Friday, September 27, 2019

तो आणि ती..... (भाग 3 आणि 4)





तो आणि ती............ यशोदा! (भाग 3)


"गोपाला.... प्रत्येक स्त्रीला बाळाला जन्म देतानाच्या वेदना कायम लक्षात राहातात आणि त्याहूनही जास्त लक्षात राहातं ते बाळाचा जन्म घेताच आलेला रडण्याचा पहिला आवाज. मी  मात्र जन्म देताना पूर्ण ग्लानीत होते... जाग आली तेव्हा तू कुशीत होतास. जन्मतःच आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होतास. तुला पहाताच माझा उर भरून आला आणि काहीही कळण्याच्या आत मी तुला पदराखाली घेतला. तुझ्या त्या कोवळ्या ओठांच्या स्पर्शात परमोच्य सुख होतं. किस्ना, तू दिसामासाने वाढत होतास आणि तुझा खट्याळपणा देखील त्याच गतीने वाढत होता. बंसिधरा...... गोपींच्या तक्रारी... तुझं त्यांच्या घरात शिरून लोणी चोरणं.... गोकुळातल्या सर्व गुरांना एकत्र करून आपल्या बासरीवर नादावण.... सर्वस्व मी मातेच्या हृदयाने आकंठ जगत होते..... तरीही......"


"माते....आज इतक्या वर्षांनी विचारांच्या वेगाने आणि मातेच्या मनासोबत इतक्या दूर मला भेटायला आली  आहेस ते याच तरीही.... बद्दल सांगायला तर नव्हे?"


"मनमोहना...... तुला माहीतच आहे रे माझ्या अंतरीच गुज. हो! आज इथे वृंदावनात असूनही मी द्वारकाधीशाच्या द्वारकेत त्याच्या प्रासादाच्या श्री आसनावर बसले आहे ते आई यशोदेच्या मनाने. तुझ कोमल... खट्याळ.... शूर आणि प्रेमळ शैशव मी आकंठ जगले यात वादच नाही. पण तरीही खोल मनात ही जाणीव होती की तू केवळ माझा पुत्र नाहीस... तू जगद्उद्धारासाठी आलेला महापुरुष आहेस. मात्र ही जाणीव मी कायमच जाणून-बुजून दडपून टाकायचे. तुझ्याबद्दल कोणीही कितीही तक्रारी केल्या तरी तुला क्षणापुरते लटके रागावायचे... पण मग माझ्या पदराआड लपवून टाकायचे. नंदना, मला भीती होती की तुला मी रागावले आणि त्या रागाच्या भरात तुझ्याकडे पाठ केली तर कदाचित् मी वळून बघेन तेव्हा तू तिथे नसशीलच."


"आई, मी शरीराने तुझ्यापाशी असलो किंवा नसलो तरी माझ बालमन कायमच तुझ्याभोवती रुंजी घालत राहाणार आहे; हे तुला माहित आहे न? तुझ्या मातृप्रेमाचे धडे घेतच मी मोठा झालो आहे. तू कायमच  माझा... फक्त माझाच काय पण संपूर्ण गोकुळाचा मातेच्या प्रेमाने सांभाळ केलास. मी तुझ्याच पावलावर पाउल ठेऊन आज द्वारकेचा सांभाळ करतो आहे."


"मधुसूदना, तुझ्याशी बोलताना कोणी जिंकू शकेल का? तुझ्या मनात आजही माझी आठवण आहे हे समजून आज माझ्या जिवनाच सार्थक झालं. एक सांगू गिरिधरा, मथुरेचे राजमंत्री अक्रूर तुला घ्यायला आले तो दिवस मला तुझ्या माझ्या आयुष्यातून पुसून टाकता आला असता तर किती चांगलं झालं असतं. मग तू कायमच माझ्याजवळ गोकुळात राहिला असतास."


"माते, पण माझा जन्म..........."


"नको वासुदेवा! नको आठवण करून देऊस... सगळं सगळं जाणून आहे मी. मृगनयना, तू मात्र हे विसरतो आहेस की माझं हृदय आईचं आहे. तू एकदा पाठ करून गोकुळातून निघाल्यानंतर एकदाही वळून आला नाहीस रे. आजही मी सांजसमयी  तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसते. वाटतं कदाचित् खांद्यावर घुंगुरकाठी घेऊन एका हाताने बासरी वाजवत गुरांमागून येऊन तू आज देखील अचानक समोर उभा राहशील. पण आता मात्र माझे नेत्र दमले आहेत. म्हणूनच आज मी मनाच्या वेगाने आईच्या वात्सल्याने तुला भेटायला आले आहे. मुरलीधरा... आज माझं एकच मागण आहे."


"माते यशोदे........ अस निर्वाणीचं नको ग बोलूस. मी परत गोकुळाला परतलो नाही कारण गोकुळ सोडताना जे निष्पाप मन मी घेऊन निघालो होतो ते कुठेतरी हरवून गेलं. त्यांतर जो कृष्ण उरला तो तुला सहन झाला नसता. सांग आई....... मी काय केलं तर तुला बरं वाटेल?"


"मुरलीधरा, मी देहाने गोकुळातल्या तुझ्या लाडक्या उखळापाशी बसले आहे. तू तुझ्या द्वारकेत बसून तुझ्या मधुर मुरलीचे स्वर आळव............. आता हृदयातल्या तुझ्या बाललीलांच्या आठवणींमध्ये आणि कानात गुंजणाऱ्या तुझ्या मुरलीच्या स्वरांच्या सानिध्यात मला माझा शेवटचा श्वास घ्यायचा आहे........."


"आssssssssई.......................... माते....................... यशोदे.......!!!"

------------------------------------------------------






तो आणि ती................ राधा ! (भाग 4)


"राधे...... तू आणि इथे द्वारकेत?"


"तुला देखील वाटलं नाही ना की मी इथवरचा पल्ला गाठेन? त्या स्वप्नवत नंदनवनातील सुरक्षित आयुष्यातून बाहेर पडून केवळ तुझ्या शेवटच्या.......दर्शनासाठी मी द्वारकेचा दरवाजा वाजवेन?"


"शेवटच्या? का राधे? कुठे जाते आहेस तू? असे निर्वाणीचे शब्द तुझ्यासारख्या जीवनाने ओतप्रोत भरलेल्या स्त्रीला शोभत नाहीत. तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाचे कारण हेच तर आहे की तू कायमच सळसळत्या उत्साहाने ओसंडत असायचीस. स्त्रीत्व म्हणजे काय ते तूच तर मला समजावलस. कधी अबोल डोळ्यांनी, तर कधी धावत्या शब्द लडयांनी, कधी उत्कट स्पर्शातून तर कधी व्याकुळ मिलनातून... अनेकदा मात्र ओसंडत्या भक्तीतून ते जास्त जाणवलं.......... मग ती रात्री-बेरात्री रचलेली रासक्रीडा असो किंवा यमुनेच्या पात्रातील तुझे नाहाणे असो..... तुझा तो प्रसन्न टवटवीत चेहेरा कायम मला जीवनातील निरामय आनंदाचा अर्थ सांगून गेला आहे..... आणि आज मात्र तू हे असे निर्वाणीचे बोलते आहेस?"


"कृष्णा...... तुझे हे दर्शन शेवटचे असे मी का म्हणाले हे तुला खरच कळले नाही का?की आता तू तुझ्या राधेशी देखील शब्दच्छल करतो आहेस? किंवा अस म्हणू; तू देखील तुझ्या राधेला समजू शकला नाहीस? जर तुझ्या समजण्यापलीकडे ही राधा असेल तर मग मी इतरांकडून काय अपेक्षा करावी? मोहना.... माझी सासू..... माझा पती अनय...... मला एकच प्रश्न सतत विचारायचे. संसारात असूनही तू नसतेस.... तू तुझ्या मुलांमध्ये असूनही त्यांच्यात रमत नाहीस..... तो गेल्यानंतर आपले उत्सव... आपले सण..... केवळ आयुष्याचा एक भाग  म्हणून करतेस. अस काय आहे त्याच्यात? मधुसूदना... त्यांच्या या प्रश्नांवर देखील मी काहीच बोलायचे नाही. त्यांना वाटायचं की मी उत्तर न देऊन त्यांचा अपमान करते आहे. पण माझ्याकडे याचे उत्तरच नव्हते रे."


"राधे.... काही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात आणि काही प्रश्नांची उत्तरे असूनही ती न दिलेलीच चांगले असते."


"मोहना.......... तुझ्या या वाक्यात सर्वकाही आले रे. तुला कळला आहे 'मी शेवटचे दर्शन घेण्यासाठी आले;' या माझ्या बोलण्याचा अर्थ. पण मनमोकळेपणी ते कबुल करायला तू आता नंदनवनातील गोपाळ राहिला नाहीस. खूप बदलून गेलास रे...... वृन्दावनातला कन्हैया तोलून मापून बोलत नसे. गोपिकांना छेडताना त्यात जितका स्वच्छ भाव होता आणि नजरेत केवळ प्रेमळ चेष्टा होती; तो माझा किसन आता मला तुझ्यात दिसत नाही. वयाने माझ्याहून लहान असणाऱ्या तुझ्यावर एका नवथर प्रेयसिप्रमाणे प्रेम करताना मी समाजाची........ घरच्यांची..... आप्तजनांची कोणाचीच तमा बाळगली नाही. तू माझा प्रियकर होतास...... आणि कायमच राहाशील...... मला माहित आहे; तुझ्या मनात देखील खोल कुठेतरी एक कळ उठतेच माझ्या नावासरशी. म्हणूनच आज इथे या खाऱ्या समुद्राच्या सानिध्यात तू एकटाच बसला आहेस; तुझं गण-गोत लांब सोडून. गोपाला... येते मी. या तुझ्या द्वारकेत राधेच्या प्रेमाला जागा नाही हे मला माहित आहे. मात्र जाताना एक प्रश्न विचारते त्याचे उत्तर दे........ अहं! मला नाही..... तुझ्या मनाला.................... आजही हातात चक्र असताना देखील कंबरेची ती बासरी तू त्यागलेली नाहीस........... ती वृन्दावनाची आठवण की या राधेची?"

क्रमशः










No comments:

Post a Comment