Friday, November 19, 2021

शेजारी (भाग 2) (शेवटचा)

 शेजारी

(भाग 2) (शेवटचा)


त्यावर त्यांना थांबवत इन्स्पेक्टरने त्या पोराकडे बघितले. इंस्पेक्टरची नजर वळताच तो पोरगा घाबरून गेला आणि म्हणाला;"साहेब, परवा संध्याकाळी इथं राहाणाऱ्या बाईसाहेबांचा दुकानात फोन आला होता. त्यांनी सामानाची यादी सांगितली आणि म्हणाल्या सामान उद्या सकाळी पाठवा. म्हणून मग मला मालकांनी काल सकाळी सामान घेऊन पाठवलं. पण सकाळी कोणीच दार उघडलं नाही. म्हणून मग मी दुपारी पण येऊन गेलो... तरी तेच... मग मालकच म्हणाले उद्या जा. म्हणून आज आलो सामान घेऊन. तर हे सगळे आजी-आजोबा इथं उभे होते. मी म्हंटल बाईसाहेबांनी मागवलेलं सामान आहे. आणि इथे ठेऊन निघणार होतो तर या आजोबांनी म्हंटल दार कोणी उघडत नाही. तर मी सांगितलं की काल पण सकाळी आणि दुपारी कोणी दार उघडत नव्हतं. ते म्हणाले तुझ्या मालकाला घेऊन ये. तसा मी दुकानात गेलो आन मालकांना घेऊन आलो...."

आता इंस्पेक्टरची नजर पोराकडून मालकाकडे वळली. मध्यम वयाचे ते गृहस्थ शांत होते. त्यांनी एकदा आपल्याकडे काम करणाऱ्या पोऱ्याकडे बघितलं. मग त्यांची नजर त्या सगळ्या म्हाताऱ्यांकडे वळली. त्यांच्या करूण अवस्थेची त्यांना खूप दया आली. त्यानंतर त्यांनी परत एकदा इन्स्पेक्टरकडे बघितलं आणि म्हणाले;"साहेब, माझा हा पोऱ्या जे सांगतो आहे ते खरं आहे; आणि मला देखील त्याच्या इतकंच माहीत आहे. बाईसाहेबांचा नेहेमीच सामान मागवण्यासाठी फोन येतो. त्यांचं बाळ लहान असल्याने त्या नेहेमी घरी सामान मागवायच्या. त्यांनी परवा संध्याकाळी खरंच म्हंटल होत की घरी कोणी नसेल तर सामान उद्या पाठवा. आता कालच्या दिवसभरात पण कोणी दार उघडलं नाही तर आम्हाला वाटलं घरी कोणी नसावं. म्हणून आज सकाळी सामान पाठवलं. त्यावेळी या आजोबांनी माझ्या पोऱ्याला मला बोलवायला सांगितलं. मी आलो... एकूण परिस्थिती बघून मला वाटलं आपण स्वतःच काही निर्णय घेण्यापेक्षा तुम्हाला बोलावलेलं बरं; म्हणून तुम्हाला फोन केला. बरं झालं तुमच्या समोरच घराचं दार उघडलं गेलं. नाहीतर हे जे काही झालं आहे त्याची जवाबदारी कोणी घेतली असती?"

मालक बोलायचे थांबले आणि सगळ्यांची नजर पांढऱ्या चादरीमध्ये गुंडाळून ठेवलेल्या तीन कलेवारांवर पडली.

.....................................................

काका सकाळी नेहेमीप्रमाणे दूध घ्यायला नेहेमीच्या दुकानावर पोहोचले. काका दूध घेऊन निघतच होते पण मालक काकांच्या दिशेने हलकेच सरकत महणाले;"काका तुम्हाला काही कळलं की नाही?"

"कशाबद्दल हो?" काकांनी नकळून विचारलं.

"अहो, ते एक तरुण गृहस्थ कधीकधी यायचे न तुमच्या बरोबर सकाळी दूध घ्यायला.... ते, त्यांची बायको आणि तीन वर्षाचा मुलगा गेले की हो चार दिवसांपूर्वी."

"अरेच्या? कुठे गेले? तसं आमचं फारसं बोलणं नाही व्हायचं. तुम्हाला माहीतच आहे न काकूंचा स्वभाव! त्यामुळे मी कधीच त्यांच्याशी संबंध ठेवले नव्हते. त्यामुळे ते कुठे जाणार होते की काय मला माहीत नव्हतं." काका शांतपणे दूध घेत म्हणाले.

"अहो काका, गेले म्हणजे तिघेही मेले की हो. तुम्ही ज्यादिवशी काकूंना घेऊन गावातल्या घराकडे गेलात त्याच्या दुसऱ्या दिवशी झालं हे सगळं. तुम्ही इथे नव्हता म्हणून. पोलिसांनी सगळीकडे चौकशी केली होती. सगळ्यांच्या दुकानात घरात जाऊन आले होते ते." दुकान मालकाने माहिती दिली.

काका एकदम आश्चर्यचकित झाले. त्यांना काय बोलावं कळेना. "कमाल आहे हो! कसं काय झालं हे सगळं?"

मालक आवाज आणखी खाली आणत म्हणाले;"अहो, बहुतेक विषबाधा झाली त्यांना. त्यांच्या घरातल्या फ्रिजमध्ये गाजराचा हलवा होता. पोलिसांनी तपास केला तेव्हा लक्षात आलं की ते साहेब संध्याकाळीच मिठाईवाल्याकडून गाजर हलवा घेऊन गेले होते. बहुतेक त्यात काहीतरी गडबड झाली. कारण मिठाईवाल्याने त्यादिवशी इतरांना देखील गाजर हलवा विकला होता. पण बाकी कोणाचीही काहीही तक्रार आली नाही. त्यामुळे पोलिसांना देखील तपास लागला नाही."

काकांचा चेहेरा अगदी उतरून गेला. मालकाकडे दुःखी चेहेऱ्याने बघत काका म्हणाले;"फार वाईट झालं हो. नेहेमी मनात यायचं कसं सुखी त्रिकोणी कुटुंब आहे. असंच सुखी राहावं. त्याच्या मनात काय असत कोणालाही सांगता येत नाही." अस म्हणून काका घराकडे जायला वळले.

...........................

आपल्या बंगल्याचं गेट उघडताना एकदा काकांची नजर दूरवरच्या अवि-सरूच्या घराकडे वळली आणि मग ते गेट लावून त्यांच्या घराच्या दाराकडे वळले.

काका घरात शिरले तेव्हा काकू दिवाणावर बसून होत्या. त्यांचा चेहेरा अत्यंत आजारी दिसत होता. काकांनी एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि हातातली दुधाची पिशवी आत नेऊन ठेवली. काका काकूंच्या समोर येऊन बसले. पण काकू आपल्याच तंद्रीत बसून होत्या. त्यांच्या शेजारीच खिडकी होती. पण आता ती घट्ट बंद केलेली होती. अगदी खिळे ठोकून! काकू त्या खिळ्यांकडेच टक लावून बघत होत्या. काकांनी एकदा त्या खिळ्यांकडे बघितले आणि काकूंकडे बघत म्हणाले;"असं बघितल्यामुळे ते खिळे बाहेर येणार नाहीत. त्यामुळे उठा आणि चहाच्या तयारीला लागा." काकूंनी नजर उचलून रिकाम्या नजरेने एकदा काकांकडे बघितलं आणि त्या उठून स्वयंपाकघराकडे निघाल्या. दोन पावलं पुढे जाऊन काकू मागे वळल्या आणि अगदी न राहावल्यामुळे दुखऱ्या-दुःखी आवाजात काकांना विचारलं;"पण का?"

हातात वर्तमानपत्र घेऊन बसलेल्या काकांनी थंड नजरेने काकूंकडे बघत म्हंटल;"उगाच नको ते प्रश्न विचारू नकोस. तू फक्त माझा आणि माझाच विचार करायचास बाकी कोणाचाही नाही; हे तूला मी कायम सांगत आलो. तुझ्या लेकाकडे तुझा ओढा वाढतो आहे हे लक्षात आल्यावर मी जे करणार होतो ते केलं असतं तर त्यानंतरचं हे काही घडलंच नसतं. पण त्यावेळी तुझ्या केविलवाण्या चेहेऱ्याकडे बघून त्याला परदेशी पाठवून दिलं. त्याच्याशी कधी संबंध नाही ठेवला. मात्र तू कसा कोण जाणे त्याच्यापर्यंत निरोप पोहोचवलास आणि तो आला की लगेच तुला भेटायला. त्याचा पोरगा बघून पाघळून गेलीस आणि माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला लागलीस. म्हणून मग त्याचा काटा काढला."

नातवाच्या आणि लेकाच्या आठवणीने काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून काका उठले आणि काकुंजवळ जाऊन त्यांचे डोळे पुसत म्हणाले;"अग, अस काय करतेस? त्या सगळ्या प्रसंगा नंतर त्या घरात राहण्याचा तुला त्रास व्हायला लागला म्हणून ते घर असूनही इथे तुझ्यासाठी नवीन घर घेतलंच न मी? किती सुखात होतो आपण इथे आल्यानंतर... तो मूर्ख अवि आणि त्याची ती अति शहाणी बायको सरू इथे येईपर्यंत. बर आला तर राहावं न आपलं आपण. सारख आपलं आपल्या घराचं दार वाजवत राहिले दोघे.... आणि मागचा अनुभव ताजा असूनही तुझी अक्कल ठिकाणावर आली नाही. माझ्या नकळत त्यांच्याशी बोलायला-त्यांच्याकडे बघायला सुरवात केलीस... त्यांच्या बाळाला जीव लावायचा प्रयत्न सुरू केलास.... कमाल आहे हं तुझी! इतक्या वेळा समजावलं तुला की मी सोडून इतर कोणाशीही सरळ बोलायचं नाही... तरीही तू नरम पडायला लागलीस. त्या दिवशी सरूने येऊन सांगितलं तोपर्यंत मला अंदाज देखील आला नव्हता की तू इतकी पुढे गेली असशील. म्हणून मग मी निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्या सगळ्यांना घरी बोलावलं. अगोदरच ठरवून ठेवल्याप्रमाणे अविलाच हलवायाकडून गाजर हलवा आणून ठेवायला सांगितलं होतं. तरी तुझा आगाऊपणा नडणार होता..... म्हणे सरू आणि बाळाला गाजर हलवा आवडत नाही.... मी विचारच करत होतो आता तो हलवा त्या तिघांच्या गळी कसा उतरवायचा. पण मध्येच त्या दोघांचं भांडण झालं आणि सगळं कस एकदम सोपं होईन गेलं माझ्यासाठी." अस म्हणून काका खळखळून हसले आणि पुढे बोलायला लागले;"सरू निघून गेली आणि तिच्या मागून अविदेखील. मग मी आपल्या घरातला विष मिसळलेला गाजर हलवा घेऊन त्यांच्या घरी गेलो थोड्या वेळाने. तोवर त्यांच्यातला वाद संपलेला होता. तसा मला अंदाज होताच. असे नवरा-बायको मधले वाद फार नाही टिकत. आपल्या दोघांमधले वाद कधी राहिले आहेत का? मी त्यांच्या घरी पोहोचलो तर दोघे झोपायची तयारी करत होते. मला बघून दोघेही ओशाळले आणि माफी मागायला लागले. ते माझ्या अजूनच पथ्यावर पडलं. त्या दोघांना आग्रह करून तो गाजराचा हलवा खायला घातला. त्यांचा तो छोकरा अगदी झोपेला आला होता. सरू म्हणाली त्याला ती दुसऱ्या दिवशी भरवेल. मनात म्हंटल अग तू कुठे असणार आहेस उद्या.... पण वरवर हसत म्हणालो अग दोन घास तरी दे. गोड खाऊन झोपलं की चांगली झोप लागते. पटलं तिला ते. तिघांचं खाणं नीट झालेलं स्वतः बघितलं आणि मगच निघालो. निघताना म्हंटलं देखील झोपा सौख्यभरे! त्यावर ते दोघेही मूर्ख हसले."

काकांचं बोलणं ऐकून काकूंच्या पायातले त्राणच गेले. त्या तिथल्या तिथे हताशपणे मटकन खाली बसल्या. तेवढ्यात दाराची बेल वाजली. काकांनी काकूंना सावरून उठवलं आणि दिवाणावर नेऊन बसवलं. काकांनी पुढे होऊन घराचं दार उघडलं. दारामध्ये इन्स्पेक्टर उभे होते. काकांनी दार उघडताच काकू कर्कश्य आवाजात कडाडल्या;"कोण आहे दारात? तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे मला सकाळी कोणीही आलेलं चालत नाही म्हणून. तरीही तुम्हाला सगळ्यांशी बोलायची हौस आहे."

काकूंचा आवाज ऐकून घराच्या आत पाऊल टाकणारे इन्स्पेक्टर देखील दचकले आणि कासानुसा चेहेरा करत काकांनी त्यांना बाहेरच चलायची खूण केली आणि एकदा काकूंकडे कटाक्ष टाकून काका त्यांच्या बरोबर घराबाहेर गेले.........

समाप्त

No comments:

Post a Comment