Friday, December 4, 2020

श्रीकृष्ण - सात्यकी

 श्रीकृष्ण - सात्यकी


मी सात्यकी. द्वारकेचा सेनापती... आणि द्वारकाधिशांचा सखा. हे मी म्हणत नाही तर स्वतः अच्युतांनी मला सांगितलं आहे. मी मात्र स्वतःला त्या राजनीतिकुशल मोहमयी कृष्णरूपाचा अंकित मानतो. या भावबंधनात अडकवणाऱ्या वासुदेवावर प्रेम करणारे अनेक आहेत; त्यांच्या पाणीदार नेत्रांमध्ये विरघळून जाणारे देखील अनेक आहेत; त्या कृष्णमयी रूपामध्ये बंधीत होणारे देखील अमाप आहेत... मी त्या अनेकांमधला एक असूनही मला स्वतःच्या हृदयात विशेष स्थान देऊन सतत सोबत ठेवणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी माझ्या अवगुणांना देखील स्वीकारून मला जिवंतपणी मोक्षप्राप्ती करून दिली आहे; असं मी मानतो. मोठेपण कसं सिद्ध होत असतं? अस्तित्वाने? वयाने? अनुभवाने? कर्तृत्वाने? अहं! मोठेपण मुळात असावं लागतं; मग ते सिद्ध करावं लागतंच नाही... ते आपोआपच स्वीकारलं जातं. नाहीतर ज्याला मी मुरलीधर गोकुळवासी गवळी समजत होतो तो पोरगेलासा काळा-सावळा नंद-यशोदा पुत्र माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ झालाच नसता.

खरं तर मी श्रीकृष्णांपेक्षा वयाने जेष्ठ. त्यांचं पहिलं रूपदर्शन महाराज कंस यांच्या वधाच्यावेळी मला झालं. मात्र त्यागोदरच त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकून होतो. बलराम दादांसोबत त्यांचं मथुरेमध्ये आगमन झालं तेच मुळी गजराजाला सामोरं जात. त्यावेळी इतर अनेक मथुरावासीयांप्रमाणे मी देखील त्या मल्ल युद्धाचा साक्षीदार होतो. महाराज कंस यांचा वध त्यानंतर झाला. मी मात्र त्या सावळ्या रंगाच्या घननिळ्या नेत्रांच्या निळाईमध्ये तेव्हाच वाहून गेलो होतो. वसुदेव पुत्र म्हणून वासुदेवांनी महाराज वसुदेवांना मथुरेच्या आणि पुढे द्वारकेच्या सिंव्हासनावर बसवलं. ज्येष्ठ बंधू म्हणून बलराम दादा युवराज झाले. तरीही श्रीकृष्ण भगवानांचे अस्तित्व सार्वभौम आणि सर्वव्यापी होते; हे प्रत्येकाला मान्य होते. मथुरेतील महाराज कंस यांच्या वधानंतर श्रीकृष्णाने महाराज वसुदेवांच्या आज्ञेने मथुरा सेनापती अनाधृष्टी यांना पाचारण केले त्यावेळी त्यांच्यासोबत मी देखील होतो. त्यावेळची माझी ओळख केवळ एक होतकरू, आजानुबाहु योद्धा इतकीच होती. मात्र सेनापती अनाधृष्टी यांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या माझ्याकडे आपली स्नेहदृष्टी वळवून त्या मनमोहनाने मला विचारले;"सेनापती अनाधृष्टी सोबत मथुरेचा सेनापती होऊन तिचा भार संभाळशील का?" त्याक्षणी मी त्या यादवश्रेष्ठ कृष्णदेवांचा अंकित झालो ते माझ्या जीवन अंतापर्यंत.

काय नाही बघितलं मी त्यांच्या सोबत? मथुरेवरील जरासंधाची सतरा आक्रमणे कृष्णदेवांनी परतून लावली. मात्र जरासंध आक्रमणे करणे थांबवणार नाही हे लक्षात आल्यानंतर सतराव्या आक्रमणानंतर मथुरावासीयांच्या होणाऱ्या हालापासून त्यांची सुटका करण्याच्या हेतूने कृष्णदेवांनी दूर सागर किनारी द्वारका नगरी वसवली... आणि कृष्णदेव द्वारकाधिश झाले. त्यानंतर ज्यांच्यावर द्वारकाधिशांनी निस्सीम प्रेम केले त्या देवी रुक्मिणींचे हरण त्यांनी केले त्यावेळी देखील मी त्यांच्या सोबतच होतो. स्यमंतक मणिरत्नामुळे द्वारकाधिशांवर आलेला चोरीचा आळ माझं हृदय घायाळ करून गेला. मात्र हाच स्यमंतक देवी सत्यभामा आणि देवी जाम्बवती यांना कृष्णदेवांच्या आयुष्यात घेऊन आला. द्वारकाधिशांनी नरकासुर वध करून कामरूपी सोळा सहस्त्र स्त्रियांना केवळ त्याच्या अत्याचारातून सोडवले नाही तर आपल्या नावाचे मंगळसूत्र त्यांना देववून यासर्व स्त्रियांना पुन्हा एकदा मानाने जगण्यासाठी त्यांचे पुनर्वसन केले आणि द्वारकाधिश कृष्णदेव समस्त मानवजातीसाठी भगवान झाले. त्यांनी कायमच कर्मयोग सर्वात मोठा मानला... आणि मी त्यांच्या अस्तित्वाचा अंकित झालो.

***

अर्जुन : श्रीकृष्णा, अरे सात्यकी द्वारकेचे सेनापती आहेत. तुझ्या श्वासाइतके तुझ्या जवळचे. केवळ इतकेच नव्हे तर ते वयाने अनुभवाने आणि कर्तृत्वाने देखील माझ्याहून ज्येष्ठ आणि महान आहेत. ते गेले अनेक दिवस मला आग्रह करत आहेत की मी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करावा. तूच सांग यदुनाथा, वयाने आणि अनुभवाने त्यांच्याहुन लहान असणाऱ्या मी त्यांना शिष्य करून घेणे कितपत योग्य आहे?

श्रीकृष्ण : पार्था, कायम केवळ योग्य आणि अयोग्य याचा विचार करण्यापेक्षा राजकीय मूल्यमापन करून आवश्यक निर्णय घेणे जास्त महत्वाचे असते. तूच आत्ता म्हंटल्याप्रमाणे सात्यकी मथुरा नगरिपासून माझ्यासोबत आहे. तो मथुरेचा आणि आता द्वारकेचा सेनापती आहे. केवळ सेनापती या नात्याने नव्हे तर माझा सखा म्हणून तो माझ्या अनेक निर्णयांमध्ये माझ्या सोबत आहे. त्यामुळे तो केवळ एक युद्धकुशल योद्धाच नाही तर अत्यंत कुशल राजकारणी देखील झाला आहे. मी तर असे म्हणेन की सात्यकी म्हणजे एक परिपूर्ण राजकीय योद्धा आहे. अशी व्यक्ती कायम पांडवांसोबत असणे अत्यावश्यक आहे.

अर्जुन : यादवश्रेष्ठा, जिथे तूच आमच्या सोबत आहेस तिथे तुझे सोबती देखील कायमच आमच्या सोबत असणार हे त्रिकालाबाधित सत्य नाही का?

श्रीकृष्ण : (मंद हसत) पार्था, त्रिकालाबाधित सत्य असं काही नसतं बरं का! आणि मी तुमच्या सोबत असणं आणि माझ्या बरोबर असणारे योद्धे तुमच्या सोबत असणं यात खूप फरक आहे. कधीतरी अशी वेळही येऊ शकते की मी पांडवांसोबत उभा आहे आणि माझ्या समोर माझे सर्व सोबती, माझी सेना इतकेच काय तर माझे सेनापती देखील शत्रू म्हणून उभे आहेत. अशा परिस्तिथीमध्ये आपल्या बाजूने कोण असावं याचा विचार आत्तापासूनच करणं आवश्यक आहे. सात्यकी हा एक आजानुबाहु, आजानूस्कंध असा महारथी योद्धा आहे. तो तुझा शिष्य झाल्याने कधीच तुझ्या विरोधात युद्धाचा विचार करणार नाही. त्याचं तुमच्या सोबत असणं ही काळाची गरज ठरणार आहे. तेव्हा कोणताही विचार न करता द्वारका नगरीच्या सेनापतीला तू आपला शिष्य म्हणून स्वीकार आणि त्याला योग्य ती धनुर्विद्या शिकव.

अर्जुन : नारायणा, तू कोणत्या परिस्थितीबद्दल बोलतो आहेस?

श्रीकृष्ण : काही प्रश्न काळावर सोडावेत पार्थ.....


*****

#shrikrushna #krushnarjun #mahabharat #श्रीकृष्ण #कृष्णार्जुन #महाभारत #अथश्रीमहाभारात #महाभारातकथा

                         

No comments:

Post a Comment