Friday, April 17, 2020

धात्री (भाग 2) (शेवटचा)

धात्री (भाग 2) (शेवटचा)

राजकुमारीच्या उत्साहाने भरलेल्या आवाजामुळे मी काही क्षण स्थब्ध झाले. परंतु ऋषी दुर्वास कसे आहेत याची राजकुमारीला कल्पना नसावी असा माझा कयास होता. त्यामुळे मी तिच्या उत्साहाला धक्का लागणार नाही अशा प्रकारे तिला सांगण्याचा प्रयत्न केला."राजकुमारी, ऋषी दुर्वास अत्यंत तापट म्हणून प्रसिद्ध आहेत; याची तुला कल्पना आहे का?" त्यावर हसत कुंती म्हणाली;"धात्री, दाई, मला ते कसे आहेत याची पूर्ण कल्पना आहे. तू कदाचित त्यांच्याबद्दल आज ऐकलं असशील. पण मी पिताजींकडून; महाराज कुंतीभोजांकडून त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं आहे. ते तापट जरूर आहेत; पण त्यांच्या रागाला कारण असते. केवळ राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी शाप दिला; असं नाही आहे बरं!" राजकुमारीच्या या बोलण्यावर मी काय बोलणार होते? कितीही म्हंटले तरी शेवटी मी एक दाई होते; याचे मला पूर्ण भान होते. बोलता बोलता राजकुमारी थांबली आणि तिची नजर माझ्याकडे वळली. कदाचित माझा चेहेरा तिला काहीतरी सांगत असावा. कारण मंचावरून उठून ती माझ्याजवळ चालत आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,"अर्थात, मला तुझी काळजी कळते आहे धात्री. पण तू खरंच चिंता करू नकोस. त्यांना राग येईल असं मी काहीही वागणार नाही." कुंतीचं बोलणं ऐकून देखील माझ्या मनाचे समाधान होत नव्हते.  मात्र तिने तिचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता यावर जास्त काही बोलणे योग्य नाही; हे माझ्या ध्यानात आले होते. मी मनातच निश्चय केला की काहीही झाले तरी राजकुमारी कुंतीची पाठ क्षणभरासाठी देखील सोडायची नाही. माझ्या या निश्चयामुळे असेल; पण मनात काहीसं हायसं वाटलं.

दुसऱ्या दिवशी पहाटेच्या प्रथम प्रहरी राजकुमारी कुंती स्नान उरकून तिच्या महालाच्या द्वारात उभी होती. तिला बघून मी देखील आश्चर्यचकित झाले. अत्यंत साधी अशी शुभ्र वस्त्र तिने परिधान केली होती आणि अगदीच मोजके मोत्यांचे दागिने अंगावर घातले होते. कोणत्याही दासीच्या मदतीशिवाय तिला तयार झालेले पाहून माझ्याप्रमाणेच इतर दासींना देखील आश्चर्य वाटले. ती रागावलेली आहे की काय असा विचार करून नीला तिची खास दासी पुढे झाली आणि म्हणाली."राजकुमारी आपण मला हाक का नाही मारलीत? मी इथेच तर महालाच्या द्वाराबाहेर बसले होते. तुम्ही उठलात ते कळलेच नाही. नाहीतर तशीच आत येऊन तुम्हाला तयारीला मदत केली असती."

त्यावर तिच्या खांद्यावर थोपटल्या सारखे करून राजकुमारी कुंती हसली आणि म्हणाली;"अग, अशी काही खास तयारी करायचीच नव्हती; म्हणून नाही हाक मारली तुला. बरं, आता लक्षात ठेव; जोपर्यंत ऋषी दुर्वास आहेत तोपर्यंत मला तयारीला मदतीची गरज नाही आहे. तेव्हा तू उगाच माझ्या महालाबाहेर जागरणं करत बसू नकोस." राजकुमारीच्या या बोलण्यापुढे नीला काहीच बोलली नाही. होकारार्थी मान हलवून ती मागे झाली. माझ्याकडे एकवार हसरा कटाक्ष टाकून राजकुमारी ऋषींच्या कुटीच्या दिशेने निघाली. मी देखील तिच्या सोबत काही अंतर राखून निघाले. मी तिला सोबत करते आहे हे लक्षात आल्यावर राजकुमारी मागे वळली आणि माझ्याकडे पाहात म्हणाली;"धात्री, तू देखील पहाटेच्या या पहिल्या प्रहरी उठायची गरज नाही बर का! ऋषी दुर्वास असे पर्यंत मी एकटीच जाणार आहे त्यांच्या कुटीमध्ये. तिथून परत कधी येईन ते माझे मलाच माहीत नाही. त्यामुळे तू उगाच कष्ट कशाला घेतेस? काहीसा आराम कर; आणि सकाळी येत जा तिथे." राजकुमारीच्या त्या बोलण्यावर हसून मी उत्तर दिले;"राजकुमारी, मी इथे कुंती नगरीमध्ये तुमची दाई म्हणून आले आहे. मी तुमची आई नाही याची मला कल्पना आहे; तरीही मी माझी दाईची कर्तव्य विसरलेले नाही. जिथे तुम्ही... तिथे ही धात्री. आता चलावं राजकुमारी. नाहीतर पहिल्याच दिवशी उशीर झाला एवढे कारण देखील ऋषी दुर्वासांना पुरेसे होईल कोप पावायला." माझ्या नजरेतील निर्धार लक्षात आल्याने माझ्याकडे हसून पाहात राजकुमारी कुंती ऋषी दुर्वासांच्या कुटीच्या दिशेने चालू पडली.

राजकुमारी कुटीमध्ये शिरण्यासाठी वाकली आणि मी देखील तिच्या मागे जाईन याची कल्पना असल्याने तिने मागे न बघताच मला बाहेर थांबण्याची खूण केली. मी देखील काहीएक न बोलता कुटीच्या द्वारापाशीच थांबले. राजकुमारी आत गेली आणि काही क्षणातच बाहेर आली. तिची मुद्रा अजूनही हसरीच होती. तिने ओठांवर बोट ठेवत मला न बोलण्याची खूण केली आणि मला घेऊन ती पुष्पवटीकेच्या दिशेने निघाली. काही अंतर गेल्यानंतर राजकुमारी मला म्हणाली;"धात्री, तू बाहेर आहेस याची ऋषींना कल्पना आलेली आहे असे दिसते. त्यांनी मला पुष्प गोळा करून आणण्यास सांगितले आणि म्हणाले; 'मी असेपर्यंत मी सांगितलेली कामे फक्त तूच करशील अशी माझी अपेक्षा आहे; राजकुमारी.' मला वाटतं मला कोणत्याही कामात कोणीही मदत करू नये असंच त्यांना सुचवायचं आहे." राजकुमारीचं म्हणणं ऐकून मी स्तब्ध झाले. ऋषी दुर्वास हे त्यांच्या तामस स्वभावासाठी जसे ओळखले जायचे तसेच ते आंतरज्ञानी होते हे देखील मला माहीत होते. त्यामुळे राजकुमारी बरोबर सतत राहायचे एवढेच मी त्याक्षणी ठरवले.

रोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी तयार होऊन ऋषींच्या कुटिकडे जाणे हा राजकुमारीचा दिनक्रमच झाला. ते सांगतील ती सर्व कामे; मग ती कितीही अवघड किंवा कष्टप्रद असली तरी; राजकुमारी विना तक्रार एकटीनेच पूर्ण करत असे. ऋषी जवळ जवळ एक मासापेक्षा देखील जास्त दिवस सतत हवन करत होते. त्यांनी कधी उच्चरवाने तर कधी मंद्र आवाजात उच्चारलेले मंत्र मला कुटीबाहेर ऐकू येत असत. ते कधीही कोणत्याही गोष्टीची मागणी करतील किंवा कोणतीही आज्ञा करतील म्हणून राजकुमारी कुंती त्यांची आज्ञा होईपर्यंत त्यांच्याच कुटीमध्ये थांबत असे. मात्र एक दिवस असा उगवला की संध्यासमयी ऋषींच्या कुटीतून बाहेर येऊन राजकुमारीने मला सांगितले की ऋषींचा यज्ञ पूर्ण झाला आहे; आणि तिने केलेल्या अविरत सेवेवर ऋषी दुर्वास अत्यंत खुश झाले आहेत. हे ऐकून मी त्या विधात्याला मनोमन हात जोडले. आता ऋषींची मनीषा पूर्ण झाली असल्याने दुसऱ्यादिवशी राजकुमारीला लवकर उठण्याचे काहीच प्रयोजन नाही असे माझ्या मनात आले. तिला तिच्या अंत:पुरात सोडताना 'आता काही दिवस पूर्ण आराम कर राजकुमारी'; असे सांगून मी बाहेर पडले. बाहेर नीला माझीच वाट बघत बसली होती. "कशा आहेत आता राजकुमारी? उद्या देखील लवकर जायचे आहे का त्यांना?" मला पाहाताच तिने मला तिचा नेहेमीचा प्रश्न विचारला. राजकुमारी रोज आपणहून तयार होत असली तरी नीला रोज पहाटेच्या प्रथम प्रहरी तिच्या अंत:पुराबाहेर हजर असे; हे मला माहीत होते. त्यामुळे तिच्याकडे हसत बघत मी म्हणाले;"राजकुमारी बरी आहे. फारच दमली आहे. ऋषी दुर्वासांचा मानस पूर्ण झाला आहे. त्यामुळे उद्या पहाटे राजकुमारीला जावे लागणार नाही. तू देखील आज आराम कर. उद्या कोणतीच घाई नाही." माझे बोलणे ऐकून नीलाने हलकेच निश्वास सोडलेला मला जाणवला.

दुसऱ्या दिवशी काहीशी उशिराच मी राजकुमारी कुंतीच्या महालाकडे निघाले. बघते तर नीला तेथे अगोदरच उपस्थित होती. तिला पाहून मला फारच आश्चर्य वाटले. "अग, तू आज सकाळीच हजर कशी?" तिच्या जवळ जात मी विचारले. त्यासरशी आपल्या उरावर हात ठेऊन मोठे डोळे करत ती म्हणाली;"दाई धात्री, राजकुमारींना ऋषी दुर्वासांकडून बोलावणे आले भल्या पहाटे. त्यामुळे नेहेमीप्रमाणे उठून राजकुमारी ऋषींच्या कुटिकडे गेल्या आहेत." हे ऐकताच माझ्या काळजात धडकी भरली. मी लगोलग ऋषी दुर्वासांच्या कुटीच्या दिशेने निघाले. मी तिथे पोहोचले आणि समोरून राजकुमारी कुंती येताना दिसली. तिच्या जवळ जात मी तिचा चेहेरा न्याहाळला. मी तिच्या बाजूला आल्याचे तिच्या लक्षात देखील आले नव्हते. आपल्याच विचारात चालत ती तिच्या महालाकडे निघाली होती. मी तिच्या खांद्याला स्पर्श करून तिला थांबवले. तशी तिने माझ्याकडे वळून बघितले. मला पाहाताच मोकळेपणी हसत ती म्हणाली;"माई, काही मंत्र मनात कायमचे घर करून बसतात नाही?" राजकुमारी अत्यंत भावुक झाली की मला 'माई' म्हणून हाक मारत असे. त्यामुळे तिच्या हसऱ्या डोळ्यांमध्ये बघत मी म्हणाले;"हो पोरी. पण हे असे अचानक का बरे तुझ्या मनात आले?"

त्यावर अनेक दिवसांनंतर आपल्या वयाप्रमाणे खळखळून हसत ती म्हणाली;"असंच ग. आज ऋषी दुर्वासांनी मला आशीर्वाद देण्यासाठी बोलावले होते. माझ्या डोक्यावर हात ठेऊन काही मिनिटं ते डोळे मिटून बसून होते. त्यांनी त्यांचा हात बाजूला केला आणि तेव्हापासून माझ्या मनात एक मंत्र रुंजी घालतो आहे. ते तातांना न भेटताच तसेच निघून गेले. निघताना मला एवढेच म्हणाले की 'मी दिलेला हा मंत्र योग्य वेळी आणि नीट विचार करून वापर. या मंत्राच्या केवळ उच्चाराने तू विश्वातील कोणत्याही शक्तीला तुझ्या कह्यात करू शकशील.' मला त्याविषयी अजून जाणून घ्यायचे होते. काही प्रश्न विचारायचे होते. मात्र ऋषी तडक निघून गेले ग." हे सर्व सांगताना राजकुमारी खूपच मोकळी आणि आनंदी दिसत होती. तिच्या मनावर कोणतेही दडपण नव्हते हे मला जाणवले.

ऋषी दुर्वास गेले आणि ते असताना कोणताही अनर्थ झाला नाही याचा मला खूपच आनंद झाला होता. त्यात हसऱ्या आणि खुशीत असलेल्या राजकुमारीला बघून तर माझ्या मनातील सगळ्या चिंता दूर झाल्या. तिला जवळ घेऊन तिचा चेहेरा कुरवाळत मी म्हणाले;"राजकुमारी, तू एका आदर्श कन्येप्रमाणे तुझ्या पित्याची इभ्रत राखली आहेस. यासाठी तू खूपच मेहेनत घेतली आहेस. रोज पहाटेच्या पहिल्या प्रहरी उठावे आणि दिवसभर ऋषींच्या आज्ञेची वाट पाहात त्यांच्या कुटीत बसावे यामुळे तू पूर्णपणे कोमेजून गेली आहेस. त्यामुळे आता काही दिवस पूर्ण विश्राती घेणे तुला गरजेचे आहे." माझे बोलणे ऐकून राजकुमारी देखील खुदकन हसली आणि म्हणाली;"खरं आहे. मी विचार करते आहे की पिताजींनी माझ्यासाठी गंगेकिनारी जो महाल बांधून दिला आहे तेथेच काही दिवस जाऊन राहावे. तुला काय वाटते धात्री? महाराज मला परवानगी देतील का?" त्यावर हसत मी म्हणाले;"अग, तू त्यांची एकुलती आणि लाडकी लेक. त्यात तू ऋषी दुर्वासांना संतुष्ट केले आहेस. महाराज आनंदाने तुला तेथे राहण्याची परवानगी नक्की देतील." हे ऐकून राजकुमारी खुशीत हसली आणि तिच्या महालाच्या दिशेने निघाली.

महाराज कुंतीभोजांनी राजकुमारी कुंतीला तिच्या गंगेकिनारच्या महालात जाऊन राहण्याची परवानगी लगेच दिली. मोठ्या आनंदाने राजकुमारीने काही दासींना आणि मला घेऊन महालाच्या दिशेने कूच केले. आम्ही गंगेकिनारी पोहोचलो आणि सर्व दास-दासींना कामे नेमून देणे, बल्लवाचार्यरांना स्वयंपाकाविषयी सूचना देणे, राजकुमारीचे अंत:पूर तिला आवडणाऱ्या रंगांच्या पडद्यांनी आणि आकर्षक पुष्परचनांनी सुशोभित करणे यात माझा सगळा दिवस गेला. तो संपूर्ण दिवस राजकुमारी मात्र काही मोजक्या दासींना घेऊन गंगेच्या पाण्यामध्ये पोहत-डुंबत होती. आदित्य नारायणाच्या कलतीच्या किरणांच्या उजेडात मी गंगेकिनारी राजकुमारीजवळ पोहोचले. त्यावेळी सर्व दासी किनाऱ्यावर बसून राजकुमारीची वाट बघत होत्या. राजकुमारी मात्र एकटीच गंगेच्या पाण्यामध्ये आदित्य नारायणाकडे तोंड करून उभी होती. मी पाण्यात शिरून तिच्या जवळ जाऊन उभी राहिले. माझी चाहूल लागताच माझ्याकडे वळून बघत राजकुमारी काहीशा गूढ आवाजात म्हणाली;"धात्री, हा अंतर्धान पावणारा अग्निगोल किती सुंदर, किती देखणा वाटतो नाही का?" त्यावर एकदा त्या पश्चिमेकडे कललेल्या आदित्याकडे पाहून मी हसून हो म्हणाले आणि राजकुमारीला आग्रह पूर्वक नदीतून बाहेर यायला लावून महालाच्या दिशेने प्रयाण करवले.

राजकुमारी रोज गंगेच्या किनारी दिवसभर जाऊन बसत असे. कधी त्या खळाळत्या पाण्यात पोहावे, कधी अंगावर सूर्यकिरणे घेत प्रासादाच्या पायऱ्यांवर पडून रहावे... असा तिचा दिवस जात होता. चौथ्या दिवशी मी राजकुमारीच्या महालाच्या दिशेने निघाले होते त्यावेळी कुंती नगरीमधून कोणी निरोप्या महाराजांचा निरोप घेऊन आल्याची वर्दी नीलाने मला दिली. माहाराजांनी दिलेले निरोपाचे भूजपत्र निरोप्याने माझ्या हातात दिले. ते घेऊन मी राजकुमारीच्या माहालात पोहोचले. राजकुमरीने ते भूजपत्र वाचले आणि म्हणाली;"धात्री, महाराजांना माझी आठवण येत आहे. त्यामुळे त्यांनी परत बोलावले आहे. परंतु मला अजून काही दिवस इथे राहावेसे वाटते आहे. त्यामुळे तू स्वतः जा नगरीमध्ये आणि महाराजांना अजून काही दिवस इथे राहण्याची परवानगी घे. तूच स्वतः गेलीस म्हणजे ते नक्की परवानगी देतील."

आजवर एकही दिवस राजकुमरी कुंती मला सोडून राहिली नव्हती. जरी आज आत्ता या क्षणी मी नगराकडे जायला निघाले असते तरी देखील महाराजांना भेटून आणि राजकुमारीचा मानस सांगून परवानगी मिळवायला मला एक दिवस लागला असता. तरीही तिने मलाच जायला सांगितले हे पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. मात्र आता राजकुमारी वयात आली होती... तिला कधीतरी तिच्या वयाच्या या दासींमध्ये राहावेसे वाटत असावे असे वाटून मी तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आणि कुंती नगराच्या दिशेने लगेच निघाले.

महाराज कुंतीभोजांना भेटून मी राजकुमारी कुंतीच्या मनीची इच्छा त्यांना सांगताच त्यांनी लगेच परवानगी दिली. त्यांची अनुमती घेऊन मी तशीच तडक राजकुमारी कुंतीकडे गंगा किनारीच्या माहाली पोहोचले. मी राजकुमारीला भेटायला गेले त्यावेळी संध्या समय झाला होता. आदित्य नारायण कधीच क्षितिजाआड गेले होते. त्यामुळे राजकुमारीचा महाल दिपांनी उजळून गेला होता. राजकुमरी एकटीच तिच्या मंचावर पहुडली होती. मी तिच्या जवळ पोहोचले आणि म्हणाले;"राजकुमारी, महाराजांनी तुला इथे जितके दिवस हवे तितके दिवस राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे..........." माझे पुढील शब्द माझ्या घशातच अडकले. मंचावर पहुडलेल्या राजकुमारीकडे पाहाताच काहीतरी वेगळे घडून गेल्याची जाणीव मला झाली. मी राजकुमारी कुंतीच्या मंचकाच्या एका बाजूला बसून राजकुमारीच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला आणि तिला मऊ आवाजात विचारले;"काय झाले आहे राजकुमारी?" माझे मऊ शब्द कानी पडताच राजकुमारीचा बांध फुटला आणि माझ्या मांडीमध्ये डोके खुपसून ती हमसून हमसून रडू लागली. तिला थोपटत मी तशीच तिथे बसून राहिले. मन शांत झाल्यावर राजकुमारी मंचावर उठून बसली आणि बोलू लागली....

"माई, आज मी तुला जे सांगणार आहे ते आयुष्यात केवळ तुझ्यापुरतेच मर्यादित राहील याची मला पूर्ण खात्री आहे... माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे... आणि तरीही मी तुझ्याकडे एक वचन मागते आहे....." राजकुमरीचे शब्द माझे काळीज चिरत गेले. तिला पुढे काहीही बोलू न देता मी म्हणाले;"कुंती.... मी ज्याक्षणी तुझ्या सोबत कुंती नगराकडे मार्गस्थ झाले त्याक्षणी माझे आयुष्य तुझे झाले. आता मला आठवत देखील नाही माझा असा काही भूतकाळ होता.. माझे भविष्य संपूर्णपणे तुझ्याच आयुष्यात गुंतले आहे. त्यामुळे तू निश्चिन्त राहा. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचून विरून जाणार आहे." माझे बोलणे ऐकून राजकुमारीचे डोळे परत एकदा भरून आले. तिने बोलायला सुरवात केली....

"माई, तुला आठवते ऋषी दुर्वासांनी जाताना मला आशीर्वाद दिला होता आणि त्या दिवसापासून माझ्या मनात एक मंत्र रुंजी घालतो आहे; असे मी म्हणाले होते? ऋषी दुर्वासांनी मला तो मंत्र आशीर्वाद म्हणून दिला होता आणि म्हणाले होते की या मंत्राच्या केवळ उच्चाराने मी विश्वातील कोणत्याही शक्तीला माझ्या कह्यात करू शकेन. माई, त्यांचे ते शब्द सतत माझा पाठलाग करत होते. आपण इथे आल्यापासून एकीकडे तो मंत्र माझ्या मनात रुंजी घालत होता... ऋषी दुर्वासांचे ते शब्द... आणि आल्यापासून मला भुरळ घातलेला तो तेजोमय शक्तीचा आदित्य नारायण! तू गेल्यानंतर संपूर्ण वेळ मी गंगेकिनारीच होते. सांजसमयी मावळतीची किरणे माझ्या कायेला स्पर्श करून सुखावत होती. तू रोजच्या प्रमाणे मला माहालात घेऊन जाण्यासाठी येणार नाही आहेस हे मला माहीत होते. त्यामुळे मी सोबतच्या दासींना महालाकडे पाठवून त्या मावळतीच्या तेजगोलाकडे पाहात तशीच बसून राहिले...... आणि........ आणि माझ्याही नकळत मी ऋषी दुर्वासांनी दिलेला तो मंत्र उच्चारला. त्याक्षणी माझ्यामनी तो केशर रंगाचा, मोहक, तेजोमय शक्तीचा गोल केवळ होता. अचानक आजूबाजूचे वातावरण तापायला लागले. मला कळेना नक्की काय होते आहे... माई, मी खूप घाबरले. तुला मी मनाच्या गाभ्यातून हाक मारली ग! पण माझी हाक माझ्या मनातून देखील बाहेर पडली नाही. कारण माझ्या भोवती त्या अग्निगोलाची मोहक आणि हवीहवीशी मिठी पडली होती. माई, तो आदित्य नारायण.... तो विश्वाला व्यापुनही उरलेला, सौंदर्याचा धनी मला मिठीत घेऊन उभा होता. आणि माझी भीती गळून पडली. माई, मी त्याच्या त्या तेजोमय शक्तीसौंदर्यात विरघळून गेले.... त्याची झाले!!! किती घटका गेल्या मला माहीत नाही. परंतु मी भानावर आले त्यावेळी मी इथेच याच मंचकावर होते. दासी माझ्या सांजसमयीचे दीपक प्रज्वलित करत होत्या... आणि तू आलीस."

राजकुमारी कुंतीचे बोलणे ऐकून मी धास्तावून गेले. राजकुमारीच्या त्या तेज:पुंज चेहेऱ्यावरील क्लांत आणि तरीही परमोच्य सुखाने नाहून निघालेले भाव मी समजून चुकले होते. मात्र जे घडून गेले होते त्याची राजकुमारीला कल्पना आहे की नाही हे मला समजत नव्हते. त्यामुळे तिला जवळ घेत हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी म्हणाले;"कुंती, पुत्री, काय घडून गेले आहे याची तुला कल्पना आहे का?" त्यावर कालवर खळखळत्या झऱ्याप्रमाणे हसणारी-बोलणारी माझी कुंती एकदम गंभीर होऊन म्हणाली;"धात्री, कालच्या एका रात्रीमध्ये मी मोठी झाले आहे. मी चुकले आहे याची मला कल्पना आहे. केवळ एका मोहाच्या क्षणी आणि लहान वयात मिळालेल्या मंत्ररूपी आशीर्वादाचे महत्व न कळल्यामुळे मी अग्नीलाच माझ्या ओटीमध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे काय घडून गेले आहे ते मला कळते आहे... मात्र आता माझ्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हा मोठा प्रश्न आहे."

राजकुमारीचे बोलणे ऐकून मी स्थब्द झाले. राजकुमारी कुंतीचे भविष्य हे केवळ तिचे नव्हते; तर त्यासोबत महाराज शूरसेन यांनी दिलेल्या संस्कारांचे आंदण, महाराज कुंतीभोज यांच्या आशांचे कुंभ आणि पुढे जाऊन राजकुमारीच्या आयुष्यात पती म्हणून येणाऱ्या कोणा महाप्रतापी राजाचे देखील होते. मी राजकुमारीला शांत केले आणि म्हणाले;"राजकुमारी कुंती, आता तुम्ही मोठ्या झाला आहात. त्यामुळे मी काय बोलते आहे ते नीट समजून घ्या. तुम्ही म्हणालात ते सत्य आहे. तुमच्या ओटीमध्ये त्या तेजोमय शक्तीच्या आनंदसूर्याने त्याचा अंश घातला आहे. हे तुमच्या इच्छेने घडले नसले तरी तुमच्या मंत्रोच्चारांमुळे घडले आहे. जे घडून गेले आहे ते बदलणे आता शक्य नाही; मात्र आता यापुढे आपण जो निर्णय घेऊ तो तुमच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरणार आहे."

माझे बोलणे मध्येच थांबवित राजकुमारी कुंती म्हणाल्या;"धात्री, मला मान्य आहे की तो मंत्र मी उच्चारल्यामुळे हे घडले आहे. मी माझ्या भविष्याची जवाबदारी नाकारत नाही. म्हणूनच मी याक्षणी या माहालातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोबत मला फक्त तू हवी आहेस. बाकी मला काही नको. यापुढील आयुष्य मी दूर कोणा अनोळखी नगरीत माझ्या या बाळासोबत एकटीने घालवण्यास तयार आहे."

राजकुमारीचे बोलणे ऐकून मी खिन्नपणे हसले. माझे हसणे पाहून राजकुमारी गोंधळली. "दाई, मी काही चुकीचे बोलले का? या अंकुराची जवाबदारी माझीच आहे न?" तिने माझ्या डोळ्यात पाहात विचारले. तिच्या डोळ्याला डोळा देत मी उत्तर दिले;"नाही राजकुमारी... तुमच्या ओटीमध्ये वाढणाऱ्या अंकुराची जवाबदारी तुमची नाही. तो अंकुर तुमच्या ओटीमध्ये घालणाऱ्या त्या आदित्य नारायणाची आहे ती जवाबदारी. तुमचं अल्लड वय आणि ऋषींनी दिलेल्या मंत्राचे अप्रूप यामुळे तुम्ही त्या तेजशक्तीला बोलावलेत. मात्र तुम्हाला जवळ करणारा तो तर पूर्ण विचारी होता. त्याला देखील तुमचा मोह पडलाच ना. मग या मोहाची जवाबदारी त्याची आहे. राजकुमारी, एक लक्षात घ्या की तुमची पहिली जवाबदारी तुम्ही ज्या कुळात जन्मला आहात आणि आता ज्या कुळाचे नाव लावता आहात... त्या दोन्ही कुळांच्या सन्मानाची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कुळाच्या विस्तारासाठी विवाह कराल त्यांच्या सन्मानाची ठरते... आणि मग सरते शेवटी जर तुमचे आयुष्य तुमच्यासाठी म्हणून शिल्लक उरलेच तर तुमच्या या क्षणिक उत्सुकतेपाई केलेल्या मोहाच्या जवाबदरी तुम्ही घेऊ शकता. आता उठा... आपण आत्ताच कुंती नगराकडे प्रस्थान करूया. तुमच्या ओटीतील अंकुराच्या खुणा जोपर्यंत जाणवणार नाहीत तोपर्यंत आपण कुंती नगरीमध्ये राहणार आहोत. तेथे राहात असतानाच तुम्ही तुमच्या तातांना, कुंतीभोज माहाराजांना, पटवून देणार आहात की तुम्हाला गंगेकिनारी राहण्याची इच्छा झाली आहे आणि पुढील काही माह या महालात राहून तुम्ही गंगेची आराधना करणार आहात. कुंतीभोज महाराजांना हे पटले की आपण दोघी येथे येऊन राहणार आहोत. तुमचे दिवस भरले की योग्य वेळी तुम्ही प्रसूत व्हाल.... आणि...."

"आणि? आणि मग काय धात्री???... माझ्या ओटीतून जन्मलेल्या त्या अंकुराचे काय धात्री? बोल न..." राजकुमारी कुंती डोळ्यात अश्रू आणून मला विचारत होत्या.

त्यांच्या त्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांकडे शांतपणे पाहात मी म्हणाले;"आणि मग त्यावेळी जे योग्य असेल ते राजकुमारी.... सध्या तरी मी जे सांगते आहे ते आणि तेवढेच करा." एवढे बोलून मी शांतपणे राजकुमारीच्या मंचकावरून उठले आणि तिच्या अंत:पुरातून बाहेर पडले. मला माहीत नव्हते की मी जे सांगितले आहे ते राजकुमाराला कितीसे पटले आहे; मात्र मला एका गोष्टीची खात्री होती की राजकुमारी माझे नक्की ऐकेल. आम्ही परत कुंती नगरीमध्ये आलो. राजकुमारीमध्ये आता अचानक खुपच बदल घडला होता. तिचा अल्लडपणा कुठल्याकुठे पळाला होता. ती अचानक पोक्त झाली होती. स्वतःला सांभाळत तिच्यात होणारे बदल कोणालाही कळणार नाहीत अशा प्रकारे ती आता माहालात वावरायला लागली होती. मी तिच्या सोबत सावलीसारखी राहात होते. पहाता-पहाता चार मास उलटून गेले. अलीकडे राजकुमरीची चाल बदलायला लागलेली काही अनुभवी दासींच्या लक्षात येऊ लागले होते; याची मला जाणीव झाली. मग मात्र मी राजकुमारीकडे घाई केली आणि राजकुमारीने महाराज कुंतीभोजांना पटवून दिले की तिला गंगा आराधना करायची असल्याने काही मास ती गंगेकिनारी असलेल्या महालात जाऊन राहणार आहे. महाराजांनी परवानगी देताच अगदीच मोजक्या तरुण दासींना सोबत घेऊन मी आणि राजकुमारी गंगे किनारी आलो. येथे आल्यानंतर राजकुमारी मनाने काहीशी आश्वस्त झाली. दिसा-मासाने राजकुमारीच्या ओटीमधील अंकुर वाढत होता आणि राजकुमारीचा मूळचा मोहक चेहेरा तेज:पुंज होऊ लागला होता. तिची कांती सुर्याप्रमाणे तळपू लागली होती.

राजकुमारीचे दिवस पूर्ण भरले होते. ती कोणत्याही क्षणी प्रसूत होणार होती. त्यामुळे मी आता माझा मुक्काम तिच्या अंतःपुरात हलवला होता. कोणत्याही दासीला आत येण्याची परवानगी नव्हती. एका रात्री बाहेरचे वातावरण ढवळून निघालेले होते; विजा कडकडत होत्या. गंगेच्या पाण्याला उधाण आले होते. मिट्ट काळोख दाटून आला होता. मी राजकुमारीचा हात हातात घेऊन तिच्या मंचाजवळ बसले होते. राजकुमारी अस्वस्थपणे पहुडली होती. उत्तर रात्री राजकुमारीला कळा येऊ लागल्या. तिचा श्वास कोंडला गेला.... मी सतत तिच्या बाजूला उभी राहून तिला येणाऱ्या कळांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्या विश्वनियंत्याकडे प्रार्थना करत होते. पहाटेच्या पहिल्या प्रहराची जाणीव झाली आणि त्याचवेळी राजकुमारी कुंती माता झाली. तिने एका तेज:पुंज, अप्रतिम सुंदर अशा बालकाला जन्म दिला होता. त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मी उचलून घेतले आणि माझे लक्ष त्याच्या कानांकडे गेले. ते तेजोमय अर्भक जन्मतःच सुंदर मांसल आणि रक्तवर्ण तेजाने चमकणारी कुंडले घेऊन जन्मले होते. बालकाची नाळ त्याच्या आईपासून तोडताना मला अतोनात कष्ट झाले आणि माझ्या लक्षात आले की हे असाधारण अर्भक केवळ जन्मजात कुंडलेच नाही तर अंगभूत कांतीमध्येच कवच धारण करून आले आहे. निसर्गाचा हा चमत्कार मी आयुष्यात कधी ऐकला न्हवता आणि पहिल्यांदाच पाहात होते. प्रसूत कळांमधून सुटका होताच क्लांत असूनही राजकुमारी कुंती उठून बसली आणि तिने अतीव प्रेमाने तिच्या त्या पहिल्या पुत्राला पाहण्यासाठी माझ्याकडे मागितले.

क्षणभरासाठी राजकुमारीच्या त्या मातेच्या प्रेमाने भरलेल्या डोळ्यांकडे मी बघितले आणि मग त्या अर्भकासह कुंतीकडे पाठ करत म्हणाले;"राजकुमारी, तुम्ही विसरता आहात की या अर्भकाची जवाबदारी खुद्द त्या आदित्य नारायणाची आहे; तुमची नाही. कदाचित म्हणूनच त्याचा जन्म पहाटेच्या प्रथम प्रहरी झाला आहे. तुमची अशी काही जवाबदारी असलीच तर; त्या अग्निगोलाने दिलेला अंकुर आपल्या उदरी नऊ माह वाढवून आणि त्याला सुखरूपपणे जन्म देऊन तुमची जवाबदारी तुम्ही पूर्ण केली आहे... आता यापुढे या अर्भकाचे काय करायचे ते त्याचा पिताच काय ते पाहून घेईल. त्याला पाहण्याचा आग्रह धरू नका. कारण एकदा तुम्ही त्याला बघितलेत तर मग ममतेच्या मोहाने किमान एकदा तरी त्याला पदराखाली घेण्याचा मोह तुम्हाला होईल; आणि मग मात्र त्याला दूर करणे तुम्हाला शक्य होणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते की तुमची जवाबदारी तुम्ही ज्या कुळात जन्मला आहात आणि आता ज्या कुळाचे नाव लावता आहात... त्या दोन्ही कुळांच्या सन्मानाची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कुळाच्या विस्तारासाठी विवाह कराल त्यांच्या सन्मानाची ठरते... आणि मग सरते शेवटी जर तुमचे आयुष्य तुमच्यासाठी म्हणून शिल्लक उरलेच तर तुमच्या या क्षणिक उत्सुकतेपाई केलेल्या मोहाच्या जवाबदरी तुम्ही घेऊ शकता. मी या अर्भकाला आता याक्षणी हिरे-मोत्यांनी सजवलेल्या पेटीकेमध्ये घालून गंगेमध्ये सोडून देणार आहे. यापुढे या बालकाचे आयुष्य हे त्याच्या ललाटावर लिहिलेल्या भविष्याप्रमाणे घडेल. तुम्ही काळजी करू नका... जन्माबरोबरच शरीरावर कवच-कुंडले घेऊन आलेला हा बालक तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात नक्की भेटेल. कसा... कुठे... कधी... ते मला सांगता येणार नाही... मात्र माझे मन सांगते आहे की तो तुम्हाला नक्की भेटेल. सावरा स्वतःला.... मी जाऊन येते."

असे म्हणून मी चालू पडले. त्याक्षणी कुंतीने मोठ्याने हंबरडा फोडला आणि ती मंचकावरून उठून माझ्या दिशेने येऊ लागली. तिला जवळ येऊ न देताच मी तिला थांबवले आणि अत्यंत कठोर शब्दात म्हणाले;"कुंती, मागे हो! स्त्रीचे आयुष्य हे तिच्या इच्छेनुसार आणि मर्जीनुसार घडत नसते; हे स्वीकार. या एका पुत्राच्या मोहापायी तू किती जणांचे आयुष्य, इभ्रत, आशा-आकांशा, स्वप्न पणाला लावते आहेस याचा विचार कर. त्या सर्वांना निराश करून या बालकासोबत जगणे तुला शक्य होणार आहे का? मला अडवू नकोस कुंती..." माझे शब्द तिचे काळीज चिरत गेले होते याची मला कल्पना होती. परंतु तरीही मागे वळूनही न बघता मी त्या मोहक अर्भकासह गंगेच्या किनारी पोहोचले. अगोदरच तयार करून ठेवलेल्या सुंदर पेटीकेमध्ये मी त्याला ठेवले आणि ती पेटी गंगेच्या प्रवाहात सोडून दिली.

पुढे पुढे जाणाऱ्या त्या पेटीकेकडे टक लावून पाहताना मात्र माझे डोळे भरून आले. हात जोडून मनोमन मी त्या बालकाची, त्या तेज:पुंज शक्तीयुक्त आदित्य नारायणाची आणि माझ्या प्रिय कुंतीची माफी मागून मी परत एकदा आयुष्याच्या पुढील जवाबदरीचे ओझे उचलण्यासाठी राजकुमारीच्या महालाच्या दिशेने पाऊल उचलले.

समाप्त

6 comments:

  1. आवडले.मुळ कमी ताकदीचे असूनही पुढील विस्तार छान.

    ReplyDelete
  2. कथा लेखनाची शैली सुंदर.

    ReplyDelete
  3. पुढच्या भागाची उत्सुकता मागचा भाग वाचून दुणावली होती ती नक्कीच 99% पूर्ण झाली असा मी म्हणेन कारण पुढचा कुंतीच्या पुढच्या आयुष्यातही धात्री ने महत्त्वाची भूमिका बजावली होती पांडवांनी आपल्या आईप्रमाणे धात्रीचे सेवा केली होती तो भाग इथे आला असता तर अजून छान वाटलं असतं.काहीतरी कमी आहे असं वाटलं म्‍हणजे सचिन तेंडुलकर जेव्हा 99वर बाद होतो तेव्हा एक चुटपूट लागून राहायची तसं काही वाटून गेलं हा कदाचित माझा एक वाचक म्हणून दोष असावा बाकी लिखाण सुंदर आहे.असे वाटून गेले की पुढच्या लेखात तुमच्या मनात कुंती विषयी लेखन करायचे मनात असावे म्हणून तुम्ही काही राखून ठेवले असावे...

    ReplyDelete
  4. कथा चुटपुट लावून गेली की ती कायम मनात राहाते. त्यामुळे मला वाटतं कथा लेखकांच यश कथा लक्षात राहण्यात असावं

    ReplyDelete