Friday, March 12, 2021

व्हर्चुअल वर्ल्ड

 व्हर्चुअल वर्ल्ड


अनिकेत आणि सुरभी दोन वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले ते एका मल्टिनॅशनल कंपणीमधल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी. अनिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि सुरभीचा इंटरव्ह्यू HR डिपार्टमेंटमध्ये होता. इंटरव्ह्यूसाठी थांबले असताना झालेली ओळख दोघांना त्याच कंपनीमध्ये नोकरी लागल्याने वाढत गेली आणि दोघे कधी प्रेमात पडले ते कळलंच नाही. दोघे दोन वेगळ्या ठिकाणी राहात होते; पण वर्षभरात त्यांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि एकत्र राहायला लागले.

सुरभी अत्यंत बडबडी होती. त्यामानाने अनिकेत शांत स्वभावाचा. सुरभिचे अकाउंट्स सगळ्या सोशल मीडियावर होते. तर अनिकेत गरज म्हणून फक्त whatsapp वापरत होता. सुरभीला सतत live राहायला आवडायचं तर अनिकेतचं म्हणणं असायचं की आपलं वयक्तिक आयुष्य का सांगायचं दुसऱ्याला? दोघांचे वाद झालेच तर फक्त या एकाच विषयावर होते. पण नव्या नव्हाळीचं प्रेम असल्याने ते वाद प्रेमाच्या ढगात विरून जात होते.

अनिकेत रागावला तर सुरभी त्याला काहीतरी सरप्राईज द्यायची आणि ती रुसली तर अनिकेत तिला मस्का मारायची एकही संधी सोडायचा नाही. दोघांचं कसं छान चालू होतं.

आता दोघांनीही आपापल्या घरी एकमेकांबद्दल सांगितलं होतं. तसं नाही म्हणण्यासारखं काहीच नसल्याने दोघांच्याही घरचे लग्नाची घाई करायला लागले होते. मात्र सुरभीचं म्हणणं होतं की त्याने अजून मला ऑफिशिअली प्रपोज नाही केलेलं... तोपर्यंत लग्न काय मी साखरपुडा देखील करणार नाही. तिला एकदम रोमॅंटिक प्रपोजल हवं होतं. अनिकेतला वाटत होतं असं सिनेमातल्या सारखं काही करण्याची खरंतर काही गरज नाही. त्याला असं काही करायची इच्छा देखील नव्हती. पण तिचं मन मोडायला नको म्हणून तो देखील खास दिवसाचं प्लॅंनिंग करत होता.

पुढच्या महिन्यात सुरभीचा जन्मदिवस होता. तारीख होती तीन. अनिकेतने ठरवलं होतं की प्रत्येक दिवशी काहीतरी खास वेगळं असं करायचं सुरभीसाठी आणि जन्म दिवसादिवशी प्रपोज करायचं. सुरभीला याची कल्पना देखील नव्हती. अनिकेत कदाचित तिच्या वाढदिवशीच तिला प्रपोज करेल असा तिचा कयास होता. त्यामुळे ती अधून मधून त्याबद्दल बोलून त्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत होती.

सुरभी : You are on facebook live Aniket.... so tell me how much do u love your girlfriend?

अनिकेत : सुरभी! हे facebook live बंद कर बघू आधी.

सुरभीने facebook live पॉज केलं आणि तशीच स्क्रीनमधून अनिकेतकडे बघत म्हणाली; "असं काय करतोस रे? गंम्मत म्हणून थोडा वेळ बोल न...." आणि परत चालू करत तिने सुरू केलं

सुरभी : So tell me Aniket; how will you explain your love for your girlfriend?

अनिकेत : I love my girlfriend and I think that is very personal. So I don't have to explain it to all those who are going to watch this video just for few seconds.

अनिकेतचं उत्तर ऐकून सुरभी नाराज झाली आणि facebook live बंद करत हॉलमध्ये निघून गेली. थोडा वेळ तसाच गेला आणि अनिकेत सुरभिजवळ जाऊन बसला.

अनिकेत : सुरभी हे सतत इथे तिथे live जायचं आणि आपल्या आयुष्यातले नाजूक सुंदर क्षण लोकांसमोर उघडे करायचे.... हे मला काही पटत नाही.

सुरभी : पण अनिकेत, त्यात इतकं वाईट काय आहे ते तर सांग. का आवडत नाही तुला हे सगळं? अरे, तू देखील याच जनरेशनचा आहेस न? मग का एकदम आजोबांसारखं बोलतोस? आपण दोघे एकाच ऑफिसमध्ये असून देखील संपूर्ण आठवडा आपापल्या कामात असतो. आपण एकमेकांना भेटत नाही नीटसे; मित्र-मैत्रिणींना भेटणं अशक्य असतं. त्यात weekends ना तुला फक्त तू आणि मी असावं असं वाटतं. त्यामुळे आपण फारसं कोणालाही भेटत नाही. मग एकमेकांच्या आयुष्यातले updates कसे कळणार रे?

अनिकेत : पण सुरभी, मित्र-मैत्रिणींबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. तुला देखील माहीत आहे की मी introward असलो तरी मला देखील friends बरोबर chill करायला आवडतं. आपण जवळ जवळ दर शनिवारी भेटतो आपल्या friends ना. आपल्या आयुष्यात घडणारे छान प्रसंग आपण एकमेकांना सांगत असतोच न भेटल्यावर?

सुरभी : हो! भेटतो न; आणि सांगतो देखील. तुझ्या आणि माझ्या आई-बाबांनी लग्नाला होकार दिला तो गुरुवारी आणि आपण सगळ्यांना पार्टी कधी दिली? रविवारी. तोपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं की आपण घरी सांगितलं आहे. बरं, सांगितलं ते कोणाला? त्याच त्या friends ना. ज्यांना आपण दर शनिवार-रविवार भेटतो. अरे पण facebook, instagram, twiter या सगळ्यांमधून आपण वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात आपल्याला या social media वर. नवीन ओळखी होतात. आपल्या आयुष्यातले मजा असते रे.

अनिकेत : सुरभी, Don't you know, it is actually called vertual world. अग ते आभासी जग आहे ग. तिथे तू ज्यांना भेटतेस आणि ज्यांना friends या संज्ञेमध्ये घालते आहेस; त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे? नाव वैभव आणि फोटो एका stylish hunk चा आणि खऱ्या आयुष्यातली वैभवी; असं असतं या social media मध्ये. या असल्या आभासी लोकांना आपल्या आयुष्यात काय घडतं आहे ते का सारखं सांगायचं आपण?

सुरभी अनिकेतच्या बोलण्याने फारच वैतागली आणि म्हणाली;"कसलं आभासी जग आणि मित्र-मैत्रिणींसाठी कसल्या संज्ञा घेऊन बसला आहेस तू अनिकेत? अरे, आपल्या पोस्ट्स ना किती likes असतात आणि आपले video किती realistic आणि तरीही वेगळे असावेत यातच खरी गंम्मत असते. पण जाऊ दे. तुला नाही कळणार."

सहज गप्पांमधून सुरू झालेला विषय कुठल्याकुठे गेला आणि शेवट वादाने झाला.

प्रेम खूप होतं दोघांचंही एकमेकांवर. पण हे vertual world/आभासी जग दोघांच्याही मधली भिंत व्हायला लागलं होतं. सुरभीला अजून अनिकेतच्या नाराजीची पूर्ण कल्पना आली नव्हती. त्यामुळे ती या वादांना पेल्यातली भांडणं म्हणून सोडून देत होती. अनिकेत मात्र अशा प्रत्येक वादानंतर मनातून अस्वस्थ होत होता. त्याला नक्की काय पटत नाही ते सुरभीला सांगता येत नव्हतं; आणि अस्वस्थ मन ताब्यात देखील राहात नव्हतं.

पुढच्या महिन्याची पहिली तारीख सुरू झाली आणि अनिकेतने सकाळी सकाळी सुरभीला उठवलं. तिच्या समोर एक मस्त सजवलेलं टी-टेबल होतं. छान गरम गरम वाफाळता चहा, बाजूला गरम गरम पोहे, कलिंगडाच्या रसाचा ग्लास आणि एक सुंदर लाल गुलाबाचं फुल. अहाहा! सुरभीने डोळे उघडल्या उघडल्या हे बघितलं आणि ती फारच सुखावली. तिने अनिकेतकडे बघत एक फ्लाईंग किस दिली आणि घाईघाईने मोबाईल हातात घेतला. अनिकेतला काहीतरी सांगायचं होतं सुरभीला. पण सुरभीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तिने फेसबुक लाईव्ह करत बोलायला सुरवात केली...

"माझ्या गोड गोड बॉयफ्रेंडने आज मला एक वेगळंच सरप्राईज दिलं आहे. हे बघा! गरम गरम चहा, वाफळते पोहे आणि गार गार ज्युस.... त्यासोबत एक मस्त रोमँटिक टच असलेला लाल गुलाब. What more will I ask for?"

सुरभीने फेसबुक लाईव्ह बंद केलं आणि अनिकेतकडे बघितलं. त्याचा चेहेरा काहीसा उतरला होता. पण तिचं लक्ष आहे म्हंटल्यावर त्याने स्वतःला सावरलं आणि हसत हसत म्हणाला;"झालं का तुझं लोकांना सांगून? आता मी काही बोलू का?" सुरभी देखील हसत हसत 'हो' म्हणाली आणि त्याच वेळी तिचा फोन बीप व्हायला लागला. तिला काही क्षणातच कंमेंट्स यायला लागल्या. तिने फोन हातात घेतला आणि खुशीत चित्कारली;"हे... हे बघ! किती लाईक्स आहेत आपल्या फेसबुक लाईव्हला. प्रत्येकजण तुझं कौतुक करतो आहे; म्हणे फारच रोमँटिक आहेस तू. बघ बघ... फारच बुवा फेमस व्हायला लागला आहेस ह तू!" सुरभी तिच्याच नादात होती. पण तिने फोन हातात घेताच अनिकेत फारच नाराज झाला होता.

त्याला सुरभिशी बोलायचं होतं. खूप काही सांगायचं होतं. पण ती तिच्याच नादात होती. तिचा चेहेरा आनंदने बहरला होता. त्यामुळे तिचा आनंद कमी व्हायला नको म्हणून तो गप बसला. मात्र त्याच्या मनात एका क्षणासाठी येऊन गेलंच; 'हिला मी हवा आहे की फक्त मी केलेलं हे सगळं सरप्राईज? हे सगळं करतानाचं माझं तिच्याबद्दलचं प्रेम तिच्या लक्षात येतंय का?'

अनिकेत उठला आणि ऑफिसची तयारी करायला लागला. सुरभीने देखील तिचा सोशल मीडिया आवरता घेत तयारी केली आणि दोघेही घाईघाईत ऑफिसला जायला निघाले. घराचं दार ओढून घेताना अनिकेतची नजर गार झालेल्या चहावर आणि नेवून गेलेल्या पोह्यांवर गेली आणि त्याचं मन अजूनच दुखावलं.

त्यादिवशी अनिकेतला ऑफीसमध्ये बरंच काम आलं. दोन महत्वाच्या मीटिंगस लागोपाठ लागल्या. त्यामुळे सुरभी एकटीच घरी आली. दुसऱ्या दिवशी देखील त्याच्या मनात असणारं असं तो काही करू शकला नाही. कारण दोघांनाही ऑफिसमध्ये बरंच काम होतं; त्यामुळे दोघेही घाईनेच निघाले. मात्र अनिकेतने मनापासून ठरवलं होतं की आज देखील तिच्यासाठी काहीतरी खास करायचं. त्यामुळे संध्याकाळी त्याने तिला एक whatsapp मेसेज केला की काही कामासाठी त्याला लवकर निघावं लागणार आहे आणि तो थेट घरीच येईल. सुरभीने मेसेज बघितला आणि OK म्हंटलं.

साधारण आठच्या सुमाराला सुरभी घरी पोहोचली. तिने दार उघडलं तर घरात पूर्ण अंधार होता. अनिकेत सहसा इतका अंधार ठेवत नसे. तिने चाचपडत दिव्याची बटणं चालू केली. पण दिवे लागलेच नाहीत. तिला थोडंसं आश्चर्य वाटलं. घराच्या बाहेर पॅसेजमध्ये तर दिवा चालू आहे. तिची नजर खिडकी बाहेर गेली आणि तिच्या मानत आलं; 'अरे बाहेर देखील दिवे चालू आहेत; मग घरातले दिवे का लागत नाहीत? बिल भरायचं राहिलं की काय?' ती विचार करतच होती इतक्यात अचानक संपूर्ण हॉलमध्ये फेरी लाईट्स लागले. लुकलूकणारे वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या दिव्यांच्या माळा मंद प्रकाशात उजळत होत्या. तिने नजर उचलून बघितलं तर अनिकेत खोलीच्या एका कोपऱ्यात हसत उभा होता. सुरभीचं लक्ष जाताच त्याने जवळच्या सुंदर कॅडल्स लावल्या आणि हलकी हलकी पावलं टाकत तिच्या जवळ यायला लागला. सुरभिचा चेहेरा आनंदने फुलला होता.... आणि तिने झटकन तिचा मोबाईल हातात घेतला. ती घाईघाईने संपूर्ण हॉलचे फोटो काढत होती आणि विडिओ काढत होती. तिची कृती बघून अनिकेत थबकला.

सुरभीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती काढलेले फोटो आणि विडिओ पोस्ट करण्यात गुंतली होती. अनिकेतने तिला हाक मारली.... सुरभी!

सुरभी : हम्म?

अनिकेत : इथे बघ तर खरं!

सुरभी : काय रे? एकच मिनिट हं. झालंच.

अनिकेत : खरंच ते फोटो आणि ते विडिओ इतके महत्वाचे आहेत का? मी काहीतरी सांगतो आहे ग.

अनिकेतचा आवाज काहीसा दुखावला होता. सुरभीच्या ते लक्षात आलं आणि तिने पटकन मोबाईल असलेला हात खाली घेतला आणि पुढे झाली. अनिकेतच्या गालावर एक हलकीशी किस करत म्हणाली;"sweetheart, U really made my day. Trust me, had never expected this. खरंच खूप खूप खुश आहे मी."

तिचं बोलणं ऐकून अनिकेत सुखावला. क्षणापूर्वी दुखावलेल्या मनाला आतल्या आत समजावत त्याने सुरभीचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवत त्याने तिच्या हातात एक गिफ्ट ठेवलं. ते गिफ्ट बघून सुरभी सुखावली आणि म्हणाली;"उद्याचं गिफ्ट आजचं? का रे?"

त्यावर हसत तो म्हणाला;"हे आजचं आहे माझ्या राणी. उद्यासाठीची तयारी आहे ती. बघ तर खरं उघडून."

त्याच्याकडे प्रेमळ नजरेने बघत सुरभीने गिफ्ट उघडलं. आत एक अत्यंत सुंदर डिनर गाऊन होता. तो हातात घेत सुरभी उभी राहिली आणि तिने तो अंगाला लावला. इतका सुंदर ड्रेस बघून ती फारच खुश झाली. परत एकदा अनिकेतला किस करत ती चित्कारली.... thank you so much my sweets....

तिचे हसरे डोळे बघत अनिकेतने काहीतरी बोलायला तोंड उघडलं.... पण सुरभी तो ड्रेस अंगावर वागवत फोन हातात घेऊन सेल्फी काढण्यात गुंतली होती. वेगवेगळ्या अँगल्सने स्वतःचे फोटो काढत ते पोस्ट करण्यात ती गुंतली आणि एक हताश नजर तिच्याकडे टाकून अनिकेत आतल्या खोलीत गेला. जाता जाता फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला;"उद्या आपण डिनरला जातो आहोत." फोटो काढण्यात मग्न सुरभीने फक्त 'OK' म्हंटलं. खोलीपर्यंत गेलेल्या अनिकेतने एकदा मागे वळून बघितलं आणि नकारार्थी मान हलवून तो आत जाऊन झोपून गेला.

त्या रात्री बारा वाजता सुरभीला अनेक फोन्स आले.... ती प्रत्यकाकडे अनिकेतचं कौतुक करत होती. आदल्या दिवशीचा ब्रेकफास्ट आणि आज संध्याकाळचं सरप्राईज. तिच्यासाठी दोन्ही खूप खास होतं; हे ती प्रत्येकाला सांगत होती. पण अनिकेतला यातलं काहीच माहीत नव्हतं. कारण तो गाढ झोपला होता.

आज सुरभीचा वाढदिवस होता. उगाच सुट्टी घेण्यापेक्षा रात्री मस्त डिनर करायचं दोघांनी ठरवलंच होतं. त्यामुळे दोघेही ऑफिसला गेले. तिचा वाढदिवस ऑफिसमध्ये देखील मस्त साजरा झाला. दोघा लव्ह बर्डसना काहीसं लवकर निघायची परवानगी देखील मिळाली.

अनिकेत आणि सुरभी घरी पोहोचले.

सुरभी : कुठे जाणार आहोत आपण अनिकेत?

अनिकेत : तुझ्यासाठी सरप्राईज आहे ते राणी. बस् तयार हो मस्त.

त्याचं बोलणं ऐकून सुरभी हसली आणि तयार व्हायला आत पळाली.

दोघे घरातून बाहेर पडले त्यावेळी अगदी दृष्ट लागेल असा जोडा दिसत होता. नेहेमीप्रमाणे सुरभीने वेगवेगळ्या अँगल्सने दोघांचे आणि तिचे एकटीच फोटो काढलेच. पण अनिकेत काही म्हणाला नाही. आजचा दिवस तिचा आहे; तिला उगाच नाराज का करा; असा विचार त्याने केला.

अनिकेतने एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या टेरेसवर खास टेबल बुक केलं होतं. सुरभी प्रत्येक क्षणाला खुश होत होती. तिचा फोन एका सेकंदासाठी देखील बंद नव्हता.

आम्ही एका खास डिनरसाठी आलो आहोत....
हे टेरेस... इथला व्यु अप्रतिम आहे....
कॅडल लाईट डिनर.... माझं स्वप्न मी जगते आहे....
रेड वाईन.... अहाहा.... अजून काय हवं वाढदिवसा दिवशी....
अनिकेत समोर आहे... तो ऑर्डर देतो आहे....
हे खास पदार्थ आहेत या हॉटेलचे....
अय्या.... व्हायोलिन वादक??? कित्ती गोड.....

सुरभीची सतत कॉमेंट्री चालू होती....... कारण ती घरातून निघाल्यापासून फेसबुक लाईव्ह होती. तिने क्षणासाठी देखील तिचा फोन बंद केला नव्हता.

हळूहळू अनिकेतची नाराजी वाढायला लागली होती. पण अजूनही तिला वाईट वाटू नये म्हणून तो काही बोलला नव्हता. डेझर्ट आलं.... सुरभीला आवडणारी कुल्फी होती. वेगवेगळ्या प्रकारे फोटो काडून कुल्फी खायचं सोडून ती ते फोटो अपलोड करण्यात गुंतली. आता मात्र अनिकेतचा बांध फुटला आणि तो काहीशा तीव्र स्वरात म्हणाला;"अग बाकी सगळं थांबेल एकवेळ पण ती कुल्फी तुझे फोटो होईपर्यंत वितळून जाईल त्याचं काय? खा की ग नीट. तुझं सगळं लक्ष त्या फोनमध्ये आहे."

त्याचं बोलणं ऐकून सुरभीने क्षणासाठी फोन बाजूला केला आणि त्याच्याकडे बघत म्हणाली;"अनिकेत, कसं कळत नाही तुला? हीच तर खरी मजा आहे. हे जे काही आज तू माझ्यासाठी केलं आहेस ते मला सगळ्यांना सांगायचं आहे. मी तुझ्यासाठी किती स्पेशल आहे ते सगळ्यांना समजलं पाहिजे न."

अनिकेत : अग, तुला माहीत आहे न? बास की. सगळ्यांना का सांगायला हवं? काय फरक पडतो त्यांना? सुरभी आजचा दिवस तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खास आहे ग. इतरांसाठी नाही. बघ तरी माझ्याकडे एकदा.

अनिकेत पोटीडकीने म्हणाला पण सुरभिचं त्याच्याकडे लक्षचं नव्हतं. खिशातून बाहेर काढलेली अंगठी परत आत ठेवत हताशपणे अनिकेतने बिल मागवलं आणि पैसे देऊन तो उभा राहिला. तो उठला तशी सुरभी देखील उठली आणि त्याच्या सोबत चालायला लागली.

दोघे घरी आले तोपर्यंत अनिकेत काहीही बोलला नव्हता. पण सुरभीला त्याचं गप्प राहाणं जाणवलं देखील नव्हतं. इतकी ती तिच्या फोनमध्ये गढली होती. दोघे घरी आले. अनिकेतने सुरभिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. तो तिच्या पुढ्यात बसला. सुरभीच्या हातात फोन होता तो बाजूला करत अनिकेतने तिचे दोन्ही हात हातात घेतले. सुरभीने देखील हसत त्याचे हात धरले आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली;"अनिकेत, तू खरंच गेले तीन दिवस माझं खूप कौतुक केलं आहेस. मला खरंच सातव्या आसमंतात असल्यासारखं वाटतंय."

तिचं बोलणं ऐकून अनिकेतला बरं वाटलं. त्याने तिचे हात थोपटले आणि सोडले. तिच्या डोळ्यात बघत त्याने हलकेच एक हात खिशात घातला अंगठी बाहेर काढायला आणि सुरभीचा फोन किणकिणला. क्षणात अनिकेतच्या डोळ्यात गुंतलेली नजर सोडवत सुरभीने तिचा फोन हातात घेतला.

तिच्या त्या कृतीने अनिकेत प्रचंड दुखावला गेला. तो तटकन उभा राहिला आणि म्हणाला;"सुरभी, आत्ता याक्षणी ठरव... तो फोन दूर ठेऊन माझं म्हणणं ऐकणार आहेस का.... नाहीतर....."

सुरभी फोनमधला मेसेज वाचत होती. एकदम तिरासटत ती म्हणाली;"अनिकेत, किती विचित्र आहेस रे तू? सगळे माझं कौतुक करत आहेत सगळ्या सोशल साईट्सवर. तुझं देखील कौतुक करत आहेत... तू स्वतः तर नाहीसच कुठेच आणि मला देखील सतत त्यांच्यापासून लांब करायला बघतो आहेस. का रे असा वागतोस?"

तिच्या पासून दोन पावलं लांब जात अनिकेत म्हणाला;"मी तुला त्या आभासी जगातून या खऱ्या जगात आणायचा प्रयत्न करतो आहे सुरभी. तुला खरंच कळत नाही का... अग, रे खरं जग नाही ग..."

सुरभी त्याच्या बोलण्याने वैतागली आणि त्याच्याकडे न बघता म्हणाली;"अनिकेत हेच जग खरं आहे. थोडा विचार कर म्हणजे तुला पटेल."

अनिकेतचे डोळे एकदम पाणावले. त्याचं मन खूपच दुखावलं. तिच्याकडे बघत तो म्हणाला;"ते जग खरं आहे सुरभी? खरंच? बर!"

एवढं म्हणून तो आत निघून गेला. सुरभीला लक्षातच आलं नाही की अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिच्या मोबाईलमध्येच गढली होती. किती वेळ गेला सुरभीला कळलं नाही. फोनमध्येच काहीतरी करत असताना सुरभीला झोप लागली.

सकाळी सुरभीला जाग आली ते फोनच्या बीपने. तिने फोन उचलून बघितलं तर तिला व्हॉइस मेल होता. अनिकेतकडून! तिने हसत हसत फोन चालू केला आणि त्यातून अनिकेटचा आवाज आला...

"सुरभी, तुला खरंच अस वाटतं न की ते आभासी जग खरं आहे? तुला खरंच मी तिथे यायला हवा आहे न? खुश होशील न मी देखील तिथे असलो की? सुरभी माझं तुझ्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे तुला आनंद वाटेल असं सगळं करायला मी तयार आहे...."

अनिकेतचं बोलणं ऐकून सुरभीच्या चेहेऱ्यावर हसू पसरलं. ती काही बोलणार इतक्यात परत एकदा अनिकेतचा आवाज फोनमधून आला....

आत येतेस सुरभी?

फोनमध्ये बघत बघत सुरभी आतल्या खोलीच्या दाराशी गेली आणि.... सुरभीच्या घशात आवंढा अडकला गेला....

समोर खोलीमधल्या पंख्याला लटकत अनिकेतने फाशी लावून घेतली होती....

सुरभीच्या फोनमधून अजूनही आवाज येत होता.....

तुला मी हवा आहे न आभासी जगात... आता यापुढे मी कायम आहे तुझ्यासोबत... तिथे आभासात! तू तिथे येइपर्यंत!!!

समाप्त

No comments:

Post a Comment