भूक
सुप्रियाची सुनंदा आत्या नाशिकमध्ये एकटीच राहात होती. सुनंदा आत्याने नुकताच एक लहासा तिच्यापुरता असा फ्लॅट घेतला होता एका नवीन होणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये आणि या वयात देखील अगदी हौसेने सजवला होता. सुप्रियला तिच्या सुनंदा आत्याचं खूप कौतुक वाटायचं. एकटी राहात होती तरी एकदम खुश असायची. या वयात देखील तिने whatsapp, facebook कसं वापरायचं ते शिकून घेतलं होतं आणि ती ते अगदी सफाईदारपणे वापरत देखील होती. सुप्रिया देखील तिच्या आत्याची अत्यंत लाडकी भाची होती. भावाला उशिरा का होईना पण गोंडस बाळ झालं याचा आत्याला खूप आनंद होता. त्यात सुप्रिया अत्यंत गोड आणि साधी सरळ मुलगी होती. एकुलती एक आणि उशीरा झालेली असल्याने खूप लाडात वाढली होती; पण तरीही तिने तिचं करियर खूप छान वाढवलं होतं.
आज सुप्रिया सुनंदा आत्याकडे राहायला येणार होती. सुप्रियाने नुकतीच नोकरी बदलली होती. नवीन जॉबला जॉईन होण्या अगोदर तिने दोन दिवसांचा ब्रेक घेतला होता आणि दोन दिवस सुनंदा आत्याकडे राहायला जायचं ठरवलं होतं. त्यामुळे आत्या सकाळपासूनच खुश होती. सुप्रिया संध्याकाळी पोहोचणार होती. त्यामुळे आत्याने दिवसभर खपून सुप्रियाला आवडणारे लाडू, चकली, गुळपोळी असे अनेक पदार्थ केले होते आणि ती अगदी अधिरपणे सुप्रियची वाट बघत होती.
साधारण सातच्या सुमाराला घराची बेल वाजली आणि आत्या स्वयंपाकघरातून लगबगीने दाराकडे धावली. दारात सुप्रियला बघून सुनंदा आत्या एकदम खुश झाली. सुप्रिया दारातच आत्याच्या गळ्यात पडली आणि तिची पापी घेत म्हणाली;"बघ, म्हंटल्याप्रमाणे आले की नाही तुझ्याकडे राहायला?" आत्या देखील तिला मिठीत घेत म्हणाली;"हो ग माझ्या लाडोबा. तुला बघून खूप खूप बरं वाटतंय ग. बरं झालं आलीस. ये आत ये." असं म्हणत आत्याने तिला आत घेतलं. सुप्रिया आत येऊन आत्याचा लहानसा पण सुंदर सजवलेला हॉल बघून एकदम खुश झाली.
"आत्या मस्तच सजवला आहेस ह फ्लॅट. केवढा हा उत्साह ग तुला. तुझ्या इतकी एनर्जी मला पण मिळाली पाहिजे. मी तर नोकरी ऐके नोकरी करून देखील दमून जाते." सुप्रिया आत्याचं कौतुक करत म्हणाली.
त्यावर मनापासून हसत आत्या म्हणाली;"अग one BHK तर आहे हा. त्यात जसं जमलं तसं केलंय ग. अभय-अंजली होतेच न मदतीला."
अभय दादाचं नाव ऐकून सुप्रियाने विचारलं;"अरे हो. कसा आहे ग दादा? अंजली वहिनीची नोकरी कशी आहे? अजूनही फिरावं लागतं का ग तिला?"
स्वयंपाकघराकडे जात सुनंदा आत्या म्हणाली;"हो ग. हा फिरतीचा जॉब म्हणजे फार कठीण. तरी बरं. अभय असतो शहरातच. त्यामुळे विपुलकडे पाहाणं सोपं जातं. मला देखील मनात येतं जावं तिथेच राहायला. पण दुरून प्रेम जास्त टिकतं ग; आणि त्यात एकदा हात-पाय चालेनासे झाले की जायचंच आहे त्यांच्या संसारात. बरं ते जाऊदे. तू तुझी बॅग आत ठेव आणि हात-पाय धुवून घे बघू. तुझ्यासाठी किती काय काय केलं आहे."
बेडरूमच्या दिशेने जात सुप्रिया म्हणाली;"मला खात्रीच होती ग आत्या तू माझ्या आवडीचं सगळं करून ठेवलं असशील. मस्त चहा ठेव दोघींसाठी. मी फ्रेश होते. आईने देखील तुझ्यासाठी काही काही दिलं आहे. माझी बॅग त्यानेच जास्त भरली आहे."
त्यावर मनातून खुश होत आत्या म्हणाली;"कशाला उगाच सुनीताने त्रास करून घेतला. इथे तसं सगळंच मिळतं ग. बरं, ये तू फ्रेश होऊन. मी चहा ठेवते."
सुप्रिया आतल्या खोलीत गेली आणि तिने तिची बॅग खोलीतल्या एकुलत्या एका पलंगावर ठेवली. आत्याने तिची बडेरूम देखील छान करून घेतली होती. बेडच्या वरच पुस्तकं ठेवायचं शेल्फ होतं. बेड समोर TV आणि बाजूला कपाट. एका व्यक्तीसाठी सगळं काही होतं त्या खोलीत. सुप्रियाने गाऊन काढला बॅगेतून आणि तिचं लक्ष आत्याच्या पुस्तक साठ्याकडे गेलं. समोरच नारायण धारपांच्या पुस्तकांची चळत बघून सुप्रियला हसायलाच आलं.
फ्रेश होऊन बाहेर येताना नारायण धारपांच्या पुस्तकांमधली दोन पुस्तकं उचलून आणत आणि ती आत्याला दाखवत सुप्रिया म्हणाली;"आत्या, अजूनही नारायण धारपांची ही भुताटकीवाली पुस्तकं तू वाचतेस? कमाल आहे ह. तुला भिती नाही का ग वाटत? एकतर या नवीन कॉम्प्लेक्समध्ये आली आहेस राहायला. त्यात हा सहावा मजला आणि अजून शेजारी कोणी आलेलं दिसत नाही. त्यात घरातसुद्धा तू एकटीच आहेस. तरीही वाचतेस असली पुस्तकं?"
चहा घेऊन बाहेर येत आत्या हसत म्हणाली;"प्रियु बेटा भुतं पुस्तकात नसतात; आपल्या मनात असतात. भ्यायचंच असेल न तर आपल्या मनाला भ्याव माणसाने. या पुस्तकांना नाही ग; आणि एकटी कुठे? खालच्या मजल्यावरच्या काळे वाहिनींशी मस्त मैत्री झाली आहे माझी. आम्ही दोघी एकत्रच बाजारहाट वगैरे करत असतो."
चहाचा कप हातात घेत सुप्रिया म्हणाली;"आत्या, भुतं नाहीत हे मला नाही पटत. अग इतके लोक त्यांचे अनुभव सांगत असतात भुतं बघितल्याचे. ते काय खोटे असतील?"
सुप्रियच्या पुढ्यात चकलीची प्लेट करत आत्या म्हणाली;"कसले अनुभव घेऊन बसलीस ग. माझा नाही यावर विश्वास; आणि तू सुद्धा हे सगळं मनातून काढून टाक बघू. एक लक्षात ठेव बेटा, मनी वसे ते स्वप्नी दिसे बरं!"
आत्याच्या या बोलण्यावर दोघीही हसल्या आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये रंगून गेल्या.
रात्री जेवणं आटोपून सुप्रिया आणि आत्या दोघी बेडरूममध्ये झोपायला आल्या. आत्याने सुप्रियासाठी खाली गादी घातली होती. सुप्रिया आडवी पडली. दिवसभराच्या दगदगीने तिचे डोळे मिटत होते; ते आत्याच्या लक्षात आलं आणि ती आपणहूनच म्हणाली;"पियु बेटा झोप तू. दमली असशील आज खूपच. उद्या मस्त भटकायला जाऊया आपण." हसून 'बरं' म्हणत सुप्रियाने डोळे मिटले. आत्या देखील दिवा बंद करून आडवी झाली.
किती वाजले होते कोणास ठाऊक... पण अचानक सुप्रियला जाग आली. खोलीत मिट्ट अंधार होता; पंखा बंद होता आणि वारा देखील पडलेला होता. सुप्रिया घामाघूम झाली होती. ती उठून बसली आणि तिचं लक्ष खोलीच्या मोठ्या खिडकीकडे गेलं आणि सुप्रियच्या तोंडून मोठी किंचाळी बाहेर पडली. खिडकीच्या बाहेर कोणीतरी उभं होतं... एक किडकिडीत मुलगा.... किंवा माणूस! सुप्रिया पार घाबरून गेली आणि त्याचवेळी तिला आत्याचा आवाज हॉलमधून आला.... "दिसला का तुला तो? घाबरू नकोस. ये बाहेर."
सुप्रिया घाईघाईने उठून बाहेर हॉलमध्ये आली. बाहेरून जेमतेम उजेड येत होता त्या उजेडात सुप्रियला आत्या हॉलमधल्या सोफ्याच्या मोठ्या खुर्चीमध्ये बसली दिसली. तिच्या समोर बसत सुप्रियाने विचारलं;"अग, वीज गेली आहे वाटतं. पंखा बंद म्हणून मला जाग आली तर एकदम अंधार की ग. आणि काय होता तो प्रकार आत्या? अग सहाव्या मजल्यावर ना तुझा हा फ्लॅट? मग? कोण होता तो इतक्या वर चढून आला. आणि तू थंडपणे म्हणते आहेस दिसला का? घाबरू नकोस!" सुप्रियाने एका दमात आत्याला विचारलं.
आत्या शांतपणे सांगायला लागली;"काय सांगू? तो... तो कोण आहे? तो म्हणजे भूक!"
सुप्रिया;"म्हणजे?"
"या कॉम्प्लेक्सचं काम चालू होतं तेव्हा तो इथे आई सोबत राहायचा. वेडा होता डोक्याने; त्यामुळे त्याला काम सुचायचं नाही. आईच काय ती काम करून थोडं काहीतरी कमवायची आणि दोघे रात्री एकत्र जेवायचे. तो असाच दिवसभर कोणत्या ना कोणत्या खिडकीबाहेर उभा राहून फ्लॅटच्या आत बघत बसायचा. कोणी समोर आलं की 'भूक... भूक...' म्हणायचा. एक दिवस त्याची आई काम करता करताच गेली. कशी गेली.... काय झालं... कोणालाही कळलं नाही. कामावरच्या मुकादमाने अंगावर बालंट नको यायला म्हणून इतर मजुरांच्या मदतीने तिचं सगळं क्रियकर्म करून घेतलं. इतक्या घाईने की मुलालासुध्दा घेतलं नाही सोबत. मुलगा काय ग.... उभा होता कुठल्यातरी खिडकीमध्ये... त्याच्या आईची वाट बघत. रात्र झाली.... दुसरा दिवस... तिसरा दिवस... आणि तो मुलगा तसाच उभा होता खिडकीत. इतर कामगार बघायचे त्याला; पण प्रत्येकाचं पोट हातावर. कोण काय मदत करणार? आणि एक दिवस तो वेडा देखील तिथेच पडला. मग त्याचं क्रियकर्म देखील असंच उरकलं गेलं. पण त्यानंतर तो अनेकांना दिसतो असा खिडकीत उभा राहिलेला. नीट ऐकलं तर त्याने म्हंटलेलं ते 'भूक...भूक...' देखील ऐकायला येतं. आणि जर ते नाही तर........"
इतक्यात एकदम वीज आली आणि अचानक घराची बेल वाजली. बेल ऐकून सुप्रिया दचकली आणि गर्रकन वळून पटकन उठून तिने दार उघडलं. समोर आत्या उभी होती कोणाशीतरी मोबाईलवर बोलत!!! सुप्रियच्या तोंडचं पाणी पळालं..... ती धडपडत मागे सरकली आणि परत गर्रकन मागे वळत तिने आत्या होती त्या सोफ्याकडे बघितलं..... सोफ्याची खुर्ची डोलत होती आणि सुप्रियला आवाज आला....
जर ते नाही तर..... आई येते त्याचं दुःख सांगायला.!!"
समाप्त
जबरदस्त.....अगदी रत्नाकर मतकरींची आठवण झाली
ReplyDelete- स्नेहा पंडित
नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी माझे आवडते लेखक. भयकथा हा सर्वात आवडता जॉनर
Deleteया कथेचा शेवट तुम्ही केला आहे तो केवळ अफलातून आहे अंगावर काटा आला आज नारायण धारप असते त्यांनी नक्की तुमचं कौतुक केलं असतं
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद अमित
Deleteएकदम मस्त कलाटणी देणारा शेवट. मस्त थरारक.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Delete