Friday, April 10, 2020

धात्री


धात्री

माझे पती अधिराज मला लग्न करून शूरसेन महाराजांच्या मथुरा नगरीमध्ये घेऊन आले त्यावेळी मी केवळ बारा-चौदा वर्षांची होते. गावाची वेस ओलांडतानाच मला माझ्या मातेने जवळ घेऊन कानात सांगितले होते;"धात्री, पुत्री, आज मी तुला तुझ्या नावाचा अर्थ सांगते. तुझ्या नावातील 'ध' अक्षराचा अर्थ 'धरून ठेव'; असा आहे आणि 'त्र' अक्षर म्हणते 'धरून ठेवायची व्यक्ती जरी लोकार्थाने त्रयस्थ असली तरी ती तुझ्यासाठी तुझं सर्वस्व असली पाहिजे'. पुत्री, तुझ्या जन्माच्या वेळी माझ्या स्वप्नात एक तेजोमय आत्मा आला होता. त्याने मला तुझे नाव मी धात्री ठेवावे असे सुचवले होते आणि त्याचवेळी त्या नावाचा अर्थ मला सांगितला होता. त्यामुळे यापुढील आयुष्य हे तुला तुझ्या वयाच्या पुढे जाऊन कायम जवाबदरीपूर्ण निर्णय घेऊनच जगायचे आहे." त्यावेळी नववधू असलेल्या माझ्या मनाने ते शब्द केवळ ऐकले होते.... बहुतेक त्याचा अर्थ पुढे जाऊन मला कळणार होता.

माझे पती अधिराज हे शूरसेन महाराजांचे खास सेवक होते. त्यामुळे ते कायमच महाराजांसोबत राजवाड्यातच असायचे. लग्न करून आल्यानंतर काही दिवस मी राजवड्याजवळील सेवक निवासात राहिले. पण मग माझ्या पतींनी शूरसेन महाराजांना विनंती केली आणि माझी वर्णी महाराणी देवमीधा यांच्या सेवेमध्ये लागली. आता महाराणींची सेवा करताना मी माझ्या पतींना किमान आठ-दहा दिवसातून एकदा तरी भेटू शकत होते. या अशा हवेवर चालणाऱ्या संसाराचे मला खूप दुःख होत होते. माझी माझ्या संसाराची स्वप्न; मुला-नातवंडांनी भरलेल्या घरातील आनंद मी कधी अनुभवू शकेन का हा प्रश्न मला कायम सतावत असे. मात्र आपले स्वप्न हे आपल्या पतीच्या सोबत असते याची मला संपूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी आताच्या आयुष्याचे दुःख करून घेत नव्हते. एक दिवस महाराणींनी महाराज शूरसेन यांना निरोप पाठवून संध्याकाली पुष्प वाटिकेमध्ये बोलावले होते. निरोप घेऊन मीच स्वतः गेले होते. त्यावेळी महाराज विश्रांती घेत असल्याने मी महाराणींचा निरोप महाराजांचे खास सेवक म्हणून अधिराज यांच्याकडे दिला. निरोप दिल्यानंतर देखील माझे पाऊल तेथून निघेना. हे अधिराजांच्या लक्षात आले आणि ते माझ्या जवळ येऊन म्हणाले;"आज बहुतेक महाराज महाराणींच्या महाली येणार आहेत. त्यावेळी आपण नक्की भेटू." त्यांच्या त्या एका वाक्याने देखील मी प्रसन्न झाले आणि महाराणींच्या कक्षाकडे परतले.

त्यादिवशी खरोखरच महाराज शूरसेन आणि महाराणी देवमीधा यांनी पुष्प वटीकेनंतर एकत्र भोजन घेतले आणि महाराज त्या रात्री महाराणींच्या महालात थांबले. अंत:पुराचा पडदा पडला आणि मी हलक्या पावलांनी मागे फिरले. महालाबाहेर येताच समोरच अधिराज उभे असलेले दिसले. मी आवेगाने जाऊन त्यांच्या बाहुपाशात स्वतःला सामावून घेतले. ती रात्र खरोखरच खूपच सुंदर होती. आकाशात पूर्ण चंद्र हसत होता आणि मी अधिराजांच्या बाहूंमध्ये विसावले होते. काही दिवासातच मी सकाळच्या वांत्यांनी बेजार झाले. सकाळी महाराणींच्या अंत:पुरात पोहोचण्यास मला उशीर होऊ लागला; तसे एकदिवस महाराणींनीच मला त्याचे कारण विचारले आणि मी लाजत-लाजत उशीर होण्याचे कारण सांगितले. महाराणी देवमीधा अत्यंत प्रेमळ आणि वात्सल्यपूर्ण होत्या. अजून त्यांची कूस उजवली नव्हती. मात्र माझी गोड बातमी ऐकून त्या अत्यंत खुश झाल्या. त्यांनी निरोप पाठवून अधिराजांना बोलावून घेतले आणि मला त्यांच्या सुपूर्द करून त्यांनी फर्मावले;"हे पहा अधिराज; धात्री माझी सर्वात लाडकी सेविका आहे. तिचा समंजसपणा, काळ-वेळेचं भान ठेऊन वागणं यामुळे ती इतर दासींपेक्षा उजवी आहे हे मी पहिल्या काही दिवासातच ओळखलं होतं. अशी माझी लाडकी धात्री आता माता बनणार आहे आणि तुम्ही पिता! त्यामुळे पुढील काही माह तुम्ही केवळ धात्रीची काळजी घ्यायची आहे. मी स्वतः आताच शूरसेन महाराजांना तसा निरोप पाठवते आहे. धात्रीच्या पोटी तुमच्या कुळाचं नाव मोठं करील असा पुत्र जन्मूदे हीच त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना आहे."

महाराणी देवमीधा यांच्या या बोलण्याने माझे डोळे भरून आले. अधिराजांनी झुकून माहाराणींना पदस्पर्श केला. ते खाली वाकलेले असतानाच त्यांनी देखील डोळे टिपलेले मी पाहिले. उठून उभे राहात झुकलेल्या नजरेनेच त्यांनी पुन्हा एकदा महाराणींना लवून नमस्कार केला आणि मला घेऊन ते तेथून बाहेर पडले. त्यानंतरचे नऊ महिने म्हणजे माझ्या आयुष्यातील मी भोगलेला सुवर्णकाळच म्हणावा लागेल. मला कोणतेही कडक डोहाळे लागले नाहीत की इतर कोणताही त्रास झाला नाही. मात्र अधिराज सतत माझ्या जवळ राहून माझी काळजी घेत होते. त्यावेळी माझ्या मनात सतत एकच विचार येत असे की हे नऊ महिने कधी संपूच नयेत. मात्र त्या विधात्याच्या मनात काय असते ते आपल्यासारख्या सामान्य मनुष्य प्राण्याला कसे कळणार? योग्य दिवस पूर्ण होताच मी एका सुदृढ आणि गोंडस बालकाला जन्म दिला. त्याचा जन्म पहिल्या प्रहरी झाला होता. अजून आदित्य नारायण पूर्वेची दिशा केशर रंगाने रंगवतच होते आणि मी प्रसूत झाले. अधिराजांनी बालकाला उचलून हातात घेतले आणि म्हणाले;"याचा जन्म आदित्य नारायणासोबत झाला आहे; त्यामुळे याचे नाव आपण आदित्यच ठेऊया. मी थकलेल्या नजरेने एकदा अधिराजांकडे आणि त्यांच्या हातातील आमच्या पुत्रकडे बघितले आणि हसून त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

असेच दिवस जात होते. मी परत एकदा महाराणी देवमीधांच्या सेवेत हजर झाले होते. मी पाचव्या महिन्यात असतानाच मला कळले होते की महाराणी देवमीधा देखील गरोदर आहेत. त्यामुळे मी त्यांची पूर्ण काळजी घेत होते. आदित्य दिसामासाने वाढत होता. मला येणाऱ्या पूर्ण पान्ह्यामुळे आदित्यची वाढ कमालीची उत्तम आणि वेगाने होत होती. तो महाराणी देवमीधांचा अत्यंत लाडका झाला होता. त्यांना त्याला बघितल्याशिवाय क्षणभर देखील चैन पडत नव्हते. त्यांच्या त्या अवघडलेल्या स्थितीत देखील त्या त्याला सतत खेळवत होत्या. नऊ माह आणि नऊ दिवस पूर्ण होताच महाराणींनी देखील एका अत्यंत देखण्या आणि सुदृढ कन्येस जन्म दिला. महाराणी देवमीधांनी माझी नियुक्ती त्यांच्या कन्येची दाई म्हणून केली. मला खात्री होती की मला येणाऱ्या विपुल पान्ह्यामुळे आणि आदित्यच्या सुदृढ वाढीकडे बघूनच माहाराणींनी मला ही जवाबदारी दिली आहे. महाराणींनी दिलेल्या या जवाबदरीचा मी अत्यंत आनंदाने स्वीकार केला.

आदित्यच्या जन्मानंतर अधिराज आणि माझी भेट होणे फारच दुरापास्त झाले होते. मात्र पृथेची काळजी घेणे; तिला दूध पाजणे; तिचे योग्य संगोपन करणे यापुढे मला आदित्यला वेळ देणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे अधिराजांची भेट होत नसली तरी मला त्याची फारशी उणीव जाणवत नव्हती. असेच दिवस जात होते. पृथा आणि आदित्य दिसामासाने वाढत होते. आता पृथा दहा वर्षांची झाली होती. ती अत्यंत तल्लख बुद्धीची होती. तिला तिच्या वायच्यापेक्षा जास्त समज होती. तिला नटण्यापेक्षा स्वच्छंदपणे निसर्गात धावायला आणि रमायला जास्त आवडत असे. त्यामुळे माझा बराच वेळ पुष्प वाटिका आणि आनंदवनातच जात असे. कारण पृथा तेथून महालात येण्यास तयारच नसे.

अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा महाराणी देवमीधांनी मला बोलावून महाराजांना रात्रीच्या भोजनाचे आमंत्रण देण्यास सांगितले. त्यांच्या त्या आज्ञेने मीदेखील खूपच खुश झाले. महाराज शूरसेन येणार म्हणजे मला देखील अधिराजांना भेटण्याचे भाग्य लाभणार याचा मला आनंद झाला होता. मी त्याच आनंदाच्या ढगांवर स्वार होऊन महाराज शूरसेनांच्या महालात पोहोचले आणि महाराणी देवमीधांचे आमंत्रण महाराजांना कळवण्यासाठी अधिराजांच्या कानी घातले. मला पाहून त्यांच्या चेहेऱ्यावर पसरलेले हास्य त्या निरोपामुळे काहीसे काळवंडल्याचा भास मला झाला. पण मी काही बोलण्याच्या आत ते महाराजांच्या अंत:पुरात निघून गेल्याने मी काही विचारू शकले नाही. तशीच उलट पावली परतुन महाराणींच्या आदेशाप्रमाणे स्वयंपाक घरामध्ये काही विशेष पदार्थ करून घेण्यासाठी मी वळले.

महाराणींनी मला स्वयंपाक घरातून लवकर बोलावून घेऊन पृथेला तयार करण्यास सांगितले होते; मी पृथेला तयार करून घेऊन त्यांच्या महाली पोहोचले तर त्या देखील शृंगार करून तयार होत्या. पृथेला तिथेच सोडून मी मागे वळले आणि महाराज शूरसेन आज भोजनासाठी आमंत्रण असूनही संध्याकाल होतानाच माहाराणींच्या माहालात आले याचे मला थोडे आश्चर्य वाटले. महाराजांसोबत अधिराज देखील आले होते. आम्ही एकमेकांपासून दूर उभे राहून महाराज आणि महाराणी पृथेशी खेळत होते ते बघत होतो. मी अनेकदा अधिराजांकडे बघत होते; किमान एकदा तरी त्यांची आणि माझी दृष्टादृष्ट होईल आणि त्यांच्या प्रेमळ नजरेने ते मला पुलकित करतील अशी मला आशा होती. मात्र अधिराज जाणून बुजून माझी नजर चुकवत होते असे मला वाटत होते. काही वेळानंतर महाराणींनी भोजनाची तयारी करण्यास सांगितले आणि मी त्या तयारीसाठी त्यांच्या महालातून बाहेर पडले.

आज महाराज शूरसेन महाराणी देवमीधांच्या महालातच थांबणार होते. महाराज थांबणार म्हणजे पृथेची जवाबदारी माझ्यावर येणार हे ओघानेच आले. त्यामुळे भोजनोत्तर मी पृथेला घेऊन जाण्यासाठी महाराणींच्या अंत: पुरात गेले. परंतु महाराजांनी स्वतःच मला सांगितले की पृथा देखील आज महाराज आणि महाराणींसोबत थांबणार आहे. महाराणी काही दुसरा आदेश देत आहेत का याचा अंदाज घेण्यासाठी मी महाराणींच्या दिशेने बघितले; मात्र माहाराणी गवक्षात उभे राहून अंधारात दूर कुठेतरी पाहात होत्या. काही क्षण थांबून अंत:पुराचे पडदे पाडून मी परत मागे फिरले. मी अधिराज आणि आदित्य जिथे होते तिथे पोहोचले; तर अधिराज आदित्यला मांडीत घेऊन आसवे ढाळत होते असे माझ्या लक्षात आले. माझ्या काळात चर्र झाले. मात्र त्याक्षणी मी अधिराजांना काहीच विचारले नाही. आदित्यला त्यांच्या मांडीमधून घेऊन मी एकीकडे झोपवले. आदित्यला झोपवून मी अधिराजांच्या जवळ जाऊन बसले. त्यांच्या आसवांचे कारण मला जाणून घ्यायचे होते. मात्र त्यांनी काहीएक न बोलता मला जवळ घेतले. पुन्हा एकदा मी त्यांच्या त्या प्रेमळ मिठीमध्ये विरघळून गेले. उश:काल होता होता अधिराजांनी मला जागे केले आणि माझा चेहेरा आपल्या ओंजळीत धरून ते म्हणाले;" धात्री, प्रिये, आता मी तुला काय सांगतो आहे ते नीट ऐक. ज्यावेळी तू गरोदर होतीस; त्यावेळी महाराजांचे चुलत बंधू आणि परम प्रिय सखा कुंतीभोज महाराज इथे मथुरा नगरीमध्ये आले होते. त्याच वेळेस महाराणी देवमीधा देखील नुकत्याच गरोदर असल्याची बातमी कळली. ही बातमी ऐकताच कुंतीभोज महाराजांनी आपल्या शूरसेन महाराजांकडे त्यांच्या पहिल्या अपत्याची मागणी केली. गेली अनेक वर्षे अनेक देवधर्म-होम-हवन करून देखील कुंतीभोज महाराजांकडे पाळणा हललेला नाही. त्यामुळे ते खूपच दुःखी होते. शूरसेन महाराजांना कुंतीभोज महाराजांचे दुःख पाहावले नाही आणि त्यांनी कुंतीभोज महाराजांना शब्द दिला की त्यांचे पहिले अपत्य दहा वर्षांचे होताच त्या अपत्याचे दान कुंतीभोज महाराजांच्या झोळीत घालतील. धात्री, प्रिये, आता आपली पृथा दहा वर्षांची झाली आणि दोनच दिवसांपूर्वी कुंतीभोज महाराजांकडून निरोप आला आहे की ते येत्या काही दिवसांमध्ये पृथेला घेऊन जाण्यासाठी येत आहेत." अधिराजांच्या त्या बोलण्याने आजवरच्या सुखस्वप्नामधून मी खाडकन जागी झाले. "काय सांगता आहात आपण नाथ? म्हणजे माझी पृथा माझ्यापासून कायमची दुरावणार आहे का? अहो, ती जरी जन्माने माझी पुत्री नसली तरी तिला मी माझ्या पान्ह्यावर वाढवले आहे."

माझ्या डोळ्यात पाहात अधिराज म्हणाले;"मला याची कल्पना नाही का? म्हणूनच तर ज्यावेळी शूरसेन महाराजांनी मला बोलावून सांगितले की तुला देखील पृथेबरोबर कुंतीभोज महाराजांकडे पाठवण्याचा त्यांचा विचार आहे; त्यावेळी मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा विचार योग्य असल्याचे सांगितले."

अधिराज जे बोलले ते ऐकूनही मला त्याचा अर्थबोध झाला नाही. पृथा कुंतीभोज महाराजांबरोबर कायमची जाणार होती; आणि शूरसेन महाराजांनी तिच्या सोबत मला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय माझ्या पतींनी आदरपूर्वक स्वीकारला होता. एक मूल जन्माला येण्या अगोदरच कायमचं आपल्या मातेला आणि मातृभूमीला मुकलं होतं. तिचा काहीच दोष नसताना लहानगी पृथा वयात येण्याआगोदरच आपल्या मातेपासून दूर जाणार होती.... आणि मी? पृथेची दाई; तिची पालन करती म्हणून तिच्या सोबत कायम जाणार होते!? माझ्या प्रिय पुत्राला आदित्यला सोडून आणि माझ्या प्राणप्रिय पतींना सोडून... या मथुरा नगरीला सोडून मी इथून जाणार होते? माझ्या मनाला हा धक्का सहन होईना. माझे नेत्र अश्रू ढाळण्याचे देखील विसरून गेले होते. काही क्षण तसेच गेले. मी काहीशी भानावर येत नकारार्थी मान हलवून बोलण्यास प्रारंभ करणार इतक्यात मला माझ्या मातेने माझ्या गावाची वेस ओलांडताना कानात जे सांगितले होते ते आठवले आणि मी माझे शब्द आत वळवले. पुढील काही दिवस मी माझ्या आदित्यचे लाड करत होते. त्याला आवडणारे सगळे पदार्थ करून घालत होते. त्याच्या सोबतच्या प्रत्येक क्षणी माझे डोळे पाझरत होते. महाराज शूरसेनांनी अधिराजांना देखील माझ्या सोबत काही काळ व्यतित करता यावा म्हणून त्यांना माझ्याकडे पाठवून दिले होते. आमचा तिघांचा असा हा कौटुंबीक वेळ कापरासारखा उडून जात होता याची मला सतत जाणीव होत होती.

.... आणि कुंतीभोज महाराजांचे आगमन झाले. दोन दिवस शूरसेन महाराजांचे आदरातिथ्य स्वीकारून कुंतीभोज महाराज पृथेला आणि तिच्या सोबत मला घेऊन निघाले. महाराज शूरसेन महाराणी देवमीधा आणि समस्त मथुरावासी आम्हाला कायमचा निरोप देण्यासाठी मथुरेच्या वेशीपर्यंत आले होते. माझा लहानगा आदित्य त्याच्या पित्याचा हात धरून चालत होता. का कोण जाणे काल संध्याकाळपर्यंत सतत वाहणारे माझे नेत्र आता अचानक कोरडे झाले होते. मनातून एक वेगळीच खंबीरतेची भावना दाटून आली होती. वेशीच्या दिशेने चालताना माझी नजर आदित्य किंवा अधिराज यांच्याकडे न वळता पृथेकडे लागून राहिली होती. केवळ दहा वर्षाची माझी पृथा डोळ्यात पाणी न आणता हसऱ्या चेहेऱ्याने समस्त नगरजनांचा निरोप घेत होती. एकीकडे देवमीधा मातेला नजरेनेच 'काळजी करू नकोस'; असे सांगत होती तर दुसरीकडे शूरसेन महाराजांना 'तुम्ही योग्य निर्णय घेऊन मला अत्यंत योग्य पित्याच्या हाती सुपूर्द करता आहात'; हे सांगत होती. वेस जवळ आली आणि आता रथांना गती देण्याची वेळ आली. कुंतीभोज महाराजांनी त्यांच्या कन्येसाठी एका मोठ्या आणि सर्व सुखसोयी युक्त अशा रथाची व्यवस्था केली होती. पृथेने त्या रथामध्ये तिचे स्थान घेतले. पृथा पुढे होताच क्षणभराचा देखील विचार न करता मी देखील तिच्याच रथामध्ये चढले. योग्य अंतर राखत मी पृथेजवळ उभी राहिले. माझी आणि महाराणी देवमीधांची नजरानजर झाली आणि त्यांच्या पाझरणाऱ्या नेत्रांनी 'माझ्या कन्येची काळजी घे'; असे मला सांगितले. मी आत्मविश्वासपूर्ण हास्य करून त्यांना 'महाराणी काळजी नसावी'; असे नेत्रांच्याच भाषेत सांगितले आणि आदित्य किंवा अधिराज यांच्याकडे एकदाही वळून न बघता नजर पुढील रस्त्याकडे स्थिर केली. शेवटच्या क्षणी त्या दोघांच्या चेहेऱ्यावरील दुःखी भाव मला सोबत नेण्याची इच्छा नव्हती. काही क्षणातच कुंतीभोज महाराज आणि पृथाच्या रथांनी वेग घेतला आणि आम्ही प्रस्थान केले.

आम्ही कुंतीभोज महाराजांच्या कुंती नगरीमध्ये पोहोचलो आणि वेशीवरच आमचे खूप मोठे स्वागत झाले. संपूर्ण नगरी आनंदाने प्रफुल्लित झाली होती. कुंती नगरीच्या प्रत्येक पथावर रांगोळ्या काढून आणि अनेकविध दिव्यांची आरास करून आमच्या रथावर फुले उधळत नव्या राजकुमारीचे स्वागत केले जात होते. आमचे रथ राजवड्याजवळ पोहोचले आणि कुंतीभोज महाराज पायउतार झाले. त्याबरोबर पृथा देखील रथातून खाली उतरली. मी देखील तिच्या सोबत उतरले. कुंतीभोज महाराजांनी माझ्याकडे बघत म्हंटले;"दाई धात्री, आज माझ्या लेकीचा तिच्या पित्याच्या घरात गृहप्रवेश आहे; परंतु तिला उत्तम औक्षण करण्यास सांगावे असे माझ्याकडे कोणीच नाही." महाराजांच्या मनातील इच्छा माझ्या लगेच लक्षात आली. मी पुढे होत म्हणले;"काळजी नसावी महाराज. आजपासून पृथेप्रमाणेच हा राजप्रासाद आणि कुंती नगरीचा मानसन्मान याची काळीज मी माझ्या प्राणापलीकडे घेईन." असे म्हणून मी पटकन राज प्रासादाच्या पायऱ्या चढून आत गेले आणि काही क्षणातच औक्षण तबक घेऊन बाहेर आले. महाराज कुंतीभोज आणि पृथा यांना दीर्घायुषी औक्षण करून मी मागे झाले. पृथेच्या पाठीवर ममत्वाने हात फिरवत महाराज म्हणाले;"बेटा आजवर तुझी ओळख शूरसेन महाराजांची कन्या म्हणून पृथा अशी होती. मात्र आता तू या कुंतीभोजाची आणि पर्यायाने या कुंती नगरीची राजकन्या झाली आहेस. त्यामुळे यापुढे तुझी ओळख कुंती हीच असणार आहे." महाराजांकडे शांत आणि हास्यपूर्ण नजरेने बघत पृथने आपल्या पित्याचे चरणस्पर्श केले आणि महाराजांसोबत गृहप्रवेश केला.

नवीन राजवड्याला समजून घेण्याचे आणि कुंती नगरीचे आणि कुंतीभोज महाराजांच्या घरचे रीतिरिवाज समजून घेण्याचे काम माझ्याकडे आले होते. त्यामुळे सतत राजकुमारी कुंती सोबत राहून मी मला जे कळेल आणि उमजेल ते तिला समजावत होते. राजकुमारी कुंती मुळातच हुशार, समंजस आणि प्रेमळ होती. त्यामुळे तिने केवळ राजवाड्यातील सर्वांचे मन जिंकले असे नाही तर कुंती नगरमधील प्रत्येक नगरवासीयांची ती लाडकी कन्या झाली. कुंती नगरीजवळूनच गंगा नदी वाहात असे. कुंतीला गंगेचे खूपच आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे कुंती अनेकदा गंगेचे दर्शन घेण्यासाठी, गंगा आरती करण्यासाठी आणि गंगेमध्ये स्नान करण्यासाठी म्हणून नगरीतील पदपथावरून चालतच गंगेच्या दिशेने जात असे. त्यावेळी ती आपुलकीने नगरजनांची विचारपूस करीत असे. कुंतीचे गंगा प्रेम बघून कुंतीभोज महाराजांनी कुंतीसाठी गंगेजवळ एक सुंदर महाल बांधून दिला. कुंती अनेकदा एक-दोन दिवसांसाठी त्या महालात जाऊन राहात असे. मी तिच्या सावली प्रमाणे सतत तिच्या सोबत असे. आमच्या वयात माता-पुत्री इतके अंतर असूनही आता मी तिची माता किंवा दाईपेक्षाही मैत्रीणच जास्त झाले होते. दिवस असेच आनंदाने आणि सुखाने व्यतित होत होते. मला क्वचितच एकांत मिळत होता. अशा त्या एकांत क्षणी अधिराज आणि आदित्यची आठवण माझं मन पोखरून टाकत असे. मात्र त्यांची आठवण मला माझ्या वागण्यात, बोलण्यात किंवा डोळ्यात देखीलं दिसणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. माझ्या उदास किंवा दुःखी चेहेऱ्यामुळे माझी कुंती व्यथित होईल याची मला जाणीव होती. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस किती उत्साहपूर्ण आणि आनंदी आहे हेच मी तिला माझ्या प्रत्येक कृतीमधून जाणवून देत होते.

असेच दिवस जात होते आणि एकदिवस कुंतीभोज महाराजांनी राजकुमारी कुंतीस त्यांच्या राजदरबारात बोलावल्याचा निरोप आला. आम्ही कुंती नगरीमध्ये आल्यापासून पहिल्यांदाच महाराजांनी राजकुमारी कुंतीला राजदरबारात बोलावले होते. त्यामुळे आम्हाला दोघींनाही आश्चर्य वाटले. निरोप घेऊन महाराजांचा खास सेवक निवेश आला होता; आणि राजकुमारी कुंतीला सोबतच घेऊन जाणार होता. त्यामुळे मी कुंतीला घाईघाईने तयार केले. कुंती त्याच्यासोबत राजदरबाराच्या दिशेने निघाली तसे मी निवेशला काहीसे मागे ओढून विचारले;"आज अचानक राजकुमारीला राजदरबारात बोलावण्याचे काही खास कारण आहे का?" त्यावेळी घाईने पुढे जाताना त्याने केवळ इतकेच म्हंटले;"ऋर्षी दुर्वास आले आहेत दाई धात्री. आता एकच प्रार्थना करा की कोणत्याही आपत्तीशिवाय राजकुमारी कुंती परत महालात येतील." निवेशचे शेवटचे शब्द तर हवेतूनच माझ्यापर्यंत पोहोचले होते. मात्र त्याचा चेहेरा सर्वकाही सांगून गेला होता.

राजकुमारी परत येईपर्यंत मी ऋषी दुर्वास यांची संपूर्ण माहिती राजपरिवरतील प्रौढ सेवक आणि कुंती नगरीमध्ये आल्यापासून मला पित्यासमान झालेल्या परचेतस यांच्याकडून घेतली. शीघ्रकोपी आणि अत्यंत बुद्धिवान प्रचंड शक्ती प्राप्त असे ऋषी दुर्वास क्वचितच कोणा राजाच्या नगरीत येत असत. त्याचा नेहेमीचा रहिवास हा घोर अरण्यात असे. त्यामुळे ते कुंती नगरीमध्ये असे अचानक का आले असावेत याची कोणालाच कल्पना नव्हती.

मी चातकासारखी राजकुमारी कुंतीच्या परतण्याची वाट बघत होते. मनातून त्या जगद्गनियंत्याकडे एकच मागणे मागत होते की कोणत्याही आपत्तीशिवाय माझी कुंती परत यावी. काही वेळातच कुंती महालाच्या दिशेने येताना दिसली. न राहून मी धावतच तिच्या दिशेने गेले आणि तिला घाईने विचारले;"राजकुमारी काय झाले राज दरबारामध्ये? ऋषी दुर्वास का आले होते?" त्यावर सौम्य हासून राजकुमारी म्हणाली;"धात्री, ते आले होते असे कोणी संगितले तुला? ते आले आहेत ग! त्यांना कुठलासा यज्ञ करायचा आहे. त्यावेळी त्यांना कोणाकडूनही त्रास नको आहे.त्यामुळे त्यांनी माझ्या पित्यांना महाराज कुंतीभोज यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे; आणि महाराजांनी ही जवाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्यांमुळे उद्यापासून माझा दिनक्रम बदलला आहे बर का! उद्या लवकर उठून स्नान करून मी ऋषी दुर्वास यांच्या राजवाड्यातील कुठेमध्ये जायचे आहे. त्यावेळी ते माझ्याकडून त्यांची काय अपेक्षा आहे ते मला सांगणार आहेत." राजकुमारीच्या चेहेऱ्यावर तिच्या पित्याने तिच्यावर टाकलेल्या विश्वासाचा आनंद ओसंडून वाहात होता........... का कोण जाणे पण माझे मन मात्र साशंक झाले होते.

क्रमशः

7 comments:

  1. पुढच्या भागाची उत्कंठा खूप वाढली आहे....पुढच्या शुकवारचे वेध लागलेत आता.....

    ReplyDelete
  2. सुरुवात सुरेख.

    ReplyDelete
  3. म्हणजे खरी तर काल्पनिक पण अगदी खरी वाटावी अशी भावपूर्ण गोष्ट लिहिल्येस. 👌👌

    ReplyDelete
  4. हो. धात्री 100% काल्पनिक! मृत्युंजय मध्ये तिचा उल्लेख आहे. पण केवळ कर्णाला गंगेत सोडण्याचा सल्ला कुंतीला तिच्या दाईने दिला. एवढेच. मला वाटलं एका स्त्रीने एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गंगेत सोडण्यासाठी त्या बाळाच्या आईला सांगितले असले तरी ती स्त्री लगेच दुष्ट आणि हृदयशुन्य ठरत नाही. म्हणून धात्रीच्या आयुष्याविषयी थोडंसं लिहिते आहे

    ReplyDelete
    Replies
    1. छान. Keep it up !
      भाषा छान आणि संवेदनशील.
      जिच्या विषयी फार माहिती नाही अश्या व्यक्ती विषयी इतका पॉसिटीव्ह विचार.... खूप छान.

      Delete
  5. मनापासून धन्यवाद

    ReplyDelete