Friday, July 19, 2019

एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही हो सकते!



एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही हो सकते!

स्त्री-पुरुष मैत्री हा विषय अनेकदा अनेक स्तरांवार चर्चेत आला आहे. वाद-विवाद, चर्चा, मत-मतांतर अनेकदा वाचनात आली आहेत. त्यातलाच एक लेख नुकताच वाचनात आला. विषय काहीसा स्त्री-पुरुष मैत्री आणि पुरुषांना समाजाने मान्य केलेली मोकळीक आणि स्त्रियांना दिली जाणारी म्हणा किंवा स्त्रियांनी घेतलेली 'मोकळीक' याविषयी स्त्रियांबद्दलचा so called समाजाचा दृष्टीकोन. असा काहीसा होता.  त्यात अस म्हंटल होत की स्त्रियांनी पुस्तकांवर लिहावं, समाजातल्या, धर्मातल्या, राजकारणातल्या समस्यांना हात घालावा पण यात जिथे जिथे सेक्स आहे तिथे बाईने हात घालू नये. नाहीतर तिची गणना बोल्ड लिहिणारी, चळवळी, वळवळी, झेंडेवाली किंवा अल्ट्रा फेमिनिस्ट अशी होते. आणि सहसा स्त्रियांना स्वतःची ओळख अशी व्हावी ही इच्छा नसते. अजून एक मुद्दा मांडला गेला होता तो स्त्रीने लग्नानंतर नवऱ्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या पुरुषाला 'तू मला आवडतोस' अस म्हंटल तर लगेच समाजाच्या भुवया वर उचलल्या जातात. पण पुरुषाला अनेक मैत्रिणी असू शकतात आणि त्यात काहीच वावग नाही. लग्नानंतर स्त्री गर्भवती असताना पुरुष म्हणाला की  'कंन्ट्रोल होत नाही म्हणून मी प्रोस्टीट्युटकडे जातो कधीमधी;' तर हे त्याची मैत्रिण सहज एकून घेते आणि मान्य देखील करते.'जर तुझ्या बायकोला कधी change हवा असेल किंवा तू बाहेरगावी असताना तिला कंट्रोल झाला नाही तर तीही तुझ्यासारखी आपली गरज सुखाने भागवून आली तर चालेल का?' असा प्रश्न त्या मित्राच एकून घेणारी मैत्रिणी त्याला का विचारत नाही? अर्थात अस विचारलं गेलच तर 'माहित नाही यावर मी कसा react होईन;' हे कॉलरबचाऊ उत्तर पुरुष देतो ते मात्र मान्य केल जात. ते का?.............. असे काहीसे विचार त्या लेखात मांडले होते.

हा लेख वाचताना काही मुद्दे जरी पटले असले तरी एक विचार मनात येत होता... केवळ नवरा बाहेरख्याली आहे म्हणून त्याची जिरवायला स्त्रीने देखील हव ते करावं अस तर नाही ना या लेखात म्हंटलेल? खर तर स्त्रीला विचार आणि आचार स्वातंत्र्य आहे. मुख्य  म्हणजे जी स्त्री खरच मनाने आणि विचाराने स्वतंत्र असते ती तिच्यापुढे लागणाऱ्या so called tags चा विचार करत असेल अस मला वाटत नाही. आणि जिला अशा tags ची भिती वाटत आली आहे ती कधीच उघडपणे आपले विचार मांडताना दिसलेली नाही.   अर्थात हे देखील तितकच खर आहे की एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष मित्र म्हणून आवडतो देखील, पण उगाच कशाला चर्चेचा विषय करायचा म्हणून मग त्या पुरुषाला ती राखी बांधून मोकळी होते. किंवा मग भावजी, दादा अशी विशेषण लावून उगाच एखाद नात तयार करते. त्यातून समाजाचे तोंड तिने बंद केले अस तिच मत असत. पण तरीही तिच्या मनातली सगळी भिती गेलेली नसतेच. नात्याचा tag लावल्यानंतर चर्चेचा विषय कदाचित होणार देखील नाही, पण आपण केवळ मित्र म्हणून बोलत असलो तरी त्या पुरुषाचा काही गैरसमज झाला तर? आपण फक्त निखळ मैत्री असा विचार करतो आहोत, पण त्याला वाटल की दोस्तीच्या पुढे सरकायला हिची काही हरकत नाही, आणि त्या गैरसमजातून त्याने अस काही केल तर? आणि मग अशी एखादी छानशी मैत्री कदाचित फुलली असती ती कधी जमतच नाही.

खर तर ओळख झाली आणि सहज गप्पांमधून विचार जुळले की दोस्ती होते. मग ती दोन मैत्रिणीमधली असेल किंवा मित्रांमधली किंवा मित्र-मैत्रिण अशी असेल. कदाचित् असही होत असेल की मैत्री असताना नैसर्गिक ओढीतून कदाचित् तो मित्र आणि मैत्रिण जवळ येतील. पण ते जर समजुतीने घेतले आणि त्याला इतर कोणतेही भावनिक बंधन घातले नाही तर अशी मैत्री देखील टिकू शकते. पण हा विचार अजुनही समाज मान्य नाही. पण मला वाटत, प्राधान्य दोस्तीला आणि जुळणाऱ्या विचारांना आणि एकमेकांना समजून घेण्याला द्यावं. अर्थात म्हणून भेटणाऱ्या प्रत्येक मित्राशी किंवा मैत्रिणीशी शारीरिक संबंध तयार करावेत; आणि त्याला दोस्तीच नाव द्यावं हे देखील योग्य असू शकत नाही.

एक मत असही आहे की कदाचित् पुरुष at first instinct स्त्रीकडे mate म्हणून बघतो... कालांतराने अनुभवातून त्याचा दृष्टीकोन बदलतो. स्त्रीला मात्र फक्त मैत्री अनेकदा अभिप्रेत असते. ती जर विवाहित असेल आणि तिच्या संसारात सुखी असेल तरीही कधी कधी वेगळ्या वैचारिक शेअरिंगसाठी तिला मित्र असावा अस वाटू शकत. त्यामुळे मूळ मुद्दा हा असू शकतो की समजून घेण आणि प्रत्येक दोस्तीला वेळ देण, ती जशी उलगतडत जाईल तशी स्विकारण महत्वाच आहे. मुळात मैत्रीची अशी कोणतीही व्याख्या असूच शकत नाही. ती होते किंवा होत नाही. खूप वर्ष ओळखत असूनही दोस्ती होते अस नाही... आणि पहिल्या भेटीतच तारा जुळतात... असा ही आपल्याला अनुभव असतो. कधी कधी खूप चांगली ओळख एखाद्या हळव्या क्षणी दोस्ती बनते किंवा कायमची तुटते. त्यामुळे मन मोकळ ठेऊन समोरच्या व्यक्तीशी आपले विचार, आवडी-निवडी जुळतात का इतकाच विचार जर केला तर कदाचित् ' एक लडका और एक लडकी सिर्फ और सिर्फ दोस्त हो सकते हे!'



4 comments:

  1. प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मनातल्या opposite sexबद्दल असलेल्या भावनिक आंदोलनाचे नेमके शब्द्चीत्रण.जीवनाच्या कुठल्यातरी वळणावर हा खास थांबा प्रत्येकाच्या मनात असतोच फक्त प्रत्येकाला व्यक्त होता येते असे नाही खूप छान मी fan आहे तुमच्या या blog चा

    ReplyDelete
  2. खूप खूप आभार अमित

    ReplyDelete