Friday, December 18, 2020

हेवा (भाग 1)

 

हेवा


भाग 1


स्वप्नाळू राधाच्या लग्न करताना आयुष्याकडून खूप काही अपेक्षा होत्या. आजवर तिने जितके सिनेमे पाहिले होते त्यात सकाळी नवरा बायकोला प्रेमाने उठवतो... स्वतः बनवलेला नाश्ता देतो... गरम-गरम चहा आणून देतो असंच दाखवलं होतं. संध्याकाळी नवरा कामाहून येण्याच्या वेळेला बायको छान तयार होऊन त्याची वाट बघते; तो आला की तिच्या केसात गजरा माळतो आणि तिला उचलून घेऊन चुंबनांचा वर्षाव करतो... दोघे सतत गुलुगुलू बोलत असतात. हे सगळं पाहून तिला अपेक्षा होती की तिचा संसार पण तसाच असेल. त्यात लग्नानंतर ती आणि नवरा दोघेचजण त्याच्या बदलीच्या गावी राहाणार होते; त्यामुळे तर हे सगळं शक्य आहे असंच तिला वाटायचं. लग्न करून नवऱ्यासोबत बदलीच्या गावी आल्यानंतर राधेचा पूर्णच भ्रमनिरास झाला. ते आले त्यादिवशीच तिच्या नवऱ्याने तिला सांगितले की तो सकाळी आठ वाजता घराबाहेर पडणार आहे आणि त्याअगोदर त्याचा नाश्ता आणि चहा त्याला हवा असतो. त्याशिवाय जाताना डबा देखील तो नेणार होता. डब्यात फक्त भाजी पोळी त्याला चालणार नव्हती. व्यवस्थित अगदी चटणी-कोशिंबिरी पासून सगळंच हवं होतं. 


हे सगळं ऐकून राधा एकदम हिरमुसली झाली. पण काही न बोलता दुसऱ्या दिवशी ती सहाला उठली आणि नवऱ्याच्या मर्जीप्रमाणे तिने सगळं साग्रसंगीत केलं. तो गेल्यानंतर पसरलेलं घर आवरलं. भांडी घासणं, कपडे धुणं, घर झाडून-पुसून घेणं या रोजच्या कामांमध्ये ती अडकून गेली. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर कसतरी जेवून घेतलं. संध्याकाळी ती थोडी फ्रेश होऊन नवऱ्याची वाट बघत बसली. पण लग्नाच्या निमित्ताने बरेच दिवस सुट्टी घेतल्यामुळे नवऱ्याला घरी यायला खूपच उशीर झाला. तो आला तोच दमून. त्यामुळे त्याची वाट बघत बसलेल्या राधेकडे बघण्याचे त्राण देखील त्याच्यामध्ये नव्हते. जेमतेम जेऊन तो बेडरूममध्ये गेला. स्वयंपाकघरातलं काम झटपट आवरून राधा अधिरपणे बेडरूममध्ये शिरली आणि पाहाते तर नवरा पार डाराडूर झोपून घेला आहे. आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.

अजून माझ्या हातावरची मेहेंदी नाही उतरली आणि हा डाराडूर झोपून गेला आहे. रोमान्स म्हणजे काय याला माहीतच नाही का? हेच का लिहिलं आहे माझ्या नशिबात? ते नवऱ्याने लाडीकपणे चहा करणं... बायकोसाठी गजरा आणणं आणि तिच्या नकळत तो तिच्या डोक्यात माळणं... प्रेमाच्या गप्पा मारत बसणं... या अपेक्षा जगावेगळ्या तर नाहीत न! तिच्या मनात आलं. पण हे सगळं ती सांगणार कोणाला होती? नवीन शहर, नवीन जागा... त्यामुळे ओळखीचं कोणीच नाही.

दुसऱ्या दिवशी देखील नवरा असाच खाऊन आणि साग्रसंगीत केलेला डबा घेऊन निघून गेला आणि राधाने रडत-रडत आईला फोन केला.

"हॅलो आई...." राधाचा रडका आवाज ऐकून आईच्या काळजात धस्स झालं.

"राधा बेटा, काय झालं ग? तुझा आवाज असा का येतो आहे? जावाईबापू ठीक ना?" आईने काळजीने विचारलं.

"त्याला काय धाड भरली आहे? मस्त पोहे-चहाचा नाश्ता करून साग्रसंगीत डबा घेऊन गेला तो कामाला." राधा काहीश्या रागाने म्हणाली.

"हो न? मग तू रडते का आहेस? काही बोलले का तुला ते?" आईने गोंधळून विचारलं.

"तो काही बोलतच नाही ग आई. त्याचाच त्रास होतो आहे. काल आमचा पहिला दिवस इथला... पण तो रात्री उशिरा आला. माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही ग. जेवला आणि झोपला. हे कसलं आयुष्य ग आई? ना माझ्यासाठी चहा केला ना गॅलरीत बसून गप्पा मारल्या... ते तर जाऊ दे; पण अग मी केलेल्या नाश्त्याचं आणि जेवणाचं एका अक्षराने कौतुक देखील नाही केलं ग. असा कसा हा... इतका unromantic?" राधा अजूनही घुश्यातच होती.

तिचं बोलणं ऐकून आई अवाक झाली आणि म्हणाली;"राधा, अग पूर्वी तू हे सगळं मला सांगायचीस तेव्हा तू लहान आहेस असं समजून मी काही बोलले नाही. पण ही असली फिल्मी स्वप्नं बघणं सोडून दे बघू. यामुळे घरात फक्त असंतोष राहातो. अग, संसार म्हणजे गुलूगुलू गप्पा; गजरा माळणं, मिठ्या मारणं नाही बेटा. रोमान्स तर हवाच पण त्याच बरोबर एकमेकांना समजून घेऊन सुख-दुःखात साथ देणं याला संसार म्हणतात. अग आपल्यासारखे मध्यम वर्गीय पैसे न कमावता फक्त गुलुगुलू बोलत राहिले तर जेवणार काय? स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर हे राधे. नाहीतर एखाद दिवस तोंडघाशी पडशील."

आईचं बोलणं ऐकून राधा अजूनच हिरमुसली. फोन ठेवताना तिने मानत ठरवलं की आता आईशी या विषयावर बोलायचंच नाही. जे करायचं आहे ते आपणच करायचं. असं तिने ठरवलं खरं; पण नक्की काय करायचं तेच सुचत नसल्याने ती आला दिवस ढकलत होती.

...... आणि एक दिवस त्यांच्या इमारतीच्या समोरच्या इमारतीमध्ये अगदी त्यांच्या समोरच्याच घरात असंच एक जोडपं राहायला आलं. दोन्ही घरांच्या गॅलरीज अगदी समोरासमोर यायच्या. गम्मत म्हणजे स्वयंपाक घराची खिडकी आणि दिवणखान्याची खिडकी देखील अगदी समोरच. आजवर राधाला हे लक्षात आलं नव्हतं. मात्र हे जोडपं आलं आणि तिचं कुतूहल जागं झालं. पहिल्या दिवशी दोघे नवरा-बायको सकाळी तसे आरामातच उठले. नवऱ्याने चहा करून आणला होता आणि दोघे राजा-राणी गॅलरीमध्ये बसून गप्पा मारत होते. थोड्या वेळाने तिचं लक्ष गेलं तर दोघे दिवाणखान्यात बसून सकाळचा नाश्ता करत होते. पण तिने तर राणीला उठून स्वयंपाकघरात जाताना बघितलं नव्हतं. त्यामुळे ती काहीशी गोंधळली. मग मात्र कुतूहलापाई राधाचं लक्ष त्यांच्या घराकडे लागलं. एकीकडे ती स्वतःच्या घरातलं काम करतच होती. राधाने भाजी फोडणीला टाकली आणि तिचं समोर लक्ष गेलं आणि अहो आश्चर्यम्! राजा स्वयंपाक करत होता. बहुतेक त्याने हिंदी गाणी लावली होती आणि मजेत काहीतरी चिरत तो गुणगुणत होता.

राधाचं जेवण उरकलं आणि ती तिच्या खोलीत जरा पडावं या विचाराने आली. पडदा सरकवताना नकळत तिने वाकून समोरच्या घराकडे बघितलंच. राणी पलंगावर बसली होती आणि राजा चक्क तिच्या नखांना नेलपॉलिश लावत होता. 'नशीबवान राणी' राधाच्या मानत आलं. संध्याकाळी पुन्हा तिचं कथा पुढे होती.... राणी गॅलरीमध्ये व्यायाम करत होती... अगदी जोरदार; आणि राजा स्वयंपाकघरात होता.

दिवेलागणीची वेळ झाली आणि राधाने देवासमोर निरांजन लावलं. दिवाणखान्याचा दिवा लावताना चुकारपणे तिची नजर समोरच्या घरात गेलीच. राणी खूप मस्त तयार झाली होती. अगदी दृष्ट लागेल अशी! राजा तिचे कपाळावरचे केस मागे करत तिच्या अगदी जवळ उभं राहून काहीतरी बोलत होता. राणीची पाठ होती खिडकीकडे... पण राधाला खात्री होती की राजाच्या त्या प्रेमळ बोलण्यामुळे सुखावून राणी मंद स्मित करत असेल. तेवढ्यात राणी घराबाहेर पडली आणि अत्यंत स्वाभाविकपणे राधा खिडकीकडे धावली. राधाने खाली वाकून बघितलं तर राजा एका गाडीचं दार उघडून देत होता राणीला आणि राणी एकटीच गाडीत बसून निघून गेली.

राणी गेली आणि त्याचवेळी राधाला तिचा नवरा येताना दिसला. समोरच्या घरातल्या राजा-राणीच्या दुनियेतून राधा परत एकदा तिच्या संसाराच्या सत्य दुनियेत आली आणि नवऱ्यासाठी चहा करायला स्वयंपाकघराकडे वळली. रात्री स्वयंपाकघरातली शेवटची आवराआवर करून राधा तिच्या खोलीकडे जात होती आणि तिने सहज समोर बघितलं तर राणी नुकतीच घरी आली होती..... अगोबाई, रात्रीचे बारा वाजून गेले आहेत आत्ता येते आहे ही? कमाल आहे! राजाला बरं चालतं हिचं असं मजा करायला बाहेर जाऊन उशिरा येणं!!! राधाच्या मनात आलं. पण ती दिवसभराच्या घरातल्या कामाने दमून गेली होती. त्यामुळे फार विचार न करता ती पलंगावर जाऊन आडवी पडली.

राधाला वाटलं होतं पहिलाच दिवस आहे त्यामुळे दोघांनी ठरवून असं काही एन्जॉय केलं असेल. पण त्यानंतर राजा-राणीचा तोच दिनक्रम आहे हे राधाच्या लक्षात आलं; आणि त्यांच्याबद्दल तिच्या मनात कुतूहल जागं झालं. राणी काही आजारी-बिजारी असेल का? तिच्या मानत आलं. पण हा विचार तिने लगेच पुसून टाकला. दोघे छान जगताना दिसत होते; मग उगाच कशाला असे नकारात्मक विचार करायचे? राधाने स्वतःलाच फटकारलं.

ते दोघे समोर राहायला येऊन पाच/सहा दिवस झाले होते. एका संध्याकाळी राधा भाजी आणायला बाहेर पडली. मुद्दाम त्यांच्या इमारतीत जाऊन घर कोणी घेतलं आहे ते नाव बघायला गेली. नावाच्या पट्टीवर उर्वशी - देवेंद्र असं लिहिलं होतं. ते वाचून राधा खुदकन हसली. तिच्या मानत आलं नावं देखील किती मिळती-जुळती. ती उर्वशी आणि तो तिचा देवेंद्र! ती मागे वळली आणि तिला देवेंद्र समोरून येताना दिसला. तिने त्याच्याकडे बघत स्मित केलं. त्याने देखील स्मित केलं आणि तो जिना चढायला लागला.

उर्वशी आणि देवेंद्रच्या संसाराचं निरीक्षण करण्याचा नादच लागला राधाला. पण हळूहळू त्यांच्या सुखी संसाराच्या कौतुकाची जागा मत्सराने घ्यायला सुरवात केली. उर्वशीचं सुख राधेला टोचायला लागलं आणि आपलं आयुष्य नकोसं व्हायला लागलं. खरं तर तिचा नवरा काही अगदीच शुष्क नव्हता. शनिवार-रविवार तो फक्त आणि फक्त राधेबरोबर असायचा. मित्रांनी बोलावलं तरी जात नसे. राधेला घेऊन सिनेमाला जाणं; बाहेर जेवायला जाणं हे तो आवर्जून करायचा. त्यांच्या कंपनीची एक मोठी ऑर्डर पास झाली आणि बॉसने अचानक सगळ्यांना खास अलौन्स दिला तर त्याने राधेसाठी एक सुंदर साडी आणली. पण राधाला त्याचं प्रेम आता दिसतच नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर उर्वशी आणि देवेंद्रचा आदर्श संसार सतत नाचत होता आणि त्याहूनही जास्त उर्वशीच्या सुखाचा वाढता राग राधेच्या डोक्यात जात होता.

राधा त्या शहरालाच नवीन होती. तिथे त्यांचे कोणी नातेवाईक राहात नव्हते; ना राधेला कोणी मित्र-मैत्रिण होते. त्यामुळे तिच्या मनातली ही धुसमुस तिला कोणालाही सांगता येत नव्हती. आईला काही सांगणं शक्यच नव्हतं. आई परत तिचं तिची जुनी रेकॉर्ड लावेल याची राधाला खात्री होती. दिवस जात होते आणि राधाचा अस्वस्थपणा वाढत होता.

एकदिवस राधा दुपारी वर्तमानपत्र वाचत बसली होती आणि तिची नजर एका जाहिरातीवर पडली...

जे हवं असेल ते मिळेल.... पैसा, सन्मान, कोणापासून सुटका किंवा कोणालातरी मिळवणं... काहीच अवघड नसतं. फक्त इच्छा प्रामाणिक आणि जबरदस्त असावी लागेल... हवं आहे? संपर्क करा!! आणि त्याच्यापुढे एक नंबर लिहिला होता.

राधाने जाहिरात वाचली; तिच्या मनात ती अडकली. पण मग राधा तिच्या कामाला लागली. राधा काम करत होती आणि तिच्या आईचा फोन आला.

"काय करते आहेस ग बाळा?" आईने प्रेमाने राधेला विचारले.

"काय करणार? घरकाम! अजून काय लिहिलं आहे माझ्या नशिबात? नवऱ्याने केलेले लाड आणि नवऱ्याचं प्रेम फक्त उर्वशीच्या नशिबात." राधा नकळत बोलून गेली.

आईला कळेना राधा काय म्हणते आहे. आई म्हणाली;"कोण उर्वशी? तिचं काय? तुमचा नवीन संसार. त्यात नवीन शहर. ना सासू बरोबर ना सासरे. तुम्ही दोघे राजा राणी आहात न? मग शनिवार रविवार कुठे जात नाही तुम्ही?"

राधा म्हणाली;"होsss, जातो की. त्याच्या मनात असलं की सगळं होतं. जाऊ दे ग. माझं दुःख आणि मी. तू कसा काय आत्ता फोन केलास आई?"

त्यावर तिची आई म्हणाली;"राधा, अगं महत्वाचंच आहे तसं. चार दिवसांनी अमावस्या आहे हं; आणि ग्रहण देखील. चांगला दिवस नाही हो! इडापिडा टळो ती. तुला सांगायला फोन केला की तो दिवस शनिवार आहे. कदाचित तुम्ही दोघे बाहेर जायचं ठरवाल. तर तसं नको करुस हं. घरीच राहा या शनिवारी."

आईचं बोलणं उडवून लावत राधा म्हणाली;"आम्ही कुठ्ठे जात नाही ग. मुळीच काळजी करू नकोस. घरातच बसणार आहे मी. खिचडी खाणार आणि रात्री झोपणार. बास!!! चल, ठेवते फोन. तो यायची वेळ झाली." असं म्हणत राधेने फोन ठेवला.

तिची नजर सवयीने उर्वशी-देवेंद्रच्या घराकडे गेली. उर्वशी रोजच्या प्रमाणे अप्रतिम सुंदर दिसत होती. आज तिने सुंदर काळा चमकदार ड्रेस घातला होता आणि मेक-अप देखील जरा खासच केला होता. तिचं सुख बघून राधेच्या मनाचा तिळपापड झाला आणि ती तरातरा खोलीत जाऊन पलंगावर पडून हमसून-हमसून रडायला लागली. किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. रडता-रडता झोपलेल्या राधेला जाग आली. पाहाते तर तिचा नवरा तिच्या शेजारी गाढ झोपला होता. त्याला शेजारी बघून ती एकदम गडबडून गेली. 'अरेच्या! हा कधी आला? उठवलं पण नाही याने मला. कमाल आहे!' तिच्या मनात आलं. तिने घड्याळाकडे बघितलं बारा वाजून गेले होते. राधेची झोप उडून गेली होती.

ती उठली आणि दिवाणखान्यात आली. सवयीप्रमाणे तिची नजर समोर उर्वशीच्या घराकडे गेली. देवेंद्र दरवाजा उघडत होता. राधा पुढे झाली आणि खिडकीला चिकटून पडद्याआड उभी राहून बघायला लागली. दार उघडताच उर्वशी आत आली. राधाला फक्त देवेंद्रची पाठ दिसत होती त्यामुळे नकळत राधा अजून थोडी वाकली. देवेंद्र हात पसरून उर्वशीला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता बहुतेक... पण त्याचे हात रागाने ढकलून देत उर्वशी आत खोलीकडे धावली. तिचा मेक-अप चांगलाच उतरला होता आणि केस पण अस्ताव्यस्त झाले होते.

राधाच्या मनात आलं 'कमाल आहे उर्वशीची. भटकायलाच तर गेली होती न? आता जर नवरा प्रेमाने पुढे येतो आहे तर त्यालाच ढकलून दिलं हिने.' विचार करत करत राधा स्वयंपाकघरात गेली. पाहाते तर नवऱ्याने जेऊन घेऊन तिचं जेवण झाकून बाकी सगळं आवरून ठेवलं होतं. ते पाहून राधाच्या मानत आलं 'हं! बरी जमतात याला असली नाटकं. काल मेसेज केला होता की मला स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे; काहीतरी घेऊन ये येताना. तर रिप्लाय करतो... मला उशीर होणार आहे. तुझ्यासाठी काही असेलच न घरात; मी खाऊन येतो. म्हणजे मला कंटाळा आला तर हा मजा करणार आणि मी खायचं शीळ काहीतरी... आणि आज अचानक सगळं आवरून ठेवलंय. मला हाक सुद्धा मारावीशी वाटली नाही याला. माझ्यावर प्रेम तरी आहे की नाही याचं?' विचार करत करत राधा ग्लासभर पाणी प्यायली आणि परत झोपण्यासाठी खोलीकडे वळली. खोलीकडे जाताना तिचं लक्ष दुपारी टेबलावर ठेवलेल्या वर्तमानपत्रावर गेलं. तिच्या समोर दुपारी ओझरती वाचलेली जाहिरात होती. पिवळ्या लाल रंगातली ती जाहिरात दिवाणखान्यातल्या मंद उजेडात डोळ्यांना आकर्षून घेत होती. झोपायला जाण्याचा बेत रद्द करत राधा सोफ्यावर बसली आणि तिने परत एकदा ती जाहिरात वाचली.

जे हवं असेल ते मिळेल.... पैसा, सन्मान, कोणापासून सुटका किंवा कोणालातरी मिळवणं... काहीच अवघड नसतं. फक्त इच्छा प्रामाणिक आणि जबरदस्त असावी लागेल... काही हवं आहे? संपर्क करा!!

खरी असेल का ही जाहिरात? की काहीतरी ढोंगी बाबा सारखं असेल? राधा विचार करत हातातल्या मोबाईलशी चाळा करत होती. अचानक तिला काय झालं कोणास ठाऊक तिने जाहिरातीमधला नंबर मोबाईलवरून लावला आणि मोबाईल कानाला लावला. रिंग व्हायला लागली आणि हे बरोबर नाही... असं मनात येऊन राधा फोन कट करणार एवढ्यात समोरून फोन उचलला गेला आणि तिच्या कानात एका स्त्रीचा आवाज घुमला... बोल राधा... नक्की तुला काय हवं आहे?

क्रमशः

2 comments: