Friday, June 19, 2020

गूढ (रहस्य कथा)(भाग 5 शेवटचा)

गूढ (भाग 5) (शेवट)

चंद्रभानला म्हादुच्या बोलण्याचा अर्थ लागायला लागला होता आता. याचा अर्थ शहरी बाबू म्हणजे निशाचा भाऊ असावा. तो इथे यायला निघाला त्यावेळी निशा तशी लहान असावी. मात्र तो उमरगावाला जातो आहे, हे तिने लक्षात ठेवलं होतं. म्हणूनच मोठी झाल्यावर ती तिच्या भावाला शोधायला तिथे आली होती. याचा अर्थ मेरी निशाला घेऊन खरातांच्या वाड्याकडे गेली होती. जसं तिने बाबुला देखील तिथेच नेलं होतं. चंद्रभान विचार करत होता.

अचानक चंद्रभानला आठवलं. तो निघत असताना पुजारीबुवांनी त्याला सांगितलं होत की बाबूने किंवा निशाने जे केलं तेच तसंच तू करावंस असं नाही. तुझ्या इथे येण्याला एक वेगळं कारण आहे. ते समजून घे. निशाच्या मागे जाणं महत्वाचं आहे की तिला सोडवणं महत्वाचं याचा विचार कर आणि मगच तुझी कृती ठरव. पुजारीबुवा जे म्हणाले होते त्याचा चंद्रभान विचार करत होता आणि त्याला अचानक सुटकेचा मार्ग दिसला. चंद्रभानचा बदललेला चेहेरा बघून म्हादुने त्याच्याकडे  प्रश्नार्थक नजरेने बघितलं. चंद्रभान म्हादुकडे बघत म्हणाला,"दादा... याक्षणी मला तुम्ही देवळाकडे घेऊन चला." चंद्रभानच्या या बदललेल्या अवताराकडे बघून म्हादू गोंधळला. तो म्हणला,"आरं पोरा.. तिला तुजी गरज हाय. दोन येळा म्या पाठ फिरवली आणि आक्रीत घडलं रं. आता मातरं माज्यामुळं आजून काय इपरीत घडाय नकू. म्याच आता तुला खरातांच्या वाड्याकड न्येतू. म्हंजी मरताना माजा जीव आडकनार न्हाई. त्या बाबुला मी पाठ दावली.. त्या पोरीला सुदिक पाठ दावली. आन मेरीन तिचा डाव साधला. माजं मन मला खातया. आता तरी प्रायश्चित्त घिऊ दये.. चल, म्या हाय तुज्या संगट. असा न्हाई सोडणार तुला मंदी."

म्हादूचं बोलणं ऐकून चंद्रभान म्हणला,"दादा... तुम्हाला जसं प्रायश्चित्त घ्यायचं आहे तस मला देखील घ्यायचं आहे. माझ्या नकळत मी एक आयुष्य अडकवलं आहे त्या वाड्यात... आणि कदाचित् निशाला सुध्दा...... म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो आहे की मला देवळाकडे घेऊन चला. मला या कोड्याची उकल कळली आहे. चला... आता मात्र घाई केली पाहिजे आपण." चंद्र्भानच्या बोलण्याचा चांगलाच परिणाम म्हादुवर झाला. तो चंद्रभानला घेऊन देवळाच्या दिशेने निघाला. चंद्रभान देवळाजवळ पोहोचला. पण देवळात जाण्याऐवजी तो त्याच्या गाडीच्या दिशेने धावला. त्याने गाडी उघडली आणि त्याची बॅग बाहेर काढली. त्याने निघता निघता ते मासिक बॅगमध्ये घातलं होतं. ते बाहेर काढलं आणि तो देवळात गेला. देवळाच्या वरच्या पायरीपाशी आतल्या कंदिलाचा उजेड पोहोचत होता. तो कंदील त्याने घाईघाईने पुढ्यात घेतला आणि खिशातून पेन काढून त्याने लिहायला सुरवात केली. त्याने जिथे कथा संपवली होती त्याच्या पुढे निशाने काहीतरी लिहून ठेवलं होतं. त्यला जोडूनच चंद्रभान लिहायला लागला.

.................आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूचं नक्की काय झालं हे तिला माहित करून घ्यायचं होतं. एकटीच.... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!! ती बाबुला शोधायला आली खरी पण तिची अवस्था देखील बाबू सारखीच झाली होती. म्हादुने तिच्याकडे देखील पाठ फिरवली आणि ती देखील काळा झगा घातलेल्या त्या स्त्रीच्या मागून खरातांच्या वाड्याच्या दिशेने निघाली. मात्र तिच्या मनात असलेली खात्री खरी ठरली. तो तिला शोधत तिथे आला. तिला कशी मदत करावी त्याला सुचत नव्हतं. शेवटी तो म्हादूला जाऊन भेटला.... म्हादू कडून त्याला कळलं की काळा झगा घातलेल्या त्या स्त्रीने तिला देखील खरातांच्या  वाड्याकडे नेलं आहे. याचा अर्थ ती जरी बाबुला भेटली असली तरी आता ती देखील बाबू बरोबर त्या वाड्यात अडकली असावी. पण ती खूप धीराची होती. तिने मनापासून त्याला हाक मारली आणि त्याने ती ऐकली होती.

इतकं लिहून चंद्रभान क्षणभर थांबला. यापुढे तो जे लिहिणार होता ते त्याला प्रत्यक्ष दिसणार होत याची त्याला मनातून जाणीव झाली होती. त्यामुळे यापुढचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य त्याने शांत मनाने लिहीलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं. त्याने पेन सरसावलं आणि तो लिहायला लागला....................  तो आला आहे याची तिच्या मनाने तिला ग्वाही दिली आणि तिला मार्ग मिळाला. खरातांचा वाडा मोठा होता... त्यांचा दरवाजा देखील तसाच जड आणि उघडायला अवघड होता... पण त्यांच्या वाड्याच्या त्या मोठ्या पुरुषभर उंचीच्या खिडक्यांपैकी एक खिडकी तिला उघडी मिळाली. अनेक वर्ष आत अडकलेल्या बाबूचा हात धरून कोणताही दुसरा विचर न करता तिने त्या खिडकीतून बाहेर उडी मारली. आता तिला वाड्याचं फाटक दिसत होतं. तिने जीव घेऊन पळायला सुरवात केली. तिने तिच्या हातात बाबूचा हात घट्ट धरला होता. त्यामुळे तिच्या बरोबर तो देखील विचार न करता धावत होता. ती फाटकाजवळ आली आणि मोडकळीस आलेलं फाटक एका हाताने दूर सारून ती तशीच बाबुला घेऊन पाळत सुटली. झाडा झुडपातून धावत ती देवळाकडे निघाली.....

चंद्रभान लिहित होता... एका क्षणाचाही वेळ न दवडता तो लिहित होता... आणि अचानक म्हादू ओरडलेला त्यला  ऐकू आलं. लिहिता लिहिता थांबून चंद्रभानने मागे वळून बघितलं. मागे देवळाच्या शेवटच्या पायरीजवळ त्याला निशा जमिनीवर कोसळताना दिसली. तिच्या शेजारीच एक बराच म्हातारासा माणूस शून्य नजरेने जमिनीकडे बघत बसला होता. त्याला चांगलीच धाप लागली होती. चंद्रभान निशाच्या जवळ जाण्यासाठी उठला. पण तिने त्याला हातानेच थांबवलं. दुसरा हात मागे झाडीच्या दिशेने करत अंगात असलेली नसलेली सगळी शक्ती एकवटून ती म्हणाली... मेरी!!!!! आणि तिची शुद्ध हरपली.

निशाला काय म्हणायचं आहे हे ओळखून चंद्रभान परत त्याच्या लिखाणाकडे वळला. त्याने परत पेन हातात घेतलं आणि लिहायला सुरवात केली.........

......... काळ्या झाग्यातली ती स्त्री.....

त्याचवेळी त्याला मागून म्हादुचा आवाज आला,"पोरा.... तू जे लिवलं न्हाई हायेस त्ये पण हित झालया. तवा मेरीचं काय झालं यापरीस म्हादूचं काय झाल त्ये लिव. म्हंजी समद ठीक हुईल." म्हादूचा आवाज एकून चंद्रभान परत एकदा मागे वळणार होता. पण त्याला म्हादुने थांबवले... " नग... आता नग मागं बघूस.. लिव काय लिवायचं त्ये. आता माज्या जगन्यात काई राम न्हाई. माजी कालजी नग करूस."

चंद्रभानच्या कानावर म्हादूचे शब्द पडले आणि तो परत त्याच्या लिखाणाकडे वळला.....

गाव जरी म्हादुला वेडा समजत होतं तरी म्हादू मात्र सगळं ओळखून होता. सुन्या निघून गेल्या नंतर मेरीची झालेली तडफड त्याने बघितली होती. तिच वेडपीसं होणं आणि गावातल्या तरुणांनी तिच्या एकटं असण्याचा गैरफायदा घेणं त्याने जवळून बघितलं होतं. त्याचा जीव तुटत होता मेरीसाठी. पण त्याला माहित होतं की तो खूपच दुबळा होता. कदाचित म्हणूनच तो बाबू किंवा निशाला मदत करायला धजावला नव्हता. पण आता मात्र त्याच्या मनाने त्याला कौल दिला होता. मेरीने कारण नसताना बाबू आणि निशाला तिच्या सूडाचा निशाण केलं होतं. आता सुद्धा देवळाकडे धावलेल्या निशा आणि बाबूच्या मागून ती त्यांना शोधात आली होती. तिला बघताच मात्र म्हादू मेरी आणि देऊळ यांच्या मध्ये उभा राहिला. त्याने समोरून येणाऱ्या मेरीला विचारलं,"मला खरातांच्या वाड्याकडं जायाचं हाय. तुम्ही रस्ता दावाल का?" काळ्या झाग्यातली मेरी किनऱ्या आवाजात हसली आणि म्हणाली, "चिंता करू नका. या माझ्या मागून." आणि म्हादू येतो आहे की नाही हे न बघता वळून शांतपणे वाड्याच्या दिशेने चालू लागली..........

चंद्रभान लिहिता लिहिता थांबला आणि त्याने मागे वळून बघितलं. त्याला लांब झाडीच्या दिशेने चालत जाणारा म्हादू दिसला. त्याला हाक मारावी अस चंद्रभानला वाटलं. हे ओळखून की काय पण जाता जाता मागे वळूनही न बघता म्हादुने मात्र चंद्रभानच्या दिशेने हात हलवला आणि तो झाडीमध्ये हरवून गेला. चंद्रभानची नजर निशाच्या दिशेने वळली. तिला मदत करण्यासाठी तिच्या दिशेने तो वळला.... मात्र त्या अगोर कथेच्या शेवटी 'समाप्त' लिहायला तो विसरला नाही.


समाप्त

10 comments:

  1. आवडली शेवट चांगला केलास.

    ReplyDelete
  2. खूप छान गूढ कथा रहस्य च शेवट उत्सुकता संपली

    ReplyDelete
    Replies
    1. शेवटपर्यंत रहस्य ठेऊ शकले आणि तुम्हाला ते आवडलं हेच महत्वाचं

      Delete
  3. Replies
    1. अभय, तू म्हणतो आहेस म्हणजे नक्कीच ही कथा मला जमली आहे

      Thank u

      Delete
  4. Superb..... मस्तच केलायस शेवट.... आणि मुख्य म्हणजे शेवट पर्यंत सस्पेन्स टिकून होता 😊👌👍

    ReplyDelete
  5. Thank u so much

    आदर्श रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांच्या इतकं सुंदर लिहिता येईल असं नाही वाटत. पण प्रयत्न कायम करेन

    ReplyDelete