Friday, April 2, 2021

काळ

 काळ


वासंती तिशीची झाली तरी लग्नाचा विचार करायला तयार नव्हती. तिच्या आई-वडिलांना ती काहीशी उशिराच झाली होती. बाबा आणि आई देखील दोघेही रिटायर होऊन सिनियर सिटीझन्सचं आयुष्य जगायला लागल्याला आता तीन-चार वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण धडधाकट आहोत आणि थोडीफार जमापुंजी हाताशी आहे तोपर्यंत लेकीचं लग्न हौसेमौजेने करून टाकावं.

वासंती अत्यंत हुशार मुलगी होती आणि दिसायला देखील छानच होती. लांब काळेभोर केसांची एक लांबसडक वेणी ती घालायची. मोठे बोलके डोळे होते तिचे. राहणी अगदी साधी होती. आजच्या काळातदेखील ती ऑफिसला जाताना व्यवस्थित साडी नेसून जात असे. तिला तिची आईच अनेकदा म्हणायची;"अग वासंती, छानसा ड्रेस घालत जा की ऑफिसला जाताना. हे काय काकूंबाईसारखी साडी नेसतेस? तुला वेस्टर्न कपडे आवडत नाहीत; तर नको घालूस. पण एकदम साडीच का?" वासंती देखील नेहेमीच्याच शांतपणे उत्तर द्यायची;"ममा, अग मी काहीशी नाजूक चणीची असल्याने मॅनेजर असूनही मला माझ्या हाताखालीची लोकं फार सिरीयस घेत नाहीत. त्यात जर मी अगदीच स्कर्ट्स आणि ड्रेस घालायला लागले न तर माझ्या तोंडावर मला उडवून लावतील."

एकदा दोघींचा हा संवाद बाबांनी ऐकला आणि वासंतीला म्हणाले;"वासंती बेटा, आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या कामाचा वचक जास्त असावा. तुला एक उपाय सांगतो. करून बघ. तुझ्या हाताखालचे लोक येण्याच्या अगोदरच ऑफिसमध्ये पोहोचत जा आणि कामाला सुरवात कर. अगदी ऑफिसच्या वेळेच्या अगोदर पोहोचायची सवय लाव स्वतःला. आपली सिनियर लवकर येऊन कामाला सुरवात करते; या विचाराने तुझ्या हाताखालची माणसं आपोआपच सरळ राहातील तुझ्याशी." आणि मग पत्नीकडे वळत म्हणाले;"तुसुद्धा उगाच तिच्या मागे लागणं बंद कर. तिला जे आवडतं ते घालू दे."

बाबांचं बोलणं पटल्याने वासंतीने लगेच दुसऱ्या दिवसापासून ते अमलात आणलं. ती खरंच काहीशी लवकर निघाली घरातून आणि ऑफिसमध्ये सगळे यायच्या अगोदरच तिची कामाला सुरवात झाली होती. वासंतीला आठवड्याभरातच तिच्या सबॉर्डीनेटर्सच्या वागण्यातला बदल जाणवायला लागला. एरवी तिची पाठ वळताच तिची चेष्टा करणारे सगळे तिच्यासमोर दबून राहायला लागले. तिच्या टीमचा एकूण परफॉर्मन्स देखील एकदम वाढला. वासंती खूपच खुश झाली बाबांवर.

आर्थिक वर्ष संपत आलं होतं. प्रत्येकाला आपापली टार्गेट्स पूर्ण करण्याचे वेध लागले होते. त्यात सगळे रिपोर्ट्स देखील तयार करायचे होते; सबमिशन तारखा जवळ येत होत्या. प्रत्येक डिपार्टमेंट दडपणाखाली होतं. मात्र वासंतीची टीम कामाच्या दडपणात देखील मोकळा श्वास घेत होती. त्यांची टार्गेट्स कधीच पूर्ण झाली होती. रिपोर्ट्स तयार होत होते. प्रेझेन्टेशन्स तयार होती. यासगळ्याचं क्रेडिट वासंतीला जात होतं. मार्च संपत आला आणि कामाच्या शेवटच्या टप्यात असताना अचानक वासंतीला तिच्या बॉसने बोलावलं. असं अचानक कंपनी CEO कडून बोलावणं आल्याने वासंती एकदम गोंधळून गेली. हातातलं काम टाकून ती वरच्या मजल्यावरच्या बॉसच्या केबिनकडे धावली.

तिने दारावर टकटक केली आणि आतून आवाज आला "Yes, you can come in." वासंती आत गेली. "sit down" बॉस म्हणाले आणि वासंती बसली. बॉसचा चेहेरा फारच गंभीर होता. आपल्या हातून काय चूक झाली आहे त्याचाच विचार वासंती करत होती. बॉसने हातातलं काम संपवलं आणि वासंतीकडे बघून हसले. त्यांच्या त्या एका हास्याने वासंतीच्या जीवात जीव आला. हलकसं हसत वासंती बसल्या जागी थोडी सैलावली.

तिच्याकडे बघत बॉस म्हणाले;"वासंती, तुझ्या टीमने यावेळी वेळेच्या अगोदरच टार्गेट्स पूर्ण केली आहेत. तुम्ही तर प्रेझेन्टेशन आणि रिपोर्ट्स सकट तयार आहात असं मला कळलं. वा!"

वासंती सुखावत म्हणाली;"सर, तुमच्या गायडन्समुळे शक्य झालं सगळं."

तिच्या बोलण्यावर हसत बॉस म्हणाले;"Oh! No no. वासंती मला बरं वाटावं म्हणून असं बोलू नकोस. यासगळ्याचं क्रेडिट तुला जातं. तू एक वेगळा पॅटर्न सुरू केलास आणि त्याचं यश आहे हे. काम तर सगळेच करतात. पण शेवटच्या क्षणापर्यंत प्रेशर ठेवण्यापेक्षा रोजची छोटी टार्गेट्स तू ठरवलीस आणि तुझ्या टीमच्या अगोदर येऊन त्यांची कामं ते यायच्या अगोदर त्यांच्या मेल्समध्ये तयार असायची. त्यामुळे एक ऑर्गनाईज प्रकारे काम झालं. खरंच तुझं मॅनेजमेंट वाखाडण्यासारखं आहे."

वासंतीने हसत "thank you" म्हंटलं. तिच्याकडे बघत हसत बॉस म्हणाले;"वासंती, I have an offer for you. तुला माहीतच असेल की आपण आपली एक नवीन ब्रँच चालू करतो आहोत नाशिकजवळ." कामाचं बोलणं सुरू झाल्याचं लक्षात येऊन ताठ बसत वासंती म्हणाली;"हो सर. माहीत आहे मला." थेट तिच्याकडे बघत बोस म्हणाले;"माझी इच्छा आहे की तू त्या ब्रँचची पूर्ण जवाबदारी घ्यावीस." अचानक आलेल्या या वाक्याने वासंती एकदम गडबडली. "सर, संपूर्ण ब्रँचची जवाबदारी मी?" बॉस हसत म्हणाले;"हो वासंती. मला खात्री आहे की तुला नक्की जमेल ते. एक काम कर इथले रिपोर्ट्स पूर्ण झाले की ते सगळं काम handover करून तू साधारण पंधरा एप्रिल पर्यंत नाशिकला रिपोर्ट कर. ठीक?" वासंतीला खूपच आनंद झाला. उठून उभं राहात आणि सरांना शेक हॅन्ड करत ती म्हणाली;"Yes sir. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."

वासंतीने घरी पोहोचताच आई-बाबांना खुशखबर दिली. वासंतीने दिलेली बातमी ऐकताच तिची आई म्हणाली;"अग अचानक नाशिक? बापरे. तिथे तर आपल्या ओळखीचं कोणीच नाही. पंधरा एप्रिल म्हणजे महिनासुद्धा नाही ग हातात. अग वासंती मी विचार करत होते की यावर्षी तुझ्या लग्नाचा बार उडवून द्यायचा. हे अचानक असं आपलं शहर सोडून जायचं तर कसं होणार आपलं?" आईचं बोलणं ऐकून वासंती काहीशी रागावली. पण स्वतःला शांत करत म्हणाली;"आई, मी सध्या काय एकूणच लग्नाचा विचार करत नाही आहे. त्यात आत्ता मला ही एक सोन्यासारखी संधी मिळाली आहे स्वतःला सिद्ध करायची ती मी मुळीच सोडणार नाही आहे." तिचं बोलणं ऐकून आई गप झाली. मात्र वासंतीच्या खांद्यावर थोपटत तिचे बाबा म्हणाले;"वासंती, आम्हाला दोघांनाही तुझ्या या यशाचा खूप आनंद होतो आहे. पण एक गोष्ट लक्षात घे बाळा, तुझ्या आईची चिंता योग्य आहे. आम्ही काय पिकली पानं आहोत. त्यात तू उशिरा झालेली आहेस आम्हाला. त्यामुळे आमच्या नंतर तुझं काय होणार ही चिंता आम्हाला सतत असते. तुझी आई तुला ते सांगते आणि मी सांगत नाही इतकाच काय तो फरक."

वासंतीने वडिलांचा हात हातात घेतला आणि म्हणाली;"बाबा, मला न खरंच लग्न करायची इच्छा नाही आहे. मला तुमच्या बरोबर राहून तुमची आणि आईची सेवा करायची आहे." लेकीने इतकी उत्तम बातमी आणली आणि तरी घरातला माहोल एकदम तणावपूर्ण झाल्याचं लक्षात आल्याने वासंतीच्या हातावर थोपटत तिचे बाबा म्हणाले;"बरं बेटा, तू लग्न करायचं की नाही ते आपण नंतर ठरवू. आत्ता मात्र आपल्याला हा विचार करायला हवा की पंधरा एप्रिलला नाशिकला पोहोचल्यावर आपण उतरणार कुठे आहोत आणि एकूणच राहण्याची काय सोय असेल तिथे."

बाबांचं बोलणं ऐकून हसत वासंती म्हणाली;"बाबा, कुठे राहायचं याची चिंताच करू नका. तुम्हाला दोघांना खूप आवडेल अशी सोय केली आहे मी तिथे. एक मस्त बंगलाच घेतला आहे आपण भाड्याने आणि माझं ऑफिस तिथून जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे चालत." तिचं बोलणं ऐकून आई आणि बाबा एकदम खुश झाले. वासंतीच्या जवळ जात आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली;"बेटा, गावात एक छोटंसं आपलं असं घर असावं अशी खूप खूप इच्छा होती माझी. तू अगदी नकळत ती पूर्ण केलीस. खूप खूप अभिमान वाटतो मला तुझा. तुझी इच्छा नाही न; मग तू स्वतःहून तू विषय काढेपर्यंत मी यावर बोलणार नाही." आईचं बोलणं ऐकून वासंती हसली आणि वातावरण एकदम निवळून गेलं.

वासंती आणि तिचे आई-वडील नाशिकला पोहोचले आणि घर बघून सगळेच खुश झाले. एक सुंदर बंगला होता तो. समोर छानशी बाग करता येईल इतकी जागा होती. त्यामुळे आई आणि बाबा दोघेही जास्तच खुश होते. वासंती पोहोचल्या दिवसापासूनच ऑफिसला जायला लागली. संपूर्ण ब्रँचची जवाबदरी तिच्यावर होती आणि कंपनीने दाखवलेल्या विश्वासाला पूर्ण उतरायचंच असं तिने ठरवलं होतं. त्यामुळे ऑफिसची वेळ दहाची असली तरी वासंती सकाळी साडेनऊलाच पोहोचायची.

एप्रिल महिना असल्याने नाशिकमध्ये प्रचंड उन्हाळा वाढला होता. त्यामुळे लवकर जाणं तसं वासंतीच्या फायद्याचं होतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचं ऑफिस घरापासून खरंच जवळ होतं; त्यामुळे रोज चालतच जायची ती ऑफिसला. त्यांचा बंगला असलेल्या त्या गल्लीमध्ये सगळेच बंगले होते. काही नवीन काही जुने. त्यांच्या शेजारचा बंगला बंदच होता. त्याच्या पुढे एक काहीसा मोठा असा जुना बंगला होता... अगदी वाडा म्हणावं असा मोठासा. वासंती त्या वाड्यावरून चालत जाताना नेहेमी विचार करायची.... कोण राहात असेल बरं या वाड्यात? तसं अगदी जुनं बांधकाम आहे आणि एकदम मजबूत आहे. पण नीट निगा नाही राखलेली. ती वाड्यावरून पुढे जात असताना अनेकदा तिला एक लहान पाच-सहा वर्षांचा मुलगा वड्या समोरच्या बागेत खेळताना दिसायचा. एका बाजूला एक छानसा झोपाळा होता त्यावर बहुतेक त्याची आजी बसलेली असायची. वासंती सकाळी जेव्हा जेव्हा जायची त्या वेळी ती एका स्त्रीला घराच्या आत जाताना बघायची. वासंतीने एक-दोन वेळा पाच मिनिटं लवकर किंवा उशिरा निघून त्या स्त्रीला बघायचा प्रयत्न केला. पण ज्या ज्या वेळी वासंती त्या घरावरून जायची त्यावेळीचं नेमकी ती बाई आत जायची. शेवटी तिचा चेहेरा बघण्याचा नाद वासंतीने सोडला.

ऑफिसमध्ये बरंच काम होतं. अगदीच सुरवात होती सगळी. त्यामुळे वासंतीला यायला अनेकदा उशीरच व्हायचा. घरी येऊन जेऊन झोपून जायची ती. खूपच दमत होती ती; पण काम आवडत असल्याने तिची काही तक्रार नव्हती. मात्र या तिच्या कामामुळे अलीकडे तिचं आणि आई-बाबांचं बोलणं कमी व्हायला लागलं होतं.

एका रविवारी अगदी आरामात उठून वासंती बाहेर व्हरांड्यात आली. बाबा बागेत गुलाबाचं कलम लावत होते आणि आई खुर्चीवर बसून पेपर वाचत होती. वासंती उठलेली बघून आई उठली आणि म्हणाली;"अग हाक मारायची नं; चहा ठेवला असता मी." हातातला कप आईला दाखवत वासंती म्हणाली;"घेतला ग मी करून. रोज सगळं तूच करतेस. बस जरा. मस्त गप्पा मारू." इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि वासंतीने आईला विचारलं;"आई, आजूबाजूला काही ओळखी झाल्या की नाही ग? आपण येऊन दहा दिवस झाले; पण बाहेर कोणाशी काय तुमच्याशी बोलायला देखील मला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आपल्याला कोण शेजारी आहेत ते देखील मला माहीत नाही."

त्यावर हसत आई म्हणाली;"अग समोर काळे म्हणून एक कुटुंब आहे. स्वतःचं घर आहे त्यांचं. खाऊन पिऊन सुखी. मुलं शाळेत जातात. हा शेजारचा बंगला तर बंदच आहे. पण काळे वहिनी म्हणाल्या ते लोक मूळचे मुंबईचे आहेत. अधून मधून येतात."

वासंतीने चहाचा घोट घेत आईला विचारलं;"अग, तो पलीकडे मोठा बंगला आहे न... अगदी जुन्या बांधकामाचा वाड्यासारखा.... तिथे कोण राहातं?" वासंतीच्या प्रश्नाने आईच्या कपाळावर एक आठी आली आणि ती म्हणाली;"वासंती मी देखील काळे वहिनींना विचारलं त्या वाड्याबद्दल. पण त्या काही बोलायलाच तयार नव्हत्या. उलट मला म्हणाल्या तुमची मुलगी त्या वाड्यावरून रोज जाते चालत.... तिला रस्ता बदलायला सांगा. आम्ही कोणीच त्या बाजूला फिरकत नाही. असं म्हणतात तो वाडा झपाटलेला आहे. मी माझ्या दोन्ही मुलांना लांबचा पल्ला पडला तरी विरुद्ध बाजूने सोडायला जाते शाळेत. आम्ही कोणीच कधीच त्या वाड्याबद्दल बोलत सुद्धा नाही. आणि तुम्ही देखील परत माझ्याकडे हा विषय काढू नका."

आईचं बोलणं ऐकून वासंतीला हसायला आलं. ती म्हणाली;"अग कसलं झपाटलेपण आणि काय. त्याबाजूने न जाता जर विरुद्ध बाजूने मी गेले न तर मला खूप जास्त चालावं लागेल. उगाच तुला कोणीतरी काहीतरी सांगत असतं हं. अग, मी सकाळी जाते न तेव्हा एक लहान मुलगा खेळत असतो बाहेर बागेत आणि त्याची आजी बसलेली असते झोपल्यावर. बहुतेक त्या मुलाची आई त्याला त्याचवेळेला दूध वगैरे पाजून आत जात असते. सरळ साधी माणसं वाटतात मला ती. कदाचित फार कोणाशी बोलत नसतील. पण म्हणून लगेच झपाटलेला वाडा म्हणून त्यांना वाळीत टाकणं योग्य नाही." आई यावर काहीतरी बोलणार होती इतक्यात बाबांनी वासंतीला हाक मारली आणि नवीन लावलेली झाडं बघण्यासाठी वासंती बागेत गेली. विषय तिथेच अर्धवट राहिला.

घरात वळताना मात्र आईने मनात ठरवलं की वासंती थोडी निवांत झाली की तिला सांगितलं पाहिजे की खरं तर त्या वाड्यात कोणीच राहात नाही; असं काळे वहिनी म्हणत होत्या.

सोमवारी देखील वाड्यावरून जाताना वासंतीला तो लहानगा खेळताना दिसला. वासंतीने मुद्दाम थोडं हळू चालत आतमध्ये डोकावल्यासारखं केलं. त्यामुळे त्या मुलाचं लक्ष तिच्याकडे गेलं. वासंतीला बघून त्याने हसत तिला टाटा केलं. वसंतीने देखील हसत हात हलवला. नंतर तिचं लक्ष झोपाळ्यावर बसलेल्या त्या मुलाच्या आजीकडे गेलं. आजींना हाक मारावी असं वासंतीच्या मानत आलं. पण आजींचं गेटकडे लक्ष नव्हतं आणि बहुतेक त्या जप करत असाव्यात असं वासंतीला वाटलं. कारण त्या एकटक कुठेतरी बघत होत्या आणि त्यांच्या हाताची एका लयीत हालचाल होत होती. म्हणून मग वासंती तशीच पुढे निघून गेली.

ऑफिसचं काम आता थोडं आटोक्यात यायला लागलं होतं. त्यामुळे आज वासंती थोडी वेळेत निघाली होती. संध्याकाळ झाली होती. पण पूर्ण सूर्यास्त झाला नव्हता. त्यामुळे छान उजेड होता आजूबाजूला. घराकडे जाताना वासंतीचं लक्ष परत एकदा त्या वाड्याकडे गेलं. तो सकाळचा मुलगा बागेत उभा होता. त्याची नजर काहीशी कावरी-बावरी झाल्यासारखी दिसत होती. तो एकदा गेटकडे आणि एकदा वाड्याच्या दिशेने बघत होता. त्याचे डोळे पाण्याने डबडबल्यासारखे वासंतीला वाटले. म्हणून थांबून तिने त्याला गेटजवळ बोलावलं. वासंतीला बघून तो धावत गेटच्या दिशेने आला. पण थोडं अंतर राखून आतच उभा राहिला.

"काय झालं बाळा? तू का रडतो आहेस?" वासंतीने प्रेमाने त्याला विचारलं.

"ताई, तू रोज आमच्या घरावरून जातेस न सकाळी? मी बघतो तुला रोज. आज तर मी तुला टाटा पण केलं." तो मुलगा रडवेला झाला होता तरी वासंतीला बघून बोलला.

त्यावर हसत वासंती म्हणाली;"हो. रोज जाते मी इथून. माझं ऑफिस आहे नं इथून थोडं पुढे. बरं, पण तू का रडतो आहेस? काय झालं?"

तिचा प्रश्न ऐकून त्या लहानग्याने डोळे पुसले आणि म्हणाला;"मी रडत नाही काही. थोडा गोंधळलो आहे. सगळे एकदम हरवले आहेत न. काय करावं सूचत नाही मला."

त्याचं बोलणं ऐकून वासंती गोंधळली आणि तिने विचारलं;"कोण हरवलं आहे?"

त्यावर वाड्याकडे हात करत तो म्हणाला;"सगळेच.... आजी, आई, बाबा आणि दादा. सगळेच आत हरवले आहेत. कधीपासून शोधतो आहे मी. पण मिळतच नाहीत मला ते."

त्याचं बोलणं ऐकून वासंतीला हसायला आलं आणि ती म्हणाली;"अरे, असे कसे हरवतील सगळे? आत असतील की घरातच."

त्यावर तिच्याकडे बघत तो म्हणाला;"हो ग ताई. मला पण वाटतं असतील. पण सापडत नाहीत ना."

वासंतीच्या मानत आलं त्याच्या घरातले सगळे गम्मत म्हणून लपून बसले असतील त्याच्यापासून आणि तो बावरला आहे ते त्यांच्या लक्षात आलं नसेल कदाचित. हा विचार आल्याने तिने त्या मुलाला म्हंटलं;"अरे बाळा, सगळे घरातच असतील. तू आत जा आणि हाका तर मार." मागे वळून घराकडे बघत तो म्हणाला;"ताई, खरंच सगळे हरवले आहेत ग आणि घरातले दिवे बंद आहेत. मला भीती वाटते." त्यावर हसत वासंती म्हणाली;"मी येऊ का तुझ्याबरोबर? आपण दोघे मिळून शोधुया तुझ्या आईला." तिने असं म्हणताच त्या मुलाने एकदा मागे वळून घराकडे बघितलं आणि परत वासंतीकडे वळत म्हणाला;"तू येशील आत? चालेल तुला? घाबरणार नाहीस न?" त्याचे प्रश्न ऐकून एकदा घड्याळाकडे बघत आणि हसत वासंती म्हणाली;"हो चालेल. आत्ता जेमतेम सात वाजले आहेत. आपण दोघे मिळून पटकन शोधू सगळ्यांना. तू आहेस न बरोबर मग मला नाही वाटणार भिती." असं म्हणत वासंतीने गेट उघडलं आणि आत शिरली.

वासंतीने पुढे होत त्या मुलाचा हात धरला आणि अचानक मागे गेट बंद झाल्याचा आवाज आला म्हणून मागे वळून बघितलं. गेट आपोआप बंद झालं होतं. साधं ग्रील्सचं गेट आपोआप कसं बंद झालं याचं वासंतीला जरा आश्चर्यच वाटलं. पण त्याकडे दुर्लक्ष करत तिने शेजारी त्या मुलाकडे बघितलं. पण तो मुलगा शेजारी नव्हताच. वासंतीने भुवया वर करत वाड्याच्या दिशेने बघितलं तर तो मुलगा पायऱ्या चढून घराच्या दाराजवळ उभा होता. वासंतीचं लक्ष जाताच त्याने तिला हात करून पुढे बोलावलं. तशी हसत हसत वासंती पुढे गेली. पायऱ्या चढत तिने विचारलं;"अरे घराच्या दारापर्यंत आला आहेस तर आत जायला का भिती वाटते तुला? बरं, चल आपण जाऊया." असं म्हणत तिने दार वाजवलं. तिला वाटलं दार वाजवल्यावर कोणीतरी नक्की येईल दार उघडायला त्या व्यक्तीला सांगावं की हा घाबरला आहे आणि मग मागे वळावं. पण दार दोनदा वाजवलं तरी कोणी आलं नाही. त्यावर तो मुलगा परत एकदा म्हणाला;"ताई, अग सगळे हरवले आहेत तर मग दार कोण उघडणार ग?"

त्याच्याकडे बघत "बरं" म्हणत वासंतीने दार थोडं ढकललं तर ते लगेच उघडलं गेलं. त्या मुलाचा हात धरत तिने घरात पाऊल ठेवलं. खरंच घरात खूप अंधार होता. अंदाजाने शेजारच्या भिंतीवर चाचपडल्यावर तिला दिव्याची बटणं हाताला लागली. तिने एक एक करत ती लावायला सुरवात केली. पण लख्ख उजेड पडण्या ऐवजी एक एक करत पिवळे दिवे लागले. वासंतीला थोडं विचित्र वाटलं. पण एकदा त्या मुलाकडे बघून तिने आतल्या दिशेने बघत हाक मारली... "कोणी आहे का? अहो, तुमचा हा लहानगा घाबरला आहे थोडा. जर त्याची गम्मत करायला तुम्ही सगळे लपले असाल तर बाहेर या."

वासंतीचा आवाज आत घुमला आणि विरून गेला. तिला ते थोडं विचित्र वाटलं. तो मुलगा वासंतीकडे बघत उभा होता. बाहेर बहुतेक आता आधारलं होतं आणि घरातले दिवे मंद होते. त्यामुळे त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव तिला नीट कळत नव्हते. इतकी हाक मारून देखील कोणी कसं बाहेर येत नाही याचं तिला खूप आश्चर्य वाटलं. त्याचा हात धरत तिने आतल्या खोलीत जायला पाऊल उचललं.

वासंती एक एक करत प्रत्येक खोलीत जात होती. घरात सगळ्या वस्तू होत्या. दिवाणखान्यात सोफा सेट्स, आतल्या तिन्ही खोल्यांमधून मोठे मोठे पलंग, खिडकी लागत मोठी कपाटं. सगळं होतं; पण घरात राहणाऱ्या व्यक्तीच नव्हत्या. जसजशी वासंती आत जात होती; तसंतशी ती जास्त गोधळात पडत होती. एक एक खोली पार करत ती स्वयंपाकघरात पोहोचली. तिथे देखील तीच परिस्थिती होती. सगळं काही होतं तिथे.... आपण इतके आत आलो तरी आपल्याला कोणीच कसं अडवलं नाही; हा प्रश्न राहून राहून वासंतीला पडला होता. स्वयंपाकघरात आल्यावर तिला ताहान लागल्या सारखं झालं. म्हणून ती पाण्याचा माठ बघून त्याजवळ गेली. तिने माठ उघडून आत बघितलं तर तो पूर्ण रिकामा होता. तिला फारच आश्चर्य वाटलं. त्या मुलाकडे वळून बघत तिने विचारलं;"अरे यात अजिबात पाणी नाही. तुम्ही प्यायचं पाणी कुठे भरून ठेवता?" त्यावर तिच्याकडे बघत तो म्हणाला;"कोण भरणार पाणी ताई? सगळे हरवले आहेत नाही का? तुला मी सारखं सांगतो आहे की सगळे हरवले आहेत आणि तरी तुला वाटतंय हाक मारली की ते येतील. अग कोणीच तर नाही ना. म्हणून तर मला एकट्याला आत यायला भिती वाटते. म्हणून तर मी सारखा बागेतच खेळत असतो न."

वासंतीला त्याच्या त्या उत्तराने आता थोडं विचित्र वाटायला लागलं. हे काही बरोबर घडत नाही आहे; असा विचार पहिल्यांदाच तिच्या मनात आला. एकदा त्याच्याकडे बघून ती मागे वळली.

"काय झालं ताई? शोधायला मदत नाही करणार मला?" तो मुलगा तिला म्हणाला.

वासंतीने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली;"अरे मी तर तुझ्या घरातल्या कोणालाही ओळखत नाही. कसं शोधणार? मला वाटलं होतं हाक मारली तर येईल कोणीतरी पुढे. पण कोणीच आलं नाही. आता मात्र मला उशीर होतो आहे. बघ; आत आले तेव्हा साडेसहा वाजले होते. आता साडेसात झाले. एक तास कसा गेला कळलंच नाही. तुझ्या घरातले सगळे हरवले आहेत. माझ्या घरातले नाहीत. त्यामुळे आता मला घरी गेलंच पाहिजे." असं म्हणून वासंतीने त्याच्याकडे पाठ केली आणि बाहेरच्या दिशेने चालू लागली. तिला त्या मुलाचा मागून आवाज आला;"ताई, नक्की नाही न हरवले तुझ्या घरातले?"

वासंती त्याचा प्रश्न ऐकून एकदम वैतागली. मदतीसाठी आले आणि हा अंगठ्याएवढा मुलगा आगाऊपणे मलाच काहीतरी विचारतो आहे. तिच्या मनात आलं. पण त्याला उत्तर द्यायला न थांबता वासंती त्या वाड्याच्या बाहेर आली आणि तरातरा चालत गेट जवळ येऊन तिने गेट उघडलं....

वासंती गेट बाहेर रस्त्यावर उभी होती. पण बाहेरचं काहीच तिला ओळखता येत नव्हतं. समोरचा रस्ता उत्तम डांबराचा होता. रस्त्यावर भरपूर उजेड असलेले दिवे होते. सतत वाहनं ये-जा करत होती. वासंती एकदम बुचकळ्यात पडली. अचानक या रस्त्यावर इतकी कशी रहदारी वाढली ते तिला कळेना. पण आता तिला भूक लागली होती. त्यामुळे मनातले प्रश्न मागे टाकत ती तिच्या घराकडे वळली.

मधला बंद बंगला सोडून ती तिच्या घराच्या गेटजवळ आली आणि वासंतीला मोठा धक्का बसला. तिथे एक मोठी इमारत उभी होती. एक मोठं उत्तम दर्जाचं गेट होतं त्या इमारतीला. गेटजवळ एक वॉचमन उभा होता. वासंतीचा गोधळलेला चेहेरा बघून तो वॉचमन स्वतः समोरून बोलायला आला.

"मावशी.... कोणाला शोधता आहात का?"

"मावशी? ओ दादा. मी काय तुम्हाला मावशी दिसते का?" त्याच्या मावशी या उल्लेखाने कावलेली वासंती एकदम आवाज चढवून म्हणाली.

त्यावर तिच्याकडे रागाने बघत तो म्हणाला,"मग काय तरुण पोरगी दिसते का ग म्हातारे तू? म्हातारी आहेस आणि कोणालातरी शोधते आहेस असं वाटलं म्हणून मदतीला पुढे आलो तर मलाच उलट बोलतेस?" असं म्हणून तो इमारतीचं गेट उघडून आत निघून गेला.

गेट बंद झालं आणि गेटवर लावलेल्या लहान लहान आरशाच्या तुकड्यांकडे वासंतीचं लक्ष गेलं आणि तिला मोठा धक्का बसला. तिला त्या आरशात तिच्या चेहेऱ्याची एक म्हातारी स्त्री दिसली......

वासंती त्या धक्याने मागे धडपडली आणि मागून येणाऱ्या एका गाडीसमोर आली. गाडीचा ब्रेक कचकचून लागला. पण तोवर उशीर झाला होता.... डोळे मिटताना वासंतीच्या मनात एकच शेवटचा विचार होता....

"माझे आई-बाबा कुठे गेले असतील? शोधलं पाहिजे त्यांना!!!"

समाप्त



No comments:

Post a Comment