Friday, October 4, 2019

तो आणि ती.... (भाग५ आणि भाग ६)



तो आणि ती...................... सुभद्रा! (भाग ५)


"दादा रे....................... गेला माझा लाडका पुत्र.... तुझा लाडका भाचा आज मृत्युमुखी पडला रे. माझ्या तेजस्वी पुत्राचा अभिमन्यूचा मृत्यू चक्रव्यूहात अडकल्याने नाही झाला दादा.... तो अभेद्य चक्रव्यूह भेदत असताना त्याच्या संरक्षणासाठी त्याचे पिता त्याच्या सोबत नव्हते.............. आणि त्याहूनही महात्वाचे म्हणजे त्याचा मामा नव्हता........ तू नव्हतास दादा.......... म्हणून त्याचा मृत्यू झाला..... माझ्या कोवळ्या पुत्राचा मृत्यू मी कसा सहन करू? दादा तू तर जग्त्तत्राता आहेस ना? मग मला माझा पुत्र आणून दे.... पुन्हा आयुष्यात मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही रे....... पण मला माझा पुत्र हवा आहे."


"सुभद्रे........... सावर स्वतःला. तुझ्या पुत्राला वीर मरण आलं आहे. अभिमन्यूने एकट्याने कौरव सेनेला त्राही त्राही करून सोडले. तो तर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य यांच्याच्याने देखील आवरत नव्हता....."


"नको........ नको करूस त्या युद्धाचे वर्णन मधुसूदना. हाय माझ्यासारखी करंटी मीच असेन या भूतलावर. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केल त्याच्याशी विवाह देखील पळून जाऊन करावा लागला. द्रौपदी ताईने मला स्वीकारले ते देखील तुझ्या प्रेम नितीमुळे हे का मला माहित नाही? तिला भेटताच पदस्पर्श करून 'तुमच्या सख्याच्या धाकट्या बहिणीचा प्रणाम स्वीकार करावात ताई;' असे मी म्हणावे हे तूच तर मला देवळात जाताना सांगितले होतेस. त्यावर काही प्रश्न विचारण्याच्या अगोदरच मला तुझ्या लाडक्या अर्जुनाने रथात घेतले. त्यांच्या विषयीचे प्रेम देखील तूच माझ्या मनात जागवले होतेस.......... सतत त्यांच्या पराक्रमाच्या कथा सांगून."


"भद्रे......... तू माझी लाडकी धाकटी बहिण आहेस. मी तुझ वाईट व्हावं अशी कामना करेन का?"


"नाही रे दादा..... माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र माझ्या आयुष्याचा तीर माझ्याच वर्मी येऊन बसला आहे त्याला काय करू? मी गर्भवती होते त्याचवेळी पांडवांसमवेत द्रौपदी ताईना वनवासात जावे लागले. इच्छा असूनही मी माझ्या प्राणप्रिय पती समवेत राहू शकले नाही. त्याकाळात मी दु:खी राहू नये म्हणून तू कायम माझी सोबत करायचास. अनेक युद्ध कथा अनेक युद्ध रहस्ये सांगून तू माझं मन वीररसाने भारलेले राहील याची काळजी घ्यायचास हे का मला माहित नाही. माझ्या गर्भारपणीच सातव्या महिन्यात तू मला चक्रव्यूह भेदाचे रहस्य सांगितले होतेस; हे मला अजूनही आठवते. मात्र त्यातून बाहेर पडण्याचे रहस्य मात्र तू हेतुपुरस्सर मला सांगायला विसरलास आणि तुझी करणी लक्षात न आलेली मी........ तू जितके सांगितलेस तितकेच मनात घोळवत राहिले. मात्र त्या अपराधाचे फळ हे असे असेल याची मला त्यावेळी किंचित देखील शंका आली नव्हती."


"लाडके...... भद्रे........... आवर हे दु:ख. जन्माला येणारा प्रत्येक जीव एक जीवितकार्य घेऊन आलेला असतो. तुझा तेजस्वी पुत्र अभिमन्यू देखील केवळ चक्रव्यूह भेदण्यासाठी जन्माला होता........"


"दादा.............. काय बोलतो आहेस हे? माझ्या पुत्राचा मृत्यू तुला माहित होता? हाय रे माझ्या नशिबा!!! माझा जाग्त्नीयन्ता बंधूच जर माझ्या पुत्राच्या दीर्घायुष्याची कामना करत नव्हता तर माझ्यासारख्या य्कंचित स्त्रीच्या इच्छेचा प्रश्नच उद्भवत नाही. जा दादा जा............ याहून जास्त मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. मात्र मला एका प्रश्नांचे उत्तर देऊन जा.... त्या नवयौवना...... नववधू.......... गर्भवती उत्तरेला मी कसे तोंड दाखवू? दादा........ तिच्या गर्भातील बाळाच्या आयुष्याची दोरी देखील तू अशीच लहान ठेवली आहेस का रे?"


"सुभद्रे.......... तू अतीव दु:खात आहेस त्यामुळे तू काय बोलते आहेस ते तुला समजत नाही आहे. अर्थात तुझे दु:ख मी समजू शकतो. तुझे सात्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत भद्रे. कदाचित् तुझ्या दु:खासोबत तुला एकटे सोडणे हाच एक उपाय आहे याक्षणी. मात्र जाताना शब्द देतो धाकटे......... उत्तरेचा पुत्रच पुढे जाऊन पांडवांचे राज्य सांभाळेल. तो महान पराक्रमी आणि अजिंक्य राजा असेल.......... येतो मी!'


-----------------------------------------------------------------------------------------




तो आणि ती ........ कुंती! (भाग ६)

"श्रीकृष्णा, तू जरी माझा भाचा असलास तरीही माझ्या आयुष्यातील तुझं स्थान वेगळ्या भावनेने व्यापलेलं आहे. तुझं असणं माझ्या पाचही मुलांच्या आयुष्याचं संरक्षण कवच; हे मी कधीही विसरणार नाही. केवळ त्यांच्याच बाबतीत नाही तर तू मला देखील अनेकदा धर्म संकटातून वाचवलं आहेस. द्रौपदीला घेऊन अर्जुन दारात उभा राहिला होता; तो प्रसंग तर मी आयुष्यात विसरणार नाही."

"आते, मी द्रौपदीला समजावलं हे खरं असलं आणि त्यासाठी तू मला कितीही महत्व दिलंस तरीही तुझ्या मनातील सत्य मी का जाणत नाही? द्रौपदीच्या अनन्यसाधारण सौंदर्यामुळे तुझ्या पाचही पुत्रांमध्ये फूट पडू नये म्हणून त्याक्षणी तू घेतलेला तो निर्णय योग्यच होता. त्यामुळे तू घेतलेल्या निर्णयाला शास्त्राधार देणं हे माझं कर्तव्यच होतं."

"मुकुंदा! हस्तिनापूराच्या महासभेत तू खांडववनाचा हिस्सा मान्य केलास त्यावेळी माझा तुझ्या त्याच शास्त्राधारावर गाढ विश्वास होता. त्यानंतरची द्यूतक्रीडा तू थांबवू शकला असतास. हे अनेकदा माझ्या मनात आलं; मात्र ज्याप्रमाणे द्रौपदी पांडवांची पत्नी व्हावी हे विधिलिखित तू ओळखलं होतंस; त्याचप्रमाणे द्युतक्रीडा आणि पांडवांचा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास देखील विधिलिखित असावं याची मला कल्पना होती. मात्र द्रौपदीने त्यांच्याबरोबर हा वनवास भोगू नये असं मला त्यावेळी खूप वाटत होतं."

"आते, तिचं पांडवांबरोबर असणं आवश्यक होतं ग. नाहीतर माझ्या प्राणप्रिय सखीला मी असं रानावनात जाऊ दिलं असतं का?"

"खरंय तुझं मधुसूदना! त्या तेरा वर्षानंतरची तुझी कौरवसभेतील शिष्ठाई आणि त्यानंतरचं युद्ध...."

"आते, आज तुझे पुत्र जेते आहेत आणि धर्मप्रस्थापना झाली आहे. मग हे असं भूतकाळातील घटनांबद्दल तू का बोलते आहेस? तुझे पाच पुत्र माझे कोणीच नसल्यासारखे का बोलते आहेस? तुला का माहित नाही....."

"थांब श्रीकृष्णा! आज मी तुला भूतकाळाबद्दल बोलण्यासाठी पाचारण नाही करवलं. आज आयुष्याच्या संध्याकाळी.... विविध चढ-उतारांच्या अनुभवातून गेल्यानंतर माझ्या मनात आयुष्याबद्दल कोणतीच शंका नाही. मात्र हे जग्दनियंत्या, मनात एक किंतु आहे; त्याचे निरसन झाले नाही तर मृत्यूसमयी  मला शांती मिळणार नाही."

"आते, काय बोलते आहेस? तू ज्यावेळी अल्लड पृथा होतीस त्यावेळी देखील कदाचित् मनात किंतु आणला नसशील. मात्र आता सर्वच उत्तम झालं असताना तुझ्या मनात किंतु यावा हे माझ्या आकलना बाहेरचं आहे."

"मोहना, तुझ्या आकलना बाहेर चराचरातील बिंदू देखील नाही. तरीही.... तुला माझ्या मुखातूनच ऐकायचे आहे आणि मला देखील तुला स्पष्ट विचारायचे आहे. मिलिंदा.... अनेक दिवसांच्या प्रयत्नाअंति आज मी धाडस एकटवलं आहे; बोलुदे मला!"

"जशी तुझी इच्छा..... तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास मी बांधील आहे."

"हे श्रीकृष्णा, कुरुक्षेत्रावरील युद्ध नक्की होणार हे ठरल्यानंतर केवळ तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या सर्वात मोठ्या पुत्राकडे गेले होते...."

"ती काळाची गरज होती आते...."

"मान्य मधुसूदना.... त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. नकळत्या वयात असली तरी चूक ती चूकच हे मी मान्य करते. माझा प्रश्न निराळा आहे. कर्ण माझा पुत्र आहे; पांडवांचा ज्येष्ठ बंधू आहे हे समजताच माझ्या पुत्राने युधिष्ठिराने मला उद्देशून समस्त स्त्रीजातीला शाप दिला.... 'यापुढे आम्ही कोणतेही गुपित उदरात सामावून ठेऊ शकणार नाही!' जग्दउद्धारा, कर्णाच्या जन्माचे सत्य मी इतर पाचांना सांगू नये; हे तूच मला सांगितले होतेस. मग ज्यावेळी माझाच पुत्र मला उद्देशून मात्र समस्त स्रीजातीला शापित होता त्यावेळी तू मध्ये का नाही पडलास? त्या घटनेने मी शब्दातीत झाले होते. परंतु संपूर्ण सत्य माहीत असणारा; किंबहुना ते घडविणारा तू समोर असूनही त्यावेळी तो शाप तू थांबवला नाहीस.... का?"

"कुंतीआते, युधिष्ठिराच्या शापामुळे स्रीजातीला गुपित सांभाळता येणार नाही; असे खरच तुला वाटते का? पुरुष कायमच सर्व गुपिते स्वतःजवळ ठेवतात आणि ठेवतील; यावर तुझा पूर्ण विश्वास आहे का?"

"श्रीविश्वेश्वरा, प्रश्नाचे उत्तर प्रश्नाने नको देऊस. आता कोडी सोडविण्याचे बळ माझ्या अंगात राहिलेले नाही."

"बरं! आते, केवळ तुला म्हणून सांगतो.... सत्य समजल्या नंतर धर्माधारावर चालणाऱ्या युधिष्ठिराचे मन त्याला खाऊ लागले. नकळत का होईना आपल्याकडून आपल्या ज्येष्ठ बंधुवर अन्याय झाला आहे; आणि त्याबदल्यात कर्णाने मात्र सर्वस्व जाणून अर्जुनाचे प्राण आपल्या झोळीत टाकले आहेत; हे सत्य त्याचे मन जाळू लागले. त्या आंतराग्नीच्या ज्वाला युधिष्ठिराला सहन होईनात. त्यामुळे केवळ मन:शांति प्राप्तीसाठी त्याने तो शाप उच्चारला होता."

"जर हे सत्य असेल...."

"अहं! आते, मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यास बांधील आहे; हे जितके सत्य आहे... तितकेच सत्य हे देखील आहे की जगद् चक्र चालण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे योग्य नाही; येतो मी. सुखम्sभवतु!"







No comments:

Post a Comment