस हं. हा भाग खूपच अवघड आहे. इथे फक्त आदिवासी नाही.... तर नरभक्षक आदिवासी राहातात. सोबत राहा सगळ्यांच्या."

संस्कृतीच्या तोंडाने नियती तर बोलत नव्हती? कारण कसं कोण जाणे...... पण कुठल्यातरी एका चुकार क्षणी गोविंद सगळ्या ग्रुपपासून तुटूला आणि एकटा पडला. गोविंदच्या लक्षात आलं की तो हरवला आहे. क्षणभर तो गांगरून गेला. आपण हरवलो आहोत.... कायमचे की काय? त्याच्या मनात आलं. पण अंधारायला लागलं होतं आणि कुठेतरी सुरक्षित ठिकाणी थांबणं याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता ग्रुपला शोधणं सोडून त्याने स्वतःसाठी सुरक्षित ठिकाण दिसतं आहे का ते पाहायला सुरवात केली.... आणि त्याला एका मोठ्या झाडाच्या मागे लपलेली एक गुहा दिसली. गुहा!!! म्हणजे प्राणी!!! पण मग तो हसला. आपल्या कथांमध्ये असतं तसं वाघ आणि सिंव्ह असे गुहांमध्ये राहात नाहीत याची त्याला कल्पना होती. पण तरीही कोणताही इतर प्राणी तिथे असू शकतो ही शक्यता तो विसरला नव्हता. त्यामुळे आडोसा आहे इतपतच तो गुहेजवळ जाऊन बसला. हळूहळू अंधार झाला आणि पक्षी शांत झाले. गोविंदला भूक आणि तहान लागली होती. त्याच्याकडे मॅगी आणि ते बनवण्यासाठी भांडं देखील होतं. पण पाणी संपलं होतं. काय करावं त्याला सुचेना.

थोडा अजून वेळ गेला आणि त्या शांततेमध्ये गोविंदला गुहेच्या आतून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आला. नक्की पाण्याचा आवाज आहे की आपल्याला भास होतो आहे; ते गोविंदला कळेना. पण लागलेली तहान त्याला स्वस्थ देखील बसू देत नव्हती. शेवटी हिम्मत करून त्याने एका हातात टॉर्च आणि एका हातात कॅमेरा घेऊन हळूहळू आत जायला सुरवात केली. अगदीच कोणता प्राणी समोर आला तर त्याच्या डोळ्यावर फ्लॅशचा उजेड टाकून धूम बाहेर पळायचं असं त्याने ठरवलं होतं.

गोविंदला फार आत जावं नाही लागलं... अगदीच पंधरा-वीस पावलांवर त्याच्या समोर एक तलाव होता. आता रात्र झाली होती; तरीही गोविंदला तो तलाव.. त्याची लांबी-रुंदी दिसत होती. तलाव असूनही पाणी वाहतं होतं... वाहातं पाणी आहे म्हणजे चांगलंच असणार. असा विचार करून गोविंद तलावा जवळ गेला आणि ओंजळीने पाणी प्यायला. थंड पाणी प्यायल्यावर त्याला बरं वाटलं. कुठून उगम आहे या पाण्याचा? त्याच्या मानत आलं. सावकाश अंदाज घेत तो तलावाच्या कडेने एका बाजूला चालायला लागला. साधारण तलाव निमुळता होत जिथे भिंतीमध्ये शिरला होता तिथे गोविंद पोहोचला. उगम पाहण्यासाठी तलावात उतरणं आवश्यक आहे हे लक्षात आलं आणि गोविंदने अंदाजाने कडेचा आधार घेतला. भिंत ओबडधोबड होती... पण... अहं.... फक्त ओबडधोबड नव्हती; तर त्याला काहीतरी अर्थ असावा; असं गोविंदला वाटलं. त्याने भिंतीवर हात फिरवून बघितलं आणि त्याला धक्का बसला. तो काही निर्माण झालेला ओबडधोबडपणा नव्हता. तिथे काहीतरी लिहिलं होतं. गोविंदने अंदाज घेत हातातल्या कॅमेऱ्याने भराभर फोटो काढले. इतक्यात त्याला पाण्यात काहीतरी हालचाल जाणवली. गोविंद मागे फिरला आणि भराभर चालत परत गुहेच्या तोंडाशी येऊन बसला.

आत्ता आपण आत जो अनुभव घेतला तो खरा होता की खोटा तेच त्याला कळत नव्हतं. तो तसाच बसून राहिला... पण दमलेल्या गोविंदचा कधीतरी डोळा लागला. सकाळी पक्षांच्या आवाजाने त्याला जाग आली. रात्रीचा अनुभव खरा होता का.... त्याच्या मनात प्रश्न आला. पण त्याचवेळी त्याच्या नावाने हाका मारलेल्या त्याला ऐकू आल्या. त्याच्या ग्रुप मधले नेहेमीचे ट्रेकर्स त्याला शोधण्यासाठी आले आहेत हे लक्षात येऊन गोविंदने त्याची बॅग उचलली आणि झपझप चालत तो तिथून बाहेर पडला.

क्रमशः

No comments:

Post a Comment