श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!
माझ्या लेखाचं शीर्षक वाचून आणि मी जे काही लिहिणार आहे ते वाचून कदाचित काही जणांना वाटू शकतं की पंतप्रधानांना भेटता आलं.... अगदी जवळून बघता आलं..... बोलायला मिळालं..... याबद्दल ही उगाच शेखी मिरवते आहे. पण खरं सांगू? सात सप्टेंबर 2019 ही माझ्या आयुष्यातली सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी सकाळ होती-आहे-आणि राहील. त्यामुळे खूप विचार करून ठरवलं; कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे!!! तर.... पहिल्या क्षणापासूनच घटना कशा घडत गेल्या ते सांगते.....
सहा सप्टेंबर संध्याकाळची साधारण पाचची वेळ होती. विले पार्ल्याचे विध्यमान आमदार ऍड. पराग अळवणी त्यांच्या श्रीगणेश उत्सवातील नेहेमीच्या कार्यक्रमाप्रमाणे सार्वजनिक गणेशांचे दर्शन करण्यास निघाले होते. त्याचवेळी त्यांचा मोबाईल वाजला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचाच फोन होता तो!
मुख्यमंत्री : पराग, विमानताळाजवळ ऐतिहासिक गणपती कोणता आहे? पीएमओ कार्यालयातून विचारणा झाली आहे की खुद्द पंतप्रधान मुंबईमधील एखाद्या जुनी परंपरा जपलेल्या अशा ऐतिहासीक श्रीगणेशाचे दर्शन घेऊन आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करू इच्छितात.
पराग : साहेब, विमानताळापासून केवळ पाच मिनिटांमध्ये पोहोतचता येईल अशी लोकमान्य सेवा संघ ही संस्था आहे. योगायोगाने येथील श्रीगणेश उत्सवाला यंदा शंभरावे वर्ष सुरू होते आहे. ही संस्था खरोखरच ऐतिहासीक आहे. कारण येथे महात्मा गांधी, पंडित नेहेरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अगदी अलीकडचे म्हणायचे तर आदरणीय पूर्व पंतप्रधान आदरणीय श्री. वाजपेयीजी अशा महान व्यक्ती येऊन गेल्या आहेत. अनेक महान कलाकार, लेखक देखील या संस्थेला भेट देऊन गेले आहेत; आणि ही संस्था पूर्वीपासूनच अनेक सामाजिक कामांमध्ये सक्रिय आहे.
मुख्यमंत्री : ठीक आहे! मी नक्की काही सांगू शकत नाही. मात्र तुम्ही तयारीला लागा.
फोन बंद झाला आणि परागजींनी स्वतःचा पुढील सगळा कार्यक्रम रद्द केला. काही मोजक्याच कार्यकर्त्यांना फोन करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बोलावून घेतले. अजून काहीच नक्की नव्हते. त्यामुळे विषय बाहेर पडून चालणार नव्हते. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी 'तयारीला लागा'; सांगितल्याने कामाला लागणे देखील आवश्यक होते. परागजी कार्यालयात पोहोचायच्या अगोदरच ट्रॅफिक विभाग आणि पोलीस कार्यालयातून त्यांना फोन येण्यास सुरवात झाली आणि विचारणा करण्यास सुरवात झाली, 'नक्की रूट कसा असणार आहे? लोकमान्य सेवा संघ या संस्थेविषयीची माहिती लवकरात लवकर आम्हाला कशी मिळू शकते?' परागजी कार्यालयात पोहोचेपर्यंत आम्ही काहीजण जमलोच होतो. त्यांनी आम्हाला त्यांना आलेल्या फोन विषयी माहिती दिली. प्रत्येकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्यक्ष आपले लाडके पंतप्रधान इथे आपल्या पार्ल्यात येणार आहेत या नुसत्या विचाराने प्रत्येकजण उत्साहाने ओसंडून वाहू लागला. मात्र अजूनही ही माहिती कोणालाही द्यायची नव्हती. त्यामुळे आनंद मनातच साठवत प्रत्येकजण कामाला लागला.
सर्व प्रथम आम्ही लोकमान्य सेवा संघाच्या कार्यकारी मंडळाला भेटायला गेलो. परागजी कार्यकारी मंडळींना भेटले आणि म्हणाले, 'एक वेगळीच माहिती घेऊन आलो आहे; अजून खात्रीलायक पुष्टीकरण नाही, मात्र खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी तयारीला लागा म्हंटल आहे....' त्यानंतर त्यांनी देवेंद्रजींनी दिलेली माहिती कार्यकारी मंडळाला दिली. आता त्यांची अवस्था देखील आम्हा कार्यकर्त्यांसारखीच झाली. 'खुद्द पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी आपल्या संस्थेच्या श्रीगणेशाच्या दर्शनासाठी उद्या सकाळी येऊ शकतात.!!!' संस्थेच्या कार्यकारी मंडाळाचा आनंद गगनात मावेना. सर्वांनीच एकमताने म्हंटले, 'अहो, नक्की होऊ दे किंवा नको, आपण कामाला तर लागू या'. यानंतर काय काय केले पाहिजे याची चर्चा सुरू असतानाच ट्रॅफिक विभाग, पार्ले पोलीस, मुंबई पोलीस अशा सर्वच एजन्सीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन्स परागजींना यायला लागले होते. यासर्व अधिकाऱ्यांकडून फोन यायला लागल्याने परागजींना खात्री झाली की वरूनच चक्र फिरायला सुरवात झाली आहे.
सर्वप्रथम रूट नक्की करण्यात आला. महानगरपालिकेचे के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी बोलणे केले गेले. त्यांनी देखील त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. मात्र कोण येणार आहे हे अजूनही सांगायचे नसल्याने त्यांनी त्यांच्या कर्मचारी वर्गाला सांगितले की आजची रात्र कोणीच घरी जाणार नाही आहे. VIP movement आहे. आणि यानंतर पोलीस, महानगरपालिका असे सर्वच कामाला लागले. संपूर्ण परिसर विविध security agencies च्या अधिकाऱ्यांनी भरून गेला. पोलीस सहआयुक्त, अपर आयुक्त , उपयुक्त, स्थानिक पोलीस स्टेशन वरील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सर्वजण स्वतः आले. सुरक्षेच्या संदर्भातील जवाबदऱ्या योग्य प्रकारे पूर्ण व्हाव्यात यासाठी विविध खाती कामाला लागली. यासर्वांव्यतिरिक्त SPG (Special Protection Group) ने संस्थेचे आवार, संस्थेची जुनी इमारत, श्रीगणेश प्राणप्रतिष्ठापना असलेला सभामंडप याची केवळ पाहणी केली असे नाही तर संपूर्ण इमारतीचा ताबा घेतला.
एकीकडे आमची देखील तयारी चालूच होती. श्रीगणेशाच्या जवळील फुलांची सजावट; पंतप्रधान येतील त्यावेळी लागणारी इतर तयारी यासर्व कामाची बारीक नोंदणी करून प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले. उत्तम फुलांच्या माळा मिळवणे आवश्यक होते. मात्र भर गणपती उत्सवात वेगळी आणि चांगली फुले मिळवणे म्हणजे खरी तारेवरची कसरत होती. कुठे आणि कोणती फुले लावायची याची सांगोपांग चर्चा होताच फुलांची सोय करणारी मंडळी रात्रीच दादरच्या फुल बाजाराकडे रवाना झाली. येणाऱ्या पहिल्याच ट्रक मधून उत्तम फुले उतरवून घेऊन ती लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात आणून त्याच्या माळा बनवण्यात आल्या. डेकोरेटरला बोलावण्यात आले. सभागृहामध्ये उत्तम गालिचा लावणे आवश्यक होते. त्याच प्रमाणे इतर लहान सहान गोष्टी देखील होत्याच. त्याला कल्पना देताच तो म्हणाला गालिचा आणायला जातो आणि तो गायब झाला. एक तास झाला.... दोन तास निघून गेले तरी त्याचा पत्ता नाही. त्यावेळी खुद्द परागजींनीच त्याला फोन केला. तो म्हणाला,'साहेब मी वसईला आहे.' परागजी त्याच्यावर भलतेच वैतागले. 'अरे, इथे काय प्रसंग आहे; आणि तू वसईला काय गेलास?' त्यांनी चिडून त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला,'साहेब, गणपती उत्सवात माझे सगळेच गालिचे दिले गेले आहेत. मात्र तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव घेतले आहे; त्यांच्या केवळ नावानेच मी सुखावलो आहे. हे काम माझ्या घरचे आहे. माझ्या घरी देव येतो आहे.... म्हणून मी नवीन गालिचा आणायला वसईला आलो आहे. काळजी करू नका.... मी इथून निघालोय. तासाभरात पोहोचेन. सकाळी चारच्या आत गालिचा लावून सभागृह तयार असेल.' त्याच्या बोलण्याने परागजींना भरून आले. शेजारी उभ्या विनीतला ते म्हणले,'अरे हा वेडा आहे रे. नवा गालिचा आणायला गेला हा वसईला. आपण असे कितीसे पैसे देणार त्याला भाड्याचे?' विनीतने हसून म्हंटले,'साहेब, तुम्ही एक वैश्विक व्यक्तिमत्व आणता आहात पार्ल्यात. ज्याला जसे जमेल तसे आणि ते तो करायला तयार आहे. तुम्ही फक्त काम सांगा.'
ही चर्चा होत असतानाच परागजींना परत एकदा लोकमान्य सेवा संघ कार्यालयात बोलावण्यात आले. स्वतः पोलीस आयुक्त सगळी पाहणी करण्यासाठी आले होते. सर्व प्रकारची चर्चा झाल्यानंतर आणि एकूण व्यवस्था नीट होते आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी परागजींना सांगितले की आम्ही जास्तीत जास्त पंधरा लोकांनाच आत येऊ देऊ. कारण पंतप्रधानांचे कार्यक्रम असे आयत्यावेळी ठरत नाहीत; आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतीही अनुचित घटना न व्हावी ही आमची जवाबदारी आहे. हे ऐकताच परागजींना धक्काच बसला. ते म्हणाले,'अहो, ही संस्थाच जवळ जवळ शंभर वर्षे जुनी आहे. या संस्थेचे अनेक सामाजिक उपक्रम असतात. त्यामुळे त्यांचे पदाधिकारीच पंधरापेक्षा जास्त आहेत. त्याव्यतिरिक्त आज रात्रभर खपणारे आणि पक्षाचे वर्षानुवर्षे काम करणारे असे आमचे काही कार्यकर्ते देखील असतीलच. त्यांच्या दृष्टीने आदरणीय पंतप्रधानांना केवळ पाहाता येणे ही आयुष्यभराची पुंजी आहे. तुम्ही फक्त पंधरा व्यक्ती म्हणालात तर फारच अवघड होईल.' अशी चर्चा होत होत शेवटी केवळ चाळीस लोकांना पास मिळतील; असे आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीचा फोटो आणि इतर आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम मिलिंद शिंदे या कार्यकर्त्याकडे देण्यात आले; अर्थात तरीही आत कोण कोण जाऊ शकेल हा अंतिम निर्णय SPG कडेच होता. एकीकडे सभागृहाची होणारी फुलांची सजावट, नवीन आलेला गालिचा पसरणे, इतर लहान मोठे माहिती फलक लावणे अशी आमची तयारी जोरदार चालू होती; त्याचवेळी पोलीस आणि त्यांच्या इतर security agencies ची त्यांच्या पद्धतीने तयारी चालु होती.
आजूबाजूच्या प्रत्येक इमारतीच्या गच्चीमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते. रस्त्यावर देखील अनेक पोलीस आणि SPG चे गार्डस तैनात होते. आयुक्तांनी जरी केवळ चाळीस व्यक्तींची परवानगी दिली होती; तरी या चाळीस जणांचे पास तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करणे हे खूप मोठे काम होते. मिलिंद शिंदे यांना सर्वांशी संपर्क साधून त्यांची माहिती आणि पासपोर्ट आकाराचा फोटो मिळवून ती फाईल तयार होईपर्यंत रात्रीचे तीन वाजले होते. त्यानंतर मिलिंदजी स्वतःच SPG च्या क्रॉफर्ड मार्केट येथील कार्यालयात गेले आणि तेथील अधिकाऱ्यांच्या हातात असलेली माहिती सुपूर्द केली. त्यानंतर या चाळीस जणांची संपूर्ण स्क्रुटीनी करण्यात आली. SPG कार्यालयाचे समाधान झाले आणि प्रत्येकाचा पास मिलिंदजींच्या हातात पडला त्यावेळी सकाळचे सात वाजले होते. हातात पास पडताच मिलिंदजींनी परागजींना फोन करून त्याची माहिती दिली आणि ते ट्रेनने पार्ल्याच्या दिशेने निघाले. रात्रभर एक सेकंद देखील डोळ्याला डोळा नसूनही अत्यंत उत्साहाने आणि आपण काम पूर्ण केलेले आहे या समाधानी चेहेऱ्याने ते लोकमान्य सेवा संघामध्ये पोहोचले. त्यावेळी सभागृह छान नटून तयार झाले होते. उत्तम फुलांच्या माळा सभागृहाची शोभा वाढवत होत्या. नवा कोरा लाल गालिचा या सौंदर्यात भरच घालत होता. विविध उपक्रमांचे माहिती फलक नव्या झळाळीने चमकत होते; आणि आपल्याला दिलेली प्रत्येक जवाबदारी पूर्ण करून प्रत्येक जण येणाऱ्या सुवर्ण क्षणासाठी सज्ज झाला होता.
सात सप्टेंबरची सकाळ भूतलावर अवतरली. आम्हा पार्लेकरांसाठी 'आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू!!!' ही एकच भावना मनात होती.
पंतप्रधान कसे आत येतील, त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या आम्हा चाळीसजणांनी कुठे आणि कसे उभे राहायचे याचे 'mock drill' तीन वेळा करण्यात आले. कोणीही आपल्या जागेवरून हलायचे नाही, पुढे यायचे नाही, मोबाईल्स बंद ठेवायचे, सेल्फी काढण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही; या आणि अशा अनेक सूचना सतत पोलिसांकडून येत होत्या; आणि आम्हाला त्यांची प्रत्येक सूचना शिरसावंद्य होती. अहो, आज भारताचे मानबिंदू.... कर्मयोगी.... वैश्विक प्रतिमेचे... भारताचे आदरणीय पंतप्रधान आणि आम्हाला परमप्रिय असे श्री नरेंदजी मोदी यांना याची देही याची डोळा इतक्या जवळून आम्ही अनुभवणार होतो.... अजून काय हवं?
.....आणि तो क्षण आला. आदरणीय आणि परमप्रिय पंतप्रधान श्री. नरेंदजी मोदी यांची गाडी लोकमान्य सेवा संघाच्या आवारात आली. त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंगजी कोशियारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस देखील होते. आमदार पराग अळवणी आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंदजी चितळे यांनी या सर्वच महनीय व्यक्तींना आदरपूर्वक संघ भवनातील पहिल्या मजल्यावरील पु. ल. देशपांडे सभागृहामध्ये आणले. इथेच श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असल्याने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी श्रीगणेश पूजन केले. गुरुजी पूजा सांगत होते आणि मोदीजी परमभाक्तिपूर्वक गुरुजी सांगतील त्याप्रमाणे पूजा करत होते. गुरुजींनी अथर्वशीर्ष म्हंटले. त्यानंतर मोदींजींनी श्रीगणेशाला माल्यार्पण केले. गुरुजींनी त्यांच्या हातावर तीर्थ दिले आणि विचारले,'आपण मोदकाचा प्रसाद घेणार ना?' त्यावर मंद हसत मोदींजींनी होकार भरला आणि अत्यंत प्रेमभराने उकडीचा मोदक स्वीकारला.
त्यानंतर मोदीजींच्या हस्ते याच सभागृहातील लोकमान्य टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करणे अपेक्षित होते. यावेळी इथे संस्थेचे काही कार्यकारी सदस्य उपस्थित होते. श्री. चितळे यांनी मोदींजींची यासर्वांशी ओळख करून दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री. बहुलकरजी यांची ओळख देखील श्री. चितळे यांनी करून दिली. श्रीगणेश मूर्तीच्या मागील फ्लेक्स वरील देखावा श्री. बहुलकर यांनी डेरवण येथे स्वतः तयार केला आहे. याविषयीची माहिती स्वतः श्री. बहुलकरांनी आदरणीय पंतप्रधानांना दिली. त्यानंतर त्यांनी स्वतः चितारलेले लोकमान्य टिळकांचे चित्र श्री. मोदीजी यांना भेट दिले. याच चित्राची मूळ तैलचित्र राष्ट्रपती भवनमध्ये असल्याचे देखील त्यांनी सांगितले आणि त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि पूर्वी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या पुस्तकाची प्रत देखील त्यांनी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना दिली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते देखील या सभागृहामध्ये उपस्थित होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील होते; यासर्वांशी परागजींनी ओळख करून दिली.
त्यानंतर मोदीजी पु. ल. गौरव दालनामध्ये आले. याठिकाणी पार्ले विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक, संघ परिवाराचे जेष्ठ कार्यकर्ते आणि लोकमान्य सेवा संघाचे कार्यकारी मंडळातील काही सभासद उपस्थित होते. पु. लंच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मोदीजी दालनात आले. त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या व्यक्तिमत्वला पाहून आम्ही सर्वचजण एकदम शांत झालो होतो. एकूणच काहीसं गंभीर वातावरण निर्माण झालं होतं. मोदींजींनी आमच्याकडे बघितलं आणि अगदी सहज विचारलं,'यहा आनेवाले लोग दिन मे कितना घंटा हसते हे? पु. लं. देशपांडे का नाम सुने और हसे नही ये कैसे चलेगा?' केवळ दोन वाक्य.... मात्र दालनातले वातावरण एकदम मोकळे होऊन गेले. हीच तर ताकद आहे मोदी नावाच्या त्या किमयागाराची! त्यांना पु. लं. माहीत होते.... त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या येण्याने दालनात निर्माण झालेला तणाव देखील त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे पु. लं. चा उल्लेख करत त्यांनी क्षणात वातावरण बदलून टाकले. त्यानंतर श्री. मुकुंदजी चितळे यांनी श्री. मोदीजींना पार्ल्याच्या इतिहासावरील पुस्तके भेट केली आणि तिथे अगोदरच ठेवलेल्या संस्थेच्या नोंद वहिमध्ये आदरणीय पंतप्रधानांनी त्यांचा अभिप्राय नोंदवावा अशी विनंती केली. श्री. मोदीजींनी मनापासून ती विनंती मान्य करून लोकमान्य सेवा संघाच्या नोंद वहीमध्ये सदर भेटीसंदर्भातील आपला अभिप्राय नोंदवला.
आता त्यांची निघायची वेळ झाली होती. परागजींनी 2011 मध्ये Town Planning Scheme या विषयावर '523 चौकड्यांचे राजकारण' हे पुस्तक लिहिले होते आणि 2018 मध्ये मी लिहिलेले 'कथा विविधा' या पुस्तकाचे अनावरण देखील झाले होते. ही दोन्ही पुस्तके आदरणीय पंतप्रधानांना द्यावीत अशी आम्हा दोघांची इच्छा होती. त्याविषयी परागजींनी आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. अत्यंत मोकळ्या मनाच्या आणि सर्वसमावेषक स्वभावाच्या आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजींनी अत्यंत नम्रपणे ही इच्छा पंतप्रधानांना बोलून दाखवली. पंतप्रधानांनी देखील तितक्याच मोकळ्या मनाने आमची इच्छा पूर्ण केली; आणि आम्ही आमची पुस्तके आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना देऊ शकलो. परागजींनी पुस्तक सुपूर्द करताना अत्यंत थोडक्यात त्यासंदर्भातील माहिती आदरणीय पंतप्रधानांना दिली; त्यांनी देखील मनापासून ते ऐकुन घेतले. आता आम्हाला वाटले या सर्वच महनीय व्यक्ती निघतील. मात्र काही क्षणांसाठी मोदीजी थांबले आणि आम्हाला एक ग्रुप फोटो काढण्याची सुवर्णसंधी मिळाली. आयुष्यभर जपून ठेवावा असा ठेवा आमच्या पदरात पडला.
त्यानंतर मात्र मुख्य कार्यक्रम मेट्रोच्या उद्घाटनाचा असल्याने सर्वचजण घाईने निघाले. पंतप्रधान खाली उतरले. आदरणीय राज्यपाल गाडीमध्ये जाऊन बसले. आदरणीय मुख्यमंत्री प्रोटोकॉल सांभाळण्यासाठी त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी निघाले. मोदीजी देखील त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाले. लोकमान्य सेवा संघाची इमारत मध्य वस्तीमध्ये असल्याने आजूबाजूच्या सर्वच इमारतींमधील उत्साही नागरिक त्यांच्या आवारात जमलेले होते. ते सर्वचजण 'भारतमाता की जय'; 'मोदी-मोदी'; 'वंदे मातरम्' अशा घोषणा देत होते. आपल्या प्रिय पंतप्रधानांची एक झलक दिसावी यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. कदाचित या जनसमुदयाची ही आंतरिक इच्छा मोदीजींच्या मनाला देखील स्पर्शून गेली. त्यांनी परागजिंकडे आणि आदरणीय श्री. देवेन्द्रजी यांच्याकडे बघून म्हंटले,'चलीये लोगोंको अभिवादन करते हें।' आणि त्यांना सोबत घेऊन ते स्वतः चालत इमारतीच्या आवाराबाहेर गेले. आजूबाजूच्या सर्वच आवारांमध्ये अनेक पार्लेकर उभे होते. ते बाहेर येऊ नयेत म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील ठेवला होता. मात्र सामान्यांमधूनच पुढे आलेल्या या असामान्य वैश्विक नेत्याने सर्व पार्लेकरांना हात उंचावून अभिवादन केले. परागजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या सोबत ते काही क्षण थांबून परत आत वळले... त्यावेळी परागजींच्या लक्षात आले की दुरवरील एका इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बरीच गर्दी होती आणि आपल्या प्रिय पंतप्रधानांची एक झलक मिळावी याची तेआतुरतेने वाट पाहात आहेत; काहीशी हिम्मत करून त्यांनी आदरणीय पंतप्रधानांना ते सांगितले. त्या असामान्य नेत्याने परत दोन पावले मागे येऊन आपल्यावर प्रेम करणाऱ्या या पार्लेकरांना परत एकदा अभिवादन केले. मग मात्र झपझप चालत ते गाडीच्या दिशेने निघाले.... बसले.... आणि एका सुवर्ण घटनेची नोंद पार्लेकरांच्या हृदयावर करून त्यांनी आपल्या पुढील कार्यक्रमाच्या दिशेने प्रस्थान केले.