Friday, October 18, 2019

तो आणि ती.... (भाग ८) आणि (भाग ९)

तो आणि ती........... सत्यभामा!

"महाराज, मी तुमची तृतीय पत्नी असून देखील तुम्ही मला मानाचे स्थान कायम दिलेत... माझे हट्ट पुरवलेत... पण तरीही माझ्या मनी एक प्रश्न कायम तसाच राहिला."

"सत्यभामे, प्रिये.... तुला प्रश्न तरी किती पडतात? तू एका शूर ज्येष्ठ यादवांची सुकन्या आहेस. त्यामुळे तू देखील युद्धकुशल शूर वीरांगना आहेस... तेवढीच तू कोमल तनु-सुंदर स्त्री देखील आहेस. माझ्या मनात कायम हा प्रश्न राहिला आहे की तुझ्या पिताश्रींच्या तिजोरीतील तो स्यमंतक जास्त तेजस्वी की तुझे हे मुखमंडल.... तू का हे जाणून नाही की तुझ्या प्रत्येक हट्टामध्ये माझीच इच्छा सुप्तपणे अंतर्भूत असायची."

"हो ना वीरेश्वरा? मी रुक्मिणीताईना हेच तर कायम सांगत आले. आपण जी इच्छा बोलून दोखवतो ती खरे तर तुमच्या मनातील भाव असतात. पण मी असे म्हंटले की त्या केवळ मंद हसतात.................. पहा पहा.......... अगदी असंच.... तुम्ही जसे गालात हसता आहात तसं...... कारण विचारलं की म्हणतात, भामे मी नाही ग हसत; तुला भास झाला असेल. सांगाना हो प्राणेश्वरा, त्या असं मंद गूढ का हसतात?"

"द्वारका नगरीच्या तृतीय का होईना माहाराणी आहात आपण.... आणि असल्या शुल्लक हास्याचा विचार करता? नका विचार करू रुक्मिणीच्या हास्याचा."

"महाराणी................ हम्म.............. जाऊ दे झालं! मात्र मला माझ्या प्रश्नाच उत्तर हवंच आहे आज."

"महाराणी.... पहा बर.... मग मन दुखाल्याची तक्रार नाही एकून घेणार मी..... तर रुक्मिणी गूढ का हसते! भामे, रुक्मिणीने आयुष्यभर फक्त माझाच विचार केला. ती माझी प्रथम पत्नी... आपल्या बंधूच्या आणि पर्यायाने रक्ताच्या सर्व नात्यांना कायमचे त्यजून तिने माझ्या मनात वरमाला घातली. एकमेकांना न पाहाता देखील आत्ममिलन होऊ शकते; हे रुक्मिणीने दाखवून दिले..."

"माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर न देता जर आपणाला ताईंच्या आपल्यावरच्या प्रेमाचे कौतुक करायचे असेल तर राहुदेमुळी हा संवाद."

"अग भामे... अशी लगेच का चिडतेस? तुझ्या प्रश्नाच्या उत्तराचा कार्यकारण भाव नको का तुला कळायला."

"राहिलं! आपण बोलावत.... मी प्रश्न करून फसले आहे ना? आता मला एकून घावे लागेल."

"प्रिये...... तुझ्या पिताश्रींकडील स्यमंतक मणीरत्न हरवण्याच्या अगोदर त्याची मागणी मी द्वारकेच्या भरभराटीसाठी केली होती हे तर तू जाणतेसच. मात्र त्यामुळेच ते मणीरत्न हरवताच ते मी घेतले असेल असे सत्रजितकाकांच्या............ तुझ्या पिताश्रींच्या............ मनात आले. स्यमंतक मणीरत्न मिळवून आणिन हा त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी द्वारका सोडली आणि या मणीरत्नासोबत जांबवतीला घेऊन मी द्वारकेत परतलो. त्या मणीरत्नाच्या शोधाचे फळ म्हणून तर तू मला मिळालीस. मात्र तुझ्यातील तडफदार स्त्रीमुद्रा कधीच कमी झाली नाही.... अर्थात ती होऊ देखील नये. तुझ्यात असलेल्या क्षत्राणीतेज असलेल्या ... शूर.... युद्धकुशल स्त्रीने स्वत्व कधीच त्यजले नाही. म्हणूनच हट्टाने मनीच्या इच्छा पूर्ण करून घेणे तुला कायम जमले. मात्र प्रिये...... रुक्मीणीच्या मनी इच्छा कधी उपजालीच नाही.... ती कर्म... आणि कर्त्यव्य केवळ प्रेम भावनेने करत गेली. त्यामुळे तू ज्यावेळी तिला म्हणतेस की तुझा हट्ट ही माझ्या मनीची इच्छा आहे.... त्यावेळी रुक्मिणी मंद हसून तुला सांगते की पतीमानाची इच्छा ही मन:स्पर्शाने समजून घ्यावी. त्यासाठी शब्दछल करण्याची गरज नाही......"

......................................................................................

तो आणि ती......... जांबवती!

"जांबवती, प्रिये...... मला आज तुला काहीतरी सांगायचे आहे. केवळ त्यासाठीच आज मी तुझ्या प्रासादात थांबणार आहे असा निरोप धाडला होता. परंतु तुझ्या चेहेरा मात्र मला दुसरेच काही सांगत आहे."
"यादवश्रेष्ठ, तुमच्या पासून कधी काही लपून राहिले आहे का? आज मला देखील मनमोकळेपणी तुमच्याशी बोलायचे आहे. यदुकुल भूषणा, आज इतकी वर्षे मी तुमची द्वितीय पत्नी म्हणून या प्रासादात राहात आहे.... तुमच्या सुपुत्राची माता आणि वसुदेव बाबा आणि देवकी आईंची सून म्हणून मिरवते आहे. तसे बघितले तर मला काहीच कमी नाही. परंतु तरीही मला माझ्या मनीचे गूज तुम्हाला सांगण्याची इच्छा गेले अनेक दिवस होते आहे..... तुमच्या सारख्या मनकवड्या देवेश्वरापासून हे कसे लपून राहील? त्यामुळे माझी खात्री आहे की म्हणूनच आज तुम्ही माझ्या प्रासादात थांबण्याचे ठरवले आहे. देवकीनंदना, तुमची आणि माझी गाठ बांधली गेली ते केवळ आणि केवळ त्या अनमोल स्यमंतक मणीरत्नामुळे; याची मला पूर्ण जाणीव आहे. स्यमंतक मणीरत्न बाळगणाऱ्या सत्रजीत महाराजांच्या बंधूंच्या; प्रसेन महाराजांच्या मृत शरीराच्या गळ्यातून ते मणीरत्न माझ्या वडिलांनी; जांबवान बाबांनी आपल्या बरोबर आणला. परंतु हे वसुदेव पुत्रा, तुम्ही चांगलेच जाणता की त्यांनी त्या मणीरत्नाच्या मोहामुळे असे काही केले नव्हते. श्रीदेवा, तुम्हाला सर्व यादवांना जाणवून द्यायचे होते की कोणतेही मणीरत्न सुदिन आणत नाही जोपर्यंत त्यामागील भावना स्वच्छ आणि प्रामाणिक नसते. त्यासाठी तुम्ही नामानिराळे राहात सर्व लीला केली होती; याची चर्चा संपूर्ण द्वारका नगरीमध्ये त्यावेळी झाली होती. त्याचप्रमाणे तुम्ही या मानिरत्नासाठी माझ्या बाबांशी मल्लयुद्ध देखील केलेत. त्या युद्धात हरल्यानंतर बाबांनी त्या स्यमंतक रत्नासोबत मला देखील तुमच्याकडे सुपूर्द केले."

"प्रिये, तुझ्या मनातील भाव बोलण्याचे सोडून तू हे काय सांगते आहेस मला?"

"द्वारकाधीशा, माझ्या मनातले भाव तुम्ही जाणताच. तरीदेखील मनीची इच्छा व्यक्त करताना त्यामागील कार्यकारण भाव देखील तुम्हाला मी स्वमुखे वदित करावा असे वाटले; म्हणून हे सर्व सांगते आहे."

"बोल जांबवती, काय आहे तुझी इच्छा?"

"देवेश्वरा, तुम्ही ज्याप्रमाणे स्यमंतकापेक्षा शुद्ध भावना महत्वाची हे सांगण्यासाठी ती घटना घडवून आणलीत त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मागील अवतारकार्य आयुष्यात माझ्या वडिलांना दिलेल्या वचन पूर्ततेसाठी देखील ती घटना घडवून आणली होतीत; हे मी जाणून आहे. रावण वधानंतर माझ्या वडिलांनी तुमचा निरोप घेताना तुम्हाला विचारले होते की त्यांना तुमच्या त्या निरामय श्रीराम रूपाचे दर्शन परत कधी होईल. त्यावेळी तुम्ही त्यांना वचन दिले होते की पुढील अवतार आयुष्यात तुम्ही त्यांना परत भेटून दर्शन द्याल.... आणि त्याप्रमाणे माझ्या बाबांना दिव्य श्रीराम दर्शन झाले....."

"जांबवती, तू बुद्धिमान खरीच..... मात्र तुझी इच्छा तू मला सांगते आहेस हे विसरू नकोस. इच्छा व्यक्त करण आणि काहीतरी मागण यात फरक असतो बर..... "

"मग माझे शब्दच खुंटले! विश्वेश्वरा............ माझ्या जन्मोजन्मीच्या पुण्याचे फळ म्हणूनच या जन्मी श्रीकृष्ण पत्नीचे स्थान मला मिळाले. तरीही..... बहुदा मानवाच्या मनाला शापच आहे की कितीही मिळाले तरी इच्छा संपत नाही आणि मी एक मानवी ह्रृदय असलेली सामान्य स्त्रीच आहे. त्यामुळे मी माझी इच्छा या श्रीचरणी ठेवते. मोहेश्वरा.... माझ्या बाबांना ज्याप्रमाणे श्रीरामांचे दर्शन झाले त्याप्रमाणे मला देखील व्हावे................... "

"देवी, आपल्या सुकार्मांचे फळ आपल्याला जरूर मिळते. मात्र आपण ते प्रसादरुपी फळ शिरोधार्य समजावे. तुझ्या पिताजींच्या पुण्यकर्माचे फळ म्हणूनच तू म्हणतेस त्याप्रमाणे श्रीराम दर्शन त्यांना झाले; तसेच तूच म्हंटल्याप्रमाणे तुझ्या पुण्यकर्माचे फळ म्हणून तू महाराणी झाली आहेस............. अजून काय सांगू? बर, ते जाऊ दे... चल; आज सारीपाटाचा एक डाव तुझ्यासोबत खेळण्याची माझी इच्छा आज तू पूर्ण कर. प्रश्न इच्छापूर्तीचा आहे ना? मग तुझी इच्छापूर्ती आणि माझी इच्छापूर्ती यात फरक तो काय?"
....................................................................

No comments:

Post a Comment