हेवा
भाग 2
...राधा फोन कट करणार एवढ्यात समोरून फोन उचलला गेला आणि तिच्या कानात एका स्त्रीचा आवाज घुमला... "बोल राधा... नक्की तुला काय हवं आहे?"
आता पुढे.....
तो आवाज ऐकून राधा तीनताड उडाली. फोन समोरच्या टेबलावर टाकत ती तटकन उभी राहिली. राधाचे हात कापत होते... अचानक बाहेरून अँब्युलन्स घंटानाद करत गेली आणि राधा एकदम धडपडली. तिचा धक्का टेबलाला लागला आणि मोबाईलमधून आवाज आला... 'राधा ठीक आहेस न?' एक स्त्री बोलत होती. अत्यंत प्रेमळ आणि मधाळ आवाज होता तो. तो आवाज ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.
'काही ओळख नाही.. संबंध नाही.. आणि ती कोणीतरी स्त्री मला विचारते आहे 'ठीक आहेस न!' इथे माझ्या आईला आणि नवऱ्याला मात्र माझी काही काळजीच नाही.' राधाच्या मनात आलं.
राधाने थरथरत्या हाताने मोबाईल उचलला आणि कानाला लावला. आवंढा गिळत राधा कापऱ्या आवाजात म्हणाली;"हॅलो... कोण?"
समोरून एका स्त्रीचा काळजीभरला आवाज राधाच्या कानात शिरला. "मी कोण याला फार महत्व नाही राधा. अगोदर मला सांग तुला लागलं तर नाही न? ठीक आहेस नं बाळा?"
"हो मी ठीक आहे." डोळ्यातून वाहणारं पाणी पुसत राधा म्हणाली.
"तुला एक पत्ता देते बाळा, उद्या दुपारी ये. मला माहीत आहे तुझ्या मनात काय आहे. विश्वास ठेव... माझ्याकडे उपाय आहे. बरं! लिहून घे बघू पत्ता. माझा मोबाईल बंद पडला आहे. त्यामुळे मेसेज नाही करता येणार ग मला." ती स्त्री म्हणाली.
घाईघाईने पेन हातात घेत राधाने समोरच्या वर्तमानपत्रावर पत्ता लिहिला आणि मोबाईल बंद करून तेवढा तुकडा फाडून घेत ती झोपण्यासाठी खोलीकडे वळली. राधा पलंगावर जाऊन आडवी पडली तर खरी; मात्र काही केल्या राधेला झोप येत नव्हती. 'कोण होती ती स्त्री? इतक्या प्रेमळ आवाजात माझ्याशी बोलली जणूकाही मला ओळखते. म्हणाली माझ्या मनात काय आहे ते तिला माहीत आहे. काय आहे माझ्या मनात?' राधेला खरोखरच हा प्रश्न पडला होता. मला नक्की काय हवं आहे?
.... आणि मग नकळत राधा विचार करायला लागली.... उर्वशी-देवेंद्रच्या दृष्ट लागावी अशा संसाराचा राधेला हेवा वाटायला लागला होता; हे तिने मनातल्या मनात मान्य करून टाकलं. पण सत्य हे होतं की तिला त्यांच्या संसारपेक्षा उर्वशीच्या सुखाचा मत्सर वाटत होता. 'उर्वशी सारखं माझं आयुष्य का नाही? प्रेमाने हाक मारून जागं करणारा आणि जाग आल्यावर हातात गरम गरम चहाचा कप देणारा नवरा माझ्या नशिबात का नाही?' राधाच्या मानत आलं. किती कौतुकाने देवेंद्र उर्वशीला नेलपॉलिश लावत होता. तिचा व्यायाम करून झाला की कौतुकाने तिच्या हातात ज्युसचा ग्लास आणून देतो. ती बाहेर जायला निघण्याची तयारी करत असेल तर तिच्या पुढे-मागे करत तिला मदत करतो. मी कित्येकदा बघितलं आहे उर्वशी निघताना देवेंद्र तिचे केस सारखे करण्याच्या निमित्ताने किंवा ड्रेस सारखा करण्याच्या निमित्ताने तिला जवळ घेतो. खरंच किती प्रेम आहे त्याचं उर्वशीवर.... आणि ती महामाया कशी वागत असते घरात. एखाद्या महाराणीसारखी सतत त्याला कामाला लावते. उशिरा उठणं, मोजकंच खाणं, आराम, व्यायाम, मस्त तयार होणं आणि भटकणं... किती मस्त आयुष्य आहे तिचं. मी उर्वशी होऊ शकले तर?(!) अहाहा! आयुष्यात बहार येईल. खरंच; मला उर्वशीचं आयुष्य मिळालं तर मी कधीतरी नक्की देवेंद्रला घरकामात मदत करेन. कौतुकाने एकदा पदार्थ पण बनवून देईन. अट एकच! प्रेम फक्त आणि फक्त प्रेम करावं त्याने माझ्यावर.... म्हणजे उर्वशीवर! हा विचार मनात आला आणि राधा खुदनकन हसली. 'उर्वशीचं आयुष्य! मला कळलंय मला काय हवंय.' तिच्या मनात आलं. डोळे मिटताना राधेने हाताच्या मुठीतलं ते पत्ता लिहिलेलं चिठोरं हलकेच उशीखाली सारलं आणि डोळे मिटले.
तिला स्वप्नात देवेंद्र तिचे पाय चेपतो आहे असं दिसलं आणि ती जागी झाली....
सकाळचे सहा वाजले होते. राधेचा नवरा अजून झोपलाच होता पण तिला उठणं भाग होतं. नवऱ्यासाठी नाश्ता आणि त्याचा डबा करून तिने ते सगळं टेबलावर ठेवलं. स्वतःचं सगळं उरकून नवरा निघाला आणि राधा हुश्य करत सोफ्यावर बसली. नेहेमीप्रमाणे राधाची नजर समोरच्या घराकडे गेली. देवेंद्र सफाई करत होता. पण त्याचा चेहेरा चिडचिडलेला होता. राधाला आठवलं आदल्या रात्री बाहेरून आलेल्या उर्वशीने देवेंद्रला ढकलून दिलं होतं. बहुतेक म्हणून तो चिडचिडला असावा. बायकोसाठी झुरणारा नवरा! किती नशीबवान आहे उर्वशी. पुन्हा एकदा तोच तो विचार राधेच्या मनात आला; आणि त्याक्षणी तिला आदल्या रात्रीच्या फोनची आठवण झाली.
तो कॉल आठवताच राधा काहीशी गोंधळून गेली. खरंच आला होता का तो कॉल की आपला भास होता? जर खरंच तो कॉल होता तर कोण होती ती स्त्री? मला ओळखत कशी होती ती? मुळात मी केला होता कॉल की आला होता मला? राधाला अनेक प्रश्न भेडसावायला लागले आणि तिने घाईघाईने जाऊन पलंगावर पडलेला मोबाईल हातात घेतला. तिने call log बघितला. खरोखरंच काल रात्री राधाने एका नंबरवर फोन केलेला दिसत होता. आता परत एकदा राधाचे हात थरथरायला लागले. तिच्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. ती मटकन पलंगावर बसली आणि हलकेच तिने तिच्या उशीखाली हात घातला. तिच्या हाताला त्या कागदाच्या कपट्याचा स्पर्श झाला आणि चटका लागल्याप्रमाणे तिने हात बाहेर घेतला. राधाचं मन आता पुरत गोंधळून गेलं होतं. ती विचार करत होती....
जाहिरात बघून आपण फोन केला. पण त्यावेळी तो फोन आपण नक्की का करतो आहोत ते आपल्याला माहीत नव्हतं. मात्र ज्या स्त्रीने फोन उचलला ती आपल्याला ओळखत होती. तिने असं देखील म्हंटलं की माझ्या मनात काय आहे ते तिला माहीत आहे आणि तिच्याकडे त्यावर उपाय आहे. मला देखील त्याक्षणापर्यंत माहीत नव्हतं की माझ्या मनात काय आहे आणि मला काय हवं आहे; मग तिला कसं कळलं??? राधा विचार करत होती.... आणि एका क्षणी तिच्या लक्षात आलं की फोन करताना जरी तिला माहीत नव्हतं की तिला काय हवं आहे तरी आता तिच्या मनात खूप स्पष्ट होतं की तिला नक्की काय हवं आहे.
आता मात्र अत्यंत शांत मनाने राधेने उशीखालचा तो कागदाचा कपटा बाहेर काढला आणि त्यावर लिहिलेला पत्ता वाचला. पत्त्यावर लिहिलेला तो भाग राधाला साधारणपणे माहीत होता. घरातली कामं उरकून झटपट जेऊन राधा घराबाहेर पडली. आज सकाळपासून एकदाही तिचं लक्ष उर्वशीच्या घराकडे गेलं नव्हतं.
खाली येऊन तिने रिक्षा केली आणि पत्ता सांगितला. तिने पत्ता सांगताच रिक्षावाल्याने साशंक नजरेने तिच्याकडे वळून बघितलं... असा राधाला भास झाला. पण मग काही न बोलता त्याने रिक्षा सुरू केली. चिठोऱ्यावर लिहिलेल्या पत्त्यावर राधा पोहोचली खरी पण अजूनही तिची दाराची बेल वाजवण्याची हिम्मत होत नव्हती. ती तशीच दाराबाहेर उभी होती आणि अचानक दार उघडलं गेलं. राधा दचकून एक पाऊल मागे सरकली. तिने नजर उचलून समोर बघितलं तर समोर एक लाल रंगाचा गाऊन घातलेली स्त्री उभी होती. दिसायला अत्यंत सुंदर होती ती आणि राधाकडे बघत मंदपणे हसत होती. काही न बोलता तिने डावा हात पुढे करत राधेला आत घेतलं आणि ती आत येताच दार लावून घेतलं. दार बंद होताच राधाच्या लक्षात आलं की खोलीमध्ये बराच अंधार आहे. तिच्या मनात आलं म्हणूनच कदाचित आपल्याला दुपारी यायला सांगितलं असेल. त्या लाल गाऊनवाल्या स्त्रीने परत एकदा राधाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. राधा बसताच ती राधाच्या पुढ्यात एका टेबलावर बसली. तिने राधाचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले आणि मंद स्मित करत म्हणाली;"मला वाटलं येतेस की नाही! तुझ्या फोनची कित्येक दिवस वाट बघत होते."
तिच्या बोलण्याने राधा गोंधळून गेली. "तुम्ही माझ्या फोनची वाट बघत होतात? पण आपण ओळखतो का एकमेकींना? मला तर नाही आठवत आपण कधी भेटलो असल्याचं." राधा म्हणाली.
त्यावर गूढ स्मित करत ती स्त्री म्हणाली;"आपण ओळखतो का?(!) यापेक्षा मी तुला ओळखते इतकंच पुरेसं आहे आत्ता. बरं बोल... तुला नक्की काय हवंय?"
राधा म्हणाली;"पण... काल तुम्ही म्हणालात तुम्हाला माहीत आहे मला काय हवंय."
तिच्याकडे रोखून बघत ती स्त्री म्हणाली;"नाही राधा. नीट आठव. मी म्हणाले तुझ्या मनात काय आहे ते मला माहीत आहे आणि माझ्याकडे उपाय आहे."
राधाने खरंच मेंदूला ताण द्यायचा प्रयत्न केला. पण त्याक्षणी तरी तिला काहीच नीटसं आठवत नव्हतं. त्या स्त्रीच्या नजरेत जणूकाही राधा अडकून गेली होती.
काहीसं पुढे सरकत ती स्त्री म्हणाली;"बोल राधा. काय हवंय तुला?"
"मला?" राधाच्या मनाचा पूर्ण गोंधळ उडाला होता. 'हिला माहीत आहे नं मला काय हवंय? की माझ्या मानत काय आहे ते फक्त माहीत आहे???' राधा विचार करत होती. आपण नक्की काय विचार करतो आहोत आणि आपल्याला काय बोलायचं आहे; यात तिचा पुरता गोधळ उडून गेला होता.
"हो! काय हवं आहे तुला?" राधापासून काहीशी लांब सरकत तिने राधाची. "देवेंद्रसरखा नवरा हवा आहे की उर्वशी सारखं आयुष्य?" राधाच्या डोळ्यात निरखून बघत ती म्हणाली. बोलत असताना ती तिच्या बोटांची काहीशी विचित्र हालचाल करत होती. राधाची नजर तिच्या डोळ्यात अडकली असली तरी तिची हलणारी बोटं राधाला अस्वस्थ करत होती.
त्या स्त्रीच्या प्रश्नांने राधाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही...........
मंद गूढ हसत ती स्त्री परत एकदा म्हणाली;"बोल राधा. तुला नक्की काय हवं आहे? माझ्याकडे फार वेळ नाही. देवेंद्र सारखा नवरा की उर्वशी सारखं आयुष्य?"
राधाने क्षणभर डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. डोळे उघडून त्या स्त्रीकडे स्थिर नजरेने बघत राधा म्हणाली;"मला सारखं काही नको. मला उर्वशीचंच आयुष्य हवंय."
आता धक्का बसायची पाळी त्या स्त्रीची होती. पण अशा जगावेगळ्या मागण्या ऐकायची तिला सवय असावी. क्षणभरातच स्वतःला सावरत ती म्हणाली;"उर्वशी सारखं आयुष्य नको आहे तुला?"
आता राधा शांत झाली होती. तिने आत्मविश्वासपूर्वक म्हंटलं;"नाही. मला उर्वशी सारखं आयुष्य नको आहे. मला उर्वशीचंच आयुष्य हवं आहे. मला तिच्या कायेत शिरून तिच्या आयुष्याचा अनुभव घ्यायचा आहे. कोणा सारखं म्हंटलं की अनेकदा त्यात काहीतरी कमी-जास्त होऊ शकतं. बरं सारखं म्हंटलं की फक्त त्या व्यक्तीचं आयुष्य मिळतं. आजूबाजूची माणसं तीच राहातात. मला तसं नको आहे. माझ्या मते उर्वशीचं आयुष्य एकदम आदर्श आहे. प्रेमळ, लाड करणारा नवरा आणि शांत संथ आरामदायी जीवन आहे तिचं. म्हणून तीचंच आयुष्य.... तिच्या सारखं नाही." राधा म्हणाली.
"उर्वशीच्या आयुष्याबद्दल तुला सगळं माहीत आहे का राधा?" त्या स्त्री ने राधाला विचारलं. आपल्याच विचारात गढलेल्या राधाला तिचा प्रश्न तर ऐकू आला पण आवाजातला छद्मीपणा नाही कळला. एका तंद्रीत राधा म्हणाली;"हो! सगळं माहीत आहे मला. बस्! ठरलं. मला उर्वशीचं आयुष्यच हवं आहे. तुम्ही मला ते देऊ शकता का हाच आता प्रश्न आहे."
राधेकडे छद्मीपणे बघत ती स्त्री म्हणाली;"मी खूप काही करू शकते राधा. पण मला देखील त्याची परतफेड लागते. मी तुला उर्वशीच्या कायेत प्रवेश करविन; पण मग तू काय देशील मला?"
तिच्या त्या प्रश्नाने राधा गोंधळली. तिने याचा विचारच केला नव्हता. त्यामुळे ती नकळत म्हणून गेली;"मी काय देणार? तुम्हीच मागा मला शक्य असेल असं काही."
राधाचं बोलणं ऐकून त्या स्त्रीने राधाचे हात सोडले आणि मान मागे टाकत ती खदाखदा हसायला लागली. मग राधेकडे वळून ती म्हणाली;"हे असं काहीही मागा म्हणू नये राधा. पण ठीक! तू बोलून गेलीच आहेस.... एरवी मी देखील खूप काही मागितलं असतं. पण आत्ता एकच मागते... तुझ्या लग्नात आलेले सगळे दागिने आणून दे मला. अगदी हे आत्ता गळ्यात घातलेलं मंगळसूत्रसुद्धा!"
तिची ती विचित्र मागणी ऐकून राधा अवाक झाली. गळ्यातल्या मंगळसूत्राला घट्ट धरत "सगळे दागिने?" तिने विचारलं.
"हो." पुन्हा एकदा राधाच्या नजरेत नजर अडकवत ती गंभीर आवाजात म्हणाली. "आणि तसंही, एकदा तू उर्वशी झालीस की मग तुला काय उपयोग आहे त्या राधाच्या दागिन्यांचा?"
राधाने क्षणभर विचार केला आणि ती खुदकन हसली. तिला देखील त्या स्त्रीचं म्हणणं पटलं. 'एकदा मी उर्वशी झाले की राधेच्या आयुष्याशी काही संबंधच नाही न. मग राधेचे दागिने दिले तरी काय बिघडतं?' राधेच्या मनात आलं. त्या स्त्रीकडे हसत बघत राधा म्हणाली;"मान्य. कधी आणून देऊ मी दागिने?" त्यावर डोळे मिटत ती स्त्री म्हणाली;"उद्याच आण दागिने राधा. तुला जर खरंच उर्वशीच्या कायेत शिरायचं असेल तर उद्याच आण दागिने.... परवाचा दिवस फार महत्वाचा आहे. त्यादिवशी तू जागी होशील ते उर्वशी म्हणून. विश्वास ठेव माझ्यावर." असं म्हणून ती स्त्री गप्प झाली. तिने डोळे देखील मिटून घेतले होते. आता आपण नक्की काय करायला हवं ते राधेच्या लक्षात येईना. पण ती स्त्री आता काहीच बोलत नाही हे पाहून राधा उठली आणि घरी निघून आली.
राधाचं घरकामात लक्षच लागत नव्हतं. ती बाई खरं बोलत असेल का? असे दागिने देऊन टकून नंतर जर काहीच घडलं नाही तर? पण जर ती बाई खरं बोलत असेल तर आपण उर्वशी होऊ शकतो. मनात उर्वशीचा विचार येताच राधाने समोर उर्वशीच्या घराकडे बघितलं. उर्वशी गॅलरीमध्ये व्यायाम करत होती. राधेने भिरभिर नजरेने देवेंद्रला शोधलं. तो कुठेच दिसत नव्हता. त्याला शोधण्याच्या नादात राधा गॅलरीमध्ये बरीच पुढे आली आणि अचानक तिची आणि उर्वशीच्या नजरा-नजर झाली. उर्वशीने व्यायाम करण्याचं थांबवलं आणि अत्यंत गंभीर चेहेऱ्याने ती राधाकडे पाहू लागली. खरं तर राधेने अस्वस्थ होण्याचं काहीही कारण नव्हतं. पण उर्वशीची गंभीर थंड नजर बघून राधा गडबदली आणि पटकन घरात आली.
राधाने ठरवलं; आता त्या घराकडे वळून नाही बघायचं.............. आता एकदम उर्वशी म्हणून जगायचं!!! हा विचार मानत येताच राधा खुदकन हसली आणि परत कामाला लागली.
राधाने भराभर घरकाम आवरलं आणि नवरा यायच्या आत स्वयंपाक देखील करून ठेवला. रात्री नवरा आला. तो काहीतरी बोलत होता पण राधाचं लक्षच नव्हतं कशातही. ती आपल्याच नादात होती. जेवणं उरकली आणि सगळं आवरून राधा जाऊन पलंगावर पडली. खरंतर तिला वाटलं होतं की तिला झोप नाही येणार. पण ती आडवी पडली आणि एका क्षणात तिला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी नवरा निघताच राधा देखील तयारी करून बाहेर पडली. ती कालच्या पत्त्यावर पोहोचली आणि दारासमोर जाऊन उभी राहिली. तिला माहीत होतं की बेल वाजवायची गरज नाही. आणि अगदी तसंच घडलं. राधा दारासमोर उभी होती आणि दार उघडलं गेलं. तीच ती सुंदर स्त्री दारात उभी होती. आज तिने पिवळ्याजर्द रंगाचा गाऊन घातला होता आणि त्यावर लालभडक रंगाचं काहीसं विचित्र चित्र होतं. तिने हसत राधेला आत घेतलं आणि दार लावून घेत तिला सोफ्यावर बसवलं. आज देखील ती कलच्याचप्रमाणे राधेच्या अगदी पुढ्यात एका टेबलावर बसली. तिने राधेच्या डोळ्यात डोळे घालत हसत हात पुढे केला आणि तिच्या नजरेच्या जाळ्यात अडकलेल्या राधेने स्वतःच्याही नकळत सोबत आणलेले सगळेच दागिने तिच्या स्वाधीन केले. त्या स्त्रीने राधेवरची नजर जराही ढळू न देता ते दागिने बाजूला ठेवले आणि राधेचे दोन्ही हात हातात घेतले. राधाला नक्की काय करावं कळेना. ती स्वस्थ बसून राहिली. परंतु थोड्या वेळाने राधेने देखील नकळत डोळे मिटले...... की आपोआप मिटले गेले?(!)
राधेने डोळे उघडले त्यावेळी ती खोलीत एकटी होती आणि खोली प्रचंड अंधारली होती. ती स्त्री कुठेच दिसत नव्हती. राधा पुरती गोंधळून गेली. आपण नक्की काय केलं पाहिजे हे तिच्या लक्षात येईना. तिने घड्याळ बघितलं. जवळ जवळ सात वाजत आले होते. 'बापरे! आपण सकाळपासून इथेच झोपलो आहोत की काय? नवरा घरी आला असला तर मोठीच पंचाईत होईल.' तिच्या मनात आलं आणि काही एक विचार न करता ती उठली आणि धावत त्या घराबाहेर पडली.
राधा घरी आली तर अजून नवरा पोहोचला नव्हता. तिने घाईघाईने घरातली कामं आवरली आणि स्वयंपाक उरकून ती हुश्य करत सोफ्यावर बसली.... तेवढ्यात नवरा आलाच. आज तिने खास गोडाचा स्वयंपाक केला होता. राधा आज गालातल्या गालात खुदखुदत होती. नवऱ्याने जेवणाचं कौतुक केलं तर एरवी तोंड फिरवणारी राधा हसून 'thank you' म्हणाली. रात्र झाली आणि तो झोपायला गेला. दिवणखान्याचा पडदा सारताना राधेने कटाक्षाने उर्वशीच्या घराकडे बघणं टाळलं. तिच्या मनात आलं.... आता काय बघायचं तिकडे? उद्यापासून तिथेच तर राहायला जायचं आहे. मात्र त्याचवेळी घराबाहेर पडणारी उर्वशी एका अधिऱ्या आणि भिरभिरणाऱ्या नजरेने पहिल्यांदाच राधेच्या घराकडे बघत होती; हे राधेच्या गावी देखील नव्हतं.
...................सकाळी सहाला सवयीनेच राधेला जाग आली. तिने झोपेत गझराचं घड्याळ चाचपडलं आणि काहीतरी पडल्याचा आवाज तिला आला. दचकून डोळे उघडत तिने पलंगाखाली काय पडलं याचा अंदाज घेतला तर ती एक सुंदर लॅम्प शेड होती. ही लॅम्प शेड आपल्या घरात कधी आली? तिच्या मनात आलं..... आणि दुसऱ्याच क्षणी तिचे डोळे टक्क उघडले. तिने पलंगावर बसत आजूबाजूला बघितलं. राधाच्या अंगात एक सुंदर सॅटीनचा गुलाबी रंगाचा गाऊन होता. ती उर्वशीच्या पलंगावर जागी झाली होती. तिने दचकून शेजारी पाहिलं... उर्वशीचा नवरा शेजारी झोपला होता.
'म्हणजे? म्हणजे!!! मी उर्वशी???? मी उर्वशी!!!!' राधा मनात म्हणाली आणि एका वेगळ्याच धुंदीमध्ये परत आडवी झाली. झोप येणं तर शक्यच नव्हतं; पण तरीही राधा आज मुळीच घाईने उठणार नव्हती. थोड्या वेळाने उर्वशीचा नवरा चुलबुळायला लागला तशी उर्वशीने/राधेने डोळे मिटून घेतले. देवेंद्र उठला आणि त्याने एकदा उर्वशीकडे बघितलं. तो खोलीबाहेर गेला आणि राधाने नकळत एक निश्वास सोडला. डोक्यावर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत होती उर्वशी.... आणि नकळत तिला परत झोप लागली.
किती वाजले होते कुणास ठाऊक पण देवेंद्र उर्वशीला उठवत होता. "डार्लिंग, उठ ना! फार दमलीस का काल? उठतेस न? मी चहा आणला आहे." उर्वशीने डोळे उघडले आणि एक लाडिक हास्य करत ती उठली. देवेंद्रने दिलेला चहा घेऊन ती गॅलरीमध्ये आली आणि सहजच तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं. समोरच्या गॅलरीमध्ये राधेचा नवरा उभा होता कपडे वाळत घालत. त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत उर्वशी घरात आली आणि दिवाणखान्यात जाऊन परत एकदा तिने समोरच्या घरात बघितलं. समोर राधा डस्टिंग करत होती. अगदी ती सकाळी करत असे तसं. तो विचार मनात येताच उर्वशीने स्वतःला फटकारलं. मी आता राधा नाही.... तेवढयात देवेंद्रने तिला एक मोठं envelop आणून दिलं. "आजचं invitation आहे baby. एकदम खास दिसतं आहे. आज तू तुझ्या नावासारखी दिसली पाहिजेस हं. अगदी स्वर्गातून उतरलेली अप्सरा! मस्त beaked vegis आणि सूप बनवतो जेवायला. आज व्यायाम पण करू नकोस. मस्त आराम कर दुपारी. झोप काढ. एकदम फ्रेश दिसली पाहिजेस हं. संध्याकाळी साधारण सातपर्यंत गाडी येईल." तो म्हणाला.
त्याच्याकडे हसून बघत तिने हातातलं envelop समोरच्या टेबलावर ठेवलं आणि ती अंघोळीला गेली. मस्त फ्रेश होऊन ती बाहेर आली तर देवेंद्रने गरमगरम पोहे केले होते नाश्त्याला. ती बाहेर येताच त्याने तिची प्लेट भरली आणि तिच्या हातात ठेवली. अगदी चविष्ट होते पोहे. "मस्त झालेत हं पोहे." ती अगदी लाडात येऊन म्हणाली. "अहो भाग्यम!!! नशीब उजळलं आज माझं. तुझ्या तोंडून माझं कौतुक?" देवेंद्र म्हणाला आणि उर्वशीच्या मनात आलं 'काय नशीब असतं! देवेंद्र इतकी सरबराई करतो उर्वशीची तरी तिला त्याचं कौतुक नाही.' पण मग चुकार मनाला फटकारत ती म्हणाली.... 'मीच तर उर्वशी आहे.' आणि गालातल्या गालात हसली. नाश्ता होताच उर्वशीने TV लावला आणि पाहात बसली. आज वेळ कसा झपाझप संपत होता. जेवायची वेळ झाली आणि देवेंद्रने टेबल सजवत उर्वशीला हाक मारली. "sweetheart, येतेस न?"
उर्वशी जेवणाच्या टेबलाजवळ आली आणि पाहाते तर फक्त एकच ताट. "तू नाही जेवणार माझ्यासोबत?" तिने देवेंद्रला विचारलं. काहीसा आश्चर्यचकित होत देवेंद्र म्हणाला;"मी जेवू तुझ्या सोबत?" त्यावर प्रेमळ हसत ती म्हणाली;"come on darling. असं काय विचारतोस? आण बघू तुझं ताट. दोघे जेऊ एकत्र." तिच्याकडे काहीसं विचित्र नजरेने पाहात देवेंद्र आत गेला.
जेवण आटोपून उर्वशी खोलीत आली आणि तिची नजर समोरच्या घराकडे गेली. राधा घरातला केर काढत होती. नकळत उर्वशी गॅलरीमध्ये गेली आणि राधेचं निरीक्षण करायला लागली. राधा फारच दमलेली दिसत होती. घरकामाची सवय नसल्याचं तिच्या हलचालींमधून कळत होतं. पण तरीही ती मन लावून काम करत होती. एकदा मान उडवून उर्वशी खोलीत आली आणि पलंगावर आडवी पडली.
उर्वशीला चांगलीच झोप लागली होती. देवेंद्र तिला जागं करत होता. "उठ ग. तयारी नाही का करायची?" तो म्हणाला. उर्वशीने उठून घड्याळात बघितलं तर पाच वाजले होते. "आत्तापासून तयारी?" तिने आश्चर्य वाटून विचारलं.
"कमाल करतेस! मी तुला म्हंटलं होतं नं; आजचं निमंत्रण खूप खास आहे. उठ बघू. मी ड्रेस काढून ठेवला आहे तोच घाल. जा फ्रेश होऊन ये मी ज्यूस घेऊन येतो." त्याच्या आवाजात किंचित अधिकारवणी होती. उर्वशी काहीशी गोंधळली. उठून बाथरूमकडे जात ती म्हणाली;"पण मला चहा हवा आहे." "गप! आत्ता चहा प्यायलीस तर डोळ्याखाली डार्क सर्कल्स दिसतील. ज्युसच पी." तो म्हणाला आणि खोलीबाहेर गेला.
काहीसं मनाविरुद्धच पण उर्वशी ज्युस प्यायली. देवेंद्रने एक नेलपॉलिश काढलं आणि उर्वशीला बसवत तिच्या हाताला लावायला सुरवात केली. उर्वशी कौतुकाने बघत होती. नेलपॉलिश लावून झालं आणि त्याने तिला मेक-अप करायला सांगितलं आणि बाहेर गेला. मेक-अप करायचं सगळं कसब पणाला लावत उर्वशी तयार झाली आणि देवेंद्रने काढून ठेवलेला अप्रतिम सुंदर ड्रेस घालून ती खोली बाहेर आली. तिला वाटलं होतं तिला पाहून देवेंद्र तिला मिठीत घेईल... पण तिला पाहाताच तो म्हणाला;"wwooww... amazing... आज एकदम वेगळीच दिसते आहेस. खरंच खूपच सुंदर. एकदम खुश होतील सगळे. तुझी निघायची वेळ झालीच आहे."
'सगळे? कोण हे सगळे? माझी निघायची वेळ झाली आहे; पण हा तयार नाही. हा नाही का येणार माझ्याबरोबर? मग जिथे बोलावलं आहे तिथे जर मी कोणाला ओळखलं नाही तर काय होईल?' उर्वशीच्या मनात आलं. पण तिला विचार करायला फार वेळ न देता देवेंद्रने तिच्या हातात सकाळचं invitation ठेवलं आणि तिला घेऊन तो खाली उरतला. समोर आलेल्या गाडीमध्ये तिला बसवत त्याने तिला flying kiss दिली आणि उर्वशी गेली.
................................रात्री उशिरा घरी आलेल्या उर्वशीचं अंगांग दुखत होतं. तिचा मेक-अप संपूर्ण चेहेऱ्यावर पसरला होता आणि हातातली फुगलेली पर्स सगळं सांगत होती. तिने घराची बेल वाजवली आणि देवेंद्रने दार उघडून उर्वशीकडे न बघताच तिच्या हातातल्या पर्सवर झडप घातली. ओलावलेल्या डोळ्यांनी दिवाणखान्यात शिरणाऱ्या उर्वशीची नजर समोरच्या घरातल्या खिडकीत उभ्या असणाऱ्या राधेकडे गेली आणि स्त्री मनाचं दुःख दोन डोळ्यांना कळलं.
समाप्त