एक red wine नातं!!!
ती त्याच्याहून साधारण आठ वर्षांनी मोठी. तिच लग्न झाल होतं. एक मुलगा आणि प्रेमळ नवरा असा सुखी संसार. पण तरीही त्याची आणि तिची झक्कास मैत्री होती. दोस्ती झाली तेव्हा नुकतंच इंटरनेट सुरु झालं होतं. भेटण कमी व्हायचं दोघांचं. पण याहू मेसेंजरवर खूप गप्पा मारायचे दोघे. ती त्याला सतत चिडवायची... कोणत्या ना कोणत्या मुलीवरून. तो ते एकदम खेळीमेळीने घ्यायचा. अशीच दोघांची दोस्ती वाढत होती. त्याच्या घरी गणपतीला नवऱ्याला आणि लेकाला घेऊन ती गेली होती. तिच्या मनात होतं कदाचित् त्याचे पालक आणि तिचा नवरा असे सगळे मिळून एक कौटुंबिक मैत्री होईल. पण तसं काही झालं नाही. अर्थात त्याचा तिला विषाद वाटला नाही; की त्याला दु:ख झालं नाही. 'त्यांचं नाही जमल;ं पण आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' दोघांच्याही मानत होतं... एकमेकांना एकदाही असं काहीही न सांगता. दोघही एन्जॉय करत होते हे दोस्तीचं नातं. मग कधीतरी त्याचं लग्न ठरलं. ठरलं म्हणजे त्यानेच ठरवलं. प्रेम विवाह! त्याच्या लग्नाला ती हौसेने आली. मग त्याच्या बायकोच्या मंगळागौरीला देखील. पण त्याच्या बायकोची आणि तिची मैत्री नाही झाली. 'नाही तर नाही. आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' परत एकदा दोघांच्या मनात होतं.....
आणि मग तो परदेशात निघाला. थोडं अजून शिकायला... थोडं अजून चांगलं आयुष्य मिळवायला. ती धावली त्याला विमानतळावर भेटायला. पण तिला तसा थोडा उशीरच झाला. ती पोहोचली तोवर तो गेला होता आत. त्याच्या आई-वडिलांशी थोडफार बोलून ती जड मनाने परतली. घरी खिडकीत बसून दोघांच्या मेसेंजरवरच्या गप्पा, कधीतरी अधून मधून भेटले होते तेव्हाचे किस्से आठवत होती; आणि अचानक तिचा मोबईल वाजला. त्याचा फोन होता. विमानतळावरून! तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.
'जातोस?'
'हो ग! जायला हवं न?'
'हम्! विसरशील?'
'वेडी! आणि तू?'
'वेडा आहेस?'
'मेल्स करत जा....' दोघांनी एकमेकांना बजावलं आणि तो गेला.
दिवस जात होते... महिने... वर्ष.... संपर्क थोडा कमी झाला होता. ती संसारात अडकत जात होती. तो त्याच्या शिक्षणात आणि नवीन संसारात बुडला होता. त्याच्या अडचणी खूप वेगळ्या होत्या आणि तिचे प्रश्न तिचेच होते. पण मेल्स मात्र चालू होत्या.
आणि मग; त्याला तिथेच छानशी नोकरी लागली. थोडा स्थिरस्थावर झाला तो; आणि मग दोन वर्षांनी आला इथे. त्याने दुसऱ्याच दिवशी तिला फोन केला.
'भेटशील?'
'हा काय प्रश्न आहे? उद्या एका कामासाठी चर्चगेटला जाते आहे. तू येतोस तिथे?'
'ओके!'
तिचं काम पटकन उरकून ती स्टेशनवर येऊन बसली होती. त्याची वाट बघत. आणि तो तिला दिसला. धावली ती. त्याला मिठी मारून मनापासून हसली. क्षणभर तो गोंधळाला. पण मग स्टेशन गुलाबी झालं. मग खूप गप्पा! त्याला आलेल्या अडचणी... त्यावर त्याने केलेली मात.... आता छानशी नोकरी.... सगळं कसं छान चालू आहे ते तो उत्साहाने सांगत होता आणि ती समाधानाने मनापासून ऐकत होती. तिच्या आयुष्यात घडलेले आणि घडणारे बदल ती देखील मनापासून त्याला सांगत होती... तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो ते ऐकत होता.
'असं काय बघतोस?' ती.
'काही नाही.' तो.
'ए तुझ्या डोळ्यांच्या पापण्या मला फार आवडतात; आणि तुझे ब्राऊन डोळे तर खूपच गहिरे आहेत रे.' ती.
'फक्त माझे नाही... तुझे पण त्याच रंगाचे आहेत. आणि त्याला ब्राऊन नाही.. गावठी मधाचा रंग म्हणतात.' तो.
'कोण म्हणतात?' ती चेष्टेच्या मूड मध्ये.
'आम्ही.... म्हणजे मी ग. तुझ्या डोळ्यातला गावठी मध मला गुंतवून ठेवतो.' त्याचा ओलावलेला हळुवार आवाज.
त्याच्या बोलण्यावर ती फक्त हसली.... मधाळसं!
तो होता तोवर जस जमेल तसं पण दोघे भेटत होते.... आणि मग हे जणूकाही ठरुनच गेलं. दर वर्षी तो यायचा आणि दर वर्षी ते दोघे भेटायचे. मग कधी एखादा बस स्टॉप गुलाबी व्हायचा तर कधी एखादा मॉल.
दोस्ती पुढे सरकली होती खरी; पण ते 'so called' प्रेम नव्हतं. ते दोघे प्रियकर प्रेयसी नव्हते. एक ओढ लागलेलं नातं होतं... पण त्याला नाव नव्हतं. सगळंच कसं शब्दातीत होतं... पण होतं!!! तिच्या आयुष्यात घडणारी लहानात लहान गोष्ट त्याला माहित असायची. इतकंच काय पण तिच्या email चा पासवर्ड देखील त्याला माहित होता. त्याच्या बँकेच्या खात्याची तिला माहिती होती. तो तिला भेटला की दोन गिफ्ट्स नक्की असायची. एक पाडव्याचं आणि एक तिच्या वाढदिवसाचं. पाडवा? हो!! पाडवा!!! कधी सुरु झालं ते दोघानाही आठवत नव्हतं... पण हे असं काहीसं होतं खरं दोघात.
तो तिला हाक मारताना कधी 'राणी' म्हणायचा तर कधी 'डार्लिंग'. ती मात्र त्याला नेहेमी नावानेच हाक मारायची. का? कारण अस काही नाही.... पण ती थोडी तशीच होती; म्हणून असेल कदाचित्.
तो तिच्याशी बोलतो अधून मधून इतकंच त्याच्या घरी माहित होतं... आणि तो तिचा एकदम खास मित्र आहे हे तिच्या घरी. याहून जास्त माहिती करून घ्यावी असं कोणाला वाटलं नाही आणि त्यांनीही काही सांगितलं नाही. वर्षं जात होती.
असाच एकदा तो आला होता... यावेळचा त्याचा नूर वेगळा होता. एरवी ती खूप बोलायची आणि तो फक्त तिच्याकडे बघत तिचं ऐकाचयचा. पण यावेळी तो खूप बोलत होता. ती मनापासून ऐकत होती. इतक्या वर्षात दोघांनाही काही गोष्टी न सांगता देखील कळायला लागल्या होत्या. त्यांच्यात काहीतरी बदलंत होतं.... ते प्रेम(?) एक वेगळं वळण घेत होतं...
आणि मग तिला त्याचा एक मेल आला.... फक्त तिच्याचसाठी लिहिलेला....
दिवस, महिने... वर्षे सरली,
तशीच ओढ तरी का मज तुझ्या भेटीची?
नेहेमीच होते मन अधीर भेटण्यास तुला;
जाते चुकवून हळूच काळजाचा ठोका.
दिसताच तू वाटे धडधड अनामिक,
बोलायाचे असे बरेच,पण शब्दच हरवतात,
असे परंतु काही जादू तुझ्या स्पर्शांत,
मज जाणवले ते प्रत्येक क्षणात.
घेताच मी हात तुझा माझ्या हाती,
होते शांत काहूर उठले जे मनात.....
तिने मेल वाचली आणि ती हसली... डोळ्यात अश्रू तरळले होते का दोन? फक्त त्याच्यासाठी? कुणास ठाऊक!
तिने त्याला फक्त 'मस्त' इतकाच रिप्लाय केला. अन् पुरेसा होता तो त्याला. एक मंद स्मित होतं त्याच्या चेहेऱ्यावर तिचा तो एक शब्दाचा मेल वाचताना.
त्यानंतरच्या एका भारत भेटीत ते दोघे भेटले होते तेव्हा त्याने तिच्या डोळ्यात खोल बघत तिला विचारलं................
'एक सांगू?'
'अजूनही अस विचारवं लागतं का आपल्यात?'
'तरीही.....'
'बरं... बोल.....'
'तुला प्रपोज करणार आहे.....'
'एका अटीवर....'
'कोणत्या ग राणी?'
'नरीमन पॉईंटला.... कोसळत्या पावसात.... एका गुढग्यावर बसून करणार असलास न तरच!!!' ती हसत म्हणाली.
त्यावर तिचा हात हातात घेत तो म्हणाला........... 'तुला कसा कळला माझा प्लान?'
मग दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघून खळखळून हसले.
मैत्री फुलत होती......... नातं मुरत होतं........ आणि जगाचं राहाटगाडगं देखील फिरत होतं......
आणि एकदिवस अचानक त्याचा मेल आला...
मी घोळ घालून ठेवला आहे. माझ्या बायकोने तुझे माझे whatsaap वरचे chats बघितले. तसं मी नेहेमी डिलीट करतो ग. पण काल राहिलं आणि तिने माझा फोन हाताळताना तुझ नाव वाचून आपलं chat उघडलं आणि बघितलं. आपल्या साध्याच गप्पा होत्या नेहेमी प्रमाणे. पण मी तुझा उल्लेख 'राणी', 'सोन्या', 'डार्लिंग' असा केलेला तिने बघितला आणि मग घरात तिसरं महायुद्ध झालं. तिने लगेच आई-बाबांना फोन करून सांगितलं. त्यांना हे माहित आहे की आपण अधून मधून बोलतो; पण तरीही त्यांना देखील या असल्या गप्पा पटल्या नाहीत. त्याचं देखील बरोबर आहे न; आपली जी आणि जशी मैत्री आहे ती सहसा कोणाला पटणार नाही. म्हणून त्यांच्या समाधानासाठी तुला एक whatsaap मेसेज करोतो आहे.
आणि त्याचा whatsaap वरचा मेसेज होता.....
आपल्यामध्ये जी काही मैत्री or जे काही होतं ते सगळं मी थांबवतो आहे. ह्या पुढे मी तुला कुठलाही मेसेज, chat or इतर काहीही contact करणार नाही. good bye
तिला धक्का बसला.... पण क्षणभरात तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्या मेसेजला उत्तर लिहीलं.....
जे काही होतं? अरे आपली एक चांगली healthy मैत्री आहे. किंवा होती म्हणू. हे अचानक काय आलं? पण ठीके! नाही बोलायचं तर नको. तू माझ्याशी किंवा मी तुझ्याशी न बोलल्यामुळे आपलं आयुष्य थांबणार नाही आहे. किंवा बोलल्यामुळे आयुष्य वेगळं देखील होणार नाही आहे. मुळात आपण असं किती बोलतो रे; की बोलणं थांबवायचा मेसेज तू करोत आहेस? एक लक्षात घे मी एक सुखी सांसारिक स्त्री आहे. तुझे आई-वडील आणि माझा नवरा एकमेकांशी का comfortable होऊ शकले नाहीत ते मला माहित नाही. त्यामुळे माझं देखील तुझ्या आई-वडिलांशी बोलण थांबलं... पण असं का झालं ते मी त्यांना देखील कधी विचारलं नाही. बरं; थट्टा, मस्करी, गप्पा याव्यातीरिक्त आपण नक्की काय बोलतो रे की तू म्हणावस की जे काही होतं? अरे माझा मुलगा आणि नवरा देखील माझा मोबाईल हाताळतात आणि माझी त्याबद्दल काही हरकत देखील नाही. ते दोघे फोन घेतात म्हणून मी कधी तुझे मेसेज डिलीट नाही करत. तुझा हा मेसेज बघून त्यांचा काही गैरसमज होऊ शकतो ना. किमान १० वेळा विचार करायचास की रे मेसेज करताना. बरं; फक्त तुझ्या माहितीसाठी सांगते आहे... मी हे मेसेज पण डिलीट नाही करणार. जर त्यांनी बघितले आणि काही विचारलं तर मी स्पष्ट सांगीन की आम्ही बोलायचो.. आणि त्याने असा अचानक हा मेसेज का पाठवला त्याचं त्याला माहित. तुला माझी बाजू सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा मेसेज करते आहे. good bye
तिने whatsaap बंद केला आणि तशीच स्वस्थ बसून राहिली. तिला फार वाट बघायची गरजच नव्हती. मेल आल्याचं तिच्या मोबाईलने लगेच ओरडून सांगितलं तिला. तिने हसतच inbox उघडलं.
अग हा काय मेसेज केलास? मी फक्त त्यांच्या समाधानासाठी मेसेज करतो आहे असा मेल केला होता तो बघितला नाहीस का? रागावली आहेस का राणी? खरंच बोलायचं नाही का आपण आता? अर्थात तू अस ठरवलं असलंस तर तुझं देखील बरोबर आहे म्हणा. हे असं खोटं बोलून नाव नसलेलं नात जर तुला पटत नसेल तर मी तुला काहीच प्रश्न नाही विचारणार.
ती हसली. मात्र त्याचा उतरलेला चेहेरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिने घाईघाईने रिप्लाय केला.
वेडा आहेस तू अगदी. माझ्या मेसेजने तू जर गडबडला आहेस तर नक्कीच त्याचा योग्य तो परिणाम इतरांवर झाला असेल न? मला कळतं रे; की नाही पटणार तुझ्या घरच्यांना हे असं आपलं बोलणं. ही मैत्री स्वीकारणं अवघड आहे सगळ्यांना. तो मेसेज करताना देखील मला मनातून वाटत होतं की खरं तर हे असं काहीतरी एक बोलायचं आणि वेगळंच वागायचं मला पटत नाही. तसा माझा काय आणि तुझा काय स्वभाव नाही. पण कोणालाही काहीतरी सिद्ध करून दाखवण्यापेक्षा.... आणि काय पटतं आहे किंवा नाही याहीपेक्षा तुझं माझ्या आयुष्यात असणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तुझं मन देखील हेच सांगतं आहे तुला याची मला खात्री आहे. त्यामुळे आता फार विचार करू नकोस. झालं गेलं संपलं ते सगळं. बस! आता मात्र काळजी घे.
तिचा मेल वाचून तो विसावला आणि मग त्याचं उत्तर आलं तिच्या मेलला....
आठवतं का ग असंच एकदा आपण गप्पा मारत होतो; तेव्हा कधीतरी मी तुला विचरलं होतं 'काय नाव द्यावं आपल्या या नात्याला?' आणि तू म्हणाली होतीस 'या नात्याला नाव नको देऊया.' पण आत्ता माझ्या मूर्खपणामुळे ज्या काही घटना घडल्या आणि तू मला सावरून घेतलंस.... आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे... तू का सावरून घेतलंस याचं कारण सांगितलंस आणि मनात आलं खरंच काही नाव का नसावं ह्या नात्याला? किंवा काय नाव देता येईल ह्या नात्याला? तसं आपल्या सामाजिक परिस्थितीत आपलं हे नातं कुठेच बसत नाही. म्हणजे 'खूप चांगली मैत्री'च्या बरंच पुढे 'girlfriend - boyfriend' च्या देखील पुढे गेलंय हे नातं. तरीही अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नात्यापर्यंत पोहोचू न शकणारं असं हे विलक्षण साधंसं आणि तरीही गुंतागुंतीचं........ भावनिक आणि तरीही सुंदर........... नातं आहे हे. मग मनात विचार आला ह्या विलक्षण नात्याला नाव देखील तेवढंच विलक्षण हवं. नाव असावंच असं नाही, पण काय आहे न आपलं दोघांचं हे नातं खरंच खूप सुंदर आहे. इतकी वर्ष होऊनही तेवढंच जिवंत आणि तरुण आहे. ना कधी भांडण ना वाद... हा; एखादा विषय पटला नाही तर चर्चा होतेच की आपल्यात.... तू तुझा मुद्दा सोडत नाहीस आणि मी माझा... पण ते तेवढ्या पुरतंच असतं; आणि दोघांनाही त्याची पूर्ण जाणीव असते. एक वेगळीच समज आहे या नात्याला. मग अशा या नात्याला नाव पण तसंच हवं न.
विचार करताना मनात आलं एक नाव.... red wine नातं! रुढार्थाने कोणत्याही नात्याच्या अटींमध्ये न बसणारं आणि एकमेव असं हे नातं आहे. आता जर हे नाव मी देतो आहे तर त्याचं कारण देखील तुला सांगितलं पाहिजे न.... हेच नाव का ते सांगू?
एकतर; red wine आपल्याला दोघांना आवडते. बर wine घ्यायला काळ वेळ लागत नाही. तरीही जेव्हा wine घेतली जाते ती वेळ खास असते. आपलं पण असंच आहे न... केव्हाही आणि कुठेही भेटलो तरी ती जागा आणि ती वेळ खास होते. red wine मध्ये एकूणच elegance आहे, नाजुकपणा आहे. wine घेताना ती कधीच संपू नये असं सारखं वाटत असतं. तसंच आपल्या नात्यात आहे. एक elegance आहे... एक नाजुकपणा आहे आपल्या नात्यात..... आणि भेटलो की ती भेट संपूच नये असं वाटतं. बियर म्हंटलं की विजय मल्ल्याची किंगफिशर आणि त्याची जाहिरात करणाऱ्या अल्पवस्त्रांकित ललना डोळ्यासमोर येतात. त्यामुळे तू आणि बीअर असा विचार कधी मनाला नाही शिवला. red wineचं तसं नाही. red wine म्हंटलं की एक शांत संध्याकाळ.... मावळतीचा सूर्य किंवा एखादी पौर्णिमेची रात्र आठवते. समोर अथांग समुद्र... जो आपल्याला दोघांना आवडतो.... आणि माझ्या शेजारी संपूर्ण पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये केस मोकळे सोडून बसलेली तूच आठवतेस. अजून एक कारण हेच नाव देण्याचं. red wine चा लाल रंग; तू असलीस की सगळं कसं गुलाबी होतं न... हा गुलाबी रंग पण त्या लाल रंगात मुरला आहे. एक अजून, red wine ची चव बराच वेळ रेंगाळते.... तुझ्या आठवणी सारखी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे wine ला expairy date नसते.... उलट ती जितकी जुनी तेवढीच तिची चव मुरते.... तिचा elegance वाढतो आणि रंग गहिरा होत जातो.
राणी; आज या नात्याला नाव देताना मनातून समाधान वाटतं आहे.... खूप काहीतरी शांत झालं आहे मनात. माझं माझ्या आयुष्यावर.... आई-बाबांवर आणि बायकोवर जितकं प्रेम आहे न तितकंच ते तुझ्यावर देखील आहे.... हे 'red wine' नातं खूप खूप खास आहे माझ्यासाठी............. अहं................. आपल्यासाठी!!!
***