श्रीकृष्ण - सुदामा
गुरू सांदीपनी : बलरामा, कृष्णा तुम्ही इथे माझ्या आश्रमामध्ये अध्यायनासाठी आला आहात. या आश्रमात कोणी उच-नीच नाही. येथे अध्ययन करणारा प्रत्येक कुमार हा केवळ विद्यार्थी आहे. तुम्ही देखील येथे असेपर्यंत याचा विसर पडू देऊ नका. विशेषतः तुम्ही कोण आहात हे येथील विद्यार्थ्यांना न कळलेलंच बरं.
बलराम : गुरुवर्य, आपण बिलकुल चिंता करू नये. येथे असेपर्यंत आम्हा दोघांकडून मथुरेचा उल्लेख देखील होणार नाही.
गुरू सांदीपनी : कृष्णा, गोकुळातील तुझ्या लीलांच्या कथा इथवर पोहोचल्या आहेत बरं का! तिथे तू अनेक गोपालांचा म्होरक्या होतास. मात्र इथे तू केवळ एक अध्यायी आहेस; हे विसरू नकोस. राजनिती, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अश्व-गज-अस्त्र-शस्त्र संचालन, मंत्रोपनिषद, वेद - उपनिषद अशा चौसष्ट विद्या इथे या आश्रमात शिकवल्या जातात. ज्या विद्यार्थ्याची जशी गती आणि जी गरज असेल तो त्याप्रमाणे त्या विद्येचे अध्ययन करतो. माझी अशी मनापासून इच्छा आहे की या आश्रमात राहून तू आणि बलरामाने सर्वच चौसष्ट विद्यांचे अध्ययन पूर्ण करावे.
श्रीकृष्ण : गुरुवर्य, आपली इच्छा आम्हा दोघांनाही शिरसावंद्य आहे. कोणत्या अध्ययनापासून सुरवात करावी आम्ही?
गुरू सांदीपनी : कृष्णा, अस्त्र-शस्त्र, अश्वरोहण, गजरोहण यासारख्या विद्या शिकण्यासाठी प्रथम तुला योग्य शरीरयष्टी प्राप्त करणे आवश्यक आहे. बलरामाने मात्र गोकुळामध्ये असताना योग्य मेहेनत घेतल्यामुळे तो या शारीरिक मेहेनतीला तयार आहे. त्याला या विद्यांचे शिक्षण लगेच सुरू करणे शक्य आहे. तरी मी असे ठरवले आहे की प्रथमतः तू मंत्रोपनिषदांचे शिक्षण घ्यावेस आणि बलरामाने अस्त्र-शस्त्र शिक्षणास सुरवात करावी.
बलराम : गुरुवर्य, आपण आमच्यासाठी जो निर्णय घ्याल तो योग्यच असणार याची आम्हाला खात्री आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य.
असे म्हणून बलराम आणि श्रीकृष्ण गुरू सांदिपनींच्या कुटीमधून बाहेर पडले.
श्रीकृष्ण : दादा, तू अस्त्र-शस्त्र शिकायला सुरवात करणार आणि मला मात्र मंत्रोपनिषद शिकावे लागणार. रोज पहाटे उठून आश्रम सेवा करायची आणि मग हवनाच्या वेळी गुरूंसमवेत मंत्र पठण करायचे यात काही मजा नाही रे. तू गुरू सांदीपनींना का नाही सांगत की मी शारीरिक मेहेनत करून शरीर कमावेन. पण मला देखील तुझ्यासोबत ठेवावे.
बलराम : छोट्या, गोकुळात असताना मी तुला कित्येकदा सांगत असे की केवळ दही-लोणी चोरण्यापलीकडे काहीतरी कर. थोडी तब्बेत सुधार. त्यावेळी तर तू माझं ऐकलं नाहीस. आता गुरूंनी जे ठरवून दिलं आहे, ते त्यांना सांगून बदलून घ्यायला मात्र मला सांगतो आहेस. हे काही बरोबर नाही. गुरू सांदीपनींनी आपल्यासाठी जे ठरवलं आहे ते काहीतरी विचार करूनच न? सर्वात महत्वाचं म्हणजे सतत माझा ओचा धरून माझ्या मागे-मागे करणं आता बंद कर बघू. थोडं स्वतःच्या हिमतीने जगायला शिक की. तुझं हे माझ्या मागे राहाणंच कदाचित गुरूंनी ओळखलं असेल; आणि म्हणूनच तुला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आपल्या दोघांना दोन वेगळ्या विद्या शिकण्यासाठी सांगितलं असेल. त्यामुळे कोणतीही कुरकुर न करता तू तुझ्या कुटीच्या दिशेने जा बघू.... आणि लक्षात ठेव तुझ्या सोबत तिथे बहुतांशी ब्राम्हण कुमार असतील. त्यामुळे तू मथुरेचे राजे वसुदेव यांचा पुत्र आहेस; हे कोणालाही कळू देऊ नकोस. नाहीतर त्या दडपणापाई तुझ्याशी कोणी मैत्री करायचे नाही.
कृष्ण : दादा, मी मुद्दाम कशाला सांगेन कुठून आलो आहे! बरं... चलतो मी माझ्या कुटिकडे.
अशाप्रकारे बलराम आणि कृष्णाने गुरू सांदीपनींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपापल्या अध्ययनाची सुरवात केली. कृष्णासोबत त्याच्या कुटीमध्ये अजून दोन कुमार राहात होते. एकाचे नाव होते सुदामा आणि दुसरा होता केवल. केवल एका श्रीमंत सावकाराचा कुमार होता. तो येथे व्यवहार निती शिकण्यासाठी आला होता. मात्र त्याला देखील काही विशेष कारणामुळे प्रथम मंत्रोपनिषद शिकण्याचा सल्ला गुरू सांदीपनींनी दिला होता. त्याला तो अजिबात मंजूर नव्हता. त्यामुळे तो कायम अध्ययन टाळत असे. सुदामा मात्र एका भिक्षुकी करणाऱ्या गरीब ब्राम्हणाचा मुलगा होता. तो अत्यंत हुशार आणि एकपाठी असल्याने त्याच्या पित्याने प्रयत्नपूर्वक त्याला गुरू सांदीपनी सारख्या उत्तम गुरूंकडे अध्ययनाला ठेवले होते. सुदामा देखील मनलावून मंत्रोपनिषद शिकत होता. त्याची एक सुप्त इच्छा होती की त्याने ज्ञानदान करावे. अर्थात त्याच्या दृष्टीने ही इच्छा म्हणजे मुंगीने आकाशाला गवसणी घालण्याइतके मोठे स्वप्न होते. त्यामुळे मनातील इच्छा तो कधीच कोठेही बोलून दाखवत नसे. आपल्या वडिलांप्रमाणेच आपण देखील आयुष्यभर भिक्षुकी करणार आहोत; हे सत्य त्याने स्वीकारले होते. कृष्ण आणि सुदामा इतर विद्यार्थ्यांसोबत गुरू सांदीपनींनी आखून दिलेला दिनक्रम तंतोतंत पाळत असत. केवल मात्र कायम पळवाटा शोधत असे. त्यामुळे कृष्ण आणि सुदामा सोबत तो कधीच नसे. कृष्ण आणि सुदामा मात्र दिवस-रात्र सतत सोबत राहू लागल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली होती. एकमेकांची काळजी घेणं; एकमेकांना आवश्यकतेनुसार मदत करणं यातून ही मैत्री चांगलीच गहिरी होऊ लागली होती.
गुरू सांदीपनींची शिस्त खूपच कडक होती. आश्रमातीलं सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या शाखेप्रमाणे आश्रमातील कामांची वाटणी करून देण्यात आली होती. मंत्रोपनिषद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत गुरूंसोबत राहावे लागत असे; त्यामुळे त्यांच्यावर होमासाठी लागणाऱ्या तयारीची जवाबदारी असे. रोज पाहाटे उठून होमासाठी सुकलेली लाकडे गोळा करणे, फुले गोळा करणे, त्यांचे हार करणे ही कामे तर रोजचीच होती. त्यामुळे रोज प्रथम प्रहरी उठून जंगलात जाणे कृष्ण आणि सुदामाला नवीन राहिले नव्हते. मात्र संध्या समय होता-होता गुरू सांदीपनी नदीच्या दिशेने एकटेच जात असत. त्यामुळे संध्याकाळी मंत्रोपनिषद शिकणारे कुमार काहीसे मोकळे होत असत. आश्रमातील सर्वच विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था गुरू पत्नी पाहात असत. मग हे कुमार गुरू मातेला मदत करण्यासाठी स्वतःहून जात असत. कधी कधी या मदतीचे कौतुक करण्यासाठी गुरुमाता या कुमारांना काही वेगळा खाऊ देत असे. असा खाऊ कृष्ण आणि सुदामा आवडीने वाटून खात.
असेच दिवस झपाट्याने पुढे सरकत होते. कृष्ण आणि सुदामाचे उपनिषदांचे शिक्षण पूर्ण होत आले होते. शिक्षण पूर्ण होत आल्यामुळे सुदामा खुश होता. आपल्या गावाकडे माता-पित्याकडे परतण्यास तो खूपच उत्सुक होता. एका संध्याकाळी कृष्ण सांदीपनी गुरूंच्या सेवेत असताना सुदामा गुरुमातेला मदत करण्यासाठी माजघरात गेला. गुरुमातेने सांगितलेले प्रत्येक काम सुदामाने झटपट करून टाकले. त्यावर मातेने कौतुकाने एक पुरचुंडीभरून मऊसूत पोहे सुदामाला दिले आणि म्हणाली;"बाळा, तू आणि कृष्ण वाटून घ्या बरं का." हसून मानेनेचे रुकार देत मिळालेली कौतुकाची पुरचुंडी घेऊन सुदामा माजघरातून बाहेर पडला.
त्याचवेळी कृष्ण आणि सांदीपनी गुरू होम कुंडाजवळ बसून बोलत होते.
गुरू सांदीपनी : श्रीकृष्णा, उज्जयिनीमधील माझ्या या आश्रमामध्ये अध्यापनाला येऊन तू उज्जयिनीमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे महत्व पर्वत शिखरावर नेऊन ठेवले आहेस. पुढे येणाऱ्या सर्वच युगांमध्ये उज्जयिनीमधील शिक्षण हे सर्वश्रेष्ठ राहील ते केवळ तुझ्या येथील या वास्तव्यामुळे. वासुदेवा, खरं तर मी कोण तुला शिकवणारा? तू कोण आहेस याची मला जाणीव आहे; आणि म्हणूनच तुझ्या सहवासाचा मोह मी टाळू शकलो नाही. त्यामुळे मंत्रोपनिषदांचे शिक्षण तू प्रथम घ्यावेस असं सांगून तुझ्या मंगलमयी अस्तित्वाची सोबत माझ्या निकट ठेवण्याची मनतील इच्छा मी पूर्ण करून घेतली आहे. मात्र आता हे शिक्षण पूर्ण होत आले आहे आणि तुला अस्त्र-शस्त्र शिक्षणासाठी पुढील शाखेत जाणे क्रमप्राप्त आहे.
यावर मंद स्मित करीत श्रीकृष्ण काही बोलणार एवढ्यात त्याला समोरून सुदामा येताना दिसला. त्याला पाहाताच गुरू सांदीपनी म्हणाले : श्रीकृष्णा, तो पहा तुझा जिवलग मित्र इथेच येतो आहे. तू कोण आहेस हे माहीत नसूनही तुझ्यावर जीवापाड माया करतो तो. खरं तर सुदामा अत्यंत हुशार आणि एकपाठी विद्यार्थी आहे. तो स्वतः देखील मंत्रोपनिषदांचे उत्तम अध्यापन करू शकतो. मात्र दुर्दैवाने भिक्षुकी करणाऱ्या ब्राम्हण घरातील कुमार असल्याने तो आयुष्यभर भिक्षुक राहणार. अर्थात एक उत्तम गुरू समाजाला लाभण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे जरुरीचे असते; हे तुला सांगण्याची गरज नाही. असो! तो याच दिशेने येतो आहे; त्यामुळे याहून जास्त काही बोलणे योग्य नाही.
गुरूंचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण उठून उभा राहिला आणि गुरूंना नमसकार करून सुदामाच्या दिशेने गेला.
सुदामा : कृष्णा, काय सांगत होते रे गुरुवर्य?
श्रीकृष्ण : तसं काहीच नाही रे. आपलं शिक्षण पूर्ण होत आलं आहे न, तर मी पुढे काय शिकावं ते सांगण्यासाठी त्यांनी मला बोलावून घेतलं होतं.
सुदामा : खोटं नको हं बोलुस कृष्णा. गुरुवर्य नक्की माझ्याबद्दल तुझ्याशी काहीतरी बोलत होते. सांग बघू काय बोलत होते.
श्रीकृष्ण : मी का खोटं बोलेन सुदामा? बरं, ते जाऊ दे. तू माजघराकडून येतो आहेस. काही दिलं आहे का गुरुमातेने? मला नं भूक लागली आहे. मात्र भोजनाची वेळ अजून झालेली नाही. जर गुरुमातेने काही दिलं असेल तर आपण खाऊया का?
सुदामा : अरे आज काहीच दिलं नाही गुरू मातेने. मला देखील थोडी भूक आहे. पण आपल्याला भोजन समय होइपर्यंत थांबावंच लागणार असं दिसतं आहे.
श्रीकृष्ण : हो का? बरं! मग आपण आपल्या कुटिकडे जाऊ चल.
सुदामा : तू हो पुढे. गुरुमातेने मला थोडं काम दिलं आहे ते पूर्ण करून मी आलोच.
असं म्हणून सुदामा श्रीकृष्णाला तिथेच सोडून दुसरीकडे निघून गेला. दूर जाणाऱ्या सुदामाकडे मंद स्मित करत बघून श्रीकृष्ण त्याच्या कुटिकडे गेला.
खरं तर सुदामाला कृष्णाचा काहीसा राग आला होता त्याक्षणी. गुरू सांदीपनी आपल्याकडे बघत कृष्णाला काहीतरी बोलले याची त्याला खात्री होती. मात्र कृष्ण मुद्दाम ते आपणास सांगत नाही आहे असं त्याचं मन त्याला सांगत होतं. म्हणूनच गुरुमातेने दिलेले चविष्ट मऊसूत पोहे कृष्णाला न देता एकट्यानेच खावे असं त्याने रागाच्या भरात ठरवलं होतं आणि कृष्णाला सोडून तो निघून गेला होता. थोडं पुढे जाऊन सुदामाने मागे वळून पाहिलं तर कृष्ण कुटीच्या दिशेने जाताना त्याला दिसला. ते पाहाताच एक झाडाच्या पारावर बसून त्याने ते पोहे संपवून टाकले आणि मग कुटीच्या दिशेने गेला.
काही दिवसातच मंत्रोपनिषद शिक्षण संपल्याचे गुरू संदीपनींनी सर्व कुमारांना सांगितले. जे कुमार पुढील अजून काही शिक्षण घेणार होते त्यांना त्या शाखेकडे जाण्यास गुरूंनी सांगितले आणि जे आश्रम सोडणार होते; त्यांना निरोप दिला. आश्रम सोडताना सुदामाच्या डोळ्यातून पाणी खळत नव्हते. तो क्षणोक्षणी कृष्णाला मिठी मारत होता.
सुदामा : तुला सोडून जाण्यास मन तयारच होत नाही रे कृष्णा. तुझ्या सोबत असताना लक्षात नाही आलं पण तुझ्या अस्तित्वात एक जादू आहे. तू सोबत असताना कोणतीही चिंता मनाला स्पर्श करत नाही. मात्र आता तुला सोडून जाणार या विचाराने देखील मी अस्वस्थ झालो आहे.
श्रीकृष्ण : असं म्हणून कसं चालेल मित्रा? आयुष्य हे एका झऱ्यासारखं वाहत असतं. केवळ पुढे जाणंच आपल्या आहात आहे बरं.
सुदामा : कृष्णा.....
श्रीकृष्ण : बोल प्रियवरा....
सुदामा : अहं! काही नाही. निघतो मी...
असं म्हणून आपलं गाठोडं उचलून सुदामा निघाला. का कोणास ठाऊक पण निघताना त्याच्या मनात काही दिवसांपूर्वीची ती संध्याकाळ घोळत होती. क्षणभराच्या रागापाई आपण आपल्या प्रिय मित्रासाठी आणलेले पोहे एकट्यानेच खाल्ले; हा विचार त्याच्या मनाला डाचत होता. मात्र आता वेळ निघून गेली; असा विचार करून सुदामा चालत राहिला. आपल्याच विचारांच्या तंद्रीमध्ये जाणाऱ्या सुदामाकडे बघून श्रीकृष्णाने काहीशा खेदाने मान हलवली आणि त्याच्याकडे पाठ केली.
दिवस-महिने-वर्ष सरत होती. आता सुदामाचे लग्न झाले होते. त्याला मुले देखील झाली होती. वृद्धापकाळाने त्याच्या माता-पित्याना देवाज्ञा झाली होती. हुशार, एकपाठी सुदामाचे अध्यापनाचे स्वप्न भिक्षुकीच्या पात्रात विलीन झाले होते. अठराविश्व दारिद्र्य त्याच्या कुटीमध्ये वास करत होते. मुलांना रोजचा अन्नाचा घास मिळणे देखील अवघड झाले होते. तरीही सुदामाची सुशील पत्नी कोणतीही तक्रार न करता संसार करत होती. मात्र मुलांच्या होणाऱ्या आबाळीमुळे मनातून कायम दुःखी राहात होती.
एकदिवस त्यांच्या गावी काही प्रवासी आले. ते धर्मशाळेमध्ये उतरले होते. हे प्रवासी श्रीमंत सावकार असल्याचे समजल्यामुळे सुदामा भिक्षुकी मिळण्याच्या आशेने धर्मशाळेमध्ये गेला; आणि धर्मशाळेमध्ये समोर केवल या आपल्या गुरुबंधुला बघून आश्चर्यचकित झाला आणि ओशाळला देखील. सुदामाला पाहून केवल देखील आश्चर्यचकित झाला. केवलची नजर चुकवून परत निघालेल्या सुदामाचा केवलने हात धरला आणि त्याला आपल्या बाजूला प्रेमाने बसवले.
केवल : अरे सुदामा, तू इथे काय करतो आहेस? काय ही तुझी परिस्थिती मित्रा? गुरू सांदिपनींच्या आश्रमातील सर्वात हुशार आणि एकपाठी विद्यार्थी होतास तू. मला तर वाटलं होतं की तू देखील गुरू सांदीपनीं प्रमाणे आश्रम चालवत असशील.
सुदामा : केवल, मित्रा, मी कुठून मोठा होणार? माझे वडील भिक्षुकी करत असत. मी शिक्षण घेत होतो त्यावेळी मनात होतं की घेतलेलं शिक्षण आश्रमातील विद्यार्थ्यांना दान करावं. पण शिक्षण संपलं आणि आयुष्याचं सत्य समोर येऊन उभं राहिलं बघ. केवळ हुशार असून काही होत नाही. त्यासाठी नशीब देखील लागतं.
केवल : असं नको म्हणूस मित्रा. नशीबाहून देखील मोठी गोष्ट तुझ्याकडे आहे. मात्र तुला अजून त्याची जाणीव झालेली दिसत नाही.
सुदामा : नशीबाहून देखील मोठं काही असतं का केवल?
केवल : अरे ज्याचा जिवलग श्रीकृष्णासारखा द्वारकाधिश आहे; अशा तुझा मला हेवा वाटतो. अरे, नुकताच मी द्वारकेहून येतो आहे. श्रीकृष्णाने मथुरेपासून दूर स्वतःची अशी द्वारकानगरी वसवली आहे. सर्व सुखसोयींनी युक्त अशा नगरामध्ये सर्वच नागरिक आनंदाने राहात आहेत.
सुदामा : कोणाबद्दल बोलतो आहेस तू? कृष्णाबद्दल? माझ्या परमप्रिय मित्राबद्दल? तो राजा आहे?
केवल : कमाल करतोस सुदामा. तुला नाही माहीत? मथुरेचे राजे वसुदेव यांचा सुपुत्र श्रीकृष्ण! त्याच्या राजनिती निपुणतेची चर्चा विश्वभरात होते; कृष्णनिती म्हणून जी ओळखली जाते असा हुषारीचा, ज्ञानाचा, सर्जनशीलतेचा महासागर म्हणजेच तुझ्या माझ्यासोबत गुरू सांदीपनी यांच्या आश्रमातील कृष्ण आहे. तुला हे माहीतच नाही?
सुदामा : अरे, संसाराच्या धकाधकीमध्ये आणि दोन वेळच्या अन्न भ्रांतीपुढे इतर काही समजून घेण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. बरं! तू द्वारकेला जाऊन आला आहेस तर आपल्या मित्राला भेटलाच असशील. तुला ते अवघड देखील नाही. एक मोठा सावकार आहेस तू.
केवल : इथेच तू चुकतो आहेस मित्रा. मी भले मोठा सावकार असेन. पण मी कृष्णसखा नाही. आश्रमामध्ये ज्यावेळी त्याच्याशी मैत्री करणं शक्य होतं त्यावेळी मी त्याला बघून न बघितल्यासारखं केलं. आज केवळ पैशाच्या जोरावर मी त्याला भेटण्याचं मानत आणलं तरी तो ते कधीच मान्य करणार नाही; हे मला माहीत आहे. तो पैशापेक्षा भावनेला तोलतो मित्रा. तू इथे असा भिक्षुकी करण्यापेक्षा त्याला जाऊन भेट. तो नक्की तुला भेटेल.
केवलचे बोलणे ऐकून सुदामा अंतर्मुख झाला आणि आपल्या घराकडे वळला. घरी येऊन त्याने आपल्या पत्नीस सर्व घटना कथन केली. सुदामाचे बोलणे ऐकून त्याची पत्नी हर्षभरीत झाली.
सुदामा पत्नी : काय सांगता? तुमचे मित्र द्वारकाधिश महाराज आहेत? तुम्हाला कसं माहीत नव्हतं ते? अहो, इतका मोठा मित्र असून देखील आपण असे दारिद्र्यात का राहातो आहोत. तुमच्या सावकार मित्राने तुम्हाला योग्य सल्ला दिला आहे. तुम्ही खरोखरच द्वारकाधिशांना जाऊन भेटलं पाहिजे.
सुदामा पत्नीचे बोलणे ऐकून विचारात पडला. बालपणी ज्या कृष्णासोबत आपण प्रतिदिनी प्रत्येक क्षण जगलो तो आता एक मोठ्या नगरीचा राजा आहे. त्यावेळी आपण दोघेही विद्यार्थी होतो. मात्र आता आपण केवळ एक भिक्षुक आहोत. आपल्यामधील दरी खुप मोठी आहे. असे असताना का बरे त्याने आपल्याला भेटावे? मनातील विचार त्याने आपल्या पत्नीला बोलून दाखवला.
सुदामा पत्नी : तुम्ही म्हणता ते खरं असेलही कदाचित. आता ते महाराज आहेत. आपल्यासारख्या गरीब व्यक्तीला ते कदाचित आपणहून भेटणार देखील नाहीत. परंतु आपले मित्रवर्य केवल यांनी काय म्हंटलं ते आपण कसं विसरता? श्रीकृष्ण महाराज भावनांचे भुकेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे काही मागण्यासाठी नका जाऊ. केवळ सुखदुःखाच्या चार गोष्टी करण्याच्या उद्देशाने जा. ते महाराज आहेत. त्यामुळे ते योग्य विचार करतीलच. आजवरचे आयुष्य आपण नशिबावर सोडलं आहे न? तद्वतच ही भेट देखील तुम्ही नशिबावर सोडून द्या.
सुदामाला पत्नीचे म्हणणे पटले आणि तो जाण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या पहिल्या प्रहरी उठून स्नान-संध्या आटोपून सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी निघाला. सुदामा निघत असताना त्याच्या पत्नीने त्याच्या हातात एक लहानशी पुरचुंडी दिली.
सुदामा पत्नी : हे घेऊन जा आपण. गोड, मऊसूत पोहे आहेत यात. आपण रिकाम्या हातांनी जाणे योग्य नाही. ते द्वारकाधिश आहेत. राजे आहेत. त्यांना काय कमी? तिथे तुमचं स्वागत नक्कीच खूप मोठं होईल. पण तरीही आपल्याकडून काहीतरी नेणं हे आपलं कर्तव्य आहे.
सुदामाने काहीएक न बोलता ती पुरचुंडी घेतली आणि तो द्वारकेच्या दिशेने निघाला. मजल दरमजल करीत तो द्वारकेला पोहोचला. संपूर्ण प्रवासामध्ये सोबत असणारी ती पोह्यांची पुरचुंडी सुदामाच्या मनात लहानपणच्या आठवणीचं काहूर उठवत होती. कधीतरी एक वांझोट्या रागापाई आपल्या जीवलगाच्या वाटणीचे पोहे आपण खाल्ले होते; हा विचार त्याला आजही अस्वस्थ करत होता. बालवयातील आपल्या वागण्याचा पश्चात्ताप सुदामाला संपूर्ण प्रवासात होत होता. द्वारकेला पोहोचेपर्यंत त्याची अस्वस्थता इतकी वाढली की तिथे पोहोचताच तो परत निघण्याचा विचार करू लागला. बरेच अंतर चालल्यामुळे सुदामा दमला होता. त्यामुळे आज एकदिवस धर्मशाळेमध्ये विश्रांती घेऊन उद्या परतीचा प्रवास सुरू करावा असा विचार त्याने केला. घरी जाऊन पत्नीस सांगता येईल की द्वारकाधिश भेटलाच नाही. दिवसभर द्वारकानागरीमध्ये फिरून सुदामाने नगरीचे सौंदर्य आणि श्रीमंती बघितली. प्रशस्त रस्ते, मोठे-मोठे प्रासाद, अंतरा-अंतरावरील बगीचे, सर्व वस्तूंनी भरलेली बाजारपेठ आणि सुखी-समाधानी चेहेऱ्याचे नागरिक बघून त्याचे मन भरून आले आणि श्रीकृष्णाला भेटण्याच्या विचाराचे दडपण देखील आले. 'आपल्या आयुष्यातील दुःख काय सांगायचे त्या राजाला?' हा मनातील विचार त्याला पूर्ण पटला.
पुढील दिवशी सुदामा आल्या वाटेने परत निघण्यासाठी धर्मशाळेतून बाहेर आला आणि बघतो तर काय त्याचा लाडका मित्र त्याच्या समोर उभा होता. कृष्णाला सामोरे पाहिल्यावर मात्र सुदामाच्या मनाचा बांध फुटला आणि धावत जाऊन त्याने श्रीकृष्णाला मिठी मारली. सुदामाला बाहुपाशात घेत श्रीकृष्णाने देखील आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून दिली. काही क्षण दोघे जगाला विसरून गेले होते. दोघे भानावर आले आणि मिठीतुन मोकळे होत दोघांनी अत्यंत प्रेमाने एकमेकांकडे बघितले.
श्रीकृष्ण : न भेटताच जाणार होतास प्रियवरा?
सुदामा : खूप मोठा राजा झालास की तू..... तुम्ही! मी एक भिक्षुकी करणारा गरीब ब्राम्हण आहे महाराज. मनात इच्छा असूनही तुमच्यापर्यंत पोहोचणे मला शक्य होते का? म्हणूनच परत निघालो होतो.
श्रीकृष्ण : आता भेटला आहेस न? मग दोन दिवस राहा कसा. माझा पाहुणचार घे आणि मग जा परत.
श्रीकृष्णाची इच्छा सुदामाने लगेच मान्य केली आणि त्याच्यासोबत तो त्याच्या महालाकडे निघाला. ते दोन दिवस कसे सरले त्या दोन जिवलग मित्रांना कळलेच नाही. गुरू सांदीपनींच्या आश्रमातील जुन्या आठवणींमध्ये दोघे रमून गेले होते. दोन दिवस झाले आणि सुदामा श्रीकृष्णासमोर उभा राहिला.
सुदामा : श्रीकृष्णा, इथे येताना मनावर एक दडपण होतं; तुझी ही नगरी बघितल्यानंतर तर ते फारच वाढलं होतं... मात्र तुला भेटलो आणि मनातल्या सगळ्या शंका-कुशंका दूर झाल्या. तुला भेटलो... बालपणीचे दिवस आठवून सुखावलो. पण आता मला परतलेच पाहिजे. घरी माझी पत्नी आणि मुलं वाट बघत असतील.
श्रीकृष्ण : निघतोस मित्रा? ठीक! निघ... मी अडवणार नाही.
असे म्हणून श्रीकृष्णाने सुदामाला आलिंगन दिले. सुदामा आलिंगनामध्ये असताना अत्यंत हळू आवाजात पण अत्यंत मिश्कीलपणे श्रीकृष्ण सुदामाला म्हणाला.... आता तरी माझे हक्काचे पोहे देणार ना मित्रा? आलिंगनातील सुदामाने ते ऐकले आणि मंद स्मित करीत तो म्हणाला.... गुरू सांदीपनी काय म्हणाले होते रे माझ्याकडे बघत?
आलिंगनामधून मोकळे होत दोघेही मनसोक्त हसले. सुदामा भाऊजींना निरोप देण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या रुक्मिणीला त्या दोघांच्या अचानक हसण्याचे कारण काही कळले नाही. मात्र परतीच्या प्रवासाला निघालेल्या सुदामा भाऊजींनी एक लहानशी पुरचुंडी आपल्या पतीच्या हातात ठेवताना तिने पाहिले.
सुदामा गेला त्या दिशेने बघत ती प्रेमभरली पुरचुंडी सोडून श्रीकृष्णाने चिमूटभर पोहे तोंडात टाकले आणि मनभर तृप्ती त्याच्या चेहेऱ्यावर दिसू लागली.
सुदामा परतीच्या वाटेवर गेल्या दोन दिवसांचा विचार करत मनाने समाधान पावत होता. मात्र जसजसे त्याचे गाव जवळ येऊ लागले तसतसा त्याच्या मनात विचार येऊ लागला की आपण तर श्रीकृष्णाकडून काहीच न घेता आलो परत. काय उत्तर द्यावे बरे पत्नीला आणि आशेने वाट बघणाऱ्या आपल्या लेकरांना? विचार करत करत आपल्या कुटिपर्यंत पोहोचलेला सुदामा समोरील दृश्य पाहून सीमित झाला होता...
सुदामाच्या समोर एक प्रशस्त आश्रम उभा होता. त्याची पत्नी आणि त्याची मुले त्याला सामोरी आली.
सुदामा : हे काय ग? आपली कुटी कुठे गेली? हा आजूबाजूचा परिसर इतका कसा बदलून गेला?
सुदामा पत्नी : आपण द्वारकेहून निघालात आणि आपण इथे पोहोचण्याच्या अगोदरच द्वारकाधिश श्रीकृष्ण महाराजांच्या खास मर्जीमधील स्थापत्य विशारद इथे आले. त्यांनी आपल्या नगरीच्या महाराजांशी बोलून आपल्या पर्णकुटीच्या जागेवर आश्रम उभारण्याचा श्रीकृष्ण महाराजांचा मानस सांगितला आणि परवानगी घेऊन मगच हा आश्रम उभारला आहे. नाथ, तुमच्या मित्राने; महाराज श्रीकृष्णांनी तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे.... गुरू सांदीपनींनी तुमच्यामधील एक उत्तम गुरू ओळखला होता. त्यामुळे आता पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून अध्यापनाचे पुण्यकर्म तुम्ही करावे अशी महाराजांची इच्छा आहे.
द्वारका सोडताना आपल्या जिवलग मित्राने आपल्याला आलिंगन देऊन रागावरील ताबा काय मिळवून देऊ शकतो हे कृतीतून दाखवून दिल्याचे लक्षात येऊन गुरू सुदामांनी मनापासून स्मित केले आणि आपल्या आश्रमाच्या दिशेने ते वळले.
(ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे. आपण पुराण कथांमध्ये कायम हेच वाचले आहे की श्रीकृष्णाने सुदामाच्या झोपदीचा महाल केला होता. तो राहात असणाऱ्या अस्मावतीपुराचे नाव सुदामापुरी झाले होते. मात्र मला या कथेमध्ये कायम विसंगिती वाटत आली आहे. सुदामा एक ब्राम्हण होता. त्यामुळे एका राज्य शासकापेक्षा तो एक उत्तम गुरू झाला असता; असं माझं मन मला कायम सांगत आलं आहे. याच कल्पनेचा विस्तार मी येथे केला आहे.)
ही कथा काल्पनिक असूनही कृष्ण-सुदामा ह्यांच्या संबंधात खरोखर घडली आहे असंच वाटतं.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteमला नेहेमी वाटतं की एका ब्राम्हणाला श्रीकृष्णासारखा विचारी राजा आश्रमच काढून देईल न. ब्राम्हण राजा झाला तरी प्रजा कुठून येणार? राज्य कसं येणार?
याच विचाराने ही कथा बांधली