एक red wine नातं (भाग 3)
ती आणि सुजाता बऱ्याच जुन्या मैत्रिणी. खरं तर दोघींचे नवरे मित्र. पण पुढे नोकरी-व्यवसाय यामुळे त्यादोघांची मैत्री कमी होत गेली. सुजा आणि ती साधारण एकाचवेळी लग्न करून आलेल्या. त्यामुळे त्या दोघींची मैत्री अगदी सहज झाली; आणि फुलत गेली. सुजाची लेक आणि तिचा मुलगा एक वर्षाच्या अंतराचे. त्यामुळे शाळेत एकत्र जाणं आणि म्हणून तिचं आणि सुजाताचं सतत भेटणं होतंच होतं. घर नवीन असलं तरी जुन्या घराजवळच असल्याने दोघींच्या मैत्रीत फरक पडला नव्हता. एकत्र मार्केटिंग, संध्याकाळच्या गप्पा आणि तशी सांसारिक सुखं-दुःखं सारखीच असल्याने दोघींचं मस्त जमत होतं.
त्यादिवशी दोघी साधारण अकराच्या सुमाराला भाजी घ्यायला निघाल्या. भाजी घेऊन तसंच शाळेत जायचं मुलांना घ्यायचं आणि घरी परत. असा अनेकदा असलेला कार्यक्रम आज देखील होता. नेहेमीच्या गप्पा मारत दोघींनी सामान घेतलं आणि शाळेच्या दिशेने निघाल्या. तशाच हातातलं वजन सांभाळत... गप्पा मारत... चालत....
इतक्यात तिला मेसेज आल्याचा आवाज आला. हातातली भाजीची पिशवी खाली ठेवत तिने पर्समधून फोन काढला आणि मेसेज उघडला. एक फोटो होता; आकाशाचा!
एका क्षणासाठी तिला सर्वस्वाचा विसर पडला. ती त्या फोटोमध्ये अडकून गेली जणूकाही. सुजाता आपल्याच नादात बोलत-बोलत चार पावलं पुढे देखील गेली होती. सुजाताच्या एकदम लक्षात आलं आपली मैत्रीण मागेच थांबली आहे. म्हणून तिच्याकडे वळत सुजाताने विचारलं;"काय ग? काय झालं? अशी एकदम थांबलीस का?"
ती भानावर आली आणि हसत म्हणाली;"कुठे काय ग. मेसेज आला तो बघत होते. तसं काही महत्वाचं नाही. चल, निघू. शाळा सुटेलच." असं म्हणून ती पिशवी उचलायला वाकली; पण परत मोबाईल उघडत तिने त्या फोटोखाली लिहिलं... द्रौपदीचा पदर! आणि ती निघाली.
दोघी शाळेपाशी पोहोचल्या; मुलांना घेतलं आणि घरी गेल्या. घरात आल्या आल्या लेकाने फर्माईश केली;"आई, मला काहीतरी मस्त खायचं आहे; भाजी पोळी नको. ते बाबांबरोबर रात्री खाऊया. काहीतरी मस्त कर न." ती हसत 'बरं' म्हणाली आणि स्वयंपाकघराकडे वळली. लेक कपडे बदलून येईपर्यंत तिने ब्रेड पिझ्झा केला दोघांसाठी; नवीनच पिझ्झा topings आणले होते ते वापरून. टेबलावर प्लेटमध्ये पिझ्झा बघून लेक एकदम खुश झाला. दोघांनी गप्पा मारत ते home made pizza खाल्ले आणि तो अभ्यासाला बसला. स्वयंपाकघर आणि आणलेल्या भाज्या वगैरे आवरून ती हुश्श करत सोफ्यावर येऊन बसली तेव्हा साधारण दोन वाजून गेले होते. तिने हात लांब करून पर्स जवळ ओढली आणि आतून मोबाईल काढला.
पुढचा मेसेज आला होता....
फोटो 11.35
तिचं उत्तर 11.37
त्याचा मेसेज 11.37 'आकाश कसं द्रौपदीच्या साडीसारखं वाटतंय न?'
आणि मग अजून एक मेसेज होता... काही मिनिटांनंतरचा...
'कुठे हरवलीस?' 11.55
तिने लिहिलं.... 'संसारात...' आणि हसत फोन बंद करून ती बेडरूममध्ये गेली. दमली होती; म्हणून पलंगावर लवंडली खरी पण डोळे मिटवेसेच वाटेना. तिच्या डोळ्यांसमोर द्रौपदी उभी राहिली. परत एकदम मोबाईल हातात घेत तिने notes app उघडलं. रोजचा खर्च, घरी लागणाऱ्या वस्तूंची नोंद, घरी कामाला येणाऱ्या वासंतीला पगाराव्यतिरिक्त दिलेल्या पैशांची नोंद असं बरंच काही होतं तिच्या notes मध्ये. ते सगळं वर सरकवत (scroll) करत तिने शेवटची note उघडली. ती note त्याची आणि तिची होती. मनातलं सगळं तिथे लिहायचं आणि मग copy-pest करायचं त्याला... तिची नेहेमीची सवय झाली होती ती. असं कितीतरी छान छान लिहिलेलं होतं त्या एकट्या note मध्ये. तिचे ओठ हलकेच विलागले ती note उघडल्यावर आणि ती तिच्या तंद्रीत काहीतरी लिहायला लागली. कितीतरी वेळ चालू होता तिचा तो उद्योग. पण मग समाधान झालं तिचं आणि copy-pest करून तिने एकदा घड्याळाकडे नजर टाकली आणि आडवी झाली. लेकाचा क्लास होता. तो निघण्या अगोदर दूध द्यायचं होतं त्याला. पण तरी किमान पंधरा मिनिटं डोळे मिटून पडणं शक्य होतं.
*********
अलार्मच्या आवाजाने तो उठला. तसे दोन अलार्म असतात त्याचे. एक साडेपाच आणि दुसरा पावणेसहा! सहसा तो दुसऱ्या अलार्मला उठायचा. पण आज त्याला दिवसाची ती पहिली पंधरा मिनिटं हवी होती... फक्त स्वतःसाठीची. कारण त्याला माहीत होतं; एक मेसेज नक्की असणार आलेला.... फक्त त्याच्यासाठी.
साता समुद्रापलीकडंचा त्याचा लाडका भारत; त्याची मुंबई मेरी जान आणि मुंबईमध्ये राहणारी त्याची सखी! कालच्या संध्याकाळची द्रौपदी इतक्यात विरणार नव्हती परत ढगात. त्याच्या मनाने दिलेली खात्री अगदी खरी होती. तसाच खास मेसेज होता आलेला त्याच्यासाठी!
ती कोणालाही कळली नाही!
तिचा अग्नी जन्म;
तिचं सोनतेजस्वी रुपडं;
तिचं हसणं, रडणं....
तिचं सर्वस्वानं असणं...
सगळं कसं मोजलं गेलं!
तिच्या रूपाचा मोह पाचांना...
मातेने वाटलं सर्वांना...
पतिचं दान चुकलं...
तिने राजसभेत लाज देऊन भोगलं...
पतींसोबत वनवास...
किचक वधने संपलेला अज्ञातवास...
तिच्या मोकळ्या केसांना वाहिलेलं;
दु:शासन रक्त....
दुर्योधन वधने संपलं...
महाभारताचं युद्ध!
सर्वांत ती होती;
तिच्यात कोणीही नव्हतं...
तिच्यातल्या कन्येला, पत्नीला...
तिच्या आसुसलेल्या हृदयातल्या मातेला...
कधी कोणी नाही विचारलं!
ती शलाका झाली;
ती स्फूर्ती देवता गणली;
मात्र तिच्यातली स्त्री...
फक्त तिच्या सख्याला कळली!!!
त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
******
ती झोपण्यासाठी आडवी पडली आणि मेसेज आल्याचा आवाज आला म्हणून तिने फोन हातात घेऊन बघितलं....
माझी सखी!!!
तिने ओलावलेल्या पापण्या हलकेच टिपल्या आणि डोळे मिटले.
****
ढगाळलेलं वातावरण होतं. दुपारी भलताच कोसळून गेला होता पाऊस. त्यामुळे सगळा निसर्ग कसा ओला हिरवा झाला होता. पौर्णिमा होती; पण ना चंद्र दिसणं शक्य होतं ना ताऱ्यांचं लुकलुकण जाणवणार होतं. पण तरीही रात्रीमध्ये एक गोड गार हळवी धून होती. घरातली जेवणं आटपली होती. स्वयंपाकघरातली सगळी आवरा-आवर करून ती लेकाच्या खोलीत गेली. हातात मोबाईल तसाच होता आणि त्याला झोप लागली होती. मोबाईल बाजूला ठेवत तिने त्याच्या अंगावरचं पांघरूण नीट केलं आणि ती परत बाहेर हॉलमध्ये आली. तिने बेडरूममध्ये डोकावून बघितलं. नवरा लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तिने हाक मारली त्याला...
"ए!"
"हम्म!?"
"येतोस गॅलरीमध्ये बसायला? हवा बघ किती मस्त आहे." एक मधाळ प्रश्न आला त्याच्या दिशेने. त्याने नजर वर उचलली तर ती खोलीच्या दाराशी अवगंठुन उभी होती. रोजचाच गाऊन होता तिच्या अंगावर... पण का कोण जाणे एकदम पांघळला तो आणि लॅपटॉप बंद करत तिच्या सोबत येऊन बसला गॅलरीमध्ये. तिने तिची लाडकी play list सुरू केली...
खाली हाथ शाम आई हें...
कहां से आए बदरा... घुलता जाए कजरा...
गाताना गळा भरून येऊन दीप्ती नवलचा हुंदका दाटला आणि तिने पापण्या उचलून नवऱ्याकडे बघितलं. त्याने डोळे मिटून घेतले होते; डोळा लागला होता त्याचा. तिने हलकेच मान हलवली आणि त्याच्या दमल्या कपाळावर एक प्रेमळ स्पर्श केला. पण गाण्याच्या पुढच्या तानेने तिला आपल्याकडे ओढून घेतलं आणि बुडून गेली ती परत तिच्या गाण्यात... नवऱ्याचं सोबत असणं किंवा नसणं; त्याच्यापलीकडे गेली होती ती.
झोपताना तिच्या मनात आलं.... आत्ता तर सखा देखील नकोय मला!!! स्वतःच्याच धुंद प्रेमात तिने डोळे मिटले.
****
'कुठे असतेस ग सारखी? आज ऑफिसमधून लवकर निघालो होतो. म्हणजे तुला फोन करून तुझ्याशी बोलायचं म्हणून. काल मेलमध्ये कळवलं देखील होत न? इथे साधारण साडेचार झाले होते; म्हणजे तुझ्याकडे सकाळचे दहा. आपली वेळ जमून येईल असं वाटलं म्हणून तुला फोन लावला होता दोन वेळा. पण तू माझा फोन उचलला देखील नाहीस.' तिने दुपारच्या जेवणानंतर फोन हातात घेतला तर दोन missed कॉल्स आणि एक नाराजी असलेल्या ईमोजी सोबत मेसेज तिची वाट बघत होता.
तिने मेल बघितला होता; पण त्यावेळी ती विसरली होती की लेकाच्या शाळेत parents meeting होती. सकाळी शाळेत जाताना लेकाने आठवण केली होती. त्यामुळे पटापट सगळं आवरून ती धावत-पळत शाळेत पोहोचली होती. या सगळ्या गडबडीत ती तिचा मोबाईल घरीच विसरली होती. त्यामुळे लक्षात असूनही ती त्याला कळवू शकली नव्हती की फोनवर बोलणं शक्य नाही. त्याला राग आला असावा हे तिच्या लक्षात आलं. पण तरीही इतकं सगळं explanation द्यावं असं तिला वाटलं नाही. त्यामुळे तिने क्षणभर विचार करून मेसेज लिहिला...
'तुझा फोन मी कसा उचलणार? तो खूप दूर आहे रे. मी तिथे पोहोचणार; तुझा फोन शोधणार आणि मग उचलणार... अतिच होईल न सगळं?' आणि मग दोन हसणारे इमोजी टाकून तिने फोन बंद केला.
नेहेमीप्रमाणे त्याचं देखील काहीतरी मिश्किल उत्तर येईल उद्यापर्यंत असं तिला वाटलं होतं.
तिच्याकडे दोन म्हणजे तो नक्की रात्रीच्या जेवणाच्या गडबडीत असणार याची तिला कल्पना होती. तो एकदा त्याच्या घरी पोहोचला की त्याचा रिप्लाय असेलच असं नसायचं. तिला अंदाज होता की त्याच्या बायकोशी तिची मैत्री झाली नाही त्याचं कारण त्याच्या बायकोला ती आवडत नसावी... सहसा नवऱ्याची मैत्रीण... अहं नवऱ्याची 'खास मैत्रीण' बायकोला आवडतच नसते. त्यात हिचं खास असणं या सरळ मनाच्या बुद्दुबुवांनी बायकोला जाणवून दिलंच असणार. उगाच आपल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद नकोत म्हणून ती त्याला एका ठराविक वेळेनंतर फार मेसेज करत नसे. एखादा केलाच तर साधासा फॉरवर्ड किंवा सोपंसं उत्तर असायचं त्याच्या प्रश्नाचं.
ती दुसरं काहीतरी करायला वळली आणि परत मेसेज आलेला तिला ऐकायला आला. तिला काहीसं आश्चर्य वाटलं आणि फोन उचलून तिने मेसेज बघितला.
'अगदी नेहेमीच चेष्टा का ग? खरंच miss करत होतो तुला... आज बोलायचं होतं मला. गेले दोन दिवस तसं ठरवून त्याप्रमाणे मी माझं काम सेट केलं होतं. तू न..... जाऊ दे बुवा!' नाराजी होती त्याच्या मेसेजमध्ये. तिला ती स्पष्ट जाणवली. पण तिने काही उत्तर नाही लिहिलं. तिला कल्पना होती; ही वेळ नाही chat करायची. बहुतेक नाराजीमुळे तो उत्तरं देत राहील. पण मीच मेसेज केला नाही तर तो थांबेल. तिने एक हलकासा सुस्कारा सोडला आणि फोन बंद करून ती तिच्या कामाला लागली.
****
तो ऑफिसला जायला निघाला होता. कालच्या त्याच्या मेसेजवर तिचं उत्तर नव्हतं. त्यामुळे लहान मुलांसारखा त्याचा फुगा झाला होता थोडा.
त्याला सकाळी साडेसातला घर सोडावं लागायचं. गाडीने मेट्रो स्टेशनला तिथून मेट्रोने ऑफिसपर्यंत प्रवास. खरंतर हा प्रवास कंटाळवाणा होता; पण त्याला तो खूप आवडायचा. कारण मेट्रोने जाताना एका बाजूला एकाच साच्यातून काढल्यासारखी पण सुंदर घरांची रांग लागायची. बाहेर व्यवस्थित राखलेली हिरवळ आणि प्रत्येक घराच्या पहिल्या माजल्याला जोडून असलेल्या प्रशस्त गच्चीत बसून निवांत कॉफी पिणारे न्यूझीलंडवासी दिसायचे. ते बघताना त्याला त्यादोघांचं असंच काहीसं असलेलं स्वप्न आठवायचं; एकमेकांना न सांगता देखील माहीत असलेलं. तर दुसऱ्या बाजूला मोकळं माळरान होतं; जिथे हातात हात घालून धावणार होते ते दोघे... धावायचं म्हणून नाही तर सोबत करायची एकमेकांना म्हणून. या स्वप्नांमुळेच या प्रवासात तो नेहेमी तिला आठवायचा आणि तिच्या सोबत घालवलेले क्षण आणि पुढे घालवायचे क्षण यांची परत एकदा स्वप्न बघायचा.
त्याने गाडी लॉक केली आणि मेट्रोच्या दिशेने निघाला.
'इतक्या सकाळी मेसेज? काही विसरलो की काय आज? बायकोचा मेसेज नक्की!' फोन वाजताच त्याच्या मनात आलं.
मेसेज होता;
'किती आवडते मी?'
त्याने परत एकदा मनगटातल्या घड्याळाकडे बघितलं. 'सव्वाआठ! म्हणजे तिच्याकडे रात्रीचे 1.45. ती जागी?'
पण तेवढ्यात मेट्रो येताना दिसली आणि तो धावला. तो उत्तर देणार होता... पण आपला फुगा झाला आहे; हे त्याच्या लक्षात होतं. त्यामुळे उत्तर द्यायला तो वेळ घेणार होता.
तो मेट्रोमध्ये चढला आणि अजून एक मेसेज आला. तीन प्रश्नचिन्ह. ते बघून देखील त्याने काही न लिहिता बाहेर बघायला सुरवात केली. अजूनही त्याचे गाल फुगलेले होते.
****
ती ठरवून जागत होती त्याची समजून काढायची म्हणून. हातात गोष्टीचं पुस्तक घेऊन सोफ्यावर वेळ काढत बसली होती. तो निघाला असेल याचा अंदाज घेत तिने मेसेज केला होता. त्याने तो बघितला... पण उत्तर नाही. म्हणून तिने परत एकदा तीन प्रश्नचिन्ह पाठवली. त्याने ते बघितलं होतं; पण उत्तर नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर फुगलेले गाल आले आणि ती हसत-हसत झोपायला गेली.
नेहेमीप्रमाणे सकाळची कामं आटोपून तिने तिची हक्काची अकरा वाजताची निवांत कॉफी करून घेतली आणि सोफ्यावर बसत फोन उघडला.
एक शब्द आणि एक चित्र; ते चित्र बघून तिच्या अंगावरून मोरपीस फिरलं.
इतकी
तिने लेकाच्या खोलीत जाऊन त्याची एक जुनी वही आणली आणि मग दिवसभर येता-जाता ती काहीतरी करत होती त्या वहीत. रात्री अकराला झोपायला जाताना तिने घरातल्या प्रिंटरचा एक कागद घेतला आणि दिवसभराची मेहेनत त्यावर काढली; त्याचा फोटो काढला आणि पाठवून दिला.
सकाळचं मोरपीस आज गुलाबी होऊन तिच्या स्वप्नात येणार होतं हे तिला माहीत होतं.
क्रमशः
सुरेखच
ReplyDelete