एक red wine नातं (भाग 5)
CCD च्या आत ती पोहोचली आणि तिने एक नजर फिरवली. तशी सकाळची वेळ असल्याने फार कोणी नव्हतंच. तो एका बाजूच्या टेबलावर बसला होता आणि हातातल्या कॅमेरामध्ये काहीतरी करत होता.
"हाय! तू 'My Name is Khan!' मधला शाहरुख तर नाहीस न?" तिने त्याच्या समोर बसत त्याला विचारलं.
"का प्रश्न कुठून प्रवास करत येतो आहे?" त्याने तिच्याकडे बघत हसत विचारलं.
"फार लांबचा प्रवास नाही रे. सिनेमामध्ये शाहरुख नाही का सतत त्याच्या कॅमेरामधून सगळं बघत असतो? तसाच तूसुद्धा सारखा स्वतःच्या कॅमेरामध्ये गढलेला असतोस; तर म्हंटलं विचारावं की....." असं म्हणत ती एकदम मान मागे टाकत खळखळून हसली. त्याने डोळे बारीक करत तिच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात तिला दिसलं... 'ओहो! मोठ्ठा जोक आहे वाटतं हा?' आणि ते बघून तर ती तिचं हसू आवरुच शकली नाही. नंतरची दोन मिनिटं ती नुसती हसत होती. शेवटी डोळे पुसत तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली;"सॉरी हं! म्हणजे आमची ऐकू येणारी माफी बरंका!" आणि मग परत एकदा त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बघत तिने खदखदायला सुरवात केली. तिच्या हसण्याचा भर ओसरला आणि त्याने तिला विचारलं;
"संपला आहे का आपला चावटपणा मॅडम? तर मी तोंड उघडतो."
"अरे? मला वाटलं तोंड दाखवतोस!" तिने परत एकदा फुल्लटॉस मारला... पण आता तिचंच पोट दुखायला लागलं होतं हसून-हसून. त्यामुळे तोंडावर हात ठेवत तिने दुसऱ्या हाताने सॉरी अशी खूण केली. तिचं ते सगळंच वागणं अगदी बालिश होतं. पण तो ते ओठांच्या कोपऱ्यातून हसत enjoy करत होता. ती शांत झाली आणि त्याने विचारलं;"मॅडम, CCDवाले आपल्याला फुकट कितीवेळ बसू देणार आहेत?" त्यावर त्याच्याकडे बघत हसत ती म्हणाली;"उठ आणि माझ्यासाठी आयरिश कॉफी आण बघू."
"तू पण?" त्याने एकदम आश्चर्यचकीत होत तिला विचारलं.
"ओय तू भी क्या?" तिने देखील त्याच्याकडे टाळी मागत विचारलं.
तिला डोळा मारत तो म्हणाला;"Not always! Only when I get company where i feel like being myslf." आणि उठून ऑर्डर द्यायला गेला. त्याचं वाक्य खूप बोलकं होतं; तिच्या चेहेऱ्यावर एक आनंदी हास्य पसरलं.
त्याच्याकडे बघताना तिच्या मनात आलं... 'किती दिवसांनी अशी बेफाम हसले असेन! आणि एकदम आयरिश कॉफी का आठवली आपल्याला? कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा श्वेतलबरोबर आयरिशची चव घेतली होती ती देखील तिच्याचमुळे. तिला असलं काहीतरी अतरंगी माहीत असायचं. पण तिच्यासोबत आयरिशची चव चाखत मारलेल्या गप्पा म्हणजे out of the world अनुभव होता त्या वयातला. त्यानंतर कधीच नव्हती घेतली आपण आयरिश कॉफी. मग आज अचानक? मी पण त्याच्यासारखा विचार करते का? त्याच्यासोबत असताना मला माझ्यातली 'मी' सापडते आहे का?'
तो तिच्या शेजारी येऊन बसला होता आणि काही न बोलता तिच निरीक्षण करत होता. ती कॉन्शस होणार नाही याची काळजी घेत. ती तंद्रीतून जागी झाली आणि त्याच्याकडे बघितलं तिने. तो हसला तसे त्याचे डोळे पण हसले.
'डोळ्यांच्या पापण्या किती सुंदर आहेत याच्या. लांबसडक आणि दाट.' तिच्या मानत आलं. पण मनातला विचार मागे टाकत ती त्याला म्हणाली;"हं माफी मागा राजे! म्हणजे माफी दाखवा राजे!" स्वतःच्याच शाब्दिक कोटीचं तिला हसू आलं. पण आता ती हसणार नव्हती.
"तर मला तुझी माफी दाखवून मागायची होती." त्याने तिच्याकडे बघत म्हंटलं.
"बरं! पण म्हणजे नक्की काय ते सांगशील का आता? खूप वेळ आपण हा खेळ खेळतो आहोत. आता बास न!" तिने त्याला म्हंटलं.
तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला;"खरं सांगू? मी ठरवलं होतं की आज पहिलं आणि शेवटचं भेटायचं तुला. म्हणजे कदाचित तूच रागावून तसं ठरवशील; माझ्या माफी मागण्याचं कारण कळलं की. पण आत्ताच्या तुझ्या एकूण परफॉर्मन्स नंतर मी माझं म्हणणं थोडं बदललं आहे. छान जगायचं असेल तर तुला अधून मधून भेटणं आवश्यक आहे. त्यामुळे मी आता तुला जे दाखवणार आणि सांगणार आहे; त्यावर चिडून तू माझ्याशी बोलणं बंद करायचं नाही. हे कबूल करत असलीस तर सांगीन सगळं; नाहीतर नाही सांगणार."
'नाहीतर नाही सांगणार'; म्हणताना त्याने लहान मुलांसारखे गाल फुगवले आणि तिला गंम्मत वाटली.
" बरं! मला वाटलं तर भेटेन. पण रागावणार नाही आत्ता." ती म्हणाली.
"अहं! असं कसं? असं कसं? माझ्याच मनासारखं झालं पाहिजे न." तो बलिशपणे म्हणून गेला आणि त्याच्या त्या बोलण्याची पद्धत आणि एकूण हावभावांकडे बघत तिला मज्जा वाटली.
"बरं! भेटेन अधून-मधून. पण माझ्या चॉईसने." ती म्हणाली.
क्षणभर विचार करून तो म्हणाला;"ok! deal! तर..... मी काल म्हणालो होतो की मला तुझी माफी दाखवायची आहे." असं म्हणत त्याने तिच्या समोर एक फोटो ठेवला. एकूण चाललेल्या संभाषणामुळे तिच्या चेहेऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. तिने त्याच हसऱ्या चेहेऱ्याने त्या फोटोकडे नजर वळवली आणि एकदम तिच्या चेहेऱ्यावरचे भावच बदलले. तिचे बदललेले भाव बघून त्याचे डोळे मोठे झाले. त्याला त्याच्या हृदयाची धडधड ऐकायला यायला लागली. तिच्याकडे बघताना त्याची नजर कावरी-बावरी होऊन गेली. ती काही क्षण त्या फोटोकडे टक लावून बघत राहिली आणि मग नजर उचलून तिने त्याच्याकडे बघितलं.
"ए मी खूपच सुंदर दिसले आहे न या फोटोत?" तिच्या आवाजात एक अनामिक आनंद-समाधान-कौतुक किंवा त्याहीपलीकडे जाऊन 'मोहरून येणं' ही भावना होती.
तिचे ते शब्द ऐकून त्याने एक मोठ्ठा निःश्वास सोडला आणि म्हणाला;"कमाल करतेस हं. तू खूप खूप सुंदर आहेस. हे त्रिकालाबाधित सत्य बोलण्या अगोदर कोणी इतका मोठा पॉज घेतं का? आणि त्यात हे असले समोरच्या व्यक्तीला मुळीच कळणार नाहीत असे भाव चेहेऱ्यावर आणतं का? जीव मुठीत घेऊन बसलो होतो न मी. मला वाटलं चला आता ही आयरिश ओठांपर्यंत येण्याच्या अगोदरच आपली इथून गच्छंती होणार. ए बाई.... आपलं.... ए मुली.... असले नाटकी पॉज घेण्याच्या अगोदर माझा विचार करत जा म्हंटलं." एवढं बोलून त्याने कॉफी उचलली आणि तोंडाला लावली. काहीसा कडवट; व्हिस्की फ्लेवर मिश्रित असा तो घोट घेऊन त्याने डोळे मिटले आणि बहुतेक त्याची त्या चविसोबत समाधी लागली.
त्याचं ते तिच्याशी अगदी सहज बोलणं; ए बाई... आपलं... ए मुली... म्हणणं; ती गमतीदार भाषा.... तिला ते सगळंच एकदम आवडून गेलं. त्याने डोळे उघडले तरीही ती शांतपणे त्याचं निरीक्षण करत होती. तिच्याकडे बघत भुवया उडवत त्याने डोळ्यांनीच 'काय' म्हणून विचारलं.
"हा असाच आहेस न तू? अगदी माझ्या मनातल्या 'मी' सारखा! हे कारणच पुरेसं आहे हं तुला परत परत भेटायला. बरं, हा फोटो तू कधी काढलास ते तर कळलं; पण त्याचवेळी मला का नाही सांगितलंस? म्हणजे ही अशी माफी दाखवावी लागली नसती." ती हसत म्हणाली.
"अग, ती गंमतच झाली. तू ती आवडलेली साडी बघत होतीस न; तेव्हा तुझ्या चेहेऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. म्हणजे आपल्याला आपलं आवडतं काहीतरी अचानक समोर दिसलं की आपण कसे हरवून जातो... तसा काहीसा होता तुझा चेहेरा. माझ्या कॅमेऱ्याला राहावलंच नाही; तोच पटकन पुढे झाला आणि माझी बोटं त्याला साथ देत गेली." तो परत हसत गमतीदारपणे म्हणाला.
ती एकदम मोकळं हसली आणि म्हणाली;"हे बरं केलंस हं की तू नाही काढलास फोटो. कॅमेऱ्यानेच सगळं केलं. नाहीतर तुझं काही खरं नव्हतं. बाकी तुझं observation बरोबर होतं. अरे मला अबोली रंग खूप आवडतो. त्यात त्या साडीचं ते combination इतकं सुंदर होतं न की अगदी हवीशीच वाटली मला ती. बहुतेक तेच सगळं होतं माझ्या डोळ्यात; जेव्हा तुझ्या त्या लबाड कॅमेऱ्याने स्वतःला तुझ्याकडून क्लीक करून घेतलं."
"आवडला तुला तो फोटो? ठेव न मग तुझ्याकडे." तो म्हणाला आणि तिने तो फोटो घेऊन पर्समध्ये टाकला. तिने कॉफीचा मग उचलला आणि तोंडाला लावला; घोट घोळत गळ्यातून खाली उरतच होता तितक्यात तो म्हणाला...
"तुला न विचारता काढलेला हा फोटो; तुला न विचारताच एका फोटो कॉम्पिटीशनमध्ये पाठवला होता आणि त्याला दुसरं बाक्षीस मिळालं आहे." संपूर्ण वाक्य त्याने एका श्वासात म्हंटलं होतं आणि ते ही तिच्याकडे न बघता.
तो जे बोलला होता त्याचा अर्थ समजायला तिला एक क्षण लागला आणि डोक्यात प्रकाश पडता क्षणीच तिचे डोळे इतके मोठे झाले....
तो तिची प्रतिक्रिया डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होता; तिचे मोठे झालेले डोळे त्याने बघितले आणि एकदम तिच्याकडे बघत म्हणाला;
"मोट्ट मोट्ट डोलं तुझं... कोल्याचं जालं जसं... माझ्या दिलाची मासोली घावायची नाय...."
आलेला राग, वैताग, त्याला मारावं अशी मनातून वाटणारी भावना... सगळं सगळं ती विसरली आणि खो-खो हसत सुटली. तिला तिचं हसणं अजिबात आवरेना; पोट दुखायला लागलं तरी ती हसत होती. शेवटी कसतरी तिने हसू आवरलं तर त्याने अगदी निरागस चेहऱ्याने आणि तितक्याच निरागस आवाजात तिला म्हंटलं;"इतकं हसण्यासारखं मी काय बोललो ते सांगितलंस तर मी पण हसेन ग. मगास पासून तूच एकटी हसते आहेस. मला पण हसायचं आहे न तुझ्यासारखं निरर्थक."
.... आणि त्यानंतर तिच्या हसण्याचा जो स्फोट झाला होता; नशीब की CCD मध्ये त्यावेळी एक कॉलेजचा ग्रुप सोडला तर कोणीही नव्हतं. नाहीतर disturb करतात म्हणून त्या दोघांना बाहेर काढलं गेलं असतं.
***
एका मागोमाग एक येणाऱ्या आठवणींच्या आवर्तनांमध्ये ती बुडून गेली होती. वासंतीने एकीकडे तिचं काम उरकत असताना कुकर लावून घेतला होता. तिचं लक्ष होतं तिच्या वहिनीकडे. स्वतःतच बुडून गेलेली वहिनी तिला आवडायची. कारण अशी हरवलेली वहिनी कायम हसत असायची. तिचा चेहेरा कसा समाधानी आणि शांत वाटायचा. त्यामुळे वहिनीची अशी तंद्री लागली की वासंती तिला अजिबात हाक मारायला जायची नाही. पण आता मात्र वहिनीला हाक मारणं आवश्यक होतं. कारण शाळा सुटायची वेळ होत आली होती. जर वहिनी जाणार नसेल आणि सुजाता ताईंना देखील जमणार नसेल तर वासंतीला जावं लागणार होतं शाळेत. म्हणून मग तिने गॅलरी जवळ जात हळू आवाजात हाक मारली...
"वहिनी... तुम्ही बसा निवांत. मी शाळेत जाऊन येते. तशी मोकळी आहे मी आज."
वासंतीच्या हाकेने आपल्या तंद्रीतून जागी होत तिने मागे वळून बघितलं. "काय म्हणालीस ग वासंती?" तिने विचारलं.
"म्हंटलं मी जाऊन येते शाळेत तुमची समाधी चालू दे." वासंती हसत हसत म्हणाली आणि मोबाईल उचलून घराबाहेर पडली.
***
'माझी समाधी?' ती परत विचारात बुडत स्वतःशीच बोलली.
...."नेहेमीच अशी समाधी लागते का तुझी?" तिला मागून आवाज ऐकू आला आणि मागे न बघताच ती हसली.
दुसरी भेट होती ती त्यांची. नरिमन पॉईंट! तिनेचं त्याला सांगितलं होतं; भेटणार असशील तर नरिमन पॉईंटला ये. लेकाला सुजाताकडे सोडलं होतं तिने. त्यामुळे उशीर झाला तरी लेकाचं जेवण देखील सुजाता उरकून टाकेल हे तिला माहीत होतं. नवऱ्याला उशीरच होणार होता आज; कुठलीशी कॉन्फरन्स होती त्याची. एरवी नवरा उशिरा येणार असला की मग आरामात जेवून सगळं आवरून ती पुस्तक वाचत बसायची. त्यावेळी ते नवीन घरात आले नव्हते. तिच्या त्या मनाने गुंतलेल्या घरी एकटीने बसायला देखील तिला आवडायचं. पण नवऱ्याने त्यादिवशी निघताना सांगितलं की त्याला उशीर होणार आहे; आणि दुपारी तिचा फोन वाजला. एक मेसेज आला होता:
'आज अभ्यास करायला बोर होतं आहे.' आणि पुढे खूपसे गमतीदार इमोजी होते.
'नरिमन पॉईंट? संध्याकाळी सात?'
उत्तरादाखल आलेलं पळणाऱ्या मुलाचं ईमोजी बघून ती खुदकन हसली होती आणि सांध्याकाळी लेकाला सुजाताकडे सोडून ट्रेन घेतली होती तिने.
ती पोहोचली होती पण तो बहुतेक आला नव्हता.
'शोधेल!' तिच्या मानत आलं आणि ती तिच्या लाडक्या सुर्यास्ताकडे बघत उभी राहिली.
***
"नेहेमीच अशी समाधी लागते का तुझी?" तिला मागून आवाज ऐकू आला आणि मागे न बघताच ती हसली.
तो तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याची नजर देखील सुर्यास्तावर खिळली होती. दोघे काही न बोलता तो बुडता क्षण मनापासून आस्वादत होते.
सूर्य पुरता बुडाला आणि तिच्या कानावर शब्द आले....
"कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा....."
आणि तिने हसत हसत त्याच्याकडे मान वळवली. त्याने देखील हसत तिच्याकडे बघितलं आणि एकदम डोळे मोठे करत तो मागे सरकला...
"हे भगवान!!!" त्याच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले.
ती एकदम गोंधळली आणि आजूबाजूला बघत म्हणाली;"काय झालं रे?"
त्याने त्याचा कॅमेरा तिच्याकडे वळवला; त्याबरोबर तिने त्याच्याकडे पाठ केली.
"तू कोणी जलपरी तर नाहीस न? सोन्याचा गोळा रोजचाच! उगाच त्याला बघत बसलो. शेजारी सोनपरी असताना." तो हसत म्हणाला. परत त्याच्याकडे वळत ती काहीशी वैतागली. त्याच्या जवळ जात त्याच्या दंडावर चापट मारत हसत म्हणाली; "आजवर हा डायलॉग किती जणींना ऐकवला आहेस?"
आकाशाकडे बघत त्याने मोजायला सुरवात केली. असेच काही क्षण गेले आणि तिने परत त्याला एक चापट मारली.
"हे बघ. तुला खोटी नाटकं करता येत नाहीत. हे जे अचानक कॉमेडी डायलॉग्स मारतोस न तू ते तुझ्यातून आपसूक बाहेर पडतात; समजलं? त्यामुळे माझ्या अगोदर जलपरी आणि सोनपरी तू कोणालाही म्हंटलेलं नाही आहेस; हे मला माहीत आहे. त्यामुळे उगाच आकाशाला मागे ढकलणं बंद कर आणि चल चाल माझ्या सोबत." ती हसत म्हणाली आणि चालायला देखील लागली. ती चार पावलं पुढे गेली आणि त्याने पटकन पाय उचलत तिला गाठलं.
"ए क्या बोलती तू!" तो
"उगाच style मारू नकोस. तू आमिर खान नाहीस आणि मी राणी मुखर्जी नाही. नीट विचार काय विचारायचं आहे." तिने त्याच्याकडे न बघता चालत म्हंटलं.
"बाईसाहेब, विचारत नाही आहे; सांगतो आहे. यापुढे मी तुझे फोटो काढणार आहे; माझ्या मनात आलं की. प्रत्येक वेळेला विचारण्यात वेळ नाही घालवणार. एकदाच काय ते सांगतो आहे." तो पण तिच्या सोबत चालत मख्खपणे म्हणाला. चालता-चालता थांबून कंबरेवर हात ठेवत तिने डोळे मोठे केले. ती काहीतरी म्हणणार होती इतक्यात तो गायला लागला;
"विटेवर उभा कटेवरी हात... काय मौजेचा पंढरीनाथ...."
तिला त्याच्या त्या गाण्याचं हसू आलं. "अशक्य आहेस." ती म्हणाली.
"हा हे शक्य आहे की मी अशक्य आहे." परत शब्दांची कोटी करत तो हसला. त्याची एक गंम्मत होती. काहीतरी गमतीदार कोटी किंवा वाक्य बोलून तो स्वतःवरच खुश होत हसायचा. त्याचं ते स्वःतावर खुश असणं आवडायला लागलं होतं तिला. दोघेही चालत होते.
"तो अब क्या इरादा हें?" त्याने विचारलं.
"चौपाटीची...." तिचं वाक्य तोडत तो म्हणाला; "पाणी पुरी आणि मग कुल्फी." आणि तिचे डोळे चमकले. चालता-चालता थांबून त्याच्याकडे बघत तिने डोळा मारला आणि म्हणाली; "same to same."
तिच्याकडे बघत तो म्हणाला; "माहीत आहे. म्हणून तर...." पण मग एकदम थांबला तो बोलायचा आणि चालायला लागला. तिने पुढे होत त्याची कॉलर धरून त्याला मागे ओढलं आणि त्याला थांबवत म्हणाली; "शाळेत गाळलेल्या जागा भरा मध्ये मला कायम शून्य मार्क मिळाले आहेत. तेव्हा तूच बोल."
तिच्या त्या वाक्याने तो एकदम फुटलाच आणि हसायला लागला. तिला कळेना असं एकदम का हसतो आहे तो. तिने कमरेवर हात ठेवत त्याला विचारलं; "इतकं कॉमेडी होतं का हे वाक्य?"
हसताना डोळ्यात आलेलं पाणी पुसत तो म्हणाला; "अग मुली, मी एकदम soft आणि romantic mood create करत होतो आणि तू एकदम मला पाचवीतल्या बाकावर नेऊन बसवलंस. मग हसू नको तर काय करू?"
त्याचं बोलणं ऐकलं आणि तिच्या लक्षात आलं तिने काय गोंधळ घातला होता. परत एकदा त्याच्या खांद्याला एका चापटीचा प्रसाद मिळाला.
"हम्म! वाक्य पूर्ण कर आता." ती म्हणाली.
"सांगू? मला आतून वाटतं की तुझ्या आणि माझ्या आवडी अगदी सारख्या आहेत. न सांगता एकमेकांना कळतील अशा." तो म्हणाला.
चालता-चालता थांबत तिने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली;"आवडी सारख्या आणि एकमेकांना कळतील अशा... असे दोन भाग आहेत यात. मस्त गुंतवलेस हं दोन्ही!"
तो हसला आणि तिने काही वेळापूर्वी मारलेल्या डोळ्याची परतफेड त्याच्याकडून झाली. दोघे पुढे चालायला लागले. चौपाटीच्या वाळूत आले आणि आपापल्या चपला हातात काढून घेत दोघांनी समुद्राच्या दिशेने चालायला सुरवात केली. इतक्यात एक गोड दिसणारी तरुणी त्यांच्या जवळ आली आणि तिने त्याच्याकडे बघत विचारलं; "excuse me. which way is nariman point?" त्याने फक्त बोट केलं आणि ती हसत "thank you" म्हणून निघून गेली.
दोघे परत चालायला लागले. ओल्या वाळूचा स्पर्श पायांना झाला आणि ती मनमोकळं हसली. तो देखील तिच्याकडे बघत हसला. दोघेही पाण्याच्या जवळ न जाता आडवे चालायला लागले... लाटांना समांतर!
"ओली वाळू पायांना जे सुख देते ते इतर कोणत्याही स्पर्शाला नाही." ती आपल्याच नादात म्हणाली. शेजारून फक्त एक "हम्म!" आला. तिने त्याच्याकडे वळून बघितलं तर त्याचा कॅमेरा तिच्या पायांवर फोकस करत होता. ती स्वतःशीच हसली आणि पुढे चालायला लागली. त्याच्या मनासारखा फोटो आला आणि त्याने तिला गाठलं.
तो शेजारून चालायला लागला आणि ती हसत म्हणाली; "हा सांग आता. लायब्ररीमध्ये bird watching व्यतिरिक्त काय करत असतोस?"
"अग बाहेरच्या univercities च्या परीक्षांची तयारी आहे. PhD करायला जायचा विचार आहे."
"Brutus U too?"
"नाही ग. मी घेतलेला विषय इथे PhD साठी मिळत नाही. पर्याय नाही म्हणून माझी लाडकी मुबंई सोडणार आहे."
"हम्म! मग ठीक... आणि ती? तिने काय ठरवलंय?"
"ती? कोण ती?" त्याने आश्चर्य वाटून विचारलं आणि परत एकदा त्याचा खांदा आणि तिची चापट एकत्र आले.
"ओय! ए तू पोहायला शिकली आहेस का?" त्याने विचारलं.
"आचरट प्रश्न विचारू नकोस. मी मारणार तुला... आणि पोहायला शिकतानाचे फुगे खांद्यावर बांधायला तू काय कुक्कुलं बाळ आहेस? त्यात ते फुगे तुला माझ्या चापटी पासून वाचवणार आहेत असं खरंच तुला वाटतं?" त्याच्या प्रश्नाला तिचं उत्तर अगदी perfect होतं.
"बरं हा आचरटपणा जाऊ दे; मी सुरवातीलाच काय सांगितलं? तुला खोटी नाटकं जमत नाहीत. तेव्हा तुझी girl friend काय करते ते सांग." ती हसत म्हणाली.
"ती पण माझ्याच fild मधली आहे. मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहे; आणि पुढे प्रॉस्पेक्ट्स पण खूप चांगले आहेत. त्यामुळे तिला काही परदेशात जाणं फार पटलेलं नाही. पण माझ्यासाठी तयार झाली आहे. खरं सांगू? मला माझा हा अभ्यास खूप आवडतोय. त्यामुळे पुढंच शिकावं असं वाटतंय. अर्थात एकदा PhD पूर्ण झाली की लगेच परत येणार आम्ही."
"तुम्ही? बरं! म्हणजे लग्न करून जाणार. आता मी खरं सांगू? तुला परत येणं जमणार नाही."
"असं का म्हणतेस? तुला इतक्या सहजासहजी सोडेन असं वाटतंय का?" तो मिश्कीलपणे हसत म्हणाला.
चालता चालता थांबून ती म्हणाली; "सोडू देईन का? बेताल मै इतने जलदी तुम्हारा पिछा नही छोडुंगा! हा हा हा!" आणि दोघेही लोटपोट होत हसायला लागले. इतके की शेवटी वाळून बसावं लागलं त्यांना.
"विक्रम और बेताल! बघायचास का?" तिने त्याला विचारलं.
"ए मुली, त्यावेळी मी चड्डीत शुशू करायचो. मला नाही आठवत. पण ऐकलं खूप आहे बरं." त्याच्या उत्तराने ती परत हसायला लागली.
"हो रे. मी शाळेत होते तेव्हा. म्हणजे तू पिल्लुच असशील." ती म्हणाली.
दोघेही परत उठून चालायला लागले. तो काहीसा शांत झाल्यासारखा वाटला तिला. म्हणून वळून बघत तिने विचारलं; "लगेच फरक मोजलास का?"
"कसला फरक?" तिची नजर टाळत त्याने विचारलं.
"हे बघ! तुला आणि मला चांगलं माहीत आहे की मी तुझ्याहुन थोडी मोठी आहे. पण म्हणून आपली मैत्री होऊ शकत नाही असं नाही न? एक सांगू? मला नाही फरक पडत इतर काय म्हणतील याचा. माझ्या मनातल्या भावना जोपर्यंत स्वच्छ आहेत; आणि तुझी माझी भेट माझ्या नवऱ्यापासून लपवण्याचा माझा इरादा नाही; तोपर्यंत सगळं अलबेल आहे." ती शांतपणे म्हणाली.
"म्हणजे तू घरी जाऊन सांगणार आहेस की आज तू मला भेटलीस; की सांगूनच आली आहेस?" त्याने विचारलं. पण ती त्या प्रश्नाने काही क्षण स्थब्द झाली आणि मग एकदम मोकळं हसत म्हणाली; "मुद्दाम सांगणार नाही आणि विचारलं तर लपवणार नाही. एक लक्षात घे; मी माझ्या नवऱ्याशी प्रतारणा करत नाही आहे. पण माझं असं आयुष्य आहेच की. एक मुलगी आहे माझ्यात जिवंत! कायमची!" असं म्हणून ती त्याच्याकडे बघून डोळा मारत हसली. तो देखील हसला आणि म्हणाला; "चल, पाणी पुरी खाऊया." आणि दोघेही पाणी पुरीच्या ठेल्याच्या दिशेने निघाले.
"कशी जाणार आहेस परत? टॅक्सी?" त्याने विचारलं.
"अहं! आपण एकत्र जाणार आहोत ट्रेनने. दादर पर्यंत एकाच डब्यातून. मग मी ladies मध्ये जाईन आणि तू तुझी ट्रेन घे." ती मोकळेपणाने म्हणाली.
"माझी राणी ती." तो अगदी सहज म्हणून गेला आणि दोघेही मोकळे होऊन हसत निघाले.
दादर स्टेशन जवळ येत होतं. दोघे दारात उभे होते. तसं उभं राहायची दोघांनाही सवय आहे हे न सांगता दोघांना लक्षात आलं होतं; आणि एका वेगळ्याच भावनेने जोडले गेले होते दोघे.
ती ledies डब्यात चढली आणि मागे वळून म्हणाली; "पुढच्या वेळी खूप वेळ असताना मेसेज कर. एक सरप्राइज ठरवलं आहे मी."
"काय?" त्याने उत्सुकतेने विचारलं. पण तोपर्यंत गाडी सुरू झाली होती.
"सोचते रहो!" पुढे जाणाऱ्या गाडीमधून त्याच्या दिशेने शब्द आले आणि हसत हसत तो त्याची ट्रेन पकडण्यासाठी वळला.
***
'ऐतिहासिक वास्तूंबद्दल तुझं काय मत आहे?' तिचा आलेला मेसेज वाचून तो एकदम गडबडला.
'कुठली ऐतिहासिक वास्तू बघायला जातो आहोत आपण?" त्याचा प्रश्न.
' परवा ग्रॅंट रोड स्टेशनला उतरून रस्ता क्रॉस करून समुद्राच्या बाजूला उभा रहा. संध्याकाळी साधारण पाच! चालेल?'
'पळेल.' त्याचं उत्तर.
तो रस्ता क्रॉस करत असतानाच त्याला ती दिसली. त्याने तिला हात केला आणि तिने टॉक्सिला. तो तिच्या जवळ पोहोचला तशी त्याला ढकलत तिने टॉक्सिमध्ये बसवलं आणि टॅक्सी ड्राइव्हरला म्हणाली; "चलो भैया."
"अग, पण कुठे जातो आहोत?" त्याने विचारलं. उत्तर टॅक्सी ड्राईव्हरने दिलं; "राजभवन की और जाना है न साहाब?"
"ऑ! अग? एकदम राजभवन? बरी आहेस न? ती वास्तू ऐतिहासिक आहे हे मान्य. पण तिथे तुझा-माझा काका बसला आहे का आपलं स्वागत करायला? वेड तर नाही न लागलं तुला?" त्याने तिच्याकडे बघत म्हंटलं.
"गप रे." त्याच्या दंडाला चापट मारत ती म्हणाली. राजभवनच्या अगोदर तिने टॅक्सी थांबवायला सांगितलं आणि पैसे देऊन उतरली. "मी उतरणार नाही. जोपर्यंत तू मला सांगत नाहीस की आपण नक्की काय बघायला जातो आहोत; मी उतरणार नाही." तो लहान मुलांच्या हट्टीपणाने म्हणाला. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने टॅक्सी ड्रायव्हरला म्हंटलं; "भैया आप जाओ." असं म्हणून ती चालायला लागली. तिच्याकडे एकदा हताश नजरेने बघत तो टॅक्सीतुन उतरला आणि तिच्या मागे चालायला लागला.
दोन इमारतींच्या मधल्या चिंचोळ्या काहीसा उतार असलेल्या गल्लीतून ती चालायला लागली आणि स्वतःचा कॅमेरा सावरत तो देखील तिच्या सोबत निघाला. त्यांना फार चालावं लागलं नाही. थोडं पुढे गेले आणि उजव्या बाजूला एकदम एक तलाव सामोरा आला. दोन दिपमाळांच्या मधून पायऱ्या उतरत दोघे पाण्याच्या जवळ गेले. पाणी काहीसं अस्वच्छ होतं. चारही बाजुंनी बांधून काढलेल्या पायऱ्या होत्या. आणि नंतर जी भिंत होती ती म्हणजे कोणाची ना कोणाची तरी वयक्तिक मालमत्ता होती.
"भर वस्तीतला हा तलाव कुठू शोधून काढलास ग?" त्याने कॅमेराला लावलेला डोळा गेल्या दहा मिनिटात एकदाही बाजूला केला नव्हता. आजूबाजूला बदकं प्रचंड प्रमाणात होती आणि ती अगदी मनमोकळेपणाने फिरत होती. त्यांच्या मागे हळूच जात त्यांचे सगळे अविष्कार टिपण्याचा सपाटा लावला होता त्याने; आणि ती सोबत असूनही तिला पूर्णपणे विसरून फोटोंमध्ये मग्न झालेल्या त्याला पाहात ती समाधानाने हसत होती.
"तलाव? बाणगंगा आहे ही." तिने शांतपणे उत्तर दिलं.
अजूनही डोळा कॅमेरामध्येच! "बरं. कोणी बांधला?" त्याचा तो प्रश्न तिने ऐकला आणि शांतपणे म्हणाली; "ए दिड शहाण्या! ये इकडे ये. दंडाला भूक लागली आहे तुझ्या. प्रसादाची वेळ झाली."
तिने असं म्हणताच आपण चुकीचा प्रश्न विचारला आहे हे त्याच्या लक्षात आलं. कॅमेरा आवरून घेत तिच्या जवळ येऊन त्याने त्याचा दंड पुढे केला. त्याच्या त्या कृतीने तिला हसू आलं. त्याला चापटी मारत ती म्हणाली; "प्रभू रामचंद्रांनी बाण मारला आणि तिथून पाणी बाहेर यायला लागलं. तो पाण्याचा स्रोत अजूनही चालू आहे. पाणी नक्की कुठून येतं ते कोणालाही माहीत नाही. पण भर उन्हाळयात देखील हा तलाव पाण्याने भरलेला असतो... म्हणून याला बाणगंगा म्हणतात."
"OK! So that's an interesting mythological story." तो म्हणाला आणि अचानक तिचा पारा चढला. "ए आंग्ल भाषेवर प्रेम असणाऱ्या पोरा... एकतर हे समजून घे की; this is not mythology... In the word mythology itself they call the story as mith. For me its not a mith!!! पुराणातील कथा आहे ही. सतयुग, त्रेता युग तसं पुरणयुग होतं. त्या पुराण युगामध्ये घडलेल्या असंख्य घटना आहेत. त्यातलीच ही एक. Mith शब्दाचा अर्थ खोटं असा होतो. आणि पुराण शब्दाचा अर्थ खूप पूर्वीच्या युगामध्ये असा होतो. मुळात हा फरक समजून घे. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ते केवळ भौगोलिक जागेवर नाही... दुर्दैवाने आपल्या अस्तित्वावर देखील त्यांनी राज्य केलं. त्याचंच हे ज्वलंत उदाहरण."
तिच्या चढलेल्या आवाजाला शांत करत तो म्हणाला;"ठीक. नाही म्हणत याला mith! पण तूच मला सांग एक बाण मारून असा इतका मोठा तलाव तयार होईल का?"
"का? एक लहानसा अणुबॉम्ब एका मोठ्या देशाला नाहीस करू शकतो; तर एक लहानसा बाण का नाही जमिनीतून पाणी काढू शकत? हे बघ! नीट समजून घे. मी असं नाही म्हंटलं की आत्ता आपल्याला जे दिसतं आहे ते त्या बाणाने तयार केलं. मी इतकंच म्हंटलं की बाण मारला तिथून पाणी यायला लागलं." इतकं बोलून ती अचानक शांत झाली.
आपण काहीतरी चुकीचं बोललो आहोत आणि ती शांत झाली असली तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे हे लक्षात येऊन तो ती बोलायची वाट बघायला लागला.
"खूप प्रामाणिकपणे सांगू का?" तिने थोड्या वेळाने बोलायला सुरवात केली.
"सांग न!" तो अगदी शांतपणे म्हणाला.
"माझा हा विश्वास आहे की रामायण-महाभारत ही काव्य नाहीत तर आपला इतिहास आहे." ती म्हणाली.
"म्हणजे तुझं म्हणणं आहे की दहा तोंडांचा माणूस होता त्याकाळात? पुष्पक नावाचं विमान होतं? कृष्णाच्या सोळा सहस्त्र बायका होत्या? महाभारतातलं युद्ध खरंच घडलं?" त्याने विचारलं.
"हो!" त्याच्याकडे बघत ती म्हणाली.
"कसं? Please explain." तो म्हणाला.
तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि बोलायला लागली;"सर्वात महत्वाचं म्हणजे कन्याकुमारी इथे रामायण कालीन दगडी पुलाचे काही अवशेष आहेत. तसेच त्याच दगडांचे अवशेष श्रीलंकेच्या किनाऱ्यावर; जो आपल्या बाजूने येईल; आहेत. बाकी संपूर्ण श्रीलंकेतल्या दगडांमध्ये या दगडांचे साधर्म्य नाही; हे शास्त्रीय रित्या सिद्ध झालं आहे. आता तुझा प्रश्न. रावणाला खरी खरी दहा तोंडं कशी असतील? पण त्यामागची कारणमिमांसा समजून घे. अरे रावण मूळचा एका मुनींचा मुलगा होता. दशग्रंथी ब्राम्हण होता तो. त्याचं शिक्षण अत्यंत उत्तम प्रकारे त्या काळातील 'आश्रम' संकल्पनेनुसार झालं होतं. पुढे तो राजा झाला आणि तो एक उत्तम राजा होता. सोन्याचा धूर यायचा लंकेमधून; असं म्हंटलं जातं. म्हणजे त्याने राज्यकारभार देखील उत्तम चालवला. अशा राजाने दुसऱ्या राजाच्या पत्नीला पळवून आणणं हे सभ्यतेच वागणं नाही. स्वतःच्या मुलाला आपल्या अगोदर युद्धाला पाठवणं; हा राजाचा निर्णय असू शकत नाही. पण तरीही तो तसं देखील वागला. म्हणजेच एकाच व्यक्तीमध्ये अनेक रूपं दडली होती. तो त्याच्या प्रजेसाठी खूप चांगला होता; पण वयक्तिक आयुष्यात अत्यंत आत्मकेंद्री आणि अहंकारी होता. कदाचित त्याकाळचे लेखक अलंकारिक भाषेत आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करत असतील. आपण मंद बुद्धी लोकांनी रावणाला खरी खरी डोकी दिली; पण त्याच्या स्वभावातील विविध पैलू म्हणजे तो... असं म्हणायचं असेल त्यांना. तेच लॉजिक पुष्पक विमानाचं. चल काही क्षणांसाठी मी मान्य करते की पुष्पक नव्हतं. पण किमान विमान हा शब्द तर होता. उल्लेख होता त्या काळात. म्हणजे काहीतरी तर असेल न ज्ञान!
कृष्ण!! तो तर माझा सर्वात लाडका आहे. तर त्याच्या सोळा सहस्त्र पत्नी! अरे बुद्दु त्या विविध देशाच्या राजकन्या होत्या. नरकासुराने त्यांना पळवून आणलं होतं. श्रीकृष्णाने जेव्हा त्याचा वध केला त्यानंतर त्या स्त्रियांना सोडण्यात आलं. पण त्या स्त्रिया दुर्दैवाने परत आपल्या घरी जाऊ शकल्या नाहीत. कारण त्यांना स्वीकारलं नसतं गेलं; ही भीती होती त्यांच्या मनात. म्हणून मग त्यासर्वांना मिळून एक गाव वसवून दिलं श्रीकृष्णाने. तरीही त्यांना कोणीतरी त्रास देईल ही भावना त्याच्या मनात आली आणि त्याने त्यासर्वांना श्रीकृष्ण पत्नीचा दर्जा दिला. जेणेकरून सर्वसामान्य लोक त्यांना त्रास देणार नाहीत. आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर आहे. आपल्याला माहीत आहे की ते खरंच होते. त्यांची हिम्मत, युद्धनीती सगळंच कसं योग्य आहे. तरीही आपण असं म्हणतो की त्यांना स्वतः भवानी मातेने भवानी तलवार दिली. तूच सांग, असं होऊ शकतं का? नाही! पण तरीही त्यांच्याबद्दलचा आपल्या मनातल्या आदराचं रूपांतर अशा काही कथांमध्ये झालं न? मग पुराण काळातल्या घटनांवर किती पुटं चढली असतील; याचा विचार कर."
ती शांत झाली तसा तो म्हणाला; "ए! तुझ्या बोलण्यात लॉजिक आहे; पटतंय मला. सांग न अजून. मस्त वाटतंय ऐकायला हे सगळं इथे बसून."
त्याला परत एकदा चापट मारत एकदम गंभीर वातावरण बदलण्यासाठी ती म्हणाली; "बस् हं! इतकंच! बाकी कथांना तुझं तूच लॉजिक लाव. मी तुला इथे आणलं आहे ते या माहोलचा आस्वाद घ्यायला. तुझ्या प्रशांची उत्तरं द्यायला नाही."
"तिच्या त्या बोलण्याने तो हसला आणि म्हणाला; "बाकी कूच भी बोल; ये समा और ये माहोल बहुत ही रुमानी है। बिलकुल तुम्हारी तर्हा!" त्याचं बोलणं ऐकून ती एकदम गोडसं हसली आणि म्हणाली; "चल, कूच रुमानी हो जाए।" आणि दोघे तिथून उठले.
दोघेही तिथून बाहेर पडले. गप्पा मारत चालत होते ते आणि अचानक त्याच्या लक्षात आलं... "हँगिंग गार्डन?"
आणि परत एकदा ती... हसत.... "अहं! म्हातारीचा बूट! मी माझ्या लहानपणी इतक्या वेळा आले आहे न इथे. लेकाला देखील आणलं आहे एक-दोन वेळा. पण अगोदर म्हातारीचा बूट नाही. अगोदर इथे." असं म्हणून ती हँगिंग गार्डनच्या समोर असलेल्या बागेच्या दिशेने निघाली. तो ही तिच्या सोबत निघाला. ते आत आले आणि तो एकदम हरखुन गेला. एक प्रचंड मोठी बाग होती ती. मस्त walking treak होता आणि सर्वात सुंदर म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर स्पीकर्स लावले होते. हिंदी गाण्यांची मंद मोहक धून वातावरणात विरघळत होती. तिच्याकडे वळत तो म्हणाला; "आपल्या मोबाईलमध्ये तो बदामी डोळे असलेला स्मायली आहे न... तसे झालेत माझे डोळे अशी कल्पना कर."
एकदम गंम्मत वाटली तिला त्याच्या बोलण्याची आणि खुदकन हसली ती. तशी पटकन कॅमेऱ्याने क्लीक केलं. पण आता तिला त्या क्लीकची सवय झाली होती. या बागेत पोहोचल्यापासून ती एका वेगळ्याच जगात गेली होती जणूकाही. हलकेच गुणगुणत होती स्वतःशी. "नशीब मोठ्याने म्हणत नाही आहेस गाणं." तो म्हणाला. त्यावर तो पुढे काय म्हणणार आहे याचा अंदाज येऊन ती खळखळून हसली. तरीही तो म्हणालाच; "हो! गुणगुणण इतकं गद्य आहे तर गाणं कसं असेल?"
दोघेही मघाचा वाद विसरले होते. त्या मंद-धुंद वातावरणात ते दोघेही हरवले होते. आपापले... आणि एकत्र! काळोख व्हायला लागला आणि तिने त्याला खुण केली. एकदा म्हातारीच्या बुटाजवळून लाडक्या चौपाटीचं मोहक विहंगम रूप बघून ते निघाले.