Friday, July 12, 2019

अधुरी एक कहाणी

अधुरी एक कहाणी



टक् टक्... 'आत्ता एवढ्या सकाळी आणि ते ही इथे मला भेटायला कोण येणार?' थोड़ वैतागत... थोड़ आश्चर्य वाटून लेखक महाशय दार उघडायला आले.

एका कादंबरीच्या लेखनासाठी एक प्रकाशकाच्या आग्रहावरुन ते थंड हवेच्या ठिकाणच्या त्या प्रकाशकाच्या बंगल्यावर काही दिवसांकरता रहायला आले होते. येऊन दोन दिवस झाले होते तरी त्यांना कथेचा प्लॉट सुचत नव्हता; त्यामुळे एकूणच ते   थोड़े वैतागले होते; रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. जरा झापड येत होती  आणि त्यात सकाळीच दार वाजत होते.


थोड्या वैतागलेल्या मनस्थितीतच त्यांनी दार उघडल. समोर एक मध्यम वयीन महिला कंबरेवर हात ठेऊन उभी होती. दार उघडल जाताच दारात उभ्या असणाऱ्या लेखकाकडे दुर्लक्ष करून ती तरातरा आत आली आणि एका खिड़कीच्या दिशेने गेली. मात्र जाताना एक खाष्ट कटाक्ष तिने लेखकाकड़े टाकला. लेखक बुचकळ्यात पडला.


'कोण असावी ही बाई आणि अशी आपल्याला न विचारता आत येऊन त्या खिडकीत जाऊन का बसली असेल? मुख्य म्हणजे आत आल्यावर आपल्याकडे रागाने का बघितलं तिने?' लेखकाच्या मनात एकामागून एक प्रश्न उभे राहिले. तो दारातच विचार करत उभा होता तेवढ्यात त्याला आतल्या बेडरूम मधून खोकल्याचा आवाज आला. गोंधळून लेखक आतल्या बेडरूमच्या दिशेने गेला. आत बेडरूममध्ये एका आराम खुर्चीत एक आजोबा बसले होते; ते दरवाजात उभ्या असणाऱ्या लेखकाकडेच पाहात होते. काय प्रकार आहे ते लेखकाला कळले नाही. आपल्यालाच भास होतो आहे अस समाजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो परत बाहेर हॉलमध्ये आला; तर त्याच्या लक्षात आल की एकूण बाहेरच्या खोलीचा चेहरा मोहरा बदलला आहे. मघाशी दार उघडायला तो बाहेर आला होता तेव्हा बैठकीच्या खोलीत फ़क्त एक सोफ़ा होता. पण आता येऊन बघतो तर मेन दरवाजा दिसत नव्हता; एक सोफ़ा एका बाजूला होता आणि आता एका कोप-यात एक डायनिंग टेबल देखील अवतरलं होतं. लेखक पुरता बुचकळ्यात पडला. त्याला त्या बंगल्यात येऊन दोन दिवस झाले होते. त्यामुळे खोल्यांची रचना त्याला माहितीची झाली होती. हे असे अचानक होणारे बदल त्याला गोंधळात टाकत होते. तो थोडासा घाबरला देखील. हा काही भुताटकिचा प्रकार असावा अस त्याच मत झाल.


तेवढ्यात तो ज्या खोलीत झोपले होता तिथे काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि लेखक दचकुन आत खोलिकडे वळला. आत जाऊन बघतो तर त्यांनी त्याचे लिखाणाचे सामान ज्या टेबलावर ठेवले होते ते सामान खाली पडले होते. आणि जी स्त्री दार वाजवून त्याची झोप मोडायला आली होती; ती त्याच्या लेखन टेबला जवळ बसून काहीतरी लिहित होती. लेखक खोलीत आला आहे हे तिच्या लक्षात आले होते तरीही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल लेखनाचे काम चालूच ठेवले.


काय प्रकार आहे हे अजूनही लेखकाच्या लक्षात आले नव्हते. पण हे असे अचानक या घरात उगवलेले आणि आपल्याला दिसणारे लोक काही त्रास देत नाही आहेत हे लक्षात आल्यावर लेखक थोडा शांत झाला. आता त्याच मन थोडं शांत झाल आणि विचार करायला लागलं. लेखकाच लक्ष परत त्या स्त्रीकडे गेलं. ती स्त्री अजूनही काहीतरी लिहित होती आणि तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे असेल कदाचित पण त्याच्या टेबलावर बसून ती काय लिहिते आहे ते समजून घेण्याची लेखकाची उत्सुकता जागृत झाली. त्यामुळे हळूच तिच्या मागे जाऊन उभे राहात त्यानी तिच्या लिखाणावरुन नजर फिरवली.


...............ललिता एकटीच खिड़कीत विचार करत बसली होती. वयात येणारी मुलगी; व्यवसायात खूपच बिझी झालेला नवरा; इंजीनियरिंगच शिक्षण घेण्याच्या नावाखाली उड़ाणटप्पूपणा करणारा मुलगा.... ललिता सर्वच बाजुनी हतबल झाली होती. काय कराव... कोणाशी बोलाव तिला सुचत नव्हतं......... ती स्त्री भराभर लेखकाच्या नेहेमीच्या लिखाणाच्या कागदावर लिहित होती. ते लिखाण पाहुन लेखक बुचकळयात पडला. पण काही क्षणात त्याला आठवलं हा परिच्छेद त्याच्याच एका गोष्टितला होता. पण मग ती गोष्ट त्याने अर्धवट सोडली होती. एका दुसऱ्याच कथेची संकल्पना मनात आली होती म्हणून ही कथा अर्धी सोडून त्याने नवीन कथा सुरु केली होती. काही महिन्यांपूर्वीचीच तर घटना होती ती.


लिखाण पूर्ण होताच ती स्त्री परत खिड़कीजवळ जाऊन बाहेर बघत बसली. लेखकाने जिथे ती कथा सोडली होती तिथेच ती स्त्री थांबली होती. याच त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्या स्त्रीला ती अर्धवट सोडलेली गोष्ट कशी माहित अस विचारायचा मोह लेखकाला झाला. पण तेवढ्यात शेजारच्या खोलितले आजोबा परत खोकले म्हणून लेखक त्या दिशेने वळला. आजोबा त्यांच्या आराम खुर्चित बसून लेखकाकडेच पहात होते. त्यांच्या शेजारी देखिल एक कागद पडला होता. आतापर्यत लेखकाची भीड बरीच चेपली होती. त्यामुळे तो पुढे झाला आणि तो कागद उचलून वाचला.


..............................काणे आजोबा म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्या तारुण्यात तर त्यांनी करियरमधली यशाची शिखरं गाठली होतीच, पण रिटायरमेंट नंतरही ते स्वस्थ बसले नाहीत कधी. सामाजिक संस्थांमधून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम केल. त्यांच्या सुविद्य पत्नीनी त्यांना आयुष्यभर साथ दिली होती. पण साध्या तापाच निमित्त होऊन त्या अचानक गेल्या; आणि त्यानंतर मात्र काणे आजोबांचा आयुष्यातला इंटरेस्टच जणूकाही संपला...............


तो कागद वाचून लेखकाला खूप खुप आश्चर्य वाटलं. 'माझ्याच एका पूर्ण होत आल्या गोष्टीचा शेवटचा भाग.' लेखकाच्या मनात आल. पण मग अचानक काही मासिकांकडून त्याला वेगळ्या विषयाच्या गोष्टिची मागणी झाली आणि ही गोष्ट नंतर पूर्ण करू असे त्याने ठरवले होते. पण मग ती गोष्ट लिहिणे मागेच पडत गेले होते.


'अरे? हे काय गौडबंगाल आहे? माझ्याच गोष्टींची पानं माझ्यासमोर का येत आहेत?' लेखकाच्या मनात आल. त्याचवेळी हॉलमध्ये एक लहान मुल जोरजोरात हसल्याचा आवाज त्याला आला आणि या अचानक आलेल्या आवाजाने धक्का बसलेला लेखक हॉलच्या दिशेने धावला.


बाहेर साधारण ४-५ वर्षांचा मुलगा सोफ्यावर जोरजोरात उड्या मारत होता आणि बाजूला एक स्त्री ............बहुतेक त्याची आई असावी................. त्याला शांत करायचा प्रयत्न करत त्याला समजावत होती;"राजू बाळा, तुला बर नाही आहे न? मग स्वस्थ बस बघू. आत्ता बाबा येतील ह तुझे. मग आपण त्याना सांगू तुझ्यासाठी काहीतरी छान छान आणायला." तिने एवढ म्हणाल्यावर तो मुलागा तिच्याकडे बघायला लागला. क्षणभर सगळ स्थिर झाल आणि मग परत तो मुलगा सोफ्यावर उड्या मारायला लागला. परत ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत तेच वाक्य त्याच प्रकारे बोलत समजावायला लागली.


आता लेखकाला हळूहळू लिंक लागायला लागली.  त्याने एका वेगळ्याच अपेक्षेने आजुबाजुला बघितले आणि त्याला डायनिंग टेबलावर एक कागद फड़फडताना दिसला. मनात कल्पलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने लेखकाने मंद स्मित केले आणि तो कागद उचलला. त्याच्याच एका गोष्टीतल्या दिवाणखान्याच वर्णन त्यात लिहिल होत. आणि पुढे लिहिलं होत की लहानग्या राजूला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला होता. त्याच्या आईवडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे कुठली मदत मिळते का ते बघण्यासाठी राजूचे बाबा सतत वणवण करत फिरत होते. या कशाचीच कल्पना नसलेला राजू मात्र घरात बालसुलभ मस्ती करत होता. मनातून कोलमडलेली आणि ते चेहेऱ्यावर दाखवता न येणारी राजूची आई त्याला सांभाळत त्याच्या वडिलांची वाट बघत होती............................. अशी काहीशी गोष्ट होती ती.... लेखकाचीच! अजुने के पूर्ण न झालेली.


'म्हणजे माझ्या अपूर्ण गोष्टी आज मला भेटायला आल्या आहेत अस दिसत.' लेखकाच्या मनात आल आणि कोडं उलगडल्याच्या स्सामाधानात तो हसत मागे वळला. मागे ललिता आणि काणे आजोबा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात उभे होते. यासर्वांच अस इथे येण्यामागच कारण त्याच्या लक्षात आलेलं नव्हत. त्यामुळे आता यांना काय उत्तर द्याव असा लेखकाला प्रश्न पडला. मुळात यांना आपण काही उत्तर देऊ लागतो का असा मुद्दा देखील त्याच्या मनात होता.  हे खर होत की लेखकाने फारच क्वाचित असेल, पण काही गोष्टी अपूर्ण सोडल्या होत्या. पण म्हणजे आपण अर्ध्या सोडलेल्या कथांमधील पात्र आज आपल्या भेटीला आली आहेत; हे त्याच्या लक्षात आलं. त्याने क्षणभर विचार केला आणि मग हसत ललिता आणि काणे आजोबांना, राजूला आणि त्याच्या आईलासुद्धा एका सोफ्यावर बसायला सांगितल. तो देखील बाजूची एक खुर्ची ओढून त्यांच्या समोर बसला.


"आता मला उलगडा होतो आहे तुमच्या उपस्थितिचा. पण उद्देश् मात्र अजुन लक्षात नाही आला." लेखक त्यांना म्हणाला. यावर त्यांच्यातल कोणीतरी एक उत्तर देईल अशी त्याची अपेक्षा होती. पण पाच मिनिटं झाली तरी ते सगळेच त्याच्याकडे थोड रागाने बघत पण आश्चर्यकारक रितीने स्वस्थ बसले होते. त्याचं हे अस न बोलता स्वस्थ बसण लेखकाला गोंधळवून टाकायला लागलं. हळूहळू लेखक अस्वस्थ व्हायला लागला.


"अरे, तुम्ही माझ्याच अपूर्ण गोष्टींमधली पात्र आहात हे एव्हाना माझ्या लक्षात आल आहे. पण हे अस अचानक इथे येण्यात तूमच काय प्रयोजन आहे; ते मला अजूनही समजल नाही. ते कसं कळावं बर?" लेखक वैतागुन काहीस त्यांच्याशी आणि काहीस स्वतःशीच म्हणाला.


तरीही काहीच घडले नाही. ते सगळे लेखकाने सांगितलेल्या सोफ्यावर स्वस्थ बसून पण रागाने लेखकाकडे बघत होते. एव्हाना चांगलीच सकाळ झाली होती. लेखकाला चहाची तल्लफ आली होती. चांगलीच भूकही लागली होती. एरवी सकाळीच बंगल्यावर काम करायला येणारा गोपाळ अजुन आला नव्हता. त्यामुळे काय कराव लेखकाला सुचत नव्हते.


'चहा मिळाला असता तर बर झाल असत. ही ललितासुद्धा नुसती बसून आहे. तिला काय हरकत आहे चहा करायला.' लेखकाच्या मनात विचार आला.... आणि काय चमत्कार... ललिता उठून उभी राहिली आणि स्वयंपाकघराकडे वळली. लेखक तिच्या मागून गेला आणि त्याला दिसले के ललिता चहा करत होती. लेखकाला आश्चर्य वाटल. आपण फक्त मनात एक विचार केला आणि लगेच तशी कृती ही ललिता करायला लागली हे त्याच्या लक्षात आल. म्हणून मग एक प्रयोग म्हणून त्याने मनात विचार केला,'चहा बरोबर मस्त गरमागरम पोहे असते तर मजा आली असती.' असा विचार करून लेखक त्याच्या खोलीत जाऊन बसला.


थोड्या वेळाने ललिता एका ट्रे मधून गरम गरम पोहे आणि वाफाळता चहा घेऊन त्याच्या समोर येऊन उभी राहीली. तिला बघून लेखक मोकळेपणाने हसला. आता त्याच्या लक्षात आले काय केले पाहिजे. त्यामुळे मग त्याने शांतपणे पोहे खाऊन आणि चहा घेऊन लेखक त्याच्या टेबलाकडे वळला. कागद पेन घेऊन त्याने थोडा विचार केला आणि मग लिहायला सुरुवात केली.


......................................ललिता कंटाळली होती. आणि तिला मन मोकळ करायची खूप इच्छा होती; आणि म्हणूनच तिने ठरवले की आज आत्ता समोर जे कोणी भेटेल त्यांच्याकडे मन मोकळे करायचे.....................


लेखकाचं एवढ़ लिहून होत न होत तोच चहा आणि पोहे लेख्कासमोर ठेऊन परत  खिड़कित जाऊन बसलेली ललिता एक मोठ्ठा सुटकेचा नि:श्वास टाकून तिथून उठून लेखकासमोर येऊन बसली.

"कित्ती बर वाटत आहे म्हणून सांगू तुम्हाला फ़क्त या कल्पनेने की आता मला माझ मन मोकळ करता येईल." ललिताने बोलायला सुरवात केली. "अहो लेखक महाशय किती किती दुःख लिहून ठेवली आहात तुम्ही माझ्या आयुष्यात. कमाल करता हो! अहो, केवळ वाचकांची सहानुभूति मिळवण्यासाठी माझा किती मानसिक छळ चालवाला आहात. अस काही खरच प्रत्यक्ष आयुष्यात असत का? प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जसे दुःखाचे क्षण असतात तसे आनंदाचे क्षण पण असतीलच न? मी आपली सारखी घरातल्या प्रत्येकाच्या वागण्याने दु:खी-कष्टी झालेली असते. मी एकटीनेच का होईना पण आनंदाचे काही क्षण तर जगू शकते की नाही? मला देखिल तुमच्या पत्नीप्रमाणे कधीतरी मॉल्समधे शॉपिंगला पाठवा की. तुम्ही कधी कधी तुमच्या पत्नीच कौतुक करता न? मग माझ्या नव-याच्या तोंडी थोड़ माझ कौतुक टाकलत तर ते काही महा पाप नसेल. तो खूप व्यस्त असतो, त्याला माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो, हे सगळ मान्य केलं तरी कधीतरी अशी वेळ येऊ शकतेच ना की तो माझं देखील थोडसं कौतुक करेल. बर ते नाही तर, अहो किमानपक्षी माझ्या मनात एखादी नोकरी करावी अस आल; एवढ लिहिलत तरी चालेल हो. इतकी काही मी मूर्ख नाही." ललिता भडाभड़ा बोलायला लागली.


'किती दिवस तिने हे सर्व मनात दाबून ठेवल असेल?' लेखकाच्या मनात विचार आला. त्याचच उत्तर म्हणून की काय ती म्हणाली,"अहो कायम असे विचार मनात येत असतात. पण सांगणार कोणाला? बर, तुम्ही मला कोणी जवळची मैत्रिण नाही दिलीत. ना मन मोकळ करता येईल अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात लिहिलीत. म्हणजे मी कायम दुखात पिचेला चेहेरा घेऊन खिडकीत दूरवर जाणार लावून बसायचं का? काहीतरी चांगलं लिहा की माझ्या आयुष्यात, की ज्या बळावर मी माझ आयुष्य जगू शकेन. सर्वात महत्वाच् म्हणजे सुरु केलेली कथा पूर्ण तर करा. अस आम्हाला अर्धवट सोडून तुम्ही दुसरीकडे कसे वळु शकता हो? आमचा थोड़ा तरी विचार करायचा ना." ललिता भडाभडा बोलत होती आणि लेखक अवाक होऊन तिच बोलण एकत होता. लेखकाकडे बघत ललिता पुढे म्हणाली,"परवाच आमची सर्वांची एक बैठक झाली....."


शांतपणे तिच बोलण ऐकणारा लेखात तिचे शेवटचे वाक्य एकताच दचकला. ललिता जरी त्याच्या समोर बसून बोलत होती तरीही ही आपल्या कथेतली एक व्यक्तिरेखा आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे 'आमची बैठक' हे शब्द एकटाच लेखक गोंधळाला आणि तिच बोलण निवांतपणे एकता-एकता अचानक ताठ होऊन बसला. आपला शांतपणा सोडत पहिल्यांदाच त्याने ललिताच्या समोर तोंड उघडले. "बैठक? कोणाची? अहो ललिताबाई काय बोलता आहात आपण?"


"जे घडल आहे न तेच बोलते आहे." ललिता म्हणाली. "तुम्ही आजवर ज्या ज्या  कथा अपूर्ण ठेवल्या आहात न त्यातील आम्ही सर्व व्यक्ती एकत्र येतो दर शुक्रवारी आणि चर्चा करतो."


"चर्चा? आणि ती कसली? कोण कोण असता या चर्चेला?" लेखकाने अजूनच बुचकळ्यात पडत ललिताला विचारले.


"तुम्हीच सांगा कोण कोण असेल. मलाच काय विचारता सगळ? कमाल करता तुम्ही. केवळ पैशासाठी लिहिता का हो? जेव्हा सुरवात केलित तेव्हा मात्र स्वसुखासाठी लिहिता अस सर्वाना सांगायचात न? आजही इतकी प्रतिष्ठा मिळाल्या नंतर जर कोणी मुलाखत घेतली तर तेच सांगता; हे देखील माहीत आहे आम्हाला." ललिता म्हणाली. "पण मग आता हे अस अचानक जे संपादक सांगेल ते त्याने सांगितलेल्या विषयावर ते म्हणतील तस  लिहायला का सुरवात केली आहात? अहो,  तुम्ही खूप पूर्वी ज्या कथा लिहायचात त्या कथांमधील व्यक्तिमतवांशी गप्पा मारायचात म्हणे! अशीच एक खूप जुनी कथा आहे तुमची. हसर दु:ख! आठवते तुम्हाला?" लालीताने लेखकाला विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघतां पुढे बोलायला सुरवात केली,"त्या कथेतली अल्लड मैना नेहेमी सांगते आम्हाला. तुम्ही तिला तिच्या अर्ध्या वयात एका दु:खला सामोरं जायला लावलंत म्हणे. पण मग तुमचं तुम्हला ते फारसं पटलं नाही, मग तुम्ही तिच्याशी बोलायला लागलात. तिनेच तुम्हाला सुचवलं होतं की तिला तारुण्याच्या उंबरठ्यावर आणून कथा थांबवा. म्हणजे तुम्हला दुसरा भाग लिहिता येईल. मैनाची कथा लोकांनी खूपच डोक्यावर घेतली होती म्हणे. ती नेहेमी सांगते आम्हाला. तिची कथा एकीकडे पूर्ण आहे अस ती म्हणते आणि शेवटाकडे पुढचा भाग लिहिण्यासारखा मजकूर तुम्ही लिहिलात; त्यामुळे अपूर्ण देखील आहे अस तिचं म्हणण आहे. पण तिच्या मनात तुमच्याबद्दल राग नाही; जसा आमच्या मनात आहे. ती एकटीच आहे जी तुमची बाजू आमच्यासमोर मांडत असते. पण बाकी सगळीजण तुमच्यावर खूपच नाराज आहेत; समजल? काहो, तुम्ही जर दु:खी-कष्टी मैनाशी बोलू शकलात तर मग माझ्याशी कधीच का नाही बोललात? माझ्याही आयुष्यात काय कमी दु:ख लिहीली आहात का तुम्ही?" ललिता मनातल सगळ भडा-भडा बोलत होती.


तिने एक निश्वास टाकला आणि पुढे बोलायला सुरवात केली. "काहो तुम्हाला ते नार्वेकर आठवतात का? तुमच्या उमेदिच्या काळातील एका कथेतले व्यक्तिमत्व. त्यांनी देखील सांगितले आम्हला त्याचं आणि तुमच छान पटायच म्हणे. ती कथा जेव्हा तुम्ही अर्धवट सोडलित तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही सांगितल होत की अचानक त्या कथेने तुमच्याशी बोलण बंद केल होत. आम्ही समजू शकतो हो की एखाद्या वेळी एखादी कथा सुचेनाशी होऊ शकत. म्हणून मग तुम्ही ती कथा अपूर्ण सोडत आहात. पण तुम्ही नार्वेकाराना विश्वासात घेतल होतंत.  नार्वेकर मिटींगमध्ये बोलतात ना तेव्हा नेहेमी म्हणतात की त्याना वाईट वाटत त्यांची कथा तुम्ही अर्धवट सोडलीत. पण त्यांना पटल होत की कदाचित तुम्ही म्हणालात तस त्या कथेने तुमच्याशी बोलण सोडून दिल असेल. मात्र इतरांच अस मत नाही आहे. आम्हला काहीजणांना वाटत की तुम्ही पुढे पुढे केवळ पैशांच्या मागे लागून आमच्या कथा अर्धवट सोडल्या आहात. त्यातलीच माझी एक! अहो... किती वाट बघू मी? सारख नुसत खिड़कीमधे बसून कंटाळा येतो हो. बर कथा अर्धी सोडताना मला एखादा छंद वगैरे तरी लाउन द्यायचात ना? काही म्हणजे काहीच नाही? कमाल करता हो तुम्ही...माझ सोडा एकवेळ. तस माझ वय आहे की मी धीर धरु शकते. पण त्या दुसऱ्या कथेतल्या बिचा-या काणे आजोबांचा विचार करा. ना ते काही करतात; ना त्याचं देहावसान होत. बिचारे तसेच अडकून आहेत. काय तर  म्हणे आराम ख्रुचीत ते बसले होते आणि भूतकाळाचा विचार करत होते. बास? अहो म्हातारे झाले म्हणून फक्त भूतकाळाचा विचार करत असतील का ते? मनुष्याचा स्वभाव विशेष हाच आहे की काही कालावधी दु:ख केल्यानंतर तो भविष्याची स्वप्न बघायला लागतो. त्यात तुम्ही त्याचं संपूर्ण आयुष्य खूप घटनांनी आणि कर्तुत्वाने भरून टाकलेलं आहात. आता मात्र त्यांना एका आराम खुर्चीत अडकवून ठेवलं आहात...." ललिता काही बोलायची थांबत नव्हती.


लेखकाच्या मानत आल; 'हीच एकटी बोलते आहे. बाकीच्यांना कुठे काही हरकत आहे?' मात्र हा विचार करताना लेखक हे विसरला होता की त्याचे विचार हाच खरा आणि एकाच दुवा आहे त्याच्या अर्धवट लिहिलेल्या कथांमधील व्याक्तीमात्वांमध्ये आणि त्याच्यामद्धे. त्यामुळे त्याच्या मनात हा विचार आला आणि त्याच क्षणी मागून काणे आजोबांनी लेखकाला हाक मारली. "अहो! अहो! इथे मागे वळून बघा. हो! मीच काणे आजोबा बोलतो आहे. तुम्ही तिने बोलावं असा विचार मनात आणलात म्हणून ती आम्हा सर्वांच्या वतीने बोलत होती. मात्र मी वाटच बघत होतो की कधी मला बोलता येत आहे. अगदी बरोबर सांगते आहे ती ललिता. कंटाळलो आहे या आराम खुर्चीत झुलून झुलून. आता माझ पुढे काही होणार आहे की नाही? बर, माझं राहुद्या एकवेळ, मला निदान संपूर्ण आयुष्य चांगल जगण्याच सामाधान आहे. पण या राजूने काय तुमच घोड मारल आहे हो? एकतर त्याला कॅन्सर सारखा आजार दिलात. त्यात त्याच्या आई-वडिलांची परिस्थिती बेताची केलीत. मग वडिलाना बाहेर पाठवलत पैशांची सोय करायला आणि राजूला आणि त्याच्या आईला घरात बंद केलत आणि थांबलात. बर आजारी पोर आहे तर त्याला झोपवून ठेवायचं; तर नाही; म्हणे मस्तीखोर राजू आईच एकत नव्हता. ती बिचारी कायम त्याला समजावत असते........ तेही तेच तेच वाक्य परत परत बोलून? का तर तुम्ही पुढे काही न लिहिता ती कथा अर्धी सोडलीत." काणे आजोबा स्वतःबरोबर राजू आणि त्याच्या आईची बाजू देखील मांडत होते.


लेखक त्यांच बोलण एकून गोंधळून गेला. हे खर होत की राजूची गोष्ट तो पूर्ण करणार होता; पण अलीकडे जास्त भावनिक कथा लोकाना नको असते अस एका प्रकाशकाच मत पडल; म्हणून मग त्याने विचार बदलला. पण मग नवीन वळणं जर त्याच कथेत घालावीत तर त्या कथेत खूप जास्त बदल करावे लागणार होते; म्हणून मग ती अर्धवट सोडून देवून लेखकाने नवीन गोष्ट लिहायला सुरवात केली होती आणि ती नवीन गोष्ट पूर्णसुद्धा केली होती.


लेखक एकूणच विचारात पडला. 'अशा अजूनही काही कथा आपण अर्ध्या लिहून सोडल्या आहेत. ती एक रहस्य कथां होती की. ज्यात एका गाढवर एका सरदार घराण्यातल्या लोकांमध्ये होणाऱ्या घटना आपण लिहित होतो; आणि ती दुसरी भय कथा! मग ती देखील आपण पूर्ण केली नव्हती. त्यामधली व्यक्तिमत्व मात्र इथे आलेली दिसत नाहीत. लेखकाच्या मनाला तो विचार स्पर्शून गेला.' त्याने एकदा समोर उभ्या असलेल्या काणे काका, राजू आणि राजूच्या आईकडे बघितलं आणि त्याच्या मनात विचार आला,'एवढीच व्यक्तिमत्व का आली आहेत माझ्याकडे आज? माझ्याशी फक्त बोलायला की काही दुसरा विचार आहे यांच्या मनात?'.......... बस तो एक क्षणभरासाठी आलेला विचार आणि.....


अचानक बोलता बोलता ती सर्वच पात्र उभी राहिली आणि लेखकाच्या दिशेने येऊ लागली. त्यांची नजर थंडगार होती. कुठल्याही भावना त्या नजरेत नव्हत्या. आत्तापर्यंत फक्त आपल दु:ख त्याना सांगणारी ती सर्व त्याच्याच कथेतील पात्र.. एका अर्थी त्यांनीच निर्माण केलेलं जग... आज त्याच्या दिशेने पुढे सरकत होत.  आता मात्र त्यांची बोबडी वळली. काय कराव त्याना सुचेना. तो मागे मागे जाऊ लागला. त्याक्षणी मागून लालीताच्या विकट हसण्याचा आवाज आला आणि काणे काका, राजू आणि राजूची आई यांच्याकडे पाठ करून लेखकाने लालीताच्या दिशेने तोंड फिरवले. मागे वळताच लेखकाला मोठ्ठा धक्का बसला होता. कारण त्याच्या समोर सरदार घराण्यातली प्रत्येक व्यक्ती उभी होती आणि ..... आणि त्या भय कथेतली ती बाई.....


"अहो.... अहो बाई.... मला थोड़ बोलू द्याल का? अहो.. अहो.. सरदार साहेब.... अरे! अरे! थांबा.... एका ना... एक मिनिट..." लेखक एका जागी थिजल्यासारखा उभा राहून हात हलवत ओरडत होता. त्याचा श्वास धपापत होता. त्याला गुदमरल्यासारख होत होत, डोळ्यासमोर अंधार दाटला होता............... आणि अचानक........


......................."साहेब..... अव... साहेब जी....." गोपाळ लेखक महाशायांच्या पलंगाजवाळ उभा राहून त्यांना हाका मारत होता. आणि पलंगावर गाढ़ झोपेत असलेले लेखक महाशय हात-पाय झाड़त 'नाही... नको.. थांबा...अहो... एक मिनिट.... ऐका... ऐकाना...' अस काहिस ओरडत होते.


शेवटी गोपाळने लेखकाला गदागदा हलवल आणि लेखकाला जाग आली. तो दचकुन ओरडत पलंगावर उठून बसला. त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता. नजर पूर्ण गोंधळून गेली होती.  "काय.... काय.... कोण............ कोण......"  गोपाळकड़े बघत लेखक गोंधळून म्हणाला.


"अव साहेब, मगासधरन आवाज देऊन राहिलोय तर तुम्ही उठायच नाव नाही घेत. काय सपान बिपान पडल का काय तुम्हास्नी?अस काय करताय राव? बर बोला जी, चाय बनवु ना?" गोपाळने लेखकाकडे विचित्र नजरेने बघत विचारले.


आता मात्र लेखकाला पूर्ण जाग आली होती. ' म्हणजे ते सगळ स्वप्न होत तर... मात्र किती खर वाटलं होत ते सगळ! क्षणभर तर मला वाटल खरच ती सगळी व्यक्तिमत्व माझ्या अंगावर धावून येत आहेत.' लेखकाच्या मनात आल. क्षणभर विचार केल्यावर मात्र लेखकाच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं,'अरे तस बघायला गेल तर उत्तम प्लॉट आहे की पुढच्या कथेसाठी. वा! वा! भलतेच प्रोफेशनल झालो आहोत की आपण. आपल्याला स्वप्नही आजकाल छान पडायला लागली आहेत. चला लिहायला विषय मिळाला. आता सुरवात केली पाहिजे लगेच.' त्याच्या मनात विचार आला आणि तो स्वतःवरच खुश होऊन हसायला लागला.


लेखकाच असं आपलं आपण हसण अचंब्याने बघणाऱ्या गोपाळकडे बघून तो म्हणला;"गोपाळ.. खरच एक फक्कड़सा चहा कर. मी फ्रेश होऊन लिहायलाच बसणार आहे."आणि मनापासून खुश होत बाथरूमच्या दिशेने वळला.


एक विचित्र कटाक्ष टाकून गोपाळ स्वयंपाक घराच्या दिशेने निघाला. मात्र त्याचा पाय दाराजवळ ठेवल्या एका कप-बशीला लागला. बाजूलाच गार झालेल्या पोह्यांची बशीसुद्धा होती.


"चाय पिउन परत झोपलं की काय साहेब? पोहे पन तसच हायेत. बर म्या तर आताच आलू. मंग ह्ये पोहे आन च्या केला कोनी कोन जान?" अस मनाशी म्हणत आणि अजब करीत कप-बशी घेऊन गोपाळ आतल्या दिशेने वळला.


--------------------------------------------------------------


2 comments:

  1. I am really impressed by your imagination and expressive writing.
    Taking the reader to a different world 👌🏼👌🏼👌🏼💕

    ReplyDelete
  2. Thank u so much manjur. Love u a lot

    ReplyDelete