श्रीकृष्ण - उद्धव
मी नक्की कोण आहे हा प्रश्न मला कायम पडत आला आहे; आणि त्याहूनही मोठा प्रश्न हा की ज्याला सगळे द्वारकाधिश म्हणतात तो आजानुबाहु राजनीतीतज्ञ असूनही प्रत्येक स्त्री-पुरुषाचे भावविश्व व्यापून असलेला मुरलीधर मनमोहन श्रीकृष्ण कोण आहे?
सर्वसामान्य भाषेतील माझी ओळख म्हणजे श्रीकृष्णाचा कनिष्ठ चुलत बंधू उद्धव! माझी माता कंसा मथुराराज कंस यांची भगिनी. त्यामुळे मी श्रीकृष्णाचा मावस बंधू देखील होतोच. पण तरीही त्या वासुदेवाने आपणहून मला भावसखा म्हणून अनेकदा संबोधले आहे. त्यामुळे मला माझी ती ओळख जास्त प्रिय आहे. ज्यावेळी तो मला प्रिय बंधो उधो असे हाक मारतो त्यावेळी त्याच्या अंतर्मनातील नाद ऐकण्यासाठी माझे कान आतुर होतात. श्रीकृष्णाच्या अंतर्मनातील नाद ऐकण्याचे परमभाग्य मला माझ्या आयुष्यात नेहेमीच मिळाले आहे; आणि त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
कुरुक्षेत्रावरील भारतीय महायुद्ध झाल्यानंतर वासुदेव पूर्णपणे बदलून गेला होता. एकदा आम्ही त्याच्या लाडक्या श्रीसोपानावर गप्पा मारत बसलो असताना मावळतीच्या सुर्यबिंबकडे एकटक पाहात मृदुहृदयी मनमोहनाने मला म्हंटले,"उधो बंधो, मानवी जीवनात कर्तव्य आद्य स्थानी कायम असावं हे मी नेहेमीचं सर्वांना सांगत आलो आहे. पण तुला म्हणून मी त्यापुढे जाऊन सांगतो की हे कर्तव्य भावपूर्ण असावं. आज मनपटलावरील सर्वच भाव तुझ्या पुढ्यात बोलून टाकावेसे वाटते आहे. परंतु कुठून सांगण्यास सुरवात करू हा प्रश्न मला पडला आहे. बंधो आज महाभारतीय युद्ध आणि त्याअनुषंगाने त्यात उतरलेल्या अनेक व्यक्तींच्या निर्णय क्षमतेतील कमकुवतपणाबद्दल तुला काही सांगायचे आहे. उधो, कर्तव्य कठोर असतेच पण त्याला भावनिक किनार असते हे समजून घेतले पाहिजे. ज्यावेळी कर्तव्य भावनिक होते आणि त्याची किनार कठोर होते त्यावेळी भीष्म प्रतिज्ञा घेऊन आजन्म अग्निपरीक्षा देणे क्रमप्राप्त होते हे पितामह भीष्मांनी त्यांच्या जीवन प्रवासात समस्त जगाला दाखवून दिले.
कर्तव्य आणि भावना यांची योग्य सांकड घालणे न जमल्यामुळेच महाराज धृतराष्ट्रांनी हस्तिनापूर नरेश हे बिरुद हृदयाशी शेवटपर्यंत कवटाळून ठेवले आणि त्यातच त्यांनी त्यांचे शंभर पुत्र गमावले; राजमाता गांधारीदेवींनी कर्तव्यापेक्षा पुत्रप्रेमाला बळी पडून दुर्योधनाला लोहशरीराचा आशीर्वाद दिला आणि आपल्या आशीर्वादानंतर देखील आपल्या प्रिय पुत्राचा मृत्यू झाला हे सत्य त्या स्वीकारू शकल्या नाहीत. आत्या कुंतीने कर्णाला जन्म दिला तो देखील भावनिक डोलायमानतेतून आणि पुढे आपले पती माहाराज पांडु यांचे दुःख सहन न होऊन मिळालेल्या वरदानाचा वापर करून युधिष्ठीर, भीम आणि अर्जुनाला जन्म दिला. कदाचित म्हणूनच तो मंत्र माता माद्री सोबत अग्निमध्ये भस्म झाला.
पांडवांमधील जेष्ठ म्हणून युधिष्ठिराचे कर्तव्य आपल्या चारही बंधूंना सांभाळणे आणि पांडव पत्नी इंद्रप्रस्थ सम्राज्ञी द्रौपदी हिचा सन्मान कायम अबाधित ठेवणे हे होते. मात्र स्वतःच्या द्यूतक्रीडेरेवरील प्रेमाखातर भावनिक होत त्याने एकदा नाही तर दोन वेळा सर्वस्व गमावले..... आणि त्यानंतरचा वनवास त्याच्या सबोतच त्याच्या बंधूंच्या आणि पत्नीच्या भाळी आला."
कदाचित तंद्री लागल्यामुळे श्रीकृष्ण बोलता-बोलता थांबला. मात्र त्याच्या निर्मम कृष्ण वाणीमध्ये पडलेला खंड मला अस्वस्थ करू लागला. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा बोलते करण्याच्या उद्देशाने मी म्हणालो;"वासुदेवा, पितामह असतील, महाराज धृतराष्ट्र असतील, राजमाता गांधारीदेवी, प्रिय आत्या कुंतीदेवी आणि जेष्ठ पांडव बंधू युधिष्ठीर असेल.... या सर्वांवर कर्तव्य पालन करण्यासोबतच निर्णय घेण्याची जवाबदारी आणि अधिकार देखील होता. तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे सर्वच कर्तव्यापेक्षा भावनेचे बळी जास्त ठरले देखील असतील. परंतु कधी कधी कर्तव्य देखील बांधिलकी घेऊन येते."
माझ्या बोलण्याने आपले कमलनेत्र माझ्याकडे वळवून मोहक स्मित करून श्रीकृष्ण परत बोलू लागला;"उद्धवा, चिंता करू नकोस. आज मी बोलता-बोलता शांत होऊन समाधिस्थ नाही होणार. बंधो, तू माझा केवळ भावसखा नाहीस तर या काळ्या कृष्णाची उजळलेली सावली आहेस. त्यामुळे आज माझ्या अंतर्मनातील गुंजन तुला सांगून मी भावमोकळा होणार आहे.
तुझा रोख माझ्या लक्षात आला आहे बरं बंधो. तू भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्या कर्तव्य पालनासंदर्भात बोलतो आहेस न? केवळ या चौघांनाच नाही तर मानवीय आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाला एक नियम लागू होतो... तो आज मी तुला सांगणार आहे. तुझ्या मनात आले की भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्या मनात इच्छा असूनही केवळ जेष्ठ बंधूच्या विरोधात जाणे योग्य होणार नाही या विचाराने त्यांनी जे जे घडत गेले ते ते मौन बाळगून स्वीकारले. त्यांच्या हातात काहीच नव्हते... असे तुला सुचवायचे आहे; हे माझ्या लक्षात आले आहे.
उद्धवा, याचा अर्थ तू माझे सुरवातीचे प्रतिपादन अजूनही समजून घेतलेले नाहीस असे दिसते. जीवनात कर्तव्य आद्य स्थानी असावे हे अंतिम सत्य आहे! भिमासहित चारही भावंडांनी केवळ ज्येष्ठ बंधू संदर्भातील आपल्या कर्तव्याची जाण ठेवली. मात्र ते हे विसरले की एक मोठे अरण्य नेस्तनाबूत करून जी इंद्रप्रस्थ राजधानी त्यांनी आपल्या जेष्ठ बंधूच्या सोबतीने आणि माझ्या मदतीने उभी केली आहे या राजधानीमध्ये या पाचही भावांच्या युद्ध समर्थ बाहूंवर विश्वास ठेऊन भारतवर्षातील अनेक स्त्री-पुरुष इंद्रप्रस्थामध्ये राहण्यास आले. यासर्वांची सुखी जीवनाची जवाबदारी राजा म्हणून जितकी युधिष्ठिराची होती तितकीच ती इतर पांडव बंधूंची देखील होती. त्यामुळे मी तर म्हणेन की ज्येष्ठ बंधूसाठीच्या कर्तव्य भावनेतून त्यांनी युधिष्ठिराची प्रत्येक कृती स्वीकारताना इंद्रप्रस्थासाठीची त्यांची बांधिलकी ते विसरले... यातून परत एकदा हेच सिद्ध होते की मानवी जीवन हे कर्तव्यापेक्षा भावनेला जास्त महत्व देते.
उधो, कुरुक्षेत्रावर घडलेल्या भारतीय महायुद्धाची जवाबदारी प्रत्येकजण माझ्यावर टाकतो आहे. ही जवाबदारी मी देखील स्वीकारतोच! मात्र कुरुक्षेत्रावरील महायुद्ध हे खूप नंतरचे सत्य आहे. या महायुद्धाची गरज का निर्माण झाली याचा कधी कोणी विचार केला असेल का? जर पितामहांनी, महाराज धृतराष्ट्रांनी, राजमाता गांधारीदेवींनी, कुंती आत्येने, युधिष्ठिराने..... अगदी दुर्योधनाने देखील स्वतःच्या मनोद्वंद्वाला जिंकलं असतं तर भारतीय महायुद्ध घडलंच नसतं; हे सत्य आहे! उद्धवा, का झालं हे महायुद्ध?"
आम्ही दोघेच ज्यावेळी गप्पा मारत असतो त्यावेळी प्रश्न निर्माण करून त्याचे उत्तर देखील स्वतःच देण्याची सवय माझ्या ज्येष्ठ बंधुला आहे; याची मला कल्पना असल्याने त्याने प्रश्न जरी विचारला तरीही मी स्वस्थपणे तोच देणार असणाऱ्या उत्तराची वाट बघत होतो.
"प्रिय बंधो..." परत एकदा अनंतात दृष्टी स्थिरावत माझा भगवान बोलू लागला;"हे महायुद्ध केवळ द्रौपदीच्या स्त्रीसन्मानासाठी किंवा पांडवांच्या न्याय हक्कासाठी नाही झाले. हे युद्ध वैश्विक सत्यासाठी आणि पुढील पिढीपुढे निर्माण होणाऱ्या आदर्शांसाठी झाले आहे.
वडिलांच्या मनात निर्माण झालेली प्रेम भावना आपल्या युवराज म्हणून असणाऱ्या कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ ठरवली देवव्रताने.... हा आदर्श नाही!
महाराज पांडूच्या राज्याची लालसा ठेवली मनात धृतराष्ट्राने.... हा आदर्श नाही!
अंध पतीवरील प्रेमाखातर धर्मपत्नीचे भाव-कर्तव्य योग्य रीतीने पूर्ण करत आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली राजमाता गांधारीदेवींनी मात्र पुत्रप्रेमापुढे त्यांची कर्तव्यभावना तिठी पडली... हा आदर्श नाही!
तूच सांग..... कुंती आत्याची तारुण्यसुलभ उत्सुकता कर्णाला जन्म देऊन गेली... हा आदर्श तरुणींनी ठेवावा का?
द्यूतक्रीडेवरील प्रेमापोटी आपल्या लहान बंधूंना आणि प्रिय पत्नीला वनवास घडवला आणि कष्टाने उभे केलेले राज्याचे पुन्हा एकदा अरण्यात रूपांतर झाले... या युधिष्ठिराच्या कृतीला स्वीकारणे योग्य होईल का?
ही उदाहरणे तर केवळ वानगीदाखल उद्धवा! परंतु तू नीट विचार केलास तर अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय आणि मानवी जीवनामध्ये योग्य आदर्श निर्माण करणे हे प्रत्येक युगातील प्रत्येक स्त्री-पुरुषाचे आद्य भाव-कर्तव्य आहे. मी केवळ एक सामान्य जीव आहे; असा विचार करून आपल्या जवाबदारी पासून लांब जाणे ही तर सर्वसामान्य कृती आहे. मात्र आपल्या आयुष्याला सामोरे जाणे हेच खरे जीवन आहे."
तो परत एकदा बोलता-बोलता थांबला होता. हीच संधी साधून मी माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न त्याच्यासमोर मांडला.
"श्रीकृष्णा, प्रत्येक युगातील स्त्री-पुरुषाचे आद्य कर्तव्य आहे हे तू म्हणतोस; मात्र एक सर्वसामान्य जीव... जो नात्यांच्या भावबंधनात कायमचा गुंतला आहे; ज्याचे रोजचे जीवन जगतानाच त्याची दमछाक होते आहे; तो आदर्श काय आणि कसा निर्माण करणार?"
माझा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करून उठून उभे राहिले आणि म्हणाले;"उद्धवा, आज या श्रीसोपानावर बसून आपण गप्पा मारतो आहोत; ही तुझी भावनाच चुकीची आहे; हे पुढे ज्यावेळी तुझ्या लक्षात येईल त्यावेळी मी आत्ता जे सांगतो आहे; त्याचा अर्थ तुला लागेल....
आपले सर्वसामान्य जीवन योग्य प्रकारे जगणे हाच आदर्श आहे बंधो. योग्य पुत्र-पुत्री होणे, घेतलेल्या शिक्षणाचा राष्ट्र निर्मितीसाठी वापर करणे, माता-भगिनी-पत्नी-पुत्री यांच्या स्त्रीत्वाचा प्रत्येक पुरुषाने आदर करणे, स्त्रीने प्रत्येक पुरुषात आपल्या पित्याची छबी पाहणे आणि त्यायोग्य त्याचा आदर करणे यालाच कर्तव्य म्हणतात. धन संचय अयोग्य नाही बंधो... धन मिळवण्याचे अयोग्य मार्ग आणि त्या धनाचा अयोग्य वापर करणे चुकीचे आहे. अभिलाषा.. मग ती कसलीही असो.... सर्वात मोठा दुर्गुण आहे!"
त्याच्या बोलण्याने मी भारावून गेलो होतो. तो बोलताना उभा राहिला आणि माझ्याही नकळत मी त्याच्या चरणांशी लीन झालो. माझ्या दोन्ही स्कंधांना धरून मला उठवत आणि आपल्या हृदयाशी धरत माझ्या भावविश्वाचा भगवान मला म्हणाला;"माझ्या प्रिय बंधो... उधो... आता निर्वाणाची वेळ झाली आहे. तरीही अजूनही काही कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक आहेच. परंतु आज इथून निघताना माझा तुला एकच परामर्श आहे, यानंतर तू हिमालयाच्या पायथ्याशी बद्रिकेदाराच्या परिसरात एक आश्रम उभार आणि पुढील काळात जीवनरस शरीरामध्ये जोवर धावतो आहे तोपर्यंत आजच्या आपल्या चर्चेचे सार मानवी जीवनापर्यंत पोहोचव. मला खात्री आहे की माझ्या हातून जर काही राहिले असेल तर ते पूर्ण करण्याची वैचारिक शक्ती फक्त तुझ्याकडेच आहे. चल आता निघू इथून."
असे म्हणून त्याने माझा उजवा हात आपल्या हातात धरला आणि श्रीसोपनाच्या पायदांड्या सावकाशपणे उतरू लागला.
Very nicely written. While reading all your articles on Mahabharata related figures, I felt the language reminds me of a great Novel “ Yayati” by great author V. S. Khandekar. It’s your achievement I must say.
ReplyDelete