Friday, November 18, 2022

आपला आत्मा आणि आपण (we as an individual and our soul)

 आपला आत्मा आणि आपण


आपला आत्मा आणि आपण
(we as an individual and our soul)

मला माहीत आहे की 'आत्मा' (soul) हा विषय म्हंटलं की अनेकांचे कान टवकारले जातील. पण मला इथे एक मुद्दा अगदी स्पष्ट करायचा आहे की इथे लिहिलेले सगळे विचार हे माझे आहेत. कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या कोणत्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाही.

तर आपला आत्मा हा विषय तसं म्हंटलं तर अगदी सोपा आणि विचार केला तर खूप गहन आहे. आज या विषयावर का लिहावंसं वाटलं याचं कारण अगोदर सांगते आणि मग माझे विचार मांडते. सध्या माझी मोठी लेक शिवानी योगविद्या, ध्यान (मेडिटेशन) याचा अभ्यास करते आहे. त्याअनुषंगाने सध्या ती अनेक पुस्तके (अर्थात इंग्रजी मधली) देखील वाचते आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही सहज गप्पा मारत होतो; त्यावेळी तिने मला एक अत्यंत सुंदर संकल्पना सांगितली.

सर्वसाधारण समज असा आहे की आपल्या मृत्यू नंतर आपला आत्मा (soul) परमात्म्यामध्ये (univerce) विलीन होतो. जर त्या आत्म्याचे या जगातले बंध अजून पूर्ण संपले नसले तर; ज्याला अनेक कारणं असू शकतात जी पुढे मी मांडली आहेत; पुढे तोच आत्मा वेगळ्या स्वरूपात पुन्हा जन्म घेतो. ज्याला आपल्या हिंदू विचारसरणीमध्ये किंवा जीवन पद्धतीमध्ये पुनर्जीवन म्हणतात. पण परमत्म्यामध्ये विलीन होणे आणि पुर्नजन्म या मधल्या काळात आपला आत्मा जिथे कुठे असतो... सोपं वाटावं म्हणून त्याला आपण एक वातावरणीय पोकळी म्हणू.... तिथे देखील त्याचं अस्तित्व असतं. अर्थात तिथे तो आत्मा एकटा नसतोच. तिथे देखील काही समूह असतात; सोबत असते.

आमच्या चर्चेमध्ये एक असा मुद्दा आला की आपण जिवंत असतो त्यावेळी आपल्या शरीरात जो आत्मा असतो; तो शंभर टक्के आपल्या शरीरात नसतो. त्यातला काही टक्के भाग हा परमात्म्या सोबत; वातावरणीय पोकळीमध्ये (univercal space) असतो. उदाहरण घ्यायचं तर आपल्या शरीरात असणारा आत्मा साठ टक्के तर परामत्म्या सोबत चाळीस टक्के असतो. हे सर्वांच्याच बाबतीत असतं. आपल्या आत्म्याचा जो काही टक्के भाग परमात्म्यासोबत असतो तो तिथे असताना देखील आपल्या जवळच्या आत्म्यांच्या सोबतीत असतो. हे 'जवळचे आत्मे' म्हणजे केवळ आपले नातेवाईक किंवा आईवडील असं नसून; 'समविचारी आत्मा' असं असावं. म्हणूनच तर अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला सहज भेटतो; किंवा प्रत्यक्ष फार भेटत नसूनही एक गुंतवणूक (connect) आपल्याला सतत जाणवत असतो. या व्यक्ती सोबत आपले विचार खूप जास्त जुळतात. तसंच अनेकदा आपण जे बोलणार असोत किंवा विचार करत असतो तोच विचार सोबत असलेली व्यक्ती बोलून दाखवते आणि आपण त्याला 'टेलिपॅथी' या संज्ञेने संबोधतो. हे कदाचित होतं कारण त्या वातावरणीय पोकळीमध्ये (univercal space) परमात्म्यासोबत आपल्या आत्म्याचा जो काही अंश असतो तो त्या व्यक्तीच्या अंशाशी जोडला जातो; किंवा जोडलेला असतोच; म्हणून तर इथे आपण भेटतो किंवा जोडले जातो.

आता पुढचं पाऊल... एक अजून संकल्पना... हे जे परमात्म्यासोबत असलेले आपले आत्मे; जे अंशतः आहेत किंवा नश्वर शरीराचा त्याग करून तिथे गेलेले आहेत; ते तिथे असताना काय करतात? दुसरा प्रश्न : मूलतः हिंदू विचार प्रणालीमध्ये परामात्म्यामध्ये विलीन होणं हीच आत्म्याची परिपूर्णता असते. मग परमात्म्यासोबत असताना देखील विलीन न होता परत हे आत्मे जन्म का घेतात?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर; शिवानी सोबत केलेल्या चर्चे नंतर माझ्या अल्पमती प्रमाणे देते आहे : अंशतः असोत किंवा पूर्णतः; परमात्म्यासोबत असलेला आत्मा हा सतत परमात्म्यासोबत विलीन होण्याच्या मार्गावर असतो. मग त्यासाठी पृथ्वीवरील जन्मामध्ये जे अनुभव घेतले त्याचं पृथक्करण करून त्यातील योग्य आणि अयोग्य याचा विचार करून हळूहळू एक एक पाऊल पुढे जाणं हे त्या आत्म्याच्या दृष्टीने उद्दिष्ट असतं. आपण जसे समविचारी लोक नकळत इथे एकत्र येतो; तसेच कदाचित तिथे समविचारी आत्मे एकत्र येतात. इथे आपल्याला अनेक भावना असतात; राग, लोभ, मद, मत्सर; पण तिथे केवळ आत्मिक समाधान आणि परमात्मा विलीन ही एकच भावना असते. त्यामुळे त्याअनुषंगाने मार्गक्रमण करतो आपला आत्मा. यामध्ये सोबत समविचारी आत्मे असतातच.

आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर : आपल्या हिंदू विचारप्रणालीमध्ये जीवनाच्या ब्याऐंशी फेऱ्या म्हंटल्या आहेत. जर या संकल्पनेचा विचार प्रमाण मानला तर.... आपण; म्हणजे आपला आत्मा; आपल्या प्रत्येक जन्मामध्ये काहीतरी शिकतो. मग ते योग्य देखील असतं आणि अयोग्य देखील असतं. जोवर आपण शरीरात असतो तोपर्यंत आपल्या आत्म्यावर एक मोठं वर्चस्व (domenence) अहंकाराचं (ego) असतं. त्यामुळे अयोग्य विचार देखील आपण जवळ करतोच.

इथे मला एक अजून मुद्दा मांडावासा वाटतो. आपल्या हिंदू विचारपरणालीमध्ये असं म्हणतात की 'कोणतेही शिक्षण चांगलेच असते'. अनेकदा या विचाराची अनेकांनी चेष्टाचा देखील केली आहे. परंतु याचा सर्वसमावेशक (comprehensive) विचार केला तर; ही संज्ञा/संकल्पना परमात्म्यासोबत विलीन झालेल्या आत्म्याला लागू होत असेल का? पृथ्वीतलावरील घेतलेले अनुभव हे एकप्रकारचे शिक्षणच नाही का? आपल्या अहंकारामुळे (ego) किंवा हट्टीपणामुळे चुकत आहे हे माहीत असूनही आपण तीच गोष्ट करतो. कदाचित ही कृती देखील आवश्यक असेल. मागील जन्मात आपण योग्य मार्गाने काहीतरी शिकलो नसू; म्हणून तर या जन्मामध्ये चुका करून किंवा अहंकारयुक्त वागून आपण तीच गोष्ट शिकलो असू शकतो.

ही शिकवण घेऊन जेव्हा आपला आत्मा परमात्म्यासोबत जातो; त्यावेळी कदाचित या शिकवणीचं पृथक्करण केलं जातं. यामध्ये सोबतच्या आत्म्यांची मदत होते. हे जे 'सोबतचे आत्मे' असतात; यांचं एक आंतरवर्तुळ (inner circle) असतं. या पृथक्करणातून जे अयोग्य आहे ते लक्षात आल्यानंतर त्या अयोग्यतेचं परिमार्जन करण्यासाठी आपला आत्मा परत एकदा पृथ्वीवर येतो. त्याच या ब्याऐंशी फेऱ्या! हळूहळू एक एक पाऊल पुढे जात आपला आत्मा कदाचित आत्मीय शांती (inner peace) मिळवतो आणि मग शेवटी पूर्णत्वाला किंवा त्या परमप्रमात्म्याला जाऊन मिळतो.

माझं मन मला अनेकदा सांगतं की आपण जगात सर्वांशी खोटं बोलू शकतो. पण स्वतःशी नाही. हे सत्य जर आपण प्रमाण मानलं; तर आपण आपल्या जीवनाचा सर्वसमावेशक विचार करून हे ठरवणं आवश्यक आहे की आपले कोणते विचार हे अहंकारयुक्त (egoistic) आहेत आणि किती विचार हे अयोग्य आहेत. याची कबुली दुसऱ्यांकडे देण्याची गरज नाही. ते कायम अगदी आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या सोबत ठेवलं तरी चालेल. पण हा लेखाजोखा आपण जितक्या लवकर सुरू करू तितकं चांगलं. त्याची मदत आपल्याला कदाचित अहंकारावर ताबा मिळवायला (control on ego) आणि अयोग्य कृतींपासून स्वतःला दूर ठेवायला होईल. कदाचित याचा उपयोग ब्याऐंशी फेऱ्या लवकर संपवण्यासाठी होईल.

अर्थात या कुठल्याही मुद्द्याला जरी काही ठोस प्रमाण सिद्धांत नसला तरी; माझ्या मते जर आपण विचार केला तर हे मुद्दे मान्य करण्यासारखे असावेत. जर कोणाला मान्य नसतील तरी त्यांची मतं मी स्वीकारते... याविषयात तुम्हाला तुमची मतं सांगायची असतील किंवा चर्चा करायची असेल; अर्थात निरोगी (healthy) तर माझी काहीच हरकत नाही. 

No comments:

Post a Comment