Friday, November 22, 2019

स्टुडियो अपार्टमेंट


आई-वडिलांच्या मनाविरुद्ध हट्टाने हे स्टुडीयो अपार्टमेंट शेवटी घेतलंच. वर्षभर इथे राहाते आहे भाड्याने. आता अगदी आपलसं वाटतं. स्टुडीओ अपार्टमेंट ही इमारत या गल्लीमधील शेवटून दुसरी; शेजारी एक बंगला आहे. तिथे कोणीच राहत नाही. दिवसभर माळी मामा आणि वॉचमन असतात. त्यांच्या समोरची दोन माजली इमारत पण बहुतेक रिकामीच आहे. माझ्यासारखं दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी रहातं. पण बहुतेक सतत प्रवास वगैरे करत असेल. क्वचितच दिवा दिसतो त्या बाल्कनीत.... ते ही जेम-तेम संध्याकाळी. मग सगळच शांत.
आई आली होती समजावायला. "विकत कशाला घेतेस? भाड्याने राहा. नोकरी बदललीस तर उगाच पैसे अडकतील. त्यात मोठी असली तरी एकच खोली. काय हा वेडेपणा! उद्या लग्न झालं की काय करणार आहेस?" लग्न हा विषय तर ती पदोपदी काढते. मला तर त्यावर बोलायचं देखील नाही. म्हणून मग मी एकूणच तिच्याकडे दुर्लक्ष केलं. "इथून ऑफिस देखील किती जवळ आहे. फुल्ल फर्निश आणि खिशाला परवडतो आहे..." अशी कारणं देत हट्टाने घेतली ही जागा.

कमाल आहे. इतके दिवस हा दिवा त्रास नव्हता देत. हे काय अचानक. तो दुसरा मजलावाला! त्याच्या बाल्कनीचा दिवा बंद न करताच गेला वाटतं टूरवर.

"माळीमामा, तो त्या बाल्कनीमधला दिवा चालूच आहे गेल्या दोन रात्री. झोपले की बरोब्बर माझ्या तोंडावर उजेड पडतो."

"रात्रभर दिवा चालू असतो तिथला?"

"हो!"

"ताई बंद आहे दिवा. थोडं मागे या आणि वर बघा बघू."

"अरेच्या! खरच की. आला वाटत तो टूरवाला. बरं झाालं. गेल्या दोन रात्री जाम त्रास झाला मला त्या उजेडाचा. चला! येते मी."

"ताई, आज सोनचाफा नको?"

"अय्या आहे? हवाच मग!"

अरेच्या मामा सकाळी म्हणाले दिवा बंद आहे. पण आता चालूच आहे. बहुतेक आत्ता लावला असेल. रात्री बंद होईल. झालाच पाहिजे. अगदी तोंडावर येतो उजेड. टॉर्चने मुद्दाम माझ्याच तोंडावर मारल्यासारखा.

अरे बारा वाजून गेले. अजूनही दिवा चालूच? कमाल आहे. या खोलीत दुसरी जागा देखील नाही की मी पलंगाची जागा बदलेन. उद्या जाऊन सांगिन तो जो कोणी आहे त्याला.

"मामा, अहो काल देखील रात्रभर दिवा चालू होता. कोण राहात हो त्या घरात? मी हे घर घेतलं त्यावेळी ते मालक काहीतरी सांगत होते त्या घराबद्दल. पण आता माझ्या लक्षात नाही."

"ताई तुम्ही भाड्याने राहाता ना?"

"नाही हो मामा. म्हणजे भाड्याने राहात होते. पण हे घर इतकं आवडलं की घेऊन टाकलं आत्ता काही दिवसांपूर्वी. माझ्या ऑफिस पासून जवळ आणि माझ्या बजेटमध्ये होत म्हणून."

"ताई, मला बोलला नाहीत!"

आता यांना का बर मी सांगावं की मी हे घर घेतलं? जरा नीट बोललं की जास्तच करतात हे लोक. म्हणे मला बोलला नाहीत! त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघालेच मी. आज घरी जाताना त्या दुसरा मजलावाल्याला मुद्दाम जाऊन सांगणार आहे; दिवा बंद कर म्हणून.

अरेच्या! एकूण घरातले सगळेच दिवे बंद आहेत. नाहीये वाटत तो. नशीब माझं!

हे काय? अचानक आत्ता दिवा लागला? किती वाजलेत? रात्रीचे दोन! काय फालतूपणा आहे!!

"................ ओय.......... अहो! शुक शुक! ओSSS....... तुमच्या बाल्कनीचा दिवा बंद करा हो. गेले काही दिवस खूप त्रास होतो आहे मला."

आयला! रात्रीच्या शांततेत पार दुसऱ्या गल्लीपर्यंत माझा आवाज गेला असेल. पण या माणसाला ऐकायला जात नाहीये. उद्या सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर त्या घरी जाणारच मी.

"अरे ताई कुठे जाता आहात?"

"अहो मामा, आता मला वाटत मुद्दाम मला त्रास व्हावा म्हणून ते जे कोणी आहेत ते दिवा लावतात. वेळी-अवेळी. आत्ता जाऊन सांगणार आहे मी त्यांना."

"नको ताई. त्यापेक्षा तुम्ही जागा बदला."

"जागा बदलू? म्हणजे? अहो एकुलती एक खोली आहे. इतकी जागाच नाही की पलंग दुसरीकडे सरकवू शकेन."

"अहो ताई, मी पलंगाची जागा नाही म्हणत. तुम्ही जा इथून."

"मामा.................. हे अतिच होतं आहे बर का! अहो फुल फर्निश घर आणि इथे मध्य वस्तीत. तरीही शांत आणि माझ्या ऑफिस पासून इतकं जवळ. इतक्या वाजवी किमतीत मिळालं. तुम्ही सरळ सांगता जा म्हणून? कमाल करता हं."

"ताई............ मी साधा माळी आहे. लहान तोंडी मोठा घास वाटेल तुम्हाला. पण ऐका माझं."

"छे! तुमच्याशी बोलत बसले आणि उशीर झाला. संध्याकाळी जाऊन सांगीन. जाते मी."

"ताई........ जाते म्हणू नाही. येते म्हणावं."

डोक्यात जातो आहे तो माळी आता. नवीन राहायला आले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या बंगल्यातला सोनचाफा बघून खुश झाले. त्याला म्हंटल; मला सोनचाफा आवडतो; तर लगेच म्हणाला रोज देईन तुम्हाला. मग इथल्या तिथल्या गप्पा झाल्या... अधून मधून काहीतरी सामान आणायला मदत करायला लागला म्हणून मी पण मामा म्हणायला लागले. पण आता हे अतिच झालं. म्हणे निघून जा घर सोडून. हा कोण लागतो माझा की हक्काने घर सोडा म्हणाला? मूर्ख नुसता! आता बोलणारच नाही त्याच्याशी.

फारच उशीर झाला आज घरी यायला. खूप दामले आहे. आता नाही जात त्या घरी.....

हे भगवान!! गेल्या कित्येक रात्री शांत झोप नाही लागत त्या दिव्यामुळे. परत आज चालू आहे. सकाळ-बिकाळची वाट नाही बघणार आहे मी. आत्ताच जाऊन बोलणार आहे. काय समजतो काय स्वतःला? मनात आलं की दिवा लावतो. बरं, बाल्कनीमध्ये तर एकदाही दिसला नाही.

अरे तरातरा निघाले आणि बहुतेक किल्ल्या विसरले. पण ते सगळ नंतर. आत्ता या क्षणी त्या घरात जाऊन त्या माणसाची हजेरी घेणार आहे चांगली आणि त्या दिव्याची तर वाट लावणार आहे मी.....................................
****
............."अहो! शुक शुक! गेले दोन दिवस मी तुम्हाला या बंगल्याच्या बागेची काळजी घेताना बघते आहे."

"नमस्कार ताई! मी या बंगल्याचा माळी आहे. तुम्ही?"

"या बाजूच्या इमारतीतल्या त्या पहिल्या मजल्यावरचा स्टुडिओ अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे मी. मामा, मला सोनचाफा आवडतो. देता का एखादं फुल?"

"अरे घ्या ना ताई. रोज देईन. नाहीतरी झाडावर सुकून जाणार."

"धन्यवाद मामा."

"......................ताई!"

"काय मामा?"

"एक सांगू?"

"बोला ना!"

"भाड्याने राहा. विकत नका घेऊ ते घर."

"अरेच्या! का मामा?"

"असंच! मागच्यावेळी सांगायचं राहून गेलं होतं. म्हणून............"

आगाऊ आहे हा माळी! जरा मामा म्हणून काय म्हंटल... जास्तच बोलायला लागला. खरतर कित्ती आवडलं आहे हे स्टुडीओ अपार्टमेंट मला.........................

No comments:

Post a Comment