Friday, October 11, 2019

 तो आणि ती ....... द्रौपदी (भाग 7)



 तो आणि ती ....... द्रौपदी! (भााा 7)गग

"कृष्णे, तुझ्या बोलावण्यावरून मी आलो. पांडवांच्या विजयामुळे संपूर्ण आर्यवर्त दुष्ट, दुर्जन राजापासून मुक्त झालय. चर्चा मात्र हीच होणार की महाभारताचे युद्ध केवळ द्रौपदीच्या अपमानाच्या बदल्यासाठी झालं. याद्न्सेनी, तुझ्या रूपापेक्षा तुझी कुशाग्र बुद्धी मला कायम मोहवून गेली. पांचाली म्हणून जगताना देखील तू तुझं स्वत्व कधीच सोडलं नाहीस. म्हणूनच पांडवांच्या संदर्भातील प्रत्येक निर्णयात मला तुझा सहभाग हवा असायचा. तुझ्या वेगळेपणामुळे तू माझी सखी झालीस."

"यादवा...तू माझ्याबद्दल जे सांगितलस ते खरं असलं तरी यासर्वापलिकडे मी मातादेखील आहे! माझे पुत्र माझ हृदय होते.
तू जरी जगद्नियंता असलास तरीही तू माता नाहीस. यदुकुलभूषणा, प्रत्येक अपत्य जन्माच्या वेळी मातेचा अनेकार्थाने पुन्हा जन्म होत असतो. स्रीहृदयातील पुत्रशोक तुला कसा कळावा? कृष्णा, युद्ध संपल्यानंतर माझ्या पाची पुत्रांना झोपेत कपटाने मारण्यात आलं रे...."

"सखे, त्या कृत्याची शिक्षा अश्वथाम्याला.............."

"कृष्णा....नंतर काय झालं याचा हिशोब कशाला? पुढच्या पिढीच्या आदर्शासाठी, न्याय-अन्याय, नीति-अनीती यातील फरक कळावा म्हणून मी किती सहन करायचं? माधवा...माझा जन्मचमुळी सूडासाठी! माझ्या अस्तित्वाला पाचजणात वाटून माझ्या व्यक्तित्वाचा अपमान झाला, भर दरबारात माझ्या स्त्रीत्वाचा अपमान झाला, महाभारताचे युद्ध देखील माझ्यामुळे-माझ्यासाठी झाले. मी मात्र आयुष्याचा प्रत्येक क्षण कर्त्यव्यपूर्तीसाठी जगले. यादवा, जन्मापासून आजवर माझ्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग ही तुझीच करणी आहे! महाभारताचा करविता तूच आहेस! तूच तर जग्त्नियंता आहेस!
केशवा....आज मात्र मी तुझ्याकडे जे मागणार आहे ते आपल्या शब्दापलीकडच्या नात्याला साक्ष ठेवून."

"कृष्णे....मी तुझ्यासारख्या सम्राज्ञीला काय देणार?"

"मोहना.......शब्दछल नको. थकले आता. सम्राज्ञीपद-राज्ञीपद काही नको मला. बस् एकच मागणं आहे. यापुढे मला कोणाचाही मृत्यू बघण्याची वेळ न येवो. नाहीतर तू माझी जी कणखर मनाच्या स्त्रीची प्रतिमा पुढील पिढीसाठी उभी केली आहेस ती ढासळून जाईल. माझ्यातील दुःखी, हताश आणि कमजोर स्त्रीच केवळ भारतवर्षाला लक्षात राहील. म्हणूनच हे मधुसूदना...मला एक वरदान दे...यापुढे मला कोणाचाही मृत्यू बघायची वेळ न येवो. कृष्णा तुझ्या कृष्णेच शेवटच....स्वतःसाठी मागितलेल दान तिच्या पदरात टाक. सखया...यापुढे माझा मृत्यु सर्वात अगोदर होईल इतकंच माझं मागण पूर्ण कर!"

"तथास्तु कृष्णे! तथाsअस्तू!!!"


2 comments: