श्रीकृष्ण - पेंद्या
(हा लेख संपूर्णपणे काल्पनिक आहे)
श्रीकृष्ण : पद्माकर, किती रे उशीर केलास? मी कधीचा थांबलो आहे. बलराम दादा तर तुझी वाट बघायला न थांबता निघूनसुद्धा गेला. योशोदा माँ मला त्याच्याबरोबर जायचा आग्रह करत होती; पण मी तुझ्यासाठी हट्टाने थांबलो.
पद्माकर : तुझं बरं आहे रे किसना, तुला शिदोरी बांधून द्यायला तुझी यशोदा माँ आहे. मला मात्र माझ्या म्हाताऱ्या आजीचं जेवण करून स्वतःची शिदोरी बांधून घेऊन निघावं लागतं या पहाटवेळी.
श्रीकृष्ण : पद्माकर, तुला किती वेळा सांगितलं की मी तुझी शिदोरी माँ कडून मागून घेईन. तू आपला वेळेत येत जा.
पद्माकर : नाही किसना. कधीतरी प्रेमाखातर तू माझ्यासाठी शिदोरी आणणं आणि रोजची शदोरी तुझ्या घरून येणं यात फरक आहे. आपल्याला नंद बाबांनी स्वाभिमानाने जगायचा धडा लहानपणापासून दिला आहे; विसरलास का? तसंही मी खाऊन-पिऊन सुखी आहे; भले तुझ्याप्रमाणे मला माझ्या घरी रोज पक्वान्न नसतील मिळत. अर्थात तू त्याची देखील सोय केलीच आहेस... आपण सर्वांनी शोदोरी सोडली की तू जो काला करतोस न तो खायला मजा येते. प्रत्येकाची शिदोरी वेगळी असते; मग सर्वच एकत्र करून आपण सगळे जेवतो. त्यामुळे माझ्यासारख्याने काही कमी आणलं असलं तरी पोटभर मिळतं खायला; तुझ्याप्रमाणे पक्वान्न घेऊन येणाऱ्या गोपाळांच्या शिदोरीतील खास पदार्थ देखील मिळतात. किसना, तुझ्या सोबत असणारा प्रत्येक गोपाळ समाधानी आहे बघ. मग माझ्यासाठी तू वेगळं काही करायची गरज नाही वाटत मला. आणि तसही मला आजीसाठी घरचा स्वयंपाक करावाच लागतो न; मग त्यात माझ्यासाठी म्हणून थोडं अजून जास्त करायला काय त्रास असणार? कन्ह्या, तुझं माझ्याविषयीचं प्रेम मी समजू शकतो; तशा तू देखील माझ्या भावना समजून घे.
श्रीकृष्ण : पद्माकरा.... कसं सांगू मी तुला माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत? बरं, तूच सांग मला की मी असं काय करू की तुला आनंद होईल?
पद्माकर : किसना, तू काय देऊ शकशील बरं मला? बरं एक मागतो.... तुला असं नाही वाटतं; माझं हे भलं मोठं नाव माझ्या या कृश शरीरयष्टीसाठी फारच भारदस्त आहे? गाई चरायला नेणाऱ्या गवळ्याच्या कृश अशा या पोरक्या पोराला पद्माकर हे भारदस्त नाव शोभलं तर पाहिजे. कन्ह्या, मला असं नाव दे जे मला शोभेल आणि तुझ्याच काय पण समस्त गोकुळवासियांच्या तोंडात सहज राहील.
श्रीकृष्ण : (मनापासून हसत) पद्माकरा... मला वाटलं होतं 'तुझ्यासाठी काय करू?' अस मी विचारल्यावर तू बरंच काहीतरी मागशील.
पद्माकर : असं मागून का सुख मिळतं कन्ह्या? कसं सांगू केवळ तुझ्या जवळ असणं यात सर्वस्व मिळतं रे!
श्रीकृष्ण : नकोच सांगूस काही. मी समजलो की तू तुझ्या भावव्याकुळ मनाप्रमाणे मागणी केलीस. पद्माकरा, शरीरयष्टीवरून का कोणाचं नाव आणि कर्तृत्व ठरतं? पण तरीही तुझं मागणं एकदम मान्य. तुला आजपासून मी पेंद्या म्हणणार. मात्र मला खात्री आहे; एक दिवस असा येणार आहे की तुझं खरं नाव पद्माकर तुला शोभेल.
श्रीकृष्णाने पेंद्याला आलिंगन दिले आणि दोघेही हसत-खिदळत इतर गोपाळांना जाऊन मिळाले आणि गावाबाहेर खिल्लारांना चरायला घेऊन गेले.
असेच दिवस जात होते आणि तो दिवस आला ज्यादिवशी बलराम दादा सोबत श्रीकृष्णाने गोकुळ सोडले. इतर सर्व गोकुळवासियांप्रमाणे पेंद्याने देखील श्रीचरणांना मिठी घातली.
पेंद्या : किसना, असा कसा तू मला सोडून जाऊ शकतोस? अजून तुझी मोहमयी मुरली मी कानात साठवलेली नाही. तू पेंद्या म्हणून मारलेली अजून कानांना तृप्त नाही करून गेली. अरे, असे कितीतरी खेळ आहेत की जे आपण अर्धेच सोडले आहेत. तू तुझा डाव पूर्ण न करता नाही हं जायचंस. कन्ह्या, तू मला मागे विचारलं होतंस नं मला काय हवंय? आता मला समजलं मला नक्की काय हवं आहे तुझ्याकडून. मला न तुझा सहवास हवा आहे मोहना. तुला माझी गरज आहे की नाही मला माहीत नाही... पण तू माझ्या आयुष्यात असणं ही माझी खुप मोठी गरज आहे. असा अचानक नको रे जाऊस सोडून मला आणि या गोकुळाला. पहाटवेळी तुझी मोहमयी मुरली ऐकल्यावाचून गुरांना चैन पडत नाही. गवळणी पाणी भरायला घरातून बाहेर पडत नाहीत. मी तर तुझ्या सुरांनीच झोपेतून जागे होतो. अरे किसना, मी... फक्त मीच का... समस्त गोकुळातील ही खिल्लारं आणि हे वेडे गोकुळवासी तुझ्या केवळ अस्तित्वाच्या भावनेवर जगतात. गाई जास्त दूध देतात; वासरं सुदृढ राहातात. तुझं असणं म्हणजे आमचं सर्वस्व आहे रे कन्ह्या.
श्रीकृष्णाने प्रेमभराने पेंद्याचे दोन्ही खांदे धरले आणि त्याला उठवून उराशी कवटाळले.
श्रीकृष्ण : पेंद्या, मित्रा, एवढा भावविवश नको होऊस. एक समजून घे आज माझं जाणं अटळ आहे. मात्र राधेप्रमाणे मी तुझ्या प्रेमबंधनात देखील पूर्णपणे अडकलो आहे. गेल्या आठ वर्षांत जे केलं नाही आणि पुढील संपूर्ण जन्मात जे करणार नाही ते आज तुझ्यासाठी नक्की करीन. माझ्या प्रिय पेंद्या... आज दुसऱ्यांदा विचारतो.... गोकुळ सोडून जाताना मी असं काय करू की ज्यामुळे तुला आनंद होईल?
पुन्हा एकदा आपल्या प्रिय मुरलीधराच्या पायांवर पेंद्या कोसळला.
पेंद्या : मनोहरा.... समस्त विश्वात मीच असा भाग्यवान आहे की ज्याच्यावर तुझी कृपादृष्टी दुसऱ्यांदा पडली आहे. पण तेवढाच करंटा देखील आहे... मला याही क्षणी कळतच नाही आहे की 'तू इथून जाऊ नकोस'; याव्यतिरिक्त मी तुझ्याकडे काय मागू? तूच समजून घे मला आणि योग्य असेल ते दान टाक माझ्या झोळीमध्ये.
श्रीकृष्णाचे चरण पेंद्याच्या अश्रूंनी भिजून गेले होते. श्रीकृष्णाने खाली बसून त्याच्या पाठीवर हात ठेवला.
श्रीकृष्ण : पेंद्या, तुझ्या प्रेमाने मला देखील अबोल करून टाकलं आहे रे. या निष्कपट आणि स्वछ मैत्रीपुढे मी तुला काहीही दिलं तरी ते थिटं पडेल. त्यामुळे आज मीच तुझ्याकडे काहीतरी मागतो आहे. तू माझी मागणी पूर्ण कर. मागे तू तुझ्या शरीरयष्टीला शोभेल असं नाव मागितलं होतंस न? आता तू अशी शरीरयष्टी कमव की तुझं पद्माकर हे नाव तुला शोभेल. बाकी सर्व नियतीवर सोड प्रिय मित्रा...
पेंद्याने अश्रूपूर्ण नजरेने श्रीकृष्णाकडे बघितलं आणि त्याच्या नेत्रांमधील भाव समजून तो बाजूला झाला. त्यानंतर गोकुळवासियांना निरोप देऊन श्रीकृष्णाने राधेला.... पेंद्याला.... त्याच्या प्रिय गोकुळाला कायमचे सोडलं.
दिवस सरले; वर्षे उलटली... पांडवांना न्याय देण्यासाठी कृष्णनीती वापरून श्रीकृष्णाने युद्धपरिस्थिती निर्माण केली. मात्र एक सत्य अधोरेखित होते की दुर्योधन बलाढ्य हस्तिनापूर नगरीचा राजकुमार होता. त्याच्या समवेत युद्धकुशल, अनुभवी असे महान रथी-महारथी होते. याउलट पांडवांकडे स्वतःच्या युद्ध निपुणतेव्यतिरिक्त काही नव्हते. त्यामुळे भारतवर्षातील राजांकडे ज्यावेळी दुर्योधनाचा दूत आणि पांडवांचा दूत एकाचवेळी मदतीसाठी जात होते; त्यावेळी हे राजे तुलनात्मक दृष्टिकोनातून दुर्योधनाच्या विजयाचा कयास बांधून त्याच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत होते. त्यामुळे दुर्योधनाच्या तुलनेत पांडवांसोबतचे सैन्यबळ कमी होते; आणि ही चिंतेची बाब होती. श्रीकृष्ण अहोरात्र केवळ हाच एक विचार करत होता की असे कोणते राजे असतील की जे बळ आणि सत्य या दोन बाजूंचा विचार करून योग्य निर्णय घेतील आणि पांडवांचे सैन्यबळ वाढेल. एक एक दिवस पुढे सरकत होता आणि युद्ध सुरू होण्याच्या आदल्या संध्याकाळी श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर युद्धभूमीची पाहाणी करत फिरत असताना अचानक त्याच्या समोर एक अत्यंत सुदृढ, बलवान योद्धा उभा राहिला. आपल्याच विचारात मग्न श्रीकृष्णाने एक स्मित करत त्या योध्याला ओलांडले आणि पुढे निघाला.
योद्धा : किसना......
आणि त्या एका हाकेने त्या विश्वेश्वराच्या शरीरावर रोमांच उभे राहिले.... तो गर्रकन मागे वळला आणि काहीही विचार न करता त्याने त्या योध्याला आलिंगन दिले.
श्रीकृष्ण : पेंद्या.... माझ्या प्रिय पेंद्या.... (अत्यंत गहिवरलेल्या आवाजात मुरलीधराने आपल्या प्रिय मित्राला साद घातली. मात्र आलिंगनामधून दूर होताच त्याच्या सुदृढ आणि बलवान शरीराकडे बघत श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला...) अहं... पद्माकरा.....
पेंद्या : कन्ह्या तुझ्या तोंडून पेंद्याच बरं वाटतं रे. तू गोकुळ सोडलंस आणि जणू आम्हाला विसरूनच गेलास. परत कधीच आला नाहीस. तू गेलास आणि माझा जीव कशातच रमेनासा झाला. मनाचा अस्वस्थपणा दूर करण्यासाठी मी रोज कालिंदीच्या प्रवाहात उलट्या दिशेने पोहण्यास सुरवात केली. त्या जोरकस प्रवाहाला भिडण्याच्या नादात हळूहळू मन शांत होऊ लागलं. तुझ्या विषयीचे विचार मनातून जात नसत परंतु किमान त्याची धार नदीच्या धारेत थोडी बोथट होत असे. मित्रा, असेच पोहता पोहता काही मास उलटून गेले आणि एकदिवस मी आपल्या लाडक्या डोहाजवळ उभा असताना पाण्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाकडे माझी नजर गेली. काय सांगू किसना; मी स्वतःला ओळखलंच नाही. समोर पेंद्या नव्हता तर तू माझ्याकडे मागीतलेला पद्माकर होता. माझ्याही नकळत मी शरीर कमावायला सुरवात केली होती. मग मात्र एकच ध्यास लागला. तू निघताना माझ्याकडे केलेली मागणी पूर्ण करायची. बाकी नियतीवर सोडून द्यायचं. माझ्या शरीराने आकार घेण्यास सुरवात केली आणि आपले सर्वच सवंगडी माझ्याकडे आले. त्यांनी देखील माझ्याकडे त्यांचं मन मोकळं केलं. तुझ्या जाण्याने सर्वच अस्वस्थ होते. मग खिल्लारांसोबत डोंगरावर गेल्यानंतर धावण्याच्या शर्यती लावणं, पैजा लावून जोर बैठका काढणं, कोयती-कुऱ्हाडीने वाळलेले वृक्ष तोडणं आणि कालिंदीच्या पात्रात पोहणं यातून सर्वांनीच शरीर कमावायला सुरवात केली. वयं वाढली आणि आम्ही सर्वच आपापल्या पुढील आयुष्यात गुंतत गेलो. मात्र आमच्या मुलांमध्ये देखील सुदृढ शरीराविषयीचं महत्व आम्ही निर्माण केलं आणि आमची पुढची पिढी देखील आपलं पारंपारिक गवळ्याचं काम करताना स्वतःकडे लक्ष देऊ लागली.
श्रीकृष्ण : अरे वा पद्माकरा, तू तर गोकुळातल्या गवळ्यांच्या शरीराबरोबरच मनाचं परिवर्तन देखील करून टाकलंस की. परंतु मित्रवरा, आत्ता मी तुझ्यासोबत फार वेळ बोलू शकणार नाही आहे. आजचा दिवस वेगळा आहे पद्माकरा. तुझ्याशी गप्पा मारायची इच्छा असूनही मी तुला वेळ देऊ शकणार नाही आहे. उद्यापासून धर्म आणि अधर्म यामध्ये युद्ध सुरू होणार आहे. मी निःशस्त्र राहून पांडवांच्या बाजूने या युद्धामध्ये पार्थाच्या रथाचे सारथ्य करणार आहे. त्यासाठीच या युद्धभूमीची पाहाणी करण्यासाठी मी आत्ता इथे आलो आहे. त्यामुळे पटकन सांग बघू की आज असा अचानक तू इथे का आला आहेस?
पद्माकर : मनमोहना, मी काय किंवा आमची पुढील पिढी काय; केवळ तुझ्या दर्शनाची आस नियतीवर सोडून तू शब्दात न सांगता दाखवून दिलेल्या मार्गावरून चालत राहिलो. आणि पहा... आज जेव्हा धर्माच्या विजयासाठी तू उभा राहिला आहेस त्यावेळी आम्ही देखील आमची चिमूटभर शक्ती घेऊन तुझ्या सोबत उभे राहाण्यासाठी आलो आहोत. यापुढील सर्व निर्णय तुझेच श्रीकृष्णा!
असं म्हणून पद्माकर पुन्हा एकदा श्रीकृष्णाच्या चरणांवर लीन झाला.
महाभारताचे अनीती विरुद्ध नितीचे, अन्यायाविरुद्ध न्यायचे, अधर्मा विरुद्ध धर्माचे घनघोर युद्ध झाले. नीतिमान, न्यायी आणि धर्मपालन करणाऱ्या पांडवांचा विजय झाला; आणि मग युद्धामध्ये जख्मि झालेल्या योध्यांची प्रेमळ विचारपूस करण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण निघाला. एका-एका योध्याला भेटून त्याच्या पराक्रमाची प्रशंसा करत श्रीकृष्ण पुढे जात होता; आणि अचानक त्याच्या समोर गोकुळातील त्याचा परममित्र पेंद्या आला. संपूर्ण शरीर जखमांनी घायाळ झाले होते; मात्र चेहेऱ्यावरील समाधानी भाव श्रीकृष्णाला सर्वकाही सांगून गेले. पेंद्या त्याच्या लाडक्या मोहनाच्या चरणस्पर्श करण्यासाठी वाकला. त्याला मध्येच थांबवत आणि हृदयाशी कवटाळत केवळ पेंद्यालाचं ऐकू जाईल अशा आवाजात श्रीकृष्ण म्हणाला;
श्रीकृष्ण : माझ्या मागील श्रीराम अवतारात देखील खारीच्या रूपाने तू सेतू बांधायला मदत केलीस... आणि आज माझ्या मनातील चिंता समजून परत एकदा माझ्या सोबत उभा राहिलास. कोण आहेस ते तरी सांग माझ्या प्रियवरा!
.......आणि पेंद्या देखील तेवढ्याच मंद स्वरात बोलता झाला...
पद्माकर : पद्मनाभा, माझ्या नावामध्ये आणि तुझ्या या नावामध्ये जे साम्य आहे तोच मी! पुरुषोत्तमा, वाम हस्तातील तुझे पद्म तू अवतार जीवनात विसरून जात असशीलही. पण सतत तुझ्या करकमलाच्या स्पर्शाची सवय असणाऱ्या मला तुझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार करता आलाच नाही. त्यामुळे तुझे चिंतन आणि तुझ्या अस्तित्वाचा कोंब मनात ठेऊन माझ्या जीवाला जमले ते मी केले आहे. माझी मदत खारीच्या वाट्याची.... माझी मदत पेंद्याच्या तुटपुंज्या शक्तीची........ पण जीकाही आहे ती सर्वस्वी श्रीकृष्णार्पणमसुस्तू!!!
खूपच छान लिहिलंय ज्योति... अगदी हृदय स्पर्शी..
ReplyDelete