Friday, August 13, 2021

सुखी महिलेचा कुर्ता

 सुखी महिलेचा कुर्ता


कदाचित आपण सगळ्यांनी लहानपणी एक कथा ऐकली असेल... सुखी माणसाचा सदरा! एकदा एक गरीब, दुःखी, कष्टी माणूस देवाची मनापासून प्रार्थना करतो. देव प्रसन्न होतो आणि म्हणतो 'बोल तुला काय हवं आहे?' त्यावेळी तो गरीब, दुःखी-कष्टी माणूस म्हणतो की 'देवा मला सुखी माणूस कर.' देव हसतो आणि विचारतो; सुखी माणूस म्हणजे नक्की कोण रे बाबा? त्यावर तो माणूस म्हणतो; सुख माणूस म्हणजे ज्याने आयुष्यात कधीच दुःख अनुभवलेलं नाही.' देव हसतो आणि म्हणतो 'तुला माहीत आहे का असा कोणी माणूस?' तो गरीब माणूस म्हणतो 'हो देवा! आमच्या गावातला सावकार सुखी माणूस आहे. वाणी सुखी माणूस आहे.... आणि असेच बरेच आहेत.' देव त्याला म्हणतो; 'ठीक! मी तुला सुखी माणूस करतो; पण अगोदर तू तुला माहीत असलेल्या सुखी माणसाचा सदरा मला आणून दे.' गरीब माणूस म्हणतो; 'त्यात काय अवघड आहे. आत्ता आणून देतो.' आणि तिथून निघून तडक सावकाराकडे जातो. सावकार नुकताच त्याच्या पेढीवर येऊन बसलेला असतो. गरीब माणूस त्याच्याकडे जातो आणि म्हणतो; 'सावकार महाराज मला तुमचा एक सदरा द्याल का?' सावकार कारण विचारतो; तर गरीब माणूस म्हणतो; 'मला देव प्रसन्न झाला आहे. तो मला सुखी माणूस करणार आहे. पण त्यासाठी मी त्याला अगोदर एका सुखी माणसाचा सदरा आणून द्यायचा आहे. तुम्ही सुखी माणूस आहात. तर तुम्ही मला तुमचा सदरा द्या. म्हणजे मी देखील सुखी माणूस होईन.' त्याचं बोलणं ऐकून सावकार हसतो आणि म्हणतो; 'अरे मी कसला सुखी माणूस? मला रोज एकच विचार असतो की मी ज्यांना पैसे कर्जाऊ दिले आहेत; ते लोक मला माझे पैसे देतील ना परत. या विचारामुळे मला जेवण जात नाही.' त्याचं बोलणं ऐकून गरीब माणूस तिथून निघतो आणि वाण्याकडे जातो. वाण्याकडे सदरा मागतो आणि त्याचं कारण सांगतो. त्यावर वाणी म्हणतो; 'मी कुठला रे सुखी माणूस? मी इतका मोठा व्यवसाय करतो आहे; पण माझा मुलगा काही हा व्यवसाय पुढे न्यायला तयार नाही. इतकी मेहेनत करून उभा केलेला व्यवसाय माझ्यानंतर काय होणार याच? या चिंतेने मी रात्र रात्र झोपत नाही.' त्यानंतर गरीब माणूस गावातल्या मंदिरातील महंताकडे जातो आणि त्यांना म्हणतो, 'मला तुमचा सदरा हवा आहे... तुम्ही तर ब्रम्हचारी आहात. सर्वसंग परित्याग केलेला आहे. तुमच्या गरजांची पूर्तता मंदिरात येणाऱ्या दानातून होते. याचा अर्थ तुमच्या इतका सुखी कोणी नाही.' यावर महंत म्हणतो; 'अरे मला मुलबाळ नाही. माझ्या मृत्यू नंतर मला अग्नी कोण देईल या विचाराने मी सतत ग्रासलेला असतो. मी कसला सुखी माणूस?'

तर सांगण्याचा मुद्दा हा की जगात कोणीही छातीठोकपणे म्हणू शकत नाही की मी सुखी आहे.... आणि तरीही...

माझी एक मैत्रीण आहे! अत्यंत यशस्वी व्यावसायिक. वरळीला राहाते. स्वतःच्या पैशांनी कमावलेल्या फ्लॅटवर. दिसायला अत्यंत सुंदर... साधारण पांचेचाळिशीची नक्की; पण तरीही एकदम क्युट दिसते. हुशार मुलगी! कधी ट्रेक-कॅम्प्सना जाते तर कधी मस्त वेगवेगळे dance forms शिकते. म्हणजे अशी मैत्रीण की जिचं आयुष्य मला देखील मिळावं असं प्रत्येक स्त्रीला वाटेल. तिला देखील याची कल्पना आहे.

हे तिच्याबद्दल जितकं खरं आहे न... तितकंच तिचा एक सर्वसामान्य पण खूप हुशार मुलगी ते यशस्वी व्यावसायिक हा प्रवास समजून घेणं आवश्यक आहे. खूप हुशार मुलगी; तिचं लग्न देखील अशाच हुशार मुलाशी झालं. दोघे परदेशात गेले कारण त्याची नोकरी तिथे होती. तो देश-विदेशात फिरत होता... ती परदेशातल्या त्यांच्या घरी होती. त्या देशात आपली विचारधारा निर्माण करण्याची तिच्या नवऱ्याची इच्छा होती. त्यासाठी देखील ती त्याच्यासोबत उभी राहिली. तिला दिवस राहिले; पण तो तिच्या सोबत नव्हता. ती म्हणाली तू तुझं करियर करतो आहेस न; मग मी सांभाळून घेते सगळं. तिने गोंडस लेकीला जन्म दिला. पण तिच्या लेकीला काही वैद्यकीय अडचणी होत्या. आता मात्र तिची इच्छा होती की नवऱ्याने तिच्या सोबत उभं राहावं. कारण लेक तर दोघांची आहे. पण तरीही तो नव्हताच. परदेशात राहून तिला घर, नोकरी आणि लेकीला सांभाळणं अवघड झालं आणि ती नवऱ्याला म्हणाली; मी भारतात जाते आणि लेकीला सांभाळत नोकरी करते. तू इथे राहून तुझा करियर ग्राफ उंचाव. मात्र तोपर्यंत जवाबदारी न घेण्याची सवय झालेल्या नवऱ्याने स्वतःचे पैसे कमवून संपवायला सुरवात केली. हळूहळू चुकीची सवय वाढत गेली. कधीतरी तिने कमावलेले पैसे देखील त्याने वापरायला सुरवात केली.

.............आणि इथे तिच्या डोक्यात अलार्म वाजला. हे कुठेतरी चुकतं आहे हे तिला जाणवलं. तिने नवऱ्याशी बोलायचा प्रयत्न केला. कारण अजूनही नवरा चुकला तर विषय संपवून टाकून पुढे जावं... ही मानसिकता नाही भारतीय स्त्रीच्या मनाची. मात्र तो काहीच बोलायला तयार नव्हता; किंवा समजून घ्यायला तयार नव्हता. तिच्या मनातून ते नातं तुटायला लागलं; आणि मग एक महत्वाचा विचार तिच्या मनात आला... हे असं ओढून-ताणून भांडत नातं टिकवायचं आणि त्याचे मनावर होणारे परिणाम लेकीला सहन करायला लावायचे; हे योग्य नाही. तिने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि.... तो तिचा एकटीचा निर्णय ठरला. त्यावेळी तिचे आई-वडील देखील तिच्या सोबत उभे राहिले नाहीत. मात्र स्वतःची हुशारी आणि मनाची खांबीरता या दोन पुंजींवर ती विभक्त झाली. त्याच काळात ती ज्या देशात राहात होती त्या देशाच्या भाषेचा उत्तम अभ्यास केला आणि मग कुठे गाईड म्हणून तर कधी ट्रान्सलेटर म्हणून काम करत तिने हळूहळू तिचं बस्तान बसवायला सुरवात केली. एककीकडे तिने खऱ्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या डिझायनिगचा कोर्स केला; आणि मग त्यात देखील हळूहळू प्रयत्नपूर्वक स्वतःला उभं केलं. खरं सांगू? हे एक वाक्य मला लिहायला जितकं सोपं आणि तुम्हाला वाचायला जितकं सोपं आहे; तितकंच तिला जगायला अवघड होतं. पण ती मला कायमच गोडसं हसताना दिसली आहे. तिची मैत्रीण असूनही मला अगदी काल-परवा पर्यंत तिच्या आयुष्यातल्या उतार-चढावांची कल्पना नव्हती. होय! अगोदर आलेले उतार आणि त्यांच्यावर मात करत तिने स्वतः निर्माण करून चढलेले चढाव! त्यामुळे तिचं खरंच कौतुक आहे.

या आयुष्य जगण्याच्या तिच्या जिद्दीचं जितकं कौतुक करू तितकं कमीच. पण खरी गंम्मत तर ही आहे; की इतकं सगळं होऊनही ती हसतेच आहे. मी अगदी परवाच तिच्याशी गप्पा मारत होते आणि मी तिला त्या गरीब माणसाची गोष्ट सांगितली; त्यावर मात्र ती हसत म्हणाली; 'ज्योती कोणाला जर सुखी महिलेचा कुर्ता हवा असला न; तर माझा घेऊन जा ग बाई.' आम्ही दोघी खळखळून हसलो यावर.

घरी गेल्यावर मी तिच्या त्या वाक्याचा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं; की देवाकडे सुखी होण्याचं वरदान मागणारा तो गरीब माणूस काय किंवा तो सावकार, वाणी, महंत कोणीही.... प्रत्येकाला त्याच्या आजच्या दिवसाच्या आनंदात जगता आलेलं नाही आहे. मात्र माझ्या मैत्रिणीने आजच्या दिवासाचा संपूर्ण आनंद उपभोगण शिकून घेतलं आहे. तिला तिच्या भविष्याच्या काळजीने सतत दुःखी राहायचं नाही आहे. कारण तिला हे कळलं आहे की दुःख हा आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे ती भविष्याची काळजी करत बसायला तयार नाही. भविष्याची योग्य सोय करून ती तिच्या वर्तमानात जगते आहे. म्हणूनच तिचा कुर्ता सुखी स्त्रीचा कुर्ता आहे.

तिच्याकडून मी घेतलेला हा मंत्र.... तुमच्या सोबत शेअर करते आहे.

***

No comments:

Post a Comment