Friday, November 20, 2020

श्रीकृष्ण - पार्थ

 श्रीकृष्ण - पार्थ


युधिष्ठिर : अर्जुना, माझं ऐक. शस्त्रागाराकडे जात असताना मध्ये माझा कक्ष लागतो हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे मी आणि द्रौपदी एकांतात असताना तू मुद्दाम तो एकांत भंग करण्यास आला नाहीस; हे आम्ही जाणतो. ब्राम्हणाच्या गाई चोरीला गेल्या आणि ही तक्रार घेऊन तो तुझ्याकडे आला. त्यामुळे राजकर्तव्य पूर्ण करण्यासाठी तू तुझी शस्त्रे घेऊन त्याच्या मदतीसाठी गेलास. तुझ्याकडे दोष येत नाही प्रिय बंधू. तरीही तुझ्या मनात काही शंका असेल तर खुद्द द्रौपदीला विचार. तिची तक्रार असली तर आपल्यामध्ये ठरलेल्या बंधनानुसार तू एका वर्षासाठी राज्य सोडून जा.

अर्जुन : महाराज, आपण माझी कितीही समजून काढलीत किंवा द्रौपदीने देखील कोणतीही आपत्ती नसल्याचे सांगितले तरीही आपण पाच जणांनी मिळून ठरवलेले बंधन पाळणे माझे कर्तव्य ठरते. त्यामुळे उद्या प्रातःकाळी मी एक वर्षाच्या प्रवासासाठी निघणार आहे.

युधिष्ठिर : तू श्रीकृष्णा व्यतिरिक्त कोणाचे ऐकले आहेस का? जसे तुला योग्य वाटते तसे कर!

असे म्हणून युधिष्ठिराने अर्जुनाला आलिंगन दिले आणि जड अंतकरणाने तो त्याच्या कक्षाच्या दिशेने गेला.

प्रातःकाळी माता कुंतीचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या चारही बंधू आणि प्रिय पत्नी द्रौपदी यांचा निरोप घेऊन अर्जुन केलेल्या चुकीच्या प्रायश्चित्तासाठी निघाला. अर्जुनाचा रथ इंद्रप्रस्थातून बाहेर पडला मात्र आपण नक्की कोणत्या दिशेने जावे हा प्रश्न पडल्याने तो काही क्षण थांबला. त्याचवेळी समोरून धूळ उडवत श्रीकृष्णाचा अबलख अश्व असलेला रथ येताना त्याने बघितला आणि अर्जुन अत्यंत समाधानी मुद्रेने आपल्या रथातून पायउतार झाला.

श्रीकृष्ण : अरे? पार्था, तू इथे राजधानी बाहेर काय करतो आहेस?

अर्जुन : (मंद हसत) देवा, आपण हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकले आहे. तुम्ही माझ्या मानतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहात. असे असूनही तुम्ही मलाच प्रश्न विचारत आहात हे काहीसे जगावेगळे नाही का वाटत?

श्रीकृष्ण : अरे, मी ईशान्य भारतातील काही राजांना भेटण्याचा मानस मनात ठेऊन द्वारकेहून बाहेर पडलो होतो. परंतु माझ्याच नादात नकळतपणे मी माझा रथ इंद्रप्रस्थाकडे वळवला. बरं, तू काहीच ठरवले नसल्यास माझे एक काम करशील का? ईशान्य भारतातील नागलोक आणि इतर गणराज्य येथील राजे अत्यंत उत्तम राज्यकारभार करत आहेत. त्यांची युद्धनीती देखील काहीशी वेगळी आहे. तू माझ्यासाठी या भागामध्ये जाऊन तेथील राजांना भेटून येशील का? तुझा प्रवास संपतेवेळीस मात्र द्वारकेस नक्की ये.

........ आणि श्रीकृष्ण इच्छा आज्ञेसमान मानणारा अर्जुन कोणताही प्रश्न न विचारता ईशान्य भारतातील राजांना भेटण्यासाठी निघाला. प्रवास संपतेवेळी तो द्वारकेस पोहोचला. मात्र त्याअगोदर ईशान्य भारतातील नागराजाची सुंदर आणि कुशाग्र बुद्धीची कन्या उलुपी आणि माहाराज चित्रवाहन यांची शस्त्रास्त्र निपुण एकुलती एक कन्या चित्रांगदा यांनी अर्जुन पत्नी म्हणून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले होते. शिक्षेचे वर्ष पूर्ण होता होता अर्जुनाने द्वारकेहून सुभद्रेचे हरण करून इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले. प्रवासामध्ये अर्जुन श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता.

श्रीकृष्ण : पार्था, सुभद्रेचे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. त्यामुळे मनामध्ये कोणताही किंतु न आणता तू तिचा स्वीकार कर.

अर्जुन : देवा, आपल्या सांगण्यावरून मी ईशान्य भारतातील राजांची गाठ घेतली आणि त्याचे फलस्वरून राजकुमारी उलुपी आणि राजकुमारी चित्रांगदा या द्रौपदी नंतरच्या माझ्या दोन भार्यांनी इंद्रप्रस्थाकडे प्रस्थान केले आहे. मोहना, माझे मन देखील सुभद्रेसाठी व्याकुळ आहे. परंतु मी परत गेल्यानंतर द्रौपदीला कोणत्या तोंडाने सामोरे जाऊ? तिच्या विशाल नेत्रातील प्रश्नांची उत्तरे देणे मला शक्य होणार नाही.

श्रीकृष्ण : धनंजया, आपल्या जीवनात असे अनेक प्रश्न येतात की आपण निरुत्तर होत असतो. मात्र याचा अर्थ या प्रश्नांचे उत्तरच नसते असे नाही. काळ ही एकच गोष्ट अशी आहे की ती प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला योग्य वेळी देते. अर्थात तू द्रौपदीला जिंकले असलेस तरी त्या बुद्धिशील स्त्रीला हे कधीच मान्य होणार नाही की तू तिच्या समोर एक नाही दोन नाही तर तीन तीन सवती उभ्या करतो आहेस. त्यात सुभद्रेचे वय आणि तुझे तिच्या प्रेमात आकंठ बुडणे तर तिच्या नजरेतून सुटणार नाही. तरीही...... जे होते आहे तेचं योग्य आहे!

दिवसांमागून दिवस जात होते आणि दुर्योधनाने महाराज युधिष्ठीरांना द्यूत क्रीडेसाठी हस्तिनापुरामध्ये आमंत्रित केले. आपल्या चारही बंधूंना आणि प्रिय पत्नी द्रौपदी हिला घेऊन महाराज युधिष्ठीर हस्तिनापुरात पोहोचले. द्यूतात हरलेल्या युधिष्ठिराने त्यानंतर आपल्या चारही बंधूंना पणाला लावले आणि त्यानंतर पांचाली देखील एका वस्तू समान पणाला लावली गेली. त्यावेळी तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान केवळ आणि केवळ श्रीकृष्णाने ठेवला होता. त्यानंतर द्रौपदीच्या शापवाणीच्या भीतीने धृतराष्ट्राने परत केलेल्या आपल्या राज्याच्या दिशेने निघालेल्या युधिष्ठिराला ज्यावेळी दुर्योधनाने परत एकदा द्यूत खेळण्याचे आवाहन केले आणि बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास या अटीवर युधिष्ठिराने ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर बारा वर्षांचा वनवास पांडवांनी द्रौपदीसह घालवला. मात्र अज्ञातवासाच्या वेळी कोणी कोणती भूमिका घ्यावी हे सांगण्यासाठी पांडवांचा सखा श्रीकृष्ण हजर होता.

अर्जुन : श्रीकृष्णा, मी आणि बृहन्नडा? माझे हे आजानुबाहु, अनेक युद्धांमध्ये शास्त्रांचे वार झेललेली बलदंड छाती मी या बृहन्नडा अवतारामध्ये हे माझे पौरुष्य कसा लपवणार आहे?

श्रीकृष्ण : पार्था, तू हे कसे विसरू शकतोस की उर्वशीने दिलेला शाप तुला कधी ना कधी जगायचाच होता. मग हीच ती योग्य वेळ नाही का? तुझ्या एका वर्षाच्या इंद्रप्रस्थ त्यागाच्या वेळी तू केवळ उलुपी, चित्रांगदा आणि सुभद्रा यांना जिंकेल नव्हतेस तर राजा इंद्राच्या सर्वात सुंदर अप्सरेला तुझ्या याच पौरुष्याने वेडे केले होतेस. मात्र ती पुरुरव महाराजांची, तुमच्या कुरुवंशाच्या आद्य पुरुषाची पत्नी असल्याने तू तिचा स्वीकार केला नाहीस. याचा राग येऊन तिने तुला एका वर्षासाठी स्त्रीभावनेचा अनुभव करण्याचा शाप दिला होता.

..... आणि अशाप्रकारे अज्ञातवासाचे ते वर्ष देखील सरले. हस्तिनापूरच्या राजकुमाराने दुर्योधनाने पांडवांचे हक्काचे इंद्रप्रस्थ तर नाहीच, पाच गावेच काय पण सुईच्या अग्रावर राहील इतकी जमीन देखील देण्याचे नाकारले आणि कुरुक्षेत्रावरील युद्धाला सुरवात झाली.

अर्जुन : श्रीकृष्णा, समोर तर पितामह भीष्म आहेत, माझे गुरू द्रोणाचार्य, माझे बंधू.... सर्वच तर माझे आप्तेष्ट आहेत. यांच्यावर मी शास्त्र प्रहार कसा करू?

यानंतर श्रीकृष्णाने युद्धनीती, धर्मनीती आणि त्यापलीकडे जाऊन मानवीय जवाबदरीचा बोध अर्जुनाला केला. अठरा दिवसांचे युद्ध झाले. अर्जुनाला केवळ कर्णच हरवू शकणार होता. मात्र त्याच्या रथाचे चाक धरतीने गिळंकृत केल्यानंतर ज्यावेळी अर्जुन पायउतार आणि निःशस्त्र कर्णावर शस्त्र उगारण्यास कचरू लागला यावेळी कर्ण वध करण्यासाठी श्रीकृष्णानेच अर्जुनाला उद्युक्त केले.

श्रीकृष्ण : कोणासाठी थांबलास पार्था? या सुतपुत्राने तुला आठवण करून दिली आहे की तो याक्षणी निःशस्त्र आहे म्हणून? तो रथातून पायउतार आहे म्हणून? हा कर्ण तुला आज धर्माचे ज्ञान देतो आहे! ज्याचे संपूर्ण जीवन अधर्मी कृती करण्यात गेले; तो आज केवळ मृत्यूच्या भीतीने तुझ्याशी शब्दच्छल करीत आहे. पार्था, आता विचार करू नकोस. ज्याने तुझ्या प्रिय पत्नीचा भर सभेत वेश्या म्हणून अपमान केला, तो तुझ्या प्रिय पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूसाठी कारणीभूत होता, ज्याने केवळ नाव व्हावे म्हणून आपली कवच-कुंडले दान केली, केवळ दुर्योधनाच्या उपकारांमुळे जो राजा झाला अशा या अधर्मी सुताच्या बोलण्यास तू महत्व देऊ नकोस. तुझ्या गांडीव धनुष्याची प्रत्यंचा ओढ आणि धरतीवरील हा अधर्मी नष्ट कर.

श्रीकृष्णाच्या बोलण्याचा परिणाम पार्थावर न होता तर आश्चर्य! कर्णाच्या अंताने महाभारतीय युद्धाच्या अंताचा शंखनाद करून गेला. युद्ध समाप्त झाले आणि......

श्रीकृष्ण : अर्जुना ऐक..... आजवर मी जे जे सांगितले ते ते तू ऐकत आलास. कधीही प्रश्न नाही केलास. त्याचप्रमाणे आजही मी जे सांगतो आहे ते फक्त ऐक. भारतवर्षातील एकमेव धनुर्धर केवळ तू नाहीस तर तो सुर्यपुत्र कर्ण देखील होता. हो! मी योग्य तेच सांगतो आहे.... तो सूर्यपुत्र होता. मात्र काळाची गरज आणि अधर्माचा नायनाट यासाठी त्याचे बलिदान आवश्यक होते. ज्याप्रमाणे तुझ्या प्रिय पुत्राचे, अभिमन्यूचा मृत्यू देखील त्याच्या जन्माबरोबर विधिलिखित झाला होता. द्रौपदी केवळ तुझी पत्नी होऊ नये ही देखील तुझ्या मातेची नव्हे तर नियतीची इच्छा होती. चार पत्नी असूनही आणि बृहन्नडेच्या वेशात असूनही तुला उत्तरेचा मोह झाला होता; हे माझ्यापासून लपलेले नाही पार्था. मात्र अभिमन्यूच काय तुम्हा पाचही जणांचे सर्वच पुत्र या महाभारतीय युद्धात कामी येणार होते, आणि तरीही हा वंश पुढे चालणे ही काळाची गरज होती. म्हणूनच उत्तरेचा विवाह अभिमन्यूशी झाला. धनंजेया, मला माहीत आहे की युद्धनीती आणि धर्मनीती नंतर आज मी जे काही सांगतो आहे... ते ऐकून तुला संन्यस्त जीवनाकडे वळण्याची इच्छा होईल याची मला कल्पना आहे; आणि तेच योग्य आहे पार्था. तुझ्या चारही बंधूंसोबत आणि पांचाली सोबत तुम्ही महानिर्वाणासाठी हिमालयाच्या दिशेने प्रयाण करावेत हेच योग्य.

अर्जुन : (अश्रू भरल्या नेत्रांनी हात जोडून श्रीकृष्णा समोर उभा होता) वासुदेवा, तू माझ्या हातून जे जे घडवलेस त्याची जवाबदरी कोणी घ्यायची केवळ या एका प्रश्नाचे उत्तर दे; म्हणजे मी माझा हा देह धर्तीवर ठेवण्यास मोकळा होईन.

श्रीकृष्ण : मी घडवले! परंतु ते तू स्वीकारलेस पार्था! मी तुला मार्ग दाखवला! मात्र त्या मार्गावर चालण्याचा निर्णय तुझाच होता धनंजया! मी सांगत गेलो! मात्र माझ्या सांगण्याला प्रश्न न विचारता त्याचा स्वीकार तू केलास अर्जुना! आपल्या कृत्याची जवाबदारी आपलीच असते मध्यमा.... तू कृती केलीस, त्याक्षणी त्याची जवाबदारी तुझ्याकडे आली.

................. आणि अश्रू भरल्या नेत्रांनी त्या कृष्णप्रिय पांडवाने देवेश्वराला पदस्पर्श केला आणि तो मार्गस्थ झाला.

No comments:

Post a Comment