Friday, May 14, 2021

श्य.... सांभाळून बोला!

 श्य.... सांभाळून बोला!


भाग 1

"हॅलो... हॅलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हॅलो..... ऐकता आहात का तुम्ही? हॅsssलो........" 

फोन कट करून मैथिली खो-खो हसत सुटली. वर्धा, अभी, राजन, मंजू सगळे तिच्या हसण्यात सामील झाले. एकटी अवनी शांत होती. 


"काय झाल तुला अवनी?" हसण थांबवत मैथिलीने अवनीला विचारले.


"मैथिली मला असले pranks आवडत नाहीत. काय हा आचरटपणा लावला आहेत तुम्ही? कुठला रस्ता मिळत नाहीये तुला? उगाच काहीतरी बडबड का करते आहेस? एक समजून घे; मला या वाड्यात फक्त ही एकच रात्र रहायचं आहे हं. पहाटेच निघायचं आहे साधारण पाच पर्यंत. आणि dont worry...  मला रस्ता मिळेल बाहेर पडायचा. तुमचं तुम्ही बघा. एकतर आपल्यापैकी कोणालाही या बंगल्याची माहिती नाही.... आणि आल्या आल्या हा असला फोन काय करतेस तू?" अवनी एकूण प्रकार न आवडून रागाने म्हणाली.


"chill अवनी. प्रत्येकवेळी तुझी लेक्चर्स नको आहेत आम्हाला. आमची ताई बनू नकोस सारखी. समजलं? अग, आत आल्या आल्या हा जुन्या पद्धतीचा फोन बघितला गोल डायलवाला आणि वापरावासा वाटला.... म्हणून केला फोन." मैथिली आवाज चढवून म्हणाली.

वातावरण तापतं आहे हे बघून वर्धा मध्ये पडला. "पण तू नक्की कोणाला लावला होतास  फोन मैथिली?" हसू थांबवत त्याने तिला विचारलं.

"अरे कोणाला असा नाही रे. बस काही नंबर फिरवले. समोरून फोन उचलल्याचं समजलं आणि मी घाबरलेल्या आवाजात बोलून फोन कट केला." मैथिली त्याच्याकडे बघून डोळा मारत आणि हसत म्हणाली.

"कोण होत ग फोनवर?" मंजूने विचारलं.

"मला काय माहित? एक घोगरा आवाज होता. हॅलो..... बोला.... असं म्हणाला. बस. जाउदे ते. यार इतका प्रवास करून आलो आहोत. चला जरा घर बघून घेऊया. बाबा म्हणाले होते की ते इथे फोन करून जो कोणी care taker आहे त्याला कळवतील की आपण येणार आहोत. पण तुम्हाला माहित आहे माझे बाबा किती बिझी असतात. त्यामुळे कदाचित ते फोन करायला विसरले देखील असतील. चला, आपणच त्या care taker ला शोधून काढू या." असं म्हणत मैथिलीने पायाशी ठेवलेली आपली bag उचलली. तिचं अनुकरण करत सगळ्यांनीच आपापल्या bags उचलल्या. 

"रामू काका....... ओ रामू काका....." अभी हाका मारायला लागला.

"ए गप. कोण रामुकाका रे?" राजनने अभिच्या टपलीत मारत विचारले.

"अरे साधारणपणे अशा जुन्या वाड्यांचा सांभाळ करणारे कोणी असतात ना ते म्हातारे असतात. आणि त्यांच नाव रामू काका असतं. कायम धोतर.... मळकट बनियन आणि खांद्यावर एक फडक असा त्यांचा अवातार असतो." अभी राजनला डोळा मारत म्हणाला आणि आतल्या दिशेने वळला. मात्र नजर वर करताच तो दचकून धडपडला. आतल्या एका दारात कोणीतरी उभं होतं. एकदम आवाज वाढवून अभिने विचारल,"कोण? कोण आहे तिथे?"

त्याच्या या प्रश्नाने सगळेच त्या दाराकडे बघायला लागले. मंजूने घाबरून वर्धाचा हात धरला. तिच्या हातातली bag खाली पडली. मैथिली पण  गोंधळली. कारण तिच्या बाबांनी तिला सांगितले होते की 'बेटा, बंगला बंद असतो. कोणीतरी आहे तिथे सांभाळायला पण त्यांना कळवावं लागतं. कारण तो गृहस्थ सतत बंगल्यात नसतो. तुम्ही दोन दिवसच जाणार आहात तर मी कळवतो. पण जर कोणी नसलं तर आपलं आपण सांभाळून घ्या.' त्यावर मैथिलीने सांगितलं होतं की फक्त एक रात्र मुक्कामाला ते सगळे त्या बंगल्यावर जाणार होते आणि सकाळी सगळं आवरून लगेच निघणार होते. त्यामुळे कोणी नसलं तरी चालणार होतं. म्हणून तर तिने बंगल्याच्या किल्ल्या आठवणीने मागून घेतल्या होत्या निघताना.

मैथिलीने धीर परत करून विचारलं,"कोण?"

"मी रामुकाका हाय जी. आवाज दिलात म्हणून आलं जी." त्या कृश आकृतीने उत्तर दिलं.

"अहो मग तिथे उभे राहून काय बघता आहात. आत या की. पाहुणे आम्ही आहोत; तुम्ही नाही." मंजू वैतागून म्हणाली.

"हा जी. आलो." असं म्हणून रामुकाका आत आले. कृश तब्बेतीचे म्हातारे, मळकट धोतर आणि बनियन आणि खांद्यावर एक फडकं असा त्यांचा अवतार होता. ते बघताच अभी राजनकडे बघत डोळा मारून परत हसला.

"काय हो इतका वेळ कुठे होतात? बरं... ते जाऊ दे. किती खोल्या आहेत इथे?" वर्धाने विचारले.

"किती म्हंजी?  मला काय माहित जी." रामुकाका म्हणाले.

"तुम्हाला नाही माहित? मग काय आम्हाला माहिती आहे का या बंगल्याची? काय ग मैथिली... मी तुला म्हंटलं होतं न की आपण एखादी खानावळ किंवा लॉजिंग-बोर्डिंग शोधुया. तिथे कायम कोणी ना कोणी उतरत असतं. त्यामुळे बरी सोय असते. तर तुलाच या आडबाजूच्या वाड्यात यायची हौस. इथे इतक्या आत कोणी कशाला येत असेल? त्यात या रामुकाकांना जर काही माहित नाही, तर मग आता कोण या वाड्यात रहाणारी पूर्वीची पितरं येणार आहेत का आपल्याला माहिती द्यायला?" राजन म्हणाला.

तेवढ्यात वाड्याच्या वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या बाजूने खाकारल्याचा आवाज आला. 

आता मात्र मैथिली, मंजू, अवनी, वर्धा, राजन आणि अभी सगळेच दचकले.

"मैथिली या वाड्यात कोणी राहातं का?" हळूच मैथीलीच्या कानाला लागून राजनने विचारले.

तेवढ्याच हळू आवाजात मैथिली म्हणाली,"माहित नाही रे. बाबा म्हणाले होते........." तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत वरच्या जिन्यावरून एक मध्यम वयाचे गृहस्थ खाली यायला लागले.

"कोण रे तुम्ही पोरं? इथे कसे आलात?" त्यांनी एक करडा कटाक्ष सगळ्यांवर टाकला आणि विचारले.

मैथिली पुढे होत म्हणाली,"आम्ही मुंबईहून आलो आहोत. कर्जतच्या पुढेच एक ट्रेकिंग पोइंट आहे. तिथे ट्रेकिंगला गेलो होतो. आता फक्त रात्रीचा मुकाम होता. माझ्या बाबांच्या ओळखीच्या लोकांचा हा बंगला आहे. बाबा म्हणाले की रात्री आम्ही इथे थांबू शकतो म्हणून फक्त रात्रीपुरते इथे आलो आहोत."

"बरं बरं....." त्या व्यक्तीने सोफ्यावर बसत म्हंटले. "मी तुम्हाला वाड्याची माहिती देतो. हा दिवाणखाना. समोरच्या जिन्याने वर गेलं की डावीकडे एक, उजवीकडे एक, आणि समोर एक अशा तीन झोपायच्या खोल्या आहेत. जिन्याच्या मागून माजघर आणि त्याच्या शेजारी  जिन्याच्या डावीकडे देवघर आहे. पण आता ते बंदच असतं." 

त्यांनी एकूण बंगल्याची जुजबी माहिती दिली आणि त्या सगळ्यांकडे बघत स्वस्थ बसून राहिले. ते काहीच बोलत नाहीत हे बघून मैथिली पुढे झाली. "आम्ही वरची खोली वापरली तर चालेल का?" तिने विचारले.

"तुमची मर्जी. माझी काहीच हरकत नाही." त्यांनी सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकत म्हंटले.

"धन्यवाद." अस म्हणत मैथिलीने रामुकाकांकडे बघितले आणि म्हणाली,"काका थोडं काही खायला करता? काहीही चालेल. पिठलं भाकरीसुद्धा. आम्ही वर खोलीत आहोत. तयार झाल की बोलवा. आम्ही येतो खाली."

"बरं... जस तुम्ही म्हणाल तसं जी." अस म्हणत रामुकाका माजघराच्या दिशेने गेले.

एकदा रामुकाका ज्या दिशेने गेले तिकडे बघून आणि समोर सोफ्यावर बसलेल्या गृहस्थांकडे बघून मैथिली म्हणाली,"चला, आपण वर जाऊ या." तिने तिचे सामान उचलले आणि जिना चढायला लागली. ते गृहस्थ शांतपणे त्यांच्याकडे बघत सोफ्यावर बसले होते. इतरांनी मग फार विचार न करता मैथिलीचं अनुकरण केलं. जिन्याने वर गेल्यावर मैथिली क्षणभर थांबली आणि मग उजवीकडच्या खोलीकडे वळली. सगळेच तिच्या पाठोपाठ त्या खोलीत गेले.

"यार अजब घर आहे हे. तू म्हणाली होतीस कोणीच नसेल. आणि आता एक एक जण अचानक उगवतो आहे इथे. अख्खी रात्र अशीच गूढ घटनांनी भरलेली असली तर मजा येईल." खोलीत आल्या आल्या सामान जमिनीवर टाकत अभी हसत मोठ्याने म्हणाला. तितक्यात काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला आणि सगळेच धावत खोलीच्या बाहेर अगदी जिन्याच्या टोकापर्यंत आले. 

"रामुकाका... ओ.. रामुकाका..... काय झालं? काय पडलं?" वर्धाने जोरात हाक मारत रामुकाकांना विचारले.

"काही नाही जी. तुम्ही म्हणाल तस जी." खालून उत्तर आले. त्यांचं उत्तर विचित्र वाटल्याने एकमेकांकडे बघत परत सगळेजण खोलीकडे वळले. पण जिन्याच्या उजव्या बाजूकडे खोलीचं दारच नव्हतं. समोर एक खोली होती आणि डावीकडे दोन खोल्या होत्या.ते बघून सगळेच गोंधळले.

"अरे आपण उजवीकडच्या खोलीकडे गेलो होतो न?" मंजूने विचारले.

अभी डावीकडे वळला आणि एका खोलीच्या दारात उभं राहात म्हणाला,"अरे आपलं सामान इथे आहे. उजवी डावी सोडा... या जेवण तयार होईपर्यंत जरा फ्रेश होऊया."


सगळे अभिच्या मागे डावीकडच्या खोलीकडे वळले. अवनीला मात्र हे थोडं विचित्र वाटलं. तिला खात्री होती की ते सगळे उजव्या बाजूच्या खोलीकडे वळले होते. पण वाड्यात आल्या आल्या तिचा आणि मैथिलीचा वाद झाल्यानंतर तिने ठरवलं होतं की फार बोलायचं नाही. हे सगळेच चेकाळल्यासारखं वागत आहेत, त्यामुळे आपण शांत बसलेलं बरं. सगळ्यांच्या मागून डावीकडच्या खोलीकडे जाताना तिने मागे वळून बघितलं तर तिला जिन्याच्या उजवीकडे खोलीचं दार दिसलं. अवनी चांगलीच दचकली. पण काही न बोलता ती सर्वांच्या मागून डावीकडच्या खोलीत शिरली.

खोलीत जाऊन सगळे एक एक करून फ्रेश होऊन आले. जरा कपडे बदलून बसले. खोली मोठी होती. खोलीच्या मध्यभागी एक बेड तीन जणांना झोपता येईल इतका मोठा होता. त्यामुळे मुलींनी या खोलीतल्या बेडवर झोपायचं आणि मुलांनी शेजारच्या खोलीत झोपायचं अशी एकूण त्यांच्यात चर्चा चालू होती. दुसऱ्या खोलीत झोपायची परवानगी त्या खाली सोफ्यावर बसलेल्या गृहस्थांकडून घ्यायची असं त्यांच्यात ठरलं. त्याचवेळी खालून रामुकाकांची हाक आली. "पिठलं भाकरी तयार हाय जी. या जेवायला."

सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे सगळे खाली माजघरात आले. माजघराकडे जाताना सगळ्यांच लक्ष सोफ्याकडे गेलं. पण तिथे कोणीच नव्हतं. रामुकाकांनी सहा ताटल्यांमध्ये दोन-दोन भाकरी आणि पिठलं वाढूनच ठेवालं होतं.

"काका पाणी देता का जरा?" अवनीने अजीजीने काकांना म्हंटलं.

"तुम्ही म्हणता तर देतो जी."असं म्हणत रामू काका पाणी आणायला आत गेले. सगळेच शांतपणे जेवायला बसले. 

"कांदा असता तर मजा आली असती." राजन म्हणाला आणि आतून पाणी घेऊन येणाऱ्या रामुकाकांच्या हातात त्याला कांदा दिसला.

"अरे वा काका... मी म्हंटलं कांदा हवा आणि तुम्ही लगेच आणलात? मस्त!" राजन काकांकडे बघत हसत म्हणाला.

"तुम्ही म्हणता तसं होईल जी." रामू काका एकदम खर्जात अगदी पुटपुटल्यासारखं म्हणाले. सगळेच जेवाणात गर्क होते. पण अवनीने काकांचं पुतपुटण ऐकलं. तिचं आपल्याकडे लक्ष आहे हे रामुकाकांच्या लक्षात आलं आणि ते तिच्याकडे रोखून बघायला लागले. अवनीला रामुकाकांच्या नजरेची भीती वाटली. ती गपचूप आपल्या ताटलीत बघून जेवत राहिली.

सगळ्यांचं जेवण आटपलं आणि हात धुवून सगळे बाहेर आले. 

"रामुकाका... ते इथे सोफ्यावर बसले होते ते कुठे आहेत? आम्हाला दोन खोल्या वापरायच्या होत्या त्यांना विचारून." मैथिलीने रामुकाकांना विचारले.

"त्यांच काम झालं; ते गेले जी. तुमच काय. तुम्ही बोलाल तसं होईल जी." अवनिकडे बघत रामुकाकांनी उत्तर दिले.

"बरं. मग आम्ही मुली एका खोलीत झोपतो आणि दुसऱ्या खोलीत मुलगे झोपतील."मैथिलीने रामुकाकांना सांगितले आणि त्यांच्या उत्तराची वाट न बघता सगळेचजण जिन्याने वर गेले.

"खोली डावीकडे होती...... परत उजवीकडे कशी आली?" जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उभं राहात मैथिली आश्चर्याने मोठ्या  म्हणाली. तिच्या अचानक असं मोठ्याने बोलण्याने सगळेच दचकले आणि धडपडले.

"हा काय प्रकार आहे नक्की?" राजन वैतागत म्हणाला.

"वर्धा, हे काय चालू आहे रे? मला भिती वाटते आहे." मंजू वर्धाला चिकटत म्हणाली. तिला जवळ घेत म्हणाला,"काळजी नको ग करुस मंजू आणि घाबरू देखील नकोस. चला रे. आपण सगळे अगोदर एकाच खोलीत जाऊ या." वर्धाने मंजुचा हात धरला आणि तिला धीर देत तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला.

क्षणभर विचार करून सगळे उजव्या खोलीत गेले. जेवण्यासाठी बाहेर पडताना त्यांचं सामान जसं होत तसचं पडलं होतं. त्यामुळे कोणालाही काही वेगळं घडतं आहे असं वाटलं नाही. मंजू अजूनही वर्धाचा हात धरूनच होती. "आपण इथून आत्ताच निघूया का? मला खरंच खूप भिती वाटायला लागली आहे." ती अचानक म्हणाली.

"मंजू अग आता खूप रात्र झाली आहे. आपण सगळेच दमलो आहोत; आणि आपल्याला इतक्या रात्री कुठे अजून जागा कशी मिळेल? परत मुंबईपर्यंत गाडी चालवण्याचे त्राण कोणाच्याही अंगात नाही. त्यामुळे घाबरणं बंद कर आणि झोपायला चल." मैथिली मंजुला म्हणाली. तरीही मंजू वर्धाचा हात सोडायला तयार नव्हती. मैथिलीने मग मंजूची चेष्टा सुरु केली. "अग, जरा आवाज झाला तर वर्धाचा हात धरते आहेस; जर छत कोसळलं तर काय त्याच्या................." मात्र मैथिलीचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच खूप मोठ्ठा आवाज झाला. सगळेच दचकले आणि धावत बाहेर आले. 

दिवाणखान्याचे छत कोसळले होते. आता मात्र सहाही जण गांगरून गेले. गोंधळून गेले. कोसळलेल्या छताच्या ढिगाजवळ उभं राहून रामुकाका या मुलांकडेच बघत होते. त्यांच्या डोळ्यातले भाव विचित्र होते.

सगळेच मागे सरकले आणि रामुकाकांना काहीही न बोलता परत खोलीत गेले. सगळे आत येताच अभिने दार लावून घेतले आणि म्हणाला, "हे नक्की काय चालू आहे? आपण दमलो म्हणून थेट मुंबईला जाण्यापेक्षा रात्री आराम करावा या उद्देशाने आलो आणि इथे आल्यापासून गेल्या दोन तासात किती घटना घडल्या."

"माझं ऐकणार आहात का तुम्ही सगळे?" अवनिने सगळ्याना शांत करत म्हंटले.

"गप ग ताई." मैथिलीने अवनीला परत एकदा गप केले. मंजू मात्र खूपच घाबरली होती. ती आता वर्धाला घट्ट चिकटली होती. "आपण निघूया का वर्धा?" तिने त्याच्याकडे बघत परत एकदा त्याला विचारले. "सगळे या एकाच खोलीत झोपूया का?" अवनीने मैथिलीकडे दुर्लक्ष करत आणि सगळ्यांकडे बघत विचारले.

"का? हिला वर्धाला सोडवत नाही म्हणून का?" मैथिलीचा परत चेष्टेचा मूड डोकं वर काढायला लागला. राजनने तिला शांत केले आणि म्हणाला,"नको अवनी. एकाच खोलीत नको. पण आता उशीर झाला आहे त्यामुळे झोपूया सगळे. मंजू आम्ही शेजारच्याच खोलीत आहोत. तुला भिती वाटली तर आम्हाला हाक मार. ठीक? चला अभी... वर्धा.... झोपूया सगळेच. सकाळी बघू काय ते."

"सगळंच विचित्र. आता राजन म्हणतो तशी ती खोली शेजारी असली तर बरं नाहीतर परत खोली शोध मोहीम हाती घ्यावी लागेल." असं म्हणत अभी त्यांच्याबरोबर खोलीबाहेर पडला. 

मुलगे बाहेर जाताच मुली थोड्या मोकळ्या झाल्या. मात्र मंजू खरंच खूप घाबरली होती. ती अवनीजवळ येऊन हळूच म्हणाली,"मी मध्ये झोपू का ग? मला खरच खूप भिती वाटते आहे. मैथिलीला सांगितलं तर ती परत चेष्टा करेल."

"घाबरू नकोस मजू. तू झोप मध्ये. आणि महत्वाचं म्हणजे आता काही बोलू नकोस. ऐक माझं." अवनी म्हणाली. मैथिली अगोदरच पलंगावर आडवी झाली होती. मंजू आणि अवनीदेखील पलंगावर येऊन पडल्या. सगळं कसं शांत झालं. तिघींनाही दमल्यामुळे लगेच झोप लागली. पम थोड्या वेळाने मंजुला थंडी वाजायला लागली जाग आली. तिने डोळे उघडले आणि अंदाज घेतला. पलंगाच्या एका बाजूला असलेल्या खिडकीतून थंडगार वारा आत येत होता. अगदी थंड! जणूकाही बाहेर बर्फ पडला होता आणि तोच गारवा आत येत होता. खोली खूपच थंड पडली होती. मैथिली आणि अवनिसुद्धा कुडकुडत होत्या. मंजूने अवनीला हलवलं. अवनी बहुतेक जागीशीच होती. तिने लगेच डोळे उघडले.

"खूप थंडी आहे न ग?" मंजू म्हणाली. "आपण झोपलो तेव्हा नव्हतं वाटत असं. कमाल आहे न! हे असं का होतं आहे काहीतरी? अवनी, मला न खरंच खूप भीती वाटते आहे ग." असं म्हणत तिने अवनीचा हात घट्ट धरला.

घड्याळाकडे बघत अवनी म्हणाली,"अग, जेमतेम अर्धा तास झालाय आपण झोपून. मुलांना हाक मारू या का?" तेवढ्यात खोलीचं दार जोरजोरात वाजायला लागलं. मैथिलीसुद्धा दचकून जागी झाली. तिघी घाबरून एकमेकींना घट्ट धरून बसल्या. मात्र पलंगावरून खाली उतरायची हिम्मत कोणालाही झाली नाही. दार अजूनच जोरात हलवलं जायला लागलं आणि त्याच्याबरोबर बाहेरून वर्धा, राजन आणि अभिच्या हाका एकू येऊ लागल्या.

"मैथिली.... मंजू.... अवनी... दार उघडा... उठा.... अरे उठा.... अवनी...." त्यांनी तिघींच्या नावाचा धोशाच लावला होता. 

तिघींनी एकमेकींकडे बघितलं; पण अजूनही काय करावं ते तिघींनाही सुचत नव्हतं. शेवटी हिम्मत करून अवनी दार उघडायला पुढे सरकली. मंजूने तिचा हात धरला... ती काहीतरी बोलणार होती. पण अवनीने तिच्या तोंडावर हात ठेवला,"मंजू, कृपा करून एक अक्षर बोलू नकोस!" असं म्हणून अवनीने दार उघडलं.


अभी, वर्धा आणि राजन धाडकन खोलीत आले आणि राजनने आत येताच दार लावून घेतलं. ते आत येताच मात्र खोलीच तापमान परत पुर्वीसारखं झालं.

"काय झाल तुम्हाला?" मैथिलीने विचारलं.

"यार, आपण या खोलीत येताना शेजारीच एक खोली होती ना? आम्ही त्याच खोलीत जाणार होतो. पण गेला अर्धा तास आम्ही खोलीचं दार शोधतो आहोत. शेजारी खोलीच नाही आहे; हे लक्षात येताच आम्ही या खोलीत यायचं ठरवलं. पण या खोलीच दार देखील आम्हाला मिळत नव्हतं. पण अचानक अवनीच्या आवाजाची कुजबुज एकू आली आणि दार दिसलं. आम्ही धावलो आणि परत दार हरवायच्या आत दारावर धडका दिल्या. नशीब तुमच्याच खोलीचं दार होतं आणि तुम्ही उघडलंत. नाहीतर आमचं काही खरं नव्हतं." अभी बोलत होता आणि त्याचं उर धपापत होतं. वर्धा आणि राजान तर खोलीत येताच मट्कन खाली बसले होते; ते तसेच होते.

मंजू वर्धाजवळ गेली आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली,"काळजी नको करुस वर्धा. आपण सगळे याच खोलीत एकत्र थांबूया. मला देखील सगळंच विचित्र वाटतं आहे. अरे, ही खोली ना आत्ता खूप थंड पडली होती. खरं तर मला थंडीनेच जाग आली. बघितलं तर अवनी देखील कुडकुडत होती. म्हणून मी तिला उठवलं. ती बोलत होती तेच तुम्हाला बाहेर ऐकू आलं बहुतेक. नशीब आमचं की तुम्हाला तिचा आवाज ऐकू आला आणि तुम्ही आत आलात." त्यानंतर सगळ्यांकडे वळत मंजू म्हणाली;"हे सगळंच एकूण विचित्रच चाललं आहे; असं नाही का तुम्हाला सगळ्यांना वाटत?"

तिच्या प्रश्नाने सगळेच विचारात पडले आणि शांत बसून राहिले. कोणालाही काहीच सुचत नव्हतं; किंवा हा एकूण काय प्रकार आहे ते ही समजत नव्हतं. एक विचार मात्र सगळ्यांच्या मनात सारखाच होता.... आता या बंगल्यात रहायची इच्छा कोणालाच उरली नव्हती. पण असं सगळ्यांसमोर म्हणायची हिम्मत देखील नव्हती कोणाची. आपण घाबरलो म्हणून आपली चेष्टा होईल म्हणुन  सगळेचजण गप्प बसून होते.

"थांबा... त्या रामुकाकालाच बोलावून जाब विचारते."अचानक उठत मैथिली म्हणाली आणि तरातरा चालत जाऊन तिने खोलीचं दार उघडून रामुकाकांना हाक मारायला गेली. तिने दार उघडलं तर रामुकाका दारातच उभे होते.

"विचारा जी." ते म्हणाले.

"काय? काय विचारा? तुम्ही काय दाराला कान लावून उभे होतात का?" चिडून मैथिलीने त्यांना विचारले.

"नाही जी. तुम्ही बोलावते म्हणालात; आनी आलो जी." रामुकाकांनी अवनीकडे बघत शांतपणे उत्तर दिलं.

"मी इथे पलंगावर बसून जे बोलले ते तुम्हाला माजघरात ऐकू आलं असं म्हणणं आहे का तुमचं?" मैथिलीचा तोल आता सुटायला लागला त्यामुळे तिचा आवाज देखील टिपेला पोहोचला होता.

रामुकाकांवर मैथिलीच्या चिडण्याचा किंवा ओरडण्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं,"होय जी. म्हंजी तुम्ही म्हणाल तसंच होईल जी."

"काय बोलता आहात तुम्ही काका? तुम्हाला तरी कळतं आहे का? जा इथून. परत मला तुमचं तोंड दाखवू नका. समजलं?" मैथिली भडकून म्हणाली.

"ठीक जी. जस तुम्ही म्हणाल तसं जी."अस म्हणून रामुकाका माघारी वळले. मात्र वळताना त्यांनी परत एकदा अवनीकडे एक कटाक्ष टाकला. त्यांचं असं सतत तिच्याकडे बघणं अवनीला खटकत होतं. पण ती त्यावर काहीच बोलली नाही. रामुकाका निघून गेले आणि मैथिलीने खोलीचे दार लावून घेतले. मैथिली खरंच खूपच ओरडली होती. तिचा घसा कोरडा पडला होता. त्यामुळे ती पलंगाजवळच्या टेबलावर ठेवलेल्या तांब्यातून पाणी पिण्यासाठी गेली. पण तांब्या रिकामाच होता. ती अजून वैतागली. कोणताही विचार न करता तांब्या घेऊन परत दाराकडे येऊन तिने दार उघडले आणि मोठ्याने ओरडली,"रामू काका... पाणी आणा...." 

जिन्यावर पावलं वाजली. तांब्या भांड्याचा आवाज झाला म्हणून मैथिली पुढे झाली. दारातून रामुकाकांचा हात पुढे आला. हातात तांब्या आणि भांड होतं ते सगळ्यांनाच दिसलं... आणि मैथिली अचानक मोठ्याने किंचाळून खाली पडली.

क्रमशः

2 comments:

  1. छान...पुढचं वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे

    ReplyDelete
  2. धन्यवाद. पुढील शुक्रवारी दुसरा आणि शेवटचा भाग

    ReplyDelete