Friday, November 13, 2020

श्रीकृष्ण - कर्ण

 श्रीकृष्ण - कर्ण


श्रीकृष्ण : तू जेष्ठ आहेस हे माहीत असूनही नकार का?

कर्ण : श्रीकृष्णा, तुझ्या व्यतिरिक्त हे कोणालाच कळलेलं नाही. तरीही हा प्रश्न तू का विचारतो आहेस?

श्रीकृष्ण : सुर्यपुत्रा......

कर्ण : अहं! वासुदेवा, मी सुतपुत्र आहे. तुम्ही चुकून माझा उल्लेख काहीतरी वेगळा करता आहात.

श्रीकृष्ण : सुर्यपुत्रा.... जेष्ठ कौंतेया.... दानवीरा.... तुझं अस्तित्व कायमच सुर्यग्रहणाप्रमाणे झाकोळलेलं राहिलं आहे. मात्र आज प्रत्यक्ष तुझी जन्मदात्री माता तुझ्यासमोर उभी राहिली आणि तिने तुला तुझ्या जन्माचं सत्य सांगितलं; ते सत्य नाकारून तू अधर्मी दुर्योधनाच्या बाजूनेच उभं राहण्याचा निर्णय घेतो आहेस... हे योग्य नाही. मला मान्य आहे की ज्यावेळी संपूर्ण हस्तिनापुराने तुला अपमानित केलं होतं त्यावेळी तो एकटा तुझ्यासाठी... तुझ्या बाजूला उभा राहिला होता. त्याने दाखलेल्या मित्रत्वामुळेच तू अंगराज झालास. आयुष्यभर एक सुतपुत्र म्हणून जगला असतास; मात्र आज तू एक राजा म्हणून मान्यता पावला आहेस. मात्र तरीही तू थोडा व्यावहारिक विचार करावास हे सांगण्यासाठी मी मुद्दाम तुला भेटायला आलो आहे. कर्णा, जीवनात योग्य संधीचा योग्य उपयोग करून घेणे हेच अंतिम सत्य आहे. तुला काय वाटतं... त्यावेळी हस्तिनापुरामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये एक सुतपुत्र म्हणून झालेला तुझा अपमान कोणताही विचार न करता तुला अंग देशाचा राजा करून दूर करणारा दुर्योधन तुझ्या प्रेमाखातर ते करत होता का? नाही.... अंगराज कर्णा, तुला देखील चांगलंच माहीत आहे की संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक कलेमध्ये अव्वल असणाऱ्या तुला कायमच अंकित करून घेण्याचा तो त्याचा डाव होता.

कर्ण : हो मला माहीत आहे की दुर्योधनाने दूरदृष्टी ठेवून त्याक्षणी आपल्या राजपुत्र होण्याचा उपयोग करून घेतला होता आणि मला अंग देशाचा राजा केलं होतं. मोहना, मला हे देखील माहीत आहे की दुर्योधन पत्नी भानुमतीने दुर्योधनाला वरताना अट घातली होती की तिच्या प्रिय मैत्रिणीला सुप्रियेला मी स्वीकारले तरच ती दुर्योधनासोबत विवाह करेल. मुरलीधरा, मला हे देखील माहीत आहे की द्यूत क्रीडेच्यावेळी खेळ चालू असेपर्यंत दुर्योधनाने मुद्दाम मला सभागृहाबाहेर ठेवलं होतं कारण ते फासे जरासंधाच्या हाडांपासून बनवलेले होते. जरासंधाला मी बाहुकंटक डाव टाकून मल्ल युद्धामध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रत्येक खेळीच्या वेळी केवळ भीमाच्या अस्तित्वामुळे... आणि त्याच्या अस्वस्थ ओरडण्यामुळे ते फासे पांडवांच्या विरोधात पडत होते; तद्ववतच माझ्या अस्तित्वाचा परिणाम त्या फाशांवर झाला असता. गिरीधरा, केवळ दुर्योधनानेच नाही तर पितामहांनी देखील केवळ मी पांडवांना युद्धात हरवू नये म्हणून माझा अपमान करून ते सेनापती असेपर्यंत त्यांच्या ध्वजाखाली युद्धामध्ये उतरू दिलं नव्हतं. द्वारकाधीशा, मला आता हे देखील माहीत झालं आहे की पांडवांच्या राजसूययज्ञाच्या वेळी तू शिशुपालाच्या दिशेने तुझं सुदर्शन चक्र सोडलंस आणि तो ज्यावेळी माझ्या आसनामागे जाऊन लपला त्यावेळी तुझं ते सूर्यकिरणांनी तेजोमय झालेलं चक्र देखील केवळ माझ्या अस्तित्वामुळे त्याला काही करत नव्हतं. म्हणूनच तू मला यज्ञवेदीच्या दिशेने बोलावलंस आणि त्याचवेळी शिशुपालाचा वध झाला. पद्मनाभा, देवांचा राजा इंद्र देखील माझ्यासमोर भिक्षुक म्हणून उभा राहिला त्याचं कारण मी समजून चुकलो आहे. अपराजिता, ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्या जीवनातील की जिथे समोरच्या प्रत्येकाने व्यावहारिक विचारच केला आहे. अच्युता, ही सर्वच उदाहरणं बाजूला ठेवतो आज. कारण आता मी जे सांगणार आहे ते यासर्वांनी केलेल्या व्यावहारिक विचारांचा कळस आहे. तू जो व्यावहारिक विचार घेऊन माझ्याकडे आला आहेस; तो विचार मुळातच माझ्यासाठी नाही. पांडव माता... राजमाता कुंतीदेवी माझ्याकडे मातेच्या ममत्वाने आल्या नव्हत्याच. त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की त्यांच्या पुत्रांना युद्धामध्ये केवळ मीच हरवू शकतो. त्यामुळे त्या त्यांच्या प्रिय पांडवांच्या जीवनदानासाठी आल्या होत्या. त्यांनी जरी मला त्यांच्या उदरातून जन्म दिला असला तरी त्यांनी मला कधीच ओळखलं नाही. म्हणूनच मी त्यांची मागणी नाकारेन या भीतीमुळे त्यांनी मला पांचालीचा प्रथम पती आणि पांडवांचा जेष्ठ बंधू या नात्याने पुढे जाऊन हस्तिनापुराचा राजा होण्याचं आमिष देखील दिलं. तुला एक सांगू का धनंजया, माझी पालनकर्ती राधाई आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करणारी वृषाली या दोन स्त्रिया आणि माझा प्रिय बंधू शोण हे सोडले तर या जगातील प्रत्येक व्यक्तीने माझ्या जीवनाचा उपयोग त्यांच्या व्यावहारिक गरजांसाठी केला.

श्रीकृष्ण : म्हणजे तू हे मान्य करतो आहेस की विश्वातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या फायद्याचा विचार करते आणि त्याप्रमाणे निर्णय घेते.

कर्ण : हिरण्यगर्भा, हे विश्वातील अबाधित सत्य आहे. ते मी मान्य किंवा अमान्य करण्याचा प्रश्नच कुठे येतो?

श्रीकृष्ण : कर्णा, मग केवळ तूच का या विचारापासून दूर जातो आहेस?

कर्ण श्रीकृष्णाच्या कमल चरणांकडे काहिक्षण पाहात राहिला आणि मग एक गूढ-दुःखी मंद स्मित करत तो म्हणाला....

ऋषीकेशा, मी का व्यावहारिक विचारांपासून दूर राहिलो आहे! जगद्नियंत्या, तू मला हा प्रश्न विचारतो आहेस? ही चराचर जीवसृष्टी ज्याने निर्माण केली.... प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ज्याने जीव फुंकला.... आचार-विचार करण्याची शक्ती ज्याने दिली तो विश्वनाथ मला विचारतो आहे की मी व्यावहारिक विचार का नाही केला....

असा विचार मी नाही केला देवेश्वरा, कारण... मी जीवनभर केवळ भावनांच्या भोवऱ्यात अडकत गेलो. दुर्योधनाने माझा अपमान होत असताना माझा गौरव केला मी त्याचा अंकित झालो. मात्र, अनिरुद्धा, आज कुरुक्षेत्राच्या या युद्धभूमीवर तुझ्या समक्ष उभं असताना मी मान्य करतो की माझ्या जीवनातील प्रत्येक चुकीचा निर्णय माझ्या अंतर्मनाला कायम टोचत राहिला. त्या टोचणीचा सल कमी व्हावा म्हणूनच मी जीवनभर दान करत राहिलो आणि माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी हे दान देतच राहणार आहे. माझ्या आयुष्यातील अनेक चुकीच्या निर्णयांनी आज मला इथे आणून उभं केलं आहे; याची मला जाणीव आहे. मी हे देखील समजून आहे धर्माध्यक्षा, की ज्या-ज्या वेळी कौरव-पांडवांचा आणि या युद्धाचा विचार केला जाईल त्या-त्या वेळी प्रत्येक व्यक्ती माझ्या चुकीच्या निर्णयांबद्दल बोलेल.... म्हणूनच केवळ म्हणूनच मी माझी ओळख त्यापुढे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न कायम केला आहे. मात्र देवेशा, कायम दुसऱ्यांना दान देणारा हा कर्ण आज तुझ्याकडे एकच मागणं मागतो आहे..... यापुढे कधीही कुठेही माझा उल्लेख झाला तर तो दानवीर कर्ण म्हणूनच व्हावा.

श्रीकृष्ण : तथास्तु दानवीर कर्णा! 

No comments:

Post a Comment