Friday, May 21, 2021

 श्य.... सांभाळून बोला! (भाग 2) (शेवटचा)

 श्य.... सांभाळून बोला! (भाग 2) (शेवटचा)


भाग 2

तिला असं अचानक काय झालं बघायला अभी धावला. अवनी देखील त्याच्या बरोबर दारापर्यंत धावली.

रामुकाकांनी दिलेलं तांब्या भांडं घेऊन अवनीच्या हातात दिलं. तांब्या-भांडं अभिच्या हातात देऊन रामुकाकांनी एकदा अवनीकडे रोखून बघितलं निघून गेले. त्यांच्या त्या बघण्याने अवनी खूपच अस्वस्थ झाली; पण तिला तिच्या मनातले विचार बाजूला ठेवायला लागले; कारण मैथिलीकडे बघणं जास्त आवश्यक होतं. अभिने खाली पडलेल्या मैथिलीला उचललं. मैथिली बेशुद्ध पडली होती. तिला त्याने पलंगावर ठेवलं. रामुकाका गेलेले अवनीने बघितले होते; त्यामुळे तिने दरवाजा लावून घेतला. मात्र दार लावून घेताना अवनीचा चेहेरा अगदी शांत झाला होता.

सगळेच मैथिलीच्या भोवती जमले.

अभिने मैथिलीच्या चेहऱ्यावर पाणि शिंपडलं. मैथिली पाण्याच्या स्पर्शने जागी झाली. क्षणभर तिला लक्षात नाही आलं ती कुठे आहे; पण पूर्ण जागी झाली आणि तिचा चेहेरा भितीने गोठुन गेला. ती दचकुन पलंगावरून उठली.

"चला, आधीच्या आधी आपण या वाड्यातून बाहेर पडू या." सामान उचलत ती म्हणाली.

"मैथिली काय झालं? तू अशी एकदम का ओरडलिस? हे असं तडकाफडकी का निघायचं आपण? अग, आता साधारण तीन वाजले आहेत. दोन तासात पहाट होईल. मग हवं तर आपण निघु. अगदी लगेच बाहेर पडायचा प्रयत्न करू. पण हे अस अपरात्रि निघुन कस चालेल?" राजन तिला समजावत म्हणाला. अवनी वैतागत राजनकडे बघून म्हणाली,"राजन... बाहेर पडायचा प्रयत्न करू? असं का म्हणालास?"

राजनने एकदा अवनीकडे बघितलं आणि डोळ्यांनीच तिला शांत राहायची खूण केली. तो परत मैथिलीकडे वळला आणि त्याने मैथिलीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. त्याला तिच्याकडून उत्तर अपेक्षित होते. त्याच्या नजरेतला प्रश्न समजून देखील त्याला उत्तर द्यायच्या भानगडीत न पडता मैथिली म्हणाली,"नाही... मला कोणालाही काहीही सांगायचं नाही किंवा कोणाच्याही कोणत्याही प्रश्नाला उत्तर देखील द्यायचं नाही. मला आत्ता या क्षणी इथून निघायचं आहे. बस्! चला उठा सगळे." ती हट्टाला पेटली होती.

"बर निघुया. पण बाहेर रस्त्यावर दिवे नाहीत. आपण रस्ता चुकू शकतो. मी रामुकाकांना बोलावून मेन रोडचा रस्ता विचारतो. मग आपण निघु." राजन ती एकत नाही हे पाहुन म्हणाला.

रामुकाकांचा उल्लेख ऐकून मैथिली एकदम बिथरली. "नाही... नको ... नको... रामुकाका नको." ती थरथर कापत म्हणाली. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. मटकन् खाली बसत ती एकदम रडायलाच लागली. तिला रडताना बघुन मंजूदेखिल घाबरली. तीसुद्धा रडायला लागली.

ते बघुन अभी वैतागला. "गप बसा बघू तुम्ही दोघी. मैथिली, अग असं काय करतेस? काय झाल सांग बघू. भूत बीत बघितलंस का तू?" अभिने तिच्याजवळ बसत तिला विचारलं.

मैथिली काहीच बोलत नव्हती. फ़क्त रडत होती. आता अवनी पुढे झाली. तिने अभी, वर्धा आणि राजनला बाजूला केलं आणि मैथिलीला जवळ घेतलं. "तुला खरंच तसं दिसलं का मैथिली?" तिने शांतपणे मैथिलीला विचारलं.

मैथिलीने चमकून अवनिकडे बघितले आणि म्हणाली "काय?"

अवनीचा प्रश्न एकून इतर सगळे गोंधळले. अभि अवनीच्या प्रश्नाने खूपच वैतागला. एकतर मैथिली काहीही सांगत नव्हती. त्यात अवनी आल्यापासूनच जरा विचित्र वागत होती. त्यात बिथरलेल्या मैथिलीला शांत करायचं सोडून अवनी तिला असे काही प्रश्न विचारत होती की ज्यामुळे अजूनच गोंधळ आणि संशय निर्माण होणारं वातावरण तयार झालं होतं. "तिने काय बघितलं अवनी? तिने जे काही बघितलं ते तुला काय माहीती? काय म्हणते आहेस तू नक्की?" अभीने आवाज चढवत अवनीला विचारलं.

"ते मी सांगतेच. पण अगोदर तू मला सांग अभी की तू रामुकाकांच्या हातातून पाण्याचा तांब्या घेतलास ना? तेव्हा तुला काही विचित्र दिसलं किंवा वाटलं का?" अवनीने अभिलाच उलट प्रश्न केला.

"नाही. मला कळलंच नाही मैथिलीने असं काय बघितलं की ती अशी किंचाळून बेशुद्ध पडली. काकांनी मला तांब्या दिला तेव्हा मी त्यांनाच विचारणार होतो. पण मग मैथिलीकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं होतं आणि ते रामुकाका पण 'होय जी'; नाही जी; जसं म्हणाल तसं जी' यापेक्षा जास्त काही बोलत देखील नाहीत न. म्हणून मग मी त्यांच्याशी बोलत नाही बसलो. नक्की काय चालू आहे अवनी? आणि मला असं का वाटतं आहे की जे काही चालू आहे ते तुला माहित आहे." अभी म्हणाला.

"जे चालू आहे ते? मला माहित नाही अभि काय चालू आहे; पण थोडी कल्पना आहे असं माझं मत आहे." अवनी  म्हणाली. 

"म्हणजे?" सगळ्यांनी एकाचवेळी तिच्याकडे बघत विचारले.

"तुमच्या एक लक्षात आलं आहे का; आपण जे जे बोलतो आहोत ते ते तसचं घडतं आहे."अवनी शांतपणे म्हणाली.


"अवनी तुला नक्की काय म्हणायचं आहे?" राजनने तिला विचारलं.

"सगळेजण शांतपणे माझं म्हणणं समजून घ्या. हे बघा... आपण इथे आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं. पण अभिने रामूकाका म्हणून हाक मारली आणि त्याने वर्णन केल्यासारखे दिसणारे आणि त्याच नावाचे रामुकाका अवतरले. पण त्यांना या बंगल्याच्या रचनेबद्दल काहीच माहित नव्हतं. कारण अभिने त्यांचं दिसणं आपल्याला सांगितलं होतं. बाकी त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल तो काहीच बोलला नव्हता. मग राजनने या घरात पूर्वी रहाणाऱ्या कोणीतरी आपल्याला घराची माहिती द्यावी म्हंटलं आणि एक गृहस्थ वरच्या मजल्यावरून अवतीर्ण झाले; केवळ माहिती देण्यापुरते. नंतर आपण खाली आलो तर ते नव्हते; किंवा अजूनही आपल्याला माहीत नाही ते कुठे गेले. आपण पिठलं भाकरी म्हंटलं तर रामुकाकांनी फक्त तेवढंच दिलं. मात्र आपण जेवायला बसलो तेव्हा कांदा हवा हे राजन म्हणाला त्यावेळी रामुकाका नव्हते. तरीही ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात कांदा होता.  बरं, अभिला पूर्ण रात्र गूढ घटनांनी भरलेली हवी होती; बघा एक एक प्रसंग आठवून... तो असं म्हणल्याक्षणी आपल्याला काहीतरी पडल्याचा आवाज आला होता; पण कळलं नाही काय ते. हा विचार करा की खोलीची दारं हरवणं, मुलगे झोपायला दुसऱ्या खोलीत गेले पण त्यांना खोलीच मिळाली नाही, मैथिली-मंजू, आपल्याला फक्त तिघी असताना खूप थंडी वाजत होती आणि मुलं आत आल्या आल्या वातावरण परत पहिल्यासारखं झालं.... हे सगळंच विचित्र आणि सतत गूढ घटनांनी भरलेलं घडतं आहे; असं नाही का वाटत तुम्हाला? काही लिंक लागते आहे का एकाला तरी?" अवनी म्हणाली.


"अवनी, अग, काहीही काय वलग्ना करते आहेस? अग, एकतर आपण या घरात पहिल्यांदा आलो आहोत. त्यात रात्र आहे. खोली कुठे आहे कशी आहे या बाबतीत आपण गोंधळू शकतो न? घर जुनं आहे; छत पडूच शकतं न. ते सोफ्यावरचे गृहस्थ झोपायला गेले असतील; आपल्याला काय माहीत त्यांनी सांगितलं त्याव्यतिरिक्त किती खोल्या आहेत या घराला आणि कुठे! बरं, कांद्याचं काय घेऊन बसलीस? पिठलं भाकरीबरोबर हे गावातले लोक कांदा खातातच. त्यामुळे रामुकाकांनी आपणहून आणला असेल कांदा. का उगाच नको त्या कल्पना इतरांच्या डोक्यात भरवते आहेस?" वर्धाने मंजू अजून घाबरेल म्हणून अवनीचा मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न केला.

"ठीक वर्धा. तुला पटत नाही ना मी काय म्हणते आहे ते... पण मी जे म्हणते आहे ते जर सिद्ध केलं तर? मग तू... तूच काय तुम्ही सगळेच विश्वास ठेवाल न?" असं म्हणून अवनी मैथिलीकडे वळली. "मैथिली, खरं सांग तू का घाबरलीस आणि बेशुद्ध कशामुळे पडलीस?" अवनीने मैथिलीला विचारले.

आतापर्यंत सतत अवनीची थट्टा करणारी किंवा तिला गप्प करणारी मैथिली अवनीचं बोलणं ऐकून विचारात पडली होती. मैथिलीला अवनीचं म्हणणं हळूहळू पटायला लागलं होतं. तिने एकदा सगळ्यांकडे बघितलंआणि ती म्हणाली,"अवनी म्हणते आहे त्यात तथ्य आहे."

मैथिलीच्या त्या एका वाक्याने सगळेच हादरले. मंजू तर श्वास अडकल्यासारखी धपापायला लागली. तिची अवस्था बघून वर्धा मैथिलीवर वैतागला आणि म्हणाला;"कशावरून तुला असं वाटतं मैथिली? अवनी काहीतरी सांगते आहे आणि तू सगळ्यांना घाबरवण्यासाठी केवळ तिला पाठिंबा देते आहेस. हे योग्य आहे का? निदान आत्ता अशा वेळी... जेव्हा एकूणच परिस्थिती आपल्या आताबाहेर जाते आहे की काय असं वाटतंय." वर्धाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मैथिलीने तिचा मोर्चा अभिकडे वळवला.

"अभी, रामुकाकांनी पाण्याचा तांब्या दिला तो तूच घेतलास ना त्यांच्या हातातून?" मैथिलीने अभिला विचारले.

"हो! का?" त्याने तिला उलट प्रश्न केला.


"तुला काही विचित्र वाटलं का?" त्याच्या प्रश्नाला उतर न देता परत मैथिलीने त्याला विचारले.


"नाही मैथिली. तुला नक्की काय म्हणायचे आहे?" अभिने तिला उत्तर देत परत विचारले.

"म्हणजे आपण जेवण्यासाठी खाली गेलो त्यावेळी आपल्याला रामुकाका जसे दिसले तसेच दिसले ना तुला?" मैथिलीने परत एकदा विचारले.

तिच्या त्या प्रश्नांनी अभि गोंधळला आणि क्षणभर विचार करून म्हणाला;"हो! अगदी तसेच दिसले ग. म्हातारे... धोतर-बनियन आणि खांद्यावर फडकं. मैथिली तुला ते वेगळे दिसले का? उगाच सस्पेन्स तयार करण्यापेक्षा तू हे असले प्रश्न का विचारते आहेस ते सांगशील का?"

"अभी... अवनी... वर्धा... मंजू ... राजन.... तुम्हाला आठवतं मी रामुकाकांवर चिडले होते तेव्हा काय म्हणाले होते? मी म्हणाले होते की तुमचं तोंड मला दाखवू नका. आठवतं? आणि काही क्षणातच मी परत त्यांना हाक मारली आणि पाणी आणायला सांगितलं. ते पाणी घेऊन आले म्हणून दार उघडलं.... दोस्तांनो; माझ्यावर विश्वास ठेवा.... मी आता जे सांगणार आहे ते खरं आहे.... तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीची शप्पथ घेऊन मी ते सांगेन." असं म्हणून मैथिली श्वास घेण्यासाठी थांबली. तिने एकदा अवनीकडे बघितलं. अवनीने तिला डोळ्यांनीच धीर दिला. एकदा सगळ्यांवर नजर फिरवून मैथिली परत बोलायला लागली. "दोस्तांनो; भयंकर होतं ते.... दारात उभ्या असलेल्या रामुकाकांना.... देवा शप्पथ सांगते.... दारात उभ्या असलेल्या रामुकाकांना चेहेरा नव्हता! तिथे एक व्यक्ती होती.... धोतर, बनियन... खांद्यावर फडकं... हातात तांब्या-भांडं... पण खांद्यावरच्या डोक्याला चेहेराच नव्हता. माझ्यासाठी तो एक मोठा धक्का होता.... विचार करा रे; मी चिडून बडबड करत दारापर्यंत गेले; त्यावेळी परत एकदा त्या रामुकाकांना झापण्याचा माझा इरादा होता. त्यामुळे मी त्याच आवेशात त्यांच्याकडे बघितलं. पण........ मी जे काही बघितलं ते बघूनच मी किंचाळून बेशुद्ध पडले. मी त्यांना काही क्षण अगोदरच म्हणाले होते चेहेरा दाखवू नका. पण लगेच हाक मारली आणि पाणी आणायला सांगितलं. त्यामुळे त्या रामुकाकांनी पाणी तर आणलं पण मला चेहेरा नाही दाखवला. मात्र तुम्ही कोणीही असं काहीही म्हंटलं नव्हतं. त्यामुळे अभिला आणि त्याच्या मागून गेलेल्या अवनीला रामुकाका चेहेऱ्यासकट दिसले. फक्त मीच त्यांना म्हंटलं होतं की चेहेरा दाखवू नका." मैथिली बोलायची थांबली आणि तिने सगळ्यांकडे परत एकदा नजर फिरवली. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसल्याचं तिच्या लक्षात आलं. पण त्यावर अजून काही बोलणं तिला शक्यच नव्हतं. तिच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग परत एकदा गेला आणि तिच्या जीवाचा थरकाप उडाला. ती एकदम अवनीला बिलगली आणि म्हणाली; "अवनी मला पटतं आहे तू म्हणते आहेस ते." मैथिलीचा कापत असलेला आवाज आणि तिची एकूण परिस्थिती बघून ती खोटं बोलत नाही आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं.

आता मात्र सगळ्यांची पाचावर धारण बसली. सगळेच आपापल्या परीने घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचा विचार करायला लागले. हळूहळू त्यांना अवनीचं म्हणणं पटायला लागलं. पण हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर मंजू तर पुरती घाबरून गेली. तिचं रडणं क्षणभर देखीलं थांबत नव्हतं. ती आता एक क्षणही या घरात थांबायला तयार नव्हती. इतरांकडे दुर्लक्ष करत ती वर्धाकडे वळली.

"वर्धा ... आपण आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडतो आहोत. चल उठ. इतरांना......"मंजू पुढे काहीतरी भलतंच बोलणार होती पण अवनीने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला गप्प केलं. "मंजू इतक सांगूनही काहीतरी चुकीचं बोलायचं आहे का तुला? गप बस् बघू तू." मंजुला गप्प करून अवनी सगळ्यांकडे वळली आणि म्हणाली;"आपण सगळेच आत्ता इथून निघतो आहोत. बस! उठा सामान उचला आणि चला. कोणीही काहीही बोलायची गरज नाही आहे. ठीक?" अवनी म्हणाली.

मंजूला ती काय चूक करणार होती ते लक्षात आलं आणि ती गप्प बसली. सगळेच उठले आणि आपापलं सामान घेऊन निघाले. अवनी म्हाणाली,"आपण शांतपणे खोलीच्या बाहेर पडणार आहोत आणि जिना उतरून खाली जाणार आहोत. ठीक?" त्यावर सगळ्यांनी मान हलवली. अवनीने खोलीचं दार उघडलं. पण खोलीबाहेर पाय ठेवायची हिम्मत कोणतंच नव्हती. सगळेच एकमेकांकडे बघत उभे होते. अवनीने हिम्मत करून पाऊल उचललं आणि सगळेचजण एकमेकांचा हात धरून खोलीबाहेर आले. समोर डावीकडे जिना होता. सगळेच हळूहळू पुढे सरकत जिन्याजवळ आले. अवनी सर्वात पुढे होती. तिची नजर जिन्याकडे गेली; जिना तर होता पण पायऱ्याच दिसत नव्हत्या. 

"पायऱ्या नाही आहेत." अवनी खर्जात म्हणाली. 

अवनीच्या मागेच अभि होता. तिचं बोलणं फक्त त्यालाच ऐकायला गेलं. "असं कसं होईल? आपण दोनदा हा जिना चढलो आणि उतरलो आहोत. थांब मी बघतो." असं म्हणत तो पटकन पुढे आला. पण त्यालाही पायऱ्या दिसल्या नाही. तोदेखील गडबडून गेला. धडपडत मागे सरकत त्याने अवनीकडे बघितलं आणि विचारलं "आता?"

त्याच्या धडपडण्यामुळे सगळेच मागे गेले आणि एकमेकांवर आपटत पडले. परत एकदा एकमेकांना सावरत उभं राहात सगळेच जिन्याजवळ आले आणि पायऱ्या गायब झालेल्या बघून हबकले.

मंजूला तर वेड लागायची पाळी आली. तिने तोंड उघडलं आणि रडवेल्या आवाजात म्हणाली;"म्हणजे आपण या वरच्या मजल्यावर....?" आता मात्र अवनीचा स्वतःवरचा ताबा संपला होता. एकदम भडकून तिने मंजुच्या तोंडावर हात ठेवला आणि चिडलेल्या आवाजात ती म्हणाली,"मंजू तू गप बसशील का? कृपा कर सगळ्यांवर. कितीही इच्छा झाली तरी आता बोलण्यासाठी तू तोंड उघडू नकोस. समजलं?" पण मग ती शांत होत म्हाणाली,"हे बघा.... इथे काहीही झालं तरी आपण या जिन्यावरून खाली उतरणार आहोत. पायऱ्या नसल्या तरी बाजूला धरायला आहे न. एकमेकांचा हात धारा... मी सुरवात करते आणि सगळे माझ्या मागून या. आपण हा जिना हळू हळू उतरणार आहोत." असं म्हणून अवनीने मनाचा हिय्या करून पाउल पुढे टाकलं. आश्चर्य म्हणजे पायऱ्या दिसत नसल्या तरी तिला पायांना त्या जाणवत होत्या. त्यामुळे तिने जिना उतरायला सुरवात केली. सगळेच जण एकमेकांचा हात धरून एकमेकांना आधार देत खाली दिवाणखान्यात आले. 

खाली येऊन सगळे सोफ्याजवळ उभे राहिले. सोफ्याच्या बाजूलाच वरून जे छत पडलं होतं त्याचा ढीग होता आणि त्याच्या बाजूला रामुकाका स्वस्थ उभे होते. रामुकाकांना बघून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं. आता नक्की काय करावं ते अवनीला देखील सुचत नव्हतं. रामुकाका तिच्याकडे एकटक बघत होते.... त्यांच्या नजरेने ती खूपच अस्वस्थ झाली. "असं का बघता आहात तुम्ही माझ्याकडे?" तिने न राहून रामुकाकांना विचारलं. "जी? जी.... तुम्ही म्हणाल तसं जी." रामुकाका म्हणाले. "हे सतत का म्हणता आहात तुम्ही? आम्ही काहीतरी चुकीचं बोलावं आणि या घरात अडकावं म्हणून?" मंजुच्या तोंडून शब्द बाहेर पडलेच..... तिचे शब्द ऐकून अचानक रामुकाका गडगडून हसले. आता ते त्यासर्वांकडे बघत होते परंतु त्यांनी अजिबात हालचाल केली नाही.

मात्र मंजुच्या बोलण्याने सगळेच हवालदिल झाले. अवनीच्या ते लक्षात आले. तिने मंजूकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. मात्र ती काहीच बोलली नाही. तिने सगळ्यांकडे नजर फिरवत गप राहण्याची खूण केली आणि सभोवार नजर फिरवली. जिन्याच्या समोरच सोफा होता आणि त्याच्यापलीकडे घराबाहेर पडण्याचं दार तिला दिसत होतं. मात्र इतरांना आजूबाजूला सगळंच धूसर दिसत होतं.

"अवनी, सगळं....." अभिने तोंड उघडलं आणि अवनी मोठ्याने ओरडली.... "अभि गप बस्. काहीही दिसत असलं तरी कृपा करून गप बस्."

आपण काय चूक करणार होतो ते लक्षात येऊन अभि शांत झाला आणि म्हणाला;"अवनी तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. सगळ्यांनी गप बसलं पाहिजे. आपल्याही नकळत आपण सतत बोलत असतो नाही?" त्याच्या त्या वाक्याने देखील अवनी अस्वस्थ झाली. पण तिने ते चेहेऱ्यावर दाखवले नाही. कारण मंजू तिच्या बाजूलाच उभी राहून तिच्या चेहेऱ्याचं निरीक्षण करत होती. अवनीच्या लक्षात आलं की तिने तिच्या चेहेऱ्यावरची नस जरी हलवली तरी मंजू कोसळून जाणार आहे. त्यामुळे तिला धीर देत अवनी त्या परिस्थितीत देखील हसली. अवनीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून सगळ्यांच्या चेहेऱ्यावर सुटकेचं समाधान उमटलं. एकमेकांचा हात धरून ते अवनीच्या मागून दाराच्या दिशेने निघाले. सगळे दाराजवळ आले.... आणि धुसरपणे दिसणारं दार उघडण्यासाठी राजनने कडीला हात घातला. पण त्याला हाताला कडी लागलीच नाही. तो गोंधळाला. दिवाणखान्यात मिणमिणता दिवा होता. त्याने अभिला अजून एखादा दिवा असला तर लावायला सांगितले. अभिने भिंतीवर चाचपडत दिव्याचं बटण शोधलं आणि दिवा लावलासुद्धा. त्या काहीशा वाढलेल्या उजेडात सगळ्यांना दिसले की समोर दार होते पण त्याला कडीच नव्हती. समोर एकसंघ असे सागवानी लाकडाचे मजबूत दार होते. जे आतून उघडणे यांच्यापैकी कोणालाही शक्यच नव्हते. आता मात्र सगळ्यांचाच धीर सुटला. थिजल्यासारखे सगळे एकमेकांकडे बघत उभे राहिले. अचानक घराच्या आतल्या बाजूने खोल कुठूनतरी घड्याळाची टिकटिक कानावर पडायला लागली. शांततेमध्ये झालेला तो टिकटिक आवाज अजूनच भयाण वाटायला लागला. सगळ्यांचे चेहेरे ताणले गेले.

मात्र आतापर्यंत कोणालाही काहीही बोलायची किंवा विचार करायची हिम्मत राहिली नव्हती. त्यातल्या त्यात अवनी थोडी शांतपणे विचार करण्याच्या मनस्थिती होती. तिने स्वतःच्या ओठांवर बोट ठेवत सगळ्यांना न बोलता तिथेच थांबायची  खुण केली आणि दाराच्या एका टोकाला असलेल्या खिडकीकडे ती चालत गेली. तिने खिडकीला हात लावला आणि काय आश्चर्य. त्या खिडकीचा दरवाजा आपोआप उघडला गेला. अवनी आनंदाने सगळ्यांना तिच्या दिशेने येण्याची खुण केली. अवनीच्या दृष्टीने तिला सगळंच स्पष्ट दिसत होतं. इतरांसाठी सगळं वातावरण धूसर झालं आहे याची तिला कल्पना देखील नव्हती. त्यात तिने जवळ बोलावल्याची खूण केलेली अभिच्या लक्षात आल्याने त्याने राजनचा हात धरला आणि तो अवनीच्या दिशेने चालायला लागला. राजनचा हात धरून मंजू आणि मग वर्धा देखील आपोआप खिडकीच्या दिशेने चालायला लागले. ते सगळेच एकमेकांचा हात धरून आपल्या दिशेने येत आहेत हे बघून अवनी पुढे झाली आणि तिने खिडकी उघून एक पाय बाहेरदेखील टाकला. अभि, राजन, मंजू आणि वर्धाच्या धूसर डोळ्यांना अवनीचा खिडकी बाहेर पडणारा पाय दिसला आणि सगळेच पुढे धावले.

"मी बाहेर पडते आहे अभि... मी पूर्ण बाहेर गेले की तिथे उभी राहून तुम्हाला हात देते. एक एक जण या. ठीक?" अवनी बोलत होती पण तोपर्यंत ती खिडकी बाहेर पडली देखील होती. ती काहीतरी बोलते आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते पण तिचा आवाज मात्र सगळ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. मात्र तिला बाहेर जाताना बघून सगळ्यांच्या चेहेऱ्यावर सुटकेचा आनंद उमटला.

त्याचवेळी आतून कुठूनतरी कुठल्याश्या घड्याळाचे टोल अचानक पडायला लागले. अवनी दुसरा पाय बाहेर घेताना सहज एक एक टोल मोजत होती......"एक..... दोन..... तिन.... चार................................ पाच..............................." अवनी पूर्णपणे वाड्याच्या बाहेर उभी होती. तिने खिडकीतून आत हात घातला. "मंजू तू ये बघू बाहेर अगोदर...." अवनी म्हणाली. 


................. पण............... पण.............. तिला आतून सगळ्यांचे फक्त आवाज एकू येत होते. "अवनी गेली बाहेर. पण मग खिडकीचं दार का नाही उघडतं? अरे........ अवनी.......... अवनी??? "हॅलो... हॅलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हॅलो..... एकता आहात का तुम्ही? हॅलो........" अवनीला मैथिलीचा आवाज ऐकू येत होता. तिला तिचे मित्र-मैत्रिणी दिसत होते. पण त्यांना मात्र बाहेर उभी असलेली अवनी दिसत नव्हती. 

पाच वाजले होते आणि वाड्याच्या बाहेर उभी असलेली अवनी असाहाय्यपणे खिडकीच्या आत दिसणाऱ्या आपल्या मित्रांकडे बघत होती.

समाप्त


No comments:

Post a Comment