Friday, January 7, 2022

अनाहत सत्य (भाग 6)

 अनाहत सत्य



भाग 6

निर्मिती जागी झाली. आजूबाजूला अगदीच शांत होतं. तिने उठून बघितलं तर सर देखील नव्हते. काहीसं गोंधळून ती बाहेर आली. एकूण आजूबाजूच्या वातावरणावरून तिला वेळेचा अंदाज येत नव्हता; म्हणून तिने हातातल्या घड्याळाकडे बघितलं... पण तिचं डिजिटल घड्याळ बंद पडलं होतं. तिने न राहावून सरांना हाक मारली; आणि जवळच्याच झाडीमधून सर तिच्या समोर येऊन उभे राहिले.

"आली का जाग तुला? good! मी मुद्दामच तुला उठवलं नव्हतं. तसही आज आपण काहीच करणार नव्हतो. त्यात इतक्या प्रवासानंतर देखील काल रात्री तुझी झोप झाली नव्हती. म्हणून म्हंटलं तुझी झोप पूर्ण होईपर्यंत उगाच कशाला उठवा." सर तिच्याकडे बघत हसत म्हणाले.

यावर निर्मिती देखील मनापासून हसली आणि म्हणाली; "होय सर. मला तर वाटलं होतं की विचारांच्या गर्दीत मला झोपच येणार नाही. पण आडवी पडले आणि डोळे मिटताच मला गाढ झोप लागली. ते थेट आत्ता जाग आली. पण सर माझं घड्याळ बंद पडलं आहे. त्यामुळे किती वाजले आहेत याचा अंदाजच येत नाहीय. त्यात इथे इतकी झाडं आहेत की बाहेरच्या वातावरणाच्या मदतीने अंदाज बांधणं देखील अशक्य आहे."

"निर्मिती, दुपारचे दोन वाजले आहेत." सर हसत स्वतःच्या मनागटावरील घड्याळ बघत म्हणाले.

"ओह! भलतीच गाढ झोप होती मग माझी. अर्थात इथे तशी इतकी शांतता आहे की कोणी मुद्दाम हाक मारली तरच जाग येईल. नाहीतर पूर्ण झोप झाली की मगच!" निर्मिती म्हणाली. त्याचवेळी तिच्या मनात प्रश्न आला आणि तिने सरांना विचारलं; "पण सर तुमचं घड्याळ कसं चालू आहे?" "अग निर्मिती, तू इथे पहील्यांदा येते आहेस; मी नाही. मला माहीत आहे की इथे डिजिटल गोष्टी चालत नाहीत नीट. त्यामुळे मी अगदीच साधंस घड्याळ घातलं आहे. अर्थात आत्ता तरी ते वेळ दाखवतं आहे. पण कधी बंद पडेल सांगता येत नाही.... आणि का बंद पडेल ते देखील कळणार नाही. बर ते जाऊ दे. तुला भूक लागली असेल ना? ये काहीतरी खाऊन घे." असं म्हणून सर निर्मितीला घेऊन परत जवळच्याच झाडीमध्ये शिरले. निर्मिती देखील त्यांच्या मागे निघाली. अगदीच दहा-बारा पावलं गेल्यावर निर्मितीला समोर एक साधीशी झोपडी दिसली. समोर छान अंगण होतं आणि तिथे लहान मुलं खेळत होती. बाजूलाच काही बायका बसून काहीतरी करत होत्या. निर्मितीला त्या काय करत होत्या ते कळलं नाही; पण एक मंद गोड वास येत होता त्यांच्या पुढ्यात ठेवलेल्या ढिगातून. त्या बायकांनी कंबरेला जेमतेम झाकेल असं काहीतरी गुंडाळलं होतं. गळ्यात फुलांच्या माळा होत्या... पण इतकंच. त्याहून जास्त त्यांच्या अंगावर काहीच नव्हतं. निर्मितीला बघून त्या एकमेकींकडे बघून खुसखुसत हसल्या आणि परत आपल्या कामाला लागल्या.

त्यांच्या पासून थोडं लांब पण त्यांच्याकडे तोंड करून सर बसले आणि अगदी सहज त्या बायकांशी गप्पा मारायला लागले.... त्यांच्या भाषेतून. निर्मितीला ते सगळंच थोडं अवघड वाटलं. नकळत ती त्या बायकांना पाठ करून बसायला लागली. पण सरांनी तिला लगेच थांबवलं आणि म्हणाले; "निर्मिती त्यांच्या दृष्टीने तू इतकं अंग झाकलं आहेस ते विचित्र आहे. त्यात जर तू त्यांना पाठ करून बसलीस तर तू त्यांचा स्विकार केलेला नाहीस असा अर्थ होईल. त्यामुळे निःसंकोच त्यांच्याकडे तोंड करून बस आणि चेहेरा हसरा ठेव." सरांचं बोलणं ऐकून निर्मितीने लगेच तिचा मोहोरा बदलला आणि ती त्या बायकांच्याकडे तोंड करून बसली. त्याचवेळी त्यांच्यातली एक उठली आणि समोरच्या ढिगात हात घालून तो ढीग तिने ओंजळीत घेतला. येऊन सर आणि निर्मितीच्या मध्ये ते ठेऊन ती झोपडीच्या दिशेने गेली आणि आतून एक लांबलचक बांबू घेऊन आली. तो बांबू देखील तिने हसत सरांच्या हातात दिला आणि परत एकदा तिच्या जागेवर जाऊन बसली.

त्या बायका नक्की काय करत आहेत याचा अंदाज घेण्यासाठी निर्मितीने त्यांच्या दिशेने सरकत त्यांचं निरीक्षण केलं. तिच्या लक्षात आलं की त्या समोरच्या ढिगाला निवडत आहेत. आपण शेंगा जसे निवडतो आणि फोडून आतले दाणे काढतो... तसा काहीसा उद्योग चालू होता त्यांचा. म्हणजे त्या बाईने त्यांच्यातल्या शेंगा खाण्यासाठी आपल्याला आणून दिल्या आहेत तर... असा विचार करून निर्मिती तिच्या पुढ्यातल्या शेंगांकडे वळली. पण पुढ्यातल्या त्या प्रकाराकडे बघून तिला मोठा धक्का बसला. तिच्या पुढ्यात ठेवलेला ढीग म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराच्या मुंग्या होत्या. तिने नजर उचलून सरांकडे बघितलं आणि तिचे डोळे विस्फारले गेले. सरांनी एक मुंगी उचलली होती आणि तिचं डोकं मोडून तोंडात टाकली होती. ते बघूनच निर्मिती शहारली. सरांनी दुसरी मुंगी उचलली आणि त्यांचं लक्ष निर्मितीकडे गेलं. तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून सरांच्या लक्षात आलं की हा एकूण प्रकार निर्मितीच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यांनी मंद स्मित केलं आणि म्हणाले; "निर्मिती; मला कळतंय तुला धक्का बसला आहे. पण चिंता करू नकोस. अग, या मुंग्या अत्यंत चविष्ट आहेत. क्षणभरासाठी असा विचार कर की तू तुझ्या गावाकडे असलेला रानमेवा खाते आहेस. या मुंग्यांचं डोकं तोडून टाकलं की या अत्यंत चविष्ट लागतात. काहीसा आंबट आणि तिखट वाटावं असं चर्चरीतपणा आहे या चवीमध्ये. त्यात अगदी दहा-बारा मुंग्या खाल्यास ना तरी पोट गच्च भरेल."

"पण सर मुंग्या? म्हणजे मला ही कल्पना देखील असह्य होते आहे हो." निर्मितीने प्रांजळपणे काबुल केलं. तिची मनस्थिती समजून घेत सर म्हणाले; "मी समजू शकतो निर्मिती... हा तुला मोठा धक्का आहे. पण आता तू मनाची तयारी कर की यापुढे इथे असेपर्यंत प्रत्येक क्षणी तुला काहीतरी वेगळं अगदी तुझ्या कल्पनेच्या पलीकडचं दिसणार - अनुभवाला येणार आहे. कारण मुळात आपण सर्वसाधारण परिस्थितीत नाही आहोत." निर्मितीला सरांचं म्हणणं पटलं. पर तरीही मुंगी खाण्याच्या कल्पनेनेच तिला अस्वस्थ वाटायला लागलं. ती या मुंग्या खाऊ शकणार नाही हे लक्षात आल्याने सरांनी तिच्या पुढ्यात बाजूला ठेवलेला बांबू दिला आणि म्हणाले; "ठीक आहे. आज एकदम हे असं खाणं तुला जमणार नाही; मान्य आहे मला. बरं, पण हा बांबू घे. एका बाजूने तोंडाला लाव. एक प्रकारचं वेगळंच पेय आहे. आवडेल तुला चव आणि मुख्य म्हणजे तब्बेतीला एकदम छान आहे ते." निर्मितीने एकदा सरांकडे आणि एकदा बांबूकडे बघितलं. तिचं मन तयार नव्हतं; पण भूक देखील चांगलीच लागली होती. त्यामुळे बांबू उचलून तिने हातात घेतला. एका बाजूने झाडाच्या जाड पानांनी बंद केला होता तो बांबू. ते पण काढून तिने वास घेऊन बघितला. गोडसर वास जाणवला तिला. वासावरून ते पेय चांगलं असावं असं तिच्या मनात आलं आणि तिने तो बांबू तोंडाला लावला आणि घाबरत-घाबरत एक लहानसा घोट घेतला. पण तिला ती गोडसर आंबट चव आवडली. ती एकदा सरांकडे बघत हसली आणि मग बांबू तोंडाला लावून तिने बरचसं पेय संपवलं.

ते पेय पिऊन तिला खरंच पोट भरल्यासारखं वाटायला लागलं. बांबू सरांकडे देत ती म्हणाली; "सर, खरंच छान चव आहे याची. नक्की काय आहे हे?" तिच्याकडे बघत हसत सर म्हणाले; "ते काय आहे ते समजलं तर तुला नाही आवडणार; कदाचित उलटून देखील पडेल जे प्यायली आहेस ते." सरांच्या वाक्याने ती थोडी अस्वस्थ झाली. पण मग स्वतःला शांत करत म्हणाली; "सर, आत्ताच तुम्ही म्हणालात न मनाची तयारी कर; मी केली आहे तयारी. उलटून नक्की नाही पडणार. कदाचित थोडी अस्वस्थ होईन मी... पण सर चालेल मला. सांगा ना सर... काय आहे हा पदार्थ?" "निर्मिती, ते कोणत्या तरी पक्षाच्या रक्तापासून बनवलेलं आहे. कोणता पक्षी ते मला देखील माहीत नाही." सरांचं बोलणं ऐकून निर्मिती खरंच खूप अस्वस्थ झाली. पण मग तिने स्वतःला सावरलं. ती शांत आहे हे लक्षात येऊन सरांना देखील हायसं वाटलं. तिच्याकडे बघत सर म्हणाले; "एका क्षणासाठी मला वाटलं की तुला इथे आणून चूक केली मी." हे ऐकून मात्र निर्मितीने शांतपणे नजर उचलून सरांच्या नजरेला भिडवली आणि म्हणाली; "सर, कधीच असा विचार करू नका. तुम्ही मला इथे येण्याबद्दल सांगितलंत तेव्हाच मी मनाची तयारी केली होती इथे जे अनुभव येतील ते स्वीकारण्याची." निर्मितीचं बोलणं ऐकून सरांना थोडं बरं वाटलं आणि तिच्याकडे बघत हसत त्यांनी समोरच्या ढिगातली अजून एक मुंगी उचलली. सरांच्या नजरेतला मिश्किल भाव बघून निर्मिती देखील हसली आणि म्हणाली; "सर, मनाची तयारी अजून होते आहे हं." आणि दोघेही मनापासून हसले.

निर्मितीने परत एकदा जवळ बसलेल्या त्या बायकांचं निरीक्षण करायला सुरवात केली. त्या एकमेकींशी काहीतरी गप्पा मारत समोरच्या मुंग्यांची डोकी मोडून ठेवत होत्या. इतक्यात बाजूची झाडं हलली आणि तिथून मिठठू पुढे आला. त्याला बघताच सर सावरून बसले आणि निर्मिती देखील. मिठठू त्या दोघांच्या जवळ येऊन बसला.

"नक्की कशासाठी गेला होतास मिठठू? काय आहे तुझ्या मनात ते अगदी स्पष्ट सांगशील का मला?" सरांनी मिठठूच्या डोळ्यात बघत विचारलं.

एकदा निर्मितीकडे बघून मिठठूने सरांकडे बघितलं आणि बोलायला सुरवात केली....

"सर, तुम्हाला असं वाटतंय की इथे जे मंदिर आहे त्याचं महत्व मला कळलंय आणि आपली ही पुराण वास्तू सर्वांसोमोर यावी.... तिचं खरं सत्य सर्वांना समजावं... तिचं महत्व सिद्ध व्हावं... इथली अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं आहे....."

"मिठठू, तुला नक्की काय म्हणायचं आहे? उगाच गोल गोल काहीतरी बोलू नकोस...." सर अजून काही बोलायच्या अगोदर मिठठूने त्यांचं वाक्य तोडलं आणि म्हणाला;

"सर, आज आत्ता मी तुम्हाला सगळंच अगदी स्पष्ट आणि सरळ सांगणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा संपर्क केला होता तेव्हा पासूनच मला सगळं सांगायचं होतं. पण मला तशी परवानगी नव्हती. पण काल रात्री दिदी सोबत गप्पा झाल्या आणि माझं मला जाणवलं की दिदीला तिथे नेण्याअगोदर तुम्हाला आणि दिदीला सगळं खरं समजलं पाहिजे. म्हणूनच मी तसाच परवानगी घेण्यासाठी गेलो.

सर, परवानगी मुखीयची नाही! त्या मंदिरची..... किंबहुना.... त्या मंदिरामधून जो मार्ग जातो आणि जिथे खुला होतो... तिथे जे आहेत... त्यांची.

सर..... मी तुम्हाला पहिल्यांदा संपर्क करावा... तुम्ही इथे याल यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करावं हा संकेत मला मिळाला. त्या संकेतानुसार मी पावलं उचलली आहेत. सर, तुम्हीच विचार करा.... इथे या जंगलात अनेक नरभक्षक जमाती अजूनही आहेत; हे सत्य आहे. अगदी लांब कशाला जायला हवं... आमच्या वस्तीच्या मुखीयाला तुम्ही भेटला आहात. त्याच्या डोळ्यात तुम्हाला एक राग-चीड कायम दिसली आहे; तुम्ही अनेकदा मला ते सांगितलंत. मी तुमची समजून करून दिली की तो राग माझा आहे; मी तुम्हाला इथे आणलं त्याचा. पण सर, तुम्ही बरोबर होतात. तो राग खरा तुमचाच. पण तरीही त्याने तुम्हाला काहीही केलं नाही... कोणीच काही केलं नाही. तुम्ही इथे आलात... परत गेलात... आणि असं अनेकदा झालं. तरीही तुम्हाला काहीही अडचण आली नाही... कारण सर; तुम्ही इथे यावं अशी ज्यांची इच्छा होती... आहे.... ते या जागेचे; फक्त या जागेचे नव्हे तर संपूर्ण जगाचे अनभिषिक्त नियंत्रक आहेत."

मिठठू जे बोलत होता ते सरांना आता सहन होईनासं झालं आणि त्यांनी त्याला बोलणं थांबवण्याची खुण केली. सर बोलायला लागले त्यावेळी रागाने थरथरणारा आवाज ते कसाबसा नियंत्रित करत आहेत हे निर्मितीच्या लक्षात आलं. तिने सरांना इतकं चिडलेलं कधीच बघितलं नव्हतं. तिला देखील मिठठूचं बोलणं पटत नव्हतं. कोणाकडून तरी मिळालेला संकेत... अनभिषिक्त नियंत्रक... हे सगळं म्हणजे अंधश्रद्धा आहे; हे तिला कळत होतं. पण सरच बोलत आहेत म्हंटल्यावर ती गप्प बसली... पण तेव्हढ्यापुरतच होतं ते... कारण सर जे बोलले ते ऐकून तिचे डोळेच विस्फारले गेले.... सर म्हणाले....

"मिठठू, मला कल्पना आली होती... मी तुला विचारलं देखील होतं याविषयी. पण त्यावेळी तू ते सगळं टाळत होतास. मी इथे येऊन देखील तू मला त्या मंदिराच्या जवळ देखील न्यायला तयार नव्हतास. मी आपणहून; तुझ्या मदतीशिवाय प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही... तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की इथे काहीतरी वेगळं असं आहे. निर्मिती आठवतं का तुला मी या जागेविषयी सांगायला सुरवात केली तेव्हाच तुला मी म्हंटलं होतं की इथे एका खूप जुन्या संसकृतीचं अस्तित्व मला सापडलं आहे. अग, ते जे काही मंदिर सदृश आहे तिथून एका गूढ अस्तित्वाची सुरवात आहे; हे मला जाणवलं होतं. तिथे पूर्वी कदाचित् अनेक युगांपूर्वीची संस्कृती नांदत असावी असा मी कयास बांधला होता. पण मी याविषयी खूपच शाशंक होतो त्यामुळे कुठेही काहीही बोललो नव्हतो."

"सर, तुम्ही कुठेही काहीही बोलला नव्हतात म्हणूनच इथे परत परत येऊ शकत होतात." मिठठू परत एकदा सरांचं बोलणं तोडत म्हणाला.

निर्मितीची अवस्था मात्र अगदीच विचित्र झाली होती. सरांनी आठवण करून दिल्यावर तिला आठवलं होतं की सर अगदीच सुरवातीला असं काहीसं म्हणाले होते. पण असं काहीतरी गूढ असेल असं सहज बोलून गेले असतील सर; असं तिला वाटलं होतं. शास्त्रोत अभ्यास करणारे सर... हे असलं काही गूढ अतिरंजित असेल यावर विश्वास ठेवतील हे तिला खरंच वाटलं नव्हतं. नक्की काय बोलावं ते तिला कळत नव्हतं... त्यामुळे ती अगदीच शांत झाली होती.

"सर, तुम्ही सत्य समजून घेण्याच्या मनस्थितीत आला आहात हे त्यांना कळल्या नंतरच त्यांनी तुमचं इथलं येणं पूर्णपणे स्वीकारलं. पण यावेळी येताना तुम्ही दिदीला आणलंय. दिदीचं येणं मला पूर्ण अनपेक्षित होतं. त्यामुळे मी पूर्ण गोंधळलो होतो. पण मग तुम्ही दोघेही किमान इथपर्यंत यायला हरकत नाही; हा संकेत मला मिळाला आणि तुम्ही दोघे इथे आलात. मात्र जस मी म्हणालो; दीदीशी बोलल्यानंतर मला जाणवलं की आपण त्या जागेमध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला दोघांना सगळं सत्य माहीत असणं आवश्यक आहे... आणि म्हणूनच तुम्हाला सगळं खरं सांगावं हे त्यांना सांगून परवानगी घ्यायला गेलो होतो मी." मिठठू म्हणाला.

एक क्षण निर्मितीकडे बघून सरांनी मिठठूला विचारलं..... "मग?"

"सर, परवानगी घेऊन आलो आहे....." मिठठू म्हणाला आणि सरांचा चेहेरा खुलला तर निर्मितीचे डोळे मोठे झाले.

क्रमशः

No comments:

Post a Comment