Friday, November 12, 2021

शेजारी (भाग 1)

 शेजारी

(भाग 1)

"नमस्कार, नुकतेच तुमच्या शेजारी राहायला आलो आहोत. याबाजूला तशी शांतता असते. इथली काहीच माहिती नाही आम्हाला.....इथे वाण्याचं दुकान.... दूध कुठे मिळतं.... थोडी माहिती हवी होती." काकूंनी दार उघडल्या उघडल्या त्याने बोलायला सुरवात केली.

खराच नवखा असावा तो. नाहीतर एकतर काकूंच्या बंगल्याच्या आत जाण्याचं धाडस त्याने केलं नसतं; आणि गेलाच असता तरी बेल वाजवण्याचा वेडेपणा तर नक्कीच केला नसता.

दुपार टळून संध्याकाळची उन्ह उतरायची वेळ झाली होती. दार उघडल्यावर अंधारातून बाहेर डोकावणाऱ्या काकूंच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप आली होती. त्यामुळे त्या मनातून चिडचिडल्या होत्या. मुळात त्या काकांची वाट बघत होत्या आणि या अनोळखी तरुणाला बघून त्यांच्या कपाळावरची आठयांची जाळी अजून दाट झाली.

"माझ्याकडे कसलीही माहिती नाही. जा इथून... आणि याद राख परत कधी बंगल्याच्या गेटच्या आत आलास तर. गेटवरची पाटी नाही वाचलीस? अनाहूत आणि अनोळखी लोकांना आत येण्यास मनाई आहे. चल, चालता हो." काकू कर्कश्य आवाजात कडाडल्या आणि तो अनोळखी-अनाहूत गोंधळून एकदम मागे वळून चटचट पावलं उचलत गेटकडे धावला. तो गेटमधून बाहेर पडत असताना काका आत येत होते. त्याच्या चेहेऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून त्यांनी त्या तरुणाला थांबवले आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. एकवार मागे बंगल्याच्या दाराकडे बघून तो तरुण बोलायला लागला.

"नमस्कार काका. मी आणि माझं कुटूंब इथे नवीन आहोत. आज सगळं घर लावून झालं आणि बायको म्हणाली इथे वाण्याचं दुकान, फळं-भाजी-दूध कुठे मिळतं ते बघून या. म्हणून चौकशी करायला बाहेर पडलो होतो. इथले अनेक बंगले अजून रिकामेच आहेत; या बंगल्यात कोणी राहात असावं अस वाटलं म्हणून आत शिरून बेल वाजवली इतकंच. पण त्या बाईंनी एकदम अंगावर येत ओरडायलाच सुरवात केली हो. माझं काय चुकलं तेच नाही कळलं मला." तो अजून देखील बोलला असता. पण मागे बंगल्याचं दार उघडल्याचा आवाज त्याला आला आणि तो पुढे काही न बोलता तिथून निघून गेला. काकांनी बंगल्याच्या दाराकडे वळून बघितलं. काकू एक हात कंबरेवर ठेऊन आणि एक हात डोळ्यांवर ठेऊन गेटच्या दिशेने बघत होत्या. त्यांना येतो असा हात करून काकांनी गेट उघडले आणि ते बंगल्याच्या दिशेने निघाले.

'अभूतपूर्व 'ही एक लहानशी बंगल्यांची कॉलनी होती. काहीशी गावाबाहेर; निसर्गाच्या सानिध्यात! साधारण सेकंड होम इन्व्हेस्टमेंटसाठी अगदी योग्य. ही एकूण स्कीम खूपच चांगली होती आणि अत्यंत प्रतिथयश बांधकाम व्यवसायिकांची स्कीम असल्याने सगळेच प्लॉट्स विकले गेले होते. हळूहळू बंगले उभे राहायला लागले होते. तीन-चार बंगले एकत्र असे एकूण काही बंगल्यांचं बांधकाम झालेलं होतं. कॉलनीच्या आत-बाहेर पडण्यासाठी चारही बाजुंनी मोठी गेट्स होती. त्यातल्याच एका गेटच्या जवळ जुनी वस्ती होती. तिथल्या काहींनी कॉलनीच्या जवळपास आवश्यक गोष्टींची वेगवेगळी दुकानं सुरू केली होती. या दुकानांची चांगलीच चलती होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी काका दूध आणायला बाहेर पडले त्यावेळी तो तरुण काकांच्या मागूनच चालत होता. त्याने एकदा मागे बंगल्याकडे नजर वळवून दार बंद आहे याची खात्री करून घेतली आणि चालण्याचा वेग वाढवून काकांना तरुणाला गाठलेच. काकांकडे बघून हसत तो म्हणाला,"नमस्कार काका. बोलुका थोडं तुमच्याशी? आम्ही त्या पलीकडच्या बंगल्यात राहायला आलो आहोत. आमचा नाही बांगला. हिच्या ओळखीच्यांचा आहे. काही महिन्यांसाठी मिळाला आहे. ते गावात राहातात. रिटायरमेंट नंतर इथे येऊन राहायचं म्हणून आतापासून त्यांनी घेऊन ठेवला आहे. हिनेच त्यांना म्हंटल की काही दिवस राहायला मिळाला तर घर स्वच्छ राहील आणि आम्ही भाडं देखील देऊ. ते तयार झाले आणि आम्ही आलो राहायला." काका काही न बोलता चालत होते. तो तरुण थोड्या वेळाने एकेठिकाणी वळला. काकांनी न राहून त्याला थांबवत विचारले,"अरे तिथे कुठे जातो आहेस? सगळी दुकानं या बाजूच्या गेटजवळ आहेत." वळून आश्चर्यचकित चेहेऱ्याने तो म्हणाला,"अरे हो का? काल मी चौकशी केली होती. पण तोवर बराच अंधार झाला होता त्यामुळे नक्की कोणतं गेट ते मला कळलंच नाही. बरं झालं तुम्ही भेटलात. अजून इथली इतकी सवय नाही न मला. चुकलो असतो तर ऑफिसला जायला उशीर झाला असता. आभारी आहे हं मी तुमचा." त्याच्या खांद्यावर थोपटत काका हसले आणि म्हणाले,"अरे आभार कसले मागतोस?" मग मनगटावरच्या घड्याळाकडे बघत ते म्हणाले,"चल, पटपट उचल पावलं. नाहीतर तुला उशीर होईल." दोघेही आपापलं सामान घेऊन आणि एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घराकडे वळले.

त्या संध्याकाळी काकांबरोबर फिरायला म्हणून काकू देखील बाहेर पडल्या होत्या. अनेक महिन्यांनंतर त्या आपणहून येते म्हणाल्या होत्या. दोघेही एकमेकांच्या आधाराने चालत होते. समोरून सकाळचा तो तरुण येत होता. हातात बरेच सामान दिसत होते. बहुतेक कामावरून येताना घरचं सामान घेतलेलं दिसत होतं. सकाळीच काकांशी बोलणं झालं असल्याने त्याने ओळखीचं हसून काकांना हात केला. पण काकांनी त्याला बघून न बघितल्यासारखं करत पुढे चालायला सुरवात केली. तो एकदम गोंधळून गेला. आदल्या संध्याकाळचा काकूंचा आलेला अनुभव आठवून तो काही न बोलता पुढे निघून गेला. काकू काहीच बोलल्या नाहीत; मात्र त्या तरुणाने हसून हलवलेला हात त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता. काका-काकू फिरून परतले आणि गेटचं कुलूप काढून बंगल्याच्या आत शिरले.... काकू वळून गेट बंद करत असताना त्यांना लांब तोच तो तरुण आणि त्याच्या शेजारी एक नाजूक अंगकाठीची तरुणी दिसले. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारण्यात पुरते गुंगले होते हे इतक्या लांबून देखील काकूंच्या लक्षात आलं. काकूंनी डोळे बारीक करून बघितलं तर त्यांना त्यांच्या जवळच एक लहान मूल तीनचाकी सायकल फिरवताना दिसलं. काकू गेटजवळ थांबलेल्या काकांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन बंगल्याचा दरवाजा उघडला होता. दरवाजा उघडतानाचा कुरकुर आवाज काकूंच्या तीक्ष्ण कानांना जाणवला आणि एकदा त्या लहानशा गोड कुटुंबाकडे बघून आणि गेटकडे पाठ करून त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा काकांची आणि त्या तरुणाची गाठ पडली. आता आपण बोलावं की नाही या संभ्रमात तो असल्याचं काकांना त्याच्या चेहेऱ्यावरून स्पष्ट कळलं. मग त्याच्याकडे हसून बघत काकांनीच हात हलवला. तसा थोडा बाचकतच त्याने देखील प्रतिसाद दिला. दोघे न बोलताच एकत्र चालायला लागले. थोड्या वेळाने त्या तरुणाने घसा खाकरला आणि काकांची लागलेली तंद्री भंगली. तो काहीतरी बोलणार होता; पण त्याच्या खांद्यावर हात ठेवत काका म्हणाले,"एक सांगू का तुला पोरा.... ही असली न बरोबर तर त्यावेळी आपण न बोललंच बरं. मला माहीत आहे तुला हे जरा विचित्र वाटेल. पण काही काळापूर्वीच ती मनाने दुखवलेली आहे. त्यामुळे तिने संपूर्ण जगाशीच जणू वैर घेतलं आहे. माझ्याशी बोलते हे तरी नशीब आहे; असं वाटत एकेकदा. तिला सांभाळणं हे एकच काम आहे सध्या माझं." त्यांच्या हातावर थोपटत तो हसला फक्त. काकाच पुढे बोलायला लागले....."अशी नव्हती रे ती. खुप मोकळ्या स्वभावाची होती. आम्ही गावात अगदी भर बाजार भागात राहात होतो. आमच्या ओसरीत कायम पाण्याने भरलेला माठ ती ठेवायची. संध्याकाळी चार-साडेचार नंतर तर चणे-दाणे घेऊन ओसरीतच बसून असायची. येणारे-जाणारे तिला हाक मारल्याशिवाय पुढे नाही जायचे. पण मग ते सगळं बदलून गेलं आणि मी तिला घेऊन इथे आलो." बोलताना काका बहुतेक भूतकाळात शिरले होते. त्या तरुणाने परत एकदा काकांच्या खांद्यावर थोपटले आणि काका परत वर्तमानात आले आणि चेहेऱ्यावर हसू आणत म्हणले,"तुला इतकंच सांगायचं होतं की ती असताना आपण ओळख नको दाखवुया.... आणि... तिच्या बद्दल गैरसमज नको करून घेऊस." तो समंजसपणे हसला आणि दोघे आपापल्या घराकडे वळले.

या बंगल्यावर राहायला आल्यानंतर काकू सहसा कोणत्याही खिडकीजवळ देखील जात नसत. खुप उजेड येतो असं कारण सांगत त्यांनी सगळ्याच खिडक्यांना जाड पडदे करून घेतले होते. काका घरात नसले तरच त्या दार उघडायला पुढे होत. नाहीतर इथे आल्यापासून त्या आणि गेल्या काही वर्षात त्यांनी जमवले देव-पोथ्या-पुराणे इतकंच त्यांचं विश्व त्यांनी सीमित केलं होतं. पण त्यादिवशी त्या काकांबरोबर बाहेर पडल्या होत्या आणि त्याचवेळी ते लहानसं कुटुंब त्यांना दिसलं होतं. ते कुटुंब काही अंतरावरच्या एका बंगल्यात राहायला आलं होतं; हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या कुटुंबाला बघितल्यापासून काकूंच्या मनात काहीशी चलबिचल झाली होती. काकांच्या नकळत त्या वेगवेगळ्या खिडक्यांजवळ जाऊन ते कुटुंब राहात असलेल्या बंगल्याच्या दिशेने बघायला लागल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात त्या कुटुंबाबद्दल एक अनामिक उत्सुकता होती. आजूबाजूचे सगळे प्लॉट्स रिकामेच होते. त्यामुळे त्या तरुण कुटुंबाचा बंगला अगदी सहज दिसायचा काकूंना. अजून शाळेत जायचं वय नसल्याने त्या जोडप्याचा तो लहानगा सतत त्या बंगल्याच्या आवारात खेळत असायचा. त्याचं ते धावणं; धावताना धडपडण आणि मग रडत आईला बिलगण.... काकू त्या माय-लेकाकडे बघत होत्या की स्वतःच्या भूतकाळात हरवत होत्या?

एक दिवस संध्याकाळी काकू खिडकीजवळ उभ्या होत्या. त्यांना तो तरुण आणि त्याची पत्नी एकीकडून येताना दिसले. 'हाक मारावी का?' काकूंच्या मनात आलं. काका घरात नव्हते; क्षणभर विचार कारून काकूंनी घराचं दार उघडलं आणि त्या गेटजवळ गेल्या. तोपर्यंत ते दोघेही काकूंच्या बंगल्याच्या गेटजवळ पोहोचले होते. दोघेही एकमेकांत गुंतले होते. त्यामुळे त्यांचं गेटजवळ उभ्या काकूंकडे लक्ष नव्हतं. "अरे ऐकलंत का?...." काकूंनी त्यांना हाक मारली... काकूंचा आवाज ऐकून दोघेही दचकले.

बहुतेक त्या तरुणाने त्याच्या पत्नीला काकूंबद्दल सांगितलं असावं. त्यामुळे काकूंना बघून तिच्या चेहेऱ्यावर एकदम घाबरल्याचे भाव उमटले. तिच्याकडे दुर्लक्ष करत काकूंनी त्या तरुणाला विचारले,"काय रे कुठून आलात इतक्या उशिरा? आणि दोघेच? तुमचा छोकरा कुठे आहे?"

आपल्या पत्नीला हलकेच मागे सारत तो म्हणाला,"काकू, थोडं कामासाठी गेलो होतो आम्ही. बस आता घरीच जातो आहोत. कशा आहात तुम्ही?"

"मी बरी आहे. पण इतक्या संध्याकाळी तुम्ही दोघे बाहेर गेलात तर तुमच्या पिल्लाला कोणाकडे सोडलंत?" काकू अजूनही काहीतरी बोलल्या असत्या पण त्यांना काका दुरून येताना दिसले; तशा त्या गर्रकन वळून घराच्या दिशेने गेल्या.

त्यांच्या त्या विचित्र वागण्याने ते दोघेही गोंधळात पडले. तेवढ्यात काका त्यांच्याजवळ पोहोचले. काकांकडे हसत बघत तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला,"सरू, मी तुला सांगितलं न ते हे काका." त्या तरुणांच्या पत्नीने काकांकडे हसून बघितले आणि नमस्कार केला. "असुदे; असुदे!" काका हसत म्हणाले आणि त्यांनी वळून आपल्या बंगल्याकडे बघितले. बंगल्याचे दार बंद होते. एक सुस्कारा टाकत त्यांनी विचारलं,"ही बोलत होती न तुमच्याशी? काय म्हणाली?"

"काही नाही काका.... काकू अविला आमच्या पिल्लुबद्दल विचारत होत्या." अवीच्या पत्नीने सरूने उत्तर दिलं.

तिच्याकडे बघत आणि भुवया उंचावत काकांनी 'बर' अशी मान हलवली आणि म्हणाले,"सरू.... मी तुला सरू म्हंटलं तर चालेल न?" "हे काय विचारणं झालं काका?" तिने हसत म्हंटल. ".... तर सरू, ही कधी काही उलट-सुलट बोलली तर मनावर घेऊ नकोस हं. तसा मी सतत तिच्या सोबत असतोच. पण कधीतरी काही ना काही कामासाठी बाहेर पडावं लागतंच नं. खरतर ती सहसा एकटी बाहेर पडतच नाही आता. पण जर चुकून माझ्या अपरोक्ष तुला.... तुम्हाला कधी कुठे भेटलीच तर मोघम बोलून तिला घरी आणून सोडा हं. ते तसं झाल्यापासून तिचं मन थाऱ्यावर नसतं."

अविने काकांचा हात हातात घेतला आणि म्हणाला,"काका मी तुमची अस्वस्थता समजू शकतो. ही जागा तशी आमच्यासाठी नवीन आहे. त्यात ही आणि बाळ दोघेच असतात घरी दिवसभर. त्यामुळे मला कामावरून यायला जरा उशीर झाला तरी माझं मन अस्वस्थ होतं. तुम्ही दोघ तर आयुष्य एकत्र जगला असाल. तुम्हाला किती काळजी वाटत असेल. काळजी करू नका; काही लागलं तर आम्हाला कधीही हाक मारा. आम्ही आहोतच. सगळं ठीक होईल." त्याच्या हातावर थोपटल्या सारखं करून काहीसं उदास हसत काका बंगल्याकडे वळले आणि अवि-सरू त्यांच्या घराच्या दिशेने.

दिवस सरत होते. अधून-मधून काका आणि अवि सकाळी भेटायचे त्यावेळी त्यांच्या गप्पा होत असत इतकंच. अवि न चुकता काकूंची चौकशी करायचा काकांकडे. काका कधी उदासवणं हसायचे तर कधी आकाशाकडे बघून नमस्कार करायचे; कधीतरी अगदीच उद्विग्न असले तर म्हणायचे;"मी असेपर्यंत हे असच चालणार; मी मेलो की तिचं ती जगायला मोकळीच आहे." त्यांचं हे बोलणं अविला अजूनच दुखावून जायचं. मग त्याने ठरवूनच काकूंबद्दल विचारणं बंद करून टाकलं. आपल्यामुळे काकांना त्रास नको; अस त्याच्या मानत यायचं. कधीतरी अवि आणि सरू त्यांच्या बाळाला घेऊन बाहेर पडायचे. त्यावेळी जर ते काकांच्या बंगल्यावरून गेले तर सरूला जाणवायचं की काकू हळूच पडदा हलकासा सारून या तिघांकडे बघत आहेत. पण ती काहीच बोलायची नाही. हळूहळू सरूला लक्षात आलं की काकू दिवसासुद्धा आपल्या घराकडे बघत बसलेल्या असतात. तिला हे सगळंच थोडं विचित्र वाटायला लागलं होतं. पण तिला प्रत्यक्ष काहीच त्रास होत नव्हता त्यामुळे ती गप होती.

त्यादिवशी काकूंना दारात बघून सरू थोडी दचकलीच. पण चेहेरा शांत ठेवत तिने काकूंना आत घेतलं. काकू पदराने घाम पुसत आत आल्या आणि त्यांनी घरात नजर फिरवली. "तुझा लहानगा नाही ग दिसत?" त्यांनी अगदी सहज विचारल्यासारखं केलं. त्यांची नजर घरभर भिरभिरत होती, बाकी काही न बोलता काकूंनी एकदम तिच्या बाळाबद्दल विचारावं हे सरूला थोडं विचित्र वाटलं. पण मनातले विचार बाजूला सारत ती म्हणाली,"दुपारची वेळ आहे न; झोपला आहे. तसा रोज नाही झोपत. पण आता उन्हाळा फार वाढला आहे न; त्यात आज खूपच मस्ती केली त्याने म्हणून मग मी त्याला जबरदस्ती झोपवला."

"तरीच! तो दिसला नाही सकाळपासून म्हणून आले विचारायला. बर जाते मी." अस म्हणून काकू मागे वळल्या आणि निघाल्या देखील. सरूने काकूंना हाक मारली आणि म्हणाली,"आल्यासारखं थांबा की जरा वेळ काकू. मस्त गारेगार कोकम सरबत करते तुमच्यासाठी." तशी परत जायला वळलेल्या काकू मागे फिरल्या आणि एकदम वस्कन सरुवर ओरडल्या,"मला भिकारी समजतेस का? काही नको मला. जरा कुठे कामाला जाताना आत डोकावले तर लागली चिकटायला." अचानक काकूंचं काय बिनसलं ते सरूला कळलंच नाही. ती काही बोलण्याच्या आत काकू घरातून बाहेर पडून गेटजवळ पोहोचल्या देखील होत्या. सरूच्या कपाळावर आठी उमटली आणि तिने दार लावून घेतलं.

संध्याकाळी अवि आल्यावर तिने त्याला दुपारी घडलेला प्रसंग सांगितला आणि म्हणाली;"तू काकांना सांगून टाक की असं काकूंना एकटीला बाहेर जाऊ देऊ नका. अशा कोणावरही त्या ओरडल्या तर प्रत्येकजण ऐकून घेईलंच असं नाही. उगाच एक करता दुसरंच व्हायचं." सगळं ऐकून घेऊन अवि म्हणाला;"सरू, मी काही नाही सांगणार काकांना. अगोदरच त्यांच्या मनाला किती त्रास होत असेल या वयात अशी भ्रमिष्ट पत्नी सांभाळताना. त्यात आपण काकूंची तक्रार केली तर त्यांना अजून ओशाळवाणं होईल. तू दुर्लक्ष कर बघू त्यांच्याकडे. अशा कितीशा येणार आहेत त्या आपल्याकडे? इथे येऊन आता सहा महिने झाले आपल्याला आणि आज पहिल्यांदा त्या आल्या ना." "हो रे अवि. पण त्या आत आल्या ना त्यावेळी त्यांच्या आवाजात खूपच ओलावा होता आणि मग मागे वळल्या तर एकदम खर्जातल्या आवाजात बोलायला लागल्या. मला थोडं विचित्र वाटलं त्यांचं ते वागणं." "बरं, परत आल्या तर आपण मुद्दाम काकांना भेटून सांगू. ठीक? चल मला चहा दे बघू." विषय संपवत अवि म्हणाला.

आज सरुचं अंग थोडं ठणकत होतं. त्यामुळे सकाळी अविला डबा देखील तिने केला नव्हता. जेमतेम बाळासाठी खिचडी टाकून ती व्हरांड्यात आराम खुर्चीत बसली होती. खरं तर तिला आत जाऊन पडावंस वाटत होतं; पण बाळ घरात यायला तयार नव्हता. त्याला आवारात एकटं सोडणं सरूला बरोबर वाटत नव्हतं. म्हणून ती तशीच व्हरांड्यात बसली होती. बसल्या-बसल्या सरूला झोप लागली. अचानक बाळाच्या आवाजाने तिला जाग आली. बाळ गेटजवळ उभा राहून कोणालातरी हात करत 'टाटा' म्हणत होता. सरू धडपडत उठत गेटकडे धावली; पण तिथे तिला कोणीच दिसलं नाही. बाळाला उचलून घेत ती घराकडे वळली. त्याचा पापा घेत सरूने त्याला विचारलं;"कोणाला टाटा करत होतास पिल्लू? अस अनोळखी लोकांशी बोलू नये सांगितलं आहे न तुला." त्यावर आपल्या बोबड्या शब्दात बाळ म्हणाला;"ती आजी येते लोज. ती खाऊ देते न मला कधी-कधी. हे बघ." असं म्हणुन त्याने आपली इवलीशी मूठ उघडून दाखवली. त्यात चार-पाच चणे-दाणे होते. ते पाहून सरू घराच्या दिशेने चालताना थबकली आणि त्याच्या हातातले चणे-दाणे फेकत ती म्हणाली; "कोण देतं तुला खाऊ पिल्लू? असं घेऊ नकोस कोणाकडून काहीतरी." तिच्या हातातून सुटायचा प्रयत्न करत बाळ म्हणाला;"ती आजी येते न मला बघायला ती देते दाने मला. ती म्हनाली तू नाई लागावनाल. म्हनुन घेतले." अस म्हणून तिच्या हातातून सुटत बाळ पळाला आणि "मला सायकल हवी." म्हणत त्याची तीन चाकी चालवायला लागला.

बाळाचं बोलणं ऐकून सरूला मात्र खूप राग आला. ती तशीच मागे फिरली आणि बाळाला उचलून काकांच्या घराकडे तरातरा चालू पडली. तिने काकांच्या बंगल्याचे गेट जोरात उघडले आणि वेगात जाऊन दार वाजवले. दार उघडले जाईपर्यंत सरू बेल वाजवत होती. दार उघडले गेले आणि दारात काका उभे होते आणि आत थोड्या अंतरावर काकू होत्या. सरू प्रचंड संतापली होती. तिने काकूंकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला.... बहुतेक काकूंच्या डोळ्यातले भाव भेदरलेल्या सशाचे होते; पण सरूने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ती काकांना जोरात म्हणाली;"काका आजवर तुमच्याकडे बघून मी गप बसले होते. पण आता मात्र अति झालं हं. तुमच्या पत्नी कधीच आमच्याशी नीट बोलल्या नाहीत. तुम्हाला कदाचित माहीत नसेल; पण त्या सतत पडद्या आडून आमच्या घराकडे बघत असतात; मी अनेकदा ते बघितलं होतं. कधीतरी सकाळच्या वेळी त्या आमच्या बंगल्यावरून जातात आणि त्यावेळी माझ्या बाळाकडे टक लावून बघत असतात हे देखील मी पाहिलं आहे. पण मी तुमचा विचार करुन यासगळ्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता हद्द झाली.... त्यांनी आज माझ्या पिल्लाला चणे-दाणे दिले. बर, हे पहिल्यांदा नाही झालेलं हे देखील माझ्या लक्षात आलं आहे. त्या असं का वागतात? माझ्याशी आणि अविशी शत्रू असल्याप्रमाणे ओरडून बोलतात. मात्र माझ्या नकळत माझ्या बाळाशी सलगी करायचा प्रयत्न करतात. काका, तुम्हाला स्पष्ट सांगते; जर त्यांना काही मानसिक आजार असेल तर तुम्ही योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या. गरज असेल तर मी तुम्हाला मदत करेन. पण हे त्यांचं अस वागणं मी चालवून घेणार नाही."

काकांनी सरूचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि वळून एकवार आत काकूंकडे बघितलं. काकूंनी अंग चोरून घेत नजर खाली वळवली. सरूला ते जरा विचित्र वाटलं. कारण काकू वस्कन ओरडत पुढे आल्या असत्या; असा तिचा कयास होता. परत सरूकडे वळत काका म्हणाले;"हे अस व्हायला नको होतं. पण ती समजूनच घेत नाही; त्याला मी तरी काय करू? बर झालं तू मला येऊन सगळं सांगितलंस. ती अशी बाहेर पडायला लागली आहे हे मला माहीत नव्हतं. कदाचित मी अंघोळीला किंवा घरचं सामान आणायला गेलो असताना ती तुमच्या बंगल्याच्या दिशेने येत असावी. चिंता करू नकोस. आता मी योग्य तो उपाय करतो. परत असं होणार नाही. शेवटी मला ती.... आणि तिला मीच आहे नं." काकांचं बोलणं ऐकून सरुचं समाधान झालं. ती तिच्या बाळाला घेऊन परत जायला वळली. वळताना तिची नजर परत एकदा घरात उभ्या असलेल्या काकूंकडे वळली. तिला त्यांच्या डोळ्यातलं भेदरलेपण परत एकदा जाणवलं. पण त्याक्षणी ती इतर काही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती.

संध्याकाळी अवि आल्यावर तिने सकाळचा सगळा प्रकार त्याच्या कानावर घातला. सगळं ऐकून घेऊन अवि म्हणाला;"कशाला उगाच तू काकांना त्रास दिलास सरू. चणेच तर दिले होते त्यांनी. कदाचित आपल्या बाळात त्यांना त्यांचा नातू दिसत असेल."

"आता यात त्यांच्या नातवाचा काय संबंध अवि?" सरूने विचारले.

"अग, परवाच काका मला सांगत होते की त्यांचा मुलगा आणि सून अमेरिकेला असतात. शिकायला गेलेला मुलगा कधीच आला नव्हता. तो अचानक आला ते बायको मुलाला घेऊनच वर्षभरापूर्वी आला होता. काही दिवस काका-काकुंजवळ राहून मग मुलगा आणि त्याची बायको दोघे त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला काका-काकूंकडे ठेऊन चार दिवसांसाठी फिरायला गेले होते. नेमकं त्याचवेळी बाळाला काहीतरी झालं आणि साध्याशा आजाराने तो दगावला. बाळ गेल्याचं कळल्यावर मुलगा-सून धावले. पण त्याचं अंत्यदर्शन देखील त्याच्या आई-वडिलांना होऊ शकलं नाही. ते सगळंच काकूंनी इतकं मनाला लावून घेतलं की त्यांनी स्वतःला एका खोलीत डांबून घेतलं होतं. त्या आपल्या मुलाला देखील भेटल्या नाही. अनेक दिवस काही खात देखील नव्हत्या म्हणे. त्यांच्या खोलीत फक्त काकाच जाऊ शकत होते. शेवटी मुलगा-सून काकूंना न भेटताच कायमचे परत गेले. त्यानंतर काकू त्या घरात राहायला तयार नव्हत्या म्हणून काकांनी हे घर घेतलं. इथे देखील त्या कधीच कोणाशी बोलत नव्हत्या. मुळात इथे एकूणच कमी वस्ती. त्यात काकुंच हे अस अबोल आणि काही वेळा फकटुन वागणं. यामुळे काका-काकू वाळीत टाकल्यासारखे एकटेच पडले होते. मात्र काकांना देखील वाटायला लागलं होतं की अलीकडे काकू आपल्या घराकडे अधून मधून बघत असतात. म्हणूनच ते मला सांगत होते की जर त्या आपल्या घराजवळ दिसल्या तर काकूंच्या नकळत ते आपण त्यांना सांगावं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तू काकूंना आपल्या घराजवळ बघितलं आहेस. ते ऐकून काका काहीसे विचारात पडलेले वाटले मला. म्हणून मग उगाच त्यांना त्रास नको म्हणू मी फार डिटेल्स दिले नाहीत. तुला हे सगळं सांगायचं राहूनच गेलं."

अविचं बोलणं ऐकून सरू एकदम शांत झाली आणि म्हणाली;"अरे.... काय सांगतोस? अस झालं होतं का? अरेरे.... म्हणून त्या आपल्या बाळाला बघायला येत असाव्यात. उगाच मी त्यांची तक्रार केली काकांकडे."

अवि आणि सरू बोलत होते आणि तेवढ्यात त्यांच्या घराची बेल वाजली. अविने उठून दार उघडले. दारात काका उभे होते. त्यांना बघून अविला खूपच आश्चर्य वाटते. दारातून बाजूला होत त्याने काकांचे स्वागत केले. "अरे काका.... या या! बरं झालं आलात. मी आणि सरू तुमच्याबद्दलच बोलत होतो आत्ता." काका आत आले आणि सरूला नमस्कार करत सोफ्यावर बसले. काही बोलावं म्हणून काकांनी घसा खाकरला पण तेवढ्यात सरुच पुढे झाली आणि म्हणाली;"माफ करा हं काका, उगाच मी तुमच्या घरी येऊन अस काहीतरी बोलले. तुम्हाला किंवा काकूंना त्रास द्यायचा किंवा दुखवायचा हेतू नव्हता माझा." तिच्याकडे शांतपणे बघत काका काहीसं गंभीर हसले आणि म्हणाले;"अग बरं झालं तू मला सगळं सांगितलंस. मला वाटायला लागलंच होतं की ही माझ्या नकळत घराबाहेर पडायला लागली आहे. पण कधी जाते ते कळत नव्हतं. कारण ती ते फारच लपवून ठेवत होती." त्यावर त्यांच्या समोर बसत सरू म्हणाली;"काका आमच्याकडे येऊन जर काकूंना बरं वाटत असेल तर त्यांना घेऊन तुम्ही जरूर येत चला. त्यांची आणि बाळाची गट्टी झाली आणि त्यामुळे जर त्या परत माणसात आल्या तर आम्हाला पण खुप आनंद होईल. तसे आमच्या दोघांचेही आई-वडील लांब असतात. अवीच्या नोकरीमुळे आम्ही या गावात येऊन राहिलो आहोत."

सरू बोलत होती आणि काका बाळाकडे टक लावून बघत होते. काकांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही हे सरूच्या लक्षात आलं. बाळाला बघून कदाचित त्यांना त्यांचा नातू आठवला असेल अस वाटून सरू बोलायची थांबली. काही क्षण शांततेत गेले आणि काकांची तंद्री मोडली. बाळावरची नजर काढत त्यांनी अवि आणि सरूकडे बघितलं आणि म्हणाले,"मी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण द्यायला आलो आहे. सरू, तू गेल्यावर मी हिच्याशी बोललो. तिने कबूल देखील केलं की अलीकडे तिला तुझ्या बाळाला बघावसं वाटतं.... त्याच्याशी बोलावसं वाटतं. मी म्हंटल मग तुम्हाला घरीच बोलावतो जेवायला. म्हणजे छान ओळख होईल तुमची तिच्याशी आणि तिचे आणि बाळाचे संबंध देखील मार्गी लागतील." यावर सरु हसली आणि म्हणाली;"नक्की येऊ एकदा काका; आणि तुम्ही दोघे देखील येत जा अधून मधून आमच्याकडे. तशी इथे जवळपास गप्पा मारायला किंवा ओळख ठेवायला कोणिच नाही. मी आणि काकू छान राहात जाऊ. मला देखील आईची आठवण मग कमी येईल." त्यावर काका हसले आणि त्यांनी मान हलवली. "पुढचं पुढे बघू ग; मी आजच रात्रीचंच आमंत्रण घेऊन आलो आहे. नक्की आजच रात्री या जेवायला... काकूंचा आग्रहाचा निरोप आहे बर का! बरं, काय आवडतं बाळाला आणि तुम्हाला? म्हणजे तसा बेत करता येईल असं ती म्हणत होती.... आणि किती वाजता जेवता? त्याप्रमाणे ती तयारी ठेवेल." काका आजच बोलावत आहेत हे ऐकून सरूला थोडं आश्चर्य वाटलं. पण तिने पटकन सावरून घेत म्हंटल;"काहीही चालेल काका.... भेटणं महत्वाचं न. आम्ही येतो आठपर्यंत. तसे एरवी आम्ही नऊ साडेनऊला जेवतो. पण आज मला थोडं बरं वाटत नाहीये... आणि बाळ देखील दुपारी झोपला नाही आज. त्यामुळे कदाचित आज आम्ही लवकरच झोपु." त्यावर काका परत एकदा मान हलवत म्हणाले;"हो पोरी! भेटणं महत्वाचं आणि तब्बेत पण महत्वाची. या तुम्ही तिघेही. वाट बघतो." आणि काका त्यांच्या घरून निघाले. बाहेर पडून परत वळत त्यांनी अविला हाक मारली आणि काहीतरी सांगितलं. अविने बर म्हणून मान हलवली आणि काका वळून निघून गेले.

काका गेले तरी सरू अजूनही सोफ्यावर बसून होती. तिच्याजवळ बसत अविने तिचा हातात हातात घेतला आणि म्हणाला;"कशाचा विचार करते आहेस सरू?" अविकडे बघत सरू म्हणाली;"अवि, मला न हे सगळं थोडं विचित्र वाटतं आहे. कालपर्यंत त्या काकू आपल्याशी नीट बोलायला तयार नव्हत्या आणि आज अचानक आपल्याला सहकुटुंब जेवायला बोलावलं आहे.असं कसं?" त्यावर अवी देखील क्षणभर विचारात पडला आणि म्हणला;"अग, कदाचित आज तुझ्या जाण्याने काकूंच्या मनाला एक धक्का बसला असेल आणि त्या त्यांच्या जुन्या दुःखातून बाहेर आल्या असतील. किंवा नातू गेल्याबद्दल त्या स्वतःला अपराधी मानत असतील तर त्या अपराधी भावनेला देखील थोडा धक्का लागला असेल. काकांनी देखील त्यांना समजावलं असेल की जर काकांपासून न लपवता काकू आपल्याशी बोलल्या तर त्यामुळे त्या दोघांनाही बरं वाटेल आणि आपल्याला देखील सगळं सोपं जाईल... आणि त्यांना पटलं असेल. मग कुठूनतरी सुरवात करायची म्हणून त्यांनी आज आपल्याला बोलावलं असेल. बर, ते जाऊ दे. इतका विचार नको करुस तू. तुला देखील बरं वाटत नव्हतं तर वेळेत जाऊ आणि वेळेत परत येऊ." त्यावर हसत मान हलवत सरू उठली.

अवि आणि सरू बाळाला घेऊन काका-काकूंच्या घरी पोहोचले तेव्हा आठ वाजले होते. काकांनीच दार उघडले आणि सगळ्यांना घरात घेतले. घर फारच छान होतं. सगळं कसं नीट-नेटकं मांडून ठेवलं होतं. एका बाजूला काही खेळणी ठेवली होती. खेळणी दिसताच बाळ अवीच्या कडेवरून खाली उतरला आणि खेळणी घेऊन खेळायला लागला. काका हसले आणि म्हणाले;"ती सगळी खेळणी त्यांच्यासाठीच आहेत. खेळून घेऊ दे त्याला." सरूची नजर आतल्या दाराच्या दिशेने वळली. "काकू दिसत नाहीत ते?" सरूने काकांना विचारले आणि तशीच ती आत जायला वळली. "अग येईल ती. बस तू." काका म्हणाले. "काका, बिचाऱ्या काकू किती करतील? मी थोडी मदत करते त्यांना. तुम्ही बसा अविबरोबर." असं म्हणत सरू आत गेलीच.

काकू ओट्याजवळ उभ्या होत्या. हातात जपाची माळ होती; पण त्यांची कुठेतरी तंद्री लागली होती. काकू कशी प्रतिक्रिया देतील याचा सरूला अंदाज नव्हता... त्यामुळे थोडं बिचकतच तिने काकूंना हाक मारली. "काकू...... काही मदत हवी आहे का?" काकूंची तंद्री भंगली आणि त्यांनी नजर उचलून सरूकडे बघितले. त्यांची नजर अजूनही हरवलेलीच होती; पण सरूला बघून एकदम त्यांच्या नजरेत ओळख आली. त्यांनी काहीसं हसत सरूला जवळ बोलावलं आणि तिचा हात हातात घेतला. क्षणभर तिच्या डोळ्यात बघून काकू म्हणाल्या;"एक सांगू का? माझं थोडं चुकलंच...." त्यांना थांबवत सरू म्हणाली;"काकू, मलाच माफ करा. मी जरा जास्तच बोलले आज दुपारी. तुमच्या किंवा काकांच्या भावना मला दुखवायच्या नव्हत्या; काय झालं कोण जाणे त्याक्षणी मला." तिला थांबवत काकू म्हणाल्या;"सरू..... एक सांगू का तुला? आज जे झालं ते झालं; पण आता तुम्ही...."

तेवढ्यात काका आत आले आणि हसत हसत म्हणाले;"काय गप्पा चालू आहेत." काकांना बघताच काकूंनी सरूचा हात सोडला आणि काकांकडे वळत म्हणाल्या;"काही नाही... जेवण तयार आहे तर जेवायला बसू म्हणत होती ही. मी म्हंटल मुद्दाम गाजराचा हलवा आहे तुमच्यासाठी; तर म्हणाली तिला आणि बाळाला नाही आवडत गाजराचा हलवा." काकुंच बोलणं ऐकून सरूला एकदम आश्चर्य वाटलं. ती काही म्हणायच्या आत काका सरूकडे वळले आणि म्हणाले;"अग तुला गाजर हलवा नाही का आवडत? तुमच्याकडे आलो होतो तेव्हा विचारायला हवं होतं काय आवडतं ते. मग पटकन जाऊन श्रीखंड घेऊन येऊ का? ते तर तुला आणि बाळाला आवडत असेल न?" त्यांनी असे म्हणताच काकू एकदम घाईघाईने म्हणाल्या;"हो! जाच तुम्ही आणि घेऊन या श्रीखंड." काकुंच हे अस वागणं बघून सरू अजूनच गोंधळात पडत चालली होती. ती एकदम सावरून घेत म्हणाली;"छे छे काका. आता कुठेही जाऊ नका. थोडा थोडा गाजर हलवा सगळेच खाऊ." काकांनी एकवार काकूंकडे बघितलं आणि ते बाहेर निघून गेले.

काकू परत एकदा सरूला काहीतरी सांगण्यासाठी तिच्याकडे वळल्या. तेवढ्यात सरुचा बाळ बाहेरून धावत धावत आत आला आणि सरूला बिलगून म्हणाला;"मया भूक लागली." त्याला उचलून घेत सरू म्हणाली;"हो रे बाळा. या आजीने तुझ्यासाठी छान छान खाऊ केला आहे. चल तुला भरवते." आणि मग काकूंकडे वळून ती म्हणाली;"मी याला वरण भात भरवून घेते आणि मग आपण मोठे बसू. चालेल न?" काकूंनी प्रेमळ नजरेने बाळाकडे बघत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सरूला म्हणाल्या;"मी कालवून देते हो त्याच्यासाठी वरण भात. छान साजूक तूप आणि बनतिखटाचं लिंबाचं लोणचं पण घालते." काकुंच बोलणं एकूण सरू हसली आणि काकूंनी वरण भात कालवून सरूच्या हातात दिला; तो ती बाळाला भरवायला लागली. काकूंनी मोठ्यांच्या जेवणाची तयारी करायला सुरवात केली.

बाळाचं जेवण झालं आणि त्याला खेळायला सोडून सरू काकूंना मदत करायला आली. सगळेजण टेबलावर बसून गप्पा मारत जेवत होते. काका अगदी आग्रह करून वाढत होते. जेवताना काका अचानक म्हणाले;"अरे, गाजर हलवा राहिला वाटत आतच." त्यावर काकांकडे बघत काकू म्हणाल्या;"अहो, त्यांना आवडत नाही म्हणून सांगितलं न मी तुम्हाला. म्हणून तर नाही आणला गाजर हलवा मी इथे टेबलावर." काकुंच उत्तर ऐकून का कोण जाणे पण काका एकदम गंभीर झाले. काकू देखील अस्वस्थपणे चुळबुळ करायला लागल्या. वातावरणातला ताण वाढायला लागला म्हणून मग तणाव कमी करायला सरूने बाळाला हाक मारली. "बाळ, हे बघ आजीने तुझ्यासाठी काय गम्मत केली आहे. ये पटकन." बाळ देखील धावत आला. काकू त्याला घेण्यासाठी पुढे होत होत्या तेवढ्यात उभे राहून काकांनीच बाळाला उचलून घेतले आणि अविला विचारले;"काय रे बाळाचं नाव काय ठेवलं आहे तुम्ही? कधी नावाने हाक मारताना नाही ऐकलं म्हणून विचारतो." त्यावर हसत अवि म्हणाला;"या सरूची अंधश्रद्धा दुसरं काय काका. आहो, हिला कोणीतरी सांगितलं की बाळाचं नाव नका ठेऊ तीन वर्षांचा होईपर्यंत. त्यामुळे अजून आम्ही त्याचं नाव नाही ठेवलं. पण आता दोनच दिवसात त्याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यावेळी त्याच बारसंच करणार आहोत. हा पठ्ठ्या पहिलाच असेल की तिसऱ्या वर्षी पाळण्यात बसेल आणि बारसं करुन घेईल."

त्यावर सगळेच हसले. काकूंनी सरूला विचारलं;"काही नाव ठरवलं आहेस का ग?" त्यावर सरू म्हणाली;"उगाच अपशकुन नको म्हणून मी अजून नावाचा विचार देखील केलेला नाही." तीच बोलणं ऐकून अवि हसायला लागला आणि काकूंना म्हणाला;"ही फारच भोळी आणि वेडी आहे. पण मी मात्र माझ्या लेकाचा नाव ठरून टाकलं आहे. मी त्याचं नाव हर्ष ठेवणार आहे. तो आला आणि आमचं सगळं कुटुंब आनंदलं... आनंद देतो तो हर्ष."

अविचं बोलणं ऐकून सरू मात्र एकदम अस्वस्थ झाली आणि जेवणावरून उठत म्हणाली;"अवि, आपलं ठरलं होतं न याविषयी अजिबात बोलायचं नाही. एवढी एक गोष्ट देखील तू ऐकत नाहीस न माझी." आणि एकदम काकांच्या हातातून बाळाला घेऊन सरु निघालीच. अवि देखील तिच्या पाठोपाठ जात म्हणाला;"अग इतकं काय लावून घेतेस मनाला? दोन दिवसात तर आपण करतो आहे सगळं तुझ्या मनाप्रमाणे." पण सरू त्याचं काही ऐकायला थांबलीच नाही. काका काकूंना देखील न सांगता ती घराबाहेर पडली आणि तरातरा स्वतःच्या घराकडे निघून गेली. अवीची फारच पंचाईत झाली... तो पटकन मागे वळला आणि एकूण झालेल्या प्रकाराने स्तंभित झालेल्या काका-काकूंना म्हणाला;"काका... काकु... तुम्ही हीचं हे वागणं फार मनाला लावून घेऊ नका हं. बाळाच्या बाबतीत ती थोडी जास्तच हळवी आहे. आता ती काही ऐकायची नाही. घरी जाऊन परत वाद घालत बसेल. पण आता ती गेली आहे तर मला पण जावं लागेल. उद्या येऊन जातो मी. आता तर काय येणं-जाणं चालेलंच आपलं. अच्छा" आणि काका-काकूंना बोलायला काही वाव न देता तो देखील सरूच्या मागे निघून गेला.

......................................

दोन वृद्ध जोडपी अवि-सरूच्या दिवाणखान्यात बसली होती. दोन्ही वृद्ध महिला हमसून हमसून रडत होत्या. दोन्ही पुरुषांची अवस्था देखील फारशी ठीक नव्हती. घरात पोलिसांचा वावर चालू होता. त्यामुळे त्यांना त्यांचं दुःख बाजूला ठेऊन पोलिसांना तोंड द्यावं लागत होतं.

पोलीस इन्स्पेक्टर : तुमचं नातं काय यासर्वांशी?

त्यातील एक पुरुष स्वतःला सावरत पुढे आले आणि म्हणाले;"मी सरूचा.... म्हणजे या मुलीचा बाप आणि ही तिची आई. ते मुलाचे वडील आणि त्या त्याच्या आई.

पोलीस इन्स्पेक्टर : तुमच्या कधी लक्षात आला हा सगळा प्रकार?

सरुचे वडील : अहो, आज संध्याकाळी आमच्या नातवाचं बारसं आम्ही ठरवलं होतं. त्यासाठीच तर आम्ही चौघेही आज सकाळीच आलो. काल आम्ही निघायच्या अगोदर फोन करत होतो तर दोघांनीही फोन उचलला नाही. त्यामुळे आम्ही पार गोंधळून गेलो होतो. त्यात अवि आम्हाला घ्यायला स्टेशनवर येणार होता; तो आलाच नाही. काही कळायला मार्ग नव्हता. पण पत्ता होता आमच्याकडे. त्यामुळे आम्हीच टॅक्सी केली आणि आलो. घरी पोहोचलो आणि सारखी बेल वाजवत होतो. कोणी दार देखील उघडायला येत नव्हतं. बरं, इथे कोणी शेजार-पाजार देखील नाही की कोणाला तरी काहीतरी विचारता येईल. पण तेवढ्यात हा पोरगा आला सामान घेऊन....


क्रमशः










No comments:

Post a Comment