Friday, March 26, 2021

9 मिनिटं 28 सेकंदांचा अनुभव

 लेखाचं शीर्षक वाचून 'ज्योतीने लिहिलेली अजून एक भय/रहस्य/गूढ कथा'असं वाटलं असेल न तुम्हाला? पण नाही हं! हा अनुभव खरा आहे आणि म्हणून तो भय/रहस्य/गूढ नाही तर खूप खूप आनंद आणि समाधान देणारा आहे. या नऊ मिनिटांची सुरवात झाली साधारण जानेवारीच्या मध्यावर. मी आणि माझी जिवलग मैत्रीण अर्चना गोरे बांद्राच्या ऍनिमेशन शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूटला गेलो होतो. तिथले मॅनेजिंग डायरेक्टर श्री. मिलिंद वगळ यांनी त्यांची इन्स्टिट्यूट बघण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. त्यावेळी मी लिहिलेल्या एका कथेवर एक ऍमिनेटेड फिल्म करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तिथून बाहेर पडल्यावर मी आणि अर्चना बराचवेळ गप होतो.... आणि मग दोघींनी एकाचवेळी म्हंटलं दुसऱ्या कोणाला आपली कथा देण्यापेक्षा आपणच करूया का एखादी शॉर्ट फिल्म! बस्... तो विचार मनात आला आणि मग मात्र मी अर्चना आणि मंदार आपटे (गायकगीतकार आणि संगीतकार) यांच्या मागे लागलो. 


आता कदाचित तुमच्या मानत येईल अर्चना आणि मंदारचा फिल्म बनवण्या संदर्भात काय संबंध? तर.... अर्चना आणि मंदार दोघांनी मिळून साठहुन अधिक शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज आणि म्युझिकल सिंगल्सचे दिग्दर्शन केले आहे. काही advertisement videos देखील त्यांनी बनवले आहेत. अगदी professionally. त्यामुळे शूटिंग आणि त्यासंदर्भातला अनुभव त्यांना चांगलाच आहे. मात्र फिल्म जगत! एक वेगळंच विश्व! सिनेमागृहात जायचं सिनेमा बघायचा आणि आवडला/नावडला याची चर्चा करायची... इतकाच या विश्वाशी आजवर माझा संबंध होता. त्यामुळे पहिले अनेक दिवस आम्ही कोणत्या कथेवर शॉर्ट फिल्म करता येईल हे ठरवण्यात घालवले. सरते शेवटी 'स्टुडिओ अपार्टमेंट' नावाची माझी एक कथा आहे. ती नक्की झाली. कथेचं स्क्रिप्ट लिहिणं हा पुढचा प्रश्न होता. तसं अर्चना आणि मंदारला स्क्रिप्ट लिहिणं शक्यच होतं. पण माझा आग्रह होता की मीच लिहीन. त्यांनी दोघांनी त्यासाठी 'हो' म्हंटलं आणि मी लिहायला बसले. पण.... स्क्रिप्ट लिहायचं??? म्हणजे नक्की काय असतं? बरं! फुशारकीने मीच लिहिते असं म्हंटल्यामुळे परत त्या दोघांना 'कसं लिहू'; म्हणून विचारणं जीवावर आलं होतं. सहज मनात आलं 'सतीश'जींना (सतीश राजवाडे, खरंच वेगळी ओळख सांगायला हवी का?) विचारून बघावं का? माझ्या मूळ स्वभावप्रमाणे मानत आलं आणि त्यांना फोन लावला. सतिशजींनी फोन लगेच घेतला.

मी : हॅलो, सतिशजी नमस्तकार. तुम्हाला थोडा त्रास देते आहे, पण मला माझ्या एका कथेवर शॉर्ट फिल्म बनवायची आहे; पण स्क्रिप्ट कसं लिहितात मला माहीत नाही. याविषयी मी कोणाशी बोलू शकते का? 

'तुम्ही कसे आहात? आत्ता बिझी आहात का?' सर्वसाधारणपणे आपण अशी सुरवात करतो कोणत्याही फोनवर. पण मी मनातून इतकी अस्वस्थ होते आणि 'स्क्रिप्ट लेखन' याबद्दल इतकी गोंधळले होते की लगेच विषयालाच हात घातला. खरं कौतुक स्टीशजींचं. अगदी शांतपणे त्यांनी उत्तर दिलं.

सतिशजी : अरे वा. मॅडम, फारच छान. स्क्रिप्ट लिहिणं तसं फार अवघड नाही.....

असं म्हणत पुढचा जवळ जवळ अर्धा-पाऊण तास त्यांनी मला खूप व्यवस्थित स्क्रिप्ट लेखनाबद्दल समजावलं. त्यानंतर त्यांनी विचारलं...

सतिशजी : फिल्म का बनवता आहात?

मी : माझ्या मनात फेस्टिव्हल्समध्ये भाग घ्यायचा आहे. पण अर्थात ते देखील मला फारसं माहीत नाही. पण मी जी माहिती काढली आहे त्याप्रमाणे काही agents असतात; जे हे काम करतात.

सतिशजी : अरे agents का हवेत तुम्हाला? गुगलवर जाऊन तुम्ही search करा. या वर्षीचे सगळे फेस्टिव्हल्स तुम्हाला दिसतील. त्यातले तुम्हाला जे योग्य वाटतात त्या sites वर जाऊन फॉर्म भरा. सुरवातीला थोडा वेळ लागेल; पण तुमचं तुम्ही करू शकता हे. अगदी सोपं असतं. त्यात अजून काही मदत हवी असेल तर नक्की फोन करा; मला जमेल तशी मदत करेन.

सतिशजींनी माहिती दिली आणि फोन ठेवला. बोलणं झालं आणि मग माझ्या लक्षात आलं.... इतक्या मोठ्या माणसाने अगदी सहज एका फोनवर मला स्क्रिप्ट लिहिण्यासंदर्भात माहिती दिली होती. इतकंच नाही तर स्वतःहून फेस्टिव्हल्स संदर्भात माहिती दिली होती. खरंच काही लोक मोठ यश मिळवतात; खूप खूप नाव कमवतात. पण खरं कौतुक हे असतं की ते मनाने जास्त मोठे असतात. खरंच स्तिशीजींशी बोलल्यानंतर तर माझा आत्मविश्वास खूपच वाढला.

स्क्रिप्ट लिहून झालं आणि मी, अर्चना आणि मंदार चर्चेला बसलो. फिल्ममध्ये किमान दोन मुली आणि एक मुलगा अशी महत्वाची पात्र होती. त्याव्यतिरिक्त एक भूत (स्त्री) हवं होतं. पहिलीच फिल्म असल्याने कमीत कमी खर्च याला सर्वात पाहिलं प्राधान्य होतं. त्यामुळे अभिनयासाठी माझ्या दोघी लेकी; शिवानी आणि सानिया यांच्याशी अर्चनाने बोलणं केलं आणि त्यांचा होकार घेतला. महत्वाचं पात्र होतं वेडा वॉचमन. यासाठी एक कसलेला अभिनेता हवा होता. तेही आमच्या बजेटमध्ये बसेल असा. जितेंद्र आगरकर एक उत्तम अभिनेता आहे. अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम केलेला आणि अनेक बक्षिसं मिळवलेला असा हा अभिनेता आहे. त्याला विचारलं आणि त्याने देखील लगेच होकार दिला. तारिख ठरली आणि शूटिंग देखील सुरू झालं. मिहीर कारखानीस आणि सागर पटवर्धन हे तरुण आणि अगदी नव्या दमाचे कॅमेरामन होते. जेमतेम दोन दिवसात शूटिंग आटपलं. मात्र पुढचे आठ दिवस फिल्मवरच्या संस्कारात गेले. 

भयपट असला तरी कुठेही बीभत्स चेहेरे किंवा रक्ताचा सडा असं काही वापरायचं नाही हे आम्ही ठरवलं होतं. याठिकाणी अर्चना आणि मंदार यांच्या संगीत जगताशी निगडित असण्याचा खूप उपयोग झाला. संपूर्ण सिनेमा हा योग्य ठिकाणच्या music मुळे जास्त परिणामकारक झाला.

फिल्म तयार झाली आणि एक दिवस मी आणि अर्चना गुगलवर वेगवेगळे फेस्टिव्हल्स शोधायला बसलो. प्रत्येक site वर जायचं माहिती वाचायची. त्यांची एन्ट्री फी बघायची आणि मग फॉर्म भरायचा की नाही ते चर्चा करून ठरवून त्याप्रमाणे ते काम पूर्ण करायचं. तीन दिवस बसून आम्ही एकूण नऊ फेस्टिव्हल्स ठरवले आणि त्यांचे फॉर्म्स भरले. आता WAIT AND WATCH PERIOD सुरू झाला. तसं काही करण्यासारखं उरलं नव्हतं. त्यामुळे या फेस्टिव्हल्सचे निकाल लागेपर्यंत थांबायचं होतं.

..... आणि फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला मला फोन आला. पॅनोरमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि महाराष्ट्र इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या दोन्हीचे श्री. विक्रांत मोरे यांचा मला फोन आला. 

विक्रांतजी : नमस्कार, आपण ज्योती अळवणी का? 

मी : हो

विक्रांतजी : मी विक्रांत मोरे बोलतो आहे. आपण आमच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या शॉर्ट फिल्मची एन्ट्री दिली आहे. मी आत्ताच ही फिल्म बघितली. अत्यंत उत्तम काम आहे. आपण फॉर्ममध्ये म्हंटलं आहे की ही आपली पहिलीच फिल्म आहे. 

मी : हो सर. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. 

विक्रांतजी : अरे वा! मला वाटलं होतं की चुकून 'first attempt' colomn click झाला आहे. फारच उत्तम फिल्म केली आहात. तुम्ही स्वतः प्रोड्युसर का?

मी : हो

विक्रांतजी : महिला दिग्दर्शक आहे का या हॉरर फिल्मची

मी : हो. co-diector महिला आहे.

विक्रांतजी : OK. माझ्या ऑफिसमधून आपल्याला फोन येईल

आमचं इतकंच बोलणं झालं आणि फोन बंद झाला. थोडं बरं वाटलं की आपल्या पहिल्याच फिल्मचं कोणीतरी कौतुक केलं. पण मला थोड्याच वेळात परत फोन आला. यावेळी फोन विक्रांतजींच्या ऑफिसमधून होता. मला आमच्या फिल्म संदर्भात सगळे details परत एकदा विचारले गेले आणि मग ते सोनेरी शब्द मी ऐकले...

Madam, your film is nominated for Panorama and Maharashtra International Film Festivals in asociation with Film Division Government of India. Nomination is for Filmmaker female director for Horror short film.

अहाहा!!! पहिलीच फिल्म आणि तिला एका महिन्याच्या आत नॉमिनाशन! आमच्या आनंदला पारावार नव्हता; आणि मग वाट बघणं सुरू झालं ते या कार्यक्रमाचं. शेवटी ती तारीख आली. 19 मार्च 2021!

अत्यंत मवाळ आणि शांत स्वभावाच्या अर्चनाला आम्ही सतत चिडवत होतो की भयपट दिग्दर्शक म्हणून पहिलं पारितोषिक मिळणार तुला आणि ती तिच्या स्वभावानुसार हसून सोडून देत होती.

कार्यक्रम होता अंधेरीला क्रिस्टल पॉईंट मॉलमध्ये. आम्ही तिथे पोहोचलो. कार्यक्रमाला सुरवात झाली आणि एक एक अवॉर्डस् जाहीर होत होते. अनंत जोग, उपेंद्र लिमये आणि उषा नाडकर्णी असे मोठे मोठे कलाकार उपस्थित होते. वेगवेगळ्या फिल्म्स मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना पारितोषिक जाहीर झालं. काही फिल्मसना आजवर अनेक अवॉर्डस् मिळाल्याचा उल्लेख, काही music videos ना जाहीर झालेले पारितोषिक यामुळे आता आपला नंबर लागणं शक्य नाही असं मनात कुठेतरी यायला लागलं.....

.... आणि अचानक घोषणा झाली. 

शॉर्ट फिल्ममध्ये पदार्पणातच भयपट दिग्दर्शन करण्यासाठी Best Women Filmmaker म्हणून अर्चना गोरे यांना पारितोषिक देण्यात येत आहे. आमच्या आनंदाला पारावार नव्हता. अर्चना तर पूर्ण गोंधळून गेली क्षणभरासाठी. मंचावर जाऊन तिने पारितोषिक स्वीकारलं आणि आभारचं बोलायला माईक हातात घेतला. असंख्य वेळा मंचावर उभं राहून हातात माईक घेऊन ती गायली आहे. गायनासाठी मिळालेल्या परितोषिकांसाठी आभाराचे दोन शब्द बोलली आहेच. पण तरीही हा क्षण वेगळा आणि खास होता.

तिच्या पहिल्याच शॉर्ट फिल्मसाठी तिला दिग्दर्शक म्हणून पारितोषिक मिळालं होतं. आवाज काहीसा भरून आला होता तिचा. कौतुकाने तिने मला (निर्माती म्हणून) आणि मंदारला (सह-दिग्दर्शक) म्हणून तिच्या सोबत मंचावर बोलावलं. आम्ही तिघांनी मिळून पारितोषिक स्वीकारलं. त्यानंतर मिडियासमोर आम्ही बोललो. माझ्यासाठी तर हा संपूर्ण वेगळा आणि शब्दांपालिकडचा अनुभव होता. 

परत आमच्या जागेवर येऊन बसलो आणि मी, अर्चना, मंदार आणि आमच्या सोबत आमचं कौतुक करायला आलेली मंदारची सुविद्य (शास्त्रीय गायक) पत्नी स्वाती आम्ही पटापट फोन्स करायला सुरवात केली. फोन जेमतेम चार केले आणि मग मात्र फोन करणं शक्य होईना कारण आम्हाला फोन्स यायला लागले. कौतुकाचा पाऊस पडत होता आमच्यावर. खरं कौतुक जरी अर्चनाचं असलं तरी जणूकाही आम्हाला सगळ्यांनाच ते पारितोषिक मिळालं आहे असं फोन करणाऱ्या प्रत्येकाचं आमच्याशी बोलणं होतं.

पहिल्याच प्रयत्नाला शिरपेचात सोनेरी मोरपीस खोचलं जाणं म्हणजे काय याचा अनुभव आम्ही घेतला. अर्थात त्यामुळे पुढची जबाबदारी वाढली आहे. पुढे करू ते काम याहूनही उत्तम आणि प्रेक्षकांच्या पसंतीला पूर्ण उतरेल असंच करू हे नक्की. 

आजवर तुम्हा सर्वांचं प्रेम आणि कौतुक आम्हाला सर्वांनाच मिळत आलं आहे; ते असंच वृद्धिंगत होवो ही श्रीचरणी प्रार्थना. धन्यवाद!

या कार्यक्रमाच्या वेळचे आमचे फोटो आणि आमच्या शॉर्ट फिल्मचं ट्रेलर देखील येथे जोडत आहे. आवडलं तर जरूर प्रतिक्रिया नोंदवा.







We got the esteem logo for our short film poster.



photo with Mr. Vikrant More. The Director of Panorama and Maharastra International films festival




The award winning girl


emotional moment for Archana, Mandar and Me




Appriciation from Mr. Vikrant More


Media moment for us


A photo moment with Ushatai Nadkarni


THE TROPHY!!



AND THE RED CARPET WALK OF ARCHANA!





Treler of our short film 'Studio Appartment'

















3 comments: