Friday, August 20, 2021

 स्त्री...दाक्षिण्य - आदर - समानता!

 स्त्री...दाक्षिण्य - आदर - समानता!


स्त्री...दाक्षिण्य - आदर - समानता! स्त्रीच्या बाबतीतल्या या तीन शब्दानुरूप समाजात प्रचलित कृती अगदी सोप्या भाषेत सांगायच्या तर...

दाक्षिण्य : पुढे होऊन स्त्रीयांसाठी दरवाजा उघडून देणे. त्यांच्यासाठी खुर्ची ओढणे. इत्यादि...

आदर : स्त्रीचं कौतुक करताना अत्यंत सभ्य आणि शालीन शब्द वापरणे. थट्टा आणि चेष्टा यातील फरक समजून त्यानुसार त्यांच्याशी बोलणे. इत्यादि...

समानता : तिचं अस्तीत्व स्वीकारावं... बस्!

आपण अनेकदा सिनेमांमध्ये किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा काहीसं उच्चभ्रू समाजामध्ये बघतो की एखादी स्त्री सोबत असली तर पुरुष पुढे होऊन तिला दरवाजा उघडून देतात; किंवा खुर्ची पुढे ओढून देतात. ती चालण्यासाठी उठली की तिचा हात हातात घेऊन तिला नेतात. खरं सांगायचं तर ही भारतीय पद्धतच नाही. पूर्वी परदेशातील स्त्रिया खूप घेर असलेले गाऊन्स (कॉरसेट) घालत असत. कमरेजवळ घट्ट आणि मग खूप मोठा घेर. त्यामुळे त्यांना अनेकदा बंद दार उघडणं शक्य होत नसे. तीच अवस्था खुर्चीत बसताना किंवा पुढे चालताना. त्यावेळी सोबतचा पुरुष तिला या कृती करण्यास मदत करत असे. पुढे स्त्रियांचा पोशाख बदलला. मात्र त्यांना 'गरज' म्हणून असलेली 'मदत' हा 'स्त्री दाक्षिण्य' चा भाग झाला.

प्रामाणिकपणे सांगायचं तर हा विचित्र आदर देणाचा प्रकार मला अजिबात मान्य नाही. पूर्वीच्या परदेशी स्त्रियांच्या कपड्यांमुळे त्यांना मदतीची गरज होती आणि ती त्यावेळी केली जायची. पण हळूहळू ही सभ्यता झाली. माझ्या मते यातून देखील पुरुष प्रधान मानसिकता देखील वाढीस लागली. दरवाजा उघडून देणं, हात पुढे करून तिला घेऊन जाणं यातून 'या स्त्रीची जवाबदारी माझ्यावर आहे'; ही पुरुषांची मानसिकता निर्माण झाली. सर्वसाधरणपणे जवाबदरीच्या भावनेतूनच मग हक्काची भावना येते. नीट विचार करता... जिच्यासाठी पुरुष काही वेगळं करतो किंवा जवाबदरीने वागतो... तिच्यावर तो हक्क देखील गाजवतो. मग ते नातं आई, पत्नी किंवा मुलीचं असो! जवाबदारी किंवा काळजी घेणं आणि हक्क गाजवणं यातला फरक सहसा पुरुषांना कळत नाही; असं माझं मत आहे.

याच्या उलट स्त्री ज्या पुरुषासाठी काही वेगळं करते किंवा काळजी घेते... त्याच्याबाबतीत त्याच्यावर हक्क गाजवण्यापेक्षा तिचा कल त्याचं ऐकण्याकडे असतो. मग ते नातं कोणतंही असो... वडील, पती किंवा मुलगा.... जर त्याची काळजी स्त्री घेत असेल तर तिच्या मानत येणारे विचार असे असतात.... त्याला राग येत नाही न, त्याची गैरसोय होत नाही न, तो नाराज तर नाही न किंवा होणार नाही न!

एकूण काय तर.... मला वाटतं; घेराच्या ड्रेस बरोबरच (कॉरसेट) बरोबरच 'स्त्री दाक्षिण्य' नामक बेगडी सवयी आपण बंद केल्या पाहिजेत. आजच्या स्त्रीला स्वतःसाठी दार उघडता येतं किंवा खुर्ची ओढून घेता येते. ती देखील ते विसरली आहे बहुतेक. तिने देखील स्वतःला याची जाणीव करून दिली पाहिजे.

पण याच बरोबर स्त्रीचा आदर करणं महत्वाचं आहे. माझ्या मते स्त्रीचा आदर म्हणजे ती जशी आहे तशी तिला स्वीकारणं! तिचा स्वभाव, आवडी-निवडी, सवयी.... सगळं जसं आहे तसं मान्य केलंत तर तुम्ही खरंच तिचा आदर करता असं मला वाटतं. सर्वसाधारणपणे सर्वच समाजामध्ये असं मानलं जातं की लग्नानंतर स्त्रीला जास्त तडजोड करावी लागते. मी म्हणते... का? स्त्रीला का करावी लागते तडजोड? उलट लग्नानंतर जर ती तिचं घर सोडून आली आहे तर तिला एकटं वाटणं स्वाभाविक आहे. मग तर सर्वात प्रथम तिच्या नवऱ्याची आणि मग त्याच्या सोबत त्याच्या घरच्या सगळ्यांची ही जवाबदरी ठरते की तिला मोकळेपणा वाटेल असं तिला वागू द्यावं आणि घरातलं वातावरण ठेवावं. यातच स्त्री बद्दलचा आदर तुम्ही दाखवू शकता.

समानता! हा शब्द तर अलीकडे सतत सगळीकडे अगदी सर्रास वापरला जातो. चेष्टा करायची असेल तर म्हणतात; समानता म्हणजे तू पोळ्या कर आणि मी भाजी.... असं हवं का स्त्रियांना?

नोकरी करते आहे, बरोबरीने घराबाहेर पडते आहे, कमावते आहे, तिला हवं ते विकत घेते, घरात सगळ्या कामांसाठी मदतनीस ठेवले आहेत..... अजून काय समानता असते? हा अजून एक विचार.

पण मला वाटत समानता हा विचार जास्त गहन आणि शांतपणे समजून घेणं आवश्यक असतं. सगळ्याच जवाबदाऱ्या घरात राहणाऱ्या सर्वांनी समजुतीने वाटून घेणं ही खरी समानता आहे. 'ही कामं पुरुषांची नाहीत'; 'फक्त स्त्रियांनाच जमतं हं हे सगळं'; ही मानसिकता बदलली पाहिजे. सर्वात पहिल्यांदा आपण वर्षानुवर्षे वापरलेली वाक्य बंद केली पाहिजेत.

1. मुलींसारखा रडतोस काय?

का? मूलग्यांना भावना नसतात का? त्या भावनांचा उद्रेक होऊ शकत नाही का? मग त्याने ते मनात का साठवून ठेवावं? किती मोठा अन्याय आहे हा पुरुषांवर; आणि गेली शेकडो वर्ष आपण तो करतो आहोत. मला तर वाटतं ज्या दिवसापासून पुरुष मोकळेपणी आपल्या भावना व्यक्त करायला लागतील त्या दिवसापासून स्त्रियांचं आयुष्य जास्त सुखी होईल. कारण आई असो, पत्नी असो किंवा मुलगी... प्रत्येक स्त्रीचं म्हणणं असतं घरातल्या पुरुषाने थोडं मोकळेपणी बोललं तर सगळंच सोपं होईल. नाही का?

2. बांगड्या भरल्या आहेस का?

का? बांगड्या भरल्या आहेस का... म्हणताना तुम्ही बांगडया भरलेले हात... म्हणजेच स्त्री... चं कर्तुत्व एका दृष्टीने अमान्य नाही का करत आहात?

3. मुलींसारखा भावलीशी काय खेळतोस? मुलगा आहेस का क्रिकेट खेळायला?

किती हा चुकीचा लिंगभेद अगदी लहानपणापासून आपण मुलांच्या मनात निर्माण करतो!

मला तर वाटतं; मुख्य म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा - वयाची बांधिलकी न मानता - मोकळा संवाद असावा एकमेकांशी. त्यातूनच सर्वांनाच समान वागणूक मिळू शकते.

कधीतरी ती हॉलमध्ये सोफ्यावर बसली आहे आणि ऑफिसमधून आलेल्या नवऱ्याने स्वतःबरोबर तिच्यासाठी चहा करणं हे कौतुक... पण ती एखाद्या वेगळ्या कामात असताना तिचं रोजच्या सवयीचं एखादं काम त्याने स्वतःहून समजुतीने पूर्ण करणं ही समानता! असं आपलं मला वाटतं.

म्हणजे तिला दार उघडून देण्यापेक्षा - तिच्यासाठी खुर्ची ओढून देण्यापेक्षा तिच्याशी बोलताना तिच्या नजरेला नजर देऊन आदरपूर्वक तिच्याशी बोलून तिने केलेल्या कामाबद्दल किंवा तिच्या हुशारीबद्दल प्रामाणिक मत देणं; तिच्या रोजच्या सवयीच्या कामांमध्ये देखील स्वतःहून मदत करणं... याला मी 'स्त्रीदाक्षिण्य - आदर - आणि समानता' मानते.

1 comment:

  1. खूप छान मांडले आहेत विचार.
    फक्त एकच वाक्य खटकलं - मोठ्यांचा आदर राखूनही
    घरातील संवाद मोकळा होऊ शकतो. वयाचा आदर राखायला शिकविणे हा सुद्धा सुंदर संस्कार आहे. आणि तो ही स्त्री पुरुष दोघांचाही.
    स्नेहा पंडित.

    ReplyDelete