Friday, June 18, 2021

एक red wine नातं (भाग 4)

 एक red wine नातं (भाग 4)


एक red wine नातं (भाग 4)

सकाळी एक मेसेज तिची वाट बघत होता. तिने हसत हसत तो उघडला आणि वाचायला लागली.

'हाssssssय.... कलिजा खल्लास झाला. ए तुला भेटतो तेव्हा ती जागा कशी गुलाबी होऊन जाते... काल तो अनुभव मी इथे मेट्रोमध्ये घेतला. मेट्रो आणि प्रवासातलं सगळंच जग कसं गुलाबी मोरपिसासारखं झालं होतं. मग मी काय केलं माहीत आहे? तुझी पहिली कविता परत वाचली. सगळा प्रवास मी हसत होतो एकटाच!'

..... आणि तिनेच लिहिलेली तिची पहिली-वहिली कविता त्याने परत तिला पाठवली होती.

ऐ चल....
थोडसं भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू...
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!
थोड लांब पळु...
एखादा डोंगर चढू...
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिनं बसु!
मग?
गेलेल्या वर्षांच्या...
मनातल्या आठवणी!
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.

ऐ चल...
समुद्र किनाऱ्यावरून...
तळव्यांना स्पर्श करणा-या
नाजुक लाट़ातुन!
तारे मोजु...
वाळुच्या कुशीत पडून!

ऐ....चल नं....
हे सगळं सगळं करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सारं हसू!


तिने ती कविता वाचली... एकदा... दोनदा... तीनदा... आणि तिचे स्वप्नाळू डोळे हरवले. पण तेवढ्यात मागून नवऱ्याने खकरल्याचा आवाज आला आणि ती परत संसाराच्या जगात आली. पलंगावरून उठताना तिने ठरवलं होतं; आजची कॉफी त्याच्या-तिच्या आगळ्या-वेगळ्या आठवणींसोबत चाखायची. स्वतःशीच हसत आणि गुणगुणत ती खोलीबाहेर पडली. तिचं ते स्वतःशीच खुदखुदणं तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं होतं. तो मनातून काहीसा कातावला; पण काही न बोलता ऑफिसला जायच्या तयारीला लागला.

वासंती कामाला आली तोपर्यंत तिचं नेहेमीचं काम आटपलं होतं. स्वतःसाठी कॉफी करून घेत होती ती. वासंतीला दार उघडलं आणि हसत-हसत तिने विचारलं; "कॉफी घेणार का ग वासंती?" वासांतीने तितक्याच मिश्किलपणे हसत म्हंटलं; "हो.... घेणार की! तुमच्या प्रश्नावरूनच मला कळलं हं वहिनी आज तुम्ही आणि तुमची गॅलरी... ना माझ्या हातची कॉफी तुम्ही घेणार; ना मी निघताना सांगेन ते तुम्हाला ऐकायला जाणार. अशा कशा हो वहिनी तुम्ही?" तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिने मस्त दोन कप कॉफी केली आणि वासंतीची कॉफी झाकून ठेवत ती गॅलरीमध्ये आली. हौसेने नाजूकसं कॉफी टेबल आणि दोन खुर्च्या तिने घेतल्या होत्या. नवरा म्हणाला देखील होता;"कोण बसणार आहे ग असं गॅलरीमध्ये? या सगळ्या श्रीमंतांच्या हौशी." पण तरीही तिने हट्टाने घेतलं होतं ते टेबल आणि प्रेमाने वापराची देखील.

तिने मोबाईल काढला परत एकदा कविता वाचायला आणि तिच्या नकळत ती हरवून गेली जुन्या आठवणींमध्ये.

तिचा लेक पाच वर्षांचा झाला आणि ती नवऱ्याच्या मागे लागली कुठेतरी फिरायला जाण्यासाठी. बाळंतपणानंतर आजपर्यंत ती अशी कुठे लांब फिरायला गेली नव्हती. त्यामुळे तिने हट्टच धरला आणि नवऱ्याने देखील केरळ टूरचा प्लॅन केला.

विशाखापट्टणमला ट्रेनमधून ते उतरले आणि तिच्या नवऱ्याचा मोबाईल सतत वाजायला लागला. टूरमध्ये असणारे सगळेच सहप्रवासी आपापलं सामान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडत होते. तिने एकदा नवऱ्याकडे कटाक्ष टाकला आणि सामान घेऊन लेकाचा हात धरत ती स्टेशनच्या बाहेर चालू पडली. ती बसमध्ये सामान चढवून आत जाऊन बसली. पण नवऱ्याने तिला हाक मारून खाली बोलावलं. नवऱ्याचा चेहरा एकदम उतरला होता. तिचा हात हातात घेत तो म्हणाला;"एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे ऑफिसमध्ये. परत जावं लागेल ग." हे ऐकून तिचा चेहेरा एकदम उतरला. डोळ्यात टचकन पाणी आलं. ते बघून नवरा म्हणाला;"अग; मला जावं लागणार आहे. पण तू खूप वर्षांनी बाहेर पडली आहेस. तू टूर सुरू कर. मी काम उरकून परत तुम्हाला जॉईन होतो." तिला ते पटत नव्हतं; पण नवऱ्याने समजावलं आणि शेवटी तो नक्की येईल असं त्याच्याकडून वचन घेऊन ती परत बसमध्ये जाऊन बसली. नवऱ्याने तिथल्या तिथे विमानाचं तिकीट बुक केलं आणि स्वतःची बॅग घेऊन तो विमानतळाच्या दिशेने निघाला.

नवऱ्याच्या आग्रहामुळे तिने हो तर म्हंटलं होतं; पण मनातून ती हिरमुसली होती. टूरला सुरवात झाली आणि गप्पा, अंताक्षरी, घरून आणलेले पदार्थ एकमेकांना देणं... सगळं सुरू झालं. हळूहळू तिची कळी खुळायला लागली. तिचा लेक तर अगोदरच इतर मुलांमध्ये एकदम रमून गेला होता. दोन दिवसांनंतरच्या संध्याकाळी त्या सगळ्यांना एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर नेलं गेलं. भरतीची वेळ होती; तो किनारा सुरक्षित होता; आणि life gards देखील होते. त्यामुळे सगळेच मस्त मजा करत होते. मात्र ती काहीसं लांब राहून सगळ्यांकडे बघत होती. अनेकांनी आग्रह करून देखील ती पाण्यात गेली नाही. 'मीच पाण्यात गेले तर माझा लेक माझ्या पुढे धावेल. त्याला ताब्यात ठेवायचं तर मी थांबवलं पाहिजे स्वतःला.' तिच्या मनात आलं. त्यामुळे ती तशीच मन मारून वाळूत बसून राहिली. अचानक कोणीतरी तिच्या शेजारी येऊन बसलं. तिने मान वळवून बघितलं तर बसमध्ये सगळ्यात मागे बसणारा आणि सतत हातात कॅमेरा घेतलेला मुलगा तिच्या शेजारी बसला होता. ती त्याच्याकडे बघत होती; मात्र तो समोर सूर्यास्त बघत होता. तो असा अचानक का येऊन बसला ते तिला कळेना. ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात तो म्हणाला;"तुझ्यात एक मुलगी देखील आहे; तिला कधीतरी तिच्या मनासारखं वागू दे की." त्याचं ते वाक्य ऐकून ती मनातून एकदम हलली. पण बोलली मात्र काही नाही. त्याने क्षणभर तिच्याकडे बघितल्यासारखं केलं आणि तो जाण्यासाठी उठून वळला. ती परत एकदा समुद्राकडे आणि समुद्रात विरघळणाऱ्या सोन्याकडे बघायला लागली. तिच्या कानावर शब्द आले...

"कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा...." तिने वळून बघितलं; पण तो इतरांमध्ये जाऊन सामील झाला होता.

आज टूरचा शॉपिंगचा दिवस होता. संपूर्ण महिलावर्ग एकदम खुश होता. केरळ म्हंटल्यावर सिल्क साडी घेणं आवश्यकच होतं जणू. ती देखील सगळ्यांबरोबर साडीच्या दुकानात गेली. इतर बायका नवऱ्या सोबत साड्या बघण्यात गर्क होत्या. त्यांचं लक्ष साडीचा रंग, जरीचा काठ याकडे होतं तर नवाऱ्यांचं लक्ष बायकोने उचललेल्या साडीच्या किमतीकडे होतं. ती मात्र इथे तिथे फिरत होती. 'नवरा असता तर मी देखील हौसेने एखादी साडी घेतलीच असती'; तिच्या मानत आलं. तसं नवऱ्याने तिला त्याचं क्रेडिट कार्ड देऊन ठेवलं होतं. पण तरीही साडी घ्यावी असं तिला वाटत नव्हतं. उगाच फिरताना मात्र तिची नजर एका अबोली काठाच्या सुंदर साडीवर पडली. पाहाताक्षणी तिला ती साडी खूप आवडली. तिने ती उचलली; पण किंमत बघून परत ठेवली. मग उगाचच त्या साडीवरून हात फिरवत ती तिथेच उभी राहिली.... आणि अचानक तिच्या शेजारून तिला आवाज आला;"केवळ नवरा शेजारी उभा असला तरच महाग साडी घेता येते असं तुला वाटत असलं तर मी उभा राहातो शेजारी; म्हणजे घेशील तू ती साडी." आता देखील तो तिच्याकडे बघतच नव्हता. त्याचं बोलणं ऐकून ती खुदकन हसली आणि तिने ती साडी उचलली. काउंटरवर पैसे देऊन तिने मागे वळून बघितलं पण तो तिला दिसला नाही.

टूर संपत आली होती. पण तिचा नवरा काही येऊ शकला नव्हता. तो रोज रात्री तिला फोन करून किमान शंभरवेळा सॉरी म्हणायचा. पहिले दोन दिवस तिने नाराजी व्यक्त केली होती; पण मग तिने मनातून स्वीकारलं की तो येणार नाही. त्यामुळे तिला वाईट वाटलं तरी त्याचा त्रास नाही करून घेतला तिने. शेवटच्या दिवशी सगळ्यांनी एकमेकांना परत भेटण्याचं आश्वासन दिलं. एकमेकांचे फोन नंबर्स घेतले-दिले. त्यावेळी त्याने देखील तिचा नंबर विचारला आणि तिने दिला.

टूर संपली. ती परत आली. पुढचे दोन दिवस टूरमध्ये काय काय मजा केली हेच सांगत होती ती नवऱ्याला. त्याचं तिच्या बोलण्याकडे कितपत लक्ष होतं कोण जाणे. पण ती खुश होती... आणि ती खुश असल्याने नवरा देखील मनातून सुखावला होता. त्याला सगळं सांगितलं तिने; पण बुडत्या सोन्याच्या गोळ्याचं रुपडं मात्र फक्त तिच्याच डोळ्यात राहिलं. अबोली काठ-पदर असलेली साडी ज्या दिवशी ती नेसली; त्या दिवशी ती खुदखुदत होती मनातल्या मनात.

******

दिवस जात होते; लेक जुनीयरला असल्याने त्याची शाळा जेमतेम दोन तास असायची. अनेकदा ती त्याला शाळेत सोडून तिची बाहेरची कामं उरकून घ्यायची आणि मग त्याला घेऊन घरी परतायची. त्यादिवशी अशीच ती बँकेत कामासाठी गेली होती आणि तिचा मोबाईल वाजला. 'नाव नसलेला नंबर? कोण असेल?' तिच्या मानत आलं. एरवी ती असे अनोळखी नंबर्स सोडून द्यायची. पण त्यादिवशी कसं कोण जाणे तिने तो फोन घेतला.

"हाय" पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला.

"आपण कोण?" तिने विचारलं.

"नसलेला नवरा." उत्तर आलं.

"अय्या तू? अरे कमालच झाली. परत आल्यापासून मी कितीतरी वेळा तुला फोन करण्याचा विचार केला. पण मला तुझा नंबरच नाही सापडला." ती एकदम खुश होत म्हणाली.

"नंबर घेतला तर सापडतो." शांत आवाज; आणि तिला एकदम आठवलं... तिने तिचा नंबर दिला होता पण त्याचा विचारला नव्हता. स्वतःच्या धांदरटपणाचं तिचं तिलाच हसू आलं.

"कसा आहेस? कुठे असतोस? असा अचानक कसा काय फोन केलास?" तिने विचारलं.

"कसा आहे? एकदम झक्कास! कुठे असतो? घरात आणि लायब्ररीमध्ये! अचानक फोन? हम्म.... हा प्रश्न अवघड आणि महत्वाचा आहे." त्याचं उत्तर आलं आणि ती गोंधळली.

'प्रश्न अवघड का? आणि महत्वाचा का?' तिने थोडं शांत होत विचारलं.

मात्र समोरून आलेल्या उत्तराने तर ती गोंधळून गेली...

"मला तुझी माफी दाखवायची होती." त्याने म्हंटलं.

"काय? काय दाखवायची होती?" आपली ऐकण्यात चूक झाली असं वाटून तिने परत विचारलं.

"माफी दाखवायची होती ग." तो म्हणाला.

"अरे... नीट बोल की. काय दाखवायचं आहे?" आता ती थोडी वैतागली.

"OK. आपण भेटू शकतो का? भेटलो तर मी सांगू शकेन मी काय म्हणतो आहे." थेट प्रश्न.

तिच्या डोळ्यांसमोर सोननिळाईमध्ये बुडणारा सोन्याचा गोळा आला आणि ती एकदम म्हणाली;"हो! भेटू की. तुला इथे यावं लागेल ह पण. ते ही सकाळच्या वेळेलाच. माझा लेक शाळेत जातो त्यावेळात आपण इथेच कुठल्यातरी CCD मध्ये भेटूया. चालेल?"

"done! उद्या साधारण दहा वाजता मी स्टेशनवर येतो आणि तुला फोन करतो." तो म्हणाला आणि तिने 'बरं' म्हणत फोन ठेवला.

*******

नवरा ऑफिससाठी निघाला होता आणि ती देखील लेकाला सोडायला बाहेर पडत होती. दहाला पाच मिनिटं होती आणि तिचा फोन वाजला. एकदम खुश झाली ती. 'वेळेला पक्का आहे... जमेल आपलं!' तिच्या मनात आलं. फोन घेत तिने त्याला शाळेच्या जवळच्या CCD चा पत्ता सांगितला आणि लेकाला शाळेत सोडून अधिऱ्या मनाने ती CCD मध्ये शिरली.....

क्रमशः



No comments:

Post a Comment