Friday, September 20, 2019

तो आणि ती............... प्रस्तावना (भाग 1 आणि 2)


तो आणि ती............... प्रस्तावना

तो जगद्नियंता.......... विश्वनिर्माता......... बंसीधर........ गोपाल.......... यदुकुलनंदन.......... देवकीपुत्र............... कृष्ण..... मधुसूदन............ मोहन............ आणि वासुदेव! असा खूप काही. सर्वांमध्ये असूनही नसलेला.......... चमत्कार करूनही मानवी रुपात रमलेला. अशा त्या विश्वरुपी मानवाशी त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीची भावनात्मक गुंतवणूक वेगवेगळ्या स्तरावरची होती. त्याची जन्मदात्री आई देवकी, त्याचा सांभाळ करणारी यशोदा, त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी त्याची प्रेयसी राधा, त्याची धाकटी बहिण सुभद्रा, त्याची सखी द्रौपदी, त्याच्या चार आत्यांपैकी त्याला अत्यंत प्रिय आणि जवळची आत्या कुंती आणि त्याच्या आठही पत्नी... रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी.......... प्रत्येकीने त्याला आपल्या भावनेने बघितलं. त्याने देखील त्या भावनेचा आदर करून त्याप्रमाणे त्या प्रत्येकीला आपल्या जीवनात स्वीकारलं. या नात्यांचा गोषवारा म्हणजे तो आणि ती.......... यात तो कायमच वसुदेव पुत्र श्रीकृष्ण आहे. मात्र ती प्रत्येकवेळी वेगळी आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या या प्रत्येक स्त्रीच्या मनातले भाव इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.... 


भाग 2


तो आणि ती............. देवकी! 

"यादवा, आज आयुष्याच्या उत्तरार्धात मागे वळून बघते तेव्हा वाटत अनेकविध घटनांनी भरलेलं आयुष्य जगले मी. वडिलांची आणि मोठ्या भावाची लाडकी होते मी. कितीतरी कौतुकाने कंसदादाने माझं लग्न तुझ्या वडिलांशी लावून दिलं होत. त्यादिवशी आम्ही सगळेच कितीतरी आनंदात होतो. मात्र त्याचवेळी ती आकाशवाणी झाली आणि माझ्या आयुष्याचे फासेच फिरले. कारावासात असताना अनेकदा मनात येऊन गेलं; जर ती आकाशवाणी झालीच नसती तर; कदाचित् आयुष्य वेगळं असत. कंसदादाच्या वधानंतर तू स्वतःचा राज्यभिषेक न करता हट्टाने तुझ्या वडिलांना सिंहासनावर बसवलंस; त्यावेळी मला तुझी माता असण्याचा अभिमान वाटला. मात्र तुझ्याअगोदारचे माझ्या सहा पुत्रांच्या मृत्यूचे दु:ख सतत माझ्या हृदयातली जखम ओली ठेवत होते...."

"माते, तू मला तेव्हाच का नाही सांगितलेस तुझ्या मनीचे दु:ख? बलराम दादाकडे तू बोललीस आणि त्याने मला सांगितले तेव्हा मला तुझ्या मनीची व्यथा कळली. मात्र त्यानंतर बलराम दादाच्या मदतीने मी तुझे सर्व पुत्र.... माझे सर्व ज्येष्ठ बंधू यमराजाशी युद्ध करून घेऊन आलोच ना?"

"यदुकुलभूषणा, माझ्या सर्व पुत्रांना घेऊन येणे ही तुझ्या अनेक लीलांमधील एक लीला होती; हे का मला माहित नाही? कारण तू तर सर्वांचं मन वाचतोस. मग तुला प्रत्यक्ष तुझ्या जन्मदात्रीच्या मनीची व्यथा सांगायची वेळ का यावी? मोहना, तू जरी माझा पुत्र असलास तरी तुझं खरं रूप माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहित असणार रे? हे जगद्नियांत्या, माझ्या गेल्या जन्मीच्या तपस्येच फळ म्हणून मी तुला माझ्या उदरातून जन्म दिला. मात्र तुझ्या बाललीला मी बघू शकले नाही. माझा पान्हा कायमच थिजलेला राहिला."

"माते, आपण भूतलावर जन्म घेतो ते आपली प्राक्तन भोगण्यासाठीच. मी अनेकदा मानवांच्या शक्तीबाहेरच्या गोष्टी केल्या असल्या तरीही मला तुमच्यातलाच एक राहू दे ग. माझ्या जन्माचं रहस्य फक्त तुझ्या माझ्यातच असू दे. त्याविषयीची चर्चा तू इतर कोणाकडे करू नकोस ह. मी कोणीही असलो तरी सध्या जन्माने तर मी मानव आहे ना? मानवीय भावना माझ्या मनातही रुजल्या आहेत. मीदेखील एका आश्वस्त स्पर्शाचा भुकेला आहे ग. कदाचित् म्हणूनच परत परत मी या भूतलावर जन्म घेत असतो."

"नंदना........... माझ्या पुत्रा..... ये असा माझ्या जवळ. ये! तो तुझा हिरेजडीत मुगुट थोडा लांब ठेऊन माझ्या मांडीत डोळे मिटून पड बघू! ये रे माझ्या बाळा....  तुझ्या काळ्याभोर केसांमधून हात फिरवून मी देखील माझ्या मनातल्या तृषार्त मातेची इच्छा पूर्ण करून घेते. तुझ्या बाललीला बघू शकले नाही; किमान तुझ्या पुत्र स्पर्शाचे सुख तरी मला या उतार वयात उपभोगू दे. आता माझ्या मनात याहून जास्त काहीही इच्छा उरलेली नाही."

क्रमशः


4 comments:

  1. नक्कीच. श्रीकृष्णाच्या अष्ट पत्नींचे मनोगत देखील असेल

    ReplyDelete