Friday, September 23, 2022

फिल्म लेखन आणि निर्मितीच्या निमित्ताने

फिल्म शूट या विषयावर मी कधी लिहीन असं मला वाटलंच नव्हतं. खरं सांगायचं तर राजकीय क्षेत्रात देखील काम करेन असा विचार देखील मी कधीच केला नव्हता... हे देखील तितकंच खरं! मात्र गेली दहा वर्ष मी काम केलं आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर ते माझं क्षेत्र नाही. म्हणूनच माझ्यासारखा स्वभाव असणारी व्यक्ती पराग सारखा खांबीर आधार असेल तरच काम करू शकेल या क्षेत्रात; हे लक्षात आलं आणि मग पक्का निर्णय घेतला की या क्षेत्रातून बाहेर पडायचं. पण मग पुढे काय करायचं ते मात्र ठरवलं नव्हतं. त्याचवेळी कधीतरी एकदा श्री. राहुल अगस्ती (फॅशन डिझायनर) यांनी मला माझ्या एका कथेसाठी विचारलं... आणि मग एक वेगळाच प्रवास सुरु झाला. त्या प्रवासाचं फलित म्हणजे मी आता माझी फिल्म निर्मिती कंपनी सुरू केली आहे.

सध्या 'Right Brain' या माझ्या निर्मिती कंपनी अंतर्गत दुसऱ्या फिल्मचं शूट सुरू आहे. माझी पहिली निर्मिती भय/ रहस्य कथेवर आधारित होती. त्यावेळचे काही फोटो....







आता मात्र एका पस्तिशीमधल्या पती-पत्नीच्या भावनिक गुंतावूनकीची प्रेम कहाणी; असा विषय आहे माझ्या दुसऱ्या फिल्मचा. या येणाऱ्या फिल्मच्या शूटचे काही फोटो .....






पण तसं बघितलं तर माझ्या कथेवर निर्मित होणारी ही चौथी फिल्म आहे. 'लालीची गोष्ट' या माझ्या कथेतील केवळ काही भागावर पहिली फिल्म शूट झाली होती 2018 मध्ये. त्यानंतर भर कोव्हिड काळात दहा मिनिटांची दुसरी शॉर्ट फिल्म 'स्टुडिओ अपार्टमेंट' केली. अर्थात हे दोन्ही सिनेमे म्हणजे केवळ एक प्रयोग होता. त्यावेळी मी कधीच असा विचार नव्हता केला की मी स्वतः फिल्म निर्मिती क्षेत्रात काही करेन.

माझी पहिली व्यावसायिक फिल्म 'एपिलॉग' ही जुलै 2022 ला फिल्लम् बाज फिल्म कंपनी या YouTube चॅनेलवर रिलीज केली. आजवर जवळ जवळ एक लाखांच्यावर views आहेत या फिल्मला. एक भय/ रहस्य कथा असूनही इतके जास्त views असणं मला खूप आनंद देऊन गेलं. अर्थात एक फिल्म लिहून, शूट करून रिलीज करणं हा एक वेगळाच अनुभव आहे.

कथा लिहिताना आपण केवळ वाचकांच्या मनाचा विचार करतो. पण प्रेक्षकांची मानसिकता वेगळी असते. मूलतः सिनेमा हे दृक्श्राव्य माध्यम. वाचक एखादा संवाद वाचताना त्या संवादातील व्यक्तिमत्व भाव कसे व्यक्त करत असतील याची त्यांच्या मनात कल्पना करतात. मात्र सिनेमामध्ये ते प्रेक्षकांना दिसतं. त्यामुळे त्यांना स्वतःचा विचार करण्याचं स्वातंत्र्य नसतं. आजवर हे मला सोपं वाटत होतं. पण आता मी स्वतःच सिनेमाच्या दृष्टीने कथा लिहायला लागले आहे त्यावेळी लक्षात येतं आहे की आपल्या मनातले भाव तंतोतंत जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर लेखक म्हणून खूप जास्त विचार करायला हवा.

कथा लेखक आणि वाचक हा थेट संवाद असतो; याउलट सिनेमासाठी लिहिणं हा अनेक माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा विचार असतो. लेखक आणि दिग्दर्शक यांचा सुसंवाद ही यशस्वी सिनेमाची पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे दिग्दर्शक आणि अभिनेते यांचा सुसंवाद. अर्थात यामध्ये जोपर्यंत दिग्दर्शकला मान्य होत नाही तोपर्यंत अभिनेत्यांना तोच तो अभिनय आणि संवाद परत परत करावा लागतो. म्हणूनच कदाचित या क्षेत्रात दिग्दर्शकचं महत्व अनन्यसाधारण आहे. अर्थात अभिनेते हे खरे संवाद साधक आहेतच; त्यामुळे ते तिसरी पायरी आहे. लेखक आणि दिग्दर्शकाला जे सांगायचं असतं ते अभिनेते त्यांच्या संवादातून सांगतात.... आणिअनेकदा संवाद नसताना त्यांनी त्यांच्या चेहेऱ्याने बोलणे अत्यावश्यक ठरते. शेवटची पायरी म्हणजे एडिटिंग. अभिनेत्यांनी जे कॅमेरा समोर दाखवलं असतं; ते योग्य पद्धतीने कट करणं देखील तितकंच आवश्यक असतं. सगळी मिळून आलेली भेळ मग तिखट, आंबट, गोड असते... ती मायबाप प्रेक्षकांच्या सोमर ठेवली जाते.

कितीतरी मोठं टीम वर्क आहे हे. एका कुटुंबासारखं काम करणारं. काही हट्टी, काही फक्त सांगकामे आणि काही इच्छा असूनही केवळ गरजेपोटी पडेल ते काम करणारे... सगळे एकत्र येतात एका सुंदर कलाकृतीसाठी. 


3 comments:

  1. फ्लिम जगत बद्दल चा आपला खरा अनुभव वाचताना खूप उत्सुकता वाटली ती नवीन फ्लिम बाबत

    ReplyDelete
  2. Awesome ❣️
    Congratulations Dear Jyoti! May you be The Famous Person in the cinema world!

    ReplyDelete
  3. Wow Bhabhi. I have seen all your three movie. Slowly and steadily your are making your path in cine world. I know you are very firm, dedicated and committed at your work. Your work is treat to us as audiance.

    I m very excited to see your next movie Right Brain. Wish you all the best.

    ReplyDelete