Friday, June 4, 2021

एक red wine नातं (भाग 2)

 एक red wine नातं!  

(भाग 2)


दिवस असेच जात होते. तिचा लेक मोठा होत होता. नुकतंच त्यांनी नवीन घर घेतलं होतं. नवीन मोठ्या घराचे मोठे EMI सुरू झाले होते. खरं तर तिला तेच जुनं घर आवडायचं. स्त्रीचं कसं असतं नं की लग्नानंतर सासरी आलं की जरी सासरच्यांनी तिला लगेच स्वीकारलं नाही तरी ती मात्र सासरच्यांना सर्वस्वाने स्वीकारते. कदाचित म्हणूनच ती जमेल त्या मार्गाने त्यांना आपलंसं करायचा प्रयत्न करत असते... मग कधी स्वयंपाकातले वेगवेगळे पदार्थ असतील; किंवा मग घरातल्या वस्तू इथे तिथे बदलत काहीतरी नाविन्य निर्मिती असेल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये घरातल्या व्यक्तींचं तिला स्वीकारणं कितपत घडतं हे सांगता येत नाही; मात्र घरातल्या वस्तू आणि घर ही वास्तू तिची आपलीशी होते. तिच्याही नकळत तिचं यासगळ्यावर प्रेम बसतं.

तिचं देखील तसंच काहीसं झालं होतं. जेव्हा नवीन लग्न करून ती आली तेव्हा तशी ती वयाने बरीच लहान होती. तिला बालिकावधू म्हणून सगळे चिडवायचे... इतकी लहान होती ती. पण म्हणूनच कदाचित तिने राहात्या घरावर प्रेम करायला सुरवात केली होती; तिचा तिच्या त्या पहिल्या घरावर खूप जीव जडला होता. त्यामुळे नवऱ्याने हे मोठं घर घेतलं आणि ती देखील जरी नवीन घरात राहायला आली तरी तिने ज्या घरात गृहप्रवेश केला होता ते घर तिच्या मनाच्या कोपऱ्यात तसंच जिवंत होतं.

नवीन घर, नवीन परिसर, नवीन ओळखी.... ती हळूहळू सवय करून घेत होती यासगळ्याची. घर तसं मोठं होतं. तीन बेडरूम्स, मोठा दिवाणखाना आणि त्याला शोभेल असं स्वयंपाकघर. तिने आणि नवऱ्याने घर सजवलं देखील होतं छान. दिवस तसे चांगलेच जात होते. पण तिच्याही नकळत तिच्या आणि नवऱ्याच्यामध्ये काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या. सुरवात कधी आणि कशी झाली होती तिचं तिला आठवत नव्हतं. पण काहीसा दुरावा आला होता मनातून. काय बनसतं आहे तिचं तिला कळत नव्हतं; आणि नवरा देखील याबद्दल फार विचार करत असावा असं वाटत नव्हतं. अलीकडे लेकच्या अभ्यासाच्या नावाखाली ती त्याच्या सोबतच झोपायला लागली होती. नवऱ्याच्या संदर्भातल्या सगळ्या जवाबदाऱ्या ती अगदी व्यवस्थित पूर्ण करत होती. बाहेरून दिसायला सगळं कसं आलबेल होतं. पण काहीतरी बदलतं आहे हे तिला जाणवत होतं.

नवीन घर घेणं; ते सजवण आणि तिथे रुळणं यासगळ्यात गेले काही महिने तिचं त्याच्याशी फारसं बोलणं झालं नव्हतं. अर्थात होणारे सगळे नवीन बदल त्याला माहीत होते. घराचे फोटो, तिने हौसेने घेतलेले फ्लॉवरपॉटस, दिवनखान्याला लागून असलेल्या मोठ्या गॅलरीमध्ये तिने थोडी झाडं लावली होती आणि कोणती झाडं लावावीत याबद्दल त्या दोघांनी व्हाट्सऍपवर चर्चा देखील केली होती. दोघांची आवड एकच आहे हे परत एकदा दोघांनाही लक्षात आलं होतं आणि एक गोडसर smily एकमेकांना भेट मिळाला होता.... पण तरीही वेळ नसल्याने तसं नेहेमीसारखं बोलणं होत नव्हतं.

एक दिवस सकाळी ती उठली तर त्याचा मेसेज होता...

'सांग; नक्की काय झालंय?'

'तिच्या कपाळावर एक अस्वस्थ आठी आली; पण मग एक हसरा इमोजी टाकून तिने त्यालाच उलट प्रश्न टाकला... 'कोणाला काय झालंय? माझा लेक आता आठवीत आहे; आता काही होण्याचं वय गेलंय माझं. न्यूज तर तू दिली पाहिजेस न!' आणि मग स्वतःच्याच मेसेजवर खुश होत ती कामाला लागली.

तिच्या मेसेजवर त्याचं काहीच उत्तर आलं नव्हतं. पण तरीही तिचा तो दिवस छान गेला. तिने लेकाच्या आवडीचा पास्ता बनवला खास रात्री जेवताना. लेक देखील खुश होता. नवऱ्याने मात्र जेवायला बसताना एक नापसंतीचा कटाक्ष तिच्याकडे टाकला. बोलला मात्र काहीच नाही. त्याची नाखूष नजर आणि नाराजी तिच्या लक्षात आली आणि दिवसभर फिरलेलं मोराचं पीस एकदम गळून गेलं. कोरा चेहेरा करून तिने स्वयंपाकघर आवरलं आणि झोपायला गेली. लेक मोबाईलवर गेम खेळत होता; ती खोलीत येताच म्हणाला; "आई, मी आज अभ्यास करणार नाही आहे. त्यामुळे जागण्याचा प्रश्नच नाही. तू जा तुझ्या खोलीत." ती म्हणाली;"अरे जागायचं नसलं तर मी इथे झोपायचं नाही; असं आहे का?" तिच्याकडे न बघता तो म्हणाला; "हो ग. रोज काय माझ्या खोलीत? जा ना तुझ्या खोलीमध्ये. नवीन घरात देखील सतत तू असतेस भोवती. मला माझी प्रायव्हसी मिळतच नाही."

लेकाच्या बोलण्याने तिला मोठा धक्का बसला होता. पण आपण आईला दुखावलं आहे हे त्याच्या गावी देखील नव्हतं. ती काही न बोलता तिच्या खोलीत आली आणि पलंगावर आडवी झाली. नवरा पुस्तक वाचत होता त्यामुळे त्याच्याकडे पाठ करून तिने डोळे पुसले.

"वा! आज इकडे कशी पावलं वळली?" पाठून आवाज आला.

तिने दुर्लक्ष केलं आणि डोळे मिटले. काही क्षण गेले आणि तिला जाणवलं की नवऱ्याने पुस्तक बंद करून दिवा मालवला आहे. तिने नकळत अंग चोरून घेतलं. पण तरीही.... ती जे टाळत होती अलीकडे तेच झालं. नवऱ्याने तिला हलकेच जवळ घेतलं.

"अशी अलिप्त का असतेस अलीकडे? जराही जवळ येऊ देत नाहीस. आजसुद्धा माझ्यासाठी इथे आली आहेस असं नाही. पण...." त्याने तिचा चेहेरा स्वतःकडे वळवायचा प्रयत्न केला.

"असं का म्हणतोस? उगाच काहीतरी घेऊ नकोस हं मनात." त्याच्या प्रयत्नाला तिने प्रतिसाद तर दिला पण ते मनापासून नव्हतं. अर्थात तिच्यातली स्त्री जागी होती; त्यामुळे तिचं मन त्याच्यासमोर उघड नाही झालं. तो आसुसून प्रेम करत होता आणि ती नेहेमीचा सवयीचा(!?) प्रतिसाद देत होती. तो बाजूला झाला आणि ती बाथरूममध्ये जाण्यासाठी उठली. अंधारात तिचा हात हातात घेत तो म्हणाला;"माझी राणी!"

तिचे डोळे पाणावले होते. का? तिलाही माहित नव्हतं.

सकाळी उठताच तिने मोबाईल हातात घेतला. एक मेसेज तिची वाट पहात होता...

'तू बोलायची वाट बघतोय मी.'

तिचा चेहेरा कोरा होता. काही क्षण थांबली ती आणि मग उत्तर लिहून कामाला लागली.

'निरंतर.....'

नवरा ऑफिसला गेला आणि लेक शाळेत. तिने घर आवरायला घेतलं. तशी ती स्वच्छतेच्या बाबतीत फारच आग्रही असल्याने कामाला येणाऱ्या बाईने कितीही चांगलं काम केलं असलं तरीही ती स्वतः आठवड्यातून एक-दोन वेळा स्वतः संपूर्ण घर आवरायची आणि सफाई करायची. सकाळपासून तिने मोबाईलला हात लावला नव्हता. घर आवरून स्वच्छ अंघोळ करून तिने स्वतःसाठी मस्त गरम गरम कॉफी करून घेतली आणि सोफ्यावर बसत तिने मोबाईल हातात घेतला.

त्याचा मेसेज होता... म्हणजे... व्हीलचेअरवर बसलेल्या पुरुषाचं इमोजी होतं.

तिच्याही नकळत तिच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं.

'अशक्य आहेस.' तिचा मेसेज.

लगेच उत्तर आलं... 'तू शक्य आहेस का?'

'अहं! पण मग सांग बघू; दोन अशक्य मिळून काय शक्य होऊ शकतं?' तिच्या हास्याची रेघ ओठांच्या बाहेर आली होती.

'एक red wine चा ग्लास भरला जाऊ शकतो... अगदी नक्की! सध्या इथली थंडीची दुलई सोडवत नाही आहे. एक ग्लास तो बनता है आज शाम को.... हम?'

'पण माझी शाम माझ्या श्यामची मध्यरात्र असते त्याचं काय?' तिचं हास्य आता मिश्किल थट्टेत रूपांतरित झालं होतं.

'बन्सी जर धुंदावलेली असेल तर श्याम मध्यरात्रीसुद्धा मदहोश होईल.... तू फक्त wain bottle बाहेर तर काढ.'

'आज नक्की!!! आपल्या आवडीच्या जास्वंदीला तीन कळ्या आल्यात. तोच तो गर्द wain रंग. त्या तिघी आणि तो ग्लास असा फोटो असेल आज तुझ्या निरोप वहीत रात्री उशिरा.... तुला मदहोश करायला.' तिने हसत हसत मेसेज लिहिला; आणि उत्तर आलं.....

'माझी राणी.......'

तिचे डोळे हसत होते. का? तिलाही माहीत नव्हतं.

जेवण उरकून ती थोडावेळ लवंडली. जाग आली तशी उठून तिने स्वतःसाठी मस्त कॉफी करून घेतली आणि लेक येण्याच्या आत मस्त गरम नाश्ता तयार केला. दिवेलागणीच्या वेळी तिने गॅलरीमध्ये दिवाळीच्या वेळची दिव्यांची माळ लावली. पण नेहेमीप्रमाणे वर सर्वांना दिसेल अशी नाही; तर जमिनीवर सोडली तिने. त्या मिणमिणत्या मंद दिव्यांचा केशर-पिवळा उजेड झाडांच्या पानांवर पडून अजून मोहक वाटत होता. तिने तिचं योगामॅट गॅलरीमध्ये आणून पसरलं आणि सोफ्यावरची मऊ उशी भिंतीला टेकवून ती अंघोळीला गेली. कधीतरी हौसेने एक वांगी रंगाचा गाऊन तिने घेतला होता; तो शोधून तिने अंगावर चढवला. कपाटातून तिची लाडकी red wine काढून नाजूक wine ग्लास भरला आणि गॅलरीमध्ये येऊन उशीला टेकून ती बसली. आकाशाचा तुकडा दिसत होता तिला बसल्या जागेवरून. मंदसा वारा देखील जाणवत होता तिच्या केसांच्या बटांना. तीन जास्वंद हसत होती तिच्या सोबत आणि एक मस्त सेल्फी प्रवास करत होता मध्यरात्रीच्या दिशेने.

सकाळी तिच्या अपेक्षेप्रमाणे एक सेल्फी तिची वाट बघत होता.... गावठी मधाळ डोळे धुंदावलेले तिला दिसत होते. इतकं प्रसन्न हास्य होतं तिच्या चेहेऱ्यावर. तिला कळलं नव्हतं; पण नवऱ्याचं लक्ष होतं तिच्याकडे.

"अलीकडे डोळे उघडलेस की अगोदर मोबाईल घेतेस हातात. इतके कोणते महत्वाचे मेसेज असतात सकाळी-सकाळी?" त्याचा प्रश्न बोचरा होता पण तिला त्याचं काहीच नाही वाटलं.

"तुला नाही कळणार. मग उगाच कशाला पडतोस त्यात? चल आटप तुझं; मला ब्रश करून स्वयंपाकघरात जायचंय. आज टिफिनमध्ये काहीतरी खास आहे. ते तयार व्हायला वेळ लागला तर तुलाच उशीर होईल आणि मग सकाळीच आपला वाद होईल. तेव्हा मला कोणाचे आणि कोणते मेसेज येतात याचा विचार करण्यापेक्षा तुझं लवकर कसं उरकेल ते बघ." तिने शांतपणे त्याला उत्तर दिलं आणि लेकाला उठवायला गेली.

नवऱ्याच्या कपाळावर एक आठी उमटली. पण त्याला खरंच वेळ नव्हता; त्यामुळे मनातले विचार बाजूला ठेवत तो बाथरूममध्ये गेला.

'काय करते आहेस सोन्या?' एक मेसेज.

'अरे नुकतंच जेवण आटपलं माझं. का रे?' तिचं उत्तर.

तिच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल एक फोटो आला. मावळतीच्या सूर्याला red wine च्या ग्लासमध्ये विरघळताना बघितलं तिने.

'माझ्या श्यामची शाम रंगीन का?' तिने हसत विचारलं.

'वो शाम कूच अजीब थी.... ये शाम भी अजीब हें....' पुढचं उत्तर!

'मै कल भी पास पास थी मै आज भी करीब हु...' तिने टाईप केलं आणि मोबाईल बाजूला ठेवला.

याहून जास्त काही तिला अपेक्षित नव्हतं आणि तो बोलणार नव्हता.... दोघांनाही एकमेकांचं मन माहीत होतं.

त्यादिवशी नवरा थोडा लवकर आला. तिला आश्चर्यच वाटलं. कारण अलीकडे त्याचं उशिरा येणं तिच्या सवयीचं झालं होतं. यायचं... जेवायचं... थोडे फोन्स... थोडं वाचन आणि मग झोप. अगदी रोज! तेच ते ठरलेलं. त्यामुळे त्याचं लवकर येणं थोडं अनपेक्षितच!

नवऱ्याने लेकाला हाक मारली आणि म्हणाला;"बाहेर जायचं का जेवायला?"

लेक नाचायलाच लागला. "बाबा, इथे एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालंय. इटालियन मस्त मिळतं. तिथे जाऊ या का? माझी मैत्रीण गेल्या शनिवरीच गेली होती तिच्या आई-बाबांबरोबर. खूप मस्त मिळतं सगळं म्हणाली."

'इटालियन रेस्टॉरंट' ऐकताच नवऱ्याचा चेहेरा बदललेला तिला कळला होता. तिला आतल्याआत हसू फुटत होतं पण ती काहीच म्हणाली नाही. एकूण चर्चेत ती त्या गावची नसल्याप्रमाणे बसून ऐकत होती.

लेकाचा फुललेला चेहेरा बघून नवऱ्याने त्याच्या म्हणण्याला होकार दिला आणि तिच्याकडे वळून म्हणाला;"अलीकडे आपलं एकत्र बाहेर जाणं होतच नाही न. म्हणून आज मुद्दाम ठरवून लवकर निघालो ऑफिसमधून. चल' लवकर तयार हो. त्याला हवं त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ या."

ती नवऱ्याकडे बघून हसली आणि तयारी करण्यासाठी बेडरूममध्ये गेली.

नवरा देखील कपडे बदलायला आला आत.

"कोणता ड्रेस घालते आहेस?" त्याचा प्रश्न.

तिला मोठा धक्का बसला. "हे तू विचारतो आहेस? बरा आहेस न?" तिने आश्चर्याने डोळे मोठे करत त्याला विचारलं.

"असं का विचारते आहेस? नवरा आहे मी तुझा. इतकं देखील विचारू शकत नाही?" तो म्हणाला.

"नवरा आहेस म्हणून नाही... पण विचारू शकतोस. बरं, विचारतो आहेस तर तूच सांग न. काय घालू?"

"तो ड्रेस घालशील? तो ग, वनपीस का काय म्हणतात तो. मागे एकदा तू तुझ्या मैत्रिणीबरोबर गेली होतीस तेव्हा आणला होतास न; तो!"

तिला दुसरा धक्का बसला होता. पण काही एक न बोलता तिने तो ड्रेस कपाटातून काढला आणि घातला. हलकासा मेकअप आणि नाजूक कानातले घालून ती खोलीतून बाहेर आली. नवरा समोर सोफ्यावर बसला होता आणि लेक तर बूट घालून तयार होता.

"आई. बाप दिसते आहेस."

"काय ही भाषा रे? आई बापासारखी दिसते आहे का?" नवऱ्याचा प्रश्न. लेकाने एक संथ निर्विकार कटाक्ष वडिलांच्या दिशेने फेकला आणि दार उघडलं.

"अरे थांब एक मिनिट. आमचा दोघांचा एक फोटो काढ रे. कितीतरी दिवसात असा आमचा फोटोच नाही काढलेला."

लेक परत मागे फिरला आणि त्याने वडिलांच्या मोबाईलमध्ये दोघांचे असे दोन-तिन फोटो काढले आणि दार उघडून लिफ्टकडे वळला.

काढलेले फोटो न्याहाळत नवऱ्याने तिला म्हंटलं;"छान आलेत ग फोटो. तुला पाठवतो. हा फोटो तुझा DP ठेवशील का?"

............ आणि सगळं लक्षात येऊन ती खुदकन हसली. "इश्य... त्यात काय? पाठव मला तो फोटो. लगेच ठेवते की." तिने उत्तर दिलं.

ती सकाळी उठली तेव्हा एक मेसेज आला होता.....

'सुहास्य तुझे मनासी मोही... जशी न मोही सुरासुरा....'

ती परत एकदा प्रसन्न हसली आणि कामाला लागली.

क्रमशः

1 comment: