Friday, April 24, 2020

मंथरा

मंथरा

"काय सांगू मंथरे, चाकाची कुणी निघाली होती. रथ पुढे काढणे अशक्य होते. चारही बाजूंनी दानवांनी घेरले होते आमच्या रथाला. महाराज त्यांच्या अमोघ शरसंधानाने समोरील दानवांना दूर ठेवत होते. परंतु रथ त्या व्यूहातून बाहेर निघणे अत्यंत आवश्यक होते. क्षणभराचा विचारही न करता मी रथाचा लगाम दातांमध्ये धरून कुणीच्या जागी माझी अंगुली लावली आणि एकच असा आसूड ओढला हवेत; क्षणभरासाठी दिशाहीन झालेले माझे प्रिय अबलख मारुत, वारुण, चापल्य आणि माझी लाडकी शलाका! माझ्या अंतर्मनाची भाषा समजून घेत त्यांनी उधळून दिले स्वतःला त्या व्यूहातून. समोरील दानवांच्या लक्षात येण्याआगोदरच आम्ही व्यूहाच्या बाहेर होतो. आमची सुटका झालेली पाहाताच आपल्या अयोध्येचे शूर आणि हुशार सैनिक आणि ज्यांच्यासाठी महावीर महाराज दशरथ धावून गेले असे भयभीत झालेले देव सर्वच दानवांवर असे काही तुटून पडले की त्यांना युद्धभूमीमधून पळून जाण्या व्यतिरिक्त काही उपाय उरला नाही. संध्या समय समीप आला होता. त्यावेळी युद्ध थांबते तर दुष्ट दानवांना जोर धरण्यास अवधी मिळाला असता; हे महाराजांच्या अंतरीचे विचार ओळखून मी रथ तसाच पळणाऱ्या दानवांच्या मागे पळवला. आम्ही दानवांचा पाठलाग करतो आहोत पाहून आपल्या सैनिकांना आणि त्याचबरोबर देवांना देखील जोर आला आणि सूर्यनारायण कलायच्या आत आम्ही दानवांवर विजय मिळवला. रथ थांबला आणि चाकाच्या कुणीमधून हात बाजूला करतानाच मी मूर्च्छित झाले.

ज्यावेळी मी नेत्र उघडले त्यावेळी मी युद्धभूमीवरील उभारलेल्या आमच्या शिबिरामध्ये होते. राजवैद्यांनी आवश्यक ते लेप लावून माझा हात औषधी पर्णामध्ये बांधून ठेवला होता. मी मंचावर पहुडले होते आणि महाराज नेत्रांमध्ये अश्रू आणून माझ्या मुखाचे निरीक्षण करत होते. त्यांना पाहून मी उठणार तोच त्यांनी मला अडवले आणि म्हणाले; 'कैकयी, प्रिये... आज केवळ तुझ्यामुळे हा विजय देवांना प्राप्त करून देऊ शकलो. हा दशरथ देखील केवळ तुझ्या शौर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे आज येथे तुझ्या जवळ बसला आहे.' 'आर्य आपण असे बोलून मला लाजवता आहात. मी केवळ माझे कर्तव्य करत होते;' मी म्हणाले."

कैकयीच्या हाताची शुश्रूषा करणारी मंथरा काही क्षणासाठी थांबली आणि आपल्याच तंद्रीमध्ये असणाऱ्या कैकयीला थांबवत म्हणाली;"महाराणी, आपलं कर्तव्य रथ हाकण्यापर्यंत मर्यादित होतं; असं आपलं माझ्या अल्पमतीला वाटतं." त्यावर एकवार मंथरेकडे बघत कैकयी म्हणाली;"मंथरे, युद्धभूमीवर रथ हाकताना जे जे म्हणून करावे लागते ते सगळेच कर्तव्य असते बरे!" यावर मनात असूनही मंथरा काही बोलली नाही. आजवरच्या अनुभवाने ती एक शिकली होती की राणी कैकयीला दशरथ महाराजांचा विरह झाला असला आणि ती त्या दुःखात असली की तेव्हाच ती मंथरेचे बोलणे ऐकत असे. त्यामुळे तिच्या मानत आले; आत्ता याक्षणी गप्प बसणेच योग्य. कैकयी परत एकदा मनानेच युद्धभूमीवर पोहोचली होती. तिने पुढील प्रसंग सांगण्यास सुरवात केली...

"तर... महाराजांनी माझ्याकडे अत्यंत प्रेमभराने पाहिले आणि म्हणाले 'कैकयी, राणी... आज हा दशरथ तुझ्या ऋनांमध्ये बांधला गेला आहे; आणि ते ही एकदा नाही तर दोनदा! तू त्या व्यूहातून माझी सुटका केलीस एवढेच नव्हे तर जीवावर उदार होऊन तू शत्रूचा पाठलाग केलास. तुझ्या या कृत्यामुळे आपले सैनिक आणि भयभीत झाल्याने किंकर्तव्यमूढ झालेले देव देखील इरेस पेटले आणि मला त्या दुष्ट दानवांवर विजय मिळवणे सहज शक्य झाले. आज दशरथाच्या शौर्य कथा जर विश्वात दुमदुमत आहेत तर त्या केवळ तुझ्यामुळे. सांग प्रिये; या ऋणातून मी कसा उतराई होऊ? आज तू जे मागशील ते देण्यास मी बांधील आहे. एक नाही दोन वर मागून घे प्रिय पत्नी. तो तुझा केवळ अधिकार नाही तर तुझ्या शूरतेला अयोध्येने केलेलं नमन आहे.' त्यांचे बोलणे ऐकून मी धन्य झाले होते मंथरे...." राणी आपल्या हाताची पीडा विसरून अजूनही त्या मंतरलेल्या क्षणामध्ये अडकली होती.

मात्र '.... एक नाही दोन वर मागून घे प्रिय पत्नी....' असे महाराज दशरथ म्हणाले, हे राणी कैकयीने म्हंटल्या क्षणापासून मंथरेचे कान तीक्ष्णपणे पति-पत्नीमधील पुढील वार्तालाप समजून घेण्यास उत्सुक झाले होते. त्यामुळे अचानक बोलणे बंद केलेल्या आपल्या राणीकडे बघून मंथरेने विचारले;"महाराणी, मग आपण काय मागून घेतलेत महाराजांकडून?" एक कटाक्ष मंथरेकडे टाकून कैकयी म्हणाली;"मी काहीही मागितले नाही." हे ऐकताच मंथरेचे मन अस्वस्थ झाले. हातातील लेप भरला सोन्याचा वाडगा एका बाजूला ठेवत मंथरा राणी कैकयीच्या कानाजवळ आली आणि म्हणाली;"महाराणी आपण काहीच मागितले नाहीत? मी आजवर आपणास जे सांगत आले आहे त्याचा आपण कधीच विचार का करत नाही?" मंथरेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कैकयी म्हणाली;"मी परोपरीने महाराजांना सांगायचा प्रयत्न केला की मला काहीही नको आहे. आपण प्रेमभराने माझे कौतुक केलेत यातच सर्व आले. परंतु महाराज काहीही ऐकायला तयार नव्हते. सरते शेवटी मी म्हणाले,'महाराज, आत्ता याक्षणी काय मागावे हे मला सुचत नाही आहे. तरी आपली परवानगी असली तर आपण दिलेले हे दोन वर मी योग्य वेळी मागून घेईन.' माझे बोलणे ऐकून महाराज मंद हसले आणि होकारार्थी मान हलवत म्हणाले,'प्रिये,जशी तुझी इच्छा! तुला योग्य वाटेल त्यावेळी तू हे दोन वर मागून घे. बर आता तुला विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे मी निघतो'. आणि असे म्हणून महाराज त्यांच्या शिबिराच्या दिशेने गेले."

'.....आपण दिलेले हे दोन वर मी योग्य वेळी मागून घेईन.' राणी कैकयीने उच्चारलेले हे शब्द ऐकून मंथरेच्या मनातील विचारांनी परत एकदा उचल ख्खाली. तिचे डोळे आनंदाने चमकले. मात्र त्यावेळी काहीही बोलणे अयोग्य ठरेल हे अनुभवाने ती शिकली होती. त्यामुळे शांतपणे लेपाचा वाडगा उचलून मंचकापासून दूर होत ती म्हणाली;"महाराणींनी आता विश्रांती घ्यावी. आपण योग्य वेळी योग्य विचार करून वर मागाल याची या मंथरेला पूर्ण खात्री आहे. त्या योग्य वेळेची वाट पाहण्यास ही मंथरा तयार आहे." राणी कैकयीला मंथरेच्या त्या बोलण्याचा अर्थ कळला नाही; परंतु त्याक्षणी कैकयीच्या शरीरात आणि मनात एवढे त्राण नव्हते की कोणत्याही विषयावर ती अजून काही चर्चा करेल. त्यामुळे एकदा मंथरेकडे पाहून तिने तिचे नेत्र मिटले.

अशाच काही घटका गेल्या आणि महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा कैकयीच्या अंत:पुरात येत असल्याची वर्दी अंत:पुराबाहेर उभ्या कलिकेने आत येऊन मंथरेला दिली. महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा येत आहेत हे ऐकून मंथरेने नाक मुरडले आणि म्हणाली;"अग कलिके आत्ता कुठे राणी कैकयी यांचा डोळा लागला आहे. जिवावरच्या दुखण्यातून अजून त्या बऱ्या देखील झालेल्या नाहीत. युद्धभूमीवर खूप मोठा पराक्रम आपल्या राणींनी गाजवला हे जितके खरे आहे तेवढेच त्यांचा क्षीण अजून गेलेला नाही हे देखील खरे आहे. मग अशा वेळी त्यांना विश्रांती मिळावी म्हणून ना तुला बाहेर उभे केले होते? तरीही कोणी येत असल्याची वर्दी बरी घेऊन आलीस?" मंथरा अत्यंत कुजबुजत्या आवाजात कलिकेला रागवत असली तरी तिची कुजबुज कैकयीच्या कानापर्यंत पोहोचलीच. कैकयीने मंचकावर उठून बसण्याचा प्रयत्न करीत विचारले;"कोण आहे ग तिथे मंथरे? कोणाशी बोलते आहेस?" त्यावर एक जळजळीत कटाक्ष कलिकेच्या दिशेने टाकून मंथरा मंचकाजवळ गेली आणि म्हणाली;"राणी, आपण विश्रांती घेत असल्याने मी या कलिकेला स्पष्टपणे सांगून ठेवले होते की कोणीही आले तरी वर्दी घेऊन आत येऊ नकोस. तुम्हाला आराम वाटेपर्यंत उगाच भेटायला येणाऱ्यांची दगदग नको; असे आपले मला वाटले... तेही तुमच्यावरील माझ्या श्रद्धेमुळे."

मंथरेकडे मऊ नजरेने पाहात कैकयी म्हणाली;"मंथरे, मी विवाह करून अयोद्धेमध्ये आले ते तुला माझी पाठराखीण म्हणून घेऊनच. त्यामुळे तुझी माझ्यावरचा श्रद्धा आणि माझ्यावरील प्रेम याविषयी मला कदापिही संशय नाही. माझ्या मातेने माझी पाठवणी करताना मला म्हंटले होते की मंथरा तुला तुझी इच्छा असेपर्यंत साथ देईल.... आणि खरं सांगायचं तर इथे आल्यावर सर्वच नवीन असताना आणि दोन थोरल्या सवती असताना तुझं असणं मला कायम हवसं वाटलं. सुरवातीला स्त्रीसुलभ भावनेने मला माझ्या सवती आवडल्या नाहीत. त्यामुळे आपण दोघींनी सुरवातीला त्यांच्याबद्दल खूप काही अयोग्य चर्चा देखील केली. त्याकाळात महाराज केवळ माझे असावेत आणि त्यांनी केवळ माझ्या अंत:पुरात यावं ही माझी इच्छा होती. मात्र मी जसजशी मोठी होत गेले तसे मला महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा यांच्या मोठ्या मनाचा उलगडा होत गेला. त्यांच्याबद्दल मनात असलेली अढी देखील पुसली गेली. त्यांच्याविषयी आदरपूर्ण प्रेमभाव माझ्या मनात निर्माण झाले. आज मला माझ्या सवती या माझ्या थोरल्या भगिनींप्रमाणे आहेत. मात्र तुझ्या मनातील अढी मात्र मी काढू शकले नाही. कितीदा तुला सांगितले की मनात काही एक विचार कायमचा धरून ठेऊ नये. मात्र तुला ते समजत नाही... काय करावे? जाऊ दे! महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा मला भेटण्यासाठी येत असल्या तर तू कलिकेबरोबर बाहेर जाऊन थांब आणि त्या दोघींना आदराने आत घेऊन ये बरं!" कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेने मान खाली घातली आणि ती अंत:पुराबाहेर जाऊन उभी राहिली. महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा येताच त्यांना आदरपूर्वक तिने राणी कैकयीच्या अंत:पुरात आणले आणि त्या स्थानापन्न होताच ती केशरयुक्त दुधाचे पेले आणण्यास बाहेर पडली.

राणी कैकयीच्या मुदपाक घराकडे जाताना मंथरेच्या डोळ्यासमोरून आजवरचा तिचा जीवनपट पुन्हा एकदा झरझर जाऊ लागला. जेमतेम नऊ वर्षांची होती मंथरा; जेव्हा तिची माता तिला घेऊन अश्वपती महाराजांच्या महालात आली. महाराजांच्या बाजूलाच काहीशी मोठी दिसणारी एक खूपच सुंदर मुलगी राज वस्त्रे आणि कधी न पाहिलेले अलंकार घालून उभी होती.

अश्वपती महाराजांनी मंथरेला जवळ बोलावले आणि विचारले;"बाळ, तुझं नाव काय?"

एकवार आपल्या मातेकडे बघत धीट मंथरा ताठ उभी राहिली आणि म्हणाली;"मी मंथरा... अलका आणि वसू यांची कन्या. महाराज, ही आपणा शेजारी उभी आहे ती कोण?"

मंथरेचा धीटपणा बघून अश्वपती महाराजांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. प्रेमाने आपल्या लाडक्या कन्येच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले;"ही कैकयी. माझी कन्या... या राज्याची राजकुमारी... आणि कैकयी ही तुझी सखी. यापुढे ती कायम तुझ्यासोबत असणार आहे."

हे ऐकताच मंथरेने बावरून जाऊन आपल्या मातेकडे बघितले. तिच्या नजरेतील अस्वस्थता ओळखून महाराज अश्वपती म्हणाले;"मंथरे, तुझी आई कैकयीची दाई आहे. त्याअर्थी तू कैकयीची दुग्ध भगिनी झालीस."

महाराजांच्या मुखातून उच्चारलेले शब्द ऐकताच मंथरेने काहीशा आश्चर्याने परत एकदा कैकयीकडे बघितले आणि महाराजांना विचारती झाली;"मग याचा अर्थ मला देखील असेच उत्तमोत्तम वस्त्र आणि अलंकार मिळणार का?" महाराजांना तिच्या या प्रश्नाचे खूपच आश्चर्य वाटले. कारण हा प्रश्न विचारण्याइतकी ती मोठी नव्हती. पण काहीसे हसत त्यांनी म्हंटले;"कैकयीने उतरवलेली आणि तिला नको असणारी सारी वस्त्रे आजपासून तुझी मंथरे. कैकयी आपणहून तुला तिचे जे अलंकार देईल ते देखील तुझे होतील. अट मात्र एकच... यापुढे संपूर्ण आयुष्यात तू कैकयीची साथ सोडणार नाहीस.... आणि तुझ्या मनात कायम फक्त आणि फक्त कैकयीच्या सुखाचा, आनंदाचा आणि उत्कर्षाचा विचार असेल. बोल काबुल आहे?"

कैकयीच्या अंगावरील त्या तलम वस्त्रांकडे आणि अभूतपूर्व अलंकारांकडे पाहात मंथरेने होकारार्थी मान हलवली. मागे वळूनही न बघता तिने आपल्या मातेला म्हंटले;"जा तू माते. तुला आता यापुढील आयुष्यात माझी चिंता करायची गरज नाही. माझ्या इतर बंधू-भगिनींची काळजी कर तू... यापुढे मंथरा कायम सुखीच असेल." त्यानंतर एक पाऊल पुढे येऊन महाराजांना लावून प्रणाम करून तिने कैकयीकडे बघितले आणि हसून म्हणाली;"राजकुमारी, आपण अत्यंत सुंदर आहात. मी आयुष्यभराची तुमची सखी झाले यात मी माझा गौरव समजते. आपण यापुढे जे म्हणाल ते मला प्रमाण असेल."

महाराज अश्वपतींना क्षणात मंथरेच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आला आणि त्यांनी मनात ही खूणगाठ बांधली की आपल्या सरळ आणि अत्यंत भावनिक कैकयीसाठी अगदी योग्य सखी मिळाली आहे. यापुढे कैकयीची काळजी करण्याचे कारण उरलेले नाही. कधी काळी जर कैकयीने भावनेच्या आवेगात काही निर्णय घेतला तरी मंथरा कैकयीसाठी योग्य आणि तिच्या सुखाचा विचार करून कैकयीला तिचा निर्णय बदलायला लावेल. कारण मंथरेला 'सुखाची व्याख्या' फारच लहान वयात कळली आहे.

असेच दिवस जात होते. कैकयी आणि मंथरा आता अगदी जवळच्या सख्या झाल्या होत्या. कैकयीला मंथरेशिवाय अजिबात करमत नसे. त्यामुळे अलीकडे तर मंथरा कैकयीच्या सोबत कायम असे. कैकयीने आपल्या तातांकडे हट्ट करून मंथरेसाठी एक खास राखीव असा भाग स्वतःच्या अंत:पुरात करून घेतला होता. त्यामुळे कैकयी झोपली की मग मंथरा तिच्या मंचकाच्या दिशेने जात असे आणि सकाळी दोघीही एकत्रच सूर्य नारायणाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरवात करीत असत.

कैकयी आता मोठी झाली होती आणि तिचा विवाह अयोध्येचे महापराक्रमी महाराज दशरथ यांच्यासोबत ठरल्याप्रमाणे मोठ्या थाटामाटात पार पडला. कैकयीने अयोध्येला येताना आग्रहपूर्वक मंथरेला सोबत आणले; आणि मंथरा देखील आनंदाने कैकयी सोबत पुन्हा एकदा अखंडित ऐहिक सुख उपभोगण्यासाठी आली.

मात्र कैकयीची जवळीक प्रेमळ आणि सौम्य स्वभावाच्या महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्राशी होऊ लागताच मंथरा मनातून अस्वस्थ झाली. तिने कितीही प्रयत्न केला तरी मूळच्या भावुक स्वभावाच्या कैकयीचा महाराणी कौसल्या आणि राणी सुमीत्रेच्या दिशेने वाढणारा ओढा ती कमी करू शकत नव्हती. सरते शेवटी मंथरेने विचारपूर्वक पावले उचलण्यास सुरवात केली.... आणि....

महाराज दशरथ अनेक दिवसांनंतर राणी कैकयीच्या अंत:पुरात येणार असल्याचा निरोप द्वारपाल घेऊन आला आणि राणी कैकयी आनंदाने शृंगाराच्या तयारीला लागली. तिने तिच्या सर्वच दासींना बोलावून घेतले. उत्तमोत्तम उटणी करून घेऊन कैकयीने अभ्यंग स्नान केले. मूलतः लांब आणि सुंदर असा केशसंभार सुगंधित धूप घालून वाळवून घेतला आणि कुशल दासिकडून अत्यंत मोहक अशी केशरचना करून घेतली. विचारपूर्वक तलम आणि मोहक वस्त्र आभूषणे चढवली. मंथरा देखील कैकयीच्या पुढे-मागे करत तिला शृंगार करण्यासाठी मदत करत होती. सौंदर्यवती तर राणी कैकयी होतीच; परंतु आजचा तिचा साज-शृंगार शब्दातीत होता. महाराज येण्याची वेळ झाल्याने ती अत्यंत व्याकुळपणे ती महाराजांची वाट पाहू लागली.

महाराजांना काही कारणाने उशीर होऊ लागला आणि अजून वयाने लहान असलेल्या आणि आजवर मनात येईल ती इच्छा लगेच पूर्ण होण्याची सवय असलेल्या राणी कैकयीला होणारा हा उशीर समजून घेणे शक्य होत नव्हते. एक एक घटिका पुढे सरकत होती आणि राणी कैकयी हिरमुसली होऊन आपल्या शृंगारातील एक एक आभूषण उतरवून ठेवत होती. मंथरा देखील राणी कैकयी सोबत तिच्या अंत:पुरात होती. ती राणीला मदत करण्याच्या बाहण्याने तिच्या जवळ गेली आणि केवळ राणीला ऐकायला येईल अशा प्रकारे म्हणाली;"राणी, आपणास एक सांगायचे होते. आपण माझ्याबाबतीत मनात किंतु आणणार नसाल तरच सांगीन म्हणते." राणी कैकयी आपल्याच भावनांच्या आवेगात असल्याने त्यांनी केवळ एक कटाक्ष मंथरेच्या दिशेने टाकला; तीच परवानगी समजून मंथरा म्हणाली;"कालच मी महाराणी सुमित्रा यांच्या महालाजवळून जात होते त्यावेळी त्यांच्या खास दासीला मी भेटले. तिला अवेळी महालाबाहेर उभे पाहून मी सहज विचारले की महाराणींच्या या विश्रांतीच्या वेळी तू इथे बाहेर काय करते आहेस? महाराणींची सेवा करण्यास आत का नाही गेलीस? त्यावर ती सटवी माझ्याकडे बघत ओठ मुडपत म्हणाली, आज खुद्द महाराज महाराणींची सेवा करण्यास आले आहेत; मग माझे काय काम? मला तर तिचा असा राग आला होता.... पण तुम्ही मला कितीही मान दिलात तरी शेवटी मी पडले दासी. काही एक न बोलता तिथून निघाले."

मंथरेचे बोलणे ऐकून राणी कैकयीच्या भृकुटी ताणल्या गेल्या. त्यावर सारवासारव केल्याच्या आवाजात मंथरा म्हणाली;"राणी आपण महाराणी कौसल्यांसाठी मनात किंतु आणू नये. त्यांची विश्रांतीची वेळ असताना महाराज अचानकच गेले त्यांच्या महालात. काल जे झाले ते झाले; पण आज महाराजांनी येतो म्हणून निरोप देऊन देखील न येणे योग्य नाही. अर्थात त्यासाठी आपण त्यांच्यावर राग धरणे जरी योग्य असले तरी आपण असे करू नका. महाराजांना फारच वाईट वाटेल त्याचे." मंथरा अजूनही काही बोलली असती मात्र त्याचवेळी महाराज येत असल्याचा निरोप घेऊन एक दासी धावत आली आणि मंथरा त्वरेने अंत:पुरातून बाहेर पडली. बाहेर पडणाऱ्या मंथरेकडे कोणाचेही लक्ष नव्हते आणि ते एका अर्थी तिच्यासाठी चांगलेच होते. कारण युद्ध जिंकल्याचा भाव मंथरेच्या चेहेऱ्यावर होता.

क्रमशः

6 comments:

  1. अतिशय छान सुरुवात.आनन्द साधलेंचे रामायण वाचले आहेस का?त्यात त्यांची कल्पना थोड़ी वेगळी आहे,कधी वेळ असेल तेंव्हा7/10 मिनिटे दे

    ReplyDelete
  2. नाही वाचलं. पण नक्की वाचेन. माझ्या मनात मंथरा थोडी वेगळीच उभी राहिली. तशीच मी रंगवली आहे.

    ReplyDelete
  3. रामायणातली खरी पात्र घेऊन या कथेत गुंतवून तुम्ही हा मंथरेच्या कथेचा प्रथम भाग सादर केला आहे निव्वळ अप्रतिम आहे.त्यातली भाषा,विरामचिन्हे,म्हणजे सगळे मोजून-मापून योग्य जागी योग्य वापर केलेला असं वाटतय.म्हणजे खूपच छान,मला खूप आवडलं. पुढच्या भागाची प्रतीक्षा राहील आता!! धन्यवाद, श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete