Friday, November 5, 2021

चिरंजीवी (भाग 8) (शेवटचा)

 चिरंजीवी


भाग 8

......कालौघात सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात यावर त्यांचा विश्वास होता.

"पंजू... म्हणूनच तुम्ही आणि स्वीटुने मिळून ही ग्रीन वर्ल्ड सिटी तयार केलीत का?" जनमेजयने..... सिध्दार्थच्या पणतुने त्याला विचारलं.

"जनमेजया एकतर ती तुझी नाही माझी स्वीटु आहे." मोकळेपणी हसत सिध्दार्थ म्हणाला. "दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सर्वात कमी आंग्ल भाषिक शब्द वापरले जातील हा नियम आहे; हे तू विसरू नकोस. या 'सत्यतापर जगत' चं नाव बदलण्याची चूक तू करू नकोस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या लक्षात आलं आहे की अलीकडे आम्हाला भेटायला येण्याच्या नावाखाली तू वानप्रस्थाश्रम विभागात जास्त वावरायला लागला आहेस. अर्थात मला त्याचा आनंदच आहे. तुमच्यासारखी तरुण पिढी आमच्या आजूबाजूला असली की खूप बरं वाटतं. पण तुला दिलेल्या जवाबदाऱ्या पूर्ण करून मगच इथे आलास तर बरं होईल बाळा."

"ओह! पंजू.... मला माफ करा... अजूनही पटकन आंग्लभाषिक शब्द तोंडातून सहज बाहेर पडतात. मुळात एरवी तेच शब्द वापरण्याची सवय आहे न म्हणून. अर्थात मी पूर्ण प्रयत्न करतो असं होऊ नये. विशेषतः तुमच्या सोबत आणि स्वीटु सोबत असतो तेव्हा... आणि तुमची स्वीटु ही तुम्हाला ज्या अर्थाने स्वीटु आहे त्या अर्थाने ती माझी स्वीटु नाही. इतकी गोड पणजी कोणालाही नाही... म्हणून ती माझी स्वीटु आहे. त्यामुळे तुम्हाला पटलं नाही तरी मी तिला स्वीटुच म्हणणार." खदाखदा हसत जनमेजय म्हणाला. "पंजू, मला खरंच इथे तुमच्या सर्वांच्या सोबत राहायला आवडतं. त्यामुळे माझा अभ्यासाचा वेळ आणि शाळेचा वेळ सोडला तर मी इथेच पळून येतो. एक सांगू का? मला तुमच्या वानप्रस्थाश्रम विभागातील संपूर्ण निसर्गासोबत ही कल्पना खूप आवडते. ही मातीची घरं, नैसर्गिक प्रकाश जास्तीत जास्त घरात येईल असे झरोके, भरपूर झाडं; आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतक्या प्रकारचे प्राणी -पक्षी अत्यंत मोकळेपणी आपल्यासोबत राहातात. हे एकूणच सगळं कितीतरी छान आहे पंजू."

"आहे खरं छान. पण आता तू इथून पळ बघू बेटा. तुझ्या आईने निरोप धाडला आहे; जेवून अभ्यासाला बसायची वेळ झाली आहे तुझी." मागून आवाज आला. सिध्दार्थ आणि जनमेजयाने एकाचवेळी मागे वळून बघितलं आणि "माझी स्वीटु" असं म्हणून हसायला लागले.

"पुरे झाला तुमचा दोघांचा चावटपणा. सिध्दार्थ तुला किती वेळा सांगितलं आहे; याला पळवून लावत जा चार वाजायच्या अगोदर हा इथे आला तर. स्वतःच्या लेकाच्या आणि नातवाच्या बाबतीत कडक राहिलास; पण पणतू तुला सहज गुंडाळून ठेवायला लागला आहे. आता मात्र तू खरंच म्हातारा झालास हं." पुढे येऊन जनमेजयाच्या पाठीत हलकासा धपाटा घालत आणि सिध्दार्थच्या शेजारी बसत कृष्णा म्हणाली. "अग स्वीटु..." जनमेजय काहीतरी बोलायला गेला पण त्याच्याकडे बघून त्याच्या ओठांवर बोट ठेवत कृष्णा म्हणाली; "हे बघ, आता माझ्या हातात जोर नाही राहिला त्यामूळे तुला आत्ता जो धपाटा बसला आहे तो म्हणजे कौतुक वाटलं असेल. पण घरी जाऊन तुझ्या बाबाला विचार या धपट्याचा अर्थ. तुझा आजा असता तर कदाचित त्याने तर तुझ्या पंजूच्या धपाट्याचे किस्से पण सांगितले असते. बरं ते जाऊ दे. पळ बघू तू आता. तुझी आई वाट बघते आहे."

खुदकन हसत तेरा वर्षाचा जनमेजय बाकावरून उठला आणि वेलांनी आच्छादलेल्या फटकातून बाहेर पडला.

"सिध्दार्थ, तू त्याला इथे फार अडकवून ठेवत जाऊ नकोस." तो जाताच सिध्दार्थकडे वळत कृष्णा म्हणाली.

आपल्या वृद्ध हातांमध्ये तिचे सुरकूटलेले हात घेत सिद्धार्थ म्हणाला; "अग, तो आणि त्याचे मित्र येतात इथे हे खूप महत्वाचं आहे. त्यांना आपण केलेला विचार फक्त आवडून नाही चालणार... तो त्यांनी पुढे नेला पाहिजे. त्यामुळे त्यांना केवळ आपले अनुभवच नव्हे तर त्यामागील आपला अभ्यास आणि इतका मोठा निर्णय घेऊन निर्माण केलेलं हे जग कळलं पाहिजे."

"मला मान्य आहे सिध्दार्थ. अभिमन्यूच्या आकसमिक मृत्यूनंतर तू किती सैरभैर झाला होतास ते मी कधीच विसरू शकणार नाही. अगदी महाभारतीय परिस्थिती प्रमाणे आपली स्थिती झाली होती. अर्थात मृण्मयीने; त्याच्या पत्नीने; आपल्याच सोबत राहायचा निर्णय घेतला आणि परीक्षिताचा जन्म झाला. अभिमन्यु नाव आपण हौसेने ठेवलं पण मग परीक्षित आणि आता हा जनमेजय... ही दोन नावं तुझा आग्रह म्हणून." असं म्हणून कृष्णा हसली.

"कृष्णा, पुरणकाळातल्या जनमेजया नंतर किंबहुना जनमेंजया पासूनच कलियुगाने चंचुप्रवेश केला होता. त्यावेळी हळूहळू मानवीय मानसिकता बदलायला लागली होती. पण तो बदल इतका सूक्ष्म होता की तो लक्षात येईपर्यंत समाजाची एकत्रितपणे आणि मनुष्याची वयक्तिक पातळीवरील विचारसरणी आणि वागणं बदलून गेलं होतं. परीक्षिताने न्यायाने राज्य केलं आणि जनमेंजयाने होणारा ह्रास फक्त उघड्या डोळ्यांनी बघितला. केवळ एकाच पिढीच्या अंतराने अचानक झालेला बदल. कृष्णा, ज्याप्रमाणे आपल्या बाबतीत एक कालातीत अनुभव घडला; कदाचित त्यावेळी परीक्षिताला किंवा जनमेंजयाला देखील सूचित केलं गेलं असेल. पण तुला एक सांगू का; आजवरच्या माझ्या आयुष्यातल्या अनुभवांनंतर माझ्या मनाची खात्री पटली आहे की प्रत्येक काळ स्वतःचा महिमा स्वतः निर्माण करत असतो. कोणीही कोणाचाही पालक किंवा चालक असत नाही किंवा कोणाचंही नशीब कोणीही बदलू शकत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे."

"आणि तरीही आपली भेट घेतली गेली सिध्दार्थ! किती वर्षं झाली त्या घटनेला?" कृष्णा विचार करत म्हणाली.

"एकहत्तर वर्ष झाली." सिध्दार्थ म्हणाला. त्याच्या त्या उत्तराने कृष्णाने त्याच्याकडे वळून बघितलं. तिच्या डोळ्यात अनेक भाव होते.... इतकी वर्षं?! तुला अचूक कसं लक्षात आहे?! आपण खरंच खूपच म्हातारे झालो आहोत!!!

इतक्या वर्षांच्या सोबतीमुळे सिध्दार्थला तिचे डोळे नीट वाचता यायला लागले होते. प्रत्येक भाव लक्षात आल्याने सिध्दार्थने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटलं आणि म्हणाला; " कृष्णा, आपण जेमतेम पंचविशीत होतो जेव्हा ती पेटी आपल्याला मिळाली आणि ते अनुभव! त्यानंतर वर्षभरात आपलं लग्न झालं आणि लगेचच्या वर्षी तर अभिमन्यूचा जन्म झाला. अभिमन्यू सव्वीस वर्षांचा असताना तो अपघात घडला. मृण्मयी वाचली पण आपला अभि आपल्याला सोडून गेला. तीन महिन्यात परीक्षिताचा जन्म! जनमेजय झाला तेव्हा परीक्षित अठ्ठावीस वर्षांचा; आणि आता जनमेजय तेरा वर्षांचा. मोज बघू! आपण आत्ता चौऱ्याण्णव वर्षांचे आहोत....

कृष्णा.... आपल्या आयुष्यात हा जो अनुभव आला तो आपण अभिमन्यूला सांगितला होता. कसं कोण जाणे पण त्याच्या मानत एकदाही असं आलं नाही की आपण काहीतरी खोटं किंवा आपल्याच मनातलं अतिरंजित काहीतरी सांगतो आहोत. परीक्षिताला सांगितलं तेव्हा देखील त्याने त्यावर विश्वास ठेवलाच की... आणि आपला जनमेजय! तो तर रोज काही ना काही कारण काढून तोच तो अनुभव मला परत परत सांगायला लावतो. पण तरीही त्याने अविश्वास नाही दाखवलेला कधीही.

कृष्णा, आपल्याला मुनी व्यासांनी आदेश दिला होता की 'धर्माचा आणि पर्यायाने मानवीय अस्तित्वाचा होणारा ह्रास थांबवा. त्यासाठी तुम्ही काय करायला हवं ते तुम्हाला नक्की सुचेल.' त्यांना आपल्या भविष्यकाळाची पावलं समजली असतील कदाचित. म्हणूनच त्यांनी आपल्याकडे त्यांचं मन मोकळं केलं असेल. पण एक भगवन व्यास सोडले तर इतरांशी झालेला संवाद खूप वेगळ्या भावनिक पातळीवरचा आहे.

महात्मन बिभीषण म्हणाले होते की 'माझी न्याय सम्मत संसार निर्मितीची उर्मी श्रीरामांच्या लक्षात आली आणि त्यांनी माझा हाच विचार पुढील पिढ्यांमध्ये मी रुजवावा यासाठी मला चिरंजीवित्व दिले. पण आज मी माझ्या उद्दिष्टापासून अनेक दशके दूर गेलो आहे... आणि तरीही चिरंजीवित्व वागवतो आहे. सिद्धार्थ, तुला भेटण्याचे हेच एक प्रयोजन आहे... तू एका वेगळ्या प्रवासाला निघतो आहेस. त्यामुळे या प्रवासादरम्यान जर तुझी गाठ अशा व्यक्तीशी झाली की ती व्यक्ती या माझ्या चिरंजीवित्वाचा परत एकदा विचार करू शकणार असेल; तर माझ्या मनातील व्यथा तू नक्की त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव.'

काहीशी तशीच व्यथा गुरू कृपाचार्यांची होती. त्यांनी देखील मला जे सांगितलं ते शब्दशः मला आठवतं आहे. 'ज्ञान हे दान आहे आणि दाता आणि युयुत्सु दोघेही आपापल्या जागी योग्य असणे आवश्यक आहे; हे सार्वभौम सत्य लयाला जाते आहे. अशा या काळामध्ये जिवीतकार्यहीन असे हे माझे जीवन मला किंकर्तव्यमूढ करते आहे. त्यागणे शक्य नाही आणि जगणे नाकारावे तर ते कोणापुढे या प्रश्नाने मी ग्रासलो आहे. पुत्रा... सिध्दार्थ... तुझ्या या नवीन प्रवास कार्यामध्ये जर खरंच तुझी भेट त्या सर्वसाक्षी परमपित्याशी झालीच... तर माझ्या मनीची व्यथा उद्धकृत नक्की कर.'

याचा अर्थ महात्मन दोघांना एका उद्दिष्टासाठी चिरंजीवित्व मिळाले होते. मात्र या कलियुगामध्ये ते दोघेही त्या उद्दिष्टाप्रत पोहोचत नव्हते. त्यामूळे ते व्यथित होते.

बळी राजाचं दुःख खूपच वेगळ्या पातळीवरचं होतं. कृष्णा, तुला मी अनेकदा म्हंटलं आहे की तू पातालराज बळींना बघूच शकली नसतीस. त्यांचं शरीर जितकं जराजर्जर झालं होतं त्याहून जास्त त्यांचं मन प्रत्येक दिवस मोजत असल्याने दुःखी होतं. ते म्हणाले होते; 'मी यमराजाला माझ्यापर्यंत पोहोचण्यास मज्जाव केला; श्रीविष्णूंना माझ्या सीमेचे द्वारपाल करून. मात्र मर्त्य मानवाला हळूहळू का होईना शरीर ह्रास सहन करत वृद्धत्वाकडे वाटचाल करावीच लागते... हे त्याक्षणी विसरून गेलो होतो. पण विधिलिखित कोणाला टळतं का? दुर्दैवाने मला उमजलेलं हे सत्य मी पुढील मर्त्य मानवापर्यंत पोहोचवू शकत नाही; ते केवळ माझ्या या जराजर्जर शरीरामुळे. म्हणूनच तुला विनंती करण्यास आलो आहे की पुढील प्रवासात जेव्हा कधी तू त्या आदिशक्तीला भेटशील तर माझी व्यथा नक्की सांगावीस.'

राजा बळींना काळाच्या अंतापर्यंत जगण्याचं कोणतंही उद्दिष्ट नव्हतं; मात्र हेच त्यांचं दुःख होतं."

"सिध्दार्थ या तिघांचं दुःख तू बघितलं आहेस; आणि त्यांची एका वेगळ्या पातळीवरची मागणी देखील आपल्याला पटली आहे. मात्र भगवन परशुरामांचे विचार अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ होते. ते म्हणाले होते; 'एकूणच सर्वस्वाचा अंत नक्की आहे... मात्र मानवजातीला काहीतरी देणं लागतात तुमच्यासारखे. त्याची जाणीव लवकर व्हावी तुम्हाला हीच त्या परमपित्याकडे मागणी करतो.' त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं. केवळ त्यांनाच नाही तर भगवन हनुमंत देखील आपल्याकडून काहीही अपेक्षित करतच नव्हते. जाता जाता ते फक्त इतकंच सांगून गेले; 'आजच्या काळामध्ये ज्याची अवहेलना सतत होते असे भक्तीरूप; तन-मनात साठवून आपल्या उद्दिष्टाशी तादात्म्य ठेवा मानवांनो!'

अश्वत्थामांचं दुःख मात्र यासगळ्याहून वेगळंच. 'मी तुमची भेट घेतो आहे ते; आपली सद्सद्विवेक कायम जागृत ठेवा आणि भक्तीरूप विश्वासाने आयुष्य क्रमित करा हे सांगायला. मनात इच्छा असूनही मी माझ्या चिरंजीवित्व नाकारू शकत नाही हे दुखरं टोचर सत्य मी आयुष्यभर वागवतो आहे. तुम्ही अशा कोणत्याही पापाचे भागीदार होऊ नका.'

भगवन परशुराम, हनुमंत आणि अश्वत्थामा यांचं आपल्याकडे मागणं काहीही नव्हतं." कृष्णाने पुढच्या तिन्ही चिरंजीवाचे अनुभव परत एकदा डोळ्यासमोर उभे केले होते.

"तरीही कृष्णा, जर अभिमन्यु आपल्या सोबत असता तर आज जे आपण उभं केलं आहे ते केलं नसतं. कदाचित आपण अति सामान्य आयुष्य जगत हाच विचार करत राहिलो असतो की भगवन व्यास आपल्याला म्हणाले तशी संधी कधी येईल. मात्र अभिमन्यु गेला आणि..........."

"आणि आम्ही आलो.......... आजी, आजोबा आता तरी तुम्ही तेच ते बोलणं बंद करा बघू." त्यांच्या समोर उभा राहिलेला उंचा-पुरा परीक्षित म्हणाला. त्याला समोर बघितल्या बरोबर कृष्णाने हसत म्हंटलं; "तुझं येणं बघून घड्याळ स्वतःची वेळ लावून घेत असेल परीक्षित. चार वाजले न? बरं! तू बस् इथे मी जरा काही कामं उरली आहेत ती पूर्ण करून येते." असं म्हणून कृष्णा बाकावरून उठली.

कृष्णा त्यांच्या मातीने बांधलेल्या घराचा दिशेने गेली. ती गेली त्या दिशेने बघत परीक्षित म्हणाला; "आजोबा, तुम्ही खरंच नशीबवान आहात की तुम्हाला समजून घेणारी सहचारणी मिळाली."

"हो रे बाबा, म्हणून तर इतका मोठा पसारा निर्माण करू शकलो आणि आजही निभावून नेतो आहे." सिध्दार्थ हसत म्हणाला. "अभि गेला आणि मन सगळ्यातूनच उडून गेलं होतं. त्यावेळी कृष्णानेच मला सुचवलं होतं की व्यवसाय आणि घर विकून आपण काहीसं दूर मोठी जागा घेऊन वृद्धाश्रम सुरू करूया. मला ते पटलंच. तू दोन वर्षांचा होतास; आम्ही सगळं आवरायला घेतलं आणि त्याचवेळी मृण्मयीने आम्हाला सांगितलं की तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे. तिच्या इच्छेनुसार आम्ही तीच लग्न लावून दिलं. तू आमच्या जवळ वाढलास; शिक्षण घेतलंस आणि अगदी परदेशात जाऊन पुढचं शिक्षण घेऊन आलास."

"आजोबा, तुम्हा दोघांकडे बघून आणि तुमची मेहेनत बघूनच मी ठरवलं होतं की आवश्यक पैसा कमावायचा असेल तर शिक्षण हवं. मात्र इथे परत आलो आणि आपण तिघांनी ही स्वप्ननगरी उभी केली."

"परीक्षिता जेव्हा सुरवात केली त्यावेळीच ठरवलं होतं इथे काहीतरी असं करायचं की मरताना समाधान भरून राहील मनात. अगोदर समोरच्या भागामध्ये आपण दोनच इमारती बांधल्या. कसा असेल प्रतिसाद याचा विचार सतत करत होतो आम्ही. पण आम्ही जाहिरात दिली आणि सहा महिन्यात दोन्ही इमारती भरल्या. ते ही आपण बांधून दिलेले सर्व नियम मान्य करून." सिध्दार्थने असं म्हणताच परीक्षिताने हसत टाळीसाठी हात पुढे केला. "आजोबा तुमचे नियम? आहो त्याला हट्ट म्हणतात. या आपल्या 'सत्यतापर जगत' मधलं सामाजिक व्यवस्थेचं आयुष्य 1985 मध्ये पोहोचून थांबलं आहे; ते तुम्ही ठरवलं म्हणून. त्यावेळी केवळ दोन इमारतींनी सुरवात केली आपण. पण आज इथे पंधरा मजली जवळ जवळ अठ्ठावीस इमारती आहेत. प्रत्येक मजल्यावर चार घरं. शाळा देखील आपण सगळ्या परवानग्या घेऊन सुरू केली; त्याला देखील बरीच वर्ष झाली आता."

"परीक्षिता, तू मोठा झाला असलास तरी माझ्याहून नाही हं." हसत हसत सिध्दार्थ म्हणाला. "अरे माझे हट्ट नाही रे... पंचमहाभूतांची आवश्यकता असं म्हण हवं तर. तुम्ही आजच्या काळातील मुलं अनेक गोष्टी मान्यच करणार नाहीत. पण साधारण 1985 च्या कालखंडात एका इमारतीमध्ये किमान एक असे दूरध्वनी आले होते. म्हणजे दूरवरचा संवाद आवश्यकतेनुसार होऊ शकत होता. इतर आवश्यक उपकरणं देखील होतीच. त्यामुळे मी अभ्यासपूर्वक विचार करून आणि अनेकांशी बोलणं करून मग ठरवलं की इथे राहणाऱ्या कुटुंबांनी एका प्रमाणापलीकडे नवीन उपकरणं वापरायची नाहीत. लोकांनी ते मान्य केलं आणि एक एक करत या इमारती आणि त्या अनुषंगाने आवश्यक अशा सुखसोयी निर्माण झाल्या."

"पंजू, परत एकदा सांगा ना कोणती पंच महाभुतं ते." तिथेच घुटमळणारा जनमेजय म्हणाला आणि हसत सिध्दार्थने सांगितलं; "पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी आणि जल ही पंच महाभुतं आहेत. अत्यंत वंदनीय असा हा निसर्ग असूनही आपण त्यांना भुतं का म्हणतो माहीत आहे का?" सिध्दार्थने जन्मेजयला विचारलं.

"अरे कमल करता पंजू तुम्ही. तुम्हीच तर सांगितलं आहे; कोणतंही कारण नसताना यातील एक जरी डळमळलं तर मानवी जीवनाचा संपूर्ण ह्रास होईल. त्यामुळे ही पंच माहाभुतं आणि पुढील पिढी यांच्यातील दुवा म्हणून जितकं जमेल तेवढं कर्तव्य करणे." हसत जनमेजय म्हणाला. "पण तरीही सांगू का पंजू.... तुम्ही हा वानप्रस्थाश्रम सुरू केला आहात ना तो सर्वात मस्त आहे. मला तर इथेच येऊन राहावंसं वाटतंय."

"तुला खुपकाही कायमच वाटत असतं बेटा. पण आपण आपल्या....." कृष्णा तिथे येऊन बसली होती ती जन्मेजयला काहीतरी सांगायला सुरवात करत होती. पण तिचं वाक्य अर्धवट तोडत जनमेजय म्हणाला; "आपण आपल्या त्या त्या वयातील कर्तव्य आणि जवाबदाऱ्या पूर्ण करून मगच पुढचा विचार करायचा असतो... माहीत आहे ग स्वीटु." त्याची बडबड ऐकून सगळेच हसले.

"माहीत आहे न? मग सहा वाजले. पळ बघू तुझ्या घराकडे."कृष्णा म्हणाली आणि जनमेजय आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना हाक मारायला गेला. इथे राहणारी सर्वच तरुण मंडळी आणि त्यांची पिल्लं चार ते सहा या वेळात वानप्रस्थाश्रमात येऊन आपापल्या आई-वडिलांना भेटून जात होती.

सत्तर एकर जमिनीवर पसरलेला हा पसारा सुरू झाला होता तेव्हा सिध्दार्थ आणि कृष्णाने शहरातलं सगळं विकून टाकून एक स्वप्न साकारायला सुरवात केली होती. अगोदर जेमतेम दोन इमारती असणारी सुरवात आता पंधरा मजल्याच्या एकूण अठ्ठावीस इमारतींची निर्मिती करण्यात आली होती. सरकार दरबारी धावपळ करून शाळा बांधली होती. काय सोयी नव्हत्या या ठिकाणी? आणि तरीही 1900 मध्ये काळ थांबला होता काहीसा. मात्र आता इथे घर मिळावं म्हणून अनेक लोक वाट बघत होते. जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यातल्या आयुष्याचं महत्व आता लोकांना पटायला लागलं होतं.

आपण लावलेलं रोपटं इतकं सुंदर वाढतं आहे हे बघून सिध्दार्थ आणि कृष्णा समाधानी झाले होते. सहाच्या पुढे काटा सरकायला लागला आणि वानप्रस्थाश्रमामधीली माणसांच्या पिल्लांची किलबिल कमी होत गेली. त्यानंतर थोड्याच वेळाने प्राणी आणि पक्षी देखील त्यांच्या गप्पा आवरून शांत व्हायला लागले. इतर अनेक वृद्ध जोडपी देखील आपापल्या घराकडे वळली.

कृष्णाचा हात हातात घेऊन सिध्दार्थ देखील त्याच्या घराकडे वळला. मोजून चार पायऱ्या होत्या. त्या चढताना मात्र त्याने त्याचा वेळ कमी केला. कारण....... फक्त दार लोटून घेतलेल्या घरातून महामृत्युंजयाच्या जपाचा आवाज त्याला ऐकू यायला लागला.

कृष्णाकडे बघत मिश्कीलपणे सिध्दार्थ म्हणाला; "हा जप आपल्यासाठी की अलीकडे त्यांच्यापैकी काहींच्या अधून मधून होणाऱ्या भेटींपैकी एक?"

सिध्दार्थकडे हसत बघत कृष्णा म्हणाली; "परीक्षित आणि जनमेजय आला त्यावेळी मी घराकडे गेले ते ह्याच कारणासाठी. आज...."

"अहं, तू नको सांगूस.... चल दोघे आत जाऊ! मला प्रत्यक्षात दर्शन घेऊ दे." सिध्दार्थ म्हणाला आणि लोटलेलं दार उघडून त्याने घरात पाऊल टाकलं.

समाप्त







No comments:

Post a Comment