Friday, November 26, 2021

अनाहत सत्य (भाग 1)

 अनाहत सत्य


भाग 1



"निमा... ए निमु? उलथली वाटत ही परत त्या टेकडीच्या टोकाला! काय कराव या मुलीचं कळत नाही." वहिनी निर्मितीला हाका मारून कंटाळल्या होत्या. दुपारी आईचा आणि वहिनीचा डोळा लागलेला बघून परत निर्मिती तिच्या लाडक्या टेकडीकडे पळाली होती असं दिसत होतं. तिची आई चहा टाकता टाकता वहिनींना म्हणाली," वहिनी कशाला हाका मारून तुम्ही तुमचा गळा सुकवता आहात. येईल ती तिन्हीसांजेच्या आत. एकटी फार नाही फिरत ती. सारखं त्या टेकडीकडे पळायचं आणि त्या गुहांमधून फिरायचं खूळ लागलय तिला. पण काsssssही नाही त्या गुहांमध्ये वहिनी. हे हिला कोण समजावणार? आणि आपण ढीग समजावू; हिने समजून घेतल पाहिजे न! पूर्वी मला काळजी वाटायची तिची त्या उजाड गुहांकडे एकटी भटकत असते म्हणून. मग गण्याला पळवायची मी हिच्या मागे. पण मध्ये ते इतिहास की जीवशास्त्र की असेच कोणी संशोधक आले होते ना... त्यांनी त्या गुहा निट आतून बाहेरून बघितल्या आणि म्हणाले इथे काही नाही. तेव्हापासून मी काळजी सोडून दिली आहे." 

"तुझ खरं आहे गं, संशोधनवाल्यांना काही नसेल मिळालं; पण कोणी जादूटोणा करणारे किंवा साता जन्मापूर्वीचं काहीतरी असलं तर तिथे? मला तर बाई काळजी वाटते." वहिनी म्हणाल्या. 

निमाची आई यावर मात्र ठामपणे उभी राहून म्हणाली,"वहिनी काहीतरी नका आणू मनात. या सगळ्यावर ना माझा विश्वास, ना ह्यांचा आणि असले विचार निमाच्याही मनात यायची गरज नाही. हे असले जादू-टोणे, मंत्र-तंत्र, पूर्व जन्मीच असलं आपणच तयार करतो आणि घाबरत रहातो. जगात जे काही घडत न त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आणि पाठबळ असत ह वहिनी."

मग मात्र वहिनीने या विषयावर बोलणं टाळालं. तिला माहित होत की निमाचे आई-वडील असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसत. त्यामुळे याबाबतीत गप्प राहिलेलं बरं असं तिचं कायमचं धोरण होतं. म्हणून मग तिने विषय बदलला. "अग, पण त्या संशोधनवाल्या  लोकांनी या निमीला काहीतरी खूळ डोक्यात घालून दिलं आहे न त्याचं काय? काल रात्री माझ्या जवळ झोपली होती तेव्हा मला सांगत होती की तिला पुराणशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मी म्हंटलं अग आपल्या पुराणांमध्ये खुप व्रत-वैकल्य आहेत. अनेक देव आहेत... तुला कोणत्या देवाचं व्रत करायचं आहे? तर मला म्हणते वहिनी तू म्हातारी झालीस. मी पुराणशास्त्र म्हणाले ना म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वी... अगदी लाखो वर्षापूर्वी मनुष्य कसा रहात होता? त्याकाळची संस्कृती... त्यावेळचे राहणीमान... सगळ्याचा अभ्यास करणार आहे मी. बोल आता यावर मी काय म्हणणार होते. काहीतरी डोक्यात घेते ही मुलगी." चहा बरोबर खायला चकल्या काढत वहिनी म्हणाली.

***

कोकणातल्या एका लहानश्या गावात आयुष्य गेलेल्या वहिनीला निर्मितीची स्वप्न समजणं अवघडच होते. मात्र निर्मितीचे वडील परिस्थितीमुळे फार शिकू शकले नसले  तरी हुशार होते. मुळात त्यांचा प्रगत शास्त्रावर विश्वास होता आणि त्यांनी निर्मितीच्या आईला वेळोवेळी समजावून आणि प्रसंगी दाखले देऊन जुन्या चुकीच्या कल्पना तिच्या मनातून पुसून टाकल्या होत्या. त्यांनी प्रयत्नपूर्वक तिचा शास्त्रनिष्ठ गोष्टींवर विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे तीदेखील अंधश्रद्ध नव्हती. 

निर्मिती अशा समजूतदार घरात जन्माला आली होती. त्यामुळे तिला तशी फारशी बंधनं नव्हती. तस लहानसं गाव असलं तरी निर्मितीच्या वडिलांना तिथे खूप मान होता. निर्मिती इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी होती. लहानपणापासूनच तिला घरामागच्या टेकडीचं खूप आकर्षण होतं. कधीतरी पूर्वी गावातल्या लोकांनी त्या टेकडीवर काही गुहा आहेत हे शोधलं. निर्मितीला त्या गुहांबद्दल आकर्षण होतं. त्या गुहांमधून काही चित्र कोरलेली होती. ती बघत बसायला निर्मितीला खूप आवडायचं. ती कधी कधी तिच्या वडिलांना देखील आग्रह करून तिथे घेऊन जायची आणि त्या कोरलेल्या चित्रांमधून काय कथा आहेत ते विचारायची.  तिच्या वडिलांना देखील याबद्दल काहीच माहिती नव्हती. पण अर्थात ते तसे समजूतदार होते. ते  कायम मुंबई पुण्याकडे कामाच्या निमित्ताने जात असल्याने अशा काही गोष्टी कळल्या तर त्याची माहिती शहरातल्या पुरातत्व विभागाला द्यायला हवी हे त्याना माहित होत. त्यामुळे त्यांनी गावातल्या इतर जाणकार आणि समजुतदार लोकांशी बोलून या गुहांची माहिती मुंबईमधल्या पुरातत्व विभागाला दिली होती. तेच लोक येऊन त्या गुहांची पहाणी करून गेले होते. परंतु त्यांनी सांगितल होत की तिथे अशी कोणती पुराणशास्त्राला निगडीत माहिती नाही. फार तर काही ३००-४०० वर्षांपूर्वी त्यावेळच्या काळाच्या गरजेपोटी या गुहा तयार केल्या गेल्या असतील तिथेल्या लोकांकडून... एक आडोसा किंवा तत्सम काहीतरी म्हणून किंवा अजूनही काही कारण असेलही. पण त्यातून फार काही निष्पन्न नव्हते. तिथे अजून काही माहिती मिळणे शक्य नाही. पण अर्थात त्या गुहा एक पुरातत्व स्थापत्य म्हणून सांभाळण आवश्यक होत; आणि त्यासंदर्भात आवश्यक त्या गोष्टी तिथे आलेल्या लोकांनी त्यांच्या संस्थेशी बोलून केल्या होत्या. 

पुरातत्व विभागाचे लोक गावात येऊन गेल्यानंतर निर्मितीमध्ये मात्र खूप मोठा बदल झाला होता. मुळातच त्या गुहांमधील चित्रांमधल्या गोष्टी समजून घ्यायची इच्छा असल्येल्या निर्मितीला आणि तिच्या विचारांना एक दिशा मिळाली होती. ते लोक आठ  दिवस त्यांच्या गावात होते तितके दिवस निर्मिती त्यांच्याबरोबरच फिरत होती. एरवी शांत आणि अबोल स्वभाव असलेल्या निर्मितीने त्यांच्याशी मात्र मैत्रीच केली होती; कारण तिला त्यांच्या चर्चांमध्ये आणि एकूणच त्या विषयामध्ये खूपच रस होता. प्रोफेसर राणे आणि त्यांचे दोन असिस्टट रोज सकाळी उठून त्या टेकडीकडे जायचे आणि प्रत्येक गुहेच बारकाईने निरीक्षण करून त्याच परीक्षण लिहून ठेवायचे. निर्मितीसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे जायची. त्यांची एकमेकांशी होणारी चर्चा ऐकायची. मग दुपारी प्रोफेसर साहेब थोडी विश्रांती घ्यायला बसले की मनातले प्रश्न हळू हळू त्यांना विचारायची. अगोदर एखाद्या लहान मुलीची चिमणी उत्सुकता असा विचार करून प्रोफेसर राणे तिला सोपी आणि साधी माहिती देत होते. परंतु दोन दिवसात त्यांच्या लक्षात आलं की निर्मितीला बाल वयातली बालिश उत्सुकता नाही. तिचे प्रश्न खुप विचार करून केलेले असतात. तिने स्वतः प्रयत्न पूर्वक याविषयातली माहिती गोळा केली आहे. याचं त्यांना खूप कौतुक वाटलं. मग मात्र कामाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी तिला जवळ बसवून एकूणच आपला पुरातत्व वारसा आणि स्थापत्यातून समजणारा इतिहास हा  विषय समजावायला सुरवात केली. 

निघायच्या आदल्या रात्री प्रोफेसर राणेंनी निर्मितीला जवळ बोलावलं, समोर बसवलं आणि म्हणाले,"निर्मिती बेटा, तुझ्या वयाच्या मानाने तू खूपच समजूतदार आहेस. तुला पडणारे प्रश्न देखील बालिश नाहीत तर खूप विचर करून अभ्यासू मनाने विचारलेले आहेत. म्हणून मी तुला आज थोडी  माहिती देणार आहे. हे बघ आजचा मानव खूप खूप प्रगत आहे. आपल्यामध्ये आणि इतर कोणत्याही जनावरांमध्ये एकच फरक आहे आणि तो म्हणजे आपण विचारशील आहोत. आपण अन्न, निवारा आणि प्रजनन यापुढेही विचार करतो. आणि म्हणूनच आपण आज इतके प्रगत आहोत. परंतु लाखो वर्षांपूर्वी मानव इतर जनावरांसारखाच होता. त्याची हळू हळू स्थित्यंतरं झाली. त्यामुळे त्यावेळची भौगोलिक परिस्थिती आणि मानवाचं रहाणीमान हा आताच्या प्रगत शास्त्रामाधला अभ्यासाचा विषय आहे. मी याच विषयावर अभ्यास केला आहे आणि अजूनही करतो आहे. पण मला इथे आल्यानंतर त्या गुहांमध्ये काहीच मिळालं नाही याच वाईट वाटत. मात्र माझी तुझ्यासारख्या मुलीशी ओळख झाली याचा आनंद आहे." अस म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावार हात ठेवला. 

निर्मितीला देखील प्रोफेसर राणेंबरोबर गप्पा मारायला खूप आवडायला लागलं होतं. ती त्यांच्याकडे बघून हसली आणि म्हणाली,"सर, तुम्ही खूप छान समजावून सांगता. खरं तर मला हे असं गुहांमधून फिरणं आणि मनुष्याच्या जन्माची माहिती करून घ्यायला  खूप आवडतं. पण आता तर माझ्या मनात या विषयाबद्दल खूपच जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे. मला करता येईल का या विषयाचा अभ्यास सर?"

तिच्या प्रश्नावर प्रोफेसर राणे मनापासून हसले आणि तिला म्हणाले,"निर्मिती बेटा, तुझी इच्छा असेल तर तू नक्की या विषयाचा अभ्यास करू शकतेस. फक्त त्यासाठी तुला कायम चांगले मार्क्स घेऊन पास व्हायला लागेल. एकदा तू बारावी झालीस न की तुझ्या बाबांबरोबर मला भेटायला ये मुंबईला. पुढे कसं आणि काय करायचं ते मी सांगेन ह."

त्यांच्या गप्पा निर्मितीचे बाबा एकत होते. त्यांनी निर्मितीला जवळ घेतलं आणि म्हणाले," बेटा जा बघू झोपायला. खूप उशीर झाला आहे." निर्मिती बरं म्हणली आणि प्रोफेसर राणेंना अच्छा करून आत झोपायला गेली. ती आत गेलेली बघितल्यावर निर्मितीच्या वडिलांनी प्रोफेसर राणेंना विचारले,"सर, खरच मला माझ्या मुलीला इतके शिकवता येईल का? हा विषय तसा वेगळा आहे आणि इथे आमच्या गावात अशी काहीच सोय नाही. त्याशिवाय मला देखील याबद्दल फारशी माहिती नाही. पण माझी खुप इच्छा आहे की माझ्या मुलीने तिला हव ते शिकावं. परिस्थितीमुळे मी फार शिकलो नाही. पण माझ्या मुलीला मात्र मी खूप शिकवणार आहे."

त्यावर प्रोफेसर साहेब म्हणाले," तुमची मुलगी खूप हुशार आहे. मुख्य म्हणजे तिला पुरातत्व शास्त्राची उपजत आवड आहे आणि तिची विचारशक्ती असामान्य आहे. तिला तुम्ही खूप शिकवाल याची मला खात्री आहे, परंतु तिला जर या विषयाची आवड असली आणि पुढे जाऊन याच विषयात तिने उच्च शिक्षण घेतले तर तिचे आणि तिच्या बरोबर आपल्या समाजाचे भले होईल. तुमच्या गावात काय इथे या पंचक्रोशीतसुद्धा फारशी सोय असेल असे नाही. पण तुम्ही तिला घेऊन मुंबईला या. मी करेन सगळी मदत. माझी खात्री आहे की ही मुलगी पुढे जाऊन पुरातत्व शास्त्रातली मोठी तत्वज्ञ होऊ शकते." प्रोफेसर साहेबांचे बोलणे एकून निर्मितीच्या वडिलांनी  ठरवलं की जर खरच निर्मितीची इच्छा असेल तर तिला ज्या विषयात अभ्यास करायचा असेल तो करु दे. आपण कायम तिच्या पाठीशी उभे रहायचे. 

लहानग्या निर्मितीने त्यानंतर कधी मागे वळून बघितलंच नाही. दहावीमध्ये तिने उत्तम गुण मिळवले आणि त्यानंतर बारावीमध्येसुद्धा. तिची डिग्री कॉलेजला जायची वेळ आली तेव्हा तिची आई थोडी धास्तावली होती. कारण पंचक्रोशीत चांगले कॉलेज नव्हते. त्यात निर्मितीने तर पुरातत्व विषयातच पुढे शिकायचे हे नक्की केले होते. त्यामुळे तिला पुण्या-मुंबईलाच शिकायला जावे लागणार होते. बारावीनंतर पुढचं शिक्षण तिथेच चांगलं होतं. निर्मितीच्या वडिलांनी तिच्या आईची समजूत काढली. निर्मितीने अशा विषयाचा ध्यास घेतला होता की कधीतरी निर्मितीला एकटं रहायला लागणारच होतं. सध्या ती मुंबईमध्ये त्यांच्या एका नातेवाईकांकडे रहाणार होती. मनावर दगड ठेऊन निर्मितीची आई तिला मुंबईला पाठवायला तयार झाली.

निर्मितीचे वडील तिला घेऊन मुंबईला आले. कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया झाली आणि निर्मितीचे वडील तिला घेऊन प्रोफेसर राणेंना भेटायला गेले. प्रोफेसर राणे सहा वर्षानंतर निर्मितीला बघत होते. 

"अरे किती मोठी दिसायला लागली ही. तुमच्या गावाला आलो होतो तेव्हा लहानसं पिल्लू होती." निर्मितीला बघून प्रोफेसर म्हणाले. तिला बघून प्रोफेसर राणेंना खूप आनंद झाला होता.

"सर, निर्मितीला आर्ट्स विषयात एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. तुम्हाला भेटल्यापासून आणि तुमच्याशी त्या चार -सहा दिवसात गप्पा मारल्यापासून ही खूपच बदलून गेली. मला तर असं वाटतं की तुम्ही तिला तिच्यातल्या आवडीची ओळख करून द्यायलाच आला होतात." निर्मितीचे वडील हसत म्हणाले.

"अरे वा! निर्मिती आता डिग्री कॉलेजला जाणार तर! very good. अहो मुळात तुमची निर्मिती हुशार आहे आणि तिला पुराणशास्त्र आणि ऐतिहासिक वारसा विषयाची इतकी आवड होती की ती मला सारखी प्रश्न विचारायची. तिच्याशी गप्पा मारायला मला देखील आवडायला लागलं होतं." प्रोफेसर राणे म्हणाले. "बरं झालं तुम्ही तिला इथे मुंबईमध्ये आणलं आहात. मी तिच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला जात असतोच. त्यामुळे तिची आणि माझी भेट होतच राहील." आणि मग त्यांनी निर्मितीला सांगितलं,"बेटा, आता तू मला कधीही येऊन भेटू शकतेस ह. खूप खूप शिक. माझी इच्छा आहे की तू या विषयात पी. एच. डी. कराव आणि काहीतरी चांगल संशोधन कराव. काय?" 

प्रोफेसर राण्यांच्या बोलण्याने निर्मितीला देखील हुरूप आला. ती त्यांना हसत म्हणाली,"सर, तुम्ही पाठीशी असलात तर तुम्ही म्हणाल तसं शिकीन. आणि तुम्हाला फक्त भेटायलाच नाही तर सारखा त्रास द्यायला येणार आहे मी." तिचं बबोलणं एकून प्रोफेसर राणे मनापासून हसले.

क्रमशः

No comments:

Post a Comment