Friday, September 6, 2019

नृत्यांगना...... अहं.... (भाग 3)

नृत्यांगना...... अहं.... (भाग 3)

मागील दोन भागांमध्ये मी ज्या अभिनेत्रींविषयी आपल्याशी संवाद साधला त्या नृत्यांगना नव्हत्या. कदाचित म्हणूनच त्यांनी केवळ आपल्या नेत्रातून आणि अभिनयातून ती दोन्ही गाणी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहेत. मात्र आज मी तुम्हाला ज्या गाण्याबद्दल सांगणार आहे; त्या गाण्यातील अभिनेत्रीने शास्त्रीय नृत्याचे धडे घेतलेले होते. ती एक अत्यंत उत्तम नृत्यांगना होती आणि अजूनही याबद्दल कोणाचंही दुमत नसेल. ही अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहेमान!

वहिदाजी अप्रतिम नृत्यांगना असूनही त्यांच्या सुरवातीच्या काळातल्या एका चित्रपटामध्ये त्यांना एक गाणं केवळ अभिनयातून लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. तसं बघितलं तर वाहिदाजींचा चेहेरा अवखळ नाही वाटत. त्यांच्या तारुण्यात देखील त्या प्रगल्भ आणि परिपक्व चेहेऱ्याच्या दिसायच्या. तरीही 'साहिब, बीबी और गुलाम' या चित्रपटामध्ये वहिदाजींनी एका अवखळ, पौग्नाडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करणाऱ्या तरुणीची भूमिका अत्यंत उत्तम रितीने केली होती. त्या गुरुदत्त यांना भेटतात आणि त्यांना ते आवडायला लागतात. त्यावेळी गुरुदत्तना एका 'भवऱ्या'ची उपमा देत त्यांनी आपल्या लाडिक हावभावांनी आणि टपोऱ्या डोळ्यांमधून ते प्रेम उत्तम व्यक्त केले आहे.

वहिदाला ते गाणं सुचत असतं आणि ती ते लिहीत असते. गाण्याची सुरवात होते तीच मुळी शब्दांनी...

भँवरा बड़ा नादान हाय.... शब्द सुचताक्षणी ती ते लिहायला लागते. लिहिताना हलकेच तिची जीभ बाहेर येते. एक बालिश निरागसता जाणवते यातून.

बगियन का..... ती विचार करते आहे की तो नादान तर आहे पण मग काय? ती तेच तेच गुणगुणते... काय असेल बर तो बगीयन चा??? आणि मग तिला सुचतं.... बगीयन का मेहमान हाय....

आणि मग जणूकाही तिला सुचत जातं की तो कसा आहे.
भवरा बडा नादान हाय... बगीयन का मेहेमान हाय...
फिर भी जाने ना... जाने ना... जाने ना... कलियन की मुसकान हाय....
भँवरा बड़ा नादान ... हे जे शेवटचं नादान... आहे ते म्हणजे समोर एखादी व्यक्ती उभी असेल तर तिला चिडवल्यासारखं वाटतं नाही? तेच तिला अपेक्षित आहे!

ती पुढचे शब्द लिहीत असते त्यावेळी गुरुदत्त येतो. तिच्या ते गावी देखील नाही... आणि ती जे लिहिलं असते ते गुणगुणायला लागते.

कभी उड़ जाये... कभी मंडराये... ती त्या कागदाकडे बघत असते आणि जणू काही कागदावरच तिला तो अभिप्रेत चेहेरा दिसतो म्हणून की काय ती त्या कागदालाच चिडवते.... भेद जिया के खोले ना...


सामने आये... नैन मिलाये... मुख देखे कुछ बोले ना... हे म्हणेपर्यंत ती पूर्णपणे चिडवण्याच्या मूडमध्ये आहे. मात्र... वो मुख देखे कुछ बोले ना... हा जो शेवटचा 'ना' आहे नं त्यावेळी काहीशी तक्रार आहे तिची. त्याने तिच्याशी आपणहून बोलावं ही तिची इच्छा या एका 'ना' मधून ती जाणवून देते. आणि... भँवरा बड़ा नादान हाय... म्हणताना देखील तो काही नाही बोलत स्वतःहून हे ती अभिप्रेत करते आहे असं मला वाटतं.

विचार करता करता तिला पुढच्या ओळी सुचतात.... अखियों में रजके.. चले बच बचके... हे 'बच बचके' ती म्हणते त्यावेळी मात्र तिच्यातली नृत्यांगना जाणवते हं... एखाद्या हरणासारखी तिची मान तालात आणि एका सुंदर ऐटीत हलते.
जैसे हो कोई बेगाना.... दुसऱ्यांदा तेच म्हणताना हाताची हालचाल देखील तिला नृत्यकला अवगत आहे हे जाणवून देते.

रहे संग दिल के... मिले नहीं मिलके... बनके रहे वो अंजना... हो बनके रहे वो... अंजना... हे गुणगुणताना परत एकदा ती तिच्या अभिनयातून व्यक्त होण्याकडे वळते... आणि... भँवरा बड़ा नादान हाय.... जणू काही ती म्हणते आहे काय करू या वेडोबाचं!!!

तिचे कागद उडतात ते ती गोळा करते. जे तिच्या मागे असतात ते गुरुदत्त तिच्या पुढ्यात टाकतो. पण स्वतःमध्ये ती इतकी मग्न असते की ते देखील तिला लक्षात येत नाही. कोई जब रोके.. कोई जब टोके...
गुन गुन करता भागे रे... यावेळी एकाद्या षोडशे वर्षीय गोड मुलीसारखे निरागस भाव तिच्या चेहेऱ्यावर दिसतात. ना कुछ पूछे... ना कुछ बूझे... कैसा अनाड़ी लागे रे... म्हणजे 'किती रे तो बुद्दु' असा असावा... हे भाव आहेत तिचे. वो कैसा अनाड़ी लागे रे.... परत एकदा.... काय करू बरं या वेड्या बुद्दुचं आणि तरीही ज्याच्याबद्दल प्रेम भाव आहेत माझ्या मनात जे सांगता येत नाही आहेत.... हे प्रतीत होतं आहे.

स्वतःत मग्न ती गुणगुणत असते...
भँवरा बड़ा नादान हाय... बगीयन का मेहेमान हाय... फिर भी जाने ना... जाने ना... जाने ना... कलीयन की मुस्कान... आणि तोच पुढ्यात उभा राहातो... एकदम तिला दचकवतो!!!

No comments:

Post a Comment