श्रीकृष्ण - बलराम
श्रीविष्णु : कमाल झाली बरं का तुझी शेषा! मागील अवतारात आणि या अवतारात देखील मी तुझी मनीषा पूर्ण केली आणि करतो आहे. तरीही तुझी माझ्यावरील नाराजी संपत नाही.
शेषनाग : देवाधिदेवा, मी कोण तुमच्यावर नाराज होणार? आपल्या सेवेसाठी आपण माझी निवड केलीत यातच सर्वस्व आलं. अनादी-अनंतकालासाठी सर्पवंशाला आपण मोठा मान दिला आहात. याहून जास्त माझं काही मागणंच नाही परमेश्वरा.
श्रीविष्णु : उगा विषयाला बगल देऊ नकोस शेषा. आत्ता यावेळी या क्षीरसागरातळी श्रीलक्ष्मी देखील नाही; कारण श्रीकृष्ण अवतार अजून समाप्त झालेला नाही. मात्र तरीही मी इथे आलो आहे तुला घेऊन; ते काही काळ विश्रांती घेण्यासाठी. या कृष्ण जन्मामध्ये मला सतत मन जागरूक ठेवावे लागते आहे. घडणाऱ्या घटनांवरील पकड एक क्षण देखील सैल होऊन चालणार नाही; याचं भान ठेवावे लागते आहे. एखाद्या सूक्ष्म घटनेकडील दुर्लक्ष संपूर्ण मानव जातीवर खूप मोठा परिणाम करेल; केवळ या एका जाणिवेने मन अस्वस्थ असते. म्हणूनच ही घटिकेची विश्रांती मला फार फार आवश्यक वाटली रे.
शेषनाग : केशवा, तुम्ही विश्रांतीसाठी आला आहात. अशावेळी माझ्या शरीराच्या थंडाव्याने मी आपले मन शांत शीतल करावे; हे माझे कर्तव्य आहे. देवन, आपण आराम करावात आणि मौन धारण करून मी आपली सेवा करावी; हेच सद्य स्थितीत योग्य ठरेल.
श्रीविष्णु : मनातील विषयापासून दूर नको जाऊस शेषा. मीच तुला तुझे मन मोकळे करायला सांगितले आहे; त्यामुळे तू तुझे मन मोकळे करण्यास काहीच हरकत नाही. कोणताही संकोच न ठेवता बोल.
शेषनाग : पुरुषोत्तमा, शब्द खेळीमध्ये आपणावर कोणी विजय मिळवू शकले आहे का? आपण अभय दिलंच आहात तर मी बोलायचे धारिष्ट्य करतो. ऋषीकेशा, आजवर आपण मत्स्य, कस्य, वराह, नृसिंव्ह, वामन, परशुराम आणि श्रीरामावतार घेतलेत. आपल्या मत्स्य, कस्य, वराह, नृसिंव्ह, वामन आणि परशुराम या आवतारांच्या वेळी माझी आपणास काहीच मदत झाली नाही.
श्रीविष्णु : शेषा, तुला माहीतच आहे की पाहिले पाचही अवतार ही त्या-त्या क्षणाची गरज होती.
शेषनाग : अगदी मान्य सर्वेश्वरा... परंतु परशुराम अवताराच्या वेळी देखील आपण माझा विचार केला नाहीत.
श्रीविष्णु : परशुराम अवतार ही देखील पृथ्वी मातेची गरज होती शेषा. पाप आणि अधर्मचा भार इतका वाढला होता की केवळ त्याच्या परिपत्यासाठी मला परशुराम अवतार हा माझा पहिला मानवीय अवतार घ्यावा लागला. मातेच्या गर्भातून जन्म घेण्याची माझी पहिली वेळ होती ती. पृथ्वी मातेच्या मनावरील ओझे उतरवण्यासाठी संपूर्ण मनुष्य जन्म जगणे ही आवश्यकता होती. परंतु माझ्यासाठी देखील तो अनुभव नवखा होता. माझे ध्येय आणि कर्तव्य मला ठाऊक होते. मात्र एक मनुष्य प्राणी त्याच्या संपूर्ण जीवनात केवळ कर्तव्यासाठी जगू शकत नाही याची मला कल्पना होती. अनेक भावभावनांच्या फेऱ्यांमधून मनुष्याला प्रवास करावा लागतो. ते समजून घेताना मला माझी वयक्तिक बंधने नको होती. म्हणूनच लक्ष्मी देवीची देखील इच्छा असूनही या अवतारात मी तिचा सहभाग नाकारला होता. संन्यस्त जीवन जगत मी मनुष्य जन्माचा अनुभव घेतला. म्हणूनच तर श्रीराम अवतार घेण्याची वेळ आली त्यावेळी लक्ष्मी देवीचा हट्ट आणि तुझी विनंती लक्षात घेऊन मी तुम्हाला देखील माझ्या सोबत भूतलावर घेऊन गेलोच की. माझा धाकटा बंधू लक्ष्मण म्हणून तू जन्म घेतलास आणि राम जीवनात प्रत्येक वळणावर माझ्या बरोबरीने उभा राहिलास.
शेषनाग : आपला धाकटा बंधू होऊन आपली साथ मी प्रत्येक क्षणी दिली. देवा, आपण कदाचित रुष्ट व्हाल, परंतु केवळ आपली साथ असे नाही तर काहीवेळा मी आपल्यावर येणारे संकट स्वतःवर ओढावून देखील घेतले होते.
श्रीविष्णु : परंतु मी हे कधी अमान्य केले शेषा? हे तर सत्यच आहे. मग मी रुष्ट का होईन?
शेषनाग : अच्युता, तुम्ही ते कधीच अमान्य केले नाही. मात्र अवतार समाप्तीनंतर ज्या-ज्या वेळी मी भूतलावर प्रवास केला त्या प्रत्येक वेळी मनुष्यप्राणी केवळ तुम्हाला आळवताना मला आढळला. माझा उल्लेख इतरांधील एक असाच तर झाला.
श्रीविष्णु : अरे तू या अनुभवामुळे बेचैन होऊन माझ्याकडे आलास त्यावेळी भूतलावर परत एकदा अत्याचार आणि अधर्माचे अराजक माजायला सुरवात झाली होती. मी पुढील अवतार धारणेचा विचारच करत होतो. त्यावेळची तुझी बेचैनी समजून घेऊन आणि तुझ्या इच्छेला मान देऊन मी सद्य कृष्ण अवतारामध्ये तुला माझ्या मोठ्या भावाचा मान दिलाच आहे ना....
शेषनाग : नारायणा, तुम्ही मला तुमचा मोठा भाऊ केलेत यात शंकाच नाही. परंतु....
श्रीविष्णु : शेषा, तुझे पण आणि परंतु राहू देत. आपण परत आपल्या अवतार कायेमध्ये जाणे आवश्यक आहे. चल पाहू....
असे म्हणत श्रीविष्णु पुन्हा एकदा कृष्ण भूमिकेमध्ये आले. त्यांच्या सोबत शेषनांगाने देखील जेष्ठ बंधू म्हणून काया प्रवेश केला. जीवन वाहात होते आणि विविध वळणे घेत महाभारतीय युद्ध समाप्ती नंतर एका निवांत क्षणी जेष्ठ बंधू बलराम आणि कृष्ण गप्पा मारत बसले होते.
बलराम : कृष्णा, खरे सांग. जरासंधाचा मृत्यू हा तुझाच कट होता ना?
श्रीकृष्ण : दादा, मी कट का बरे करेन. भीमाने जे योग्य होते ते केले.
बलराम : जरासंधाचे शरीर उभे चिरले तरी तो परत एकसंध होऊन उभा राहातो याविषयी भीमाला माहीत होते; असे तुला म्हणायचे आहे काय? कुस्ती होत असता भीमाच्या डावांचे कौतुक करण्याच्या कारणाने अचानक तू मोठमोठ्याने ओरडू लागलास आणि भीमाचे लक्ष तू तुझ्याकडे खेचून घेतलेस. त्याचवेळी नेमकी तुला एक शुष्क गवत पात मिळाली आणि भिमाचे लक्ष असताना अगदी सहज म्हणून ती गवत पात मध्यभागी तोडून तू विरुद्ध दिशांना दूर भिरकावून दिलीस; असे तर तुला म्हणायचे नाही धाकट्या?
श्रीकृष्ण (गालात हसत) : आपण अगदी योग्य समजून घेतले आहात दादा. तुमच्या इतके चांगले मला कोण समजून घेईल सांगा बरे.
बलराम : शब्दच्छल करू नकोस कृष्णा. तुझ्या कृतीचे निरीक्षण करणाऱ्या भीमाने पुढील डावामध्ये जरासंधाचे शरीर मधोमध फाडून विरुद्ध दिशांना फेकले आणि अपराजित जरासंध मृत्यू पावला. तुला कधीच जरासंधाला हरवणे शक्य नव्हते. किंबहुना द्वारका वसवणे हे जरासंधाला घाबरून मथुरेहून पळून जाण्याचे कारण होते. कृष्णा, मला काही तुझी ही कुटनिती पटत नाही. अरे तू किमान एकदा तरी माझ्याकडे येऊन माझी मदत मागायला हवी होतीस. जरासंधाला यमसदनाला पाठवण्यासाठी माझा एकच कुस्ती डाव पुरेसा ठरला असता.
श्रीकृष्ण : दादा, पण समोर काय घडते आहे हे दिसत असूनही आपण देखील तटस्थतेची भूमिका घेतलीतच न?
बलराम : उगाच माझ्यावर आरोप करू नकोस हं कृष्णा.
श्रीकृष्ण : बरं, मग माझ्या केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर द्या दादा. धर्म आणि अधर्म समोरासमोर उभे असताना आपण कोणासोबत राहण्याचा निर्णय घेतलात?
बलराम : कृष्णा, शब्दच्छल करण्यात आणि समोरच्या व्यक्तीला उमज पडणार नाही अशा शब्दात प्रश्न विचारण्यात तुझा हात कोणी धरणार नाही. परंतु हे विसरू नकोस की मी तुझा जेष्ठ बंधू आहे. त्यामुळे माझ्याशी बोलताना तुझ्या मनात हे असेल ते स्पष्टपणे सांग.
श्रीकृष्ण : दादा, कौरव-पांडवांच्या युद्धाच्या वेळी आपण ताटस्थतेची भूमिका घेतलीत आणि हिमालयाकडे प्रयाण केलेत. हे योग्य कसे ते मला समजावाल का?
बलराम : हे पहा धाकट्या, गुरूने आपल्या शिष्यांमध्ये कधीही दुजाभाव करू नये हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे तर तुला मान्य आहे ना? दुर्योधन आणि भीम हे दोघेही माझे शिष्य. ते दोघे आपापली सेना घेऊन जर एकमेकांसमोर युद्धासाठी उभे राहिले तर कोणा एकाची बाजू घेऊन युद्धात उतरणे एक गुरू म्हणून मला योग्य वाटले नाही.
श्रीकृष्ण : म्हणून मी समजावयास येईन याचा अंदाज येताच आपण हिमालयामध्ये निघून गेलात ना?
बलराम : तुला नाही कळायचे ते कृष्णा. त्यामुळे तुझ्यासाठी तू म्हणतो आहेस तेच सत्य मानून चल.
......... आणि त्यानंतर काही कालावधीमध्ये श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवले. श्रीकृष्ण प्रयाणापूर्वीच ज्येष्ठ बंधू बलराम यांनी समाधी घेतली होती.
.....श्रीविष्णु पुन्हा एकदा क्षीरसागरामध्ये आपल्या शेषशैयेवर पहुडले होते. शेषनाग पुन्हा एकदा काहीशा नाराज मनाने डोलत होता.
श्रीविष्णु : शेषा... मला तुझे काही कळत नाही. रामावताराच्या वेळी माझा धाकटा बंधू असल्याने तुला योग्य तो मान नाही मिळाला अशी तुझी तक्रार होती. ते समजून मी यावेळी तुला माझ्या मोठ्या बंधूचा मान दिला. तरीही तुझी नाराजी काही संपत नाही.
शेषनाग : प्रभो, उगा का मला टोचून बोलत आहात. मी आपली सेवा करून खुश आहे. माझ्या मनामध्ये कणभरही नाराजी नाही. परंतु वासुदेवा मला राहून राहून एकच प्रश्न सतावतो आहे... आजही भूतलावर श्रीकृष्ण अवताराची चर्चा आहे. मात्र कृष्णाच्या मोठ्या भावाची चर्चा देखील नाही. देवा, बलराम एक उत्तम योद्धा तर होताच. मात्र कोणीही कल्पना केली नसेल असे नांगर या शेत नांगरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आयुधाला त्याने शस्त्र बनवले. बलरामा इतका उत्तम कुस्ती योद्धा कोणी नव्हता. सर्व शक्तिमान दुर्योधन आणि अजस्त्र भीम यांचा तो गुरू होता. तो वसुदेव बाबांनंतर द्वारकेचा राजा होता. तो धर्मनिष्ठ होता... तो ज्येष्ठ होता... तो...
श्रीविष्णु : शेषा, तू कृष्णाचा ज्येष्ठ बंधू होतास तरीही भूतलावरील मनुष्य तुला आठवत नाहीत; याचे दुःख तुला आहे... हे मला समजले आहे. असे का? असा तुझ्या मनातील प्रश्न देखील मला समजला आहे... अरे, युगानुयुगे आणि गेले दोन अवतार तुझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर फारच सोपे आहे....
तुम्ही जेष्ठ आहात की कनिष्ठ... उत्तम योद्धा... नव कल्पनाविष्कारक... अतुलनीय गुरू आहात... याने काहीही सिद्ध होत नाही. शेवटी तुम्हाला जर जनमानसात तुमचे स्थान निर्माण करायचे असेल तर केवळ आणि केवळ कर्मयोग हा एकच मार्ग आहे.... याहून जास्त मला बोलणे नलगे आणि तुला ऐकणे...
असे म्हणून श्रीविष्णूंनी मंद स्मित करीत आपले नेत्र मिटून घेतले.
No comments:
Post a Comment